संपादकीय

एक गोष्टीवेल्हाळ वाचकाग्रणी 

 पालघर येथील सुधीर दांडेकर अंतर्नाद वाचकांना एक व्यासंगी लेखक म्हणून  सुपरिचित आहेत. या नोव्हेंबरच्या अंकातदेखील त्यांचा एक अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळेल.  सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक घटनांचा वेध घेण्याची त्यांची एक निराळी पद्धत आहे.  अशा प्रकारचा वेगळा विचार करण्यासाठी आवश्यक असणारे वाचन आणि चिंतन ते विपुलपणे करत असतात.  त्यांचा स्वतःचा खूप मोठा असा पुस्तक संग्रह आहे. त्याचबरोबर गेली सुमारे पन्नास वर्षे वृत्तपत्रांत येणाऱ्या विविध विषयांवरील महत्त्वाच्या बातम्यांच्या कात्रणांचे संकलन त्यांनी केले आहे. त्यांची व्यवस्थित प्रतवारी करून त्यांचे जतनही केले आहे.  भारतीय लोकांची दस्तऐवज जतन करण्याबाबतची अनास्था सर्वश्रुत असताना त्यांचे हे काम महत्त्वाचे आहे.

पालघर येथील कला साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. ‘वाचक आपल्या भेटीला’ हे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी नुकतीच सुधीर दांडेकर यांची एक वाचक म्हणून मुलाखत घेतली आहे. त्यात दांडेकरांनी आपला वाचक म्हणून झालेला प्रवास उलगडून दाखवला आहे. त्यांची साठी ज्या वेळी झाली त्या वेळी त्यांनी एक अत्यंत वेगळा उपक्रम राबवला होता.  कार्यक्रमाच्या ठिकाणी चक्क एक पुस्तकांचा स्टॉल लावलेला होता.  त्या स्टॉलवर राजहंस प्रकाशनाची व इतर महत्त्वाच्या प्रकाशनांची पुस्तके ठेवलेली होती. उपस्थितांना  परत भेट म्हणून या स्टॉलवरची त्यांच्या आवडीची काही पुस्तके घेण्याची मुभा होती.  या त्यांच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. 

  आपल्या वाचनप्रेमाचे श्रेय ते वडिलांना व त्यांनी घरात जाणीवपूर्वक जपलेल्या वाचन संस्कृतीला देतात.  त्या काळात ते मुंबईच्या ख्यातनाम एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाचे सदस्य होते. ते मुंबईबाहेर राहत असल्याने त्यांना एका वेळी दहा ते बारा पुस्तके घरी नेण्याची परवानगी होती.  वडिलांना वाचताना पाहणे हा संस्कार महत्त्वाचा असतो असे दांडेकर यांचे सार्थ सांगणे आहे. एका सुट्टीत वडिलांनी घेऊन दिलेली ह. ना.आपटे यांची ‘उषःकाल’ ही कादंबरी हे मी वाचलेले पहिले पुस्तक असे त्यांनी सांगितले. 

नुसतं, ‘पुढची पिढी वाचत नाही हो!’ असे  निःश्वास सोडून काही होणार नाही. घरात आपण विकत घेतलेली दहा-बारा पुस्तके ठेवली पाहिजेत. आपण स्वतः मुलांसमोर वाचले पाहिजे आणि मुलांनीदेखील वाचावे म्हणून त्यांना प्रवृत्त केले पाहिजे असे ते सांगतात. 

  समाज माध्यमांचा प्रभाव अत्यंत तात्कालिक असतो. त्यात कसलेही ज्ञानसंपादन होत नाही.  समाजमाध्यमावर वाचलेला मजकूर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ लक्षात राहत नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. पुस्तक वाचनातून येणारे ज्ञान वेगळ्या प्रतवारीचे असते.  ते आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते आणि त्यामुळे ते दीर्घकाळपर्यंत लक्षात राहू शकते.

    इतिहास आणि पुरातत्त्व हे दांडेकरांचे आवडीचे विषय.  या विषयांवरची उत्तमोत्तम पुस्तके मिळवून, ती विकत घेऊन ते वाचतात.  त्यांतील अवतरणे व अनुभव  लिहून काढतात. 

 विदेशी लोकांनी भारताची लिहिलेली प्रवासवर्णने त्यांना आवडतात. स्थळदर्शनाबरोबरच तत्कालीन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थितीचे एक वेगळे दर्शन त्यातून घडते असे ते सांगतात.

वाचन संस्कृतीच्या ऱ्हासाविषयी आपल्याला चिंता वाटत असताना सुधीर दांडेकर यांच्यासारख्या सजग वाचकांच्याकडे पाहिले, की एक प्रकारे धीर येतो.  पालघरत हीच वाचन संस्कृती टिकावी   व वाढावी यासाठी ते व त्यांचे पालघर येथील सहकारी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना पुस्तके मिळावीत म्हणून पुस्तक दानपेटीचा उपक्रम, पुस्तक भिशी,वाचन कट्टा हे यांतील काही उल्लेखनीय उपक्रम. 

 भोवतालाविषयी असलेले कुतूहल जपा आणि ते शमविण्याचाही प्रयत्न करा.   तुमच्या लक्षात येईल पुस्तकांची  यामध्ये खूप मदत होते असे ते आजच्या तरुणाईला आवर्जून सांगतात. 

Author

One thought on “संपादकीय

  1. बहुआयामी दादा दांडेकर यांच्या वाचन प्रेमाची ओळख करून देणारा छान लेख. संपादकांना हार्दिक धन्यवाद.

Leave a Reply