आकाशवाणीचं हे ….
‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।
वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’
(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)
भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या जोरदार आक्रमणामुळे आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते; परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. स्वतःचे ॲप तयार केले. विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व विश्वासार्हता टिकवून आहे. शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत.
भाग ५
अनेक पर्यायांतही आकाशवाणी कायम
मला अजूनही आठवतंय, की १९८५ मध्येच टाईम्स ग्रूपने प्रायोजित कार्यक्रमांसाठी आकाशवाणीचा वेळ विकत घेतला होता. १९९३ नंतर हळूहळू खासगी रेडिओ केंद्रांची नवी मनोरंजन संस्कृती आकाराला आली त्याची जणू ही सुरुवात होती. नवे आव्हान आकाशवाणी समोर उभे राहिले. १९९३ मध्ये टाइम्सने तर ‘रेडिओ मिरची’चे जाळे अखिल भारतीय स्तरावर विणले. सादरीकरणाची शैली नवे रूप घेऊन आली. या सगळ्या वादळ-वार्यात रेडिओ या माध्यमालाच नवे धुमारे फुटले. तरी आकाशवाणीने मात्र आपले पारंपरिक व्यक्तिमत्त्व – आशय – चारित्र्य सांभाळले. उपयुक्तता सिद्ध करताना तांत्रिक बदल अंगीकारले. स्वतःची ओळख नुसती जपलीच नाही; तर नव्याने प्रस्थापित केली. या काळाचा विचार करताना झोपड्यांपासून बंगल्यांपर्यंत आकाशवाणी कितपत लोकप्रिय राहिली? तिने आपले अस्तित्व राखले का? हा गंभीरपणे विचार करण्यासारखा प्रश्न असला तरी एक मात्र निश्चित, की आकाशवाणीची माध्यम म्हणून स्वतःची जी शक्ती आहे ती कायम होती; फक्त अस्तित्व आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान होते. खरं पाहता कोणत्याही माध्यमाचं यश-अपयश मोजण्यासाठी संपूर्ण विश्वासार्ह मापदंड नाहीत. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लोकप्रियतेचा विचार करता ‘टेलिव्हिजन’ने बरीच मजल गाठली; मात्र ‘आपल्या उद्दिष्टांच्या विषयी असलेली इमानदारी’ या निकषावर आकाशवाणीनं केलेलं कामही दुर्लक्षिता येणार नाही. आकाशवाणीच्या तुलनेत दूरदर्शनच्या नवेपणाची आणि दृक् आकर्षणाची प्रतिमा अजून भारतात अनेक ठिकाणी कायम आहे. त्यामुळे दूरदर्शनचे नवे उपक्रम इतर माध्यमांतूनही – विशेषतः वृत्तपत्रांकडून खूप चर्चिले जातात. दूरदर्शनवर बरेच ‘नवीन’ वाटणारे प्रयत्न आकाशवाणीच्या दृष्टीने खरेतर जुने असतात. मात्र अशा उपक्रमांची चर्चा वृत्तपत्रांनी रेडिओपेक्षाही दूरदर्शनबाबतीत जास्त तीव्रतेने घडविली. गावात कॉन्व्हेंटच्या शाळा उघडू लागल्या, की जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेकडे ‘दुय्यम’ म्हणूनच पाहिले जाते. हाच न्याय आकाशवाणलाही लागू होता.
