झुकझुक आगीनगाडी :  लेख क्र.६ 

Image of

माझे सोलापूर आणि रेल्वे

आता तांत्रिकदृष्ट्या मी बराच सक्षम झालो होतो. एक उत्तम संकेत आणि दूरसंचार रेल्वे अभियंता म्हणून मी सरावलेला म्हणण्यापेक्षा, रेल्वेच्या प्रत्येक कामाला ‘रुळावलेला’ झालो होतो असे म्हणायला हरकत नाही.

कोणतेही काम सराव झाल्याखेरीज आणि आपल्याला काय-काय करायचे आहे व कसे करायचे आहे  याचे थोडक्यात पूर्वनियोजन असल्याशिवाय उत्तम पद्धतीने अमलात आणता येत नाही, मग ते क्षेत्र कोणतेही असो.

माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर आणखीन एक जबाबदारी टाकली. ते रजेवर किंवा ट्रेनिंगला गेले तर सोलापूर डिव्हिजनचा  सगळा कार्यभार मी बघायचा. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा कळून चुकले होते, की माझे वरिष्ठ रिटायर झाल्यानंतर येणारा नवीन निरीक्षक (Depot Incharge) सोलापुरीच आहे. त्यामुळे तेसुद्धा आता व्यवस्थित सहकार्य करत होते.

केंद्र सरकारच्या सेवेमध्ये प्रांतवाद, भाषावाद खूप असतो. अर्थात ते साहजिकच आहे म्हणा, आपला प्रांत आणि आपली भाषा सोडून वेगळ्या प्रांतातील वेगळ्या भाषिक लोकांबरोबर जुळवून घेण्याचे काम जरा किचकटच होते. पण त्याबाबतीत मी जरा नशीबवान ठरलो. सोलापूर डिव्हिजन मिळाल्यामुळे मला माझाच प्रांत आणि माझीच भाषा मिळाली. वेगळ्या भाषेशी जुळवून घेण्याचा माझा फारसा संबंध जबलपूर डिव्हिजन इतका आला नाही. सोलापुरात बोटावर मोजता येतील इतके लोक वगळता बाकी सगळेच मराठी होते. पण काही कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा इगो होता. माझ्यावाचून काम अडते, ही बाब त्यांना प्रचंड सुखावणारी होती. पण हा पायंडा मी मोडीत काढला. चतुर्थ श्रेणीपासून ते माझ्याबरोबरचे आणि कनिष्ठ कर्मचारी – सगळ्यांना मी त्यांच्या ‘Duty’ नमूद सगळी कामे शिकवलीसुद्धा आणि त्या प्रमाणे करायलादेखील लावली. त्यामुळे सर्वजण आनंदाने सहभागी होऊन कामे करू लागले. त्यांच्यामध्ये आपण विभागीय परीक्षा पास होऊन तंत्रज्ञ होऊ अशी आशा जागृत झाली. काही जणांनी त्या दृष्टीने प्रयत्नदेखील सुरू केले.

माझे वरिष्ठ एकदा माझ्यावर सगळा कार्यभार सोपवून दीर्घकालीन रजेवर गेले असताना एक कर्मचारी कार्यरत असताना मयत झाला. त्याचे पेंशन प्रकरण माझ्याकडे आले. मी सोपस्कार आटपून लेखा (Accounts) विभागाकडे पाठवले. २-३ महिन्यांनी एक स्त्री येऊन माझ्या वरिष्ठांशी भांडू लागली. तिचा असा दावा होता, की तिला अजून निवृत्तिवेतन मिळाले नाही. मला वरिष्ठांनी बोलावून घेतले, कारण हे प्रकरण मीच त्यांच्या गैरहजेरीत लेखाविभागाकडे पाठवले होते. शहानिशा केल्यावर लक्षात आले की मयत कर्मचाऱ्याची ही खरी पत्नी होती आणि मी प्रकरण पाठवले होते ते त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे होते. माझ्या वरिष्ठांनी माझ्याकडे भुवया उंचावून पाहिले आणि मला म्हणाले, “हेमंतसाहब, आप ने मृत कर्मचारी की पत्नी को देखा था क्या? आप को उनके परिवार के बारे में कुछ भी पता था क्या?” मी उत्तरलो, “नाही.” “आपल्याला कर्मचाऱ्याच्या कुटुंबाबद्दल काही ठोस माहिती असेल तर बिनधास्त सह्या करा, नाहीतर अशा वेळी आपण हे प्रकरण कल्याण (Welfare) विभागाकडे पाठवावे. तो विभाग सगळी शहानिशा करेल आणि आपल्याकडे सह्यांसाठी परत पाठवेल अशी प्रोसेस आहे. आता तुम्हीच निस्तरा हा उपद्व्याप,” असे बोलून ते प्रकरण मग मलाच निस्तरण्यास सांगितले. त्यामुळे मला खूप माहिती, नियमातील खाचा-खोचा कळायला लागल्या  आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्या खऱ्या पत्नीला निवृत्तिवेतन चालू झाले. नंतर ते प्रकरण कोर्टात गेले. रेल्वेच्या कागदोपत्री जी पत्नी होती तिलाच पत्नीचा दर्जा दिला गेला. नंतर कळले, की त्या दुसऱ्या पत्नीचा कोणीतरी लांबचा नातेवाईक, तिला सल्ले देणारा माणूस हा रेल्वेतच होता. निवृत्तिवेतनाचे पेपर्स त्यानेच भरले होते आणि माझ्या अज्ञानाचा फायदा घेतला.

