भटकंतीत दिसलेली बेंगळुरूची झलक

 बेंगळुरूमध्ये प्रवाशांनी बघण्यासारखे खूप काही आहे; अशा कांही आगळ्यावेगळ्या जागांविषयी लिहिण्यासारखेही खूप काही आहे.   उदाहरणार्थ : इंटरनॅशनल आयटी पार्कमुळे आणि वर्षातील चार महिने जिथे सत्यसाईबाबा वास्तव्य करीत त्या त्यांच्या भव्य आश्रमामुळे प्रसिद्ध असलेले उच्चभ्रू व्हाइटफिल्ड. तेथील एका लॉजमध्ये होणाऱ्या वीकएंड पार्ट्यांना सव्वाशे वर्षांपूर्वी बंगळुरूमधे राहणारा तरुण विन्स्टन चर्चिल जात असे! ज्या क्लबचे चर्चिल आजही चौदा रुपये ‘देणे’ लागतो तो खानदानी वैभव मिरवणारा बंगलोर क्लब हादेखील एखादी संध्याकाळ मित्रांबरोबर निवांत गप्पा मारण्यात घालवावी असा आहे. किंवा पद्मभूषण डॉक्टर देवी प्रसाद शेट्टी यांचे नारायण हृदयालय – ज्याच्या शाखा आज देशात एकवीस ठिकाणी आहेत आणि जिथे अल्प किमतीत उत्तम हृदयशस्त्रक्रिया केली जाते. या हॉस्पिटल चेनचा विस्तार डोळे दिपवणारा आहे. पण या साऱ्याबद्दल मी पूर्वी थोडेफार लिहिले आहे. त्यामुळे इथे तीन वेगळ्या स्थळांबद्दल लिहावेसे वाटते :

एक स्थळ खूप जुने आणि दोन स्थळे अगदी नवी.

   त्यातले खूप जुने स्थळ म्हणजे नंदी मंदिर किंवा बुल टेम्पल. बेंगळुरूमधील हे सर्वांत प्राचीन स्थळ मानले जाते. शहराचा संस्थापक  केंपेगौडाने सोळाव्या शतकात हे नंदीचे म्हणजे शंकराच्या वाहनाचे मंदिर उभारले. त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे; पण आज जे दृष्टीस पडते त्यावरून मूळ देऊळ कसे होते याची कल्पना करता येते. देऊळ आहे चांगले, दर्शनाला गर्दीही बरीच होती; पण खरे आकर्षण आहे ते नंदीबैलाची येथील प्रचंड मूर्ती किंवा त्याचा पुतळा. चौदा फूट उंच आणि वीस फूट लांब असलेला हा काळाकभिन्न नंदी ग्रॅनाईटच्या एकाच विशाल खडकातून कोरलेला आहे. जगातील हा सर्वांत मोठा बैलाचा पुतळा मानला जातो. नंदीच्या मागे शंकराची पिंडीही आहे; पण तिच्यापेक्षा नंदीलाच जास्त महत्त्व दिले जाते. प्रत्यक्ष देवापेक्षा देवाचे वाहन इथे अधिक पूजले जाते! हारफुलांनी तो नंदी मढवलेला होता, अनेक जण त्याची पूजा करत होते; पण तरीही त्याचे मूळ नितळ काळे सौंदर्य नजरेत भरणारे होते.

   याबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की या भागात मुख्य पीक हे पावटा किंवा वालाच्या शेंगांचे घेतले जाई आणि एक रानबैल तिथे येऊन पिकाची नासाडी करत असे. त्याला तृप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही नंदीची मूर्ती उभारली आणि मग शेजारीच केंपे गौडाने हे मंदिर उभारले. या नंदीला आजही वालाच्या शेंगांचाच नैवेद्य दाखवला जातो. विशेष म्हणजे वालाच्या शेंगा ही केवळ कर्नाटकातली नव्हे तर सगळ्याच दक्षिण भारतातील खूप लोकप्रिय भाजी आहे. 

