महुद ते ह्युस्टन: ९

माझ्या जीवनावरील चिंतन

 मला हा लेख लिहिणे दोन कारणांमुळे सर्वात कठीण गेले :

  • मी व्यावसायिक लेखक नाही. 
  • सप्टेंबर महिन्यात माझ्या दोन्ही डोळ्यांच्या लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या, त्यामुळे त्या चार आठवड्यांदरम्यान आणि पुढील ५-६ आठवडे काहीही वाचताना खूप अडचण येत होती. परिणामी, लेख पूर्ण करण्यासाठी मला वेळ कमी मिळाला, परंतु माझी दृष्टी खूप स्पष्ट झाली आहे. 

मी यावर नक्कीच विश्वास ठेवतो : प्रथम एक निर्णय घ्या (अर्थातच, साधक-बाधक विचार करूनच; पण नेहमीच काही अनिश्चिततेसह) आणि नंतर त्याला ‘योग्य’ ठरवण्यासाठी  कृती करा! 

१. पहिल्या २४ वर्षांत शिकलेलेमराठीआणि भारतीय मूल्ये 

मी नेहमीच माझ्या पालकांवर, नातेवाइकांवर (आत्या, मामा, मावश्या, काका-काकू) आणि  शिक्षक-प्राध्यापकांवर विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या शिकवणुकीला आणि सल्ल्याला महत्त्व दिले आहे. याचा अर्थ माझा त्यांच्यावर केवळ ‘अंधविश्वास’ होता का? – अजिबात नाही! माझ्याकडे स्वतंत्र  विचार करण्यासाठी मेंदू आहे (शिकण्यासाठी आणि ठरवण्यासाठी) आणि माझी स्वतःची मते आहेत (कधीकधी खूप ठाम); परंतु मी आयुष्यात कधीही शत्रू निर्माण केले नाहीत. मी लोकांना प्रामाणिकपणे सांगतो, की देवाने माझ्या मार्गावर केवळ ‘चांगल्या’ लोकांनाच आणले आहे. 

महाराष्ट्रात (आणि भारतात) मी शिकलेली काही महान मूल्ये 

प्रामाणिकपणा 

शिस्त  

जबाबदारी  

कठोर परिश्रम 

लक्ष 

वचन/शब्द  पाळणे

कुटुंबसंस्थेचा आदर 

कृतज्ञता

करुणा 

नम्रता

राष्ट्राभिमान 

२. गेल्या ४४ वर्षांत अमेरिकेने मला काय दिले? 

विसाव्या शतकात राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्य, आर्थिक संधी, विविधता असणाऱ्या अमेरिकेला जगासाठी ‘आशेचा किरण’ म्हटले गेले होते. हा देश अजूनही जगभरातील लोकांना आकर्षित करत असला तरी, मी येथे अनेक समस्या आणि आव्हाने पाहिली आहेत. प्रत्येक देश आणि समाजात त्याची शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने असतात. गेल्या चार दशकांत अमेरिकेत ज्या मूल्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे त्यांमध्ये विवाह आणि कुटुंबसंस्था  यांचा आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास यांचा समावेश आहे. तसेच अतिरेकी  वैयक्तिक स्वातंत्र्य कधीकधी टोकाला नेले जाते, त्यामुळे  इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन होते, म्हणून कायदे सतत बदलत राहतात. 

तथापि, अमेरिकेच्या समाजातून आणि अनेक अमेरिकन मित्रांकडून माझ्या येथील वास्तव्यादरम्यान शिकलेल्या अनेक उत्कृष्ट मूल्यांबद्दल मी कृतज्ञ आहे. 

