रघुवंशातील राजेशाही

मानवाच्या इतिहासातली पहिली राज्यव्यवस्था बहुधा राजेशाही ही असावी. विविध कुले (clans) आपले शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी सर्वांत शक्तिशाली माणसाला नायक म्हणून निवडत असतील. त्या बदल्यात ती त्याला मान व खंडणीसारखे धन देत असावीत. हा नायकच पुढे राजा होत गेला असेल, असा तर्क करता येतो. भारतवर्षात तर ‘ना विष्णुः पृथिवीपतिः’ असे म्हणून राजाला पूजनीय मानले गेले होते. हजारो वर्षे अनेक प्रदेशांत ती स्वीकारली गेली होती. मात्र गेल्या काही शतकांत जगभरातच ही राज्यव्यवस्था बदनाम झालेली आहे. लोकशाही हीच अधिकाधिक लोकांची आणि देशांची पसंती ठरली आहे. याला कारण राजेशाहीत निर्माण झालेले दोष हे तर स्पष्टच आहे. राजांचे एकतंत्री कारभार, सत्तेचे दुरुपयोग, विलासी, ऐशआरामी जीवनशैली, प्रजेला फक्त वापरून घेणे अशा अनंत दोषांमुळे लोकांना राजे नकोसे झाले, विचारविश्वात उलथापालथी झाल्या, आणि राजांच्या राजवटी उलथवल्या गेल्या. फ्रेंच राज्यक्रांती हे अगदी ठळक व ज्वलंत उदाहरण; पण बहुधा एका बाजूला राजेशाहीबद्दलचे आकर्षण लोकांच्यातून पूर्णपणे नाहीसे झाले नसावे. त्यामुळे, इंग्लंडसारख्या लोकशाहीचा जिथे पाळणा हलला म्हणतात त्या देशातही बकिंगहॅम राजवाडा आणि राजा-राणीच्या वैभवशाली खजिन्याचे प्रदर्शन मांडणारा लंडन टॉवर आपले आकर्षण टिकवून आहेत. राजघराण्यावर, त्याच्या खर्चावर पार्लमेंटमध्ये टीका झाली तरी राजवाडा अजून चिरेबंदी आहे. जगात काही ठिकाणी राजे आहेत खरे; पण त्यांतले बरेचसे पत्त्यांतल्या राजांसारखे. त्यांना राज्याचे काही निर्णय घेता येत नाहीत, घेतले तर ते कोणी ऐकणार नाही. त्यांची अवस्था, राजेरजवाड्यांचे मानमरातब आणि कौतुकही तसेच आणि तेवढेच. समष्टीपेक्षा व्यष्टिवाद वरचढ ठरला, कालचक्राचे काटे फिरले आणि आधुनिक जगात लोकशाही राज्यव्यवस्था प्रस्थापित झाली आहे, हे वास्तव आहे. 

या पार्श्वभूमीवर त्या प्राचीन काळात शेकडो वर्षे टिकलेल्या एका आदर्श राजेशाहीचे प्रारूप कसे होते, हे पाहणे वेधक ठरेल. महाकवी कालिदासाचे सर्वश्रेष्ठ मानले जाणारे महाकाव्य म्हणजे रघुवंश. एकोणीस सर्गांच्या या काव्यात त्याने राजा दिलीपापासून एकोणतीस राजांच्या राजवटी, त्यांचे पराक्रम व चारित्र्य यांच्या कथा वर्णन केल्या आहेत. पहिल्या व दुसऱ्या सर्गांत दिलीप, मग आठव्या सर्गापर्यंत रघूची पराक्रमी कारकिर्द व अजविलाप, नवव्या सर्गात दशरथ, दहाव्या सर्गात रामाचा जन्म व कर्तृत्वाचा प्रारंभ होऊन पंधराव्या सर्गापर्यंत त्याच्या जीवनाचे वर्णन येते. सोळाव्या सर्गात रामाचा पुत्र कुश याची राजवट वर्णन केली आहे. सतराव्या सर्गात कुशाचा पुत्र अतिथी याची कारकिर्द आपल्यापुढे येते. अठराव्या सर्गात अतिथीच्या पुढच्या बावीस राजांच्या नावांची  केवळ जंत्री देणारे श्लोक आहेत. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे वा नवीन असे फारसे काही नाही.  शेवटच्या एकोणिसाव्या सर्गात अग्निवर्ण या पूर्णतया बेजबाबदार व अत्यंत विलासी राजाच्याबरोबरच तेजस्वी रघुवंशाचा ऱ्हास व अंत होतो. हा अंत अटळच होता. मग राज्याच्या निर्नायकी अवस्थेकडे पाहून अग्निवर्णाच्या गर्भवती विधवा राणीला सिंहासनावर बसवून अमात्य तिला किंवा/म्हणजे कदाचित त्या गर्भाला राज्याभिषेक करतात. रघुवंशाच्या राजांच्या पराक्रमाच्या गाथेचा हा शोकात्म शेवट होतो. 

