अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(३) 

आकाशवाणीचं हे ….

                                             ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।

                                              वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’

(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)

भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या  जोरदार आक्रमणामुळे  आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते;  परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले.  स्वतःचे ॲप तयार केले.  विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व  विश्वासार्हता टिकवून आहे.  शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः   उलगडून दाखवत आहेत. 

भाग ३

कीर्तिवंतांचा स्पर्श

आकाशवाणीच्या उल्लेखांचे काही मराठी संदर्भ आपण पाहिले; तसे अन्य राज्यातले, अन्य भाषाप्रदेशांमधील आकाशवाणीच्या जिव्हाळ्याची प्रतिबिंबंही

न्याहाळण्यासारखी आहेत. हे एवढ्यासाठीच, की आकाशवाणी माध्यमाचा जिव्हाळा हा भारतीय पातळीवर एकात्मतेचे सूत्र सांभाळणाऱ्या घटकांपैकी एक ठरला. काही वर्षांपूर्वी कोलकता विद्यापीठात ‘विविध भारती : राष्ट्रीय एकात्मतेचे सूत्र’ या विषयावर प्रसार भारतीचे तत्कालीन सी. ई. ओ. जवाहर सरकार यांचे व्याख्यान अभ्यासकांची दाद घेणारे ठरले. अर्थात बंगाली रेडिओवरचे रवींद्र संगीत, नजरुल गीतं, आसामी रेडिओवरची भूपेन हजारिका यांची जादू, दक्षिणेत एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांनी रेडिओतून लोकप्रिय केलेला भक्तिस्वर अशी कितीतरी उदाहरणे आहेत, की तिथल्या केंद्रांनी प्रादेशिक वैशिष्ट्यांचे जतन, संवर्धन केले आहे, याची कल्पना येते.

पंडित शिवकुमार शर्मा हे भारताचे अग्रगण्य संतूरवादक. ‘जर्नी विथ हंड्रेड स्ट्रींग्ज’ हे सुंदर आत्मचरित्र त्यांनी २००२ मध्ये पूर्ण केलं. त्यात त्यांनी जम्मू इथं बालपणी आपल्या जडणघडणीत रेडिओची कशी मदत झाली, त्याच्या गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

 ते लिहितात, ‘वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी मी रेडिओवर विविध प्रकारचं गायन वादन ऐकायला सुरुवात केली. पं. डी. व्ही. पलूसकर, पंडित अमीरखाँ साहेब, पन्नालाल घोष, गोपाल मिश्रा,  रोशन आरा बेगम, ओंकारनाथ ठाकूर या लोकांच्या गायन वादनाची

आकाशवाणीवरून मेजवानीच असे. मी रेडिओला चिकटून बसून हे सारे कार्यक्रम ऐकत असे.

ते सूर जणू प्राशन करत असे.’ पंडित शिवकुमारजींचे हे उद्गार बोलके आहेत. शिवकुमारजींचे

वडील उमादत्त शर्मा लाहोर रेडिओवर गात. त्यांना हा मोठा सन्मान वाटे. साधारण १९४५ चा हा काळ आहे – सुमारे ८० वर्षांपूर्वीचा. किती आतपर्यंत शिरलेलं हे माध्यम होतं!

विदुषी डॉ.शन्नो खुराणा या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका. १९४५ दरम्यान त्या लाहोर रेडिओवर गायच्या. लाहोरमध्येच वॉल्टन कॅंटोनमेंट या भागात राहायच्या. फाळणीनंतर सगळं मागे टाकून त्या दिल्लीत आल्या. दिल्ली आकाशवाणीवर त्या नियमित यायच्या. १९४७ ते २००३ एवढा प्रदीर्घकाळ त्या आकाशवाणीशी जोडलेल्या होत्या. त्यांनी त्या काळातल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. सुरुवातीचा बराच काळ  कार्यक्रम लाईव्ह प्रसारित व्हायचे. ध्वनिमुद्रण नसायचं. अशाच एका लाईव्ह प्रसारणात त्या दिल्लीच्या स्टुडिओत पोचल्या तेव्हा सारंगीवर साथीसाठी ठाकूर खांसाहेब बसले होते. त्यांच्या बाजूला ११-१२ वर्षांचा एक मुलगा खांद्यावरून काळसर रजई ओढून बसला होता. 