   नंदी मंदिर हे प्राचीन बंगळुरूचा वारसा म्हणून बघण्यासारखे आहे, पण आधुनिक बंगळुरूमध्येही आवर्जून बघण्यासारखी अनेक स्थळे आहेत. असेच एक अगदी भिन्न आणि नवे स्थळ म्हणजे इंडियन म्युझिक एक्सपिरियन्स हे संग्रहालय. भारतीय संगीताचे विविध भाषांतील विविध पैलू समजून घेण्यासाठी जे. पी. नगर भागातील या संग्रहालयाइतकी उत्तम जागा दुसरी सापडणे अवघड आहे. जवळजवळ पन्नास हजार चौरस फूट विस्तार असलेल्या या तीन मजली वातानुकूलित संग्रहालयात एकूण नऊ गॅलरीज आहेत. एका गॅलरीत बिस्मिल्ला खान यांची सनई, पन्नालाल घोष यांची बासरी, एम. एस. सुब्बूलक्ष्मी यांचा तंबोरा तसेच भीमसेन जोशी मैफलीत घालायचे तो ड्रेस अशा अनेक गोष्टीही इथे प्रदर्शित केलेल्या आहेत. मूळ मालकांकडून त्या विकत घेण्यासाठी बरीच रक्कम लागली असणार. येथील प्रत्येक भिंत म्हणजे टच स्क्रीन असलेले एकेक मोठे पॅनल आहे. तो स्क्रीन तुम्ही स्क्रोल करू शकता, हवा तो आउटपुट सिलेक्ट करू शकता. एक गॅलरी केवळ विविध वाद्यांची आहे. शंभराहून अधिक वाद्ये तिथे बघता येतात, ती कशी निर्माण झाली याची माहिती मिळवता येते आणि त्यांच्या विशिष्ट इमेजवर बोट ठेवले तर ती प्रत्यक्ष ऐकताही येतात. लोकसंगीत, नाट्यसंगीत, सिनेमा संगीत, शास्त्रीय संगीत, नृत्यासोबत जाणारे भक्ती संगीत, कर्नाटकी संगीत इ. कोटी 
संगीताचे प्रकार इथे ऐकता येतात. समोरच्या पॅनलवर तुम्हांला जे गाणे दिसेल त्यावर तुम्ही बोट ठेवले तर ते गाणे तुम्ही ऐकू शकता. त्यासाठी प्रत्येक पॅनलसमोर छोटी-छोटी आसने (पुफी) आहेत. प्रत्येक आसनाला जोडून एकेक अद्ययावत हेडफोन आहे. एकाच वेळी चार-पाच रसिक एकाच पॅनलसमोर बसून वेगवेगळी गाणी ऐकू शकतात आणि कोणालाही त्याचा जराही त्रास होत नही. ‘आप जैसा कोई’ आणि ‘डिस्को दीवाने’
ही नाझिया हसनची पॉप गाणी मी अनेकदा ऐकली होती, पण इथे ती मला जितकी आवडली तितकी पूर्वी कधीच आवडली नव्हती. बहुधा त्यांनी ओरिजिनल साऊंड ट्रॅक मिळवला असावा. येथील म्युझिक सिस्टिम खूपच हाय-टेक आहे. ‘समयचक्र’ नावाचे एक पॅनल आहे. तिथे वेगवेगळे भारतीय राग वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आणि दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कसे ऐकू येतात हे अनुभवता येते. साऊंड गार्डन या कक्षात बागेत बसून गाणे ऐकण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. रॉक म्युझिक किंवा जॅझ यांच्या पॅनलवर त्या संगीताची सुरुवात कशी झाली आणि ते संगीत कसे विकसित होत गेले ते ऐकता येते.

