बिनकाट्याचा गुलाब

२०२५ साल हे पु.ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे (दि.१२ जून २०२५) आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीच्या शुभारंभाचे (दि. ३ जुलै २०२५) वर्ष आहे आणि चालू महिन्यात पु.लं. चा जयंती दिन (दि. ८ नोव्हेंबर) आहे. याचे औचित्य साधून पु. लं.च्या  बाबा आमटे यांच्या आनंदवनाशी जुळलेल्या ऋणानुबंधांचा धांडोळा घेणारा हा लेख ‘अंतर्नाद ’च्या नोव्हेंबर २०२५ च्या अंकात प्रसिद्ध करत आहोत. त्यासोबत पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या सर्जनशील सहजीवनाला अर्पण केलेली एक काव्यांजली.  

बिनकाट्याचा गुलाब   

पु.ल. देशपांडे यांचे बाबा आमटे यांच्या आनंदवनाशी जे ऋणानुबंध जुळले होते, त्यांतून काही सोनेरी क्षणांची निर्मिती झाली होती. त्या क्षणांच्या आठवणी संबंधितांकडून ऐकण्याचं आणि त्यांतल्या काही क्षणांचा तर प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. त्या क्षणांनी दिलेली ऊर्जा, प्रेरणा आणि आनंद वाचकांसोबत वाटून घेणं हा या लेखाचा हेतू आहे.   

बाबा आमटे यांनी आनंदवनात जशी खऱ्या मानवी विकासाची जिवंत लेणी घडवली, तसेच अनेक नावीन्यपूर्ण शब्दालंकारही घडवले. बाबांचं मराठीइतकंच इंग्रजीवरही प्रभुत्व होतं. त्यांचे काही शब्दालंकार नैसर्गिकपणे  इंग्रजीत घडायचे. ‘पेनफ्रेंडशिप’ हा त्यांतलाच एक. पण हा तर जुनाच शब्दप्रयोग. यात नावीन्य कुठे आहे?… तर  ते आहे, त्याच्या स्पेलिंगमध्ये. यातल्या ‘पेन’चं  स्पेलिंग जरा वेगळं होतं. बाबा आमटे लोकांना असं  आवाहन करत असत, की ‘तुम्ही नुसते ‘p-e-n’ friend होऊन थांबू नका, तर ‘p-a-i-n’ friendसुद्धा बना.’ म्हणजे दुःखितांशी, पीडितांशी, वंचितांशी  सहवेदनेचं  नातं  जोडा.  पु.लंना जेव्हा बाबांची ही इंग्रजी शब्दद्वयी समजली, तेव्हा त्यांनी तिचं  चट्कन आणि चपखल असं मराठीकरण केलं आणि ते  आनंदवनाच्या मित्रमेळाव्यात श्रोत्यांपुढे मांडलं. 

पु.लंनी इंग्रजी ‘पेनफ्रेंडशिप’ला मराठी कसं केलं हे  माहीत करून घेण्याआधी मित्रमेळाव्याची संकल्पना समजून घेतली पाहिजे. घराघरांतून नकोशा होऊन टाकून दिल्या गेलेल्या कुष्ठरुग्णांचा जणू एक ‘सामाजिक तुरुंग’ असं स्वरूप आनंदवनाला येणं  बाबांना  नको होतं. त्यामुळे आनंदवनाच्या आतले रहिवासी आणि बाहेरच्या समाजाचा मुख्य प्रवाह यांना परस्परांशी जोडून घेणारा मित्रमेळावा दरवर्षी आयोजित करण्यास बाबांनी सुरुवात केली. बाहेरच्या लोकांनी आनंदवनात यावं, कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांचे साहसी क्रीडाप्रकार आणि  कलाविष्कार त्यांनी बघावेत, बाहेरच्या लोकांचे कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत, आनंदवनवासीयांचा आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास वाढावा, त्यांना नवे मित्र मिळावेत असे अनेक हेतू आनंदवन मित्रमेळाव्याच्या आयोजनामागे होते.  

अशाच एका  मित्रमेळाव्यात बोलताना पु.लंनी लोकांना सांगितलं, की ‘नुसते लेखणी-मित्र होऊन थांबू नका, तर  दुखणी-मित्रही बना!’  

