
पंढरपूर मिरजचे ब्रॉड गेजमध्ये कसे रूपांतर झाले झाले ते गेल्या लेखात आपण पाहिले.
परिणामतः आता थेट मुंबई-पंढरपूर गाडी सुरू झाली आणि ‘पांडुरंग प्रसन्न झाला’ असे वारकरी म्हणू लागले. मग सोलापूर मंडळ खऱ्या अर्थाने पूर्णपणे ब्रॉडगेज झाले. काही वारकऱ्यांचा रोष आम्हांला पत्करावा लागला पण तो भाग वेगळाच; कारण पंढरपूर-मिरजमधील छोटी-छोटी स्टेशने बंद झाली. काही मोजकीच स्टेशने शिल्लक राहिली. चालायचेच! हळूहळू तो विरोध मावळला. एकंदरीत काय? तर सर्वच खात्यांवरील कामाचा भार वाढत चालला होता. अशा वेळी माझ्याही खात्याला मागे राहून चालणार नव्हते. आमची सध्याची संकेत आणि दूरसंचार व्यवस्था कमी पडू लागली म्हणून आमच्या मंत्रालयाने आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला आणि RailTel Corporation of India Limited ही एक स्वायत्त संस्था PPP( Public Private Partnership ) तत्त्वावर स्थापन केली आणि रेल्वेमध्ये OFC ( Optical Fiber Communication) ह्या नवीन तंत्राचा शिरकाव झाला. तसे प्रायोगिक तत्त्वावर चर्चगेट ते विरार येथे हे तंत्रज्ञान सुरू झाले होते. माझ्या प्रशिक्षणाच्या दरम्यान मी यावर थोडे कामही केले होते. त्यामुळे ह्या नवीन कामासाठी माझी निवड झाली. अजून नोकरीची बरीच वर्षे बाकी होती. थोडक्यात मी अजूनही तरुण होतो; But with Enough Experience, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यावर ह्याच्या देखभालीसाठी एक अनुभवी व्यक्ती असावी म्हणून माझी प्रतिनियुक्ती (Deputation) रेलटेलला केली गेली. माझ्या मदतीला पश्चिम रेल्वेमधून माझे समकक्ष अभियंतासुद्धा आले होते आणि आमचे काम सुरू झाले.
JCB – Joseph Cyril Balm ford – या हरहुन्नरी माणसाने तयार केलेले चर/खड्डा खोदणारे यंत्र, त्याच्याच नावे ओळखले जाऊ लागले. JCB च्या मदतीने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंस १.५मी. खड्डा खोदून त्यात दोन केबल्स घालणे आणि प्रत्येक स्टेशनाला अत्याधुनिक उपकरणे लावून ती त्या केबलला जोडून कार्यन्वित करणे असे कामाचे स्वरूप होते. (Installation, Testing and Commissioning). काम जोखमीचे होते; कारण चालू असलेली कोणतीही यंत्रणा बंद पडू द्यायची नव्हती; नाहीतर, त्या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प होणार होती. मुंबई ते वाडी असा ६०४ कि. मी. मार्ग आम्हांला पूर्ण करावयाचा होता. आमचे खोदकाम चालू झाले आणि उत्खननात रेल्वेच्या अनेक जुन्या वस्तू सापडू लागल्या. १९१२ नंतर ह्या मार्गावर एवढे खोदकाम करणारा मीच होतो ना! (सोलापूर -वाडी ह्या मार्गावर रूळ टाकून रेल्वेची प्रवासी /माल वाहतूक साधारणतः १९१२ ला सुरू झाली होती.)
पितृपक्षाचे दिवस होते आणि त्यातच आमचे खोदकाम सुरू झाले तसे भुताटकीच्या अनुभवापेक्षा माणसेच भयंकर भेटली. कामात अडथळे आणणारे बरेच भेटले. रेल्वेहद्दीत अतिक्रमणे होतीच. त्यासाठी मी मराठी/हिंदी/इंग्लिश आणि कन्नडमध्ये जाहीर आवाहन केले आणि त्याची छापील पत्रके रेल्वेहद्दीच्या आजूबाजूंस वाटली. JCB चालकांकडेही ही पत्रके दिली. बऱ्याच जणांनी आपापली अतिक्रमणे काढली होती; पण कधी कधी मला रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक कर्नाटक पोलिसांना बरोबर घेऊन खोदकाम आणि इतर कामे करावी लागत होती.
