दुर्लक्षित पुस्तके

विस्मृतीत गेलेले मोती

   पहिले मराठी पुस्तक १८०५ साली प्रकाशित झाले. सुरुवातीला खूप कमी असलेला पुस्तकप्रकाशनांचा ओघ यथावकाश खूप विस्तारत गेला. सध्या एका अंदाजानुसार मराठीत दरवर्षी चार ते पाच हजार पुस्तके प्रकाशित होतात. आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एकूण संख्या प्रचंडच असणार. त्यांपैकी बहुसंख्य पुस्तके सुमार दर्जाचीच असतात आणि साहजिकच लगेच विस्मरणात जातात; त्यात वावगे काहीच नाही. काही पुस्तके त्या-त्या विशिष्ट काळात बऱ्यापैकी गाजलेली असतात, पण काळाच्या ओघात साहजिकच तीही विस्मरणात जातात; उदाहरणार्थ : मोरोपंतांच्या आर्या किंवा नाथमाधवांच्या कादंबऱ्या. काही थोडी पुस्तके इतकी उत्तम असतात,  जी दीर्घकाळ वाचकांच्या स्मरणात आणि चर्चेत राहतात; उदाहरणार्थ कुसुमाग्रजांचे ‘विशाखा’ किंवा खांडेकरांची ‘ययाति;’ अर्थात अशी पुस्तके अगदी थोडीच असतात. पण काही पुस्तके खूप महत्त्वाची असूनही काळाच्या ओघात मागे पडतात. अशा काही दुर्लक्षित पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष वेधणे हे एक साहित्यप्रेमी म्हणून आपले कर्तव्यच आहे.  विस्मृतीच्या अंधारात आणि साहित्यसागराच्या तळाशी दडलेले मोतीच आहेत ते. 

   या संदर्भात एक प्रश्न साहजिकच उद्भवतो; तो म्हणजे कुठली पुस्तके गाजतात आणि कुठली मागे पडतात याबद्दल ठामपणे किंवा निष्कर्षवजा काही सांगता येईल का? हितसंबंधी लोकांनी मुद्दाम गाजवलेली पुस्तके इथे आपण अर्थातच सोडून देऊ; तो अगदी वेगळाच विषय आहे. साधारणतः आपण असे म्हणू शकतो, की पुस्तकाला एखादा मोठा पुरस्कार मिळाला किंवा कोणा ज्येष्ठ समीक्षकाने एखादे पुस्तक उचलून धरले तर ते पुस्तक गाजते. उदाहरणार्थ, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ ही कादंबरी चर्चेत आली किंवा गंगाधर गाडगीळ यांनी ‘साहित्याचे मानदंड’ या पुस्तकात विस्तृत परीक्षण केल्यानंतर ‘रणांगण’ कादंबरीकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. दुर्दैवाने हल्ली मोठे पुरस्कारदेखील कशा प्रकारे दिले जातात हे सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्ही कुठल्यातरी विशिष्ट समाजघटकाचे, जातीचे किंवा विचारधारेचे प्रतिनिधित्व करत असाल किंवा तुम्हांला कुठल्यातरी संस्थेचे किंवा पक्षाचे पाठबळ असेल तरीही तुमचे पुस्तक गाजू शकते. दलित साहित्यात त्याची बरीच उदाहरणे आहेत. त्या विशिष्ट काळाची गरज असलेला विषय पुस्तकात हाताळलेला असेल तरीही ते पुस्तक गाजू शकते. उदाहरणार्थ विनय हर्डीकर यांचे आणीबाणीवरील ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे पुस्तक. तुमच्या मागे  तुमच्या पश्चातही पुस्तकांना उजाळा देणारे कोणी नातेवाईक किंवा एखादी संस्था असेल तर तीही पुस्तके चर्चेत येत राहतात. उदाहरणार्थ नंदा पैठणकर आणि वीणा देव यांनी सातत्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनुक्रमे जी. ए. कुलकर्णी व गो. नी. दांडेकर यांची पुस्तके कायम चर्चेत राहिली. काही पुस्तके खळबळजनक आशयामुळे गाजतात; उदाहरणार्थ ‘गांधीहत्या आणि मी’ किंवा ‘लज्जा’ किंवा ‘सेटानिक व्हर्सेस.’ गाजलेल्या पुस्तकांची अशी अनेक उदाहरणे देता येतील; पण पुस्तक गाजण्यासाठी यांतले कुठलेच एक कारण ‘नेमके हेच’ असे म्हणता येणार नाही. काही पुस्तके का गाजतात आणि काही पुस्तके उत्तम असूनही का मागे पाडतात हे सांगणे खरोखर खूप अवघड आहे. कदाचित माणसांप्रमाणे पुस्तकांचेही नशीब असावे! 

   मला स्वतःला महत्त्वाची वाटलेली पण मराठी साहित्याच्या समीक्षकांनी फारशी कधी दखल न घेतलेली अशी अनेक पुस्तके आहेत. वानगीदाखल त्यांपैकी काही पुस्तकांबद्दल इथे लिहिणार आहे. 

   त्यांतील पहिले आहे, ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी.’ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १९०१ साली झालेल्या निधनानंतर रमाबाई रानडे या त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या त्यांच्या या आठवणी १९१० साली प्रथम प्रकाशित झाल्या. ते पुस्तक प्रथम कोणी प्रकाशित केले याची नोंद नाही; पण त्याची माझ्याकडे असलेली प्रत वरदा प्रकाशनाने २०१२ साली काढलेल्या आवृत्तीतील आहे (पृष्ठे २७२, किंमत रुपये ३००). ‘उंच माझा झोका’ ह्या नावाने झी टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या मालिकेमुळे या आठवणींना उजाळा मिळाला, पण प्रत्यक्ष पुस्तक मात्र फारसे कुठे वाचनात आले नाही. अनेक कारणांनी मला हे पुस्तक महत्त्वाचे वाटते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तकाचे नायक ज्यांना म्हणता येईल त्या न्यायमूर्ती रानडे यांचे असामान्य व्यक्तित्व आणि त्यांचे पुस्तकात उमटलेले प्रतिबिंब.