हे राजे कसे होते? पहिल्या सर्गातच कालिदास रघुवंशातल्या राजांचे स्वभाव सांगतो. इथे अर्थातच शेवटचा अग्निवर्ण धरायचा नाही – शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम् – वार्द्धके मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम् – ही त्यांची जीवनशैली होती. 

प्रारंभाला विद्या केवळ जीवनातले सुख पुढती

वानप्रस्थी वैराग्यातुन योगसाधना मरणांती

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व  संन्यास या आश्रमधर्माच्या चौकटीत ते जगत होते. प्रारंभी विद्याभ्यास, मग जीवनाचा उपभोग व नंतर शेवटी योगसाधना असे सत्त्व त्यांच्यामध्ये होते; शिवाय;

त्यागाय संभृतार्थानाम् सत्याय मितभाषिणाम् 

यशसे विजिगीषूणाम् प्रजायै गृहमेधिनाम्- 

त्यागासाठी वित्तसाधना सत्यासाठी मितभाषी

कीर्तीसाठी शौर्यसाधना प्रजाहितास्तव संसारी

असा सत्य, त्याग व कीर्ती जपण्याचा त्यांचा वसा असे. एका प्रकारे यौवनामध्ये ते विषयैषी असले तरी एकंदर राजा म्हणून जगताना प्लेटो आपल्या रिपब्लिकमध्ये अपेक्षा करतो तसे ते राजे तत्त्वज्ञासारखे वागत होते, असे या श्लोकात दिसते. या राजांमध्ये सर्वाधिक शूर व सद्गुणी कौस्तुभ रत्नासारखा रघू; म्हणून वंशाचे नाव रघुवंश व त्यामुळे रामासह सर्व राजे राघव ठरतात. शेक्स्पीअरचा जसा पाचवा हेन्री आवडता आदर्श राजा होता, असे ते नाटक वाचताना जाणवते, तसे कालिदासाचे रघूबद्दलचे प्रेम जाणवते. या महाकाव्यातून राजेशाही या राज्यव्यवस्थेचे एक प्रारूप किंवा आदर्श रूप आपल्यासमोर येते.  

त्याचे स्वरूप वेधक आहे. मुख्यतः पहिला दिलीप, रघू, अज, दशरथ, श्रीराम यांच्या वर्तनातून व काही निर्णयांतून हे राजेशाहीचे स्वरूप व्यक्त होते. जगभरातल्या राजेशाही राज्यव्यवस्थांमध्ये दिसते, की राजाच्या जोडीला देवाचे प्रतिनिधित्व करणारा पुरोहित असतोच असतो. धर्मगुरूंकडून वा धर्मपीठांकडून मिळणारे दैवी शक्तींचे पाठबळ या संकल्पनेवर सर्व जगातच त्या काळात दृढ श्रद्धा होती – आज विज्ञानयुगात ती अजिबात नाही असे म्हणता येईल का, हा प्रश्नच आहे! एका प्रकारे राजसत्ता व धर्मसत्ता दोन्ही मिळून राज्य करतात. प्राचीन ग्रीक नाटकांतून दिसते, की राज्यातील समस्येच्या प्रसंगात देवळातले पुरोहित देवाला कौल लावून राजाला सल्ले देत असत व ते राजाला मानावे लागत. पुढच्या ख्रिश्चन काळात पाश्चात्त्य इतिहासात राजसत्तेला चर्चची व चर्चला राजाची गरज असे. चर्चचे सर्वोच्च पीठ व्हॅटिकनमध्ये होते. त्यांच्यातील संबंध नेहमीच गोडीचे होते असे दिसत नाही. ज्याँ आनुईच्या बेकेट या वास्तवाधारित नाटकात अशा तीव्र संघर्षाचे चित्रण आढळते. अकराव्या शतकात सातवे पोप ग्रेगरी आणि सम्राट चौथा हेन्री यांच्यात झालेला तीव्र संघर्ष ‘वॉक टु कनोसा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. सम्राटाने कनोसाला जाऊन प्रायश्चित्त घेतल्यानंतरच तो पुढे राज्य करू शकला. इंग्लंडच्या इतिहासातल्या सोळाव्या शतकातली गोष्ट. आठव्या हेन्री राजाला त्याचे आधीचे लग्न रद्द करून दुसरे लग्न करायचे होते. ते करण्याची परवानगी रोमच्या पोपने नाकारल्यावर त्याने त्या चर्चशी संबंधच तोडले आणि चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केले, तो त्याचा प्रमुख बनला व त्याने स्वतःच्या मनाप्रमाणे लग्न केले. 