‘Pen-friendship’ साठी ‘लेखणी-मैत्री’ आणि  ‘pain- friendship’ साठी ‘दुखणी-मैत्री’ हा पु.लंनी केलेला केवळ अनुवाद नव्हता, तर ते अनुसर्जन होतं. ‘ती फुलराणी’ च्या प्रस्तावनेत अरुण आठल्ये यांनी पु. ल.कृत भाषांतरांसाठी ‘अनुसर्जन’ हा अत्यंत समर्पक शब्द योजला होता. अनुसर्जन म्हणजे नुसतं ‘translation’ नव्हे, तर ‘trans-creation.’ रसिकाला एका वेगळ्याच  ‘trans’ मध्ये (आनंदाच्या धुंदीत) घेऊन जाणारं. विशेष म्हणजे पु.लं.चं शब्दप्रभुत्वही ‘trans-verbal’ – (शब्दातीत) होतं. ‘शब्दातीत शब्दप्रभुत्व’ असा वरवर विसंगत वाटणारा चमत्कार पु. लं.च्या बाबतीत खरा ठरला होता; याचं कारण पु. लं.च्या शब्दप्रभुत्वाला सहृदयतेचं कोंदण आणि सक्रियतेचं अधिष्ठान होतं. त्यामुळे ‘तुम्ही दुखणी-मित्र व्हा’ असं फक्त लोकांना सांगून पु.ल. थांबले नाहीत, तर ते स्वतः आनंदवनाचे एक सच्चे दुखणी-मित्र बनले. पु.लं.च्या या ‘pain-friendship’ चा प्रत्यय ‘प्रकाशाच्या शाळे’ला आला.   

कुठे होती ही ‘प्रकाशाची शाळा’?   कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या प्रकल्पाला रोगाची सतत आठवण करून देणारं ‘कुष्ठधाम’सारखं नाव देणं हे कविमनाच्या बाबांना मंजूर नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्रकल्पाला नाव दिलं, ‘आनंदवन’ – जिथे आनंद हा कुष्ठरोगापेक्षाही अधिक सांसर्गिक आहे, असं आनंदवन. केवळ संपूर्ण प्रकल्पालाच नव्हे, तर प्रकल्पांतर्गत केंद्रांनासुद्धा अशीच एकेक काव्यमय नावं बाबांनी दिली होती. अनाथालयाला ‘गोकुळ,’  वृद्धाश्रमाला ‘उत्तरायण’ (आणि इंग्रजीत ‘Wisdom Bank’), दिव्यांगांच्या कार्यशाळेला ‘संधीनिकेतन’ आणि अंधविद्यालयाला ‘प्रकाशाची शाळा!’  या प्रकाशाच्या शाळेसमोर सुंदर बाग फुलली होती. विविधरंगी आणि सुगंधी गुलाब हे त्या बागेचं वैभव होतं. या गुलाबांचं दर्शन घेणं जरी अंधविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शक्य नसलं, तरी गुलाब-पाकळ्यांच्या कोमल स्पर्शातून आणि सुगंधाच्या आस्वादातून अंध मुलांना अवीट गोडीचा आनंद मिळायचा. पण हा आनंद मिळवण्यासाठी त्यांना किंमत चुकवावी लागायची ती वेदनांची आणि कधी कधी तर थेंबभर रक्ताचीही; कारण गुलाबाची फुलं हाताळताना या अंध मुलांना त्याचे काटे टोचायचे आणि ते काटे कधी कधी अंध मुलांच्या कोवळ्या बोटांतून रक्तही काढायचे. पु.लं.ना जेव्हा हे समजलं, तेव्हा ते अतिशय व्यथित झाले आणि मग पु.ल. आणि सुनीताबाईंनी अंध मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब शोधण्याचा चंग बांधला. पु.लं.च्याच शब्दांत सांगायचं तर – “त्या काळात कोणीही पाहुणा आमच्या घरी आला असला, की बोलता बोलता सुनीता त्याला मध्येच विचारत असे की, ‘काय हो, बिनाकाट्याचा गुलाब तुमच्याकडे आहे काय?’ या अचानक आलेल्या प्रश्नामुळे तो पाहुणा बिचारा गोंधळून जाई आणि माझ्याकडे काहीशा करुणेनं बघू लागे!” शेवटी पु.लं.च्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि त्यांना बिनकाट्याचा गुलाब मिळाला तो शांतिनिकेतनात. मग टागोरांच्या बंगालमधून महाराष्ट्राच्या टागोरांनी बिनकाट्याचा गुलाब आणला आणि तो बाबा आमटे यांच्या आनंदवनात लावला. हा योगायोगही अत्यंत औचित्यपूर्ण होता; कारण बाबा आमटे आणि पु.ल. देशपांडे हे दोघेही टागोरांचे  चाहते आणि वंगभाषेचे सह(ज)पाठी!

   केवळ आनंदवनातले गुलाबच  नव्हे, तर सर्वच झाडं पु.लं.ना आपली सोयरी वाटायची. ज्या काळात जागतिक हवामान बदल, तापमान वाढ, पर्यावरण संरक्षणासाठी  झाडांची गरज यांच्या चर्चाही  सुरू झाल्या नव्हत्या, अशा काळातच द्रष्ट्या पु.लं.नी वृक्षांचं महत्त्व जाणलं होतं. आनंदवनाच्या मित्रमेळाव्यात बोलताना पु.ल. म्हणाले होते, “बाबा नेहमी असे सांगतात, की ‘प्रभूचे हजार हात चांगल्या कामाच्या मदतीसाठी येतात.”

