पुनरपि जननं : प्रकरण नववे

   अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला, की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण नववे

 – संपादक

पुनरपि जननं

प्रकरण नववे

प्रशिक्षण

आरुषीला अकादमीत येऊन आता वर्ष होत आलं होतं. ती तिथे आता छान रुळली होती आणि तिथल्या दिनचर्येत तिचे दिवस मजेत जात होते. गेल्या अकरा महिन्यांत तिची उंची वाढली होती, तिच्या कांतीला सोनेरी झळाळी आली होती, तिचे लांब केस एखाद्या वाहत्या सोनेरी झऱ्यासारखे झाले होते, तिच्या पंखांची रुंदी पूर्ण वाढली होती आणि त्यांचा रंग गडद जांभळा झाला होता. तिच्या सुंदर चेहऱ्यावर मात्र अजूनही लहानपणीचा निरागसपणा होता. चेहऱ्यावर तिच्या वडिलांची झाक होती पण डोळे मात्र आईचे होते – मोठे, खोल डोळे ज्यांत तिच्या विचारी आणि सदसद्विवेकी मनाचं प्रतिबिंब स्वच्छ पडलेलं दिसे.

अकादमीत तिला बऱ्याच नव्या मित्र-मैत्रिणी मिळाल्या होत्या. त्यांच्याबरोबर ती वनात फिरायला, नदीवर सर्फिंग करायला आणि तलावांवर   उडायला जायची. ती सगळी मुलं नेहमीच अत्यंत उत्साही आणि सक्षम असायची. त्यांना स्वतःच्या शारीरिक शक्तीची कल्पना तर येत होतीच; पण त्याचबरोबर त्यांच्या मनात नवीन इच्छादेखील जागृत होत होत्या. त्यांच्या तरुण शरीरांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्या अननुभवी  मनाला कधीकधी समजतही नसत. बऱ्याचदा शरीर आघाडीवर आणि मन त्याच्या मागेमागे असण्याचा काळ होता तो.

सेनेट तलावावर काही मित्र-मैत्रिणींबरोबर ती सर्फिंग करायला गेली होती तेव्हा ते घडलं. स्वयंचलित मोटरबोटींच्या मागे बांधलेल्या सर्फिंग बोर्डांवर उभे राहून ती मुलं भरधाव  वेगाने पाण्याच्या पृष्ठभागावरून जात होती आणि एरव्ही स्तब्ध असलेला तो तलाव त्यांच्या हसण्याने आणि आनंदाच्या आरोळ्यांनी गजबजून गेला होता. पाण्याचे तुषार चेहऱ्यावर झेलत आणि पाण्यावरून वेगाने पुढे जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेत आरुषी पुढे जात होती. तिचे पंख पसरलेले होते आणि केस मागे वाऱ्यावर भुरभुरत होते. जयंतने मारलेली हाक ऐकून तिने मागे वळून पाहिलं आणि तो तिच्या मागून येत असलेला तिला दिसला. ती त्याच्याकडे पाहून हसली आणि तिने आपला वेग थोडा कमी केला. तो जवळ आला आणि तिचं सडपातळ शरीर त्याने कवेत घेतलं. एक प्रकारचा उबदार प्रकाश अंगभर पसरत असल्याचं आरुषीला जाणवलं. त्याला आणखी जवळ येता यावं म्हणून तिने आपले पंख हळूच मिटून घेतले. थोडं पुढे झुकून त्याने आपले ओठ तिच्या गालावर टेकवले.

“आपण बेटावर जाऊ या,” तळ्याच्या मध्यावर उंच गवताने आच्छादलेल्या बेटाकडे निर्देश करत जयंत म्हणाला. तिथल्या झाडांच्या दिशेने काही जोडपी आधीच निघालेली आरुषीला दिसली. तिची जिवलग मैत्रीण अँजेलिना डेव्हबरोबर होती. आरुषी आणि जयंत हळूहळू बेटाजवळ आले. त्याच्या हातांची मिठी अजूनही तिच्या भोवती होती. काठावरचे दगड ओलांडताना त्याने हळुवारपणे तिला आधार दिला आणि ते दोघे काही झुडुपांच्या आडोशाला गेले. आरुषीला थोडा संकोच वाटत होता. जयंतला ती लहानपणापासून ओळखत होती. तो तिच्या प्रियकरांपैकी एक असेल असं तिला नेहमीच वाटलं होतं; पण ते असं इतक्या अचानकपणे होईल याची तिने कल्पना केली नव्हती. तिला ते एकाच वेळी हवं होतं आणि नकोही वाटत होतं. 

थरथरत्या हातांनी आणि थोड्या उतावळेपणाने जयंतने आरुषीचा पाण्याने भिजलेला झगा उतरवला आणि मग स्वतःचे कपडे काढले. तिचे सोनेरी केस ओले होते आणि तिच्या शरीराला चिकटले होते. बोटांनी तिच्या ओठांना स्पर्श करत आणि तिचे केस चेहऱ्यावरून बाजूला सारत जयंतने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांचे पुढचे काही क्षण उत्कट प्रणयाचे होते. 

धाडसी आणि रोमांचकारी घडामोडींनी भरलेल्या दिवसानंतर आरुषी अकादमीतल्या आपल्या घरी परतली तेव्हा रविअस्त होऊन गेला होता. तिला थोडं विचित्र वाटत होतं. एका पुरुषाला स्पर्श करू दिल्यामुळे, थोडसं मोठं झाल्यासारखं. पण तो उंबरठा ओलांडल्यामुळे तिला एका प्रकारे बरं वाटत होतं. आता आयुष्यातील इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला ती मोकळी होती. 

