मराठी माणसा तू कुठे आहेस ?

 साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी दुपारच्या गाडीने मुंबईला चाललो होतो. एका स्टेशनावरती एक भय्या आकाराने खूप मोठे पण वजनाला हलके असे बोचके घेऊन डब्यात चढला. गाडीत विशेष गर्दी नव्हती. बोचके डब्याच्या पॅसेजमध्ये ठेवून तो माझ्या बाजूच्या सीटवरती बसला. माझे कुतूहल जागे झाले. मी त्या भय्याला विचारले, “इस में क्या है?” 

तो म्हणाला, “पेड का पत्ता!” मला आश्चर्य वाटले. आणखीन चौकशी केल्यावर मला असे कळले, की हा पाला तो वांद्रे येथील बेहराम पाड्यातील बकरे पाळणाऱ्या मुसलमानांना विकणार आहे. त्यातून त्याला तीनशे रुपये मिळतील. त्या वेळी मजुरीचा दर दिवसाला साधारण शंभर रुपये होता. त्याचा हा रोजचा धंदा होता. मला त्याच्या एंटरप्राईजिंग वृत्तीचे कौतुक वाटले. माझ्या गावातील रस्त्यावर हातगाडी लावून फळे विकणारे सर्व भय्ये आहेत. त्यांना फळे पुरविणारे होलसेल फळ विक्रेतेसुद्धा भय्येच आहेत. त्यांची मोठी वेअर हाऊसेस आहेत. त्यांच्याकडे रोज वीस ते पंचवीस ट्रक माल येत असतो. उन्हाळ्यात हातगाडीवर छोटे डिझेल इंजिन लावून निरनिराळ्या स्वादांचा – म्हणजे अननस, पुदिना, संत्रे घालून उसाचा रस विकणारे सर्व भय्ये आहेत. ही यादी खूप लांबविता येईल. भेळवाल्या,पानवाल्या भय्यांनी मुंबईत स्वतःच्या मोठ्या मिळकती केल्या आहेत.

      मी राहतो त्या पालघर बोईसर भागात खूप छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. माझा एक मारवाडी मित्र जो उत्तम मराठी, गुजराती बोलतो  व ज्याचा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे तो मला सांगत होता, की या सर्व इंडस्ट्रीजमधील बहुतांश कामगार, सुपरवायझर, मॅनेजर हे उत्तर प्रदेशातील म्हणजे भय्येच आहेत. त्याचे कारण तो सांगत होता, की ही सर्व माणसे ओव्हरटाईम करायला नेहमी तयार असतात. मराठी मॅनेजर ट्रक भरण्याची कितीही अर्जंसी असली तरी थांबण्यास तयार नसतो.

        आता एक दुसरे उदाहरण देतो  : इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करणारे वकील आमच्याकडे  पालघरला आठवड्यातून दोन दिवस ठाण्याहून येत असत. त्यांच्याकडे पालघरचाच एक गुजराती माणूस मुनीम म्हणून काम करीत असे. पहिल्यांदा तो बिल बनवणे, त्या बिलांची वसुली करणे, चलन भरणे वगैरे काम करीत असे. नंतर तो वकिलांच्या दुकानदार क्लाएंटचे हिशोब लिहणे वगैरे कामे करू लागला. वकील त्याला काही पगार देत असावेत; परंतु त्याचे खरे उत्पन्न हिशोब वगैरे लिहून व क्लाएंटला सर्वतोपरी  मदत करणे यातूनच मिळत असावे. तो वकिलांशी अगदी प्रामाणिक होता. बिल वसूल करण्यात तरबेज होता. काही वर्षांनी त्याचा मुलगा व पुतण्या हे ही कामे करू लागले. ते थोडे शिकलेले असल्याने व अनुभवातून क्लायंटला अधिक मदत करू लागले, त्यामुळे वकिलांचे क्लायंटेलसुद्धा वाढले. असे ते परस्पर पूरक होते. आज त्यांची चार मुले म्हणजे मूळ मुनिमाचे नातू कॉम्प्युटर वापरून हीच कामे करतात. आज मात्र त्यांना कामामुळे बोलायलाही  वेळ नसतो. मला सांगावयाचा मुद्दा हा आहे, की या मुनीमाने जॉब निर्मिती करून घरच्या अनेकांना कामाला लावले. बिगरमराठी माणसाची धंद्यातून रोजगार  निर्मिती करण्याची प्रचंड क्षमता असते. मराठी माणूस तो ज्या खात्यात  काम करीत असे तिथे मुलाला चिकटवला म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असे समजत असे. परंतु हल्ली रिझर्वेशन व इतर कायदे कानून यांमुळे तेही शक्य होत नाही.