  • स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता
  •  प्रामाणिक कार्य संस्कृती 
  • आनंद
  • दयाळूपणा
  •  स्वयंस्फूर्त नेतृत्व
  • स्वयंसेवा
  • ३. जीवनाबद्दल आणिआजीवन शिक्षणाबद्दल (lifelong learning) माझा दृष्टिकोण 

काही सर्वोत्तम शाळा, महाविद्यालये आणि पदव्युत्तर विद्यापीठांमध्ये २६ वर्षांच्या पारंपरिक शिक्षणानंतर, माझ्या ३० व्या वर्षी मी ‘आजीवन शिक्षणा’चा चाहता झालो. मी काही उत्कृष्ट सवयी लावून घेतल्या आहेत, हजारांहून अधिक पुस्तके वाचली आहेत आणि काही दिग्गज मार्गदर्शकांनी (mentors) मला मार्गदर्शन केले आहे. या सर्व प्रयत्नांमधून, कोणत्याही विषय किंवा घटकाचे ‘शिकणे’ याबद्दलचा माझा स्वतःचा दृष्टिकोण आता तयार झाला आहे. त्यात चार मुख्य मुद्दे आहेत : 

  • शिकण्याची तीव्र आवड (passion) निर्माण करा. माझे एक मार्गदर्शक याला ‘ज्वलंत इच्छा’ (burning desire) म्हणतात. 
  • विषयावरील सर्व उपलब्ध ‘विश्वासार्ह’ संसाधने वापरा (पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम, इतर संबंधित पुस्तके, ऑडिओबुक्स, पॉडकास्ट, YouTube व्हिडिओ आणि लागू असल्यास, तज्ज्ञांशी चर्चा), नोंदी घ्या आणि शक्य तितकी माहिती गोळा करा. 
  • तुम्हांला पटलेले सर्वात महत्त्वाचे काही मुद्दे ठरवा आणि माहितीचे  ज्ञानात रूपांतर करण्यासाठी जीवनात त्या गोष्टी वापरा. 
  • स्वतःचे ज्ञान इतरांना द्या. 

‘पश्चात्ताप’ आणि ‘भूतकाळात अडकून राहणे’ निरुपयोगी आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळातील गोष्टींमधून शिकले पाहिजे. सकारात्मक गोष्टी व यश तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि नकारात्मक गोष्टी किंवा चुका भविष्यात त्या टाळण्यासाठी. पण, नेहमी ‘झालं गेलं सोडून द्या’आणि ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब्ब’ (संत कबीर दोहा)

४. मागे वळून पाहताना (सिंहावलोकन) 

माझे बहुतेक यश – शिक्षण आणि व्यावसायिक कारकिर्द या दोन्हीमध्ये – वर दिलेल्या माझ्या मूल्यांमुळे आणि मी विकसित केलेल्या चांगल्या सवयींमुळे मिळाले आहे. ‘अनुभवातून विकास’ नावाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, कारण मी अनेक चुका केल्या आहेत आणि त्यांपैकी बऱ्याच पुन्हा-पुन्हा करत नाहीये. चुकांमधून काय शिकलो, कसा बदललो, हे मी अंतर्नादमधील यापूर्वीच्या अनेक लेखांमध्ये तसेच माझ्या पुस्तकात सांगितले आहे. 

५. मी भविष्याबद्दल आशावादी  का आहे? 

माझ्या संपूर्ण आयुष्यात मी अत्यंत आशावादी राहिलो आहे. यासाठी मी माझे पालक आणि मार्गदर्शक, तसेच मी घेतलेले निर्णय आणि निवडलेले मित्र-मैत्रिणी यांचे आभार मानतो. मी भविष्याबद्दल आशावादी असण्याची खाली दिलेली अनेक कारणे आहेत, त्यांपैकी काही एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याबरोबरच आपण एक राष्ट्र आणि जग म्हणून ज्या महत्त्वपूर्ण आव्हानांना तोंड देत आहोत, त्यांना मी कमी लेखत नाही. 