हा ‘प्रभू’ म्हणजे नेमका कोण? मंदिरातल्या प्रभूविषयी मला फारशी माहिती नाही; पण प्रभू या  शब्दातील ‘भू’ ज्याला जवळची वाटते तो प्रभू असावा असं मला वाटतं. ‘प्रकर्षानं जो ‘भू’जवळ म्हणजे मातीजवळ जातो, तो प्रभू,’ अशी प्रभू या शब्दाची व्याख्या असली पाहिजे. झाडाच्या फांद्या मला प्रभूच्या हजार हातांसारख्या वाटतात. झाडाला एकाच वेळी जमिनीत खोलवर जाण्याचं वेड असतं आणि त्याचबरोबर आकाशात उंच झेपावण्याची ओढही असते! बाबांचं  व्यक्तिमत्त्व असंच आहे.”

   प्रभूचं नातं ‘भू’ शी जोडणारा आणि माती आणि आकाश यांना एकत्र आणणारा पु.लं.चा हा  विचार बाबा आमटे यांच्या एका कवितेशी कसा सूर जुळवतो बघा :

झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात

त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते

आणि सृजनशील साहसांना सीमा नसतात या 

त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते!

(संदर्भ : ‘ज्वाला आणि फुले’ काव्यसंग्रह)

   मातीच्या स्पर्शाची ही अट पु.लं.नी नेहमीच पाळली होती. आनंदवनाच्या मातीत माणसाची सहृदयता जागवण्याची शक्ती आहे हे पु.लं.नी ओळखलं होतं. त्यामुळे ते आनंदवनात येणाऱ्या अभ्यागतांना असं सांगत, की ‘इथे ‘पर्यटक’ म्हणून या आणि ‘परिवर्तित’ होऊन जा!’ आनंदवनातला प्रत्येक माणूस म्हणजे पु.लं.च्या दृष्टीनं ‘पर्यटन’ ते ‘परिवर्तन’ (tourism to transformation) या प्रवासातला एकेक वाटाड्या होता. पु.ल.  आनंदवनवासीयांच्या सौंदर्यनिर्मितीची प्रशंसा करताना नेहमी नम्रपणे म्हणायचे, की ‘मी तर फक्त ‘सुंदर मी होणार’ एवढंच म्हणून थांबलो; पण आनंदवनातला प्रत्येक माणूस त्याहीपुढे जाऊन म्हणतो, की ‘सुंदर मी करणार’!”

आनंदवनवासीयांच्या सौंदर्यनिर्मितीला पु.ल.देशपांडे फाउंडेशनच्या निधीचं पाठबळ देऊन   पु.ल. आणि सुनीताबाईंनी आनंदवनात मुक्तांगण मंच बांधून दिला. मुक्तांगणाच्या उद्घाटन प्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांनी आनंदवन-निवासींना असा काव्यमय आशीर्वाद दिला:

विक्राळ वणव्याचे पाणलोट

अशरण बाहूंनी बाजूला सारीत

श्रमर्जित सुंदरतेच्या चंद्रशाळेकडे

प्रवास करणाऱ्या पांथस्थांनो,

हे मुक्तांगण देवो तुम्हाला

निरामय विसावा

आणि नव्या निर्धाराचे

संजीवक पाथेयही !

या काव्यमय आशीर्वादातला एकेक शब्द –  विशेषतः त्यातलं प्रत्येक विशेषण – किती आशयघन आहे पाहा : अशरण बाहू, श्रमर्जित सुंदरता, पुन्हा त्या सुंदरतेची चंद्रशाळा, निरामय विसावा, नवा निर्धार आणि संजीवक पाथेय! 

मुक्तांगणासाठी  कुसुमाग्रजांपाठोपाठ गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांनीही आपली लेखणी उचलली आणि मुक्तांगणाचं एक सुंदर गाणं लिहून दिलं.  (ग.दि.मांनी लिहिलेलं त्यांच्या आयुष्यातलं हे बहुधा शेवटचंच गीत ठरलं.) या गाण्याची झलक म्हणून त्याची पहिली दोन कडवी बघा :

आनंदसाधकांनो, या रे मिळून सारे

मुक्तांगणात या रे, मुक्तांगणात या रे.. 

वय वंश धर्म भाषा यांना न ठाव काही

क्रीडांगणी कलांच्या हा भेदभाव नाही

मनमोकळेपणे घ्या इथले पिऊन वारे

मुक्तांगणात या रे, मुक्तांगणात या रे.. 

व्हा चित्रकार कोणी – स्वप्ने चितारण्यासी

व्हा शिल्पकार कोणी – आकार द्या जिण्यासी

अनुकूल क्षेत्र येथे, या अंगणी फुला रे,

मुक्तांगणात या रे, मुक्तांगणात या रे.. 