   ज्यांना महात्मा गांधी स्वतः गुरू मानत त्या गोपाळ कृष्ण गोखलेंचेही गुरू म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रात अठराव्या शतकात जे प्रबोधनयुग अवतरले त्याचे हे एक महत्त्वाचे प्रवर्तक. त्यांना जेमतेम ५९ वर्षांचे आयुष्य लाभले. तत्कालीन ब्रिटिश राजवटीत न्यायाधीशपदी असल्याने त्यांच्या सामाजिक सहभागावर साहजिकच मर्यादा होती; पण तरीही त्यांनी केलेले कार्य थक्क करणारे आहे. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते; प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक होते; भारतीय सामाजिक परिषद, ग्रंथोत्तेजक सभा आणि इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांचे संस्थापक होते. पुणे येथे १८७८ साली भरलेल्या पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आजच्या मराठी साहित्य संमेलनाचे हे आद्य रूप. आपली उच्चपदावरील नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी या साऱ्या भूमिका बजावल्या. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. त्यांना दररोज वीसहून अधिक पत्रे येत आणि सर्वांना ते उत्तरे देत. त्याच वेळी त्यांनी चौफेर वाचन व अभ्यासपूर्ण लेखनही केले. सार्वजनिक सभेचे त्रैमासिक सतरा वर्षे सुरू होते, त्या काळात त्रैमासिकातले दोनतृतीयांश लेख माधवराव (हे त्यांचे खरे पहिले नाव) रानडे यांनी लिहिलेले होते.  

   रानडे यांचा सगळा भर राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांवर होता; कारण आपल्यातील विविध सामाजिक दोषांमुळेच आपण परकीयांचे गुलाम झालो याची त्यांना जाणीव होती व ते दोष दूर करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. एक समाज म्हणून आपण आज कुठे आहोत याचे नेमके भान असणे आणि त्याच वेळी समाजाचा तेजोभंग होणार नाही याचे भान राखणे ही विधायक विचार मांडताना करावी लागणारी एक तारेवरची कसरत असते. ते तारतम्य रानडे यांना चांगले साधले होते.    

   “महाराष्ट्र एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या तऱ्हेने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल, याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरता जिवापाड मेहनत जर कोणी केली असेल, तर ती प्रथमतः रानडे यांनीच केली असे म्हटले पाहिजे आणि तेच त्यांच्या थोरवीचे मुख्य चिन्ह होय.” हे लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मध्ये रानडे यांच्या निधनानंतर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर अग्रलेखात केलेले हे मूल्यमापन यथार्थ आहे. तो २२ जानेवारी १९०१ रोजी लिहिलेला मर्मग्राही अग्रलेखही या पुस्तकात शेवटी परिशिष्ट म्हणून समाविष्ट केलेला आहे. 

   या पुस्तकाला गोपाळ कृष्ण गोखले यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत त्यांनी लिहिल्याप्रमाणे “रावसाहेब रानडे हे एकोणिसाव्या शतकाची शेवटची तीस वर्षे प्रथम महाराष्ट्रातील व पुढे सर्व हिंदुस्थानातील राष्ट्रोन्नतीच्या नानाविध चळवळींचे केवळ आधारस्तंभ नव्हेत तर आद्यप्रवर्तक होते.” 

   एखाद्या मराठी महिलेने लिहिलेले हे बहुधा पहिलेच आत्मचरित्र आहे व त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे आहे. पुस्तकाच्या साध्या, सरळ  शीर्षकापासूनच पुस्तकाचे वेगळेपण आपल्याला जाणवते. इथे अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून माधवराव आपल्यापुढे उभे राहतात. 

   माधवरावांचे हे दुसरे लग्न. पहिली पत्नी तरुणपणीच वारली होती व त्यांना अपत्य नव्हते. त्यांना अपत्य व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती; किंबहुना वडिलांच्या आग्रहामुळेच माधवरावांनी पुनर्विवाह केला. तेव्हा त्यांचे वय ३२ होते तर रमाबाईंचे वय अवघे ११ होते. (या दुसऱ्या लग्नानंतरही त्यांना अपत्य झाले नाही हा वेगळा भाग.) रमाबाईंचे शालेय शिक्षण झाले नव्हते; पण त्यांनी शिकावे अशी स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते असल्याने माधवरावांची तीव्र इच्छा होती. पत्नीला लिहिता-वाचता येत नाही हे कळले त्याच दिवशी संध्याकाळी ते पाटी-पेन्सिल घेऊन घरी आले व त्यांनी तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. मूळाक्षरे व बाराखडी शिकवून झाल्यावर सुरुवातीच्या काळात रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन तास ते पत्नीला सरकारी शाळेतील पाठ्यपुस्तकाच्या आधारे शिकवत असत. कोर्टातील कामामुळे कितीही दमलेले असले तरी त्यात खंड पडत नसे. रात्री माडीवर आपल्या खोलीत गेल्यावर अभ्यास सुरू होई. धड्यात कविता असल्या तर त्या मोठ्याने वाचून दाखवाव्या लागत. त्यामुळे त्या चांगल्या समजतात असे माधवरावांचे मत होते. घरात एकत्र कुटुंबपद्धती होती आणि घरच्या काही जुन्या वळणाच्या बायका जिन्याखाली उभे राहून त्या कविता चोरून ऐकत व त्यावरून दुसऱ्या दिवशी रमाबाईंची थट्टा करत! पण त्याकडे दुर्लक्ष करत दोघांनीही चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला. हळूहळू रमाबाई उत्तम लिहू लागल्या, पुढे तर जाहीर सभेत भाषणही करू लागल्या. मुख्य म्हणजे त्यांच्यात शिकण्याची खूप आवड निर्माण झाली. पुढे एकदा कलकत्ता येथे काही महिने मुक्काम असताना त्या बंगाली भाषाही शिकल्या.