विसाव्या शतकात म्हणजे लोकशाही काळात राजा आठव्या एडवर्डला वॉलिस सिंप्सनशी लग्न करायचे असेल तर राज्याधिकार सोडायला हवा, असे चर्चने निक्षून सांगितले. पार्लमेंटने चर्चची बाजू घेतली. एडवर्डला प्रेमासाठी सिंहासनाचा त्याग करावा लागला. तसे संघर्ष प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेत झाले नसावेत, असे वाटते. कालिदासाच्या साहित्यात ते आढळत नाहीत. इथल्या धर्मसत्तेचे रूप वेगळे होते. दरबारात पुरोहित असत, ते धर्मकृत्ये करत आणि आश्रमातून ऋषींच्या तपस्येचे आशीर्वाद राजांना हवे असत. अभिज्ञानशाकुंतलात दुष्यंत राजा कण्वांच्या आश्रमात प्रवेश करताना आपल्या सैनिकांना शस्त्रे बाहेर ठेवायला लावतो व आपल्यामुळे तिथे कोणताही उपद्रव होऊ नये, असे बजावतो. दिलीपाला पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठांचा सल्ला घेण्याची सूचना मंत्री करतात, म्हणून तो त्यांच्या  आश्रमात जातो. या प्रवासात त्याला भेटणाऱ्या प्रजाजनांशी तो स्नेहाने बोलतो, त्यांच्याकडून वाटेतल्या माहीत नसलेल्या झाडांची माहिती करून घेतो, त्यांच्या भेटी स्वीकारतो. तो व पत्नी सुदक्षिणा आश्रमातल्या एकवीस दिवसांच्या तपस्येसाठी मुनींप्रमाणे व्रतस्थ राहतात व नंदिनी गायीची सेवा करतात. 

रघूच्या व्यक्तिमत्त्वात श्रेष्ठ राजाची अनेक लक्षणे आढळतात. तो शूर आहे, पराक्रमाने लढाया जिंकतो, राजांना पराभूत करतो; पण जिंकलेल्या राजांकडून खंडणी घेऊन त्यांना पुन्हा त्यांची राज्ये परत देतो. कालिदास एका उपमेने हे स्पष्ट करतो. शेतकरी साळीचे रोप तयार झाल्यावर ते उपटून पुन्हा दुसरीकडे लावतो; मग भरघोस पीक येते, तसे हे नव्याने स्थापित झालेले राजे अधिक समृद्धी देत. श्रीकृष्णाने कंसाला मारले तरी राज्य उग्रसेनाला दिले आणि जरासंधाला मारले तरी त्याच्या मुलाला ते राज्य दिले. 