  • वैज्ञानिक शोध आणि ज्ञानविस्तार : आपल्याला जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अंतर्दृष्टी देतात, जसे : आपले अन्न उत्पादन वाढवणे (हरितक्रांती), वैयक्तिक उत्पादकता वाढवणे… 
  • वैद्यकीय प्रगती आणि आरोग्य सेवा उपलब्धता : सरासरी आयुष्य वाढले आहे, एकूण आरोग्य  सुधारले आहे, आरोग्य सेवा व वैद्यकीय सेवांची उपलब्धता वाढली आहे (डॉक्टर, हॉस्पिटल, लॅब, इ.). 
  • शिक्षण आणि माहितीची उपलब्धता : सर्वांना शिकण्याची  संधी (ऑनलाईन शैक्षणिक संसाधने), ज्यामुळे सर्वांना नवी कौशल्ये मिळवता येतात (आपल्या सोयीने व आवडीप्रमाणे) आणि सामाजिक विकासात अधिक सक्रियपणे भाग घेता येतो. 
  • तांत्रिक प्रगती : अलीकडच्या काळात नावीन्याचा वेग अफाट वाढला आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीमुळे नजीकच्या भविष्यात गंभीर आव्हानांवर उपाय मिळेल अशी आशा वाटते. 
  • जागतिक सहयोग : हवामान बदल, महामारी, दारिद्र्य, मूलभूत संसाधनांची कमतरता इत्यादींचा सामना करण्यासाठी जागतिक सहयोग, परस्पर समन्वय आणि सहकार्य मिळत आहे. 
  • युवा सशक्तीकरण : तरुण पिढी सकारात्मक बदलासाठी एक प्रेरक शक्ती ठरत आहेत. 
  • तांत्रिक कनेक्टिव्हिटी आणि दळणवळण : डिजिटल क्रांतीमुळे जगभरातील लोकांना त्वरित जोडणे, सहयोग करणे आणि कल्पना सामायिक करणे शक्य झाले आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जनसमूहांकडून मिळणारे योगदान (crowdsourcing) (उदा. विकिपीडिया). 
  • लवचीकता : जगाच्या इतिहासात मानवाने प्रतिकूल परिस्थितीत लक्षणीय लवचीकता (resilience) नेहमीच दाखवली आहे. आपल्यामध्ये अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता आहे. 
  • पर्यावरणाबद्दल जागरूकता :  पर्यावरणस्नेही  ऊर्जा स्वीकारणे, संवर्धनासाठी प्रयत्न आणि पर्यावरणासाठी जागरूक ग्राहकांची निवड  वाढीस लागत आहे. 

६. पुढील वर्षांत मी शिकण्यावर लक्ष केंद्रित केलेले काही विषय 

मी दोन महत्त्वाचे विषय शिकण्यास सुरुवात केली आहे :

  • मेंदूचे कार्य आणि ‘शिकायचे’ कसे
  • आनंद (सकारात्मक मानसशास्त्राचे विज्ञान). Positive psychology.

७.  सरतेशेवटी

जेव्हा डॉ. अनिल जोशी यांनी मला अंतर्नाद वाचकांसाठी माझे मिनी-आत्मचरित्र  लिहिण्याची विनंती केली, तेव्हा माझा  अंदाज होता, की सुमारे ६-७ लेख होतील. तथापि, पृष्ठांच्या मर्यादेमुळे मला त्यांपैकी काही लेख दोन भागांमध्ये लिहावे लागले आणि आता मी या अंतिम भागाला (finale) पोचलो आहे. 

माझ्या जीवनातील काही सर्वात महत्त्वाच्या धड्यांविषयी :

  • आपण ‘नियतीने’ ठरवल्याप्रमाणे (destiny) जगतो, की आपले जीवन आपल्या ‘विचारांमुळे आणि आपण केलेल्या निवडींमुळे’ आपल्या नियंत्रणाखाली असते? 