   न्यायाधीश म्हणून त्या काळात माधवरावांना घसघशीत आठशे रुपये पगार मिळे व सर्व रक्कम ते  पत्नीच्या हाती आणून देत; आपल्या खिशात एक पैसाही बाळगायचा नाही असा त्यांचा नियम होता. न्यायाधीश म्हणून ते पाळत असलेली ती शिस्त होती. सर्व घरखर्च रमाबाईच सांभाळत. त्यामुळे शिक्षण तसे फारसे झालेले नसले तरी व्यावहारिक ज्ञान रमाबाईंना बऱ्यापैकी होते. कुठल्याही पक्षकाराला माधवराव कधीच घरी भेटत नसत किंवा खासगी रितीने त्याच्याशी बोलतही नसत; जे काही बोलणे करायचे ते फक्त कोर्टात करा हा त्यांचा नियम होता. हादेखील त्यांच्या व्यावसायिक शिस्तीचा एक भाग होता. आपल्या कामात माधवराव कधीही हयगय करत नसत; लग्न लागले त्या दिवशीसुद्धा त्यांनी कोर्टातून सुट्टी घेतली नव्हती. आजारी असले तरीही ती सबब न देता ते कोर्टात हजर असत. नोकरी सांभाळून माधवराव स्वातंत्र्यसैनिकांना जमेल तशी मदत करत असत. त्यामुळे दोन वेळा त्यांची बदलीही केली गेली होती. त्यांची पत्रेही चोरून उघडली जात. पण माधवरावांनी आपली मर्यादा कधीच ओलांडली नाही.

   आपले म्हणणे चांगल्या प्रकारे विशद करायची हातोटी रमाबाईंना होती. उदाहरणार्थ : काही जुनाट वळणाची माणसे म्हणतात त्याप्रमाणे शिक्षण घेतल्यावर बायका उर्मट, बेताल व मर्यादाशून्य बनत नाहीत; तर उलट त्या नम्र व शालीन बनतात असे सांगताना एके ठिकाणी त्या लिहितात, “सुशिक्षणाचा परिणाम म्हणजे माणूस विनयसंपन्न बनतो. केळीचे वैभव म्हणजे तिला अतिशय मोठा लोंगर येणे. असे वैभव प्राप्त झाले असता ती कधी ताठत नाही; उलट अधिक नम्र व विनयशील दिसते व यामुळेच ती अतिशय शोभते.”

   आपल्या नोकरीमुळे माधवरावांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. त्या प्रत्येक प्रवासात रमाबाई त्यांच्याबरोबर होत्या. अहमदाबाद, जयपूर, कालका, सिमला, हरिद्वार, लाहोर, अमृतसर, दिल्ली, आग्रा, अजमेर, पुष्कर, जबलपूर, काशी, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले व त्या-त्या ठिकाणाचे लेखिकेने साध्या शब्दांत पण बहारदार वर्णन केले आहे. शेवटच्या वर्षात माधवरावांची तब्येत खूप खालावत गेली. त्या काळात रमाबाईंनी पतीची अहोरात्र सेवा केली. त्या दिवसांच्या आठवणी खूप हृदयस्पर्शी आहेत. 

   लेखिकेची भाषा त्या काळातली व साहजिकच जुन्या वळणाची आहे. उदाहरणार्थ, पतीचा उल्लेख ती नावाने किंवा सर्वनामानेही नाही करत; तर अगदी त्रयस्थपणे ‘स्वतः’ असा करते! उदाहरणार्थ, ‘त्यांनी काहीच उत्तर दिले नाही’ असे न लिहिता ‘स्वतः काहीच उत्तर दिले नाही’ असे ती लिहिते! 

   हे रानडे यांचे चरित्र नव्हे; त्यामुळे त्यांचा एकूण जीवनपट इथे उभा राहत नाही; लेखिकेचा तो उद्देशही नाही. कुठल्याही रोजनिशीचा किंवा लेखांचा लेखिकेने आधार घेतलेला नाही. पतीच्या निधनानंतर आपले दुःख हलके व्हावे म्हणून चार-पाच वर्षांच्या कालावधीत केलेले हे लेखन आहे. केवळ मानसकन्येने केलेल्या आग्रहामुळे त्या आठवणी  प्रसिद्ध झाल्या. सत्तावीस वर्षांच्या सहवासातील घटना जशा आठवतील तशा इथे नोंदवलेल्या आहेत. पण रानडे यांच्यासारखी लोकोत्तर व्यक्ती आपल्या दैनंदिन वागण्याबोलण्यात कशी होती, तिचा स्वभाव कसा होता, तिचा दिनक्रम कसा होता, आवडीनिवडी काय होत्या आणि एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व कसे होते हे मात्र इथे स्पष्ट होते. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंबही या लेखनात ओघाने उमटले आहे. त्यामुळे अशा लेखनाला एक मोठे ऐतिहासिक मोल आहे. म्हणूनच या पुस्तकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो.                        

   मी निवडलेले दुसरे पुस्तक आहे ‘रात्रंदिन आम्हां…’ हे वंचितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कार्यकर्त्याचे प्रांजळ आत्मकथन (उन्मेष प्रकाशन, २०१६, पृष्ठे ३२८, किंमत रुपये ३००). महाराष्ट्राला सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधीतर महाराष्ट्राला (आणि गुजरातलादेखील) ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हणायचे. अशा कार्यकर्त्यांमध्ये दोन प्रकार आढळतात. काही कार्यकर्ते व्यक्तिशः खूप प्रसिद्ध असतात, पण त्यांचे कार्य तितकेसे भरीव नसते. याउलट काहींचे कार्य खूप व्यापक असते, पण समाजापुढे त्यांचे नाव फारसे आलेले नसते. विलास चाफेकर हे ह्या दुसऱ्या प्रकारात मोडतात; कार्य मोठे पण कर्ता तुलनेने अप्रसिद्ध. रात्रंदिन आम्हां… हे त्यांचे आत्मकथन त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, कारण त्यातून आजच्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सामाजिक कार्यकर्ता एक व्यक्ती म्हणून वाचकांपुढे उभा राहतो.