_______________________________________________________________________________________________

पृथ्वी मोहिमेचं प्रशिक्षण चालू राहिलं आणि प्रत्येक सहामाहीत अधिक अवघड होत गेलं. भौतिक शास्त्र आणि कॉंप्युटेशन शाखेतील प्रशिक्षण आरुषीला आवडायचं; पण दमवून टाकणाऱ्या कवायतीचा तिला कंटाळा यायचा. बहुतेक वेळा संध्याकाळपर्यंत ती इतकी दमून जायची, की तिच्यात करमणुकीच्या खेळांसाठी शक्तीच उरलेली नसायची. आपल्या खोलीत जाऊन, अंथरुणावर पडल्या पडल्या कॉम चालू करून आईशी संपर्क साधायला तिला आवडायचं. आई मग हळू आवाजात गाणी म्हणायची आणि ती ऐकता ऐकता आरुषीला झोप लागायची.

रविउदय व्हायच्या साधारण तासभर आधी ती उठायची. प्रातःकालपूर्व प्राशन करून ती तासभर व्यायाम आणि ध्यान-धारणा करायची. मग अंघोळ करून ती तिच्या हॉस्टेलच्या मित्रमैत्रिणींबरोबर उन्ह खायला जायची. हा दिवसभरातील सर्वात मजेचा काळ असायचा. ती सगळी मुलंमुली गप्पा मारायची, एकमेकांची थट्टा करायची आणि आपापल्या अभ्यासाच्या तुकडीच्या बातम्या एकमेकांना सांगायची आणि मग ते सगळे अकादमीत जायचे.

पहिला तास बहुतेक सिम्युलेटरमध्ये असायचा. पृथ्वीवरच्या वातावरणासारख्या कृत्रिम रीतीने तयार केलेल्या वातावरणात तंत्रज्ञानाशिवाय जगण्याचा, पाणी स्वच्छ करून पिण्यायोग्य करण्याच्या प्रक्रियांचा, हिंस्र पशूंचा प्रतिकार करण्याचा आणि संपर्काच्या अनेक साधनांचा सराव करण्यात ते बराच वेळ घालवत. 

त्यानंतरचा तास बहुतेक जीवविज्ञान केंद्रात असे. तिथे त्यांना अधिक प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी इंजेक्शन दिले जाई. तिथल्या अंथरुणात पडल्या पडल्या आरुषीच्या मनात अनेकदा विचार येई, की कोण जाणे प्रत्यक्षात पृथ्वीवर पोचल्यावर त्यांचं आयुष्य सिम्युलेटरमध्ये तयार केलेल्या देखाव्याशी कितपत समांतर असेल! तिथे पोचल्यावर तो ग्रह त्यांचं कसं स्वागत करेल? अर्थात तिथे जाणाऱ्या दलात तिची निवड झाली तरच्या या गोष्टी! तिला मनापासून जावंसं वाटत होतं. प्रकल्पाविषयी तिला जितकी अधिक माहिती मिळत गेली आणि साक्षात्कारपूर्व मानवाचा इतिहास जेव्हा तिने आणखी अभ्यासला तशी त्या ग्रहावर पाऊल ठेवण्याची तिची उत्सुकता आणखी बळावली. 

पृथ्वीविषयी हे आकर्षण तिच्या मनात केव्हा अंकुरित झालं होतं? कदाचित आईबरोबर घराच्या छतावर लावलेल्या दुर्बिणीतून बघत जे अनेक तास घालवले होते तेव्हाच. आई तेव्हा त्या प्राचीन संस्कृतीच्या कथा सांगायची… शास्त्रीय जग चुकीच्या मार्गाला लागलं आणि त्या ग्रहावरील मानवजात नष्ट होण्यास कारणीभूत झालं त्या जगाच्याही पूर्वीच्या कथा. अनेक वर्षांच्या युद्धानंतर आणि क्रौर्यानंतर त्या ग्रहावर आता काय उरलं असेल याचा ती विचार करत बसायची. 

दुपारची वेळ बहुधा शिक्षकांबरोबर भौतिक शास्त्र, गणित, कॉंप्युटेशन आणि जीवशास्त्रासारखे मूळ विषय शिकण्यात जाई. अकादमीतला शेवटचा तास साक्षात्कारपूर्व इतिहास किंवा प्राचीन भाषांच्या आकलनाचा असे.

सुटीच्या दिवशी आरुषी बर्‍याचदा जयंतला भेटे. ते दोघेही जरी पृथ्वी प्रकल्पाचे प्रशिक्षण घेत असले तरी त्यांचे अभ्यासाचे गट वेगळे होते. वीकेंडला ते खेळासाठी जवळच्या केंद्रात जात किंवा जवळच्या गावाच्या मार्केटपर्यंत उडत जाऊन तिथल्या करमणुकीच्या केंद्रात दिवस घालवत. जेव्हा ते एकांतात भेटत, तेव्हा त्यांचा प्रणयदेखील ठरावीक असे. बहुतेक सगळेच या अवस्थेतून जात होते.
 

एक दिवस शेवटचा तास संपत आल्यावर जीवविज्ञान केंद्राच्या प्रोफेसरांकडून आरुषीच्या कॉमवर एक संदेश आला. पुढच्या आठवड्यात तिला प्रतिकारशक्ती वाढवणारा एक पॅच मिळणार होता. तो तिला आठवडाभर दंडावर लावावा लागणार होता आणि त्या दरम्यान शारीरिक श्रम न करता तिला विश्रांती घ्यावी लागणार होती. मिनिटभरात आरुषीच्या लक्षात आले की सहामाहीच्या मध्यावर तिला एक प्रकारची अनपेक्षित सुटीच मिळत होती. आपल्या खोलीवर गेल्यागेल्या तिने आईशी संपर्क साधला. 

“मी आठवडाभरासाठी घरी येते आहे,” आई स्क्रीनवर दिसल्या-दिसल्या तिने आनंदाने घोषणा केली. 

“कधी? परीक्षा संपेपर्यंत आभासी भेटदेखील शक्य होणार नाही असं म्हणाली होतीस तू.”

“हो, पण प्रतिकार शक्तीचा पॅच लावल्यावर मला आठवडाभर विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि मी घरी येऊन नुसता आराम करणार आहे.”

