पुनरपि जननं : प्रकरण सहावे

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण सहावे .

 – संपादक

पुनरपि जननं

प्रकरण सहावे

निरोप

अमर आपल्या खुर्चीत मागे रेलून बसला आणि त्याने शक्तिपेयाचा एक घोट घेतला. आज बऱ्याच दिवसांनी त्याला जरा निवांत वेळ मिळाला होता. पृथ्वी प्रकल्पाच्या केंद्रवर्ती मंडळाचा सदस्य असणं दमवून टाकणारं होतं. आण्विक जीवशास्त्राच्या सगळ्या गटांच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्याची होती. त्याचा बहुतेक वेळ आवारातील प्रचंड आण्विक जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत जात असे. कधीकधी त्याला वेगवेगळ्या गटांचे प्रस्ताव ऐकायचे असत; तर महिन्यातून एकदा एकूण प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढच्या महिन्यातील कामाचा आढावा आखण्यासाठी केंद्रीय मंडळाची साल्चर विंडार बरोबर बैठक होई.

पण आता प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. पृथ्वीवर करायच्या प्रयोगांचा आराखडा तयार झाला होता. आता तो थोड्या दिवसांसाठी विश्रांती घेऊ शकणार होता.

कामातून थोडी विश्रांती घेण्याची गरज आहे हे त्याला ठाऊक होते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील घडामोडी होत होत्या. कुटुंबातील व्यक्तींना निरोप देण्याची वेळ झाली होती. त्यासाठी आणि आयुष्याच्या नवीन घडीचा सराव करण्यासाठी त्याला मोकळा वेळ हवा होता. गेल्या आठवड्यात त्याचा मुलगा जयंत पंधरा वर्षांचा झाला होता. थोड्याच दिवसांत तो अकादमीत जाण्यासाठी निघणार होता आणि त्याचबरोबर जयंतच्या आईशी झालेला त्याचा पालक करार संपुष्टात येणार होता. 

अमर विचारात गढून गेला. गेली पंधरा वर्षं तो कुटुंबातील जीवन जगत होता. वीस वर्षांपूर्वी कोणत्यातरी कार्यक्रमात त्याची आणि नताशाची भेट झाली होती. त्यांनी काही वर्षं नियमितपणे डेटिंग केलं होतं आणि मग तिने कुटुंब वसवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमरने आनंदाने होकार दिला होता. नताशाबरोबर पालक करार करण्याची कल्पना त्याला आवडली होती. त्यातून निर्माण होणारी आपुलकी त्याला भावली होती.

ते दोघेही मग नव्या घरात राहायला गेले होते. जास्त वेळ घरी राहता यावं यासाठी त्यांनी आपापल्या कामाचं वेळापत्रक बदलून घेतलं होतं आणि मग जोडीने राहण्याची सवय झाल्यावर त्यांनी मुलं तयार करणाऱ्या एका संस्थेत नाव नोंदवलं होतं. ज्या दिवशी ते आपल्या बाळाला घरी घेऊन आले तो अमरच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. त्या दिवसापासून त्या रुप्याच्या कांतीच्या इवल्याशा बाळाने त्यांच्या आयुष्याचा ताबा घेतला होता.

जयंत खूप हुशार निपजला होता. नवीन नवीन गोष्टी शिकत त्याला वाढताना पाहून अमरला मिळालेलं समाधान अद्वितीय होतं. त्याच्याचप्रमाणे त्याच्या मुलालादेखील आण्विक जीवशास्त्रात रस होता. अकादमीत गेल्यावर तो बहुतेक त्या विषयात निष्णात होईल, असं अमरला वाटत होतं. प्राचीन संस्कृतींविषयीदेखील त्याला कुतूहल होतं. त्याच्या शिक्षणाच्या ज्ञानभांडारातून त्याने साक्षात्कारपूर्व संस्कृतीबद्दल बरंच वाचलं होतं. 

नताशा सिएलो तलावाकाठच्या निएबो गावी जाणार होती. केंद्रावर्ती खजिनामंडळाची उपसंचालक म्हणून तिची नियुक्ती झाली होती. अमर अर्थातच पृथ्वी प्रकल्पावर काम करत राहणार होता. आणखी काही दिवस – कदाचित आणखी एक दोन वर्षं तरी – जोडीदार शोधण्याची आवश्यकता पडेल असं त्याला वाटत नव्हतं. कामापासून त्याला फुरसत कुठे होती? फार तर तो त्याच्या मित्राला – काईजाला अधून मधून भेटत जाईल – टेनिस खेळायला आणि त्याच्या कामाविषयी चर्चा करायला.

