मुलाखत : डॉ.अनंत देशमुख

मुलाखत: डॉ. अनंत देशमुख

मुलाखतकार: प्रा. प्रतिभा सराफ

परिचय – डॉ. अनंत देशमुख

निवृत्त प्राध्यापक आणि विभाग प्रमुख,

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.

संशोधक, समीक्षक आणि चरित्रकार.

एम. फिल. आणि १० पीएच. डी.च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन.

साहित्य आणि समीक्षेतील योगदानासाठी ‘कोकण साहित्य भूषण’ हा कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)  पुरस्कारासहित अनेक पुरस्कार.

डॉ. अनंत देशमुख यांचे लेखन :

१.नाट्यविचार : नीहारा प्रकाशन, पुणे.

२.आधुनिक नाट्यविचार : पुष्प प्रकाशन, पुणे.

१.अ.नाट्यविचार: ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. (सुधारित आवृत्ती)

२.अ.नाट्यसमीक्षा : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. (सुधारित आवृत्ती)

३.आ. ना. पेडणेकर यांची कविता :  पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

४.यात्रेकऱ्याचा वृत्तान्त : स्वयम् पब्लिकेशन्स, ठाणे (प.)

रधों : रघुनाथराव कर्वे यांच्या संबंधीची संशोधन, समीक्षा आणि चरित्रपर : पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

(आठ पुस्तकांचा संच)

५.र.धों कर्वे : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.

६.र.धों. कर्वे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व : मैत्रेय प्रकाशन, मुंबई.

७.रॅंग्लर र. पु. परांजपे : गंधर्ववेद प्रकाशन, पुणे.

८.वि. द. घाटे : साहित्य अकादमी, दादर, मुंबई,१४.

९.श्रीधर बळवंत टिळक : चरित्र आणि लेखसंग्रह : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.

१०.चित्रगुरू कृष्णराव केतकर : मराठी संशोधन मंडळ, नायगाव, दादर मुंबई,१४.

११.संधिकाल : स्वयम् पब्लिकेशन्स, ठाणे (प.)

१२.गतकाल : स्वयम् पब्लिकेशन्स, ठाणे (प.)

१३.शोधयात्रा : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.

१४.मुक्तच्छंद : वसंत बुक स्टॉल प्रकाशन, दादर, मुंबई,२८.

१५.आंबेया डहाळी : व्यास क्रिएशन्स, ठाणे.

१६.सत्यकाम : विश्वसखा प्रकाशन, बदलापूर.

१७.मराठी साहित्यातील अश्लीलतेचा पहिला वाद : मराठी संशोधन मंडळ, नायगाव, दादर, मुंबई,१४.

१८.कुसुमावती देशपांडे : स्वयम् पब्लिकेशन्स, ठाणे (प.)

१९.अनन्वय : स्वयम् पब्लिकेशन्स, ठाणे (प.)

२०.कुसुमाग्रज/शिरवाडकर : ॐकार प्रकाशन, मुंबई.

२१. ‘विशाखाभोवती’ : प्रतिमा प्रकाशन, पुणे.

२२.ओ अमेरिका…अनघा प्रकाशन, ठाणे (पूर्व)

२३. रंगांचा जादूगार : दीनानाथ दलाल,राजहंस प्रकाशन, पुणे.

२४.अडनीड आणि इतर कथा, संवेदना प्रकाशन, पुणे.

२५.माझा (गोपाळराव जोशी यांचा) आगबोट प्रवास : मराठी संशोधन मंडळ, नायगाव, दादर, मुंबई,१४.

२६. र.धों. कर्वे समजावून घेताना : अनघा प्रकाशन, ठाणे (पूर्व)

२७. स्थानपोथी : कृष्णा प्रकाशन, ठाणे.

आगामी 

२८.शकुंतलापर्व

(शकुंतला परांजपे यांचं ‘समाजस्वास्थ्य’मधील लेखन): उत्कर्ष प्रकाशन, पुणे)

२९.व्यक्तिदर्शन, डिंपल प्रकाशन, मुंबई.

३०. मराठी कादंबरी : काठ आणि घाट, डिंपल प्रकाशन, मुंबई.

३१. प्राक्कथन

(माझ्या निवडक पुस्तकांना मी लिहिलेल्या संशोधनपर प्रस्तावना) अनघा प्रकाशन, ठाणे.

