काय झाले, सध्या आमच्या घरात, घरातील काही खोल्यांचे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरण चालू आहे. चिरंजीव आणि सूनबाई ह्यांनी घराचा ताबा घेतलेला आहे; आमच्या आयुष्यभर जपून ठेवलेल्या आणि दहा-वीस वर्षे आम्हीच ढुंकूनदेखील न बघितलेल्या अशा सर्व गोष्टींचा, वस्तूंचा, पुस्तकांचा एका अर्थाने पंचनामा चालू आहे. हे कचरा निर्मूलन (त्यांच्याच शब्दात) चालू असतानाच काही काही वेळा आमच्या हातामध्ये दुर्मीळ खजिना लागत आहे आणि त्यातच मन रमून जात आहे.
परवा मी रुग्णालयात असताना मोबाईलवर एक फोटो आला. चिरंजीवांनी पाठवलेला फोटो हा मीच १९८९ साली लिहिलेल्या एका पत्राचा होता. मला नुकतेच एमएस (सर्जरी) ह्या विषयाचे रजिस्ट्रेशन मिळालेले होते. अतिशय उत्साहात आणि विचारपूर्वक मी माझ्या भावी आयुष्यातील वाटचालीचा विचार करत होतो, मांडणी करत होतो. सातारा शहरात मध्यवर्ती भागामध्ये आमच्या मामेआजोबांचा मोठा वाडा होता, तो रुग्णालयासाठी विकत घ्यावा असे माझ्या आणि वडिलांच्या मनामध्ये होते. त्या संदर्भात मी त्यांना लिहिलेल्या पत्राचा तो फोटो होता. आज दत्तकाशी रुग्णालयाची वास्तू त्याच जागेत उभी आहे.
मी पत्र वाचले, आठवले, की मी हे पत्र उत्साहात मामांना लिहिले होते, त्यानंतर काही दिवसांत त्यांची आणि माझी ज्या वेळी भेट झाली त्या वेळी त्यांनी ते पत्र मला परत केले होते आणि म्हणाले होते, की ‘तू आधी एमएस पूर्ण कर,आणि त्याहीपुढे सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घे, मग नंतर बघू!’ मी त्यांचे उत्तर ऐकून मनातून नाराज झालो होतो; परंतु त्यांचा करारी चेहरा हा दिलेला शब्द पाळण्याची खातरी सांगत होता हे नक्की.
आज हा पत्राचा फोटो पुन्हा बघताना माझे लक्ष त्या लेटरहेडकडे गेले आणि मी खरोखरीच भूतकाळामध्ये हरवून गेलो. १९८७ मध्ये मी इंटर्नशिप पूर्ण करून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील शिक्षणासाठी आलो होतो. अद्याप कोणत्याच पदव्युत्तर शिक्षणासाठी माझी नोंदणी झाली नव्हती. साल होते १९८८, मी नुकताच इंटर्नशिप पूर्ण करून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हाउसमन या पदावर सर्जरी डिपार्टमेंटमध्ये रुजू झालो होतो. हाउसमन असल्यामुळे पडेल ते काम आपल्याला करावे लागायचे. अगदी जखमेमध्ये किडे पडलेले असतील तर ते उचलण्यापासून ते सिव्हिलच्या त्या सरकारी कागदावर पाच-सहा पाने कारकुनी खर्डेघाशी काम करत रुग्णाचे पेपर भरणे इथपर्यंत. पुरुष वॉर्डमधील चाळीस आणि स्त्री वॉर्डमधील चाळीस रुग्णांच्या गराड्यामध्ये रोजच्या पंधरा ते वीस अॅडमिशन्स आणि तितकेच डिस्चार्ज असायचे. त्यांची सर्व कामे कागदोपत्री पूर्ण करणे आणि दुसऱ्या दिवशीची शस्त्रक्रियेची पूर्वतयारी करणे हे सगळे आमच्या माथी असायचे.
अपघाती रुग्ण आणि डायबेटिसच्या जखमा आणि ऑपरेशन झालेल्या रुग्णांचे ड्रेसिंग करणे हे सर्वात महत्त्वाचे आणि इतरांनी नाकारलेले काम आम्हांलाच करावे लागायचे. हे काम करताना दिवस आणि रात्र दोन्हींमधील फरक कळायचा नाही.
