शंकुकाव्य

या काव्यप्रकाराचा  उगम हल्लीचाच असावा. पहिल्या ओळीत जितकी अक्षरं असतात त्यापेक्षा एक अक्षर कमी दुसऱ्या ओळीत, असं एक-एक अक्षर कमी कमी करत शेवटी एका अक्षरावर यायचं. त्यामुळे काव्याचं रूप शंकूसारखं निमुळतं दिसतं.

या बंधात्मक प्रकाराचा प्रयत्न केला आहे. मला एकच नियम माहीत आहे — अक्षरसंख्येचा. जाणकारांनी आणखी नियम सांगितले तर फारच आनंद होईल.  पहिली ओळ २४ अक्षरांची आहे. मग २३,२२ असं करत एकावर आले आहे. 

जोडाक्षरं एकच अक्षर म्हणून धरलेली आहेत.

विषय

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक पू.के.वि. बेलसरे (बाबा) यांनी लिहिलं आहे, त्यांनी एकदा गुरूंना विचारलं, “हल्लीच्या तरुण पिढीला आत्म्याचं वर्णन करणारा ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि’ हा श्लोक कसा शिकवावा?”

तेव्हा  गुरू पू. गोंदवलेकर महाराजांनी विचारलं, “हल्लीच्या मुलांची आवड काय?”

बाबा म्हणाले, “सिनेमा”

महाराज म्हणाले, “सोपं आहे मग! त्यांना सांगावं, चित्रपटात पाऊस पडतो…  त्यानं पडदा भिजतो का? चित्रपटात आगीचं दृश्य असतं त्यानं पडदा जळतो का? नाही ना? तसा आत्मा आहे. सर्वसाक्षी.”

हा बंध लिहायचा विचार केला तेव्हा  साधं निसर्गवर्णन करायचं इतकंच मनात होतं; पण ते वेगळ्या दिशेनं गेलं. 

—————————————————

शंकुकाव्य  पडदा

निळाशार कधी काळाभोर भासणारा तो आकाशाचा कोरा पडदा

येतात जातात निरनिराळी पात्रे, सूर्य चंद्र ढग नि  चांदण्या 

उन्हाचे पसरलेले पंख, झाकोळणारी निवळणारी अभ्रं 

सारं  न्याहाळत असतो पडदा वरून  निरंतर   स्थिर 

पांढरंफेक  हसत  चांदीचे  किरण  सांडतो  चंद्रमा 

पसरलेलं  दुधाळ  गारुड  आवरत  लुप्त  होतो 

काळी रात्र दबत आणते  भयाचे तीव्र शहारे

सुखाची चांदणनव्हाळी सारी करपून जाते 

पडदा  असतो  बघत  सारं अलिप्त स्थिर 

ना सुखावलेला ना कधी होत तो बधिर 

ढगांचा  संथ  तरंगता  शुभ्र   कापूस  

काळ्या हत्तींची झुंज नि गडगडाट 

चांदण्यांचा मृदुल शीतळ शेला  

किंवा चमकदार उल्कापात 

दिमाखदार बलाकमाला

सोयर ना सुतक त्याला

चमत्कारिक   पडदा 

व्यापून सगळ्यांना

तरीही   निर्लेप 

नवी  जाणीव 

ऐसा आत्मा? 

हो मर्त्या 

तैसा 

मी

Author

Leave a Reply