   चांगले काम केल्याने कसा दबदबा निर्माण होतो याचे एक खरे उदाहरण देतो : नळबाजारात एका बोहरी माणसाचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्या दुकानात एक मराठी माणूस (त्यांच्या भाषेत ‘घाटी’ )खूप वर्षे काम करतो आहे. त्याला दुकानातील मालाची, भावाची खडान् खडा माहिती असते. त्याचा परिणाम असा झाला आहे, की येणारे गिऱ्हाईक  मालकाला कधीच काही विचारत नाही. मालक असला तरी प्रथम या घाटी माणसाची चौकशी करतात. मूळ मालकाच्याऐवजी मालकाचा मुलगा गल्ल्यावर बसलेला असेल तर कोणाला माल उधार द्यायचा, कोणाला द्यायचा नाही  हे तो घाटीच सांगतो. कोणाचे किती बिल थकले आहे, ही माहितीसुद्धा तोच देतो. तेव्हा अशी उदाहरणेही आहेत…पण फार थोडी! 

    आम्ही हलकीसलकी कामे करीत नाही; आम्ही बुद्धिमान आहोत अशीसुद्धा शेखी मराठी माणूस मारतो. आता त्या क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेऊ : 

१) इंग्रजी वर्तमानपत्रात अग्रलेखाच्या बाजूला जे लेख लिहिले जातात त्यात मराठी माणूस अपवादानेच दिसतो. हे लेख लिहिणाऱ्यांत बंगाली व दाक्षिणात्य लेखकांची संख्या खूप  आहे 

२) इस्रोसारख्या संस्थेत मराठी माणसे नगण्य संख्येत आहेत. 

३) हल्ली अनेक विषयांत भारतीय माणसाने लिहिलेली इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध होत असतात. अशा लेखकांत मराठी लेखक किती… हा संशोधनाचा विषय आहे.

४) ज्ञानपीठ पुरस्कार  मिळविणारे मराठी लेखक किती? व कानडी लेखक किती? सहज तुलना करून बघा. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या चांगल्या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे होत नाहीत हे त्या मागील एक कारण आहे.

५) आय. ए. एस. होणाऱ्यांमध्ये मराठी माणसाचे प्रमाण खूप कमी आहे. असा माझा अंदाज आहे. कारण गेल्या वीस वर्षांत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आय. ए. एस. परीक्षा पास झालेले जे कलेक्टर्स आले ते सर्व बिगर मराठी होते. आयएएस ग्रेडमध्ये प्रमोट केलेले कलेक्टर्स होते ते मात्र मराठी होते. पण कमालीचे भ्रष्ट होते. आयएएस परीक्षा पास होणाऱ्यांत बिहारी लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याचे एक कारण म्हणजे तिथे इंडस्ट्रीज नसल्याने हुशार मुले या परीक्षेच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

६) इंग्लिश टीव्ही चॅनलवरती एखाद्या विषयावरती तज्ज्ञ म्हणून बोलावण्यात येणाऱ्यांमध्ये मराठी माणूस क्वचितच दिसतो. याला एकच अपवाद आहे लष्करी तज्ज्ञ. यात अनेक मराठी लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल भाग घेताना दिसतात. 

७) टीव्ही चॅनलवर पक्षाचे प्रवक्ते म्हणून भाग घेणाऱ्यांमध्ये मराठी माणूस नसतो. शिवसेना (उबाठा)चा इंग्रजी व हिंदी टीव्ही चॅनल वरचा प्रवक्ता हा उत्तर भारतीय असतो. केवढा हा विरोधाभास! ही यादी मोठी होऊ शकते.

        आता यामागील कारणांचा विचार करू या! 

