अर्कचित्र : मनस्विनी लाटकर
‘ज्याचा त्याचा विठ्ठल’
नुकताच आषाढी एकादशीला ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाट्यवाचनाचा प्रयोग पाहिला. मधुराणी गोखले आणि इतर कलाकारांनी इतकं सुरेख उभं केलेलं वारीचं चित्र पाहताना मला पंढरपूरच्या वारीतले माझे ते दिवस आठवले. अर्थात, संपूर्ण वारी मी कधी केली नाही; पण त्यातला एक दिवसाचा टप्पा मात्र बऱ्याच वेळा केला आहे. ऊन-पावसात अनवाणी पायांनी चालणारे, तरीही ओठांवर हरिनाम आणि मनात विठोबाच्या दर्शनाचा ध्यास घेऊन चालणारे ते वारकरी मी जवळून पाहिले होते. नव्हे, मी त्यांच्यातलाच एक झालो होतो. ते सारं पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहिलं. नायिकेची शुद्ध हरपते, तेव्हा वारीतलं एक जोडपं तिला आधार देतं, तिला दवाखान्यात नेऊन जीव वाचवतं आणि कुठलाही बडेजाव न करता निघून जातं. नायिकेला त्यांच्यात विठ्ठल-रखुमाई दिसतात… तो प्रसंग मनाला अगदी भिडला.
नाटकाच्या अनुषंगानं मला इरावती कर्वेंचा ‘वाटचाल’ हा लेख आठवला. त्यांनाही वारीचा अनुभव अतिशय आनंददायी व अंतर्मुख करणारा वाटला. पंढरपूरची वारी म्हणजे समग्र महाराष्ट्राचं दर्शनच. वऱ्हाड, खानदेश, मराठवाडा, पुणे, सोलापूर, सातारा अशा सर्व भागांतले लोक वारीत सामील होतात. सगळे मराठीच! प्रांत वेगळे, जाती वेगवेगळ्या, पण अभंगांच्या तालात सारे एक होतात. एकाच वारकरी पंथाचे भक्त एकत्र गातात, बोलतात, एकमेकांना मदत करतात. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, नाथांच्या ओव्या, नामदेव व तुकारामांचे अभंग, जनाई-मुक्ताईचं मधुर काव्य हे सारं लोकांच्या ओठांवर असतं. आधी भाषा गोड होते आणि मग मन शुद्ध होतं. हीच खरी संस्कृती नाही का? दुसऱ्याला समजून घ्यावं, आपल्या तत्त्वांवर हटून न बसता दुसऱ्याच्या भावनांचाही आदर करावा!
परंतु इरावतीबाईंना वारीत जाणवलेला जातिभेद मात्र खटकला. ब्राह्मण बायका आणि मराठा बायका एकत्र चालतात, एकत्र अभंग म्हणतात… पण जेवताना, पाणी भरताना त्यांच्यात एक अदृश्य भिंत उभी राहते. मराठा बायकांबरोबर त्या जेवल्या, त्यांच्यासोबत हातात हात घालून चालल्या आणि नकळत त्यांच्याशी सलगी झाली. त्यातलीच एक लहान मुलगी त्यांना म्हणाली, “बरं का ताई, आम्ही पुण्याला तुमच्याकडे येऊ, बरं का! पण ताई, तेव्हा आता वागताय तशाच वागाल ना?”
त्या लहान मुलीच्या प्रश्नाला आजतरी उत्तर मिळालं आहे का? वारीतून परत आल्यावर माणूस त्याच आपुलकीनं समाजात वावरतो का? समाजात वावरताना तीच सुसंस्कृतता बाळगतो का? तो परिणाम फक्त पंधरा दिवसांपुरताच होता का? वारी संपते, सारे परत येतात… पुन्हा राजकारण, जातपात सुरू होते. वारीतून आपण काय शिकलो? फक्त विठोबाचा जयजयकार? त्या गजरामागे दडलेल्या माणुसकीला रोजच्या व्यवहारात आपण स्थान देतो का?
कथेतली नायिका पंढरपूरपर्यंत पोहोचतच नाही. तिला तिचा विठ्ठल वाटेतच गवसतो. इरावतीबाईंची कथादेखील पंढरपूरच्या वेशीवरच थांबते. आपलं जगणं हीदेखील एक वारीच आहे. या वारीतच ज्याचा त्यानं ‘विठ्ठल’ शोधायचा आहे!
गिरीश घाटे
