मन वढाय वढाय :भाग ७ 

स्किझोफ्रेनिया भाग २

गोष्ट लखू आणि रेखाची.

मागील भागामध्ये आपण स्किझोफ्रेनिया या गंभीर आणि प्रदीर्घ आजाराची माहिती घेतली आणि प्रातिनिधिक स्वरूपातील एका रुग्णाची कथादेखील वाचली. आज मी तुम्हांला तीन वेगवेगळ्या रुग्णांच्या गोष्टी सांगणार आहे.

लखूपासून आपण सुरुवात करू या.

लखू 

पंढरपूरजवळच्या एका वस्ती-वजा खेडेगावात लखूचे कुटुंब राहत होते. लखू, त्याचा मोठा भाऊ आणि आई-वडील. त्याच्या दोन्ही  बहिणी लग्न होऊन आपापल्या संसारांत व्यग्र होत्या. लखूच्या आईला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता त्यामुळे तिला जमेल तसे ती स्वयंपाकपाणी, मुलांचे पालन पोषण करायची. वडील घरी फारसे लक्ष देत नसत. लखूच्या मोठ्या भावालादेखील हाच मानसिक आजार झाला आणि त्याला त्या आजाराचा मोठा झटका आला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी गाडी ठरवली. लखू आणि त्याच्या भावाला घेतले आणि ते सर्वजण लखूच्या भावाला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन चालले होते. वाटेत अचानक त्याच्या भावाने गाडीतून उडी मारली आणि तो पळून गेला. सर्वांनी त्याला बरेच शोधले पण तो सापडला नाही. या घटनेचा लखूच्या मनावर फार मोठा आघात झाला आणि दुर्दैवाने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याच्यामध्येसुद्धा मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागली.

लखूच्या बहिणी आल्या. गावातील काही लोकांच्या मदतीने त्या लखूला माझ्या दवाखान्यात घेऊन आल्या. लखूला झोप लागत नव्हती; तो सतत चुळबूळ करत होता; तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता; विचित्र हातवारे करत होता. त्याचे स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेकडे अजिबात लक्ष नव्हते. चेहऱ्यावरील हावभाव आजूबाजूच्या परिस्थितीशी विसंगत होते आणि आमच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नव्हते. त्याला तहान-भुकेची शुद्ध नव्हती.

त्याची सविस्तर मानसिक, शारीरिक तपासणी केली. त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईक आणि मित्रांकडून सर्व माहिती घेतली आणि त्यांना सांगितले, की लखूला दवाखान्यात भरती करावे लागेल; काही दिवस निरीक्षणाखाली औषधोपचार करावे लागतील आणि अपेक्षित परिणाम दिसले नाहीत तर शॉक थेरपीचा विचार करावा लागेल; परंतु कौटुंबिक अडचणींमुळे त्याला दवाखान्यात भरती करण्यास त्याच्या नातेवाइकांनी नकार दिला. तोंडी औषधे लिहून दिली आणि औषधे वेळेवर काटेकोरपणे घेणे किती महत्त्वाचे आहे हे नीट समजावून सांगितले. पुढच्या तपासणीच्या वेळी त्याची बहीण त्याच्यासोबत आली होती. लखूच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती; परंतु नवीन समस्या पुढे उभी होती  – लखूच्या बहिणीला आणखी जास्त काळ त्याच्यासोबत राहणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे ती त्याला स्वतःसोबत घेऊन जाणार होती आणि त्यांनी एकदम दोन महिन्यांची औषधे लिहून देण्यास सांगितली. खरे म्हणजे रुग्णामध्ये आमच्या दृष्टीने निम्म्याहून जास्त सुधारणा झाल्याशिवाय आम्ही फेरतपसणीसाठीची इतकी लांबची तारीख देत नाही; पण या बाबतीत नाइलाज होता. त्यांना पुन्हापुन्हा मी नियमित औषधे घेण्यास बजावले; लखूच्या आजाराची आणि औषधोपचारांची प्राथमिक माहिती दिली. 