    ‘सॉंग्ज ऑफ स्ट्रगल’ नावाचे पॅनल मला विशेष आवडले. वेगवेगळ्या ऐतिहासिक लोकसंघर्षांमध्ये वेगवेगळ्या गाण्यांनी आंदोलकांना कशी साथ दिली त्याचा अनुभव इथे येतो. यात आपल्या ‘वंदे मातरम्’पासून मार्टिन ल्युथर किंगच्या ‘वुई शॅल ओव्हरकम’पर्यंत अनेक प्रेरणादायी गाणी ऐकता येतात. ‘वंदे मातरम्’ची तर पस्तीस वेगवेगळ्या चालींवरची आणि वेगवेगळ्या गायकांनी गायलेली रेकॉर्डिंग्स इथे आहेत. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्यापासून सोनू निगमपर्यंत आणि बेगम अख्तर यांच्यापासून श्रेया  घोशालपर्यंत सगळ्यांची गाणी इथे उपलब्ध आहेत. चित्रपटगीतांचा तर इथे अक्षरशः खजिना आहे; शिवाय गाण्यासोबत चित्रपटाची ती विशिष्ट क्लिपदेखील तुमची इच्छा असल्यास समोर बघता येते. तत्कालीन सिनेमांची पोस्टर्सदेखील इथे प्रदर्शित केलेली आहेत. ती बघताना तो सगळा कालखंड तुमच्यासमोर उभा राहतो. रविशंकर, येहुदी मेनुहीन, भीमसेन जोशी, लता मंगेशकर, एस. पी. बालसुब्रमण्यम, इलायाराजा आणि एम. एस. सुब्बूलक्ष्मी यांच्यासाठी एक-एक स्वतंत्र पॅनेल आहे. एडिसनने आपल्या ग्रामोफोनवर केलेले पहिले संभाषणही, त्याच्या मूळ ग्रामोफोनच्या मॉडेलवर इथे ऐकता येते. एका गॅलरीत भारतीय संगीतातील शंभर दिग्गजांची माहिती आहे. त्यांचे फोटो, त्यांचा जीवनपट, त्यांच्या संदर्भातले किस्से, त्यांचे संगीतातील योगदान हे सगळे तिथे सुरेख भाषेत नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे संगीतही तुम्ही पॅनलवर बोट ठेवून ऐकू शकता. ‘संगीत नसलेल्या जगाची तुम्ही कल्पना तरी करू शकता का?’ हा प्रश्न इथे जागोजागी विचारला गेला आहे आणि तो खरोखरच तुम्हांला विचारात पाडतो. आपण वाचनप्रेमी साहित्याची महत्ता जाणून असतो; पण लिखित शब्दांप्रमाणे स्वरांनाही विलक्षण सामर्थ्य असते. आनंद, दुःख, उत्साह, प्रेम, विरह, तिरस्कार, उन्माद, भक्तिभाव, समर्पण, देशप्रेम अशा विविध भावनांची अभिव्यक्ती संगीतातून कशी करता येते ते इथे बघता येते. इथेच उत्तम कॅफेटेरिया आहे, पार्किंगसाठी भरपूर जागा आहे; जी मोठ्या शहरात क्वचितच उपलब्ध असते; शिवाय प्रवेश फी फक्त दीडशे रुपये आहे. अशा प्रकारचे दुसरे कुठलेही संग्रहालय माझ्या माहितीनुसारतरी भारतात नाही.

   ब्रिगेड ग्रुप नावाची एक मोठी बिल्डर कंपनी बेंगळुरूमध्ये आहे. त्यांचे प्रमुख एम. आर. जयशंकर हे एकदा अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे गेले असताना त्यांनी तिथे विख्यात ग्रॅमी म्युझियम बघितले. संगीतक्षेत्रातील सर्वोच्च मानाचे मानले गेलेले ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड देणारी संस्था ती हीच. तसेच एखादे म्युझियम भारतात असावे असा निश्चय त्यांनी केला. प्रत्यक्षात तसे घडायला नंतरची दहा वर्षे गेली. हे म्युझियम सर्वोत्तम असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणून ज्या अमेरिकन डिझायनरने ग्रॅमी म्युझियम उभारले त्याच्याकडूनच जयशंकर यांनी हे म्युझियम डिझाइन करून घेतले. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी पवित्रा यांनी स्वतःचे पन्नास कोटी रुपये या प्रकल्पात प्रथम गुंतवले. त्यांचे बघून मग नंतर इतरही अनेक देणगीदार पुढे झाले. शेवटी २०१९ साली या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. जयशंकर यांनी स्थापन केलेल्या एका ट्रस्टतर्फे हे चालवले जाते. इतरही अनेक संगीतविषयक उपक्रम इथे चालवले जातात, तसेच अनेक संगीतप्रेमी इथे स्वयंसेवक म्हणून कामही करत असतात. शहराचे भूषण ठरतील अशी मोठी सांस्कृतिक कामे व्यक्तिगत पुढाकारातून कशी उभारता येतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. अर्थात त्यासाठी निव्वळ पैसा पुरेसा नाही; विशिष्ट दृष्टी(व्हिजन)देखील हवी.

