संपादकीय : ती गोळी आज मारली गेली असती तर?

Image of

 माल्कम ग्लॅडवेल हे लेखक अमेरिकेत खूप लोकप्रिय आहेत.  एखाद्या सामाजिक प्रश्नाची सहसा आपल्याला न जाणवणारी एखादी बाजू समोर आणून त्यावर आपण विचार करणे आणि वाचकाला विचार करायला भाग पाडणे ही त्यांची खासियत.  त्यांची प्रज्ञा अवकाशात त्यांना हवी तशी विहार करते आणि त्यातून अनेक नवनव्या शक्यता निर्माण होतात.  त्यांच्या प्रज्ञेच्या असाधारण भरारीचे असेच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत स्वयंचलित शस्त्रांच्या अनिर्बंध वापराने होणारा हिंसाचार व त्याचे परिणाम याबद्दलचे त्यांचे चिंतन. अमेरिकेत स्वयंचलित (ऑटोमॅटिक) किंवा अर्ध-स्वयंचलित (सेमी-ऑटोमॅटिक) शस्त्रांचा अनिर्बंध वापर हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. यामुळे  मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अमेरिकेत दररोज सुमारे १०० लोक बंदुकीच्या हिंसेत मरण पावतात. यात सामूहिक गोळीबाराच्या (Mass Shootings) घटनांचा मोठा वाटा असतो. अमेरिकेत अध्यक्षीय व इतर निवडणुकांत बंदुकांच्या अनिर्बंध वापरावर कायद्याने बंधन घालणे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.  त्यामुळे बंदूकजन्य हिंसाचार कमी होतोय असे दाखवण्यात काही राजकीय प्रणालींचा रस असतो. अशा प्रकारच्या काही आकड्यांची चिकित्सा माल्कम यांनी  केली आहे.  हिंसाचार म्हणजे मृत्यू  आणि एकंदरीत बंदुकीमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या म्हणजे त्या हिंसाचाराची तीव्रता मोजण्याची पट्टी या सरधोपट  निकषाला माल्कम  यांनी विरोध केला आहे. हिंसाचाराचे प्रमाण तेच आहे; मृत्यूंची संख्या कमी होण्यामागे वैद्यकीय प्रगतीचा वाटा आहे असा त्यांचा सिद्धांत आहे.  

   अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीतील एक महत्त्वाचे उमेदवार रॉबर्ट केनेडी यांची १९६८ मध्ये एका मारेकऱ्याच्या गोळीने हत्या केली. जर त्यांना आज गोळी मारली असती तर ते जगले असते का? या प्रश्नाचा अर्थ असा आहे, की आज अमेरिकेत ज्या प्रतीच्या व दर्जाच्या वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध आहेत तशा १९६८ साली उपलब्ध असत्या तर रॉबर्ट केनेडी यांचा जीव वाचू शकला असता का?  त्या  हल्ल्याच्या प्रयत्नातून ते वाचले असते तर ते अध्यक्ष झाले असते का? आणि त्याचा अमेरिकेच्या इतिहासावर काय परिणाम झाला असता हा आणखी एका चिंतनाचा  भाग होऊ शकेल. ग्लॅडवेल हे या ठिकाणी अमेरिकेत स्वयंचलित हत्यारे बाळगण्यासाठी असलेले  अतिशय ढिसाळ कायदे, त्यामुळे अमेरिकाभर असणारा बंदुकांचा सुळसुळाट आणि त्यातून होणारा हिंसाचार याचा विचार करत आहेत. बंदुकांच्या वापरामुळे होणाऱ्या हिंसाचाराचा विचार करत असताना ते एक वेगळाच मुद्दा घेऊन पुढे येत आहेत.  अशा प्रकारे हिंसाचाराचे बळी पडलेल्या लोकांवर उपचार कसे होतात, ते कोण करतात व त्यासाठीची यंत्रणा कशी कार्यरत असते आणि या यंत्रणेच्या कार्यक्षमतेत गेल्या काही दशकांमध्ये किती व कशी सुधारणा झाली आहे याबद्दल त्यांनी एक पॉडकास्ट  केला आहे. हा  पॉडकास्ट मुख्यतः बंदुकांचा( अनिर्बंध)  वापर या विषयाला वाहिलेला आहे.  अमेरिकेत सध्या जखमी रुग्णांना तातडीचे उपचार देण्याची काय व कशी व्यवस्था आहे ते पहिल्यांदा पाहू या. 