कलांचं क्रीडांगण, स्वप्नांचे चित्रकार, जिण्यांचे शिल्पकार अशा अनेक सुंदर संकल्पनांनी  आणि संकल्पांनी हे गाणं नटलं आहे. (एक गमतीचं निरीक्षण : या गाण्यातल्या ‘इथले पिऊन वारे’ या ओळीत विदर्भाच्या विषम हवामानातले ‘ऊन’ आणि ‘वारे’ असे दोन्ही डोकावतात!) ग.दि.मांनी दिलेला ‘अनुकूल क्षेत्र येथे’ हा आश्वासक दिलासा किती मोलाचा आहे, हे सतत प्रतिकूलतेशी संघर्ष करावा लागलेल्या वंचितांनाच कळू शकेल. या गीतात ग.दि.मांनी कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी किती उत्साहवर्धक शब्द योजला आहे : ‘आनंदसाधक!’       ‘आनंदसाधकांनो’ या प्रोत्साहक  संबोधनातूनच वंचितांच्या सक्षमीकरणाची सुरुवात होत असेल. 

ग.दि.मां.च्या  या मुक्तांगण-गीताला मग पु.लंनीच  संगीत दिलं. म्हणजे बघा : मुक्तांगण उद्घाटनाच्या निमित्तानं   कर्मप्रभू बाबा आमटे, शब्दप्रभू पु. ल. देशपांडे, काव्यप्रभू कुसुमाग्रज आणि गीतप्रभू ग.दि. माडगूळकर अशी चार जबरदस्त ताकदीची माणसं एकत्र आली होती; मग त्यातून काहीतरी अलौकिक घडणं हे तर क्रमप्राप्तच होतं. पुढे अनेक वर्षांनंतर डॉ. विकास आमटे यांनी ‘स्वरानंदवन’ हा कुष्ठरुग्ण, दिव्यांग, अंध, मूकबधिरांचा जो अलौकिक कलाविष्कार साकारला, त्याची बीजं या प्रेरणांमध्ये असावीत. असं म्हणता येईल, की बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांमधला ‘स्व’ जागवला, तर डॉ. विकास आमटे यांनी त्यांच्यातला ‘स्व-र’ जागवला!

बिनकाट्याचा गुलाब आणि मुक्तांगण मंच यांखेरीज इतरही अनेक प्रकारे पु.लंनी आनंदवनाला योगदान दिलं. त्यांनी स्वतः  निमंत्रणपत्रं लिहून  बृहन्महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक नामवंतांना मित्रमेळाव्यासाठी आनंदवनात बोलावून घेतलं. पं.कुमार गंधर्व, पं. वसंतराव (पु.लं.च्या शब्दात ‘वसंतखाँ) देशपांडे, कवी वसंत बापट, इंदूरचे चित्रशिल्पकार विष्णू चिंचाळकर (पु.लं.च्या शब्दांत ‘मध्यभारताचे पिकासो’), गीतकार ग.दि. माडगूळकर असे अनेक मान्यवर आनंदवनच्या मित्रमेळाव्यात सहभागी होऊ लागले. विष्णू चिंचाळकर एकदा मित्रमेळाव्यात बोलताना म्हणाले होते, “आम्ही चित्रकार, शिल्पकार द्विमिती, त्रिमितीमध्ये कलाकृती घडवत असतो. पण आनंदवनवासीयांची सर्जनशीलता पाहिल्यावर मला कलेची आजवर न गवसलेली चौथी मिती सापडली!”  मित्रमेळाव्यामधल्या आपल्या मनोगतात पं.वसंतराव देशपांडे म्हणाले होते, “सात स्वरांपैकी एकेक स्वर सापडावा यासाठी आम्ही गायक धडपडत असतो; पण मी आनंदवनात आलो आणि मला एकदम संपूर्ण सप्तक सापडल्यासारखं वाटलं!”  अशा केवळ शब्दांपलीकडल्याच नव्हे, तर लौकिक संवेदनांच्याही पलीकडल्या अलौकिक अनुभूतींची ओळख या कलावंतांना होऊ शकली, ती पु.लं.नी आवर्जून आणि आर्जवानं केलेल्या बोलावण्यांमुळेच. आनंदवनाची माहिती आणि महती फक्त बृहन्महाराष्ट्रालाच सांगून पु.ल. थांबले नाहीत, तर ती त्यांनी पाश्चात्त्य देशांपर्यंतही पोचवली. साधना प्रकाशनानं बाबांच्या पन्नाशीनिमित्त काढलेल्या विशेषांकातल्या मराठी लेखांची इंग्रजी भाषांतरं करून पु.लं.नी ती पाश्चात्त्य देशांमधल्या आपल्या मित्रांना पाठवली आणि त्यांना आनंदवनाला देणग्या देण्याचं आवाहन केलं. राम गबाले यांच्या साहाय्यानं पु.लं.नी आनंदवनाच्या कार्यावर लघुपट बनवून घेतले. दि. १४ मार्च १९७६ या दिवशी ‘ती फुलराणी’ या आपल्या नाटकाचा प्रयोगही पु.लं.नी आनंदवनात आयोजित केला. 