“मग तर छानच आहे, बिट्टू! तुला घ्यायला झिप्पर पाठवू का? कधी निघू शकतेस तू?”

“ते उद्या सांगेन तुला. अजून सगळा तपशील माहीत नाही मला.”

“तू लवकरच भेटणार म्हणून मला किती आनंद झाला आहे सांगू बिट्टू! मी वाट बघेन तुझी.”

आरुषीला पण तेवढाच आनंद झाला होता. हे तर अगदी लहानपणासारखं होणार! आरुषीने आयुष्याची पंधरा वर्षं ज्या घरात घालवली त्या घरात जरी आई आता राहत नसली तरी आई जिथे असेल ते आरुषीच्या दृष्टीने घर होतं. पपाला पण बोलावून घ्यावं म्हणजे सगळ्यांना एकत्रितपणे एक आठवडाभर राहता येईल असा विचार आरुषीच्या मनात आधी आला; पण मग तिला त्याचा राग आणि अबोला आठवला आणि त्यामुळे आईला त्रासच होईल असं तिला वाटलं. जाऊ दे, ही सुटी फक्त आईसाठी असेल. परीक्षा संपल्यावर पपाला भेटता येईल आणि तेवढे श्रम घ्यायची परवानगी असेल तर घरी गेल्यावर पपाला आभासी भेट देता येईलच. तिला एकदम सुटसुटीत आणि आनंदी वाटलं आणि मनात सोनेरी प्रकाश आठवून ती झोपी गेली.

________________________________________________________________________________________________

तीन दिवसांनी जेव्हा आरुषी घरी पोचली तेव्हा तिला आई खूप उत्साही आणि आनंदी दिसली. तिच्या नव्या घरात आणि नव्या दिनचर्येत ती चांगली रुळलेली दिसली. लेकीची सुटी जास्तीत जास्त आरामशीर करण्यासाठी तिने आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. पण पहिले दोन दिवस आरुषीला खूप झोप येत होती आणि बहुतेक वेळ ती अंथरुणात पडून  विश्रांती घेत राहिली. गाढ झोपेतून स्वप्नात, स्वप्नातून जागृतीत आणि पुन्हा झोपेत शिरत राहिली. तिसऱ्या दिवशी तिला बऱ्यापैकी हुशारी वाटू लागली आणि अकादमीतल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिने आईला सांगितल्या.
 

“तू जयंतला डेट करत आहेस तर,” आरुषीच्या सगळ्या करमणुकीच्या गोष्टींत त्याचं नाव सारखं सारखं येताना ऐकून आईने ओळखलं.

“हो, तो तसा ठीक आहे.”

“छान. एकमेकांची काळजी घ्यायला शिका,” आई म्हणाली.

“आणि तू अजून पपाशी बोलते आहेस का?” आरुषीने विचारलं. प्रौढावस्थेचा उंबरठा आता तिने ओलांडला असल्यामुळे हा प्रश्न आईला विचारताना तिला आता संकोच वाटला नाही. 

“हो तर, आमच्या आभासी भेटी होत असतात. खरं म्हणजे मी तुला चकित करण्यासाठी म्हणून बोलले नव्हते, पण आता सांगते – पपा उद्या तुला भेटायला येणार आहे. तुला त्यालापण भेटावसं वाटत असणारच, म्हणून तू येणार हे कळल्यावर मी त्याला तसं सांगितलं. तो म्हणाला, की तो इथे येऊन राहील म्हणून.”

“माझ्या निर्णयाबद्दल अजून त्याच्या मनात राग आहे का?”

“अजून काही तो तुझ्या निर्णयाचं कौतुक करण्याच्या टप्प्यापर्यंत पोचलेला नाही, पण मला नाही वाटत त्याच्या मनात आता तेवढा राग असेल; पण तो इथे असेपर्यंत प्रकल्पाच्या प्रशिक्षणाबद्दल जास्त बोलूच नकोस. तुझ्या अभ्यासाच्या इतर गटांबद्दल सांग त्याला.”

आईला अर्थातच पपाशी वागताना तोल कसा सांभाळायचा हे माहीत होतं आणि या वेळेस तिचा सल्ला तंतोतंत पाळण्याचं आणि त्याच्याशी उगीच वाद न घालण्याचं आरुषीने ठरवलं.  

उरलेला आठवडा भर्रकन निघून गेला. पपा चांगल्या मूडमध्ये होता आणि आई अर्थातच नेहमीसारखीच होती आणि म्हणून आरुषीला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं आणि सुटीचे शेवटचे दोन दिवस तिने अतिशय मजेत घालवले. पपा आणखी काही दिवस आईबरोबर राहणार आहे हे कळल्यावर तर तिला आणखीच आनंद झाला. ती स्वतः अकादमीत नवनवीन धाडसांना सामोरी जात असताना घरी आई आणि पपा एकत्र असले, की तिला बरं वाटायचं.

_______________________________________________________________________________________________

दोन महिन्यांनी शक्तिवर्धक पेयांचा आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचा परिणाम जाणवू लागला. आरुषीला कायम खूप उत्साही आणि सशक्त वाटू लागलं. न दमता तिला लांबवर उडून जाता येऊ लागलं. पृथ्वीच्या मॉड्यूलमध्ये करायच्या रोजच्या कवायती आता कंटाळवाण्या वाटत नव्हत्या. विद्यार्थ्यांना आता चार किंवा पाचच्या आणि क्वचित आठ जणांच्या गटांत प्रशिक्षण देण्यात येत होतं. सिद्धांतात्मक विषयांचं शिक्षणपण अधिक खोल आणि रोचक होऊ लागलं होतं. या सगळ्यामुळे आरुषीच्या एका मनस्वी, भावुक मुलीच्या व्यक्तिमत्त्वाचं रूपांतर एका विचारी आणि प्रतिभावंत स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात होत होतं.