अमेरिकेत ट्रॉमा केअरची (तातडी उपचार केंद्र )  रचना श्रेणीबद्ध प्रणालीमध्ये केली आहे.  ट्रॉमा सेंटर्सना ‘लेव्हल I’ ते ‘V’ पर्यंत वर्गीकृत केले आहे. प्रत्येक स्तरावर  वेगवेगळ्या पातळींवरील उपचार होतात. त्या ठिकाणी त्यांच्या वर्गीकरणानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ आणि साधनसामग्री  उपलब्ध असते. ‘लेव्हल I’ केंद्रे – जी बऱ्याचदा विद्यापीठांशी संलग्न असतात – ती सर्वात व्यापक उपचार सुविधा देतात.  याउलट, ‘लेव्हल V’ केंद्रे रुग्णाला स्थिर करण्यावर आणि उच्च-स्तरीय सुविधांमध्ये सुखरूप पाठवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ही प्रणाली जखमी रुग्णांना वेळेवर आणि योग्य काळजी मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण आहे – विशेषतः अशा भागांमध्ये जिथे मोठ्या ट्रॉमा सेंटर्सपर्यंत पोहोचण्यासाठी खूप  वेळ लागतो.

   वैद्यकशास्त्राचा एक सर्वसाधारण नियम असा आहे, की एखाद्या  प्रकारच्या आजारावर किंवा जखमेवर उपचार करण्याचा तुमचा अनुभव जितका वाढत जातो तितका तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचे कौशल्य वाढते आणि तुमच्या उपचारांना यश येण्याचे प्रमाणही वाढते.  तंत्रज्ञान व उपचार पद्धती व उपचार तंत्र यांतदेखील कालानुरूप अधिकाधिक सुधारणा होत जातात. आपण या विषयाच्या संदर्भात  अमेरिकेत गोळीबारातून झालेल्या जखमा आणि त्यांचे उपचार याकडे जास्त लक्ष देणार आहोत. अमेरिकेत गोळीबार जखमांवर उपचार करणाऱ्या शल्यचिकित्सकांच्या प्रत्येक पिढीला कमीत कमी एक युद्ध पाहायला मिळाले व त्यातून खूप वेगवेगळे  अनुभव मिळाले. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, कोरिया, व्हिएतनाम, इराक पहिले, इराक दुसरे, अफगाणिस्तान ही अशा काही युद्धांची ठळक उदाहरणे. 

     अमेरिकेतल्या अनेक मोठ्या शहरांतील गुन्ह्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर बऱ्याचशा शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या  खुनांची  संख्या निम्म्यावर आल्याचे चित्र दिसते. ही शहरे अधिकाधिक सुरक्षित होत आहेत याचे हे चिन्ह आहे असे प्रथमदर्शनी वाटू शकते. ग्लॅडवेल यांचे याबाबत एकदम वेगळे प्रतिपादन आहे.  एखाद्या शहरातील खून होण्याचा वार्षिक दर हा प्राणघातक हल्ल्यांची संख्या आणि अशा हल्ल्यात सापडलेल्या लोकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाचवणाऱ्या  डॉक्टरांचे प्रयत्न यांचा एकत्रित विचार करून मगच ठरला पाहिजे.  तात्पर्य आकडेवारीत प्राणघातक हल्ल्यांची संख्या हा महत्त्वाचा निकष आहे.  हे हल्ले कदाचित पूर्वीच्याच  संख्येने होत आहेत; परंतु डॉक्टर मंडळी जखमी लोकांना वाचवण्यात अधिकाधिक यशस्वी होत आहेत. त्यामुळे वरकरणी,  बंदुका वापरून  होणारे मृत्यू   कमी होताना दिसले; तरी हे चित्र काहीसे फसवे आहे असा त्यांचा मुद्दा आहे  आणि तो विचार करण्याजोगा आहे हे निश्चित !  