पु.ल. आनंदवनात भावनिकदृष्ट्या किती गुंतले होते, याचा एक दाखला पु.लं.च्याच शब्दांत :  “मी परगावी जायला निघालो, की सुनीता मला नेहमी बजावून सांगते, की ‘भाई, तिकडून परत येताना तिथे काही विसरून येऊ नकोस. नेलेल्या सगळ्या वस्तू  नीट ट्रंकेत भरून परत आण.’ पण सुनीताच्या या सूचनेला फक्त एकाच ठिकाणाचा अपवाद असतो आणि ते ठिकाण म्हणजे आनंदवन. मी आनंदवनला जाताना सुनीता ही सूचना मला कधीच करत नाही. कारण तिला हे माहीत आहे, की मी आनंदवनातून परतताना तिथे स्वतःलाच विसरून येतो!”

ही भावनिक गुंतवणूक एकतर्फी (unilateral) नव्हती. पु.लं.ना एकदा त्यांच्या अन्य काही कार्यक्रमामुळे आनंदवन मित्रमेळाव्याला उपस्थित राहता  येणार नाही असं साधनाताईंना कळलं आणि मग त्यांनी ‘कसंही करून येणं जमवाच’ अशी गळ घालणारं पत्र पु.लं.ना लिहिलं. या पत्रात साधनाताईंनी लिहिलं होतं : ‘तुमचे मन खट्टू करणारे पत्र मिळाले आणि क्षणभर वातावरण उत्साहगलित झाले. तुमच्या भेटीला सर्वजण आसुसलेले असतात. स्वयंपाकी सिया पंडितपासून बाबांपर्यंत. सर्वांनाच वाईट वाटले. तुमचा तिथला (म्हणजे अन्य कार्यक्रमासंबंधीचा) करार हा आर्थिक असला, तरी आनंदवनचा करार पारमार्थिक आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तो पाळलाच पाहिजे. बघा. कसेही करा आणि सर्वांची मने जाणून घ्या.’  साधनाताईंनी पु.लं.ना किती हक्कानं, आपुलकीनं केला आहे येण्याचा आग्रह! या आग्रहात आनंदवनवासीयांचा पु.लं.विषयीचा प्रेमादर प्रतिबिंबित झालेला दिसतो. थोडक्यात सांगायचं तर दुखणी-मैत्री ही दुतर्फा  (bilateral) होती!                    

दुखणी-मैत्री, परिवर्तन, सौंदर्यनिर्मिती, मुक्तांगण अशा उदात्त गोष्टींबरोबरच पु.लं.ना खट्याळपणाचंही आकर्षण होतं. एक व्रात्य मूल पु.लं.मध्ये कायम जागं असायचं. लहान तोंडी खूपच मोठा घास घेऊन असं गमतीनं  म्हणता येईल, की सुनीताबाई म्हणजे मूर्तिमंत ‘पातिव्रत्य’ आणि पु.ल. म्हणजे ‘पतिव्रात्य!’ आपल्या या व्रात्यपणाला साजेशी एक गंमत पु.लं.नी एकदा बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ.विकास आमटे यांना सांगितली होती : “विकास, तुला माहीत आहे का,  माझे एक जयवंत दळवी की कोणीसे मित्र आहेत ना, त्यांनी सुनीताला काय नाव ठेवलं आहे? – ‘पु.लं.देवी’!” (त्या काळात दरोडेखोरीग्रस्त   चंबळच्या खोऱ्यात  जिची दहशत होती, अशा एका महिला डाकूचं नाव होतं, ‘फुलन देवी’!)  पु.लं. कडून सुनीताबाईंचं हे नाव ऐकल्यावर डॉ.विकास आमटे त्यांना चट्कन म्हणाले, “भाई, मित्रांनी वगैरे काही नाही, सुनीताबाईंना हे नाव तुम्ही स्वतःच ठेवलं असणार. कारण सुनीताबाईना ‘पु.लं.देवी’ म्हणण्याची प्रज्ञा आणि प्राज्ञा उभ्या महाराष्ट्रात तुम्ही सोडून इतर कुणामध्येही नाही!” पु.लं.चं शब्दप्रभुत्व कसं संसर्गजन्य होतं बघा – त्यांच्या सान्निध्यात येताच डॉ. विकास आमटे यांनीही ‘प्रज्ञा’ आणि ‘प्राज्ञा’ अशी शब्दगंमत केली. (खरं तर जयवंत दळवींनी सुनीताबाई आणि पु.ल. या दोघांनाही खरंच  टोपणनावं ठेवली होती. पण ती थट्टेखोरीची नव्हे, तर नितांत आदराची निदर्शक होती.  सारस्वतांमध्ये कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांना असलेलं महत्त्व स्मरून जयवंत दळवींनी देशपांडे दांपत्याला ‘पुलस्वामी’ आणि ‘पुलस्वामिनी’ अशी नावं दिली होती. आदरयुक्त मैत्रीच्या मांगल्याचं हे एक मधुर उदाहरण होतं!)

