माझा रेल्वेतील दिनक्रम व्यवस्थित चालू होता. हळूहळू, अनेक मुलींचे पालक मला एक योग्य स्थळ म्हणून पाहू लागले. ही कुजबुज माझ्या आईच्या कानावर पडू लागली आणि तिच्यातील वरमाई जागी झाली. अर्थात मुलाचे लग्न व्हावे आणि सुनेचे मुख पाहावे, ही तिची स्वाभाविकच इच्छा होती. माझेही लग्नाचे वय झाल्यामुळे मी फारसे आढेवेढे न घेता लग्नासाठी होकार दिला. मुलाच्या लग्नाची मोहीम फत्ते करण्यासाठी ती जोरात कामाला लागली.
२७ स्थळे पाहिल्यानंतर…
गणपुळ्यांच्या सायकलवरून मला भेटायला आलेल्या, माझ्याच मित्राच्या बायकोची बहीण माझ्या मनात भरली. त्या वेळी स्थळ पाहण्याचा आणि दाखवण्याचा कार्यक्रम मजेशीर असायचा. तिला पाहताना मी नेहमीप्रमाणेच, “तू कोणती पुस्तके वाचलीस?” असा अभ्यासूपणा असलेला प्रश्न विचारला. पाहण्यासाठी येणारा मुलगा असा प्रश्न विचारू शकतो, याचा अभ्यास करून आल्यामुळे तिने ‘ययाति’ आणि ‘मृत्युंजय’ या दोन गाजलेल्या पुस्तकांची नावे आत्मविश्वासाने सांगितली. आईने माझ्याकडे सूचक नजरेने पाहिले. त्यानंतर मी असे अभ्यासूपणाचे प्रश्न विचारणे थांबवले.
अखेरीस, नक्षत्रांच्या संख्येतील सत्ताविसावे नक्षत्र, म्हणजेच पूर्वा गणपुळे, या हेमंत ऋतूच्या आयुष्यात आल्या. पूर्वा गणपुळे रा. पंढरपूर, ती आता अपूर्वा हेमंत कुलकर्णी झाली. लग्नानंतर तिनेच मला बोलताबोलता सांगितले, की तुमचं वाचन खूप आहे हे मला आधीच माहीत होतं. कदाचित, आमच्या मध्यस्थाने तिला ‘तो पुस्तकांवर प्रश्न विचारू शकतो’ अशी माहिती दिली होती म्हणूनच तिने प्रसिद्ध पुस्तकांची नावे मला सांगितली. तिच्या या प्रामाणिकपणाचे मला कौतुक करावे लागले; कारण आता लग्न झाले होते!
रेल्वेची खरी गाडी रुळावर…
त्या काळी, “या महिन्यात मुहूर्तच नाही,” “पंचमात हा ग्रह आहे,” “सप्तमात तो आहे,” “एक नाड आहे,” “मंगळ आहे,” “त्या तारखेला कार्यालय मिळेल का?” असे अनेक प्रकार होते. त्यामुळे मीच म्हणालो, “एका महामानवाचा जन्म ज्या दिवशी झाला, तो दिवस चांगलाच असणार,” आणि मी स्वतःहून तारीख ठरवली, १४ एप्रिल. अशा प्रकारे आम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि माझी गाडी खऱ्या अर्थाने रुळावर आली.
वायरलेस विभागात बदली
काही दिवसांनी माझे खाते बदलले आणि माझी बदली सोलापूरच्याच वायरलेस विभागात झाली. रेल्वेमध्येसुद्धा वायरलेसचे खाते असते. प्रत्येक स्टेशनवरील उद्घोषणा, इलेक्ट्रॉनिक फलक, ड्रायव्हर-गार्ड-स्टेशन मास्तर यांच्यातील संभाषण, उपग्रहाद्वारे संवाद आणि इतर अनेक कामे हे खाते करत असते. अगदी रेल्वे हॉस्पिटलचे एक्स-रे मशीन आणि सोनोग्राफी मशीनसुद्धा आम्ही दुरुस्त केले आहे.