पण आता आरुषीला दिवसाचे अनेक तास आणि कधीकधी रात्रीपण प्रशिक्षण घ्यावं लागत असल्याने आई मात्र आता तिची जास्त काळजी करत होती. आईला आपली मुलगी अजून लहान आणि नाजूक आहे असंच वाटत होतं. आरुषी जेव्हा प्रशिक्षणासाठी आकाशगंगा प्रवास केंद्रात गेली तेव्हा तिची काळजी आणखी वाढली. पृथ्वीच्या कठोर वातावरणात संरक्षण देण्यासाठी जे फुगे तयार करण्यात आले होते त्यात प्रशिक्षण घेणाऱ्या दलाच्या सदस्यांना तासन्‌तास  घालवावे लागत होते. हे फुगे म्हणजे साध्या हवेचे मोठाले गोळे होते आणि प्रत्येक गोळ्याभोवती प्रचंड शक्तीच्या कणांचं आवरण होतं. हे आवरण आत बसलेल्या व्यक्तीला जंतू, हिंस्र प्राणी किंवा जोराचा वारा, वीज आणि आगीपासून संरक्षण देणार होतं. या संरक्षण देणाऱ्या फुग्यांच्या आवरणाने वेढलेलं असताना हालचाल करण्याचा आणि उडण्याचा सराव या दलातील व्यक्तींना करायचा होता. हे फुगे जरी चेंडूसारखे टप्पे खात असले तरी त्यांच्या आवरणामुळे उडताना फार अडथळा व्हायचा. 

पृथ्वीवर मध्यम अंतरावरचा प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आलेले ड्रोन उडवण्याचं शिक्षणदेखील दलातील व्यक्तींना देण्यात येत होतं आणि अवकाशयान कसं कार्य करतं याचं शिक्षण त्यांना वर्गात देण्यात येत होतं. 

आरुषीला रोज इतकी नवीन नवीन माहिती मिळत होती, की संध्याकाळी जेव्हा ती आईशी बोलत असे तेव्हा तिच्या डोक्यात नव्या कल्पनांची आणि प्रश्नांची नुसती गर्दी झालेली असे. मग मोठे होण्याच्या सामान्य प्रक्रियेत कोणत्याही अठरा वर्षांच्या मुलीच्या मनात कधीही उद्भवले नसतील असे प्रश्न ती आईला विचारायची. एका जगावेगळ्या अनुभवाला सामोरे जाण्यासाठी तयारी करत असताना तिच्या मनाला तत्त्वज्ञानाचे काही खोल, मूलभूत प्रश्न भेडसावत होते.

“तुला काय वाटतं आई, आपण जेव्हा अंतिम विश्रांतीच्या स्थितीत जातो तेव्हा आपल्या अस्मितेचं काय होतं?”

“तू हे असले प्रश्न का विचारतेस, बिट्टू?”

“मी विचार करत होते. आज अकादमीत आम्हांला साक्षात्कारपूर्व मानवाला घडवणाऱ्या एका प्राचीन तत्त्वज्ञानाविषयी सांगितलं. त्या तत्त्वज्ञानाच्या काही शाखांच्या मते सगळे लोक मेल्यानंतर एक सर्वशक्तिमान देव प्रत्येक माणसाचा न्यायनिवाडा करतो. इतर काहींच्या मते जन्म आणि मृत्यू यांचं चक्र चालू असतं. प्रत्येक व्यक्तीच्या कर्माप्रमाणे तो जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो. ज्या काळात मानवी शरीर कसं काम करतं याची जुजबी माहितीसुद्धा मानवाला नव्हती त्या काळात हे सगळं त्यांना कसं सुचलं? किंवा कदाचित तेव्हा त्यांचं मृत्यूवर नियंत्रण नसल्यामुळे आयुष्य संपल्यानंतर काय होतं या विषयी ते जास्त विचार करत असावेत.”

“तू अशा ठिकाणी जाणार आहेस जिथे मृत्यू स्वेच्छेने स्वीकारता येत नव्हता. मला काळजी वाटते बिट्टू! स्वर्गात लागू होणारे जीवनाचे नियम जर पृथ्वीवर लागू होत नसतील तर?”

या असल्या बोलण्याकडे पपा दुर्लक्ष करायचा. एका निरुपयोगी प्रकल्पासाठी तिला प्रशिक्षण घेऊ दिल्याला तीन वर्षं होऊन गेल्यानंतर आपल्या मुलीच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा काय फायदा? असं त्याचं मत होतं. अर्थात प्रकल्पाविषयी आरुषीच्या मनात तिळमात्रदेखील शंका नव्हती. तिला फक्त कुतूहल होतं…खूप खूप कुतूहल होतं.

जयंतशी असलेल्या तिच्या नात्यात चढउतार होत होते. काही महिने सलग ते एकमेकांना डेट करायचे पण प्रशिक्षणानिमित्त जेव्हा ते बऱ्याच दिवसांसाठी एकमेकांपासून दूर जात तेव्हा त्यांचा संपर्क तुटलेला असे. अशा वेळी आरुषी इव्हानला आणि कधीकधी कायटोला पण डेट करी. तिच्या काही मित्रमैत्रिणींना आयुष्याच्या या टप्प्यावर आपसांतील ही नातीच सर्वात महत्त्वाची वाटत असत. आरुषीचं तसं नव्हतं. तिच्या पुरुष मित्रांची सोबत तिला आवडायची; पण त्याहीपेक्षा अधिक समाधान देणाऱ्या गोष्टीत तिला जास्त रस होता. तिला ज्ञानाची पिपासा होती आणि मिळवलेल्या ज्ञानावर ती खोल विचार करायची. प्रत्येक दिवस हा तिच्यासाठी एक नवीन शोध लागणारा प्रवास होता आणि तिचा प्रत्येक क्षण कुतूहलाने भरलेला होता. 