   ‘वंचित विकास’ व ‘जाणीव संघटना’ ह्या विलासरावांनी उभ्या केलेल्या सामाजिक संस्थांचे वेगळेपण असे, की जी माणसे सर्वार्थाने वंचित आहेत आणि तरीही ज्यांना समाजाची सहानुभूतीसुद्धा मिळत नाही, अशा माणसांकरिता त्या काम करतात. कामगार, शेतकरी, अपंग, अनाथ, मनोरुग्ण हेदेखील वंचित घटकच असतात, पण त्या वंचितांना निदान समाजाची सहानुभूतीतरी मिळते; परंतु वेश्या, वेश्यावस्तीतील मुले, तृतीयपंथीय, फेरीवाले हे समाजघटक लौकिक अर्थाने वंचित तर असतातच, पण त्यांना समाजाची सहानुभूतीसुद्धा नसते. अशा सर्वार्थाने वंचित असलेल्यांच्या आयुष्याला उभारी देण्यासाठी चाफेकरांनी आपले सगळे आयुष्य झोकून दिले. 

   १३ नोव्हेंबर १९४१ रोजी ठाण्यात जन्मलेल्या आणि तिथेच अतिशय गरिबीत वाढलेल्या चाफेकरांचे बालपण अगदी जगावेगळे. ‘बालपणाचा काळ सुखाचा’ अशी एक साधारण धारणा असते. चाफेकरांच्या वाट्याला आलेले बालपण मात्र प्रथमपासूनच अगदी करपून गेलेले होते. त्यांचे आई-वडील पारंपरिक प्रतिमेत अजिबातच बसणारे नव्हते आणि त्यांचे प्रेम लहानपणापासूनच चाफेकरांना कधी लाभले नाही. वैतागली की लाथाबुक्क्यांनी मारणारी आई. ‘मेल्या, रांडीच्या’ अशा शिव्या सररास देणारी. ‘एकदाचा मेलास की सुटेन मी’ असे वैतागून म्हणणारी. वडीलही असून नसल्यासारखे. चाफेकर लिहितात, “बाप काही उपयोगाचा नाही. मुंबईच्या हायकोर्टात कारकुनी करायचा म्हणे. बापावर कर्जाचा हा मोठा डोंगर. बाप कामावरून आला की, ‘दमलो’ म्हणून एका जागी बसून राहायचा, तो दुसऱ्या दिवशी कामावर जाईपर्यंत.” साधी आमटी ती काय, पण मुलगा ती जास्त ओरपतो म्हणून वडील एकदा संतापले. चाफेकर म्हणतात, “एक निश्चय केला. यापुढे आमटी बंद. तेव्हापासून आजतागायत मी कधीही आमटी खाल्ली नाही.” 

   ते राहत असलेल्या ठाण्यातील साठेवाडीचे त्यांनी केलेले वर्णन अगदी अंगावर काटा आणणारे आहे. तिथे कायम मारामाऱ्या चालू असत, अगदी रक्तबंबाळ होईस्तोवर. अगदी नरकवास होता तो. चाफेकर लिहितात, “साठेवाडीत माणसे खूप, शेकडो. संडास मात्र फक्त सहा. ते पुरायचे नाहीत. पाणी अपुरं, त्यामुळे सगळी घाण व्हायची. पांढऱ्या बटबटीत अळ्या वळवळायच्या. बसलं की अंगावर चढायच्या. शीः! शीः! घाण! घाण! मुलं तर उघड्यावर बसायची. या हागणदारीचं दर्शन नको व्हायचं. पण रोज सकाळी लाइनीत उभं राहावंच लागे. त्यातूनच मला पोटाचे विकार जडले.”

   खेड्यातील दलितांइतकेच दुःख शहरातील ब्राह्मणाच्या वाटयालाही कसे येऊ शकते हे अशा वर्णनातून पुरेपूर जाणवते.

   चाफेकरांचे शिक्षण झाले नगरपालिकेच्या मोफत शाळेत. तिथे विड्या ओढत असलेले गुरुजी. नातेवाईकही तसेच, शेजारीपाजारीही तसेच. ‘डॉक्टर, डॉक्टर’ खेळायच्या निमित्ताने वाड्यातल्या काही मुली त्यांना एका बंदिस्त खोलीत घेऊन जात आणि त्यांच्याशी अश्लील चाळे करत. ‘मी तुला तपासते’ म्हणत सर्वांगावरून हात फिरवत. ‘आता तू आम्हांला तपास’ असेही नंतर कपडे उतरवून म्हणत. अशा प्रकारे अनेक वेळा त्यांना लहानपणीच लैंगिक अत्याचार सोसावे लागले. आयुष्यात पुढेही असे अनेक किळसवाणे अनुभव त्यांना येत गेले. ह्या साऱ्याचे सविस्तर वर्णन ह्या आत्मचरित्रात आहे. स्वतःला आलेल्या असल्या अनुभवांचे इतके प्रांजळ कथन माझ्यातरी वाचनात अन्य कुठे आल्याचे आठवत नाही. 

   यात भर म्हणजे त्यांना प्रकृतीची जराही साथ नव्हती. एकतर जन्माला आल्यापासून ते सारखे आजारी असत. बालपणापासून मधुमेह. पाठदुखी, कंबरदुखी कायमची. मणके खराब. ॲलर्जी आणि पित्ताचा त्रास. दोन्ही डोळ्यांत पंचविशीपासून मोतीबिंदू. आयुष्यभर ह्या दुखण्यांशी त्यांचा संघर्ष चालूच राहिला. 