आनंदवनाच्या मित्रमेळाव्यात पु.ल. संवाद साधत, तो केवळ तिथं उपस्थित असलेल्या मान्यवर अतिथींशीच नव्हे, तर सर्वसामान्य माणसांसाशीसुद्धा. हे दर्शवणारी एक रम्य आठवण दै. ‘तरुण भारत’चे पत्रकार  श्री.शरद सालफळे यांनी मित्रमेळाव्याविषयीच्या एका लेखात लिहिली होती. ती अशी : एकदा मित्रमेळावा चालू असताना अचानक वीज गेली. मग पु.लं.नी सगळ्या उपस्थितांना आपल्या जवळ बसायला बोलावून घेतलं आणि कंदिलाच्या प्रकाशात संवाद आणि संवादिनीची मस्त मैफिल सुरू केली. मराठी वाक्यांमध्ये अकारण इंग्रजी शब्द घुसडण्यात आधुनिकता मानणाऱ्या मनोवृत्तीचा एक धमाल विनोदी (काल्पनिक) किस्सा पु.लं.नी या अनौपचारिक संवादात असा सांगितला होता : “एकदा अशी व्यक्ती युरोपला जाऊन आली, तर तिकडून  परत आल्यावर तिनं युरोपचं वर्णन कसं केलं असेल? ‘तिकडे सगळं एवढं क्लीन असतं की नै…,की एवढी क्लीनता जगात कुठे नसेल  आणि तिथली सगळी माणसं एवढी डिसेंट असतात ना…,की एवढी डिसेंट्री जगात कुठे नसेल!”  याच मैफिलीत पु.लं.नी जेव्हा ‘रात्रीचा समय सरून येत उषःकाल हा’ हे नाट्यगीत वाजवायला सुरुवात केली, तेव्हाच नेमकी वीज परत आली !

पु.लं.नी डॉ.विकास आमटे यांना एकदा असंही सांगितलं  होतं,  की विकास, मला मेल्यावर स्वर्गात जाण्याची बिल्कुल इच्छा नाही. मला नरकातच जायचं आहे. कारण स्वर्गात मला भजी, भेळ, मिसळ असे माझे आवडीचे चमचमीत खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. सतत सात्त्विक, सपक अन्न गिळावं लागेल; शिवाय ज्यांच्या विसंगतींवर विनोदाचं बोट ठेवावं अशी लबाड माणसंसुद्धा स्वर्गात भेटणार नाहीत. गांधीजी, विनोबाजी, साने गुरुजी अशा सज्जन माणसांच्या सहवासात राहावं लागेल. मी अगदी कंटाळून जाईन; शिवाय माझ्याआधी गेलेल्या माझ्या सगळ्या मित्रांच्या गप्पांचा कट्टा – तो तर नरकातच असणार! त्यामुळे मेल्यावर मी नरकातच जावं अशी माझी इच्छा आहे!” मी जेव्हा पु.लं.ची ही इच्छा ऐकली, तेव्हा मला तिच्या पूर्तीतील एक अडचण लक्षात आली; ती अशी की, पु.ल. जरी त्यांच्या इच्छेनुसार नरकात गेले असते, तरी पु.लं.च्या येण्यामुळे त्या नरकाचाच स्वर्ग झाला असता ना, त्याचं काय !      

पु.लं.ची विनोदबुद्धी इतकी सहजोत्स्फूर्त होती, की तिला मोठ्या प्रेक्षकसंख्येची गरज नसायची. मोराची नृत्यकला किंवा कस्तुरीमृगाची सुगंधवार्ता जशी आस्वादकांच्या आकड्यावर अवलंबून नसते, तशीच पु.लं.ची शब्दक्रीडाही होती!  पुण्यात एकदा कविवर्य बाकीबाब  – बा.भ. बोरकर यांच्या कन्या पद्माताई वज्रम यांच्या घरी बाबा आमटे, बा. भ. बोरकर आणि पु.ल. देशपांडे यांचं स्नेहभोजन झालं होतं. जेवणात पद्माताईंनी  चविष्ट डोसे (किंवा या दाक्षिणात्य शब्दाचं मराठीकरण केलं, तर ‘दोशे’) केले होते. जेवणानंतर घरी जाताना पु.लं.नी प्रशंसादर्शक अंगुलीनिर्देश (म्हणजे आजच्या भाषेत ‘स्माइली’) करत पद्माताईंना अशी दाद दिली होती की, “जेवण अगदी ‘दोशास्पद’ झालं होतं बरं का!”