अमर अशा विचारांच्या साखळीत हरवून गेलेला असताना त्याच्या कामाच्या स्क्रीनवर एक संदेश झळकला. उद्या संध्याकाळी चार वाजता कुणा तारीक हुसेनसाठी शेवटचा निरोप समारंभ आयोजित केलेला होता. आर. एन. ए. प्रयोगशाळेच्या शेजारच्या बागेत समारंभ होता आणि अमरला निमंत्रण होते. शेवटच्या निरोप समारंभासाठी आपल्याला का बोलावले आहे याचा अमर विचार करू लागला. तारीक हुसेन हे त्याच्या कुठल्याच वयस्क नातेवाइकाचं नाव नव्हतं; किंबहुना त्या नावाची कोणी व्यक्ती त्याला आठवतसुद्धा नव्हती. 

त्याने तो संदेश पुन्हा वाचला आणि केंद्रवर्ती मंडळाच्या सगळ्याच सदस्यांना निमंत्रण होतं हे त्याच्या लक्षात आलं. इतर निमंत्रितांपैकी बहुतेक सगळेजण भौतिक खगोलशास्त्राच्या गटातले होते. त्याने पट्कन नावावरून तपास केला आणि तारीक हुसेन हा एक नावाजलेला भौतिक खगोलशास्त्रज्ञ होता हे वाचून त्याला आश्चर्य वाटलं. दहा वर्षांपूर्वी पृथ्वी प्रकल्पाच्या सुरुवातीलाच तो त्यात सामील झाला होता पण त्यानंतर पाच वर्षांनी त्याने प्रकल्पातून राजीनामा दिला होता. आता वयाच्या केवळ पंचाहत्तराव्या वर्षी तो आयुष्य संपवत होता हे एक नवलच होते. चला, निदान या विचित्र शास्त्रज्ञाविषयी आणखी जाणून घेण्यासाठी तरी निरोप समारंभाला गेलं पाहिजे असं अमरने ठरवलं. फ्रांस्का टोरी नावाच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या एका भौतिक खगोलशास्त्रज्ञाने समारंभाचं आयोजन केलेलं दिसत होतं.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता तारीक हुसेनच्या शेवटच्या निरोप-समारंभासाठी आर. एन. ए. प्रयोगशाळेच्या जवळ जमलेल्या समुदायात अमर सामील झाला. आर. एन. ए. प्रयोगशाळा आणि आण्विक जीवशास्त्राच्या माहिती केंद्राच्यामधील बागेचा एक भाग सुशोभित पुष्पचक्रे आणि स्वयंप्रकाशी झुडुपांनी सजवलेला होता. पृथ्वी प्रकल्पातील लोक आणि बाहेरचे काही पाहुणे अशी गर्दी तिथे जमली होती. काही दूरस्थ लोकही समारंभात सामील झाले होते आणि त्यांच्या होलोग्राफिक आकृत्या जमावात उजळलेल्या होत्या. प्राशनाच्या कारंज्यातून अमरने स्वतःसाठी एक पेय भरून घेतले आणि एका कोपऱ्यात उभा राहून तो गर्दीचे निरीक्षण करू लागला. उंच, रुबाबदार दिसणारा आणि सौम्य पण आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेला तारीक हुसेन त्याला लगेच ओळखू आला. काहीसा थकलेला आणि अलिप्त असा नक्कीच वाटत होता तो. तरी पण प्रत्येकाला भेटून काही ना काही संभाषण करत होता. त्याच्या जोडीदारालादेखील अमरने ओळखले. ती सुंदर आणि आकर्षक स्त्री कदाचित तारीकपेक्षा थोडी कमी वयाची असावी. त्याने तिला काही वेळा प्रयोगशाळेच्या आवारात पाहिलं होतं. ती फ्रांस्का टोरी असणार, अमरने अंदाज केला. ती दुःखी; पण शांत वाटत होती. किती वर्षं ते दोघे एकमेकांना ओळखत असतील? त्यांनी एकमेकांशी पालक करार केला असेल का? का आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची मैत्री झाली होती? तारीक एकाकी नक्कीच नव्हता. त्याच्या आवतीभोवती जमलेल्या गर्दीवरून तो  लोकप्रिय  असणार हे उघड होतं. 