         बंदुकांचा वापर करून राजकीय पुढाऱ्यांवरती गोळीबार करणे हे इतर देशांपेक्षा अमेरिकेत जास्त आढळते.  अशा प्रकारे हल्ला झालेल्या  अमेरिकन अध्यक्षांमध्ये  अब्राहम लिंकन, रूसवेल्ट  जेम्स गेटफील्ड, विल्यम मॅककिन्ले, जॉन केनेडी,  रोनाल्ड रेगन आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. यांतले जेम्स गेटफील्ड, विल्यम मॅककिन्ले हे दोन राष्ट्राध्यक्ष  – त्यांच्यावर आजच्या तारखेला गोळी चालवली गेली असती व त्याच प्रकारच्या जखमा झाल्या असत्या तर आज होणाऱ्या उपचारांच्या जोरावर ते वाचू शकले असते असा ग्लाडवेल यांचा निष्कर्ष आहे. 

         भारतीय संदर्भात या सर्व विषयाचा जर विचार करायला गेलो तर दोन गोष्टी दिसतात : भारतात  हल्ली अमेरिकेच्या धर्तीवर  ट्रॉमा सेंटर्स  चालवली जात आहेत.  त्याचे दोन-तीन स्तरही आहेत; परंतु या  केंद्रांमुळे वेळेवर उपचार मिळून कोणाचे प्राण वाचू शकले आहेत असे निदान माझ्या वाचनात तरी नाही.  मोठी हॉस्पिटल्स – मग ती  खासगी असो की सरकारी – त्यांतच अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या जखमांचे उपचार होतात असे सर्वसाधारणपणे भारतातले चित्र आहे. भारतात राजकीय हिंसाचाराच्या तीन मोठ्या घटना आपल्याला माहीत आहेत.  महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी.  आज उपलब्ध असलेले उपचार त्या काळात उपलब्ध असते तर यांतील एखाद्या मान्यवराचा जीव वाचू शकला असता का?  ज्या प्रकारच्या जखमा या तिन्ही व्यक्तींना झाल्या होत्या त्या पाहता या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. 

        ग्लॅडवेल  यांना हा प्रश्न बंदुकांच्या अंधाधुंद  वापरामुळे अमेरिकेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करताना पडलेला आहे.  अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये फक्त आकडेवारी पाहिली तर एका वर्षात होणाऱ्या खुनांची  संख्या कमी-कमी होते आहे असे दिसेल;  परंतु ही आकडेवारी फसवी आहे.  गोळीबारानंतर होणाऱ्या  मृत्यूंची संख्या कमी होण्यात उत्तम व वेळेवर मिळणारे  वैद्यकीय उपचार खूप महत्त्वाचे आहेत.  बंदूकजन्य हिंसाचार व त्याची तीव्रता ठरवण्यासाठी या घटनांमध्ये झालेले मृत्यू न   लक्षात घेता अशा प्रकारच्या एकंदरीत घटनांची एकूण संख्या विचारात घेतली गेली पाहिजे हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त गोळीबारात झालेले मृत्यू विचारात घेतले तर बंदूकजन्य हिंसाचारावर  नियंत्रण मिळवल्याची फसवी समजूत होऊ शकते हे त्यांचे सांगणे आहे.

माल्कम ग्लॅडवेल

Author

Leave a Reply