१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज म्हणजे मराठा समाज. या समाजाने स्वातंत्र्योत्तर काळात समाजाच्या शैक्षणिक प्रगतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. लोकसंख्या व सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकीय पदे मिळविणे यात हा समाज गुरफटून गेला. दूरदृष्टी असलेले नेतृत्व हा समाज निर्माण करू शकला नाही. अपवाद फक्त यशवंतराव चव्हाण यांचा. सत्तास्थानावरून ते जेव्हा पायउतार झाले तेव्हा त्यांना याच समाजाने त्यांना अडगळीत फेकून दिले. 

२) पूर्वीपासून शिक्षणात पुढे असलेले तीन मराठी समाज घटक म्हणजे ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण व कायस्थ. शैक्षणिक परंपरा असलेल्या समाजाचे मराठी लोकसंख्येतील प्रमाण केवळ तीन टक्के! त्यामुळे या समाजाच्या भारतीय अवकाशात ठसा उमटविण्याच्या सामर्थ्याला मर्यादा होत्या व आहेत. रिझर्व बँकेचे दोनच मराठी गव्हर्नर झाले १)चिंतामणराव देशमुख व २)आडारकर हे दोघे वर उल्लेख केलेल्या जातींतील होते; शिवाय मराठा समाजाने वरील वर्गाची कोंडी केल्यामुळे या वर्गातील हुशार मुलांनी परदेशाचा रस्ता पकडला. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादाने महाराष्ट्राचे खूप नुकसान केले आहे.

३) उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल या प्रांतांत ब्राह्मण व कायस्थ वर्गाची एकत्रित लोकसंख्या पंधरा ते वीस टक्के आहे. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरती निरनिराळ्या  पदांवर या जातीतील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते.  ही गोष्ट ही आपण लक्षात घेतली पाहिजे. 

४) बहुसंख्य मराठी माणसाला इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषा अस्खलितपणे बोलता व लिहिता येत नाहीत म्हणून त्यांचा ठसा भारतभर उमटू शकत नाही. याला मराठी राजकीय नेतृत्वसुद्धा अपवाद नाही. प्रमोद महाजन हा एकच अपवाद. काँग्रेसमधून जे कोणी केंद्रीय मंत्रिमंडळात गेले ते मराठवाड्यातील होते; कारण मराठवाडा हैद्राबाद संस्थानात असल्याने या नेत्यांना हिंदी बोलण्याची सवय होती. ज्याला भारताच्या केंद्रीय स्तरावर काम करायचे आहे त्याला इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागते ही गोष्ट मराठी माणसाला समजली नाही. यशवंतराव चव्हाण जेव्हा पहिल्यांदा संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांना हिंदी शिकण्याकरता शिकवणी ठेवावी लागली होती. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आपण मराठीभाषेबद्दल अवाजवी भावनिक आहोत. इंग्रजी शिकायला आपला विरोध नसतो पण हिंदी शिकायला आपला विरोध असतो हे कोडे मला काही उलगडत नाही.  बहुभाषिकतेने माणसाची क्षितिजे विशाल होतात. 

५) मराठी समाज कविता, कथा, कादंबऱ्या व नाटक (सिनेमाच्या क्षेत्रातून त्याची पूर्वीच हकालपट्टी झाली आहे.) या मनोरंजनाच्या क्षेत्रांत कमालीचा बुडून गेला आहे. वंचितांच्या दुःखाला वाचा फोडणारा कवी म्हणून आपण त्या कवीचा खूप उदो उदो करतो; पण कविता केल्याने वंचितांचे दुःख कमी होत नसते. त्यासाठी  त्या समाजात काम करावे लागते हे कोणीच लक्षात घेत नाही. माझे वडील कै. अप्पासाहेब दांडेकर म्हणत असत, की जेव्हा जेव्हा समाजात मनोरंजनाच्या क्षेत्राला महत्त्व मिळायला लागते, तेव्हा तेव्हा तो समाज ऱ्हासाच्या दिशेने चालला आहे असे नक्की समजावे.