दुधनी स्टेशनाच्या पुढे आमचे खोदकाम सुरू होते. ( हा भाग कर्नाटकामध्ये येतो. ) JCB ने एक किलोमीटर लांबीचा खड्डा खोदला. आम्ही त्या दिवसाचे काम संपवले आणि ‘उद्या बघू,’ म्हणून निघालो. दुसऱ्या दिवशी आम्हांला केबलचे काम करताना एके ठिकाणी २ ते ३ मीटर खड्डा बुजवलेला दिसला. दुधनी गाव हे सीमावर्ती असल्यामुळे कर्नाटकातील लोक येऊन येथे जुगार/मटका खेळून जात असत. त्यात कधीकधी बाचाबाची/मारामारी होत असे आणि कधीकधी त्याचे पर्यवसान खुनात व्हायचे; प्रेत रेल्वेमार्गावर आणून टाकत. मग महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस यांच्यात हद्दीवरून वाद होई आणि त्याचा गुन्हेगारांना फायदा मिळत असे. काम करीत असलेल्या एका मजुराच्या डोक्यात आले, की बुजवलेल्या खड्ड्यामध्ये प्रेत असेल तर? या शंकेनंतर कोणताही मजूर त्या खड्ड्यात उतरण्यास तयार होई ना. मी थोडा विचार केला. काम थांबवणे शक्यच नव्हते म्हणून मी तेवढी २-३ मीटर लांबीची केबल गुंडाळी करून ठेवली आणि एका मजुराला रात्रपाळीसाठी नेमले आणि पुढची केबल घालत आम्ही निघालो. अशा अचानकपणे बुजवलेल्या खड्ड्यात नक्की काय असेल याची तपासणी करण्याकरिता दुसऱ्या दिवशी कर्नाटक पोलीस, रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांना बोलावण्यात आले. पोलिसांनी खड्डा परत उकरायला लावला त्या वेळी आम्हांला त्यात जुने टाकून दिलेले कपडे मिळाले आणि आम्ही हुश्श केले. पितृपक्षाचे दिवस असल्यामुळे कोणीतरी नको असलेले कपडे आणून आयत्या खोदलेल्या खड्यात पुरले होते. आमचे काम परत सुरू झाले. काम कंटाळवाणे होते. ‘काय करावे?’ म्हणून मी फावल्या वेळात JCB मध्ये बसून त्या चालकाशी गप्पा मारू लागलो. १५ दिवसांनी मी JCB चालवायला शिकलो. जमीन साफ असली, की मी JCB चालवायचा आणि इतर वेळी त्याने चालवायचा असा नित्यक्रम चालू झाला. माझाही वेळ छान जाऊ लागला. मला JCBचे आर्थिक गणित कळत गेले. निवृत्त झाल्यावर JCB घ्यायचा विचारसुद्धा डोक्यात तरळून गेला.
सोलापूर ते वाडी दरम्यान लहान स्टेशनला पॅसेंजर गाडीशिवाय कोणतीच गाडी थांबत नाही. एकदा मला ऑफिसने दिलेली चारचाकी गाडी बंद पडली. काही मजूर तिथेच तंबू ठोकून होते, काही मजुरांना जवळच सोडायचे होते. नेहमीची पॅसेंजरगाडी निघून गेली होती. मला दिलेली चारचाकी गाडी बंद होती. मी माझ्या वायरलेस सेटवरून स्टेशन मास्तरला विचारले, “आसपास कोणती गाडी आहे का?” त्याने सांगितले xxxx ट्रेन आहे. मी माझ्या सेटवरून त्या गाडीच्या चालकाशी बोललो. तो नेमका माझ्या ओळखीचा निघाला. मी त्याला माझी अडचण सांगितली आणि ‘मी कुठे उभा आहे’ याचे Hectometer सांगितले. (Hectometer म्हणजे रेल्वेच्या कडेला प्रत्येक १०० मीटर अंतरावर इंजिन चालकाला अंतर कळण्यासाठी आखीव/रेखीव कि. मी. कोरलेले दगड असतात आणि त्यावर मुंबईपासूनचे अंतर कोरलेले असते. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई आहे म्हणून अंतर मुंबईपासून मोजलेले असते.)आता सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक आहेत. मार्गावर येणाऱ्या लहान मोठ्या पुलांवरदेखील असे पूल क्रमांक आणि Hectometer असतात.) माझ्याबरोबर ८-१० मजूर होते. त्यांनी विनंती केली, “आम्ही पण येतो” म्हणून. यथावकाश xxxx गाडी आली. नेमका AC कोच समोर आला. आम्ही आत चढलो आणि गाडी निघाली. त्या वेळेला नुकतीच मोबाईल फोनची सुरुवात झाली होती.
सोलापुरात रात्री ती गाडी आली. मी उतरलो. फलाटावर बरेच पोलीस आणि श्वानपथक आले होते. मी गाडीतून उतरताना पाहून माझ्या ओळखीच्या रेल्वे सुरक्षादल निरीक्षकाने विचारले, “हेमंतसाब, कुछ गडबड तो नहीं ना?” मी उत्तर दिले, “सब नॉर्मल है|”
मी, “का?” असे विचारले तर तो म्हणाला, “गाडीपर दुधनी के पास ॲटॅक हुआ है ऐसा HQ (मुंबई) से मेसेज प्राप्त हुआ है|” मी परत म्हणालो, “फेक होगा , रिलॅक्स| ”
गाडी जोपर्यंत रवाना होत नाही तोपर्यंत आरपीएफ आणि मीसुद्धा थांबलो. गाडी निघाली आणि मी घरी निघालो.
‘फलाटावर बरेच पोलीस आणि श्वानपथक का आले होते?’ याचे कारण मला कळले होते. माझ्याबरोबर ८-१० मजूर होते, त्यांच्याकडे कुदळ/फावडे/आणि कुऱ्हाडीपण होत्या आणि आम्ही AC कोचमध्ये चढलो होतो. कोणीतरी मोबाइलवरून थेट मुंबईलाच (HQ) फोन केला होता, की गाडीवर दरोडा पडला आहे त्यामुळे आमचे सोलापुरात जंगी स्वागत झाले होते.
रेल्वे सिग्नलिंग माहितीसाठी खालील क्लिप पाहणे. https://www.youtube.com/watch?v=Uq4K3C6vri8