   काही प्रकारच्या सामाजिक कामाला लोकांचा तसा विरोध असत नाही. तुम्ही अंधांसाठी शाळा चालवलीत, अनाथ विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवलेत, महारोग्यांची सेवा केलीत, अपंगांचे पुनर्वसन केलेत किंवा आदिवासींना अन्नधान्य पुरवलेत तर त्याला कोणी विरोध करायचा प्रसंग सहसा येत नाही; पण चाफेकर काम करत त्या वेश्यावस्तीत हितसंबंधी लोकांची एक बळकट साखळी तयार झालेली असते व त्या लोकांकडून होणारा विरोध खूपदा हिंसक असतो. चाफेकरांवर अनेकदा अगदी शारीरिक हल्लेही झाले, त्यांना जिवे मारायचाही प्रयत्न झाला. अनंत खोट्या कोर्ट केसेस त्यांच्यावर लादल्या गेल्या. त्यांतल्या लातूरमधील एका खटल्याविषयी चाफेकरांनी संस्थेच्या ‘संवादिनी’ या मुखपत्राच्या जानेवारी २०१७च्या अंकात विस्ताराने लिहिले आहे. त्यात ते लिहितात :

   “लातूरच्या आमच्या एक कार्यकर्त्रीने  तिला आलेल्या वैफल्यातून आत्महत्या केली. या कार्यकर्त्रीला आत्महत्येस कारणीभूत केलं असा आरोप माझ्यासह पाच कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला. आम्हांला अटक झाली. पंधरा दिवस आम्ही तुरुंगात होतो. जामिनावर आमची सुटका झाली. मला आश्चर्य याचं वाटतंय, की त्या मुलीसाठी मी किती केलं आणि तरी आमच्या वाट्याला तुरुंगवास आला. केवळ दहावी पास, परित्यक्ता अशी ती मुलगी. तिचं प्रशिक्षण केलं. तिला काम दिलं. तिच्याच पैशांत तिच्या आईवडलांचा सगळा खर्च ती भागवत असे. ती शिकावी म्हणून धडपडलो. ती बी. ए. झाली. तिचे वडील मला म्हणत, की तिचा स्वभाव विक्षिप्त आहे. तुम्ही तिला आधार दिलात. वळण लावलंत. खरे आईबाप तुम्हीच आहात! आणि तरीही त्या वडिलांनी पोलिसात आमच्याविरुद्ध तक्रार दिली! 

     “१९९४पासून सबला महिला केंद्रात पाचशे बायका शिकून गेल्या. साडेचारशे बायका स्वावलंबी झाल्या. त्यांची निराशा नाहीशी झाली. त्या कमावू लागल्या. एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून त्यांना समाजात मान मिळू लागला. मग या एका कार्यकर्त्रीने आमच्या पदरात अपयश का टाकावं? खूप विचार केला. पण या प्रश्नांना उत्तर नव्हतं. जवळजवळ चार वर्षं केस लढत होतो. किती मनःस्ताप! किती बदनामी! न केलेल्या गुन्ह्याची सजा आम्ही भोगत होतो. ३१ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी कोर्टाने निर्णय दिला, ‘तुम्ही सारे निर्दोष आहात, तुम्ही मुक्त आहात. कोणीतरी तुमची बदनामी करण्यासाठी हा बनाव रचला असावा.’ कोर्टाने नवीन वर्षासाठी जणू या निकालातून शुभेच्छाच दिल्यात.”

   सुदैवाने त्या खटल्यातून त्यांची पुढे निर्दोष सुटका झाली; तरी पुण्यातील एक तितकाच गंभीर खटला त्यानंतरही चालूच राहिला. काही ना काही कायद्याचे प्रश्न उद्भवतच असत. सामाजिक क्षेत्रात अत्यंत निःस्वार्थीपणे काम करतानादेखील किती दारुण अनुभव एखाद्याच्या वाट्याला येऊ शकतात याची अशी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत. पण तरीही त्यांची झुंज चालूच राहिली. म्हणूनच या आत्मचरित्राचे शीर्षक अगदी सार्थ म्हणावे लागेल. 

   सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या एका हायस्कूलमध्ये त्यांनी चार वर्षे शिकवले. एक योगायोग म्हणजे मी त्याच शाळेचा विद्यार्थी होतो. पुढे पुण्याला जे. पी. नाईक व चित्रा नाईक यांच्या इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनमध्ये त्यांनी काही वर्षे काढली. त्यांचा तरुण विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेला प्रसिद्ध ‘जाणीव जागृती प्रकल्प’ याच काळातला. पण पुढे त्यांचे संस्थाचालकांशी बिनसले, संस्था सोडावी लागली. जवळजवळ पूर्ण होत आलेले पीएच.डी.चे कामही त्यांनी अगदी अखेरच्या टप्प्यात सोडून दिले. उत्तम पगार आणि सुरक्षितता देणारी सुखाची प्राध्यापकी करण्याऐवजी त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात उडी घ्यायचे ठरवले. 

   समाजसेवेतीलही त्यांचा सुरुवातीचा अनुभव कटू होता. ते बाबा आमटे यांच्याकडे आनंदवनात गेले. पण आपल्या स्वतंत्र विचारसरणीमुळे बाबा आमटेंशी त्यांचे जुळले नाही; किंबहुना चाफेकरांच्या निवेदनानुसार बाबांनी त्यांना हाकलूनच दिले. ज्ञानप्रबोधिनीतील त्यांचा अनुभव साधारण असाच होता. शेवटी १९८२ साली आपली स्वतंत्र वाट आपण शोधू या असा विचार करून त्यांनी स्वतःच ‘जाणीव’ संघटनेची आणि १९८५मध्ये ‘वंचित विकास’ची स्थापना केली.

   जाणीव ही संस्था फेरीवाल्यांसाठी काम करते. हे फेरीवाले समाजाची महत्त्वाची गरज भागवत असतात. कामावर जाता-येता आपल्याला हव्या त्या जिनसा लोक खरेदी करू शकतात – त्याही दुकानांपेक्षा कमी भावात. बहुतेक फेरीवाले हे अल्पशिक्षित असतात. या व्यवसायामुळे त्यांना निदान पोटापाण्यापुरते पैसे मिळतात. हा व्यवसाय नसेल तर त्यांच्यावर भीक मागायचीच पाळी आली असती. त्यातून कदाचित गुन्हेगारीही वाढली असती. आपल्या व्यवसायासाठी हे फेरीवाले सरकारकडून कुठलेही अनुदान किंवा कसलीच मदत मागत नाहीत. सन्मानाने करता यावा असाच हा एक स्वयंरोजगार आहे.