______________________________________________________________________________________________

“आज आम्ही साक्षात्कारपूर्व आजारांविषयी शिकलो, आई. ते सगळं फारच दुःखदायक आणि भीतिदायक होतं. लोक तेव्हा कुठल्याही वयात मरायचे. कधीकधी तर लहान मुलं पण मरायची. मुख्यतः पृथ्वीच्या ज्या भागात तंत्रज्ञान जास्त विकसित झालेलं नव्हतं त्या भागातले लोक लवकर मरायचे. लाखो मुलं आजारी पडून मरायची. ज्या भागांत तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं त्याच भागांत फक्त ते लोक आयुष्यभर सुदृढ राहू शकायचे आणि जेव्हा ते पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहगोलांवर वसाहतीसाठी गेले तेव्हा कुठे मानवाने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आत्मसात केली. किती विचित्र असेल नाही जीवन तेव्हा!”

आरुषी अकादमीतल्या आपल्या पलंगावर लोळत होती. तिच्या समोरच्या भिंतीवर तिच्या आईच्या घराचं दृश्य दिसत होतं आणि आई हातात एक स्क्रीन घेऊन तिच्या खुर्चीवर बसलेली दिसत होती. लेकीच्या निरागस चेहऱ्याकडे आणि झोप भरून आलेल्या डोळ्यांकडे प्रेमाने पहात आई तिचा झोपाळलेला आवाज ऐकत होती. 

“होय बिट्टू, जीवन खूप खडतर होतं तेव्हा. खूप कष्ट करावे लागत. पण कधी कधी मला असं वाटतं, की आयुष्य खडतर असल्यामुळे लोक एकमेकांची काळजी घ्यायचे. जगण्यातल्या अनिश्चिततेमुळे आतापेक्षा तेव्हा लोकांना एकमेकांची जास्त किंमत होती.”

“ओह, मला तुझी खूप किंमत आहे, आई.”

“मी सर्वसाधारणपणे म्हणत आहे. तुला अर्थातच माझी आणि पपाची किंमत आहे आणि मला तर तुझं प्रमाणापेक्षा अधिक मोल आहे. शेवटी, तू माझ्यातूनच जन्मली आहेस. तू म्हणजे मीच आहेस. पण उन्नयनपूर्व काळात एक लग्न नावाची प्रथा होती. निदान अंतिम युद्धात संस्कृतीचा विनाश सुरू होईपर्यंत  बहुतेक जण आपल्या जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ राहायचे.”

“ती प्रथा जास्त चांगली होती असं तुला वाटतं का? आणि एखाद्याला त्याच्या जोडीदाराचा कंटाळा आला म्हणजे?”

“पण तोच तर मुद्दा आहे. आपल्या आयुष्यात येणारे लोक काही नुसते मजा करण्यासाठी नसतात. त्यांच्या आनंदाचं उत्तरदायित्व आपलं असतं, असायला हवं.”

पण आरुषीला झोप लागली होती. आईच्या ते लक्षात आलं आणि तिने हलकेच स्क्रीनचा उजेड मंद केला. प्रेमाने आरुषीच्या कपाळाचा पापा घ्यावा, तिला उबदार पांघरूण घालावं, असं तिला वाटलं. पण आरुषी ज्या आकाशगंगा प्रवास केंद्रात प्रशिक्षण घेत होती त्या केंद्रापासून आई दीड हजार मैल दूर होती. ती फक्त आपल्या लेकीकडे मायेने पाहत बसली.

______________________________________________________________________________________________

प्रशिक्षणाचं शेवटचं वर्ष भराभर पुढे सरकत होतं. आरुषी आणि प्रशिक्षण घेणारे इतर सगळे विद्यार्थी अत्यंत व्यग्र होते. त्यांना झोपायला आणि ऊन्ह खायलादेखील वेळ मिळत नव्हता. कधीकधी आरुषी रात्रभर अभ्यास करत बसायची. सकाळी प्रशिक्षणाच्या तासाला उडत जाण्यापूर्वी फक्त काही तास झोप मिळायची तिला. आता ती कॉंप्युटेशनमध्ये तज्ज्ञ झाली होती आणि डाटा रिकवरी करण्यात पटाईत झाली होती. कितीही खराब झालेल्या, जुन्या किंवा नुकसान झालेल्या डिजिटल उपकरणांतूनसुद्धा तिला डाटा काढता येत असे. तिचं हे कौशल्य खगोल विज्ञानाच्या शाखेत अर्थातच अत्यंत उपयुक्त होतं कारण अवकाशात किंवा दुसऱ्या ग्रहांवरील कठीण वातावरणात किंवा रवीची ऊर्जा एकत्रित करणारी स्वर्गाची विद्युत केंद्रं ज्या उल्कांवर बांधलेली होती तिथे उपकरणं नेहमीच खराब होत; पण पृथ्वीवर तिच्या कौशल्याचा अधिक उपयोग होण्याची शक्यता होती. तिथे जाणाऱ्या दलाला जर अंतिम युद्धातून आणि त्यानंतर झालेल्या ग्रहाच्या दुर्दशेतून वाचलेली उन्नयनपूर्व काळातील काही सामग्री सापडली तर तिला त्यातून माहिती काढता येणार होती.