एवढ्यात आण्विक गटातील एबिओला अमरजवळ आला. 

“तू ओळखतोस त्याला?” त्याने अमरला विचारलं.

“खरं म्हणजे नाही. पण तो पूर्वी प्रकल्पात होता. प्रकल्पात आल्यावर सोडून जाणारा तो एकमेव शास्त्रज्ञ आहे.”

“शेवटच्या निरोपासाठी तो काही तेवढा वयस्क नाहीये,” एबिओला म्हणाला. 

“हो ना! कोण जाणे त्याने हा निर्णय का घेतला!”

हे असे समारंभ किती विचित्र असतात, अमरच्या मनात विचार आला. आपल्याभोवती जमलेल्या लोकांना आपण पुन्हा कधीच पाहणार नाही हे जाणवून कसं वाटत असेल; पण कदाचित, जेव्हा मनुष्य शेवटच्या निरोपापर्यंत पोचतो, तेव्हा त्याचं काही वाटत नसावं.

थोड्या वेळाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून तारीक बोलू लागला. 

“मित्रांनो, मला शेवटचा निरोप देण्यासाठी आल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रेमामुळे मला भरून आलं आहे. माझ्या आयुष्याची शेवटची वर्षं मला माझ्या सर्वात आवडत्या साथीदाराबरोबर – फ्रांस्काबरोबर – घालवता आली हे माझं भाग्यच आहे. माझ्यावर अनेक वर्षं प्रेम केल्याबद्दल आणि मला सोबत केल्याबद्दल मी तिचा ऋणी आहे. अनेक वर्षांपूर्वी आम्ही पालक करार केला होता आणि आम्ही आमच्या मुलाला – फारुकला – लहानाचं मोठं केलं. आज फारुक इथे त्याच्या मुलाबरोबर आणि त्याच्या मुलाच्या आईबरोबर आला आहे. शेवटच्या भेटीसाठी तू इथे आलास त्याबद्दल धन्यवाद फारुक! तुमच्यापैकी अनेकांनी आज मला विचारलं, की मी इतक्या लवकर का जातो आहे. खरं सांगायचं तर मला उत्तर माहीत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे, की आता वेळ झाली आहे. मी पृथ्वीप्रकल्प सोडला याचंदेखील अनेकांना आश्चर्य वाटतं. प्रकल्पाच्या सुरुवातीला त्याच्याशी जोडला जाऊन नंतर प्रकल्प सोडून देणारा असा फक्त मीच आहे. पण मित्रांनो,  विशेषतः आमचा आदरणीय नेता साल्चर विंडार याला मी सांगू इच्छितो, की मी जेव्हा प्रकल्पात रुजू झालो तेव्हा माझा खरंच या प्रकल्पावर विश्वास होता आणि काही अंशी अजूनही आहे; पण प्रकल्पावर काम करायला लागून तीन वर्षं झाल्यावर, मी करत असलेल्या प्रयोगांमधील माझा रस कमी झाला. आपण पृथ्वीवर परत गेलो काय किंवा नाही काय, त्याने फार काही फरक पडेल असं मला वाटेनासं झालं. मी तसाच आणखी दोन वर्षं काम करत राहिलो आणि मग माझ्या लक्षात आलं की माझा एकूण आयुष्यातीलच रस संपत चालला आहे. 

हे खरं विचित्रच होतं; कारण मी तेव्हा अत्यंत सुस्थितीत होतो. मी पुन्हा फ्रांस्काबरोबर राहायला लागलो होतो, आपल्या ग्रहावरील सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञांबरोबर मी काम करत होतो आणि सर्वात लोकप्रिय अशा प्रकल्पावर काम करत होतो; पण मला वाटतं, आयुष्य जेव्हा संपत येतं, तेव्हा तुम्ही काय करत आहात याला फारसं महत्त्व उरत नाही. आता जाण्याची वेळ झाली एवढंच फक्त तुम्हांला समजतं. 