प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये आठवड्याचे दोन दिवस आणि इमर्जन्सीचा तिसरा दिवस हा आम्ही रुग्णाच्या फक्त पूर्वतयारी मध्येच घालवायचो आणि आपल्याला केव्हा तरी शस्त्रक्रिया प्रत्यक्ष करायला मिळेल, ह्या आशेवर थांबावे लागायचे. हर्निया,अपेंडिक्स, हायड्रोसिल आणि मूळव्याध या शस्त्रक्रिया आमच्यातील सिनियर मंडळींना मिळायच्या. आमच्या वाटेला किरकोळ सरकमसीजन आणि इतर टाके घालण्याच्या इमर्जन्सी शस्त्रक्रिया मिळायच्या. अशा वेळी एकच आशेचा किरण दिसायचा : आम्ही रात्री-मध्यरात्री कधी एकदा इमर्जन्सीची केस येते आणि आपल्याला कापायला किंवा टाके घालायला मिळतात याची वाट बघायचो.
इमर्जन्सीमध्ये येणारी सर्वात मोठी शस्त्रक्रिया म्हणजे ‘बर होल’ – म्हणजे काय तर डोक्याला मार लागलेला एखादा रुग्ण अॅडमिट झाला असेल तर त्याला डोक्याच्या आत कुठे रक्तस्त्राव होऊन मेंदूवरील कॉम्प्रेशनची लक्षणे असतील तर ती रक्ताची गुठळी काढून टाकण्यासाठी कवटीला भोक पाडणे.
त्या वेळी सिटीस्कॅन नसल्यामुळे अर्थातच रुग्णाच्या हातापायाला झालेला पॅरॅलिसिस आणि डोळ्यांतील बुबुळांच्या तपासणीनंतर कोणत्या बाजूला मेंदूवर प्रेशर असावे ह्याचा अंदाज घ्यायचा.
अशा वेळी कानाच्या वरच्या बाजूला एक लहानसे छिद्र पाडून त्यातून रक्त किंवा रक्ताची गुठळी ही बाहेर काढणे हे महत्त्वाचे काम मध्यरात्री, पहाटे कधीही करावे लागायचे आणि तेदेखील आम्ही दोघे हाउसमन किंवा आमच्यावरील रजिस्ट्रार आणि काही पी. जी. स्टुडंट हे आळीपाळीने करायचो.
मला आठवते, की एप्रिल, १९८८ चा पहिला आठवडा असावा. मी सांगलीच्या सर्जरी वन या युनिटला बराचसा सरावलो आणि रुळलो होतो. आमच्या युनिटमध्ये मकरंद खोचीकर हा आमचा रजिस्ट्रार आणि इतर काही पीजी स्टुडंट यांची संख्या पाच होती.
एके दिवशी सांगलीच्या प्रताप थिएटरच्या मागील गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेला एक मध्यमवयीन तरुण आमच्या युनिटला अॅडमिट झाला. त्याची काहीही ओळखपाळख, नाव माहीत नाही; परंतु त्याला डोक्याला मुका मार जोरात लागला होता आणि संपूर्ण बेशुद्ध अवस्थेत तो अॅडमिट झाला होता. अंदाजे चार दिवस तो तसाच अॅडमिट होता, बाहेरून कोणतेही लक्षण नसल्यामुळे कोणत्या बाजूला रक्तस्राव झाला असावा याचा अंदाज आम्हांला येत नव्हता.
एके दिवशी रात्रीच्या राऊंडमध्ये मी त्याला तपासले असता डोळ्याच्या डाव्या बाहुलीची हालचाल होते आहे असे दिसले. उजवी बाजू मात्र हालचाल करत नव्हती. मी आमचा रजिस्ट्रार मकरंद खोचीकर आणि लेक्चरर डी. आर. कुलकर्णी यांना तसे सांगितले. मकरंद खोचीकर याने रुग्णाला रात्री बघून इमर्जन्सी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन डाव्या बाजूला कानाच्या वर ‘बर होल’ सर्जरी करायची म्हणून सांगितले.