उन्नयनपूर्व इतिहासावर तिची उत्तम पकड असल्यामुळे ती पृथ्वीवर जाणाऱ्या दलात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकेल अशी आरुषीला आशा होती. प्रशिक्षण घेणाऱ्या सगळ्या चाळीस सदस्यांना प्राथमिक स्तरापेक्षा अधिकचं आण्विक जीवशास्त्र आणि जैविक विज्ञानाचं शिक्षण मिळालं होतं आणि तिने त्या विषयात जरी विशेष प्रशिक्षण घेतलं नसलं; तरी आरुषीला त्यात मुळातच रस होता. प्रकल्पाच्या तंत्रज्ञानातदेखील तिने बऱ्याच अंशी प्रावीण्य मिळवलं होतं. प्रकल्पाविषयी तिला जर काही आवडत नसेल तर ते म्हणजे प्रकल्पासाठी मुद्दाम तयार केलेले सुरक्षात्मक फुगे. फुग्यामुळे तिच्या उडण्यात अडथळा येत असे आणि ते तिला अजिबात आवडत नव्हतं आणि अर्थातच सैद्धांतिक विषयात वरच्या स्तराचा अभ्यास होता – गणित, भौतिकविज्ञान, रसायन शास्त्र, क्वांटम मेकॅनिक्स आणि व्यवस्थापनशास्त्र. दलातील विद्यार्थ्यांना अकादमीतील इतर विद्यार्थ्यांपेक्षा महिनाभर आधी आपला अभ्यास, अभ्यासक्रमाशी निगडित सादरीकरण आणि संशोधन कार्य संपवायचं होतं. त्यानंतर लगेचच त्यांच्या प्रकल्पात निवड होण्यासाठी द्यायच्या परीक्षा होणार होत्या. 

हिवाळ्यात उजळणी सुरू होण्यापूर्वी आई आणि पपाबरोबर एक छोटी सुटी घालवण्याचा आरुषीचा बेत होता. आरुषी जेव्हा घरी जात असे तेव्हा पपादेखील आईकडे येत असे. दोघांच्याही आयुष्यात आता त्यांचे वेगळे प्रियजन होते हे आरुषीला माहीत होतं; पण दोघांपैकी कोणीही त्यांच्या प्रिय व्यक्तीशी अजून तरी पालक करार केलेला नव्हता आणि त्यामुळे दोघेही आपापल्या घरात एकटेच राहत होते. आरुषीच्या सुटीत त्यांचं पूर्वीचं कुटुंब एकत्र येत असे आणि सुरुवातीचं अवघडलेपण जाऊन आता सगळे खेळीमेळीने राहत होते. 

आता आरुषीला जयंतबरोबरसुद्धा एकत्र राहायची संधी बऱ्याचदा मिळत असे. प्रशिक्षण जसजसं अवघड होत गेलं तसं सगळ्या चाळीस उमेदवारांसाठी एकत्रच तास घेतले जात. अशा वेळी आरुषी आणि जयंत एकच ठिकाणी राहत. कधीकधी त्यांचा प्रणयदेखील त्यांच्या प्रशिक्षणाइतकाच गहिरा असे; तर कधीकधी शारीरिक परिश्रमांमुळे दोघेही इतके दमलेले असत, की दमून अंथरुणाला पाठ टेकताच झोपी जाताना एकमेकांची नुसती सोबतच त्यांना पुरेशी होत असे.

___________________________________________________________________________________________

तीन दिवसांच्या सुटीपूर्वीचा अकादमीतला तो शेवटचा दिवस होता. सुटीनंतर मूल्यमापनाची शेवटची कठीण परीक्षा होणार होती. सुटीत आई-पपाला भेटण्यासाठी आरुषी उत्सुक होती. आपला शोधनिबंध दाखल करण्यासाठी आरुषी आण्विक प्रयोगशाळेतून घाईघाईने भौतिक शास्त्राच्या प्रयोगशाळेत निघाली होती. तेव्हा भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेच्या व्हरांड्यात तिला काईटो भेटला.

“हाय आरुषी, आजकाल तू दिसतच नाहीस,” तिच्या खांद्याभोवती हात टाकत तो म्हणाला.
 

आरुषी हसली. त्याला डेट करून बरेच दिवस झाले होते. अकादमीतल्या सुरुवातीच्या काळात त्याच्याबरोबर घालवलेल्या दिवसांच्या आठवणी तिच्या मनात दाटी करू लागल्या. तिनेही त्याच्या कमरेला विळखा घातला आणि प्रशिक्षण आणि शिकवणीचे तास यांमुळे तिला लोकांना भेटायला कसा वेळच मिळत नाही हे त्याला सांगितलं.
 

“हे चालणार नाही. थोड्याच दिवसांत तू मोहिमेवर निघून जाशील आणि मग तुला असं जवळ घ्यायला मला पृथ्वीपर्यंत उडत यावं लागेल,” काईटो विनोदाने म्हणाला.
 

“आज संध्याकाळी तुझ्या खोलीवर येऊ का? आपण एक रात्र एकत्र घालवली तर जयंतला आणि माझ्या मैत्रिणीला – एम्माला –  त्याचं एवढं काही वाटणार नाही,” तो म्हणाला.
 

“मी संध्याकाळी माझ्या आईच्या घरी जाणार आहे. पण परीक्षा झाल्यानंतर मीच एक दिवस तुझ्या खोलीवर येईन,” त्याच्या केसांतून हात फिरवत आणि त्याच्या गालाचा पापा घेत ती म्हणाली. त्याने मिठी सोडली आणि ती भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेच्या दिशेने निघाली.

पण मागे वळताच प्रयोगशाळेच्या दारात जयंत उभा असलेला तिला दिसला आणि त्याचा चेहरा अतिशय विचित्र दिसत होता.
 

“काय झालं?” त्याच्या गंभीर चेहऱ्याकडे बघून आरुषीने विचारलं.
 

“माझ्यादेखत तू त्याला का मिठी मारत होतीस?” त्याने चिडून विचारलं.
 

“काय हे जयंत, किशोर वयात वाटते तशी असूया तुला वाटते आहे का? मी काईटोला डेट करायचे हे तर तुला माहीत आहे; शिवाय मी तुला इथे उभं असलेलं बघितलंच नव्हतं.”

आरुषीला त्याचं वागणं आवडलं नाही. जयंत उगीच राईचा पर्वत करत होता. तिने काही त्याच्याबरोबर पालक करार केलेला नव्हता. 