●●●●●●

साहित्यिकांच्या कोणत्याही गटातटांत न दिसणारे आणि पूर्ण वेळ संशोधनात कार्यरत असलेले ज्येष्ठ समीक्षक, संशोधक आणि कविहृदयाचे लेखक डॉ. अनंत देशमुख यांची मुलाखत ही वाचकांच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच साहित्यक्षेत्रातील साहित्यिकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे! सरांनी मुलाखतीसाठी जो अमूल्य वेळ दिला त्त्यासाठीही मी सुरुवातीलाच आभार मानते.

*****

प्रतिभा सराफ : अनेक लेखक आहेत, थोडे समीक्षक आहेत परंतु अत्यंत तुरळक असे ‘संशोधक’ मराठी साहित्यात आहेत; त्यांपैकी आपले नाव मुख्यत्वे घ्यावे लागेल! आपल्या संशोधक वृत्तीमुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे. ‘असंग्रहित र.धों. कर्वे’ , ‘बुद्धिप्रामाण्यवाद’, ‘समाजस्वास्थ्य’ आणि ‘र.धों. कर्वे : मते आणि मतांतरे’ इ.  र. धोंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर आपण प्रचंड काम केलेले आहे आणि आपली ठळक नाममुद्रा उमटवलेली आहे. तर मला आपल्याला पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, की या व्यक्तीकडे, या विषयाकडे वळण्याची प्रेरणा कोणती होती?

जेव्हा आपल्या बहराचा काळ असतो म्हणजे जेव्हा आपल्याला खूप काही सुचत असतं, त्या काळामध्ये आपले लेखन बाजूला ठेवून आपला मौल्यवान वेळ या प्रकल्पासाठी बहाल केलात या मागची कारणे, यातून मिळालेले समाधान इत्यादी विषयी आपण आपले मनोगत व्यक्त करावे!

डाॅ. अनंत देशमुख : र. धों. कर्वे यांच्याकडे मी कसा वळलो?

पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने माझी नोकरी सुरू झाली. प्रथम अलिबाग काॅलेजमध्ये अध्यापक, नंतर ‘सिंदिया वर्कशॉप’मध्ये कारकून आणि त्यानंतर डोंबिवलीच्या ‘कला आणि वाणिज्य महाविद्यालया’त मराठी विषयाचा अधिव्याख्याता. याचाच पुढचा भाग म्हणजे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’त अध्यापक. ही माझी शेवटची‌ नोकरी होती.

वयाच्या चाळिसाव्या वर्षी ‘सिंदिया वर्कशाॅप’मधून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर दीड वर्षं डोंबिवली इथं‌ काढून मी चर्चगेट इथल्या SNDT Women’s University च्या मराठी विभागात मी रुजू झालो. तिथं मला नांगरल्यावीण भुई मिळाली आणि त्या संधीचा फायदा मी मनोमन लुटला.

तेव्हा अण्णा कर्वे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठात मी नोकरी करीत होतो. तेव्हा कृतज्ञताबुद्धीने मी अण्णांचे चरित्र लिहायला हवे असे मला वाटले. त्यानुसार मी अभ्यास सुरू केला. तर अण्णांनी आपली जीवनकहाणी किमान तीन वेळा update केली असल्याचे आढळले.

म्हणजे अण्णांच्या जीवनकहाणीत मी नव्याने काही भर टाकू शकणार नव्हतो. म्हणून मी अण्णांच्या थोरल्या चिरंजीवांकडे वळलो. मग मी शक्य तितकी मराठी नियतकालिके धुंडाळली. त्यामध्ये रघुनाथरावांचे लेखन आढळून आले.

रघुनाथरावांच्या अन्य नियतकालिकांत लिहिलेल्या लेखांच्या ‘दातेसूची ग्रंथ’ वा ‘नियतकालिक लेखसूची ग्रंथां’मध्ये त्यांच्या नोंदी नसायच्या. त्यामुळे रघुनाथरावांचे हे लेखन अलगच होते. स्वत: रघुनाथरावांनीही अशा लेखनाची नोंद फारशी केलेली नव्हती. यातून ‘असंग्रहित र. धों. कर्वे’, ‘र. धों. कर्वे : मतं आणि मतांतरं’, ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ ही पुस्तकं सिद्ध झाली. रघुनाथरावांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांविषयी या लेखांमधील माहिती वेगळी आणि मोलाची होती. 