मी प्रकल्प सोडून आयुष्यावर विचार करण्यात काही वर्षं घालवायची असं ठरवलं. मी लोकांचं आणि निसर्गाचं निरीक्षण करू लागलो आणि आजपर्यंत मनुष्य जितकी युगं जगत आला आहे त्यावर विचार करू लागलो. हळूहळू माझ्या मनात एक प्रकारची शांती पसरली. माझ्या मनात येणारे विचार कमी कमी होत गेले. आता माझ्या मनात फक्त एक शून्य, शांतीचा एक निराकार समुद्र भरून आहे. कधीकधी एखादा जुना मित्र कुठेतरी जाताजाता भेटायला येतो किंवा माझ्या मुलाचं कुटुंब भेटायला येतं तेव्हा त्यावर एखादा तरंग उठतो; पण मग थोड्या वेळाने मन पुन्हा निर्विकार होऊन जातं. मुद्दाम एखाद्या विचाराचा पाठपुरावा करावा किंवा काहीतरी काम करावं अशी इच्छा उरत नाही… 

आणि मित्रांनो, मला असं वाटतं की निघून जाण्यासाठी हीच अवस्था उत्तम आहे. मन विरघळून जाण्यापूर्वी! स्वतःची ओळख हरवण्यापूर्वी! परवा दिवशी इच्छामरण घेण्यासाठी मी नाव नोंदवलं आहे. फ्रांस्काच्या परवानगीने मी माझं व्यक्तिमत्त्व डाउनलोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हां सर्वांना तुमच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा इतक्या सुंदर रितीने मला शेवटचा निरोप दिल्याबद्दल तुम्हां सर्वांचे आभार मानतो.”

अमर दुरून पाहत होता. फ्रांस्काने तारीकला आलिंगन दिलं, त्याच्या मुलाच्या कुटुंबातील लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. आलेले पाहुणे अभिवादन करून परतू लागले. ते शांतपणे काही पावलं चालत होते आणि मग आकाशात भरारी घेत होते. अमर त्याच्या प्रयोगशाळेच्या दिशेने चालत निघाला, पण मग विचार बदलून त्याने घरी जायचं ठरवलं. त्याला उगाचच कसनुसं आणि उदास वाटत होतं. तारीक त्याचं आयुष्य जगत असताना त्यांची ओळख नव्हती तरी! 

—————————————————————————————————————-


आरुषीची आई सकाळचं पेय आरुषीच्या, तिच्या पपाच्या आणि स्वतःच्या ग्लासात ओतत बसली होती. तिचा चेहरा गंभीर होता आणि तिच्या मनातली चलबिचल तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. 

“काय झालं आई? तू एवढी दुःखी का दिसते आहेस?”  तिच्या चेहऱ्याकडे पाहत आरुषीने विचारलं. 

“मी ठीक आहे बिट्टू!”

“तुला परत ते भयंकर स्वप्न पडलं का?” तिने काळजीने विचारलं.

“तुला कसं कळलं, “आईने आश्चर्याने विचारलं.

आरुषी खुर्चीवरून उठून आईजवळ गेली. आईच्या गळ्याभोवती हातांची मिठी घालून तिने हलकेच आईचा पापा घेतला. 

“मी इथेच तुझ्याजवळ आहे आई आणि आता मी मोठी झाले आहे. त्या वेड्या स्वप्नाची तू आता काळजी करू नकोस.”

“तुला आता आरुषी अकादमीला जाणार म्हणून काळजी वाटते आहे; म्हणून तुला भीतीची स्वप्नं पडताहेत,” पपा म्हणाला.

“मग आरुषी निघून जात आहे असं स्वप्न पडायला पाहिजे. ती माझी वाट बघत अंधारात थरथर कापत बसली आहे आणि मी जिवाच्या आकांताने तिच्यापाशी पोचण्यासाठी धावते आहे, असं स्वप्न नको पडायला. नेहमी तेच स्वप्न असतं आणि त्यातले तपशीलपण तेच असतात,” आई खेदाने मान हलवत म्हणाली.

“तुझ्या मनाने ते स्वप्न पाठ करून ठेवलं आहे,” पपा ते हसण्यावारी नेत म्हणाला.

“चल, बाहेर हवा बघ किती छान पडली आहे. आपण बाहेर जाऊन उन्ह खाऊ या. तुझं पेय लवकर संपव,” आईचा मूड बदलण्यासाठी आरुषी उत्साहाने म्हणाली. बाहेरच्या मोकळ्या वातावरणात आणि उन्हात आई आनंदी असते हे आरुषीला माहीत होतं.