जयंतलादेखील इतर जवळच्या मैत्रिणी होत्या. आरुषीने त्यावर कधीच आक्षेप घेतला नव्हता. आरुषी त्याला डावलून पुढे गेली आणि प्रयोगशाळेत जाऊन तिचा शोधनिबंध सादर करण्यासाठी तिच्या प्राध्यापकांना शोधू लागली. सगळा गृहपाठ त्यांना सुपुर्द करून मोकळी झाल्यावर ती घाईघाईने आपल्या घरी गेली आणि तिने सामान बांधायला सुरुवात केली. 

एडनला जाण्यासाठी ती गावोगावी जाणाऱ्या झिप्परमध्ये चढली तेव्हा रविअस्त व्हायला आला होता. ती झिप्पर तिला जिथे सोडणार होती तिथे पपा त्याची झिप्पर पाठवणार असल्याचं त्यानं तिला फोन करून सांगितलं होतं. तिने आपला कॉम उचलला, एक बटण दाबून तिच्या खोलीच्या भिंती अपारदर्शक केल्या, दार लावले आणि गच्चीवरून झिप्परच्या थांब्यापर्यंत ती उडत गेली. तिच्या कॉमच्या संपर्कात राहून, खालून तिची सुटकेस घरंगळत आली.

झिप्परच्या मऊ सीटवर रेलून ती आई पपाच्या भेटीनंतर आपल्याला किती आनंद होईल याचा विचार करू लागली. काही तासांपूर्वीच्या जयंतच्या प्रतिक्रियेचा विचार न करण्याचा प्रयत्न करत राहिली; पण काईटोच्या प्रेमळ मिठीच्या आठवणीबरोबरच जयंतच्या प्रतिक्रियेची कडवट आठवणदेखील तिच्या मनात रेंगाळत राहिली.

________________________________________________________________________________________________

ती तीन दिवसांची सुटी आरुषीच्या अकादमीतल्या पाच वर्षांच्या कालावधीतली सर्वात आठवणीत राहील अशी सुटी ठरली. पपा पण घरी आला होता आणि आईने अर्थ (Emission And Radiation Technology for Health – EARTH) प्रयोगशाळेतील तिच्या नवीन प्रकल्पाच्या अनेक कथा ऐकवल्या. दुपारी भरपूर विश्रांती आणि संध्याकाळी आरुषीच्या उत्साही आवाजात प्रशिक्षणाच्या आणि अकादमीतल्या तिच्या आयुष्याच्या गमती ऐकण्यात आई आणि पपाचाही वेळ मजेत गेला. पृथ्वी प्रकल्पात भाग घेण्याच्या आरुषीच्या निर्णयावर आता पपादेखील टीका करत नव्हता. उलट मूल्यमापनाच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आणि पृथ्वीवर जाणाऱ्या दलाची निवड करण्याची परीक्षा आत्मविश्वासाने देण्यासाठी तो तिला प्रोत्साहन देत होता. या तीन दिवसांच्या सुटीची वाट बघण्यात आरुषीने जेवढे दिवस घालवले होते त्याच्या तुलनेत सुटीचे दिवस भर्रकन निघून गेले.

जेव्हा अकादमीत परत जाण्याची वेळ झाली तेव्हा आई तिला जवळ घेऊन खूप रडली.
 

“मला भीती वाटते बिट्टू. तू आता इतक्या लांब जाणार. माझं बाळ तारामंडळ ओलांडून जाणार.”

आरुषीपण आईच्या कुशीत शिरली. तिला कल्पना होती, की पृथ्वीवर जाण्याच्या प्रवासात जर तिला काही अपघात झाला तर आईच्या दुःखाला पारावार उरणार नाही. तिलाही थोडी धाकधूक होतीच. तीन वर्षं आईला भेटता येणार नाही आणि संपूर्ण प्रवास आणि पृथ्वीवरचं वास्तव्य या काळात आईचा आवाजदेखील ऐकता येणार नाही या विचारानेसुद्धा तिला उदास वाटत होतं; पण त्याच वेळी तिला पृथ्वीवर जाण्याची उत्सुकता देखील होती.

“मला काही होणार नाही, आई. पृथ्वीवरच्या मातीचे नमुने घेऊन मी परत येईन तेव्हा तुला माझा किती अभिमान वाटेल. तिथे जर संदेश प्रक्षेपण करण्याची यंत्रणा चालू करण्यात आम्ही यशस्वी झालो तर मी तुला नक्की संदेश पाठवत राहीन.”

“निवड समितीचा निकाल लागल्या-लागल्या आम्हांला कळव,” पपा म्हणाला. “तू अंतराळाच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आम्ही येऊन तुला भेटू.”

“लगेच कळवेन, पपा.”

पपाचं बोलणं ऐकून तिला इतकं बरं वाटलं! ती जर खरोखरच पृथ्वीच्या प्रवासाला गेली तर कदाचित आईच्या भावनांची पपा जास्त कदर करेल. आता भावनिक आधारासाठी आईला पपाची गरज नव्हती. तिचा नवा जोडीदार मनाने फार चांगला होता; पण ती स्वतः जेव्हा इतक्या लांबच्या प्रवासाला जाईल तेव्हा आईला तिची काळजी लागून राहील आणि रोज तिची आठवण येईल आणि एक कुटुंब म्हणून त्या तिघांनी एकत्र घालवलेल्या काळाशी पपा हाच एक दुवा होता. 

त्या रात्री आरुषी खूप स्वप्नं उराशी बाळगून अकादमीत परतली. पुढच्या महिन्यात काय घडेल? कोणत्याही मानवाने अनुभवला नसेल असा भविष्यकाळ तिच्या नशिबात असेल, का अंतराळवीरांच्या अकादमीतलं एक सर्वसाधारण करिअर?… 

काळच सांगेल.