उदाहरणार्थ : संततिनियमनाचा आणि गुप्तरोगाचा त्यांनी अभ्यास केव्हा सुरू केला, त्याला कोणती परिस्थिती कारण ठरली, पॅरिसला त्यांना पीएच. डी. पदवी का मिळाली नाही, आफ्रिकेत वशिला असूनही नोकरी का मिळाली नाही, रघुनाथराव इराणच्या आखातात नोकरीनिमित्त जात, ती माहिती, ‘बाॅम्बे बेहरिन कंपनी’तील नोकरीचा राजीनामा देण्यामागील कारण, मालतीबाईंच्या मृत्यूची तारीख. त्यामुळे हे चरित्रलेखन मराठीत एक मोलाचे मानले गेले आहे.

*****

प्रतिभा : आपण साहित्याचे विविध प्रकार म्हणजे कथा, ललित गद्य, व्यक्तिचित्रण, समीक्षा इ. उत्तमरीत्या हाताळलेत. परंतु  अत्यंत संवेदनशीलतेने असंख्य कविताही आपण लिहिलेल्या आहेत. आपली एक कविता मी youtube सादरीकरणासाठी घेतलेली आठवत आहे. त्या दीर्घ कवितेतील काही ओळी मला  उद्धृत करायचा मोह होतोय – 

पुस्तकांनी माझं बोट धरून मला समीक्षेकडे ओढलं।

पुस्तकांनी मला संशोधनाची थडगी उकरायला भाग पाडलं।

पुस्तकांनी मला लोकोत्तर मृतव्यक्तींची आयुष्यं चित्रित करायला प्रवृत्त केलं।

आणि लिहिता लिहिता माझं आयुष्य हे लायब्ररीतल्या कपाटातलं एक पुस्तक कधी झालं हेहीे उमगलं नाही।

पुस्तकं देतात ब्रह्मसहोदर ज्ञानविज्ञान भरभरून। 

पण मी आहे दुबळा, फाटका फकीर आणि पसा माझा नित्य रिता।

पुस्तकांनी केलं गारुड माझ्यावर त्या नशेत मी सदैव चूर।

एवढं सारं विलक्षण या पुस्तकांनी केलं।

( कविता : पुस्तकांनी मला काय दिलं)

इतक्या विविध प्रकारच्या कविता आपण लिहिल्यात तरीही आपण स्वतःला कवी मानत नाही आणि इतर कवींबद्दल भरभरून बोलता लिहिता, त्यांच्या कवितांवर रसाळ रसग्रहण करता…

यामागचे कारण काय?

देशमुख सर : मी अगदी सुरुवातीपासून मराठी कविता खूप वाचली आहे. प्रतिमात्मकता हे कवितेचं महत्त्वाचं बलस्थान. केवळ अभिधेतून चित्रदर्शन आणि नाट्यात्मकता साधता येईल, पण व्यंजनेनं जी मौलिकता कवितेला लाभते ती खरी होय असं माझं मत अहे. ती शक्ती माझ्यापाशी नाही याची मला जाणीव आहे. त्या दृष्टीनं केवळ हौस म्हणून मी काव्यलेखन केलं असलं तरी मी कवी असल्याचा दावा मात्र मी करीत नाही.

****

प्रतिभा : डाॅ.अनंत देशमुख सातत्याने जुन्या जाणत्या तसेच नव्याने साहित्यक्षेत्रात काही करू पाहणाऱ्यांनाही प्रोत्साहनपर, आशीर्वादपर प्रस्तावना  देत असतात. त्यांची पाठराखण करत असतात उदाहरणार्थ : अर्जुन डोमाडे यांच्या कथांची प्रवाही भाषा आणि ठसठशीत व्यक्तिचित्रणाची धाटणी वाचकांना निश्चितच प्रत्ययाला येईल.

‘संपादन प्रकाशन’ या गौरवग्रंथात रविप्रकाश कुलकर्णी यांचा ‘तीव्र स्मरणशक्ती असलेला बुद्धिवान मित्र,’ असा उल्लेख डाॅ. अनंत देशमुख यांनी केला आहे.

