अखेरचा हा तुला दंडवत

दोनच दिवसांपूर्वी लातूरच्या पॅथाॅलाॅजीच्या राज्य परिषदेत नेहमीप्रमाणेच सर्वांना मोहवून टाकणारे ‘सर्जिकल पॅथाॅलाॅजी’ या विषयावरचे अस्खलित व्याख्यान देणार्‍या डाॅ.अनिता बोर्जेस यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे अनपेक्षित वृत्त आले व मन एकदम गलबलून गेले. कसा विश्वास ठेवायचा या दुःखद  वृत्तावर? त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगणार्‍या व्यक्तींच्या शोकसंदेशांची मालिका गेले दोन दिवस अव्याहत सुरू आहे. त्यामुळे या अविश्वसनीय दुःखद घटनेवर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त झाले. सहजपणे न पचवता येणारे हे दुःखद वृत्त क्षणभर बाजूला ठेवून आज शांतपणे त्यांच्या स्मृती जागृत करतो आहे.

माझा व मा.डाॅ.कै.अनिता बोर्जेस यांचा परिचय करून दिला तो माझ्या UG Teacher डाॅ.रोशन चिनाॅय(सुखिया) यांनी! माझे सर्जन बंधू डाॅ.सुरेश वाणी(मालेगावकर) हे डाॅ.रोशन चिनाॅय(सुखिया) यांचे वर्गबंधू ! त्यामुळे, तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या कामामुळे त्या मला जवळून ओळखायच्या! रक्तसेवेच्या कार्यामुळे १९८३ सालापासून माझे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बर्‍याचदा येणे जाणे होत असे. बर्‍याचदा तिथेच मुक्काम पडत असे. त्या वेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या रक्तपेढी-प्रमुख डाॅ.झरीन भरुचा आम्हांला तेथील भोजनगृहात पोटपूजा करण्यासाठी नेत असत. मग डाॅ.रोशन चिनाॅय, डाॅ.झरीन भरुचा व डाॅ.अनिता बोर्जेस अशी आमची ‘किचन कॅबिनेट’ रंगत असे. तिघींचे इंग्रजी अत्यंत उच्च प्रतीचे! युरोपियन थाटाचे! माझे पुणेरी थाटाचे! पण भाषा ही कधी आमच्या मैत्रीच्या आड आली नाही; विशेषतः डाॅ. झरीन भरुचा यांच्याशी संभाषण करताना; कारण अनेक व्यासपीठांवर आम्ही सहव्याख्याते असत असू. डाॅ.अनिता बोर्जेस यांचे मात्र तसे नव्हते. गोवानीज पोर्तुगीज संस्कृतीमध्ये वाढलेल्या डाॅ.अनिता बोर्जेस यांचे हिस्टोपॅथाॅलाॅजीमधील ज्ञान जेवढे सखोल, त्याहून त्यांचे भाषाप्रभुत्व अप्रतिम! शिवाय कठीण विषय सोपा करून सांगायची अत्यंत अनोखी हातोटी! त्यामुळे कुठेही, कधीही त्यांचे व्याख्यान ऐकणे म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असे.

    डाॅ.अनिता बोर्जेस यांची एक ‘श्रेष्ठ सर्जिकल पॅथाॅलाॅजिस्ट’ ही प्रतिमा माझ्या मनात खूप उशिरा ठसत गेली. माझ्या मनावर मा.डाॅ.कै.अनिता बोर्जेस त्याच्या आधीच ठसल्या गेल्या त्या एक ‘दिलखुलास भाषाप्रभू गोवानीज व्यक्तिमत्त्व’ म्हणून! टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ‘शल्यक्रिया पॅथॉलॉजी’ विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता मारिया बोर्जेस या ‘कर्करोग पॅथॉलॉजिस्ट’ म्हणून केवळ मुंबईत किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सुप्रसिद्ध आहेत.

टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, मुंबई येथून १९६८ साली MBBS व १९७० साली MD (पॅथॉलॉजी) झालेल्या डॉ.अनिता मारिया बोर्जेस. 