   तरीही त्यांच्या कामात अनंत अडचणी असतात. दिवसभर उन्हातान्हात रस्त्यावर उभे राहावे लागते; धूळ, प्रदूषण, गोंगाट, ट्रॅफिक हे सारे सहन करावे लागते. धंदा करण्यासाठी कर्ज काढायचे म्हटले तर त्यालाही अतोनात त्रास होतो. बँका यांना थारा देत नाहीत. खासगी सावकारांकडून भरमसाट व्याज देऊन कर्ज काढावे लागते. पुणे महानगरपालिकेने अनेक वर्षे फेरीवाल्यांना परवाने देणे बंद केलेले आहे. त्यामुळे बहुतेक फेरीवाले अनधिकृत मानले जातात; वर्षानुवर्षे त्याच जागी धंदा करत असले तरीही. त्यांचा व्यवसाय म्हणजे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण मानले जाते व तो कायद्याने गुन्हा आहे. धंदा करता यावा म्हणून अनेकदा पोलिसांना, स्थानिक गुंडांना, राजकीय कार्यकर्त्यांना हप्ता द्यावा लागतो. सार्वजनिक मंडळे वेगवेगळ्या उत्सवांची वर्गणी सक्तीने गोळा करतात. एवढे करूनही महानगरपालिकेची गाडी कधीही येऊन त्यांचा माल गाडीसह जप्त करू शकते. ते परत सोडवून घेणे मोठ्या जिकिरीचे असते. त्यासाठीही चिरीमिरी द्यावी लागते; शिवाय अधिकृत दंड तर भरावाच लागतो. जप्त केलेले सामान अधिकारी बेदरकारीने इकडे तिकडे फेकतात व त्यात खूपदा गाडीचीही मोडतोड होते; शिवाय त्यातील माल नाशवंत असेल तर तो हमखास खराब होतो. अशा सगळ्या परिस्थितीत तो फेरीवाला कसाबसा आपला धंदा करत असतो. तरीही त्याला समाजाची सहानुभूती कधीच मिळत नाही. उलट वाहतुकीला अडथळा येतो म्हणून वाहनचालक दोष देतात, तर चालताना त्रास होतो म्हणून पादचारी शिव्या देतात. 

   या सगळ्याचा विचार करूनच चाफेकरांनी जाणीव ही फेरीवाल्यांची संघटना उभारली आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप यावे म्हणूनही खूप प्रयत्न केले. फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी एक आराखडा त्यांनी तयार केला. तो महानगरपालिकेकडे दिला. नुसता दिला असे नाही; तर त्याचा सतत पाठपुरावा केला. शेवटी पुणे महानगरपालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्रे द्यायला सुरुवात केली. देशात असे करणारी ही पहिली महानगरपालिका. पुढे नॅशनल हॉकर्स फेडरेशनमार्फत चाफेकरांनी हे आंदोलन देशव्यापी पातळीवर नेले. सुप्रीम कोर्टानेदेखील या मागण्या उचलून धरल्या. मार्च २०१४मध्ये केंद्र सरकारने त्याबद्दलचा कायदा केला. फेडरेशनच्या मणिपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय अधिवेशनाचे चाफेकर अध्यक्ष होते. जाणीव संघटनेचा भर आता या कायद्याच्या अंमलबजावणीवर आहे. दुर्दैवाने आपल्या देशात अनेक कायदे केवळ कागदावर राहतात आणि त्यांची वास्तवातली अंमलबजावणी हा म्हणूनच सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. 

   वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी पुण्याजवळ लोहगाव येथे ‘निहार’ नावाचे निवासी केंद्र उभारले आहे. निहार नावामागेही चाफेकरांचे साहित्यप्रेम आहे. निहार म्हणजे दवबिंदू. महादेवी वर्मा यांच्या एका हिंदी खंडकाव्याचे हे शीर्षक. चाफेकर म्हणत, “दवबिंदूसारखी असणारी ही मुलं. संस्थेच्या रूपात कमलपत्राचा आधार त्यांना मिळाला, तर त्यांचे मोती होतील; नाहीतर ते मातीत मिसळून नाहीसे होतील; असं मला वाटलं. म्हणून या कामाला निहार हेच नाव दिलं.” 

    आपले काम आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे म्हणून चाफेकरांनी अनेक व्यवसायिक उपक्रम राबवले. अगदी सुरुवातीला चाफेकर बराचसा खर्च स्वतःच्या बचतीतूनच भागवत होते. पण ती रक्कम फारशी नव्हती आणि लौकरच संपली. पुढे त्यांनी अक्षरवेध नावाचा छापखाना काढला. लिफाफे व वह्या बनवायचा व्यवसाय केला. गोपालन केले. मशरूम बनवले. संगणकप्रशिक्षण वर्ग चालवले. 

    व्यक्तिगत पातळीवरही अर्थार्जन करून त्यांनी संस्थेला हातभार लावला. आपल्या व्याख्यानांचे व प्रशिक्षण वर्गांचे मानधन म्हणून जी रक्कम मिळे, ती संस्थेसाठीच वापरली. एकदा तर अगदी कमाल झाली. एका कार्यकर्त्याला पैशाची खूप गरज होती व त्याला देण्यासाठी चाफेकरांच्या खिशात काहीच शिल्लक नव्हते. त्या वेळी ते चक्क एका रुग्णालयात गेले व तिथे एका रुग्णाला स्वतःचे रक्त त्यांनी दिले. त्याचे जे पैसे मिळाले ते त्यांनी त्या कार्यकर्त्याला नेऊन दिले. 