असे आपले अनेक साहित्यिकांसाठीचे कौतुकास्पद उद्गार मी अनेक ठिकाणी वाचले आहेत, ऐकले आहेत.

आपण दीर्घकाळ ललित, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इ. अंकांसाठी, वर्तमानपत्रांसाठी पुस्तक परीक्षणेही लिहिली आहेत. पुस्तक परीक्षणे वाचून, वाचकांना पुस्तक वाचल्याचे समाधान मिळू शकतं का? परीक्षणे पुस्तक विक्रीसाठी उपयोगी पडतात का?

देशमुख सर : ‘ग्रंथपरीक्षण’ हा साहित्यकृती मुळातून समजून घेण्याचा प्रकार आहे असं माझं मत आहे. तिथं  साहित्यकृतीच्या माझ्या आकलनाची सूक्ष्मता, ती ज्या वाङ्मयप्रकारात जन्म घेते त्याच्या इतिहासाचे आणि वाङ्मयप्रकाराच्या प्रकृतिधर्माचे आकलन, साहित्यकृतीची अर्थवत्ता हेरण्यातील अचूकता यांसंबंधी माझी तयारी  – सारे स्पष्ट होते. त्यातून माझा अधिकार व्यक्त व्हावा या दृष्टीनं माझी सर्वंकष तयार दृष्टी स्पष्ट व्हावी. समीक्षा ग्रंथविक्रीला कितपत साहाय्यक ठरते, हे असले व्यावहारिक प्रश्न तिथे अनाठायी ठरावेत.

*****

प्रतिभा : आपण एसएनडीटी युनिव्हर्सिटीमध्ये दीर्घकाळ अध्यापनाचे कार्य केलेत. सुरुवातीच्या काळाचे विद्यार्थी आणि निवृत्तीच्या काळातले विद्यार्थी यांमध्ये तुम्हांला कोणता फरक पडलेला दिसलाय का? आता अलीकडच्या काळात तुमच्या संपर्कात मार्गदर्शन इत्यादीच्या संदर्भात काही विद्यार्थी येत असतीलच! त्यांचे लेखन, वाचन याविषयी आपल्याला भाष्य करायला आवडेल का?

देशमुख सर : सर्जनशील लेखकाला विविध अनुभव विविध आकारांत नि प्रकारांत आवाहन करीत असतात. विशिष्ट कालानंतर त्यातील जे मनाच्या गर्भातच परिपक्व झालेले असतात ते लेखकाच्या मनाचे बांध उधळून उसळी मारून पुढं येतात, त्यांना येऊ द्यावं. सुरुवातीच्या खर्ड्यानंतर त्यावर अधिक चिंतन आणि डागडुजी करायला वेळ भरपूर असतो. पण एका अनुभवाने दुसऱ्यावर कुरघोडी करू नये.

विद्यार्थी हा विद्यार्थी असावा. त्या विषयाच्या अकृत्रिम आणि आत्यंतिक प्रेमापोटी सूक्ष्म अभ्यासाच्या जिज्ञासेपोटी तो आलेला असावा. मी अध्यापक होतो, तेव्हा या दृष्टीनं फारसं कोणी आलं होतं असं झालं नाही. अभ्यासाच्या ध्यासातून ज्ञानग्रहण करून पुढं आपल्या कर्तृत्वानं सिद्ध‌ करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याची मी वाट पाहात होतो. हाच अनुभव माझ्या समवयीन आणि समव्यावसायिक मित्रांना आला असणार. याला अपवाद ठरू शकले ते आता लिहिताना दिसत आहेतच. त्यांना माझ्या शुभेच्छा!

प्रतिभा : ‘शिक्षणतज्ज्ञ’ म्हणूनही आपण ओळखले जाता.  दहावीच्या परीक्षेला पर्याय म्हणून काही पर्याय आपण सुचवले आहेत, त्याविषयी शासनाकडून काही पावलं उचलली गेली आहेत का? याला जोडूनच मला असेही विचारावेसे वाटते, की आत्तापर्यंत आपण शिक्षणप्रक्रियेविषयी शासनाला काही सुचवले आणि ते मान्य झाले, असे घडले आहे का?