एखादी गोष्ट बघितल्यावर तिचं मोठेपण ओळखणं यात काही विशेष नाही. पण ती गोष्ट बघण्यापूर्वीच तिचं मोठेपण ओळखणं यात ओळखणाऱ्याचंही मोठेपण असतं. पु.लं.नी आनंदवन प्रत्यक्ष बघण्यापूर्वीच त्याचं मोठेपण ओळखलं होतं. दि. ११ जुलै १९६५ रोजी (म्हणजे आनंदवनाला भेट देण्याआधीच) पु.लं.नी बाबा आमटे यांचा ‘ज्वाला आणि फुले’ हा काव्यसंग्रह वाचून बाबांना एक पत्र लिहिलं होतं. पु.लं.नी बाबांच्या विचारांचं आणि कार्याचं वेगळेपण आणि मोठेपण किती अचूक ओळखलं होतं, हे या पत्रातल्या शब्दाशब्दांतून  जाणवतं. पु.लं.नी या पत्रात बाबांसाठी एक जबरदस्त शब्द योजला होता. ‘विमनस्क’ या शब्दाचा अर्थ आपण जाणतो (आणि आजकाल दुर्दैवानं तो वरचेवर अनुभवतोही), पण पु.लं. नी बाबांसाठी योजलेला  शब्द  होता , ‘महामनस्क’! या पत्रातल्या एका वाक्यात  पु.ल.बाबांना उद्देशून म्हणतात,

 “एक भारी वजनाचा क्रॉस खांद्यावर घेऊन चालणाऱ्या तुमच्यासारख्या महामनस्काच्या वेदना तुमच्या कवितेतून बोलल्या आहेत.”

या पत्रातून आणखी एका सत्याची साक्ष पटते की, पु.ल. देशपांडे हे अजिबात कालबाह्य झालेले नाहीत. ‘पु.लं. च्या विनोदविश्वातले संदर्भ शिळे झाल्यामुळे पु.लं. ची प्रासंगिकता संपली आहे, ते इर्रिलेव्हंट झाले आहेत’  अशी कुजबूज करताना काही तथाकथित इंटलेक्चुअल दुढ्ढाचार्य हल्ली अधूनमधून आढळतात. तब्बल सहा दशकांपूर्वी  पु.लं.नी बाबांना लिहिलेलं पत्र हे अशा कुजबुजीला एक सणसणीत उत्तर आहे. या पत्रातल्या एका परिच्छेदात शब्दांच्या अवमूल्यनाविषयी पु.ल. लिहितात, “हल्ली जिवंत शब्द कुठले आणि शब्दांचे पेंढे भरलेले सांगाडे कुठले हे ओळखणं कठीण होऊन बसलं आहे. वापराला शब्द फार लागताहेत. वर्तमानपत्रं आहेत, नियतकालिकं आहेत. जाहिरातींना गोंडस, गुळगुळीत शब्द लागतात. हुकमी कौतुकं आहेत. रेडिओ आहे. भाषणबाजी आहे. त्यामुळे शब्दांचा चलनफुगवटा वाढला आहे. नकली शब्दांच्या टांकसाळी जोशात आहेत.” म्हणजे शब्दांच्या अवमूल्यनाची चाहूल पु.लं.ना साठ वर्षांपूर्वीच लागली होती. आता  तर हा चलनफुगवटा इतका पराकोटीला गेला आहे, की क्रिया होण्यापूर्वीच तिच्यावर शाब्दिक प्रतिक्रिया उमटतात आणि एखादा अनुभव घेण्याआधीच त्याची विशेषणं आपल्याला ठाऊक  होतात. मराठीत ‘मंत्रमुग्ध होणे, भारावून जाणे, भान हरपणे’ आणि इंग्रजीत ‘ग्रेट, अमेझिंग, माइंड-ब्लोइंग’ अशा शब्दांचा अतिसार चालू असतो. एके काळी क्वचितच दिसणारे ‘दिग्गज’ हल्ली प्रत्येक व्यासपीठावर आढळतात, इतका ‘दिग्गज’ हा शब्द स्वस्त झाला आहे. अनोळखी लोकांना उद्देशून आपण निर्विकारपणे ‘एच.बी.डी.’ पासून ‘आर.आय.पी.’ पर्यंतच्या शुष्क शाब्दिक संदेशांचा रतीब घालत असतो. समाज माध्यमात एखाद्याच्या संदेशाला  किती लाइक्स मिळतात, यावरूनच जणू त्याची ‘लाइकी’ ठरत असते. त्यामुळे नकली शब्दांच्या टांकसाळीचं पु.लं.नी १९६५ सालीच केलेलं वर्णन २०२५ साली अधिकच प्रासंगिक ठरतं. 