माझ्या आधीचे कर्मचारी सांगायचे, की येथील वायरलेस सेटमुळे सोलापुरातून ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला जात असे. हा वायरलेस सेट आपल्या घरातील छोट्या गोदरेज कपाटाएवढा होता. त्याचे परीक्षण करणे एक अवघड काम होते. हा सेट घोड्याला बांधला जायचा आणि घोडा १० कि. मी. धावल्यानंतर तो सेट परत सुरू करून पाहायचे. तो व्यवस्थित सुरू झाला, तरच तो वापरण्यायोग्य ठरत असे, नाहीतर नाकारला जायचा. याशिवाय आमच्याकडे एक ‘ऑल बँड रिसीव्हर’ होता, ज्यावर जगातील कोणतेही रेडिओ स्टेशन ट्यून करता येत होते.
जेम्स बॉंडचा अनुभव…
वातावरणामुळे कधीकधी वायरलेस सेटच्या संभाषणात अडथळे यायचे आणि संभाषण पूर्ण होत नसे; मग वायरलेस सेटची फ्रिक्वेंसी बदलून पुन्हा बोलावे लागे. जेम्स बॉंडच्या ‘डॉक्टर नो’ या सिनेमाच्या सुरुवातीचा सीन पाहिला, की याचे उत्तम प्रात्यक्षिक लक्षात येईल. मी काही दिवस असेच RCA (Radio Corporation of America) सेट हाताळले. नंतर ते सेट ‘अँटिक’ म्हणून दिल्लीतील रेल्वे संग्रहालयात पाठवण्यात आले. रेल्वे अपघात किंवा भूकंप यांसारख्या परिस्थितीत अशा सेटचा उपयोग होतो. किल्लारी भूकंपाच्या वेळी रेल्वे आणि मिलिटरीच्या दळणवळणाची (HF-High Frequency) सोय याच वायरलेस सेटने केली होती. मी तिथे तीन दिवस होतो आणि एक वेगळाच अनुभव घेतला.
सार्वजनिक कार्यक्रम आणि गमतीजमती
राष्ट्रीय कार्यक्रम आणि रेल्वेच्या इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आम्ही पी.ए. (पब्लिक ॲड्रेस) सिस्टिम, म्हणजे माइक आणि लाऊडस्पीकर्सची सोय करत असू. आजच्याइतकी प्रगत प्रणाली तेव्हा नव्हती, त्यामुळे कार्यक्रमांमध्ये अनेक गमतीजमती होत असत.
एकदा १५ ऑगस्टचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. एका टी.सी.ने माझ्याकडे एक कॅसेट आणून दिली आणि म्हणाला, “मी असे (हात वर करण्याची खूण करून) हात केले की तुम्ही प्ले करा.” कारण तो स्त्री वेशात नाचणार होता. मी कॅसेट लावली. त्याने हात वर केल्यावर मी टेपरेकॉर्डरचे प्ले बटण दाबले. गाणे होते – ‘कोहिनूर’मधील नर्तिका ‘कुमकुम’वर चित्रित झालेले ‘मधुबन में राधिका नाचे रे|’ दुर्दैवाने ते गाणे फास्ट, म्हणजे ‘2X’ स्पीडमध्ये रेकॉर्ड झाले होते. गाण्याच्या स्पीडमुळे त्यालाही तसेच फास्ट नाचावे लागले. गाणे संपल्यावर तो अक्षरशः घामाघूम झाला आणि जागेवर बसला. लोकांना वाटले, की हे गाणे आणि नृत्याचा एक प्रकारच आहे, त्यामुळे त्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. खरी गोष्ट फक्त त्याला आणि आम्हांलाच माहीत होती. ऐन वेळी त्याने कॅसेट आणि रेकॉर्डिंग तपासले नाही, म्हणून हा गोंधळ झाला होता. नंतर आम्ही ती कॅसेट पुन्हा वाजवून पाहिली, तेव्हाही ती ‘2X’ स्पीडमध्येच वाजत होती, म्हणजे आमची चूक नव्हती. आम्ही जेव्हा कधी ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर भेटतो, तेव्हा चहा पिताना, हा प्रसंग आठवून खूप हसतो.