रघुवंशाच्या पाचव्या सर्गात कौत्स हा एक शिष्य आपल्या गुरूला दक्षिणा देण्यासाठी द्रव्य मागायला रघूकडे येतो. आश्रमातून आलेल्या कौत्साला तिथले कुशल विचारताना रघू विचारतो, “ऋषींच्या त्रिविध तपस्येत व्यत्यय येत नाही ना? आश्रमातले वृक्ष वाऱ्यावादळांपासून सुरक्षित आहेत ना? हरिणींची प्रसूती  निर्विघ्नपणे होते ना? रानटी जनावरांच्याकडून आश्रमात घेतली जाणारी पिके व धान्ये नासवली जात नाहीत ना? शुद्ध पाणी उपलब्ध आहे ना?” या संवेदनशील चौकशीत आश्रमाबद्दलची कळकळ व पर्यावरणाची काळजीही घेतलेली दिसून येते. त्या वेळी राजाचे अर्घ्य देण्याचे पात्र मातीचे आहे, म्हणजे रघूचा खजिना यज्ञातल्या दानधर्माने रिता झाला आहे, हे कौत्साच्या लक्षात येते. ते पाहून द्रव्य मिळवण्यासाठी अन्य राजाकडे जायची कौत्स तयारी करतो, पण राजा कौत्साला दोन-तीन दिवस अग्निशाळेत थांबून राहायला सांगतो आणि स्वतः थेट कुबेरावर स्वारी करण्याची तयारी करतो. सकाळी स्वारी करण्यासाठी रात्रीच रथात शस्त्रास्त्रे ठेवून तो तिथेच विश्रांती घेतो. पण कुबेराला रघूच्या पराक्रमाची कल्पना असल्याने तो युद्ध टाळण्यासाठी रात्री रघूच्या खजिन्यात सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स केवळ गुरुदक्षिणेपुरते द्रव्य उचलतो. राहिलेले खजिन्यात न ठेवता राजा रघू ते प्रजेला वाटून टाकतो. आपण विजयादशमीला लुटतो ते हेच सोने! पुढच्या काळातला दशरथ आपले कैकेयीला दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून तिच्या मनाप्रमाणे रामाला वनवासाला पाठवतो आणि पित्याच्या त्या वचनाला बाधा येऊ नये, म्हणून राम ती आज्ञा स्वीकारतो. राज्यावर खरा अधिकार रामाचा आहे, म्हणून भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याच्या वतीने राज्यकारभार करतो. हे सर्व राजांचे कर्तव्यपालन व निर्मोही वृत्ती दर्शवणारे आहे. 

रावणवधानंतर अयोध्येत परत येऊन रामाने रामराज्य स्थापले, हा सुखांत झाला. पण नंतर येणाऱ्या उत्तरकांडातील प्रजेतील प्रवादामुळे सीतेचा त्याग करण्याचा रामाचा निर्णय नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे.  व्यक्तिवादाऐवजी समष्टिवादाचे वर्चस्व असलेल्या त्या काळातल्या रामाची त्यामागची भूमिका फक्त प्रजेचा आदेश मानणे हीच होती. याविषयी कोणालाही – त्या निर्णयासाठी त्याला दोष देणाऱ्यांनाही संशय नसतो. पित्याच्या आज्ञेवरून राज्याभिषेक सोडून चौदा वर्षे वनवासात जाणाऱ्या राजाने राज्याच्या मोहाने प्रजेचे ऐकले, असे म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या व्यक्तींनी रामाविषयी विविध दृष्टिकोण प्रकट केले आहेत. रघुवंशात कालिदास ती रामाची अपरिहार्यता मानतो, भवभूती तर उत्तररामचरितात ती अनेक प्रकारे दर्शवतो. तो पहिल्या अंकात दाखवतो, की राम गुप्तहेराने प्रवादाविषयी सांगितल्यावर मूर्च्छित पडतो, निर्णय घेताना व घेतल्यावर सतत शोक करतो. झोपलेल्या सीतेच्या पायावर दुःखाने मस्तक टेकवतो. अनेक कवी, नाटककार, विचारवंत यांनी रामाच्या या निर्णयाविषयी इतके लिहिले आहे, की ते एकत्र केल्यास बृहद् ग्रंथाचा ऐवज होईल. वर्णाश्रमधर्माच्याच चौकटीत राज्य करणारा तो मर्यादापुरुषोत्तम होता. शंबूकहत्येबद्दल हेच म्हणावे लागते. कालिदास, भवभूती वगैरेंनी हे उत्तरकांड रामायणाचा भाग म्हणून स्वीकारले आहे. पण अनेक विद्वानांनी विविध पुरावे देऊन ते रामायणात प्रक्षिप्त असल्याचे प्रतिपादन केले आहे. तथापि, एकूणच या सर्व राजांची पहिली व शेवटची बांधिलकी प्रजेशी होती. ‘प्रजानुरंजनात् राजा’ हीच त्यांची व्याख्या होती. तो त्यांचा राजधर्म होता. दुसऱ्या बाजूला प्रजादेखील राजाला सन्मान देई व त्याने दिलेला न्याय स्वीकारत असे. त्याच्यावर विश्वास  ठेवत असे. त्याच्या शब्दासाठी सैनिक मरायला तयार होत. 

