मी अजूनही ‘लिहितो’ कविता
~~~~~~

मी लिहायचो कविता
तिला भेटण्यापूर्वीपासूनच
तेव्हा मात्र ती अस्फुट असायची
तरी करायची घुसखोरी माझ्या कवितेत
अलगद, अनायासेच, माझ्या नकळत
लिहित गेलो मी कविता यमक टाळत
तरी ती घुसायची एखाद्या ओळीत
देऊन चकमा यमकाला गूढरम्य
सरकत गेले दिवस असेच
प्रकाशित होऊ लागल्या माझ्या कविता
इथेतिथे, माय मराठीच्या पदरात दडून
¤
अखेर झालीच तिची-माझी भेट
अरण्यातील एका ओसाड पाठशाळेत
पर्णहीन वृक्षांच्या नसलेल्या सावलीत
आणि अकस्मात घडू लागला बदल
लेकुरवाळी झाली ओसाड पाठशाळा
पर्णहीन वृक्ष सारे सजले पर्णसंभाराने
अवकाळी पाऊस पडून गेला
कमळ फुलले रस्त्यावरील चिखलातही
गिरीशिखरे नजर वेधून घेऊ लागली
शुभ्र पांढरे ढग विराजू लागले निळ्या नभात
कळपात बदकांच्या राजहंस शोभू लागला.
¤
कविता माझी आता गुदमरू लागली
सुचतच नव्हते तिला अन्य विषयादि
कवितेच्या प्रत्येक कडव्यातील प्रत्येक ओळीत
तिची प्रत्यक्ष साकार घुसखोरी
सहजच सजग होऊ लागली
माझ्या कवितेच्या देहात एकाच वेळी
घुसू लागले अनेक अविनाशी आत्मे
प्रवाहाची धार बोथट होत गेली
संथ प्रवाहाच्या पोटात डोह साचू लागले
डोहातील चलबिचल लपवता लपवता
माझ्या नाकी नऊ येऊ लागले.
¤
डोहाच्या अदम्य चक्रव्यूहात
डोलू लागली माझी डळमळीत नाव
नावेत मी एकटाच नावाडी नवथर
अशातच तिचे दलबलासहितचे आक्रमण
मला कळेनासे झाले, कसे थोपवावे “ते”
मला आठवली मग महाभारत युद्धातील
शहीद अभिमन्यूची असफल कथा
मी घेतले ताब्यात मलाच बळजबरीने
नाकारले चक्रव्यूहात फसण्याचे प्रयत्न सारे
बृहन्नडेला घेऊन आपल्या साक्षीला
अखेर गेलो मी शरण उषोदयाला.
¤
झाला उषोदय तरी व्रण मिटले नव्हतेच
झाली गळाभेट वर्तमानाशी तिची
दोघींच्या त्या अनाकलनीय भेटीदरम्यान
मी लपवून ठेवले कसेबसे माझे “ते” व्रण
काळ खरोखरच अगम्य, अबुझ असतो
जसजसा सरत जातो तसतसा विरळ होत जातो
व्रण मिटवता येत नसले तरी घाव जुना होतो
प्रवासातील एकच मार्ग निवडता येतो
लक्ष्यप्राप्तीचा तोच एकमेव उपाय ठरतो
निवडला तिनेही तिचा प्रवास-मार्ग
परी अपसमजातच भ्रमला लक्ष्याचा लक्ष्य.
¤
ती गेली तिच्या मार्गाने, मीही माझ्या,
तरी तिचा श्वास राहिला माझ्या ओळींमध्ये.
ती विसरली मला, पण मी नाही विसरलो “शब्दांना”.
कविता पुन्हा उमलली, नव्या वेदनेच्या बीजातून.
आता कविता तिच्याविना, तरी तिच्याच छायेत.
प्रत्येक ओळीत तिची अनुपस्थितीच बोलते.
मी शिकलो — हरण्यातही एक सर्जन असते
मी शिकलो — मौनातही आवाज असतो.
व्रणांचा गंध घेत फुलतात नवी कडवी.
तिचे स्मरण नाही आता ओझे, तेच प्रेरण तथापि
आणि म्हणूनच — मी अजूनही लिहितो कविता.
¤¤¤
(या कवितेचे शेवटचे कडवे ChatGPT ने लिहून कविता पूर्ण करावी, अशी मी त्याला विनंती केल्यावर शेवटचा कडवा ChatGPT ने लिहिलाय!!! – अहो आश्चर्यम्) लखनपालसिंह कटरे.
(२६.१०.२०२५ .)
~~~~~~~~~~