कर्करोग प्रशिक्षणासाठी ‘रॉयल मार्सडेन हॉस्पिटल, लंडन’ येथे गेल्या. ‘मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर, न्यूयॉर्क’ येथे त्यांनी उच्चप्रशिक्षण घेतले. त्या एफआरसीपॅथ(फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स) झाल्या. त्यानंतर डॉ.बोर्जेस यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली. तिथे त्या ‘शल्यक्रिया पॅथॉलॉजी’च्या प्रमुख होत्या. काही काळ त्यांनी युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेट्स येथेसुद्धा ‘कर्करोग पॅथॉलॉजिस्ट’ म्हणून काम केले आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील सेवानिवृत्तीनंतर त्या एस.एल.रहेजा हॉस्पिटल(फोर्टिस असोसिएट),माहीम, मुंबई येथे कन्सल्टंट हिस्टोपॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत होत्या. ‘सेंटर फॉर ऑन्कोपॅथॉलॉजी,’ वडाळा,मुंबईच्या त्या डायरेक्टर होत्या.एस. आर. एल. डायग्नोस्टिक्स सेंटर ऑफ एक्सेलन्स इन हिस्टोपॅथॉलॉजी, मुंबईच्यादेखील डायरेक्टर होत्या. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑंकोलॉजी येथे कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट होत्या. एसआरएल डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सेंटर ऑफ एक्सेलन्स इन हिस्टोपॅथॉलॉजी अँड आयएचसी, मुंबईच्या प्रेसिडेंट होत्या. अशा सर्वच संस्थांना मा.डाॅ.कै.अनिता बोर्जेस हव्याहव्याशा होत्या. ते व्यक्तिमत्त्वच तसे होते – सर्वांना हवेहवेसे !

मा. डाॅ.कै.अनिता बोर्जेस अतिशय विद्यार्थिप्रिय होत्या.

वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणात त्या अत्यंत सक्रिय होत्या. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि मुंबईतील अनेक मेडिकल स्कूल्समध्ये फॅकल्टी म्हणून काम केले आहे. त्यांना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार 

खालीलप्रमाणे : 

१. २०१५ आणि २०२२ मध्ये ‘द पॅथॉलॉजिस्ट’च्या  पॉवरलिस्टमध्ये  नामांकन

२. इंडियन सोसायटी ऑफ हेड अँड नेक 

ऑंकोलॉजिस्ट्सकडून पहिले लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड

३.प्रेसिडेंट ऑफ इंडिया सिल्वर मेडल

४.स्कॉलरशिप ऑफ द मेडिकल वुमन ऑफ इंडिया फंड : लेडी रे सिल्वर मेडल.

५.कामा गोल्ड मेडल

६.श्रीमती इंदिराबाई आनंद तेलंग प्राइज

७.सालस्कर गोल्ड मेडल

८.१९८५ मध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड.

९.इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ पॅथॉलॉजीच्या उपाध्यक्ष  (आशिया)

१०.नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) च्या क्लिनिकल लॅबोरेटरी अक्रेडिटेशन कमिटीच्या चेअरमन

११.इंडियन कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट्सच्या अधिष्ठाता 

१२.इंडियन कॅन्सर सोसायटीच्या चेअरपर्सन

त्या मुंबईतील प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.अर्नेस्ट बोर्जेस यांच्या कन्या. त्यांनी कर्करोग निदान आणि संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. माझ्या मनात ठसलेल्या मा.डाॅ.कै.अनिता बोर्जेस म्हणजे ‘सर्जनसारखा विचार करणारी पॅथॉलॉजिस्ट!’ गेले दोन दिवस त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगणार्‍या व्यक्तींच्या शोकसंदेशांची अव्याहत मालिकाच सुरू झाली आहे. ती वाचून मला कणभर समजलेल्या मा.डाॅ.कै.अनिता बोर्जेस हे खूपच गहिरे व्यक्तिमत्त्व आहे याची जाणीव झाली व जरा खोलात जाऊन मॅडमच्या संपूर्ण ‘बोर्जेस’कुटुंबाचा अभ्यास केला.

माझे सर्जरीचे प्रोफेसर डाॅ.सुनंद साने ‘लैला को देखो मजनू की ऑंखो से’ या चालीवर नेहमी म्हणायचे, “अल्सर को देखो सर्जन की ऑंखोंसे!” काल व आज अनेकांनी वर्णन केलेल्या मॅडमच्या कार्यपद्धतीकडे पाहून मलादेखील असेच वाटू लागले आहे, की ‘स्लाईडको देखो सर्जन की ऑंखों से!” डोळे पॅथाॅलाॅजिस्टचे पण मेंदू सर्जनचा! मुंबईचे ऑंकाॅलाॅजिस्ट डाॅ.निर्मल राऊत यांचा फेसबुकवरील श्रद्धांजलीपर लेख हेच सांगतो. ते म्हणतात, “मॅडम पॅथाॅलाॅजिस्टपेक्षा ‘शेरलाॅक होम्स’ जास्त होत्या! आता त्यांच्या पश्चात आपल्या अवघड केसेससाठी असा कोणता ‘गुप्तहेर’ निवडायचा? 

