
आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वच वाचकांना, रसिकांना कालिदासाची आठवण येते. वाचने, व्याख्याने वगैरेंनी कालिदासदिन साजरा केला जातो. पावसाच्या धारा पाहताना मेघदूताची आठवण न होणारा रसिक विरळाच! पण केवळ रसिकराज कालिदासच नव्हे तर अंगावर वारुळ निर्माण होईपर्यंत तपश्चर्या करणारे ऋषी वाल्मीकीसुद्धा पावसाच्या धारांनी आनंदविभोर होतात, हे पाहून अंतःकरण भरून येते. कालिदासाने त्याच्या आधीच्या काळातले सर्व वाङ्मय वाचलेले आहे, हे त्याची ग्रंथसंपदा वाचताना जाणवत असतेच. रामायणात ‘कुमारसंभव’ असा शब्द वाचल्यावर त्याने नक्की आपल्या महाकाव्याचे शीर्षक इथून उचलले आहे, असे वाटते. पूर्वसूरींना ‘वाट पुसतु’ त्याने असामान्य रचना केल्या, यात संशय नाही. व्यक्तिशः माझा वाचनाचा क्रम उलटा झाला. आधी कैक वेळा मेघदूत वाचले होते. नंतर रामायण वाचताना त्यातले किष्किंधाकांड सुरू झाले. वालीला मारून सुग्रीवाला राज्याभिषेक करून झाला आहे. पावसाळ्याचे चार महिने त्या काळात कोणतीच कामे केली जात नसत. त्या प्रमाणे इथेही सीतेच्या शोधाचे काम पुढे नेणे शक्य नव्हते, म्हणून शरद ऋतूपर्यंत वाट पाहणे भाग होते. तेव्हा राम व लक्ष्मण माल्यवान पर्वतावर निवास करताहेत. त्या पर्वतावरून दिसणारी पावसाळ्यातली दृश्ये राम लक्ष्मणाला दाखवत आहे. या सहासष्ट श्लोकांच्या अडतिसाव्या सर्गातील त्या पावसाळी दृश्यांची वर्णने वाचताना एकसारखे वाटत राहिले, की याची गडद छाया मेघदूतावर आहे. म्हणूनच रघुवंशाच्या प्रारंभीसुद्धा तो पूर्वसूरींचे ऋण असल्याचे सांगतो. राम लक्ष्मणाला म्हणतात, ‘आकाश कामातुर झाल्याप्रमाणे दिसते आहे.’ धरणीवरचे जलबिंदू पाहून ते म्हणतात, की शोकसंतप्त सीतेप्रमाणे धरणी अश्रू ढाळते आहे. हे सर्व वर्णनच भावविभोर आहे.
या सर्गातील निवडक वर्णनाचे भाषांतर साधारण असे करता येईल :
“मेघांतल्या पाण्याच्या अभिषेकाने शीतल झालेले व केतकीच्या सुगंधाने भारलेले वारे ओंजळीत घेऊन हुंगावेत, असे वाटते. पर्वतांनी मेघांचे अजिन पांघरले आहे व जलधारांचे यज्ञोपवीत धारण केले आहे. माणसांनी कुंभ घेऊन राजाला जलाचा अभिषेक करावा, तसे मेघांच्या कुंभांनी पर्वतांना अभिषेक केल्यामुळे ते आपले प्रसन्न रूपाचे ऐश्वर्य दाखवताहेत. मेघांच्या गडगडाटात गजेंद्रांच्या रणगर्जनांचा भास होत आहे. आपल्या मार्गाने जाणाऱ्या एखाद्या हत्तीला मेघगर्जना ऐकून वाटते, की आपल्याला कोणी हत्ती आव्हान देतो आहे, म्हणून तो लढण्यासाठी मागे वळतो. हत्तींनाही केतकीच्या वासाने हर्ष झाला आहे आणि धबधब्यांच्या गर्जनांनी आकुल होऊन ते मोरांबरोबर आवाज करताहेत. मेघांनी नभ असे आक्रमिले आहे, की दिवसा सूर्य आणि रात्री तारे दिसत नाहीत. आकाशातला त्यांचा निर्घोष म्हणजे सोनेरी विजेच्या चाबकाच्या फटक्यामुळे होणारी त्याची वेदना आहे का? पाण्याने जड झालेले मेघ पर्वतशिखरांवर ‘विश्रम्य विश्रम्य’ पुढे जात आहेत. (हे वाचल्यावर कालिदासाने मेघाला दिलेला विश्रांती घेऊन पुढे जाण्याचा संदेशच आठवतो.) शुभ्र बलाक ढगांना भिडू पाहताहेत पण त्यांच्या माला या आकाशाच्या फुलमाळा वाटताहेत. वातावरणातली धूळ खाली बसून शांत ओहळ वाहताहेत. नद्या तट फोडून भरधाव वाहताहेत. पहाडांवरून काही नद्या इतक्या वेगाने त्यावरचे धातू खरवडून आणत येत आहेत, की पाण्याचा रंग लालसर झाला आहे. राजांचे दौरे रद्द झाले आहेत व प्रवासी घराकडे परतत आहेत.