शन्नोबाईंनी खांसाहेबांना विचारले, “हा कोण?” 

खांसाहेब म्हणाले, “माझा मुलगा मशकूर. त्याला म्हणालो, घरी कुढत बसण्यापेक्षा माझ्याबरोबर चल, गळ्यातली धार काय असते ऐक. पोरगं जेवढं चांगलं

ऐकेल तेवढे कान तयार होतील.” 

पुढे हाच पोरगा मशकूर खांसाहेब म्हणून उस्ताद गवय्या बनला. कोलकत्ता संगीत अकॅडमीमध्ये ‘गुरु’ स्थानी नियुक्त झाला. आकाशवाणी माध्यमाचे

कलाकार घडवण्यात काय स्थान होते याची साक्ष शन्नो खुराणा यांच्या आठवणीत आहे. हे लिहीत असताना श्रीमती शन्नोबाई ९७ वर्षांच्या आहेत. रेडिओवर त्यांचे अपार प्रेम आहे.

माझे आकाशवाणीतले एक स्नेही डॉ. नागराज राव हवालदार यांनी पंडित भीमसेन जोशींकडे तालीम घेतली. ते सध्या बंगळुरूला असतात. आठ-दहा वर्षे आकाशवाणीत काम करून त्यांनी नंतर शास्त्रीय संगीताला वाहून घेण्यासाठी सरकारी नोकरी सोडली. त्यांनी आणि त्यांच्या तबलावादक मुलाने  सवाई गंधर्व संमेलनात आपली कलाही सादर केलेली

आहे. अगदी अलीकडे डॉक्टर हवालदार यांनी भीमसेनजींवर इंग्रजी चरित्र लिहिले.

(‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी : द व्हॉइस ऑफ द पीपल) या पुस्तकात एका ठिकाणी

उल्लेख आहे, की पंडित भीमसेन जोशी १९४१-४२ मध्ये आकाशवाणी लखनऊमध्ये अल्पकाळ नोकरीस होते. इथल्या मुक्कामाचा खूप चांगला फायदा त्यांनी ठुमरी गायक- गायिकांशी भेटीगाठीसाठी करून घेतला. त्याच वेळी उस्ताद बिस्मिल्ला खाँ हेही लखनऊ रेडिओवर होते. राग-रागिणी आणि त्यांचा ठुमऱ्यांवर प्रभाव याविषयी आकाशवाणीत येणाऱ्या

कलाकारांशी त्या दोघांच्या गप्पा होत. काही वेळा पंडितजी कलाकारांच्या घरी जाऊनही गाण्याविषयी चर्चा करत. याच दिवसांत थोडा काळ का होई ना, श्रेष्ठ गायक भूपेन हजारिका हेही गोहाटी आकाशवाणी केंद्रात होते. असंख्य श्रोत्यांनी पुढे त्यांना रेडिओवर

दीर्घकाळ ऐकले. कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्यावर मात्र पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी आकाशवाणी सोडली; पण आजही आसाममधले हाफलाँग, जो-हाट, नौगाँग, दिफू, दिब्रुगड, सिलचर आदी कोणतेही केंद्र लावा, ब्रह्मपुत्रेचा हा लाडका स्वर

‘आकाशवाणी’वरून पूर्वोत्तर गाजवत असतो.

अशीच गोष्ट ज्येष्ठ बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसियांबद्दल आहे. १९५७ मध्ये ते ओरिसातील आकाशवाणी कटक येथे संगीतकार म्हणून रुजू झाले. मुंबईत येण्यापूर्वी बरीच वर्षं ते कटक येथे नोकरीत होते. पंडितजींनीच मला दिलेल्या एका दीर्घ मुलाखतीत हे सांगितले. पुढे त्यांनी नोकरी सोडली; पण देश-विदेशांत मैफिलीकरिता फिरतानाही 

आकाशवाणीचे ममत्व कायम राखले. अगदी आता-आता  – २०१७ पर्यंत  ते मुंबई आकाशवाणीच्या ऑडिशन्स बोर्डवरही होते.

पंजाबात पतियाला जिल्ह्यातील बडवाल  नावाच्या खेड्यात शेती करणाऱ्या अमरजीतसिंग खैरा या तरुण शेतकऱ्याने आपल्या आठवणी लिहिताना आकाशवाणी

पतियाला केंद्राचे कृषिविषयक कार्यक्रम त्याला किती फायद्याचे ठरले हे सांगितले आहे.