एकंदरीत भारतीय समाज जास्त नशीबवादी आहे आणि बहुधा पहिल्या भागावर विश्वास ठेवतो. मी निश्चितपणे दुसऱ्या भागावर विश्वास ठेवणारा आहे. मी यासाठी जेम्स ॲलन यांचे ‘As a Man Thinketh’ हे एक लहान, दुर्मीळ पुस्तक वाचण्याची शिफारस करतो. 

  • जेव्हा बहुतेक लोक यशस्वी होतात, तेव्हा ते ‘नशिबामुळे’ होते, की ते सामान्यतः ‘योग्य ज्ञानासह केलेल्या श्रमाचे’ (Labor Under Correct Knowledge) याचे फलित असते? 

हा मुद्दा थोडासा अधिक स्पष्ट करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या जीवनातील एक सुंदर उदाहरण देत आहे 

१५ जून, २०२३ रोजी पंढरपूरमध्ये कल्पवृक्ष लर्निंग सेंटर (KLC) चे उद्घाटन.

या स्वप्नाची पूर्ती होण्यासाठी कारणीभूत झालेल्या पाच ‘भाग्यवान’ आणि निर्णायक घटना (एकमेकांशी पूर्णपणे असंबंधित) : 

  1. मे २०१४ मध्ये ह्युस्टनमध्ये माझे मार्गदर्शक, (कै.) प्रा. अरविंद पांडुरंग कुडचडकर (APK) यांच्याशी भेट (जिथे बीज रोवले गेले), त्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये माझ्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मुंबईतील त्यांच्या घरी त्यांनी केलेले मार्गदर्शन. 
  2. सप्टेंबर २०१८ मध्ये पंढरपूरला माझ्या शाळेच्या कल्पना सादर करताना पहिल्या भेटीत काही नवीन मित्रांशी ओळख : चंद्रशेखर लक्ष्मण जोशी, CA पवनकुमार झंवर, मंदार आणि मैत्रेयी केसकर. या सर्वांनी प्रकल्पाला महत्त्वपूर्ण पाठिंबा आणि मदत केली आहे. 
  3. माझ्या एका खास मित्राने (श्री.संदेश सावंत), मला २०१८ मध्ये सलमान खान (कॅलिफोर्निया, यूएसए येथील ऑनलाईन ‘खान अकादमी’ चे संस्थापक) यांचे ‘The One World Schoolhouse’ हे पुस्तक वाचण्याची शिफारस केली. हे पुस्तक २१व्या शतकातील आदर्श शिक्षणाबद्दलच्या माझ्या विचारांसाठी  मोठा विश्वास देणारे ठरले. २०१९ मध्ये त्याने मला पुण्यात CA अभय कुलकर्णी यांचीही ओळख करून दिली. त्यांनी आम्हांला आमची Section 8 कंपनी, ‘कल्पवृक्ष प्रशाला फाऊंडेशन’ स्थापन करण्यास मदत केली आहे. याव्यतिरिक्त, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (MKSSS) चे बोर्ड संचालक म्हणून, त्यांनी मला वाई (३ शाळा) आणि नऱ्हे (पुणे) व्हिजन स्कूलसारख्या अनेक MKSSS शाळांची ओळख करून दिली. यामुळे मला माझ्या काही कल्पना लागू करण्याची संधी मिळाली. 
  4. जानेवारी २०१९ मध्ये मुंबईत (४६ वर्षांनंतर) (कै.) डॉ. व्ही. एन. श्रीखंडे यांची भेट झाली. त्यांनी माझी ओळख श्रीमती अनघाताई लवळेकर यांच्याशी करून दिली. मी आता ज्ञानप्रबोधिनी (JP) पुणे शाळेला अनेक वेळा भेट दिली आहे. त्याचप्रमाणे, माझ्या बालपणीच्या मैत्रिणीने – सौ. विद्या डेगवेकर यांनी माझी ओळख (कै.) डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्याशी २०१९ मध्ये करून दिली आणि मी फेब्रुवारी २०२० मध्ये JP हरळी शाळेला आणि नंतर २०२२ आणि २०२५ मध्ये JP सोलापूर शाळेला भेट दिली. JP शाळांमधून शिकल्यामुळे आमच्या प्रकल्पाचे मूल्य वाढले आहे. 
  5. जून २०१९ मध्ये पंढरपूरमध्ये डॉ. अनिल जोशी यांची भेट, त्यांनी माझी ओळख सौ.अमरजा जोशी यांच्याशी करून दिली. त्यांनी  २०१३ मध्ये पुण्यामध्ये ‘आनंदक्षण लर्निंग स्पेस (ALS)’ ही शाळा सुरू केली होती. (तिची शिक्षणपद्धती आमच्या शाळेसारखीच आहे. ) अमरजा आणि ALS च्या काही वरिष्ठ शिक्षिका आता KLC शिक्षकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करत आहेत, तसेच अभ्यासक्रम प्रदान करत आहेत.  