अलीकडच्या राजस्थानच्या इतिहासातली पन्नादाईची कथा प्रसिद्धच आहे. पाळण्यातल्या राजपुत्राला मारायला शत्रू येत आहे, हे पाहिल्यावर तिने आपले मूल पाळण्यात ठेवले आणि राजपुत्राला उचलून घेऊन जाऊन त्याचे प्राण वाचवले. अशा स्वामिनिष्ठेची अनेक उदाहरणे पाश्चात्त्य, विशेषतः मध्ययुगीन, इतिहासातही सापडतात. प्रजेची ही राजनिष्ठा हे राजाचे बळ असे व त्यासाठी कोणत्याही त्यागाची किंमत द्यायला तो तयार असे. अर्थात अशी राजनिष्ठा हे जगभरच्याच राजेशाहीमध्ये दिसणारे मूल्य आहे. ते जगाच्या इतिहासात ठायीठायी पाहायला मिळतेच. परस्परांवरची ही निष्ठा हाच राजेशाहीचा आधारस्तंभ होता आणि तो डळमळीत होत गेल्यावर ही राज्यव्यवस्था मोडकळीला येऊन ढासळत गेली.   

कालिदासाच्या साहित्यावरून त्या काळच्या भारतवर्षाचा भूगोल, संस्कृती, पर्यावरण व इतिहास त्याला ज्ञात होता असे जाणवते, तसे राजनीतीचेही त्याला सम्यक ज्ञान असले पाहिजे असेच रघुवंशातही दिसते; कारण हा राजधर्म वर वर्णन केल्याप्रमाणे सर्व राजांच्या व्यक्तिमत्त्वांतून, वर्तन व निर्णयांतून दिसतोच, पण  या राजधर्माचे वा नियमांचे सविस्तर वर्णन वा व्याख्यादेखील आपल्याला रघुवंशात पाहायला मिळते. ती अनपेक्षितपणे रामपुत्र कुशाचा पुत्र राजा अतिथी याच्या वर्णनात सविस्तरपणे येते. अनपेक्षितपणे असे म्हणण्याचे कारण या अतिथीचे नाव फारसे कुणाला माहीतही नसते, पण त्याच्याविषयीच्या सर्गात त्याने पालन केलेला राजधर्म सविस्तरपणे सांगितला गेला आहे. मौर्य-गुप्त-काळातील कामंदकाचे नीतिसार, कौटिल्याचे अर्थशास्त्र वगैरे ग्रंथांमध्ये राजेशाहीचे संविधान किंवा राज्यघटनाच वर्णन केली आहे. हे राज्यशास्त्रावरचे ग्रंथ आणि त्यानुसार वर्तन केल्यामुळे यशस्वी झालेले राजे या साऱ्याचाच अभ्यास या कवीने केला असला पाहिजे, असे वाटू लागते. म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यातली कोमलता हळवेपणाने टिपणाऱ्या व शृंगारकवीही असणाऱ्या महाकवी कालिदासाने इतिहास, भूगोलाबरोबर राज्यशास्त्राचेही अध्ययन केलेले दिसते. 

राजेशाहीच्या या व्यवस्थेत राजाला येनकेनप्रकारेण निवडून येऊन पाच वर्षांसाठी कारभार करायची जहागीर मिळत नसे, तर ती त्याची जन्मभराची जबाबदारी असे. त्याच्या जन्मापासून, लहानपणापासून त्याला त्यासाठी घडवण्याचा प्रयत्न केला जात असे. राजनीती, युद्धशास्त्राचे धडे दिले जात असत. अतिथीला राज्याभिषेक केल्यानंतर तुरुंगातले कैदी तर सोडले गेलेच, पण पिंजऱ्यांतले पक्षीदेखील मुक्त केले गेले. तो प्रजेला सामोरा जाताना व त्यांच्याशी बोलत असताना त्याची मुद्रा प्रसन्न असायची. सुज्ञ अमात्यांबरोबर चर्चा करून तो न्यायनिवाडे करत असे. त्याच्याकडून सेवकांना समुचित मेहनताना मिळत असे. त्याचे बोलणे सत्य असे व दान निश्चित असे. आपल्या रूपाचा व सद्गुणांचा त्याला गर्व नव्हता. केवळ शांती भेकड ठरते व केवळ शौर्य पाशवी होण्याची शक्यता असते. त्याने या दोहोंचा समतोल राखला होता. राज्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचे लक्ष असे, कारण तो झोपला तरी चार म्हणजे हेरांच्या रूपाने तो जागाच असे.         

