‘दैव रुसले दैव हसले’
अहिल्यानगर जिल्ह्यातील ही सत्यकथा आहे. श्रीपती पवार आणि त्यांची पत्नी सोजराबाई हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन लहान मुलांसोबत आनंदात राहत होते. शेती थोडी असल्यामुळे भाजीपाला पिकवून आठवड्याच्या बाजाराला तालुक्याच्या गावी किंवा जवळच्या मोठ्या गावी जाणे, धान्य व भाजीपाला विक्रीतून येणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणे असा त्यांचा दिनक्रम चालू होता. शेतीचे उत्पन्न कमी असल्यामुळे कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध विक्री इत्यादी पूरक व्यवसायातून पैसे कमावणे आवश्यक होते. वेळप्रसंगी त्यांना शेतमजुरीदेखील करावी लागत असे.
श्रीपतरावांची सर्जा आणि राजा ही बैलजोडी केवळ गावाचेच नव्हे, तर तालुक्याचे भूषण होती. श्रीपतराव आणि सोजराबाई यांना त्यांचा सार्थ अभिमान होता, त्याला कारणही तसेच होते. ही जोडी म्हणजे पोळ्याच्या सणादिवशी सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असे. गावच्या जत्रेच्या वेळी बैलजोड्यांच्या शर्यती होत असत. त्या वेळी दुसरा नंबर कोणाचा येणार याचीच चर्चा रंगत असे; कारण सर्जा-राजाचा पहिला नंबर येणार हे गृहीतच होते.
गावात कोणी आजारी पडले किंवा एखादी गरोदर स्त्री अडचणीत असेल, तर श्रीपतराव कोणतीही अपेक्षा न ठेवता हातातले काम सोडून आपली बैलगाडी जोडून संबंधितांना तालुक्याच्या दवाखान्यात नेण्यात तत्पर असत.
एप्रिल-मे महिना म्हणजे नगर जिल्ह्यात कडक उन्हाळ्याचे दिवस. भाजीपाला, धान्य घेऊन श्रीपतराव आपली बैलगाडीने तालुक्याच्या गावी निघाले. सामानाची विक्री केल्यानंतर त्यांनी सोजराबाईसाठी लुगडे, मुलांसाठी कपडे, खेळणी, खाऊ खरेदी केले, शेतीसाठी लागणारी सामग्री, युरिया-सुफला ही खते आणि बियाणे खरेदी केले.
सूर्य मावळतीकडे झुकला, श्रीपतरावांची गावाकडे जाण्याची लगबग सुरू झाली. सर्जा-राजालादेखील घराकडे जाण्याची ओढ लागली. बैल गावाकडे वेगाने धावू लागले. गळ्यातील घुंगुरमाळेच्या तालावर श्रीपतरावांची गाडी धावू लागली.
इकडे गावाकडे सोजराबाई आणि मुले श्रीपतरावांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. ते आपणासाठी काय काय घेऊन येतील याबाबतीत त्यांच्यामध्ये आडाखे बांधले जात होते.
एवढ्यात सगळीकडे काळोख पडला, सोसाट्याचा वारा वाहू लागला, विजा चमकू लागल्या, ढग गरजले आणि वळिवाचा पाऊस पडू लागला. सर्जा आणि राजा जोराने बैलगाडी ओढत होते, पण वाऱ्याचा आणि पावसाचा जोर वाढत होता. इतक्यात ‘कडाड!’ असा वीज पडल्याचा आवाज आला. सगळीकडे काळोख पसरला होता. उंच वाढलेले निलगिरीचे झाड उन्मळून विजेच्या तारेवर पडले. सर्जा-राजा यांची चाल मंदावली. सर्जा मटकन खाली बसला. श्रीपती गाडीतून खाली उतरला, सर्जाला काय झाले ते पाहू लागला. सर्जाला स्पर्श करताच श्रीपतीला विजेचा धक्का बसला. श्रीपतीने मोठी किंकाळी फोडली. सर्जा आणि श्रीपती यांची शरीरे काळी ठिक्कर पडली. दोघेही जागेवरच गतप्राण झाले.
किंकाळीचा आवाज ऐकून आसपासच्या वस्तीवरील शेतकरी धावून आले. त्यांनी ही बातमी श्रीपतीच्या घरी कळवली.
घरातील दृश्य एकदम पालटून गेले. सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, गावातील प्रतिष्ठित लोक जमा झाले. पोलीस पाटलांनी ही वार्ता नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवली. तत्काळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. श्रीपती व सर्जाचे शवविच्छेदन अहवाल तयार करण्यात आले. घटनास्थळ पंचनामा, प्रेतांचे पंचनामे, खबरी जबाब इत्यादी नोंदी केल्या. शवविच्छेदन अहवालावरून आणि प्रेतांच्या पंचनाम्याच्या आधारे श्रीपती व सर्जा यांचे मृत्यू विजेच्या धक्क्यामुळे झाल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले.