   ज्याच्या भेटीसाठी अनेक राष्ट्रप्रमुखांनाही वाट पाहावी लागते तो मायक्रोसॉफ्ट कंपनीचा प्रमुख बिल गेट्स हा स्वतः त्यांच्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या लाल बत्ती भागात वेश्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या दवाखान्याला नोव्हेंबर २००८मध्ये भेट देऊन गेला. संपूर्ण गुप्तता पाळून दिलेली ही भेट होती. तो येणार हे चाफेकरांना केवळ एक तास आधी कळवण्यात आले. त्या भेटीचा त्रोटक पण वेधक वृत्तान्त पुस्तकात आहे. दुसऱ्या एखाद्याने बिल गेट्सच्या या भेटीचा वारंवार उल्लेख करून, त्याची जाहिरातबाजी करून स्वतःसाठी भरपूर प्रसिद्धी मिळवली असती व संस्थेसाठी निधीही; पण चाफेकरांनी तो मोह कटाक्षाने टाळला.

   आपले सारे आयुष्य वंचितांसाठी अर्पण केलेले चाफेकर अखेरपर्यंत अविवाहित राहिले, त्यांचे स्वतःच्या मालकीचे घरही नव्हते. त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थांमध्ये ते साधे पदाधिकारीसुद्धा राहिले नाहीत; सारे अधिकार त्यांनी केव्हाच अन्य कार्यकर्त्यांकडे सोपवले. त्यांचा एकही नातेवाईक ह्या कुठल्याच कामात नोकरीला वा पदाधिकारी म्हणून नाही. त्यांच्या कामाचा व्याप थक्क करणारा होता. नव्वद पूर्णवेळ कार्यकर्ते आणि साडेबारा हजार अंशवेळ कार्यकर्ते या दोन्ही संस्था सांभाळतात. अविरत ऊर्जेने चाफेकर शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्यातलेच एक बनून तेच काम करत राहिले. अशा ह्या आगळ्या कार्यकर्त्याने आपला जीवनप्रवास ह्या पुस्तकातून मांडला आहे. 

   बालपणाच्या जखमा अनेकांच्या आयुष्यात कायमची कटुता निर्माण करतात; ‘समाजाने माझ्यासाठी काही केलेले नाही, मी कशाला अशा समाजासाठी काही करू’ अशी मग त्यांची धारणा बनते व तिचे ते कायम समर्थनही करत राहतात. चाफेकरांच्या बाबतीत हे घडले नाही. उलट त्यांचा प्रवास वंचनेकडून अनुकंपेकडे आणि अनुकंपेकडून सेवेकडे झाल्याचे दिसते. त्यांचे सेवाकार्य हा आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखावरचा उतारा ठरला. 

   जीवसृष्टीच्या विकासासाठी ज्याप्रमाणे ऊब लागते, ओलावा लागतो, त्याप्रमाणे हा समाज सांधला जावा यासाठीही एक आपलेपणाचा ओलावा लागतो, करुणेची ऊब लागते. सामाजिक कार्य म्हणजे ही ऊब, हा ओलावा पुरवणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. अशा कामाकडे उपहासाने बघण्याची, कधी त्या कामाचे वरकरणी कौतुक केले तरी प्रत्यक्षात स्वतः काठावरच राहण्याची आणि आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारची झळ पोचू न द्यायची प्रवृत्ती समाजात अनेकदा आढळते. ‘मोजलेली चाल आहे, मापलेला पंथ आहे, बरगड्यातील पाखराचा शब्द आता संथ आहे’ हे आजच्या मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचकाला आतून कुठेतरी हलवणारे आहे. सर्वसामान्य वाचकाच्या सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.              

   आणखी दोन दुर्लक्षित पुस्तकांचा निदान धावता उल्लेख तरी इथे करावासा वाटतो. एक म्हणजे ‘राजवाडे दर्शन’ (मॉडर्न बुक डेपो प्रकाशन, पृष्ठे २२०, किंमत रुपये २०) हे पुस्तक. इतिहासाचार्य संशोधनमहर्षी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या २५ निवडक निबंधांचा हा संग्रह आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९६५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला दत्तो वामन पोतदार यांची प्रस्तावना लाभली आहे. तिच्यात त्यांनी लिहिले आहे, “राजवाडे यांचे नाव शिक्षित लोकांतही थोड्यांनाच माहित असते. कारण राजवाडे यांनी आपले सर्व आयुष्य मराठ्यांच्या इतिहासाची साधने शोधण्यात खर्च केले. त्यांच्या प्रचंड उद्योगाला हिंदुस्तानात कोठेही तोड नाही.” १८६३ ते १९२६ हा राजवाडे यांचा जन्मकाळ. लग्नानंतर तीनच वर्षांत पत्नी वारली, मुलगाही वारला; पण खचून न जाता आपले सगळे आयुष्य त्यांनी इतिहास संशोधनासाठी अक्षरशः भटकंती करण्यात व्यतीत केले. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून आणि प्रसंगी अर्धपोटी राहून त्यांनी कामाचा डोंगर उभा केला. आज मराठ्यांचा इतिहास म्हणून जे मूळ कागदपत्र उपलब्ध आहेत त्यामागे मुख्यतः राजवाडे यांचेच परिश्रम आहेत. त्या काळातील त्यांचे हे निवडक लेखन आजही समयोचित आहे. विशेषतः ‘श्रीसमर्थांचा सांप्रदाय’, ‘शिवाजी व रामदास’,‘भारतीय इतिहासाची मूलतत्त्वे’ किंवा ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद’ हे लेख.