माझ्या (Google) शोधानुसार, ‘लकी कॉईन टॉस’ म्हणजे सलग पाच वेळा – एकतर ‘छाप’ (heads) किंवा ‘काटा’ (tails) – येणे, भाग्यवान मानले जाते! संभाव्यतेच्या दृष्टीने, ते 0.03125 (किंवा सुमारे 3.1%) आहे.

पाच स्वतंत्र ‘भाग्यवान’ घटना घडण्याची एकत्रित संभाव्यता (0.03125)^5 किंवा 3^(−8) किंवा 0.00000003 आहे. ही इतकी लहान संख्या आहे, की जवळपास प्रत्येकजण म्हणेल की हे अशक्यप्राय आहे! 

तथापि, ही घटना माझ्या जीवनात 100% घडली आहे. आता बोला!!!

*आपण निर्णय कसे घेतो? 

बहुतेक लोक त्यांच्या भावनांवर आधारित तत्काळ  – जागच्या जागी – निर्णय घेतात किंवा बहुतेक वेळा कोणतेही निर्णय घेत नाहीत (तोसुद्धा एक निर्णय आहे ☺) आणि प्रवाहाबरोबर जातात. मी एक म्हण ऐकली आहे, ‘मेलेले मासेसुद्धा प्रवाहाबरोबर जातात.’ 

जीवनातील तुमचे मोठे ध्येय खऱ्या अर्थाने साध्य करण्यासाठी, तुम्ही विशिष्ट छोटी-छोटी ध्येये निश्चित केली पाहिजेत, अनेक कृती केल्या पाहिजेत आणि प्रयत्न न सोडता अनेक आव्हाने आणि परिस्थितींवर आणि अगदी अपयशांवर पण मात केली पाहिजे. 

मी माझ्या प्रौढ जीवनातील काही सर्वात महत्त्वाच्या (‘जीवन बदलणारे’म्हणा) निर्णयांची उदाहरणे देत आहे. त्यात मी विविध धोरणे आणि संसाधने वापरली आहेत :

  • जेईई न देता IIT मुंबईत प्रवेश मिळवणे रूपारेल कॉलेजमधील माझे मार्गदर्शक कै. प्रा. अनंत सुरू यांनी मला सांगितले, की हा एक पर्याय आहे (लेख २ वाचा). तरीसुद्धा १९७४ च्या मुंबई विद्यापीठाच्या F.Y.Sc. परीक्षेत पहिल्या १० मध्ये येण्यासाठी मला आत्मविश्वास असणे आवश्यक होते. 
  • बी.टेक.साठी केमिकल इंजिनिअरिंगची निवड करणे, नंतर एम.टेक. करण्याचा निर्णय: फारसा विचार न करता घेतलेले यादृच्छिक निर्णय. बहुतेकांसारखे ‘प्रवाहाबरोबर जाणे’ (लेख 3 वाचा). 
  • पीएच. डी. साठी अमेरिकेत येणे : मी TOEFL आणि GRE च्या verbal section मध्ये अपयशी ठरेन असा माझा गैरसमज होता. मी माझे मार्गदर्शक, APK यांचे ऐकले आणि अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एकामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी माझी  शब्दविषयक  कौशल्ये (vocabulary skills) सुधारली (लेख 3 वाचा). 
  • मार्गदर्शनाचे महत्त्व 