पण लक्षात आले, की लोकांच्या आवडी-निवडी आणि गरजा यांचा विचार करून आणि त्यांचा कार्यक्रमांतला सहभाग वाढवून काही प्रयत्न केले गेले तर त्यांची परिणामकारकता वाढते. मग असे अनेक उपक्रम आकाशवाणीने केले. अभ्यासक्रमाविषयी आधारित शालेय कार्यक्रम असो, उत्कृष्ट नभोनाट्य असो, खुसखुशीत श्रुतिका असो… त्यांतून आकाशवाणी जनमानसात तग धरून राहिली. अर्थात लोकप्रियता आणि यशस्विता या बाबतीत सतत चढउतार होत असतात. अशा लाटांवर आरूढ होताना पिढी बिघडवण्याचं पाप आकाशवाणीच्या माथी कोणीही मारलं नाही. माहिती, मनोरंजन आणि लोकशिक्षण यांची पाठराखण एकीकडे आकाशवाणी करीत असताना दुसरीकडे मनोरजंनाचा आणि अभिरुचीचा स्तर केबल टी. व्ही. च्या जाळ्यातून फार खाली आला, अशीच मतं व्यक्त होत होती. स्टार, एम. टी. व्ही., झी. टी. व्ही., ए. टी. एन. आदी वाहिन्यांमुळे भले स्पर्धा वाढली असेल; पण प्रेक्षकांचा गळा मात्र घोटला जात आहे की काय असा प्रश्न नक्की निर्माण झाला होता. ‘शक्तिमान’ सिरियलच्या आशयावर उच्च न्यायालयात खटले चालले. काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची एक सुंदर समज ही खासगी माध्यमं हरवून बसली. कमर्शियल म्हणजे जाहिरात संस्कृतीने तर एक अनाकलनीय अक्राळ विक्राळ जबडा उघडला आहे. स्पॉंसरशिपच्या दे – मार गर्दीत मूल्य आणि विवेक यांचा विसर पडत नाही का? नवश्रीमंतीची, लाचखोरीची इच्छा मनात निर्माण केली गेली नाही का? माहिती देता देता लादल्या गेलेल्या अनावश्यक इच्छांचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत आणि लागणार आहेत. बहुतांश पालकांच्या मनात अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध यांसारख्या आशयाबद्दल एक भयावह चित्र निश्चित निर्माण होत आहे. रेडिओनं मात्र लोकप्रियतेच्या कसोटीवर टिकणारे अनेक कार्यक्रम करताना समाजातील नीतिमूल्यांचा विसर पडू दिला नाही याचा गौरवानं उल्लेख करावासा वाटतो. चोवीस तास बातम्या, खेळांची प्रत्यक्ष वर्णनं,सामाजिक समस्यांवर झोत, प्रश्नोत्तरे, गीतों भरा मनोरंजन, विज्ञानदृष्टी, निसर्गसंपदा, मानवी उत्क्रांती, उंबरठा अशा कितीतरी उपयुक्त मालिकांचे नियोजन या १९९० आणि २००० च्या दशकात घडले. भारतीय स्तरावरच्या ज्ञानमालिका स्थानिक पातळीवर स्थानिक भाषांमधून त्याच वेळी भारतभर केल्या गेल्या. आकाशवाणीनं आपल्या उद्दिष्टांविषयी असलेली निष्ठाच व्यक्त केली. एक सात्त्विक संस्कार हे कार्यक्रम करीत गेले. तो हवा की नको या मुद्द्याची सामाजिक चिकित्सा स्वतंत्र होऊ शकते.याचा अर्थ दूरदर्शनचं प्रभावीपण अमान्य आहे, असा नाही. सुरभी, वर्ल्ड धिस वीक,टर्निंग पॉइंट, रामायण, महाभारत, जनवाणी, आप की अदालत यांसारख्या कार्यक्रमांनी
सुरुवातीला व्यावसायिकतेचं एक सशक्त रूप दाखवून दिलं. ‘महाभारत’ने तर रस्ते ओस पाडले; मात्र एकूण विचार करताना अशा स्मरणीय कार्यक्रमांचं प्रमाण सर्वत्र कमीच राहिलं आहे.