देशमुख सर : आजचं एकूणच वातावरण विलक्षण झपाट्यानं बदलत आहे. वैज्ञानिक प्रगतीचा इलेक्ट्रॉनिक युगाचा आपल्या जीवनावर सहज प्रभाव पडत आहे. आज सहा महिन्यांच्या मुलाच्या आसपास इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि मोबाईल्स असतात. लहानपणापासून  या आकर्षणाची भूल आणि त्यात त्यांना गती प्राप्त होते. खेडोपाड्यांत वीज गेली आहे. प्राथमिक शाळांमध्ये काँप्युटर्स पोहोचले आहेत. अखंड ज्ञानगंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटने प्रवेश केला आहे. त्याच्या आधारे शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे प्रोग्राम्स लिहीत असतात आणि त्यांच्या आधारे जगण्याचे नवनवीन पर्याय निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेनुसार आणि अभिरुचीनुसार असंख्य पर्यायांच्या शक्यता उपलब्ध होत आहेत. त्याचप्रमाणे हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा मानवी जीवनाला जसा उपयोग होऊ शकतो, तसाच तो अपायकारकही होऊ शकतो. पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते विचारवंत यांनी सकारात्मक विचार करून योग्य दिशेने पावलं उचलायला हवीत.

****

प्रतिभा : व्यास क्रिएशन्सने आपले ‘आंबेया डहाळी’ हे पुस्तक प्रसिद्ध केले तेव्हा अत्यंत हृद्य शब्दात प्रकाशक नीलेश गायकवाड यांनी ‘आंबेया डहाळी’च्या निमित्ताने अंतरीचा भाव व्यक्त केला आहे, जो मला खास उद्धृत करावासा वाटतो –

“आमचे गुरुवर्य डॉ. देशमुख यांच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे हे लिखाण आहे. अनुभवातून स्फुरलेले हे चिंतन आहे. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ अशी यात ओढ आहे. सुहृदाशी साधलेला हा संवाद आहे.”

एकंदरीत काय तर या संपूर्ण साहित्य प्रवासात अनेक दिग्गजांनी त्याचबरोबर रसिक वाचकांनी आपल्याला भरभरून पत्रं लिहिलेली आहेत. हा आपण जतन करून ठेवलेला अनमोल ठेवा आहे. या निमित्ताने ‘पत्रं’ माणसाच्या आयुष्यात कितपत महत्त्वाची होती?

काळाचे पुरावे त्यातून हाती लागतात का?

देशमुख सर : मी १९७८पासून समीक्षा लिहीत आलो. त्या निमित्तानं माझ्याशी मान्यवर समीक्षकांनी, संपादकांनी, लेखकांनी पत्रव्यवहार केला. त्यात विविध  वाङ्मयीन प्रश्नांची चर्चा त्यांनी केली. ही पत्रं माझ्याकडं अशीच पडून होती. त्यांपैकी काही मी ‘फेसबुक’वर टाकू लागलो. तर माझे एक स्नेही चंद्रकांत भोंजाळ मला म्हणाले, ‘याचं एक चांगलं पुस्तक होईल.’ यातून ‘पत्रसंस्कृती’ सिद्ध झालं. त्याला निस्संशय वाङ्मयमूल्य  आहे, असं काही म्हणतात.

****

प्रतिभा :’संशोधक’ या नात्याने अनेकांनी अनेक प्रकारचे संदर्भ आपल्याकडून घेतले आहेत. आपण त्यांना ते मनापासून पुरवलेही आहेत. आपल्याला असा एखादा अनुभव आहे का, की याचा कोणी दुरुपयोग केला आहे किंवा ते संदर्भ वापरल्यावर आपल्या मदतीचा उल्लेख टाळलेला आहे?

देशमुख सर : मी अनेक विषयांवर लिहिलं आहे. त्यांपैकी एखाद्या विषयावर कोणाला शोध घ्यावासा वाटला तर मला आनंद होईल; पण मी जे संशोधन करतो त्याचं मोल ओळखलं जाण्याची शक्यता कमी; शिवाय त्यातून संबंधिताला अर्थप्राप्ती होईल असं नाही. अतः एव हे विषय त्याज्य होत. त्याकडे कोणी वळतही नाहीत.