तिघंही बाहेर बागेत आले आणि पंख पसरून उन्ह खाण्यासाठी गुडघे टेकून बसले. आईने आरुषीकडे पाहिलं. ती खरोखरच मोठी होत होती आणि एक चाणाक्ष, उत्साही आणि सगळ्या गोष्टींत रस असलेली व्यक्ती बनत होती आणि तरीही तिची संवेदनक्षमता अजून टिकून होती. अजूनही तिला आपल्या लेकीचं मन एखाद्या पुस्तकासारखं वाचता येत होतं. आईने डोळे मिटले आणि त्या ग्रहावरच्या सर्वात उत्तम मुलीचं मातृत्व तिला बहाल केल्याबद्दल तिने विश्वातील शक्तींचे आभार मानले. यापेक्षा अधिक तिने काही कधी मागितले नसते.

———————————————————————————————


जड पावलांनी फ्रांस्का घराच्या दारातून आत आली. आज काम संपल्यावर भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेपासून ते तिच्या कुटीपर्यंत ती पाय ओढत आली होती. तेवढं थोडं अंतरदेखील उडायला तिच्या पंखांत त्राण नव्हते आणि मनाची उभारी नव्हती. 

तिने कल्पना केली होती त्याहीपेक्षा घरात अधिक शांतता होती. या शांततेची आता तिला सवय करून घ्यावी लागणार होती. तारीक निघून गेल्यानंतरचा हा पहिलाच दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून ती कामावरून परतल्यावर तिला जरी तारीक गच्चीवरच्या त्याच्या खुर्चीत शांतपणे बसून राहिलेला दिसत असे, तरीपण रिकाम्या घरात परत येणं आणि शांतपणे बसून असलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीत घरी येणं यांत फरक होताच. तारीक आता कायमचा निघून गेला होता हे सत्य स्वीकारणं फार कठीण होतं. तो सहज अजून पंचवीस-तीस वर्षं जगू शकला असता. तिचंही वय जवळजवळ त्याच्या इतकंच होतं. पण तिला अजूनही शेवटाची काही चाहूल लागलेली नव्हती. अजून वीस वर्षं तरी आपण जगू हे तिला माहिती होतं. 

फ्रांस्का सावकाशपणे बैठकीजवळ आली आणि एका खुर्चीत बसली. कुठे गेला होता तारीक? त्याचं हुशार, मनमिळाऊ, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आता कुठं होतं? त्याचं शरीर विघटन करण्यासाठी सोडलं तेव्हा ती साक्षीला उभी होती, हे खरं… पण त्याचं मन कुठे होतं आता? त्याच्या शरीराबरोबरच त्याच्या मनाचंही विघटन झालं होतं का? का या विश्वात कुठेतरी ते विश्रांती घेत होतं? तिच्या स्वतःच्या मनाशी एकरूप असलेली एक निराकार शक्ती होऊन राहिलं होतं? 

तारीकशिवाय आयुष्य कठीण होतं. फ्रांस्काला एकदम खूप एकाकी वाटू लागलं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिला समजलं आहे हे जेव्हा त्याला कळलं होतं तेव्हा त्याने तिचे हात हातांत घेतले होते ते तिला आठवलं. 

“मी गेल्यावर दुःख करू नको, फ्रांस्का! स्वतःची काळजी घे. तुला तुझं आयुष्य जगायचं आहे. एखादा जोडीदार शोध आणि आनंदात राहा,” तो म्हणाला होता. 

तारीकच्या मृत्यूनंतर तिला अनेक मित्रमैत्रिणींचे संदेश आले होते – तिचं सांत्वन करणारे आणि तिला मानसिक आधार देणारे. तिचा एक जुना प्रियकर स्टीव्ह याने तिच्याबरोबर येऊन राहण्याची तयारी दाखवली होती. कामातून निवृत्ती घेऊन फारुकच्या घराजवळ कुठेतरी जाऊन राहण्याचा पर्यायदेखील तिच्याकडे होताच; पण ते शहाणपणाचं झालं नसतं. 