मुलाखतींमधली स्पष्टता आणि खुलेपण तसेच मांडणीतील परखडपणा यांमुळे नलिनी सिंह आणि विनोद दुआ यांच्या कार्यक्रमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उत्तम उदाहरण दूरदर्शनवरून सुरुवातीस समोर आणले. शासन आणि शासनकर्ते टिकेला सामोरे जाण्यास तयार आहेत याची अनेक उदाहरणे जेव्हा जेव्हा रेडिओनेदेखील आपल्या कार्यक्रमांमधूनघालून दिली तेव्हा तेव्हा श्रोत्यांनी पसंतीची पावती दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटल,वीज मंडळ, रेल्वे, एस. टी. आणि खुद्द आकाशवाणीविषयी असलेल्या तक्रारीवर खुली टीका करणारे विशेष कार्यक्रम जळगाव, छ. संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद), रत्नागिरीसारख्या केंद्रांनीही केले. त्या त्या वेळीही अशाच कार्यक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या.शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम घडले. अगदी गॅस, वीज पुरवठ्यापासून वेश्यावस्तीच्या समस्यांपर्यंत आशय मांडला गेला.म्हणजे रेडिओच्या मर्यादा बर्याच असल्या तरी बळकट मुद्देदेखील बरेच आहेत. इडियट बॉक्ससारखे विशेषण रेडिओला ऐकावे लागले नाही. अभ्यासात गर्क झालेला तरुण, स्वयंपाकघरात काम करणारी गृहिणी, रस्त्यावर किंवा शेतात काम करणारा मजूर या सर्वांना रेडिओ कधीच अडसर वाटला नाही. ‘रेडिओ टाईम’ या संकल्पनेला कधीही तडा गेलेला नाही. असंख्य अंधांसाठी तर रेडिओ आजही वरदान आहे. मला आठवतं, की जळगाव आकाशवाणी केंद्रावरून मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची कादंबरी जेव्हा क्रमशः प्रसारित केली तेव्हा पैठण, किनवट, दापोडी इत्यादी ठिकाणच्या अंधशाळांमधून शेकडो श्रोत्यांची भावपूर्ण पत्रे आली. पुढच्या प्रसारण दिवसाची ते वाट पाहत असत. सर्वसामान्यांच्या जीवनात असा आनंद अनेकदा रेडिओने निर्माण केला.अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) केंद्राने लुई ब्रेलच्या जीवनावर एक सुंदर नाटक सादर केले होते. त्याचे ध्वनिमुद्रण ऐकवताना नगरच्या अंधशाळेतली पिनड्रॉप शांतता, ऐकतानाची अंधांची एकाग्रता, शेवट झाल्यावर त्यांनी वाजवलेल्या टाळ्या मला आठवतात. या सगळ्यांमध्ये रेडिओ माध्यमाची शक्ती दडली होती. शहरात बिअरबारची संख्या वाढली म्हणून दूध डेअरीचे महत्त्व कुठे कमी होते का? गल्लोगल्ली जिम थाटल्या गेल्या तरी सातारा- कोल्हापूरकडचे सगळे आखाडे बंद थोडेच झाले! जुन्या नव्याची भरती ओहोटी हा काळाचा नियम आहे आणि तो माध्यमांनाही कमी जास्त लागू होणारच; थोडक्यात आकाशवाणीने अद्यापही मान टाकली नव्हती – टाकण्याचे कारणही नव्हते; उलट आता तंत्रज्ञानाची एक नवी लाट आकाशवाणीला अंतर्बाह्य नाहू घालणार होती, ताजंतवानं करणार होती.
* * * * *

२५ नोव्हेंबर १९५३ म्हणजे तब्बल ७२ वर्षांपूर्वीचा हा दुर्मीळ क्षण. आंतर-विद्यापीठ कबड्डी सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणी पुणे केंद्राने प्रसारित केले. एस.आर. पाटणकर आणि प्रभाकर गोखले यांनी समालोचक म्हणून काम केले.

श्रोत्यांचे अमाप प्रेम हे आकाशवाणीचे खरे बळ.
उत्साही श्रोता संघ असे विशेष अंक काढून आपले प्रेम व्यक्त करीत.

आकाशवाणी कोलकाता केंद्रावरून क्रिकेटपटू
सौरभ गांगुली २००३ मध्ये अनुभव सांगताना…

श्रोत्यांच्या प्रेमाची अशीही एक अभिव्यक्ती.ऑगस्ट ९८ च्या दीपावलीमध्ये आकाशवाणी इमारतीच्याबाहेर असा बोर्ड लावून विविध भारतीचे कार्यक्रम विनाव्यत्यय प्रसारित होवोत अशा शुभेच्छा बाळकृष्ण शर्मा या श्रोत्याने व्यक्त केल्याचे दिसत आहे.