मिरची, भुईमूग, मसूर इत्यादी पिकांची बियाणे विक्री करण्यावर त्याने भर दिला  आणि त्याचे जीवनमान उंचावले. कुठेही व्यक्त न झालेली अशा शेकडो शेतकऱ्यांची उदाहरणे भारतभर विखुरलेली आहेत. आकाशवाणीने त्यावर आधारित सुंदर सचित्र पुस्तकही

प्रकाशित केले आहे.

गंगूबाई हंगल यांना कोण ओळखत नाही? दीपा गणेश या ‘द  हिंदू’ वृत्तपत्राच्या सहसंपादक राहिलेल्या संगीत अभ्यासिकेने गंगूबाईंचे सुंदर चरित्र लिहिले आहे.

‘अ लाईफ ऑफ थ्री ऑक्टेव्हस’ (तीन स्वरसप्तकांतले जीवन) असे या चरित्राचे शीर्षक आहे. या चरित्रात

थोड्या थोडक्या नव्हे तर २४-२५ ठिकाणी आकाशवाणीचा उल्लेख आहे. एका पद्मविभूषण

गायिकेच्या जीवनात आकाशवाणीचे किती स्थान होते याचे हे निदर्शक आहे. गंगूबाईंनी जेव्हा २००२ साली आकाशवाणीतील शेवटची संगीत सभा केली त्या वेळी त्या ८९ वर्षांच्या होत्या. 

अमृतसर आकाशवाणीतली एक आठवण तर फार वेगळीच आहे. पंडित कुमार गंधर्व आणि गंगूबाई हंगल अमृतसरला संगीत महोत्सवात गेले होते. खुल्या मंडपात गाणे होते; पण मुसळधार पावसामुळे त्या दिवशी संमेलन स्थगित होऊन दुसऱ्या ठिकाणी एका बंदिस्त सभागृहात लोकांनी दोघांचे गाणे ऐकले. सभा संपली. संयोजकांनी अगोदरच पोबारा केला.

मानधन मिळाले नाही. परतण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. अशा कठीण प्रसंगी दोघांना आकाशवाणीची आठवण झाली. दोघांचेही अमृतसर आकाशवाणीने ध्वनिमुद्रण करून लगेच मानधन दिले आणि या महान कलाकारांचा तेवढ्यापुरता प्रश्न सुटला. ही आठवण मला यासाठी उल्लेखनीय वाटते, की मोठ्या गायकांचे तर सोडाच पण भारतभरात उभरत्या

कलाकारांच्या कलेला आकाशवाणीने मोठा आश्रय दिला. सुयोग्य मानधन दिले आहे. ग्रेडनुसार मानधनात वाढही केली. अनेक आर्थिक दुर्बल लोककलावंतांसाठी आकाशवाणी आधार राहिली आहे. मी स्वतः महाराष्ट्रातील नऊ केंद्रांवर काम करताना लोककलावंतांच्या बाबतीत हे जवळून अनुभवले आहे. हे अनुबंध फार वेगळे आहेत.

भारतीय आणि पाश्चात्त्य रसिकांचा ताईत राहिलेले तबला नवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांची चरित्रात्मक दीर्घ मुलाखत असलेले पुस्तक ‘माझे तालमय जीवन’ नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिले आहे. यात  ‘न विसरलेली आठवण’ विचारल्यावर झाकीर हुसेन यांनी

बालपणी ऑल इंडिया रेडिओवर शाळेचा प्रतिनिधी म्हणून केलेल्या तबलावादनाचा उल्लेख

केला आहे.