वाङ्मयीन  उचलेगिरीचा मला अनुभव आहे. ‘अभिनव प्रकाशन’च्या वा. वि. भट यांच्या पत्नी उषा भट यांनी ‘आम्ही दोघं’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं. मी त्याचे ‘आलोचना’ मासिकात परीक्षण लिहिले. त्यानंतर नजीकच्या काळात ‘साहित्यसूची’मध्ये एका अभ्यासकाचे परीक्षण आले. कुतूहलाने मी वाचू लागलो, तो मला धक्के बसू लागले. माझ्या परीक्षणातील काही शब्द, वाक्ये त्या परीक्षणकर्त्याने उचलली होती. हे त्यांच्या लक्षात आणल्यावर त्यांनी माफी मागितली.

ख्यातनाम समीक्षकांविषयी असे काही घडले आहे. पण औचित्याच्या आणि सभ्यतेच्या दृष्टीने इथे सांगणे टाळत आहे. असो.

****

प्रतिभा : सर, आपण विचारवंतही आहात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधूनमधून महाराष्ट्राबाहेर घडवून आणले जाते त्यावर मोठ्या प्रमाणात विरोध होतो. तर अशा संमेलनांविषयी मला आपले मत जाणून घ्यायचे आहे.

देशमुख सर : अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या मराठी माणसांना विद्यमान मराठी साहित्यामध्ये कोणते प्रश्न मांडले जात आहेत, कोणत्या प्रकारची साहित्यनिर्मिती निर्माण होत आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा असते, ती या संमेलनांद्वारे पूर्ण होते. ज्या ज्या भागात म्हणजे हैदराबाद, बडोदा इ. जिथे कुठे ही संमेलने होतात तिकडच्या स्थानिकांनासुद्धा मराठी साहित्यविषयक कुतूहल असतेच, त्यांनाही त्यांच्या भागात भरलेल्या या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्यातील अनेक घडामोडी जाणून घेता येतात. आपणच आपले पंख पसरून महाराष्ट्राबाहेर भरारी घेऊन जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे संमेलने घेण्याची गरज आहे. फक्त अशा संमेलनात जे साहित्यिक प्रतिनिधी पाठवले जातात त्यांना परिसंवाद, चर्चासत्र वा कवितेतून आपल्या विषयाची मांडणी गंभीरपणे करता येणार आहे का, ज्या विषयावर विचार मांडणार आहेत त्यावर त्यांचे प्रभुत्व आहे का? हे घटक संस्थांतील पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे जाणून घेऊन त्यांना पाठवले पाहिजेत, हे अत्यंत महत्त्वाचे आहे!

*****

प्रतिभा : अलीकडे काही कार्यक्रमाला गेले असता, मी आपल्याला अनेकदा प्रेक्षकांमध्ये एक रसिक म्हणून बसलेले पाहिलेले आहे. आजच्या काळात अशी माणसे दुर्मीळ आहेत. आपला मौल्यवान वेळ आपण आजही निव्वळ तरुण माणसं काय लिहितात, काय बोलतात यासाठी देता ही गोष्ट कौतुकास्पद आहे, शिवाय अनुकरणीय आहे. याविषयी आपण काय सांगू इच्छिता?

देशमुख सर : मी साहित्याचा जिज्ञासू. त्यामुळे समकालीन तरुण पिढी काय बोलते, लिहिते, विचार करते याविषयी माझ्या मनात सदैव कुतूहल असते. त्यामुळे मी कार्यक्रमांना जातो.

*****

प्रतिभा : होय सर, आपल्या उपस्थितीमुळे तरुणांना प्रोत्साहनही मिळते, यात शंकाच नाही.

आज आपल्या सर्व साहित्यकृतींकडे आपण जेव्हा पाहता तेव्हा त्याविषयी आपण समाधानी आहात का? काय करायचं राहून गेलंय असं वाटतंय? आपले भावी प्रकल्प?

देशमुख सर : मला गोपाळराव जोशी यांचे उत्तरायण पूर्ण करायचे आहे, ॲना तर्खडविषयी लिहायचं आहे…

*****

प्रतिभा : सर, आपले भावी प्रकल्प निश्चितच लवकरच पूर्ण होतील याची खातरी वाटते; कारण आपल्या कामाचा आवाका आणि आणि संशोधनावरची निष्ठा (devotion) प्रचंड आहे.

आजच्या नव्याने लिहिणाऱ्या लेखक कवींसाठी आपले मार्गदर्शन मला महत्त्वाचे वाटते; तर आपण याविषयी काही मुद्दे मांडावेत.