न तस्य मंडले राज्ञः न्यस्तप्रणिधिदीधितेःl

अदृष्टमभवत्किंचित् व्यभ्रस्येव विवस्वतःll१७-४८ll — याचा अर्थ

हेरांचे जे जाळे त्याच्या राज्यामधि वसले

सूर्यासम मग काही त्याला अदृष्ट न उरले 

हे हेर ‘परेषु स्वेषु च क्षिप्तैरविज्ञातपरस्परैः’ म्हणजे ‘परस्परांना ठाउक नाही अपुले की परके’ अशा पद्धतीने आपल्या व शत्रूच्या राज्यात पेरलेले, नेमलेले असत. अमात्य-मंत्री यांच्याशी एकान्तात चर्चा करूनच राजा निर्णय घेत असे आणि या चर्चा करण्याच्या जागा  ‘गुप्तद्वारो न सूच्यते’ अर्थात ‘रहस्यमय ती गुप्तद्वारे’ असत. त्या परंपरेचे अवशेष आपल्याला हंपीसारख्या प्राचीन इतिहासाच्या स्थळी आजही पाहायला मिळतात. दिवसच नव्हे तर रात्रीच्याही कोणत्या प्रहरात काय करायचे, याचे राजाचे वेळापत्रकच ठरलेले असे आणि ते पाळणे ‘विकल्पपराङ्मुख’ म्हणजे अनिवार्य होते. राजा होणे आजच्या लोकशाहीतल्या मंत्रिपदापेक्षा अधिक जोखमीचे होते, ‘ग्रहीत इव केशेषु मृत्युना’ म्हणजे डोक्यावर सतत केसांना बांधलेली तलवार अशी त्याची अवस्था असे. त्याच्या प्रजेसाठीच्या कल्याणकारी प्रकल्पांची कल्पना काळजीपूर्वक पण गुप्तपणे केली जाई. कालिदास म्हणतो, की साळी तयार झाल्यावरच आपल्याला कळते, की त्यांची पक्व होण्याची प्रक्रिया आतल्याआत चालू होती, तसे ते प्रकल्प वा धोरणे पूर्ण झाल्यावरच प्रजेसमोर येत. भरभराटीच्या काळातही तो समुद्राप्रमाणे आपल्या किनाऱ्याच्या मर्यादेत राहत असे. प्रजेमध्ये फार असंतोष निर्माण होईल अशा गोष्टी टाळण्याची तो नेहमीच काळजी घेत असे. धर्म, अर्थ,  काम व मोक्ष हे भारतीय परंपरेत जीवनातले पुरुषार्थ मानलेले आहेत. धर्म, अर्थ व काम यांचे राजा उचित संतुलन राखत असे, असे म्हटले आहे. यात मोक्षाचा उल्लेख कालिदास करत नाही, हे उल्लेखनीय आहे. मोक्ष ही वैयक्तिक गोष्ट आहे आणि स्वतःच्या अध्यात्मापेक्षा प्रजेविषयीच्या कर्तव्यालाच राजाने प्राथमिकता द्यायला हवी, हे भान त्याला आहे. त्यासाठी कोशागार भरलेले राहील, याची काळजी घेतली जात असे. कामंदकाच्या राजनीतिशास्त्रात राजाच्या खजिन्याचे महत्त्व वर्णन केले आहे. राजा एकूण उत्पन्नाच्या एकषष्ठांश भाग प्रजेकडून घेई, पण त्याचा मोबदला, आजच्या भाषेत ‘रिटर्न्स’ किती तरी जास्त असत. सूर्य व आकाश पाण्याची वाफ करून घेतात पण अनेक पटीने अधिक पाणी पावसाच्या रूपाने देतात, अशी सुंदर उपमा देऊन हे कवीने ठसवले आहे. शत्रूचे दुर्बलबिंदू जाणून घेऊन तो त्यांच्यावर हल्ले करत असे आणि यशस्वी होत असे, कारण आपले सैन्य म्हणजे आपले शरीरच अशी त्याची भावना होती. संकटप्रसंगी उपयोगासाठी म्हणून अभेद्य दुर्गांची रचना त्याने करून ठेवली होती. प्रभाव, मंत्र व उत्साह या राजाच्या तीन शक्ती मानल्या जातात, त्या त्याच्याकडे होत्या, पण सर्पाच्या माथ्यावरच्या रत्नाप्रमाणे त्या त्याच्याकडून कोणाला काढून घेता येत नसत. राज्यातील व्यापारी व कारागीर नद्या, जंगले, पर्वत अशा सर्व ठिकाणी आपली कामे निर्भयपणे करीत, ते अनुक्रमे आपल्या तळ्यात, बागेत, घरात असल्यासारखे सुरक्षित असत. त्यामुळे भूमी भरपूर पिके देई, खाणी विविध रत्ने व जंगले अमाप हत्ती देत असत. आपल्याच नव्हे तर ग्रीकांच्याही इतिहासातल्या नोंदीतून दिसते, की त्या काळी भारतात प्रचंड प्रमाणात हत्ती होते. कालिदासाचा तर हत्ती अतिशय लाडका प्राणी असावा. त्याच्या सर्व साहित्यात तो सतत येतो, कधी उपमांसाठी, कधी त्याच्या मदस्रावाच्या सुगंधासाठी. (मात्र हा सुगंध केवळ काल्पनिक आहे, असे आजचे पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणतात!) मेघदूताचा तर प्रारंभच मेघाला दिलेल्या हत्तीच्या उपमेने होतो. पण हत्तीचे केवळ प्रेम नव्हे, तर जंगली हत्ती पाळीव हत्तींपेक्षा खूपच शक्तिशाली असतात, गंधद्विप व गंधरहित असे हत्तींचे दोन प्रकार असतात व गंधद्विप गंधरहितांना पळवून लावतात, अशी त्याची वेधक माहिती आहे. राजा बुद्धिमंतांचा आदर करीत असे. शत्रूंनाही त्याच्या सद्गुणांची जाणीव असे. अठरा प्रकारची माणसे व राजनीतीचे चार प्रकार लक्षात घेऊन राजा यश मिळवत असे. थोडक्यात, राजासाठी स्मृतींनी, कौटिल्याने व कामंदकाने सांगितलेली राजनीती, दिलेले आदेश या सर्वांचे पालन करणारे असे हे कालिदासाने वर्णन केलेले रघुवंशाचे राजे आहेत. 