मॅडमचे असे शेरलाॅक होम्ससारखे ग्रुमिंग कुणी केले असावे? यात अनुवंशाचा भाग किती? परदेशी प्रशिक्षणाचा भाग किती? या सगळ्यांचा काल अभ्यास केला व मा.डाॅ.कै.अनिता बोर्जेस या कोड्याचे एक एक पदर उलगडत गेले व मॅडमचे ‘एकमेवाद्वितीयत्व’ लक्षात येत गेले. हे पदर समजायचे असतील तर मॅडमची भक्त असलेल्या डॉ.ऋजुता अयाचित यांची ही कविता वाचा!

भावविभोर आम्ही 

माय तू आमची साऱ्यांची

पॅथॉलॉजीची भक्त

सूक्ष्मदर्शी तुझा ताईत

तू गुरू म्हणूनी सक्त !

कमी न लेखो सूक्ष्मनिदानाला

तू उजळविली महती त्याची 

दिली झळाळी, गौरव त्याला

तपस्येस जोड अधिकारवाणीची |

तू तेज ज्ञानदीपांचे,

तूचि प्रखर सिंधू

भाव तव करुणेचा 

रुग्णची केंद्रबिंदू |

तुज पाहता गवसे आत्मविश्वास,

तुज ऐकता ज्ञानाचा सुवास

मनस्विनी तू ज्ञानयोगिनी,

तू अखंड झरणारा उल्लास !!

हरेक अहवाल सत्य, 

दावी पोलादी निश्चय

तू ‘ऑॅंको’ *चा आधारवड,

शिष्यांचा अखंड आश्रय

पोरकेच वाटे आता, 

पॅथोच्या या जगी….

तिमिर दाटे घोर जेव्हा 

तेजाळशील होऊन समई  ?

——————————–

* Oncopathology

    आपण पॅथाॅलाॅजीची जी पुस्तके वाचून शिकलो तीच पुस्तके वाचून मॅडमपण शिकल्या. आपण ज्या प्रकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून शिकलो तशाच प्रकारच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यापण शिकल्या; मग त्या एवढ्या ‘वेगळ्या’ कशा झाल्या? त्यांचा ‘अनुवंश’ व त्यांचे ‘परदेशी शिक्षण’ त्याला कारणीभूत असावे का? 

   कै.डॉ.अनिता मारिया बोर्जेस यांचे पिताश्री म्हणजे मुंबईतील सुप्रसिद्ध कर्करोग सर्जन डॉ.अर्नेस्ट जोसेफ बोर्जेस (१९०९-१९६९) ! कनिष्ठ बंधू डॉ.एरिक बोर्जेस म्हणजे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे सिनियर कार्डिऑलॉजिस्ट आणि प्रोफेसर! तर कनिष्ठ भगिनी रेनी बोर्जेस या जागतिक कीर्तीच्या संशोधिका !

रेनी बोर्जेस या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगलोर येथील सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेसमध्ये प्रोफेसर आणि उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ! त्यांच्या मातोश्री ग्रेसी बोर्जेस यांना सहा मुले! अनिता, एरिक, रेनी, निना, रीटा आणि मेरी ! सगळेच सामाजिक कार्यात समृद्ध ! याचा अर्थ मॅडमचा ‘अनुवंश’ जबरदस्त!

मॅडमना त्यांच्या अभ्यासकाळात १३ पुरस्कार आणि सोनेरी पदके मिळाली आहेत; ज्यात उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अनेक सन्मान समाविष्ट आहेत; तर भगिनी रेनी बोर्जेस या नामांकित वाइल्ड लाइफ कंझर्व्हेशनिस्ट आणि पर्यावरणतज्ज्ञ! 

रेनी बोर्जेस या भारतातील एक प्रमुख उत्क्रांतीय जीवशास्त्रज्ञ! पश्चिम घाटांच्या फायटोकेमिस्ट्रीशी संबंधित त्यांचे संशोधन एकमेवाद्वितीय! त्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफ रिसर्च  होत्या आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहरादून येथे अ‍ॅडजंक्ट फॅकल्टी होत्या.