रेल्वेची प्रशासकीय बाजू सांभाळणेदेखील अवघड काम आहे याची मला जाणीव झाली आणि इतके नियम का बनवले हे मला समजले. कारण माझ्या एका सहीमुळे आणि छोट्याशा अज्ञानाचा त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीस चांगलाच मनस्ताप झाला होता; कारण तिला सवत आहे हे तिलापण तेव्हाच कळले होते.

या प्रसंगानंतर मला यंत्रे/उपकरणे हाताळण्यापेक्षा कर्मचारी हाताळणे अवघड असते हे कळून चुकले होते.

या प्रसंगामुळे मी तांत्रिक पुस्तकांबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियमावली इत्यादी पुस्तकेही वाचू लागलो. तसेच Retiring Rules देखील ‘मीपण कधीतरी रिटायर होईन’ या स्वार्थी वृत्तीने वाचून घेतले. ह्याचा मला अलीकडे रिटायर होताना खूप फायदा झाला. बरेच लोक मला तांत्रिक शंकेबरोबरच इतरही रजेचे नियम/शिक्षा (Punishments) आणि त्यातून सोडवणूक याबद्दल विचारणा करू लागले. यामुळे माझे क्षेत्र खूपच विस्तारले गेले.

या प्रसंगादरम्यान माझा इतर विभागांच्या वरिष्ठांशीसुद्धा संपर्क आला. त्यांनी त्यांच्या अनुभवांतील काही किस्से मला सांगितले.

एका दाक्षिणात्य रेल्वे कर्मचाऱ्याने सोलापुरात खूप देणी करून ठेवली होती. तो खूप कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे सावकार लोक देणी मागण्यास ऑफिसमध्ये येत. प्रसंगी त्याला मारायलासुद्धा येत. म्हणून तो कर्मचारी त्याच्या मूळ गावी गेला. २-३ महिन्यांनी ऑफिसला Telegram आला की सदर कर्मचारी मयत झाला आहे. शहानिशा करण्यासाठी संबंधित विभागाची टीम त्याच्या गावी जाऊन आली आणि हे सर्व खरे आहे, कर्मचारी मृत झाला आहे आणि त्याचे Death Certificate ग्राह्य धरले गेले आणि अनुकंपा तत्त्वावर त्याच्या अपत्याला भरती केले गेले. त्याची सर्व देणी संपली  आणि सगळे सावकार हातावर हात ठेऊन बसले. अंदर की बात म्हणजे तो कर्मचारी ७ वर्षांनी त्याच्या मूळ गावी खरा मृत झाला. स्वतःच्याच मृत्यूचा बनाव घडवून आणणे आणि रेल्वेला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणे आणि विशेष म्हणजे सदर बनाव पकडला न जाणे याकरिता कमालीचे कसब व धैर्य लागते ते त्या कर्मचाऱ्याने दाखवले. ‘शेवटी पकडला गेला तरच चोर म्हटले जाते.’ त्या सात वर्षांत तो सोलापुरात फिरकलासुद्धा नाही. त्याला सल्ला देणारे सल्लागार संबंधित विभागाचेच होते.

असाच आणखीन एक किस्सा. एक अतिशय गुणी कलाकार व्यसनाच्या आहारी गेला होता (गायक सैगलसारखी त्याला प्रत्येक वेळी काळी पाच – सोप्या भाषेत काळी पाच म्हणजे दारू – लागत असे). रेल्वेतील एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी (रेल सप्ताह) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला संगीताबद्दल मार्गदर्शन केल्यामुळे त्याचा राग त्याला अनावर झाला, म्हणून कार्यक्रम संपल्यावर त्या कलाकाराने त्या अधिकाऱ्याचा अगदी अर्वाच्य भाषेत पाणउतारा केला. कारण हा कलाकार त्या वेळेस ब्रह्मलीन झाला होता. त्या अधिकाऱ्याने लगेच कार्यरत डॉक्टरला फोन केला आणि त्या कलाकाराची अमली पदार्थाची परीक्षा घेण्यास सांगितले, जेणेकरून त्याच्यावर कारवाई करता येईल. पण दुसऱ्या दिवशी तो रिपोर्ट नॉर्मल आला. आता रिपोर्ट नॉर्मल कसा आणि का आला हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. कलाकार त्याची कलाकारी योग्य ठिकाणी वापरून स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी झाला होता.

रेल सप्ताह का आणि केव्हा साजरा केला जातो हे पुढील दृकश्राव्यावरून कळेल:

Author

Leave a Reply