योगायोगाने त्या रात्री ती शस्त्रक्रिया करण्याची माझी वेळ होती. मध्यरात्री बारा वाजता मी त्या रुग्णाला डाव्या बाजूला कानाच्या वर एक इंच व्यासाचे भोक पाडून आतून साठलेला रक्तस्त्राव हा बाहेर काढला. अंदाजे दोन वाट्या भरतील एवढे रक्त त्यातून बाहेर आले. पेशंट पूर्ण बेशुद्ध असल्यामुळे भूल देण्याचा प्रश्नच नव्हता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेशंटच्या मेंदूवरील त्या रक्ताच्या गुठळीचा दबाव कमी झाल्यानंतर टेबलावरच पेशंटने हात, पाय आणि डोळे यांची हालचाल करायला सुरुवात केली. शस्त्रक्रिया टाके घालून संपली त्या वेळी पेशंटने हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केली.
त्याचे नाव त्याने सांगितले ‘गोपाळ अग्रवाल.’
आग्र्यावरून सांगलीला बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी आलेला तो एक व्यापारी – त्याच्याकडील बिले दाखवून गोळा केलेले पैसे चोरून त्याला कोणीतरी गटारात टाकले होते. सकाळी आम्ही पोलिसांना तो शुद्धीवर आला असल्याचे कळवले आणि पोलिसांनी त्याचा जबाब घेतला.
इतक्यातच आग्र्यावरून त्याचा भाऊ त्याला हुडकत पोलीस स्टेशनमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या वॉर्डात आला. त्याची आणि भावाची भेट झाली आणि आम्हांलादेखील खूप आनंद झाला. यथावकाश तो डिस्चार्ज होऊन घरी गेला. त्याचा व्यवसाय छापखान्याचा होता.
त्याने जाताना ‘माझे ऑपरेशन कोणी केले’ हे सिस्टरना विचारले होते. अर्थातच केस पेपरवर सर्जन म्हणून असणारे माझे नाव त्याने लिहून घेतले होते. माझ्या घराचा पत्ता कसा मिळवला हे एक कोडे आहे.
अंदाजे महिनाभरामध्ये एक पार्सल आले, डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, सिव्हिल हॉस्पिटल, सांगली या नावाने. आमच्या प्राध्यापकांनी ते उघडले आणि आत तीन लेटर हेड होती. माझ्या नावाची! मला ते पूर्णपणे अनपेक्षित असे होते. आपले छापील नाव असणारे लेटर हेड ही कल्पनाशक्तीच्या पलीकडील गोष्ट होती; नाही म्हणायला कॉलेजच्या आर्ट्स सर्कलचा दोन वर्षे कार्यवाह असल्यामुळे तिथे छापील नाव असणारी लेटर हेड्स होती.
मी ‘एमएस’ रजिस्ट्रेशन ‘न’ मिळालेला असा फर्स्ट इयर हाउसमन म्हणून होतो. त्यामुळे मी छापील लेटर हेड छापलेले नव्हते. आपले नाव छापणे हे स्वप्न होते. मी त्या वेळी एमएस साठी अधिकृत नोंदणी न झालेला एक साधा हरकाम्या होतो. तरीदेखील लेटरहेडवर एमबीबीएस आणि एमएस असे छापले होते. मनातून आनंदलो असलो तरीदेखील खजील झालो होतो.
मला ती तीन लेटरहेड आणि त्या जोडीला आमच्या प्राध्यापकांचा ‘मेमो’ असे दोन्ही मिळाले.
मेमोमध्ये मला शिव्या मिळाल्या होत्या. मेमो मध्ये असे लिहिलेले होते, ‘Your behaviour with the patients is not proper!’ अर्थात मला ते अपेक्षित होतेच. कोणत्याही वैद्यकीय शिक्षण संस्थेतील विविध शाखांत असे राजकारण नित्य असायचे. कोण कुणाच्या अधिकाराखाली एमएस करतो, हा मोठा, अगोदरपासून नियोजित करण्याचा महत्त्वाचा गेम असायचा.
त्या सगळ्या आठवणी माझ्या मनात झर्रकन आल्या. आज अडतीस वर्षांनतर गंमतही वाटली आणि वाईटदेखील वाटले.
असे ते माझे पहिले छापील नाव असलेले लेटरहेड
आणि त्यावर लिहिलेले हे पहिले पत्र.
कोणती बारकीशी घटना आपल्याला मनाच्या वारूवर बसवून भूतकाळातील कोणत्या ठिकाणी घेऊन जाते, नाही का?