डॉ. राजेश भट हे काश्मीरमधील वरिष्ठ माध्यम अभ्यासक आहेत. काश्मीर टाइम्स, ट्रिब्यून इ. वृत्तपत्रांतून त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. अगदी अलीकडे २०१८ मध्ये

त्यांनी ‘रेडिओ काश्मीर : इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर’ हे बहुमूल्य – अभ्यासपूर्ण पुस्तकलिहिलं आहे. सीमाभागात पाकिस्तानच्या दुष्प्रचाराला रेडिओ काश्मीरनं कसं चोख उत्तर वर्षानुवर्ष दिलं आहे, याचं विस्तृत विश्लेषण त्यात केलं आहे. त्यात लष्करपूर्व काळात भातातर्फे शत्रुराष्ट्राला रेडिओने किती आणि कसा प्रभावी जबाबी हमला केला होता, याचं विश्लेषण आहे. काश्मीरमधल्या या कामाला काही तोड नाही. १९४९, १९५६, १९६४ मधले हे संदर्भ आहेत. पुढे १९९२ मध्ये काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सय्यद कासीम यांनी आपल्या आत्मचरित्रात (माय लाईफ, माय टाइम्स) या सर्व प्रयत्नांविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

अशी कितीतरी उदाहरणं आहेत, की वैश्विक आणि राष्ट्रीय स्तरावर महान परफॉर्मर ठरलेल्या कलावंतांच्या भावजीवनात आकाशवाणीचे मोठे योगदान आहे. अनेक कलाकार, श्रेष्ठ साहित्यिक आकाशवाणीच्या सेवेतही होते. आपल्याकडे पुरुषोत्तम दारव्हेकर, 

बा. सी.मर्ढेकर, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, यशवंत देव, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. माध्यम आणि कलाकार दोघांनी एकमेकांना मोठं केलं होतं, एकमेकांचे ऋण लक्षात ठेवलं होतं, आणि या प्रक्रियेत मायबाप श्रोत्यांनी श्रीमंती अनुभवली होती; समृद्धी अनुभवली होती. कला, वाङ्मय, नाटक, साहित्य यांच्या स्पर्शाने जीवनाला एक आगळी श्रीमंती प्राप्त होते यावर समाजाचा विश्वास होता. पैशांच्या दिशेने सर्वांची मने अद्याप धावू लागली नव्हती. आकाशवाणीचा पहिला ३० रुपयांचा चेक सांभाळून ठेवणाऱ्या, पंचवीस रुपयांचा उल्लेख असलेले कॉंट्रॅक्ट (करार पत्र) जपून ठेवणाऱ्या लोकांच्या डोळ्यांतला आनंद आणि अभिमान मी बघितला आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या वाढत्या गुन्हेगारीसाठी,हिंसेसाठी, श्रीमंती चोचल्यांसाठी, ढासळत्या कुटुंब संस्थेसाठी, कोसळत्या विवाह संस्थेसाठीकोणीही रेडिओला – आकाशवाणीला दोषी मानलं नाही. गुन्हेगारीच्या मानसशास्त्राचा जो अभ्यास अनेकदा झाला, त्यातही रेडिओ माध्यमावर मनोभंजनाचा (डिस्टॉर्शन ऑफ माईंड) कोणी आरोप ठेवला नाही. समाजमनाने एके काळी आकाशवाणी माध्यमावर फार प्रेम केले, हे सत्य म्हणूनच कोणालाही बदलता येणार नाही. आजही ते प्रेम संपलेले नाही.

* * * * *

छायाचित्र तपशील: 

१ डावी बाजू वरील छायाचित्र: पुणे केंद्राच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर- वि.स.खांडेकर , मंगरूळकर , 

ना.सी. फडके

२ डावी बाजू खालील छायाचित्र: दर्जेदार मनोरंजन हे आकाशवाणीचे ब्रीद.  टिळक स्मारक मंदिरात पुणे आकाशवाणी ने

प्रतिभावंत अभिनेता सुबोध भावे यांना घेऊन विशेष गीतगंगा प्रस्तुत केला.भावे,  निर्माता संजय भुजबळ यांच्यासह मध्यभागी लेखक

३ उजवीकडे राजेश भट यांनी लिहिलेल्या  ‘Radio Kashmir – In Times of Peace & War’या एका महत्त्वाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ. 

 युद्धकाळात किंवा  एरवी ही आंतरराष्ट्रीय राजकारणात समाज माध्यमे किती महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचे विवेचन करणारे हे पुस्तक. 

Author

One thought on “अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(३) 

  1. Redio च्या set समोर वंदन🙏.
    म्हणजेच उत्तम आणि दर्जेदार देण्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या सर्व team ला.
    आपला आवाज आपलासा वाटतो.
    शेवटचे 3 मिं.तर खूप आवडले. सप्रेम नमस्कार.

Leave a Reply