देशमुख सर : आपलं मराठी वाचन १९५०-१९८० मधील साहित्यकृतींपुढे जात नाही. ‘तेच ते’ ही वृत्ती सोडायला आपण तयार नाही. मुळातच मराठी वाचन हा गंभीर प्रश्न आहे आणि त्या जंगलात शिरण्याची माझी इच्छा नाही.

******

आजही सरांचा हात लिहिता आहे. ते नियमितपणे साहित्यिक कार्यक्रमाला जातात. पुस्तकांवर भरभरून बोलतात. अनेकांना प्रस्तावना देतात. ब्लर्ब देतात. सातत्याने पुस्तक परीक्षण करतात. यापलीकडे जाऊन नव्याने सर्व वयोगटांतील साहित्यिकांना, साहित्यातील जुन्या गमतीजमती सांगतात, कधी वैचारिक माहिती देतात. बुद्धीला खाद्य म्हणून त्यांना काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तरेही देतात. अधूनमधून ताजे ताजे लिहिलेले उत्कृष्ट ललित गद्य, प्रवासवर्णनं, कविता व्हॉट्सॲपवरून शेअर करतात. सर उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत हे अनेकांना माहीत नसेल; परंतु त्यांनी मला देशाविदेशांतून पाठवलेले काही फोटो मी जतन करून ठेवले आहेत.

एका ‘काजवे…काजवे…’ नावाच्या ललितगद्याचा काही भाग वाचकांसोबत शेअर करावासा वाटतोय :

आपल्याकडच्या आणि विशेषत: कोकणातील पावसाळी संध्याकाळी अकारण भेसूर वाटायच्या. तेव्हाही काजवे आपल्या विलक्षण चित्तवेधक प्रकाशाने लक्ष वेधून घेत असत.

खाडीकिनारी साधारण ओहोटीच्या वेळी पाणी निरव आणि मंदगतीने प्रवाहशील होत असते  तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर काजवे संथ गतीने हालचाल करतात. त्यात भर म्हणून की काय त्यांचं वेधवंती प्रतिबिंब जळात पडलेले दिसते.

रात्र चांदणी असेल आणि त्यातही ती पौर्णिमेची असेल तर एरव्ही काहीसे गडद प्रकाशमान दिसणारे काजवे फिके होताना दिसतात आणि आकाशात कोणी तरी फुलबाजे लावले आहेत अशा वेगाने ते वरखाली सरकताना दिसतात.

काजवा हा खरंतर निरुपद्रवी प्राणी. फुलपाखरं, कावळे-चिमण्या जशा कविमनाचे विषय होतात तसे काजवे होताना दिसत नाहीत.

काजव्यांना एकच ठाऊक असते – संध्याकाळ झाली, की अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणं. तेव्हा काळोखात त्यांचा वाटाड्या हा त्यांची अंगभूत ऊर्जा असलेला प्रकाश खास त्यांचा असतो. 

*****

हे वाचताना आपल्या लक्षात येईल, की हे ललित गद्य किती कवितिक आहे. सर जरी स्वतःला कवी मानत नसतील तरी ते उत्कृष्ट कवी आहेत म्हणूनच त्यांची एक कविता मी इथे देऊन मुलाखतीचा शेवट करते – 

वातावरण शांत उदास

पाखरूही सावलीत स्तब्ध

उन्हाच्या झळांनी माणसं स्तब्ध

मनंही अस्वस्थ नि बेचैन

तू गेल्याचा दिवस तसाच

सूर्य वरून ओतीत आग

आणि अंगाची काहिली

आशांची पोतेरी झालेली

पाणवठ्यावर गायी  स्थिर 

त्यांचे डोळे डबडबलेले

आणि माझ्या काळजात

तुझे चित्र ओलावलेले.

********

Author

2 thoughts on “मुलाखत : डॉ.अनंत देशमुख

  1. छान, मुलाखत ,श्री.अनंत देशमुख, ह्या व्यक्तीजवळ बरंच काही सांगण्यासारखे अजून देखील शिल्लक आहे.

  2. सरांचे वाचन व स्मरणशक्ती फार अफाट आहे.त्यांच्या कडून विविध विषयांवरील माहिती काढुन घेऊन ती शब्दबद्ध करणे,हे अवघडच.

Leave a Reply