हळूहळू रोजच्या कामांमध्ये लखूची केस विसरले होते आणि तो पुन्हा उपचारांसाठी येईल की नाही याची खातरी नव्हती; पण दिलेल्या तारखेला तो आला – स्वच्छ कपडे, नीट विंचरलेले केस, वागण्याबोलण्यात स्थिरता आली होती. लखू आणि त्याची बहीण अतिशय आनंदात होते कारण त्याची आई आणि भाऊ यांच्यामध्ये इतक्या वेगात सुधारणा झाली नव्हती पण लखू बरा होत होता आणि तो स्वतःची काळजी घेऊ शकत होता. त्याची बहिण निर्धास्त झाली होती पण माझ्या मनावर दडपण आले होते कारण स्किझोफ्रेनिया हा आजार इतक्या लवकर बऱ्या होणाऱ्या आजारांमधील नाही. लखूची आजाराची लक्षणे फक्त कमी झाली होती आणि त्यामुळेच पुढचे काही महिने लखूने अतिशय काळजीपूर्वक नियमित औषधे घेणे आणि दिलेल्या तारखेला तपासणीसाठी येणे फार गरजेचे होते.  लखू नियमित तपासणीस येत होता. त्याच्यासोबत त्याचा एखादा मित्र असायचा. काही काळाने त्याला नोकरी लागली. सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटत होतं;  परंतु दुसरीकडे त्याच्या आईचा आणि भावाचा आजार बळावत होता. वडील घर सोडून परागंदा झाले. तरीही लखू दर महिन्याला तपासणीसाठी यायचा त्या वेळी त्याचं समुपदेशनसुद्धा सुरू होतं… पण नंतर तो आलाच नाही. जवळजवळ ६-८ महिने तो आला नाही. 

एके दिवशी लखू पुन्हा पहिल्यासारखा झालेला दवाखान्यात आला; आला म्हणजे त्याच्या गावातील लोक त्याला घेऊन आले. तेव्हापासून लखूची मानसिक स्थिती ढासळत गेली. अधूनमधून त्याला कोणीतरी तपासणीसाठी घेऊन यायचं – कधी मित्र, कधी शेजारी, कधी कामावरचा ठेकेदार, तर कधी चक्क त्याच्या गावचा सरपंच! आम्ही सगळेच आमच्या परीने जसे जमेल तसे प्रयत्न करत होतो; खरं म्हणजे अजूनही करत आहोत. जोपर्यंत लखू व्यवस्थित औषधे घेत असतो तोपर्यंत त्याचं सगळं व्यवस्थित सुरू असतं.  एकदा औषधे बंद झाली, की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात. त्याची काळजी घेणारे कोणी जवळचे जबाबदार नातेवाईक नसल्यामुळे आम्ही यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. पण दरवेळी तो दवाखान्यात येऊन गेला, की वाईट वाटतं. त्याने सलग न चुकता औषधोपचार घेतले तर तो  सर्वसामान्य आयुष्य जगू शकला असता; पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं! 

रेखा 

ही गोष्ट आहे रेखाची. माझी रेखा! माझी म्हणण्याचं कारण म्हणजे मी तिला माझ्या इतर रुग्णांच्या तुलनेत खूप  मदत केली पण…

तर ही रेखा माझ्या सुरुवातीच्या रुग्णांपैकी एक. माझ्याकडे येण्यापूर्वीपासूनच तिचे अनेक वर्षे स्किझोफ्रेनिया  या आजारावरील उपचार सुरू  होते; परंतु दर महिन्याला तपासणीसाठी परगावी जाणे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हते आणि तिच्यामध्ये अपेक्षित सुधारणादेखील होत नव्हती.