रेनी बोर्जेस या ‘जर्नल ऑफ बायोसायन्सेस’ च्या एडिटर-इन-चीफ” आहेत आणि ‘फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स ऑफ द रॉयल सोसायटी’सारख्या जर्नल्सच्या एडिटोरियल बोर्डवर आहेत. त्यांनी Battles Over Nature : Science and the Politics of Conservation सारख्या पुस्तकात एक अध्याय लिहिला आहे. 

रेनी बोर्जेस यांचे ‘रात्रीच्या संवाद(nocturnal communication)’ व शहरी पर्यावरणातील जनुकीय रचना हे संशोधन जगन्मान्य समजले जाते. त्याबद्दल त्यांना जे.सी.बोस नॅशनल फेलोशिप (२०१६) तसेच इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची फेलोशिप (२००९) प्राप्त झाली असून त्यांचे काम ‘इंडिया टुडे’च्या प्रोफाइलमध्ये हायलाइट झाले आहे. 

अनिता व रेनी ही दोन्ही भावंडे बोर्जेस घराण्याच्या वैद्यकीय आणि वैज्ञानिक वारशाचे प्रतीक आहेत.

आता मॅडमच्या बोर्जेस घराण्याबद्दल दोन शब्द !

गोव्याच्या पोर्तुगीज काळातील इतिहासात ‘बोर्जेस’ (Borges) हे आडनाव पोर्तुगीज वंशाच्या अनेक कुटुंबांशी जोडलेले आहे. हे घराणे पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासोबत गोव्यात स्थायिक झाले आणि व्यापार, प्रशासन,धर्म आणि सामाजिक जीवनात सक्रिय होते. बोर्जेस घराणे हे एक विशिष्ट राजघराणे किंवा नोबल डायनेस्टी म्हणून ओळखले जाणारे एकमेव घराणे नाही. ते पोर्तुगीज-गोमंतकीय समुदायातील एक महत्त्वाचे कुटुंब आहे. ‘बोर्जेस’ म्हणजे ‘बोर्जोइस(bourgeois)’ – शहरी लोक! मूळ फ्रान्समधील ‘बोर्जेस(Bourges)’ शहराशी किंवा पोर्तुगीज ठिकाणांशी ते जोडलेले आहे. पोर्तुगीज साम्राज्यातील अनेक कुटुंबांनी ‘बोर्जेस’ हे आडनाव स्वीकारले आणि ते १५व्या शतकापासून युरोपमधून आशियात पसरले. १५१० मध्ये अफॉन्सो डी अल्बुकर्कने गोवा जिंकल्यानंतर, पोर्तुगीज सैनिक,व्यापारी आणि धर्मप्रचारक गोव्यात आले. बोर्जेस कुटुंबातील अनेक सदस्य या पहिल्या लाटेत सामील झाले. ते मुख्यतः बर्देस (Bardez) आणि सालसेटे (Salcete) भागात स्थायिक झाले. तिथे त्यांनी जमिनी खरेदी केल्या व स्थानिक व्यापारात सहभाग घेतला. काहींनी मिशनरी म्हणून धर्मप्रसाराचे कार्यदेखील  केले.

मॅडमच्या बोर्जेस घराण्यातले जेसुइट इतिहासकार म्हणजे चार्ल्स जे. बोर्जेस! त्यांनी Goa & Portugal: Their Cultural Links सारखी पुस्तके लिहिली,ज्यात पोर्तुगीज-गोमंतकीय सांस्कृतिक संबंधांचा अभ्यास आहे. पोर्तुगीज काळात बोर्जेस कुटुंब व्यापारात आघाडीवर होते. ते मसाले, सोने आणि सिल्कच्या व्यापारात सहभागी होते. काही सदस्य गोव्याच्या प्रशासकीय यंत्रणेत होते. १७व्या शतकात, ते स्थानिक गावकारी(village communities) व्यवस्थेतही सामील झाले. इतर बोर्जेस कुटुंबातील सदस्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारण आणि शिक्षणात योगदान दिले. उदा.गोवा विद्यापीठ!

१९६१ मध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर,बोर्जेस कुटुंब भारताच्या मुख्य भूमीशी जोडले गेले. आज ते गोमंतकीय संस्कृतीचे प्रतीक आहे,ज्यात पोर्तुगीज आणि भारतीय मिश्रण दिसते. अनेक बोर्जेस गोव्याच्या राजकारण,व्यवसाय आणि कलेत सक्रिय आहेत.

एवढा प्रचंड बोर्जेस वारसा लाभलेल्या मा.डाॅ.कै.अनिता मारिया बोर्जेस यांना माझा मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली!

Author

Leave a Reply