६) क्षात्रतेज  व अन्यायाविरुद्ध जिद्दीने उभे राहणे हा महाराष्ट्राचा खरा स्वभाव आहे. परंतु क्षात्रतेजाचे रूपांतर गुंडगिरीत व अन्यायाविरुद्ध उभे राहणे म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे असे जेव्हा रूपांतर होते तेव्हा आपल्यात तारतम्याचा अभाव आहे हे निश्चित समजावे. प्रगल्भ राजकीय व सामाजिक नेतृत्वाचा अभाव हेही मराठी माणसाच्या अधोगतीचे कारण आहे.

७) आता काळ बदलला आहे. ज्या समाजाकडे आर्थिक सामर्थ्य आहे तोच समाज अनेक गोष्टींवर वर्चस्व गाजवू शकतो. ही गोष्ट मराठी समाज समजून घेत नाही. नोकरीतून आर्थिक सामर्थ्य येत नसते. ते धंद्यातून येत असते. धंदा सुरू केला आणि भरभराट झाली अशी उदाहरणे खूप कमी. धंदा टिकवायला, वाढवायला धंदा करणाऱ्या पहिल्या पिढीला अपार कष्ट घ्यावे लागतात. दुसरी पिढी जर कर्तबगार असेल तर ती मूळचा धंदा खूप चटकन वाढवते. आपण फक्त तेच बघतो. पहिल्या पिढीचे कष्ट आपल्या लक्षात येत नाहीत. मराठी माणसाची एक खासियत अशी आहे, की धंद्यात असणाऱ्या मराठी माणसाच्या मुलाला बहुतेक वेळेला बापाचा धंदा करण्यात रस  नसतो. त्याला नवीन स्वतःचा धंदा करावयाचा असतो. त्यामुळे काय होते? बापाचा अनुभव, त्याने निर्माण केलेले कॉंटॅक्ट्स मुलाला उपयोगी पडत नाहीत. तो परत चाकाचा शोध लावण्याच्या खटपटीत पडतो. त्यामुळे मराठी माणसाचा धंदा तिसऱ्या पिढीपर्यंत क्वचितच पोचतो. एक गमतीची गोष्ट अशी, की मराठी माणसाला पैसे पचवता येत नाहीत. त्याला खूप मोठ्या पैशांची भीती वाटते. एखाद्या मराठी माणसाचा धंदा १००-२०० कोटीचा झाला, की त्याला भीती वाटू लागते. याला कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा हाताळण्याची परंपरा नाही. अगदी सामान्य गुजराती मारवाडी माणूस २५- ३० लाखांची कॅश ज्या सहजतेने हाताळतो तसे मराठी माणसाला जमत नाही कारण त्याला त्याची सवय नाही.

   भारताची जेव्हा फाळणी झाली, तेव्हा पंजाब व बंगाल प्रांताची फाळणी झाली. सिंध प्रांत तर पूर्णपणे पाकिस्तानात गेला. हिंदू, सिंधी,पंजाबी व बंगाली हे अक्षरशः रस्त्यावर आले. वरील तीन समाजांपैकी सिंधी व पंजाबी समाज हा व्यापारी समाज होता. बंगाली समाज बुद्धिजीवी होता. बंगाली समाजाने शिकून चांगल्या नोकऱ्या मिळवल्या असतील त्यांची वैयक्तिक उन्नती झाली ही असेल; परंतु समाज म्हणून त्यांची आर्थिक  स्थिती यथातथाच आहे.

 परंतु आज सिंधी व पंजाबी समाज आर्थिक दृष्ट्या खूपच संपन्न आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

  व्यापारी वृत्ती व उत्पादन करण्याची वृत्ती (मॅन्युफॅक्चरिंग स्किल )या दोन भिन्न गोष्टी आहेत. भारतीय कारखानदार (इंडस्ट्रियालिस्ट) मूलतः व्यापारी मनोवृत्तीचे आहेत. त्याचा परिणाम असा झाला, की भारतीय उत्पादनात वैविध्यतेचा अभाव होता व आहे. लायसन्स-राजमुळे या अभावालाच प्रोत्साहन मिळाले. परंतु आता येणारा काळ हा संशोधन, नवनिर्माण व नवीन कल्पना वापरून पैसे मिळवण्याचा काळ आहे. त्याचा फायदा मराठी समाजाने घेतला पाहिजे. आपल्या उणिवा समजून घेत त्यांवर मात करण्याची जिद्द आता मराठी माणसाने बाळगायला हवी.

Author

Leave a Reply