रेखाच्या आई-वडिलांना रेखा धरून तीन मुली आणि एक मुलगा. सर्वात मोठ्या बहिणीला लग्नानंतर सासरी त्रास झाला आणि काही कारणास्तव तिच्या नवऱ्याने ती गरोदर असताना तिला सोडून दिले. या घटनेचा तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला. परंतु ती कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यास तयार नसायची. दुसरी बहीण काही कारणांनी अविवाहित होती परंतु ती नोकरी करत होती. रेखाच्या मोठ्या बहिणीचा मुलगादेखील त्यांच्यासोबत राहत होता. रेखा मोठी झाल्यावर तिला पंढरपुरातील एका दुकानात नोकरी लागली. परंतु तिथे काम करताना काही घटना घडल्या किंवा कामाचा तिच्यावर खूप ताण पडला. नक्की काय झाले हे कोणाला कधी कळले नाही;  परंतु रेखाची अचानक चिडचिड सुरू झाली. कामावरच्या सहकारी बायका तिला मुद्दाम त्रास देतात, तिच्याविरोधात काहीतरी कारस्थान करतात अशा तक्रारी ती सारखी करू लागली. एकटी बसली, की स्वतःशी पुटपुटत असायची. तिचे जेवण कमी झाले. शेजाऱ्यांनादेखील तिच्या वागण्याचा त्रास होऊ लागला. वडील एका दुकानात कामाला होते आणि आईचा घरगुती छोटासा व्यवसाय होता. एका लहानशा घरात ६-७ जण राहत होते; त्यामुळे रेखाला शांतता, विश्रांती मिळणे कठीण होते. तिचा त्रास वाढत चालला आणि  तिची नोकरी गेली. ओळखीतल्या काही लोकांच्या सल्ल्यानुसार ते तिला जवळच्या शहरातील मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन गेले. तिथे तिला त्यांनी दाखल करून घेतले आणि शॉक थेरपीची सुरुवात केली. शॉक थेरपीसाठी तिला घेऊन जात असताना तिने दवाखान्यातून अचानक पळ काढला; परंतु सुदैवाने ती पंढरपूरला पुन्हा घरीच आली. तेव्हापासून तिला तोंडी औषधे सुरू होती. फार सुधारणा होत नव्हती. अशातच तिच्या धाकट्या भावाचे लग्न झाले. पुढे त्याला मूल झाले आणि हळूहळू रेखाच्या मनात तिच्या भावाविषयी आणि वहिनीविषयी संशयभ्रम निर्माण होऊ लागले. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने सगळेजण नशिबाला दोष देत आला दिवस ढकलत होते. रेखा नुसती रस्त्याने भटकत राहायची. केस पिंजारलेले, डोळ्यांमध्ये वेडसर झाक , स्वतःशी पुटपुटत हातवारे करत चालणं यामुळे कोणी तिच्या वाटेला जात नसे.

तर एके दिवशी अशा रेखाला तिची आई आणि बहीण माझ्याकडे घेऊन आल्या. तिला पूर्वीपासून जी औषधे सुरू होती त्यामध्ये गरजेनुसार बदल करून आम्ही नव्याने तिचे उपचार सुरू केले. कोणत्याही परिस्थितीत ती दवाखान्यात भरती व्हायला तयार नव्हती त्यामुळे माझ्यासमोर फार मोठं आव्हान होतं.

परंतु परगावी जाण्याचा त्यांचा खर्च वाचला आणि तुलनेने माझी तपासणी फी कमी होती. त्यामुळे रेखा दरमहिन्याला न चुकता तपासणी साठी येत होती आणि तिच्यामध्ये चांगली सुधारणा दिसत होती. हळूहळू आम्ही तिला सुरू असणाऱ्या औषधांची संख्या कमी केली आणि आता तिच्या उपचारांमधील पुढची पायरी आली पुनर्वसनाची. रोज स्वच्छ अंघोळ करणे, तेल लावून केस विंचरणे, स्वतः धुतलेले स्वच्छ कपडे घालणे ही कामे तिला दिली. तिने सलग एक महिना हे रोज करणे फार आवश्यक होते आणि माझ्या शब्दाखातर ती सगळं तिला जमेल तसं करतदेखील होती.

एके दिवशी काही लोक मला भेटायला माझ्या दवाखान्यात आले. त्यांपैकी काही जण रिक्षाचालक होते, काही दुकानदार होते. 

ते म्हणाले, “डॉक्टर ती रेखा नावाची मुलगी तुमच्याकडे येताना आम्हांला दिसते. तुमच्याकडे तिचे उपचार सुरू आहेत असे कळले म्हणून आम्ही मुद्दाम भेटायला आलो आहोत.”

 मी जरा गोंधळून गेले होते कारण त्यांचा मला भेटायला येण्यामागचा नेमका हेतू मला समजत नव्हता.

त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “डॉक्टर आम्ही गेली कितीतरी वर्षे तिला नुसतं रस्त्याने भटकताना पाहिलं आहे; पण आता गेले काही महिने ती व्यवस्थित राहते, तिचं चालणं-बोलणंदेखील सुधारलं आहे म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलो आहोत.”

 या घटनेने मला प्रोत्साहन मिळालं आणि रेखाच्या आयुष्याची घडी नीट बसवायची असा निश्चय पुन्हा दृढ झाला.

रेखाला आता घरातील कामे करायला सांगितली होती; परंतु तिच्या मनात तिच्या भावाबद्दल, त्याच्या बायकोबद्दल असणारे संशय काही केल्या कमी होत नव्हते. त्यामुळे ती घरी काम करण्यास तयार नव्हती. शेवटी मी तिला माझ्याच दवाखान्यात साफसफाई करण्याची नोकरी दिली. ती रोज  कामावर यायला लागली. वेळेच्या बाबतीत काटेकोर आणि अगदी स्वच्छ काम यामुळे तिची नोकरी पक्की झाली. तिला योग्य पगार मिळू लागल्याने तिचा आत्मविश्वासदेखील वाढला होता. दवाखान्यात कामाला  यायचे असल्याने तिला स्वतः स्वच्छ आणि टापटीप राहणे भाग होते.