माझ्या जीवनातील गेल्या ४५ वर्षांमध्ये मी जाणीवपूर्वक माझ्या परिसरात  व  बाहेरही मार्गदर्शक शोधण्यास आणि मार्गदर्शन मिळवण्यास सुरुवात केली. याचा मला खूप फायदा झाला . 

  • आनंद आणि तुमचे जीवन जगणे 

प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. विविध  विषय शिका, जिज्ञासू बना, प्रश्न विचारा. पैसे कमावण्यासाठी तुम्ही कोणतीही करिअर निवडली असेल, तरीही जीवनात फक्त काम (नोकरी किंवा व्यवसाय) करण्यापलीकडे खूप काही आहे. 

तुम्हांला काही प्रसिद्ध जागतिक नेते, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक इ. सारखं १००% सामाजिक कार्य करण्याची गरज नाही. आपले काम करताना तुम्ही लोकांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी अनेक गोष्टी करू शकता. 

 तुमचे कुटुंब आणि मित्रांपासून सुरुवात करत, तुमचा  शेजार आणि तुमच्या शहरापर्यंत जीवनाच्या खेळात फक्त प्रेक्षक बनू नका. त्यात सहभागी व्हा. 

“झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा” हे प्रसिद्ध मराठी वाक्य कवी मोरोपंत यांनी लिहिले आहे व ते प्रत्येक व्यक्तीला लागू पडते. 

माझ्या दृष्टिकोणामुळे माझी दोन सर्वात आवडती मराठी गाणी, 

  • ‘हे जीवन सुंदर आहे’ (कवी : सुधीर मोघे, गायिका : आशा भोसले). 
  • ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’(कवी : मंगेश पाडगावकर, गायक : अरुण दाते) 

भूतकाळात जगून – तुमच्यावर झालेल्या सर्व ‘अन्यायांबद्दल’ विचार करून किंवा सोशल मीडियावर (फक्त इतर लोकांचे ‘खोटे’ क्षणिक प्रक्षेपण पाहणे किंवा त्याचे कौतुक करणे) वर्तमानकाळ वाया घालवायचा आहे, की तुम्ही तो वेळ शिकण्यात (चांगली पुस्तके वाचणे, उपयुक्त पॉडकास्ट पाहणे/ऐकणे) आणि आनंद घेण्यात (नातेसंबंध व मित्र वाढवणे, संगीत, खेळ, स्वयंपाक, प्रवास, किंवा तुमचे जे काही छंद असतील), तसेच इतरांचे जीवन अधिक चांगले करण्यात (सामाजिक कार्य, तुमच्या आसपासच्या परिसरातील काही समस्या सोडवणे) गुंतवायचा  आहे? तुम्ही काहीतरी साध्य केल्यामुळे (एक गंतव्यस्थान) आनंदी नसता; तर सिद्धीच्या प्रक्रियेत (प्रवास) आनंदी असता. ‘आता’ (Now) नावाच्या ‘वर्तमान क्षणात’ जगायला शिका! 

माझ्या हायस्कूलच्या मराठी पाठ्यपुस्तकातील माझ्या सर्वात आवडत्या धड्यांपैकी एकाने मी ह्या लेखमालिकेचा शेवट करतो. 

दोन मेणबत्त्या : अनंत काणेकर 

या कथेचे नैतिक तात्पर्य (moral of the story) शेवटच्या ओळीत आहे : “स्वतःसाठी जगलास, तर मेलास; इतरांसाठी जगलास, तरच जगलास!” 

त्याच्या ऑडिओ आवृत्तीसाठी येथे YouTube लिंक दिली आहे : 

Author

Leave a Reply