श्रीपती आणि सर्जा यांच्या मृत्यूमुळे सर्व गावावर शोककळा पसरली होती. राजा तर जन्मभराचा सहकारी आणि मालक गमावल्यामुळे वेडापिसा झाला होता. त्याने वैरण-काडीला तोंड लावले नाही. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्या मुक्या जनावराचे दुःख पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली होती.
दुःखाचे दिवस हळूहळू जात होते. श्रीपतरावांसारखा खंदा पोशिंदा आणि कुटुंबातील सदस्य असल्यासारखा सर्जा गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कर्ता-कमावता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाचा सर्व भार सोजराबाईवर पडला. कमावता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाने आधार गमावला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पार ढासळून गेली. सोजराबाईवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली.
श्रीपती व सर्जा गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले. हाता-तोंडाची मिळवणी अवघड होऊन बसली. गावातील पुढाऱ्यांनी वीज मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला.
तालुक्याच्या गावी जाऊन सोजराबाईने कुलकर्णी वकिलांची भेट घेतली. त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास करून वीज मंडळास नोटीस पाठवली व पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई मागितली. वीज मंडळाने नोटिशीला उत्तर देऊन, सदरची घटना नैसर्गिक आपत्ती असून यात वीज मंडळाचा कोणताही निष्काळजीपणा नाही असा विश्वामित्री पवित्रा घेतला. वीज मंडळाची कसलीच जबाबदारी नाही असे कथन केले.
कुलकर्णी वकिलांनी ‘फॅटल ॲक्सिडेंट’च्या तरतुदीनुसार नगर येथील सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन यांच्या न्यायालयात दावा दाखल केला व २५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली.
वीजमंडळातर्फे वरिष्ठ वकील सरपोतदार यांनी वकीलपत्र दाखल करून कैफियत दाखल केली. त्यामध्ये दाव्यातील सर्व कथने नाकारली व दावा खर्चासह फेटाळावा अशी विनंती केली. दोन्ही पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि कथने यांचा विचार केला. न्यायालयाने वादाचे मुद्दे निश्चित केले. दोन्ही बाजूंचे साक्षी-पुरावे नोंदवले गेले. कागदपत्रांची छाननी करण्यात आली. दोन्ही वकिलांनी युक्तिवादात आपापल्या पक्षांची बाजू मांडली. कुलकर्णी वकिलांच्या मते, सदर अपघाती मृत्यू घडण्यास सर्वस्वी वीज मंडळ जबाबदार आहे. विजेची तार तुटल्यानंतर आपोआप विद्युत पुरवठा बंद होण्याची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.
याउलट, सरपोतदार वकिलांनी युक्तिवाद करताना प्रतिपादन केले, की ही नैसर्गिक आपत्ती आहे, वीज मंडळाचा कोणताही निष्काळजीपणा या घटनेमध्ये नाही.
श्रीपती व सर्जा यांचे मृत्यू विजेच्या धक्क्याने झाले हे सिद्ध करण्यासाठी पंचनामे आणि शवविच्छेदन अहवाल हे कागदोपत्री पुरेसे होते. न्यायाधीशांनी पुराव्यांची बारकाईने तपासणी केली. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा अभ्यास केला. सदरचे प्रकरण हे विजेच्या धक्क्यामुळे ‘अपघाती मृत्यूचे’ आहे. यामध्ये वीज मंडळावर फार मोठी जबाबदारी आहे. विद्युत पुरवठा ही भयकारक व अपायकारक सेवा आहे. नागरिकांची व प्राण्यांची सुरक्षा करणे ही वीज मंडळाची जबाबदारी (strict liability) आहे. विजेची तार तुटल्यानंतर वीज पुरवठा चालू राहिला, पुरवठा बंद करण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, त्यामुळे वीज मंडळास सदरची घटना ही नैसर्गिक किंवा दैवी आपत्ती (act of god) असा बचाव घेता येणार नाही असे निरीक्षण करून न्यायाधीशांनी सोजराबाईचा दावा मंजूर केला. वीज मंडळाने तिला २५ लाख रुपये द्यावेत असा आदेश देण्यात आला.
या दुर्दैवी अपघातामुळे सोजराबाईंनी आपला धनी त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्य असल्यासारखा सर्जा बैल गमावले होते. तिच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. एक प्रकारे तिच्यावर दैव रुसले होते; परंतु न्यायालयाने तिचा दावा मंजूर करून तिच्या दुःखावर काही प्रमाणात फुंकर मारली होती. वीज महामंडळानेदेखील तिचा सहानुभूतिपूर्वक विचार करून वरिष्ठ कोर्टात अपील दाखल न करता किंवा दरखास्तीची वाट न पाहता नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली. अशा प्रकारे तिच्यावर रुसलेले नशीब आता हसले होते.