माइक स्टँडचा चमत्कार
असंच एकदा राम नाईक – त्या वेळचे रेल्वे मंत्री – पंढरपूर-मिरज ब्रॉडगेजसाठी आले होते. माझ्या बॉसच्या बॉसने मला सांगितले, “प्रोग्राम तुम्हीच मॅनेज करा आणि मध्येमध्ये माझ्याकडे बघा. माझ्यासोबत मंत्रीजी आणि सी.आर.बी. (चेअरमन ऑफ रेल्वे बोर्ड) आहेत. त्यांच्यासमोर काहीही गडबड नाही झाली पाहिजे.” मी ठीक आहे म्हणून मान डोलावली आणि ॲम्प्लीफायर व इतर उपकरणांपाशी ‘अॅलर्ट मोड’मध्ये बसलो. गायक, त्याची सर्व वाद्ये, तबला, कोरस या सर्वांचे माइक दिलीप प्रभावळकरच्या ‘हसवा फसवी’ स्टाईलप्रमाणे चेक केले. कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झाली होती.
कार्यक्रम सुरू झाला. मधूनमधून मी बॉसकडे पाहत होतो. बॉस समाधानाने मान डोलवत होता, त्यामुळे मीही निश्चिंत होतो. एकदा त्याने खूण करून सांगितले, की तबल्याचा आवाज वाढव. मी लगेच वाढवला. अशा आमच्या बऱ्याच खाणाखुणा झाल्या. नंतर एका लहान मुलीचा नृत्याचा कार्यक्रम होता. तिच्या पायातील घुंगरांचा आवाज येत नव्हता. माझ्या बॉसने एक भलतीच खूण केली. आम्हांला प्रश्न पडला, की हे नवीन काय? मी माझ्या सहकाऱ्याला सांगितले, “जाऊन बॉसला विचार की नक्की काय करायचे आहे?”
माझा सहकारी जागेवरून उठला. त्याने काही विचारण्याआधीच स्टेजवरील माइक स्टँड ‘कुईSSS’ असा कर्कश आवाज करत वाकला आणि माईक खाली झुकला. त्यामुळे त्या नृत्य करणाऱ्या मुलीच्या घुंगराचा आवाज येऊ लागला. बॉसने माझ्याकडे बघितले आणि ‘ठीक आहे’ अशी खूण केली. माझा सहायक परत आला. आम्ही काहीही न करता आता घुंगरांचा आवाज येत होता! नाचण्यामुळे स्टेजला हादरे बसून तो माइक स्टँड सैल होऊन वाकला होता. कार्यक्रम उत्तम झाला आणि मंत्रिमहोदयांनी संपूर्ण सोलापूर मंडळासाठी भरघोस बक्षीस जाहीर केले.
कार्यक्रम झाल्यावर बॉसने मला शाबासकी दिली आणि म्हणाला, “बढिया हो गया! हा माइक स्टँड झुकवण्याचा रिमोट तुम्ही कुठून घेतला?” मी त्याला सत्य परिस्थिती सांगितली. तोही मनापासून हसला आणि आमच्यात सामील झाला आणि माझ्या डोक्यात पंढरपूर ते मिरज रुंदीकरणासाठी करायच्या कामांचे विचार सुरू झाले.
वरील दुवा ४.१६ ते ०६:३० मिनिटांपर्यंत पाहावा म्हणजे Wireless चे काम कसे चालते ते कळेल.
