बांधुनि बंधांत विविध
गोमूत्रिका बंध
गोमूत्रिका बंध हे नाव वाचून जरा धक्का बसतो. या नावाचं स्पष्टीकरण असं – गाय, बैल सरळ चालत असतात पण त्यांच्या मूत्रविसर्जनाची धार चतुष्पाद गतीमुळे नागमोडी होते. त्या नागमोड्या गतीप्रमाणे वाचता येईल असा रचलेला हा बंध म्हणजे गोमूत्रिका बंध!
किरातार्जुनीयम् सर्ग १५ श्लोक १२
नासुरोऽयं न वा नागो धरसंस्थो न राक्षसः|
ना सुखोऽयं नवाभोगो धरणिस्थो हि राजसः|
नासुरोऽयं चं पुढच्या ओळीत
ना सुखोऽयं
एका अक्षराचा बदल करून नवीन घडण केली जाते.
या रचना प्रयत्नपूर्वक केल्याने कृत्रिम वाटत असल्या तरी त्या करण्यातली मौज विलक्षण असते.
पहिल्या ओळीतलं पहिलं अक्षर, दुसऱ्या ओळीतलं दुसरं, परत पहिल्यातलं तिसरं असं वाचत गेलं की पूर्ण पहिली ओळ मिळते.
तसंच दुसऱ्या ओळीतलं पहिलं, पहिल्यातलं दुसरं असं वाचत गेलं की दुसरी ओळ मिळते. (सोबत फोटो जोडला आहे.)
या गोमूत्रिका बंधकाव्यात मी निसर्गप्रेम आणि निसर्गाची हानी या परस्परविरोधी विषयांवरच्या सोळा ओळी लिहिल्या आहेत.
पहिल्या ओळीत निसर्गाविषयी ममत्व आणि दुसऱ्या ओळीत निसर्गाची लुबाडणूक असा आलटून पालटून आशय असलेल्या ओळी लिहायची कसरत केली आहे. ( चटक, खाटीक ही पक्ष्यांची नावे आहेत.)
गोमूत्रिका बंध
*रानपिसे*
रान पिसे मला लागे मोहक ती वनी फुले|
रान भासे मला सांगे मोह किती मनी उले||
पहा अमानवी सुरी कैशी गोडी स्थिरावली|
पहार मानवी भारी कैशी झाडी हिरावली||
हव्या गुहा नि संसार सोयरी ही जनावरे|
हव्यास हानि संहार सोय पाही छिना घरे||
सुरू बहावे शेकट मोह शिरीष बेहडा|
सुरू, न हावे शेवट मोह भारीच बेरडा||
आपमाया पायी वोळे मुक्त बेबंद नाचते|
आपत्ती या पायी ढाळे मुक्त जे बंधनात ते||
ओढे गाजविती गोड येतो निनाद काननी|
ओढे बुजविती गुंड येतो विनाश का मनी||
मृग कासवे चटक खाटीक विणती सुखे|
मृगयेसवे चटक खाटीक विकती नखे||
वास लाभो गहनात मनी शांती अनाहती|
वासना भोग हवेत मनीषा तीव्र, ना क्षिती||
——————————————
खाली फोटोत रचना आणि ती कशी वाचावी त्या खुणा आहेत. पहिली ओळ सरळ वाचली की लाल रेघांच्या दिशेने वाचत गेलं की तीच ओळ परत दिसते.
दुसरी ओळ पूर्ण वाचायची आणि हिरव्या रेघांच्या दिशेने वाचायची.

हे सव्यापसव्य का करायचं? हा प्रश्न पडेल… पण हे करण्यात खूप मजा वाटते, बुद्धीला खाद्य मिळतं!