   यातील शेवटचा लेख खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तत्कालीन महाराष्ट्रातील दीडशे प्रमुख मंडळींची त्यांनी व्यवसायानुसार यादी केली आहे. तशीच एखादी यादी आजच्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही संदर्भात करायचा मोह ती वाचताना मला झाला! आज आपल्याकडे खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान म्हणता येतील अशी माणसे किंवा नेते किती कमी आहेत ते त्या वेळी जाणवले. सध्या ‘सुमारांची सद्दी सुरू आहे’ असे माझ्या एका मित्राने लिहिले होते त्यात तथ्य असावे! ‘मराठी भाषेचे भवितव्य’ हा राजवाडे यांचा कटू पण सत्य सांगणारा दीर्घ लेख तर पुनःपुन्हा वाचावा इतका महत्त्वाचा आहे; त्यात त्यांनी नोंदवलेल्या मराठी भाषेपुढील समस्या आजही कायम आहेत. १९२६ साली पुण्यात भरलेल्या पहिल्या शारदोपासक संमेलनात त्यांनी केलेले ते अध्यक्षीय भाषण आहे. आपले सर्व लेखन राजवाडे यांनी जाणीवपूर्वक आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत केले हेही विशेष आहे. अनेक भारतीय समाजसुधारकांचा परस्परांमधील पत्रव्यवहार हादेखील त्या काळी बहुतांशी इंग्रजीतच असायचा याची इथे आठवण होते.

   ‘एक प्रवास, एक शोध’ (प्रकाशन १९७५, पृष्ठे १४२, किंमत १८ रुपये) हे असेच आणखी एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित राहिलेले पुस्तक. सातारा जिल्ह्यातील औंधचे एके काळचे संस्थानिक अप्पासाहेब पंत यांचे हे आत्मकथन. ते मूळ इंग्रजीत ‘ए मॉमेंट इन टाइम’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्याचा मराठी अनुवाद अप्पासाहेबांच्या पत्नी नलिनी पंत यांनी केलेला आहे. ओरिएंट लॉंगमन या विख्यात इंग्रजी प्रकाशकांनी मूळ पुस्तक आणि अनुवाद ह्या दोन्हीचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मार्मिक प्रस्तावना लाभलेली आहे. देश स्वतंत्र व्हायच्या आधीच अप्पा पंत यांच्या वडिलांनी – म्हणजे राजा भवानराव पंतप्रतिनिधी यांनी, आपल्या संस्थानात सर्व अधिकार प्रजेला देऊन संपूर्ण देशात प्रथमच लोकशाहीची स्थापना केली होती. १९३५ साली इंदूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी स्थापन केलेले औंध येथील कलासंग्रहालय आजही रसिक आवर्जून बघत असतात. त्यांची सामाजिक बांधिलकी आणि रसिकता चिरंजीवांतही आली. सूर्यनमस्काराचे खंदे प्रचारक म्हणूनही दोघांची ख्याती होती.

   अप्पासाहेबांचा पंडित नेहरू यांच्याशी व्यक्तिगत स्नेह होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध देशांत भारताचे वकील किंवा प्रतिनिधी नेमायचा प्रश्न प्रथमच निर्माण झाला. देश परतंत्र असताना त्याची अर्थात गरजच नव्हती. राष्ट्रकुलात (म्हणजे जिथे पूर्वी इंग्रजांची सत्ता होती त्या कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट होणाऱ्या देशांत) उच्चायुक्त (हायकमिशनर) आणि इतर सर्व देशांत राजदूत (ॲंबॅसॅडर) असे त्या पदाचे नामकरण झाले. त्या महत्त्वाच्या कालखंडात पंडितजींच्या सांगण्यावरून भारताचे उच्चायुक्त आणि राजदूत म्हणून त्यांनी प्रथम पूर्व आफ्रिका आणि नंतर इजिप्त, सिक्कीम, तिबेट, इंडोनेशिया, ग्रेट ब्रिटन व इटली येथे सेवानिवृत्त होईपर्यंत काम केले. त्या-त्या देशांबद्दलची त्यांची निरीक्षणे अतिशय सखोल आणि महत्त्वाची आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरू, जे. कृष्णमूर्ती, दलाई लामा, सुकार्नो, नासेर, जोमो केन्याटा अशा अनेक थोर व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांची अल्पपरिचित वैशिष्ट्ये या पुस्तकात नमूद केलेली आहेत. उदाहरणार्थ इंडोनेशिया या जगातील सर्वांत मोठ्या मुस्लीम राष्ट्राचे सर्वांत मोठे नेते सुकार्नो यांची आई बाली या बेटावरची हिंदू होती. पुस्तकातील आफ्रिकेची अर्चना’, ‘गूढ तिबेट’, ‘इस्लाम’, ‘लंडनमधील तीन वर्षे’ आणि ‘एक चिंतन’ ही पाच प्रकरणे मला विशेष आवडली. पुस्तकात व्यक्त झालेले त्यांचे आध्यात्मिक विचारही मोलाचे आहेत. हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला अपरिचित अशा जागतिक स्तरावर आणि एका वेगळ्याच प्रगल्भ वातावरणात  घेऊन जाते. 

   बरीच महत्त्वाची माहिती या सर्व उपरोक्त पुस्तकांतून आपल्याला मिळते. त्यांच्यातील चिंतनही वेगळी दृष्टी देणारे आहे. अभ्यासकांसाठी संदर्भ म्हणून ही चारही पुस्तके खूप उपयुक्त आहेत. दुर्लक्षित राहिलेली पण महत्त्वाची अशी आणखीही बरीच पुस्तके आहेत पण स्थळाभावी इथेच थांबतो. 

   सखोल आणि दीर्घ स्वरूपाच्या वैचारिक लेखनाला आजच्या प्रसारमाध्यमांमध्ये दुर्दैवाने अगदीच कमी स्थान आहे. महाराष्ट्राला एकोणिसाव्या शतकापासून लाभलेली वैचारिकतेची उज्ज्वल परंपरा योग्य मंचाच्या अभावी खंडित होणे दुःखद ठरेल. केवळ सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे मराठी भाषा समृद्ध ठरणार नाही; राजकीय स्वार्थासाठी मराठीप्रेमाचे प्रदर्शन करूनही आपली भाषा समृद्ध होणार नाही; ती खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायला हवी असेल तर त्यासाठी अशी अभ्यासपूर्ण पुस्तके सातत्याने मराठीत प्रकाशित व्हायला हवीत; तसे लेखक निर्माण व्हायला हवेत आणि त्यांची योग्य ती दखलही वाचकांनी व समीक्षकांनी घ्यायला हवी.    

Author

Leave a Reply