   मी इथे साधारण दोन-तीन तास घालवले, पण खरे तर दोन-तीन दिवसही इथे सहज काढू शकलो असतो! बंगळुरूला येणाऱ्या प्रवाशांनी हे संग्रहालय अवश्य बघावे अशी मी शिफारस करेन. 

   कर्नाटक म्हटले की उडीपी हॉटेल्स पट्कन डोळ्यांपुढे उभी राहतात; तिथे मिळत असलेले इडली,  डोसा, मेदूवडा, उत्तप्पा हे पदार्थ बहुधा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थ असतील! अमेरिकेतील पटेलांच्या मोटेल्सप्रमाणे येथील उडीपी हॉटेल्स हीदेखील एक सक्सेस स्टोरी म्हणायला हवी. उडीपी हॉटेलांची वैशिष्ट्ये त्यांनी अगदी वर्षानुवर्षे कायम राखली आहेत. स्वच्छ वेटर्स आणि टेबल्स, तत्पर सर्व्हिस, ठरलेली चव, माफक दर. अगदी भिंतीवरचा ताजा हार घातलेला तो स्वामींचा फोटोही तस्साच. तसे यांच्याविषयी बरेच काही वाचले आहे, ऐकले आहे. त्यांना हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांच्याच समाजाकडून अगदी अल्प व्याजदराने कर्ज कसे मिळते, त्यांचे कामगार ते गावावरून कसे आणतात, त्यांची राहण्याची व्यवस्था तिथेच कशी करतात, सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचे मालक आणि कामगार दोघेही सतत कसे कष्ट करत असतात, त्यांना लागणार्‍या कांदे-बटाट्यांपासून मसाल्यांपर्यंत वेगवेगळ्या वस्तू पुरवणारे व्यापारी कसे ठरलेले असतात, चटणी-सांबारपासून दहीवड्यांपर्यंत त्यांच्या सगळ्या रेसिपीज कशा कायम असतात, फालुद्यापासून पिझ्झापर्यंत आणि चिनी नूडल्सपासून मेक्सिकन टॅकोपर्यंत जगभरातले नवे नवे पदार्थ, आपला स्वतःचा विशिष्ट ठसा उमटवत, त्याचे उडीपीकरण करत, ते मेन्यूमध्ये कसे वाढवत जातात आणि या सार्‍यामुळे ती उत्तम कशी चालतात वगैरे. त्यामुळे बंगळुरूला कधीही आले, तरी मावाल्ली टिफीन रूम्स (एमटीआर) येथे माझी एकतरी भेट ही ठरलेली असायची. उडीपी जेवण देणारे हे इथले सर्वांत प्रसिद्ध हॉटेल. इथल्यासारखे मसाले डोसे किंवा त्यांनीच तांदुळाचा तुटवडा असताना प्रचलित केलेल्या रवा इडल्या कुठेच मिळत नसतील. बंगळुरूमधे त्यांच्या दहा शाखा आहेतच; पण शिवाय जगातील इतरही अनेक देशांत त्यांच्या शाखा आहेत. १९२४ साली ते स्थापन झाले. म्हणजेच यंदा त्यांचे शंभरावे वर्ष आहे. पण या लेखात मला लिहायचे आहे ते एमटीआरबद्दल नाही तर एका नव्या हॉटेलबद्दल; जिथे जायचा हा माझा पहिलाच प्रसंग होता.