अकादमीतला शेवटचा महिना बघता बघता संपला. महिन्याच्या सुरुवातीलाच सहामाहीच्या शेवटाची परीक्षा झाली. एखाद्या सराइताप्रमाणे आरुषी त्यात उत्तीर्ण झाली. बाकीचे विद्यार्थी मग त्यांच्या करिअरची निवड करण्यासाठी निघून गेले. काहींना नोकरी मिळेल, काही वेगवेगळ्या क्षेत्रांत अनुभव घेऊन बघतील किंवा वेगवेगळ्या संस्थात आणि उत्पादन केंद्रांत काम करून पाहतील. बाकीचे सगळे विद्यार्थी निघून गेल्यावर पृथ्वी प्रकल्पाचे प्रशिक्षण घेणारे चाळीस विद्यार्थी शेवटच्या चाचणीची अधीरतेने वाट बघत बसले.

सर्वांना निरोप देऊन झाले, बाकीचे विद्यार्थी निघून गेले आणि दुसऱ्या दिवसापासून परीक्षा सुरू झाल्या. आरुषीचे दोन्ही जोडीदार इव्हान आणि काईटो यांनी तिच्या संपर्कात राहण्याचे वचन दिले आणि तिला निवड-चाचणीसाठी शुभेच्छा दिल्या. भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेतील घटनेमुळे जयंत अजूनही रुसलेला होता. आरुषीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तिला परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचे होते. एकापाठोपाठ एक घेतलेल्या खडतर परीक्षांत उमेदवारांची शारीरिक क्षमता, प्रसंगावधान, त्यांची प्रश्न सोडवण्याची कला आणि संकटात तग धरून राहण्याची क्षमता तपासली गेली. एकमेकांबरोबर एक संघ म्हणून काम करण्याची त्यांची क्षमता तपासण्यासाठी त्यांना अशक्यप्राय वाटणारी कामं दिली गेली. काही कामं तर इतकी कठीण होती, की त्यांच्यापैकी प्रत्येकाला वाटलं की आपण नापास झालो. 

आठवड्याच्या शेवटी सगळे उमेदवार इतके दमून गेले होते, की त्यांना आता काय निकाल लागेल याचीदेखील पर्वा नव्हती. त्यांना एक दिवसाची सुटी मिळाली आणि त्यांच्यापैकी बहुतेकांनी ती झोपण्यात आणि विश्रांती घेण्यात घालवली. आई आणि पपाला फोन करून चाचण्या संपल्याचे आरुषीने सांगितले. मग दिवसभर ती एखाद्या बाळासारखी गाढ झोपली. शरीराने आणि मनाने ती पार थकून गेली होती. 

तिच्या स्वप्नात आई आली आणि ती स्वतः पुन्हा त्यांच्या जुन्या घराच्या बागेत खेळणारी, पपाबरोबर उडणारी छोटी मुलगी झाली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा आई इथेच कुठेतरी असेल असं तिला क्षणभर वाटलं आणि मग लक्षात आलं, की आपलं बालपण हा स्वप्नाचाच भाग होता. ती पुन्हा झोपेत शिरली. का कोण जाणे पण तिला तिच्या अकादमीतल्या आयुष्याची किंवा आजकाल सारखी पडणारी निवड चाचण्यांची स्वप्नं पडली नाहीत. लहानपणीच्या मैत्रिणी आणि लहानपणी ते एडनमध्ये राहत असताना खेळत असलेले खेळ तिच्या स्वप्नात आले. आई आणि पपाबरोबर ज्या टेकडीवर जाऊन तिने अगणित रविअस्त पाहिले होते ती टेकडी तिच्या स्वप्नात आली. तिला पुन्हा जाग आली आणि पाण्याचा घोट घेऊन ती पुन्हा झोपी गेली. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत ती झोपून राहिली. शेवटी संध्याकाळी जेव्हा तिच्या डोळ्यातून झोप निघून गेली तेव्हा तिला एक विचित्र जडत्व जाणवू लागलं. कशातच रस वाटेना. चाचण्यांच्या निकालाविषयीदेखील तिला उत्सुकता वाटेना. 

पाय ओढत ती बाहेर हिरवळीवर आली, गुडघे टेकून बसली, अनिच्छेनेच आपले पंख पसरले आणि अर्धा तास उन्ह खाल्ले. अस्ताला चाललेल्या रवीची ऊब तिच्या पंखांना जाणवली. त्या किरणांमुळे जेव्हा हळूहळू तिच्या शरीरात शक्ती पसरू लागली, तेव्हा तिचं आयुष्य आणि त्या आयुष्यातील ध्येय तिच्या जाणिवेच्या टप्प्यात आलं. निकाल तर उद्या सकाळी लागणार. अजून संपूर्ण रात्र जायची होती आणि इतका वेळ झोपल्यामुळे आता अंथरुणावर पडायची तिला आजिबात इच्छा नव्हती.
 

इतर उमेदवारांशी बोलावं असंपण आरुषीला वाटेना – अगदी जयंतशीसुद्धा! कारण सगळे त्याच मनःस्थितीत असणार. परीक्षेविषयीच्या गप्पा आणि निकालासंबंधी तर्कवितर्क हे सगळं आरुषीला टाळायचं होतं. त्यांच्या वसतिगृहाच्या गच्चीवर काहीजण मजा करताना आणि मनातली धाकधूक विसरण्यासाठी नशा करताना तिला ऐकू येत होतं. आरुषी शांतपणे आपल्या खोलीत परतली, खोलीच्या भिंती तिने अपारदर्शक केल्या आणि आपला कामाचा स्क्रीन उघडला. ती काही संगीत तयार करणार होती. आपली चिंता वाहून जाऊ देण्यासाठी ती कलाविष्काराचा आधार घेणार होती. आपल्या रुपेरी पडद्याचं तिने एका डिजिटल वाद्यात रूपांतर केलं आणि ती ते वाजवू लागली. नादमुनींचे शिष्य येहुदी यांच्याकडून लहानपणी शिकलेल्या प्राचीन संगीताच्या आल्हाददायक लहरींनी  तिची खोली भरून गेली.

_______________________________________________________________________________________________

भाग नववा समाप्त

Author

Leave a Reply