जांभळाच्या झाडांच्या फांद्या फळांनी इतक्या लगडल्या आहेत, की भुंग्यांच्या झुंडी त्यांना प्राशन करताहेत, असे वाटते. भ्रमरांसारखी दिसणारी जांभळे व विविध रंगांची आम्रफळे जमिनीवर पडलेली आहेत. पोपटाच्या कांतीच्या भूमीवरचे गवतावरचे इंद्रगोप पाहिल्यावर आळता उडालेले वस्त्र पांघरलेल्या स्त्रीचा भास होत आहे. विरही राम म्हणतो, की सकाम कांता प्रियाकडे जात आहे. कदंबाच्या फांद्यांवर लोंबणाऱ्या मोठाल्या भुंग्यांनी भरपूर पुष्परस चापला आहे. पण वरून येणाऱ्या पाण्याच्या थेंबांच्या माऱ्याने ते हैराण झालेत. कमळांचे केसरही त्या थेंबांनी तुटलेले पाहून काही भुंग्यांनी आता कदंबाच्या फुलांकडे मोर्चा वळवला आहे. पक्ष्यांचे पंखही त्यामुळेच विस्कटलेत म्हणून ते तहानलेले पक्षी झाडांच्या पानांवर मोत्यांसारखे चमकणारे सुरेंद्राने दिलेले पाण्याचे विशुद्ध थेंब पीत आहेत. मेघांचे मृदंग, भुंगे, मोर, हत्ती या सगळ्यांच्या निनादाने सारे रान संगीतमय झाले आहे. सर्ज, कदंब, कुटज, अर्जुन वगैरे सारे वृक्ष चिंब झाले आहेत व आनंदित सुंदर दिसत आहेत.”
एक अनुभव सांगावासा वाटतो. तो असा, की “संप्रस्थिताः मानसवासलुब्धाः प्रियान्विताः सम्प्रति चक्रवाकाः” ही पंक्ती वाचून मी चक्रावले. आतापर्यंत संस्कृत साहित्यात कमळाचे पान रात्री दोघांच्यामध्ये आडवे आल्यामुळे विरह वाटून ओरडणारा (तो खरे म्हणजे असा ओरडत असतो की ‘कोकलणारा’ म्हणावे, माफ कर हं, चक्रवाका!) पक्षी असाच चक्रवाकाविषयीचा संकेत वाचला आहे. संस्कृत साहित्यात इतर कोठे मानसाकडे जाणारा चक्रवाक कधी दिसला नव्हता. मानसाकडे जाणारा पक्षी हंसच दाखवला जातो. मेघदूतातही तोच तर मानसाकडे जातो आणि इथे वाल्मीकी चक्रवाकाला प्रियेला घेऊन मानसाकडे पाठवत आहेत. मग पक्षिकोश व पर्यावरण जाणकार किरण पुरंदरे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा वाल्मीकींचे वर्णनच बरोबर असल्याचे कळले आणि मनोमन वाल्मीकींना दंडवत घातले. खरोखर, वाल्मीकी आणि व्यास यांना महान म्हणताना महान शब्द लहान वाटतो. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने निर्मिलेल्या दोन सर्वश्रेष्ठ महाकाव्यांसमोर नतमस्तक होताना ते आपल्या भूमीतले आहेत, हा अभिमान दाटून येतो. नोबेल-विजेते अमर्त्य सेन म्हणाले होते ते खरेच आहे, की संस्कृत साहित्य भाषांतरावाचून मुळात वाचणे हे आणखीच भाग्याचे आहे.

