१)
मला आवडेल
मला आवडेल संध्याकाळी
लांब लांब होत जाणाऱ्या
सावल्यांशी लपंडाव खेळायला
मला आवडेल जागेपणीच
असंख्य स्वप्नांचे
मनोरे रचून
त्यांच्याबरोबर
लगोऱ्या खेळायला
मला आवडेल
एखाद्या खूप गाजलेल्या
पुस्तकातील एकच अक्षर होऊन
चिरंजीव व्हायला
मला आवडेल
साधुसंतांच्या आध्यत्मिक चैतन्यातून
स्फूर्ती घेऊन अन्यायाशी
सतत दोन हात करायला
२)
मन कोठे तरी विषण्ण होते
अजूनही सारखी माझ्या
डोळ्यासमोर येतात
डी. जे. च्या कर्णकर्कश आवाजात
भर रस्त्यावर अंगविक्षेप करून
वेडेवाकडे नाचत जाणारी ती
तरुणाईची नकोशी दृश्ये
वाटते तरुणाई अगदी
बधिर झालेली आहे
आज युवा पिढीतील अस्वस्थता पाहून
मन कोठे तरी विषण्ण होते
बेकारीच्या जखमांचे
महागाईच्या माराचे
धार्मिकतेच्या क्रूर उन्मादाचे
एक कुरूप द्योतक बनून
जेव्हा ऐन पंचविशीतील तरुणाई
माझ्यासमोर पिंगा घालते तेव्हा
मन कोठे तरी विषण्ण होते
आपल्या आक्रमक हालचालीतून
तीव्र तिरस्काराचे विचार रुजवत
किळसवाण्या वाटणाऱ्या
बेसूर आरोळ्यात तरुणाई
माझ्यासमोर भणभणते तेव्हा
मन कोठे तरी विषण्ण होते
तरुणाईची असह्य दृश्ये बघून
अगतिक होणारे माझे मन
डोळे अगदी घट्ट मिटून घेते
कारण माझ्या कानांना
तरुणाईच्या आरड्याओरड्यात
केव्हाच दडे बसलेले असतात
बहिरे कान आणि मिटलेल्या डोळ्यांची
जीवघेणी वेदना गुदमरत सोसताना
मन कोठे तरी विषण्ण होते
राजन हर्षे
माजी कुलगुरू अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठ, प्रयागराज