एक विचार मनात येतो, राजेशाही उखडून आधुनिक काळाने लोकशाही आणली, ती आज जगाच्या सर्वाधिक भागात लोकप्रिय आहे. प्राचीन काळापासून मानवसमाजाचा प्रयत्न चालला आहे की सर्वांसाठी सुखकर, कल्याणकारी अशी योग्य राज्यव्यवस्था अंमलात आणावी. सर्वांनी सुखी असावे. ते विविध देशांतल्या आजच्या लोकशाहीत साध्य झाले आहे का? राजेशाहीमध्ये समतेच्या तत्त्वाचा पाया अनुस्यूत नाही. आज विषमता नष्ट करून आपण समता आणली आहे का? प्रजेचे हित हेच ‘सर्वोपरि’ असे सत्ताधारी मानत आहेत का? लोकशाही By the people, for the people, of the people अशी सर्वत्र दिसते आहे का? राजेशाहीत सत्ता वंशपरंपरेने चालत येत असे. आज लोकशाहीत ती तशी वंशपरंपरेने न येता योग्यतेनुसार येत आहे का? ‘सर्वेsपि सुखिनः सन्तु’ हे ध्येय साध्य करण्याचे अधिक प्रामाणिक प्रयत्न होताना दिसताहेत का? 

अखेर राज्यव्यवस्था कुठलीही असो, ती तटस्थ असते. ती राबवणारे हात कसे आहेत, यावरच लोकांचे सुख व कल्याण अवलंबून असते.

Author

Leave a Reply