 या सर्व सकारात्मक घटनांमुळे तिला असणाऱ्या स्किझोफ्रेनिया या आजाराची बरीचशी लक्षणे कमी कमी होत नष्ट होत होती;  परंतु संशय मात्र कमी होत नव्हता. अशातच माझे हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले आणि आम्ही गावातील दवाखाना बंद करून हॉस्पिटलमध्ये काम सुरू केले.  तिला ते अंतर फार होते त्यामुळे मी तिला पूर्ण वेळेची नोकरी दिली आणि दुपारी जेवल्यानंतर तिला विश्रांतीसाठी एक तास ठेवला होता. तिच्या घरचे आणि मी आता जवळजवळ निर्धास्त झालो होतो… पण कोविड महामारी आली आणि लॉकडाऊन झालं. त्यामुळे तिचे औषधोपचार अचानक बंद झाले. त्यांचं सर्वांचं हातावरील पोट. लॉकडाऊनमुळे सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे तिची औषधे विकत आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. काही महिन्यांनंतर जेव्हा तिला तिचे नातेवाईक माझ्या दवाखान्यात उपचारांसाठी घेऊन आले त्या वेळी तिची मानसिक स्थिती फार खालावलेली होती.  तिला दवाखान्यात दाखल करून घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता; परंतु ते त्यासाठी तयार नव्हते. मी त्यांना अनेक परीने विनंती केली; अगदी बिलसुद्धा घेणार नाही, फक्त औषधांचा खर्च करा एवढे सांगितले. पण ते तयार नव्हते. शेवटी हताशपणे मी फक्त औषधे लिहून  दिली. त्यांच्यासोबत  केलेली चर्चा वैद्यकीय भाषेत तिच्या प्रिस्क्रिप्शनवर लिहून ठेवली. त्यानंतर रेखाची परिस्थिती ढासळत गेली. घरी आर्थिक अडचण,  वडिलांचे आजारपण, आईचे मणक्याचे ऑपरेशन या सगळ्यामुळे रेखाचे उपचार मागे पडले. तिचा आजार बळावत चालला होता. 

एके दिवशी मध्यरात्री मला एका परिचित व्यक्तीचा फोन आला, की तुमची एक रुग्ण आहे रेखा म्हणून, तिला आत्ता वेडाचा अतिशय तीव्र झटका आला आहे. आम्ही ७-८ जणांनी कसेबसे तिला बांधून ठेवले आहे.  आम्हांला तिला येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे पाठवायचे आहे, त्यासाठी काय करावं लागेल? 

त्या वेळी आवश्यक मार्गदर्शन मी केले आणि फोन ठेवला. माझ्या डोळ्यांत पाणी आले होते. रेखाचे पूर्ण पुनर्वसन मला करायचे होते. अगदी तिच्या आईवडिलांना  माझ्या दवाखान्यामागे असणाऱ्या दोन खोल्या राहायला देऊन, चहाचे दुकानदेखील टाकून द्यायचे अशी कल्पना मी त्यांच्यासमोर मांडली होती; जेणेकरून रेखा माझ्या डोळ्यांसमोर राहील, तिची नोकरी चालू राहील; पण तिच्या घरच्यांचे मला सहकार्य मिळाले नाही आणि शेवटी रेखाला येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. 

लखू आणि रेखा आणि त्यांच्यासारखे स्किझोफ्रेनिया हा आजार असणारे रुग्ण  बऱ्याच वेळा आर्थिक अडचणी, नातेवाइकांची अनास्था, अनियमित उपचार , मानसिक आजारांवरील औषधांबाबतीत असणारे गैरसमज, अंधश्रद्धा अशा अनेक कारणांमुळे उपचारांपासून वंचित राहतात. 

जाता जाता शेवटी हीच कळकळीची विनंती, की तुमच्या ओळखीतील कोणी या आजाराचे रुग्ण असतील तर त्यांना उपचाराचे महत्त्व पटवून द्या आणि त्यांनी उपचार नियमित घ्यावेत यासाठी त्यांना शक्य ती मदत करा.

Author

Leave a Reply