याच पत्रात पु.ल. लिहितात, “ह्या जगात एकेका विश्वामित्राच्या नशिबी एकेक मेनका आहेच. या विश्वामित्राची दाढी जितकी लांब, तितकी त्याची लाज झाकली जाते. प्रत्येक दाढीमागे कसल्यातरी स्वरूपातल्या मेनकेची ओढ दडली आहे. त्यामुळे सारी धडपड तपःसाधनेची न राहता तपोभंगाची क्षणोक्षणी भेडसावणारी भीती दडवण्याची असते. साधना करणात्मक न राहता अकरणात्मक राहते. ‘अ’ हिंसा, ‘अ’ स्तेय, ‘अ’ परिग्रह… म्हणून पुष्कळदा हा सारा ‘अ’ व्यापारेषु व्यापार होतो – उरतात नुसते शब्द (की ‘अ’ क्षरे?)” पु.लं.चं हे वर्णन सध्या बोकाळलेल्या भोंदू बुवांच्या विश्वामित्री दाढ्या आणि त्यामागे दडलेल्या ‘मी टू , मी टू’ करणाऱ्या बिचाऱ्या मेनका यांना तंतोतंत लागू पडतं की नाही!                                          

पु.लं.च्या संकल्पना अनेकदा त्यांच्या काळाच्या पुढच्या आणि म्हणून आजच्या काळात अधिक प्रासंगिक ठरणाऱ्या असायच्या. १९७९ साली – म्हणजे मोबाईल फोन्स येण्याच्या कित्येक दशकं आधी – आनंदवन मित्र मेळाव्यात पु.लं.नी सांगितलं होतं, की ‘दरवर्षी इथे यायचं ते आपली बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी!’  म्हणजे पु.लं.च्या दृष्टीनं बाबा आणि साधनाताई आमटे यांचं  आनंदवन ही  ऊर्जा पुरवणारी एक पॉवरबँक होती!  

या पॉवरबँकेच्या ऊर्जेनं एकदा काही क्षणांपुरती का होईना, पण पार्किन्सन्स डिसीज या गंभीर व्याधीवरही मात केली होती. आयुष्याच्या अगदी अखेरच्या टप्प्यात पु.ल. आनंदवनाच्या भेटीवर गेले होते. तेव्हा पु.लं.चा पार्किन्सन्स डिसीज बळावला होता. वास्तविक  पाहता या व्याधीत रुग्ण  भावाभिव्यक्ती करण्यास असमर्थ (expression-less) झालेला असतो; पण पु.लं.च्या त्या अखेरच्या आनंदवन भेटीत या वैद्यकीय नियमाला अपवाद घडला. ते  हिवाळ्याचे दिवस होते. विदर्भातली कडक थंडी होती म्हणून पु.लं.साठी शेकोटी पेटवण्यात आली.  तेव्हा बाबांचा हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन पु.ल. त्यांना म्हणाले होते, “बाबा, या शेकोटीपेक्षाही तुमच्या स्नेहाची ऊब खूप मोठी आहे!”   बाबांच्या स्नेहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पु.लं.चे डोळे पाणावले होते, चेहरा  भावुक  झाला होता आणि  पु.लं.च्या त्या भावनिक अभिव्यक्तीपुढे क्षणभर पार्किन्सन्सही नमला होता!

पु.लं.चा २५वा स्मृतिदिन आणि सुनीताबाईंची जन्मशताब्दी या निमित्तानं एक काव्यांजली:    

सुनीता आणिक भाई

सर्जनशील तो कोटी-भास्कर

 पुरुष उत्तम ‘भाई,’

कडक शिस्तीची छाया त्याच्या सोबत सुनीताबाई.

जनरोषाचा क्लेश सोसुनी ढाल पतीची बनली,

प्रयोग-मंचन, ग्रंथ-प्रकाशन करण्या कधी न थकली.

मुक्त मनस्वी पतीस देऊन जीवनसाथ शहाणी,

व्यवहारातून तिने कोरली दातृत्वाची लेणी.

छाया असली तरी सुनीता होती स्वयंप्रकाशी,

तेजशलाकेसमान झरणी धरली तिने हाताशी.

जरी ‘मनोहर तरी’ मधुनी व्यथा बोलकी झाली,

तरी पतीने दिलदारीची प्रथा आपली जपली.

आयुष्याच्या संध्याकाळी काव्यवाचने करूनी

भाई – सुनीता छान शोभले तरूण आणिक तरुणी.

त्यांच्या पु.ल.कित सहजीवनातून फुलल्या आनंदराशी,

या जोडीचे अतूट जुळले नाते रसिकमनाशी!

(टीप : ‘झरणी’ = फाउंटन पेन :  स्वा. सावरकरांनी मराठी भाषेला दिलेल्या अनेक शब्दांपैकी एक.)

 मंदार परांजपे, पुणे.

Author

Leave a Reply