   ते हॉटेल म्हणजे इंदिरानगर भागातील रामेश्वरम कॅफे. त्यांच्या बेंगळुरूमध्ये इतरही चार शाखा आहेत; इतरही अनेक शहरांत, अगदी परदेशातही त्यांचा विस्तार होत आहे. बेंगळुरूमध्ये गेली पंधरा वर्षे स्थायिक झालेल्या मानसी होळेहोन्नुर या ओळखीच्या लेखिकेला भेटायचे होते आणि त्यासाठी आम्ही हेच सेल्फ-सर्विस असलेले हॉटेल निवडले. अशा हॉटेलांना इथे दर्शिनी म्हणतात. आम्ही त्या हॉटेलात गेलो त्याच्या थोडेच दिवस आधी ही हॉटेल चेन चर्चेत आली होती. १ मार्च रोजी यांच्या ब्रूकफिल्ड या बेंगळुरूच्या आयटी कॉरिडॉरमधील शाखेत ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या बॉंबस्फोटामुळे. नऊ माणसे त्या वेळी जखमी झाली होती. राघवेंद्र राव नावाच्या एका तरुण मेकॅनिकल इंजिनियरने आपल्या चार्टर्ड अकाउंटंट पत्नी दिव्या हिच्या सहभागातून ही चेन २०२१ मध्ये सुरू केली. रामेश्वर येथे अत्यंत गरिबीत जन्म घेऊनही पुढे देशाचे राष्ट्रपती बनलेले अब्दुल कलाम हा त्या दोघांपुढचा आदर्श होता आणि म्हणूनच आपल्या चेनचे नाव त्यांनी रामेश्वरम असे ठेवले. पदार्थांचा दर्जा, स्वच्छता, विनम्र व झटपट सेवा यांच्यामुळे बघता बघता ही चेन बंगळुरूवासियांच्या गळ्यातील ताईत बनली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या गाजलेल्या विवाहसोहळ्यात रामेश्वरम कॅफेने केलेल्या उडीपी पदार्थांचाही मेन्यूमधे समावेश होता. तो एक मोठाच बहुमानच मानला गेला होता. त्यांची गुबगुबीत आणि लोण्यासारखी मऊ घी इडली आणि सोबतची पोडी (चटणी), कुरकुरीत घी डोसा आणि कितीही खाऊ शकू असा वेन पोंगल या प्रसिद्ध डिशेस आम्ही मागवल्या आणि त्या खरोखरच खूप आवडल्या. ही हॉटेल चेन अल्पावधीतच इतकी प्रसिद्ध झाली आहे ते उगाच नाही.

   दुपारी जेवता जेवता मानसींबरोबर झालेल्या गप्पाही उद्बोधक होत्या. मूळच्या मराठी पण लग्नानंतर त्या बंगळुरूवासी झाल्या आणि कन्नड भाषा येत असल्याने इथल्या वातावरणात समरस झाल्या. त्यांच्या ‘बेंगळुरू डायरी’मधील शैलीदार ललितलेख इ-अंतर्नादमध्ये बऱ्याचदा प्रसिद्ध झाले आहेत. त्या आणि त्यांचे यजमान आयटीमध्ये आहेत, त्यांचे मराठीवरील प्रभुत्व कौतुकास्पद आहे. नोकरीसाठी देशभरातून इथे येणाऱ्या लोकांमुळे बेंगळुरू कसे कॉस्मोपॉलिटन बनत आहे, कन्नड भाषा आली नाही तरीही तुमचे इथे का अडत नाही याविषयीची त्यांची निरीक्षणे मला विशेष महत्त्वाची वाटली. माझ्यासारखा भटक्या एखाद्या शहरात सात-आठ दिवसांत खूप काही बघू शकत नाही; व्यावहारिकदृष्ट्या ते शक्यही नसते; पण मानसी अनेक वर्षे बेंगळुरूमध्ये राहत असल्याने त्यांचे तेथील लोकजीवनाचे आकलन निश्चितच अधिक सखोल होते. मराठीचा त्यांना अभिमान आहे; पण त्यांचे कन्नडवरही तितकेच प्रेम आहे असे जाणवले. भारतासारख्या बहुभाषिक देशात अशी  उदार मनोवृत्ती फार मोलाची आहे. 

Author

Leave a Reply