साक्षात्कारपूर्व जगात लोक प्रियजनांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कसे सावरत असतील, फ्रांस्काच्या मनात विचार आला. दीर्घ आजारानंतर होणारे मृत्यू वगळता, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक होणाऱ्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागत असणार. लोक तेव्हा आजारी पडून, अपघातात, हिंसेमुळे मरत असत… पूर्वसूचना न मिळता… बऱ्याचदा वेदना सहन करत. त्यांच्या मागे उरणारे त्या धक्क्यातून कसे सावरत असतील? रोजचं दैनंदिन आयुष्य जगताना एक दिवस अचानक काहीतरी भयंकर घडत असेल आणि आपल्या प्रिय व्यक्तीला वेदनेने तडफडत मरताना त्यांना पाहावे लागत असेल. किती भयानक असेल ते! त्या काळी मरेपर्यंत लोकांचं आरोग्य उत्तम राहत नसे. वय वाढल्यावर त्यांचं शरीर म्हातारं होत असे. त्यांची शक्ती कमी होऊन त्यांना आजार होत. जगणं जसजसं कठीण होऊ लागे तसतसे ते कदाचित मृत्यूची वाट पाहू लागत. अर्थात ते जर त्याआधीच तरुणपणीच मेले नाहीत तर! 

निदान आता आपल्याला कळतं आपलं शरीर कधी त्यागायचं ते. जेव्हा आयुष्य अर्थहीन होऊन जातं आणि मनाला कशातच रस वाटेनासा होतो, तेव्हा जाण्याचा निर्णय घेणं सोपं होतं आणि अर्थातच आता मृत्यू वेदनारहित असतो. एका हळुवार झोपेत शिरल्यासारखा, तुमच्या आवडीचं संगीत चालू असताना आणि तुमच्या पसंतीचं दृश्य परावर्तित केलेल्या दालनात, तुमच्या प्रिय व्यक्तीने तुमचा हात धरलेला असताना. निदान तारीक तरी असा गेला. काहीजण एकटे मरतात आणि कदाचित तेव्हा एकाकीदेखील असतात! पण कदाचित त्या क्षणी हे सर्व काहीच महत्त्वाचं नसतं. तुम्ही तुमच्या शरीराचा त्याग करायला तयार असता. त्या शरीराचं मग विघटन यंत्रात घालून विघटन केलं जातं आणि ते सृष्टीच्या मूलतत्त्वांत विलीन होतं.

खरा धोका असतो तो म्हणजे आयुष्य संपत आल्याच्या निश्चित खुणा ओळखता न येणं आणि मनाचं विघटन आधी होईपर्यंत थांबणं. मग शरीर निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून राहतं आणि अतिशय सावकाश त्याचं विघटन होतं. इच्छामृत्यूचा कायदा होण्यापूर्वी तसंच व्हायचं. प्राचीन काळी जो कायदा असाध्य रोग झालेल्या लोकांना दया म्हणून त्यांच्या जीवनाचा अंत करू देण्यासाठी होता किंवा नको असलेल्या लोकांना मारून टाकण्यासाठी ज्या कायद्याचा दुरुपयोग होत असे त्याच कायद्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. आजच्या आधुनिक जगात अर्थातच दया म्हणून कुणाला जीवन संपवण्याची परवानगी देण्याची गरज नव्हती आणि कोणी नको असलेली माणसेही नव्हती. कोणाही माणसाला दुसऱ्या माणसाला मारावं असं वाटूच कसं शकेल, फ्रांस्काच्या मनात विचार आला. मनुष्याच्या अंतःकरणात आता द्वेष उरलाच नव्हता. वाइटात वाईट जर काय होत असेल तर ते म्हणजे दुर्लक्ष सहन करायला लागणं. 

आपण लवकरच स्टीव्हला लिहावे, फ्रांस्काने विचार केला. स्टीव्ह शिक्षणतज्ज्ञ होता. लहान मुलांच्या ज्ञानभांडारासाठी तो सामग्री तयार करत असे. घरातल्या एका खोलीत बसूनच त्याचं काम चाले. पृथ्वीप्रकल्पाचं केंद्र असलेल्या मध्यवर्ती आण्विक जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत येऊन राहण्यास त्याला काहीच अडचण येणार नव्हती. 

तिला तारीकची आठवण येतच राहील. तीव्रतेने येत राहील;  पण आयुष्य तर जगायलाच हवं…

—————————————————————————————————————-

पावसाळा संपला होता आणि झेरुआ पर्वतावर एक सुरम्य सकाळ उगवली होती. केंद्रीय आण्विक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, त्यांचे जोडीदार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हिरवळीवर गुडघे टेकून, रवीच्या दिशेने आपले जांभळे पंख पसरून उन्ह खात बसलेले दिसत होते. दिवस वर चढल्यावर बहुतेकजण त्यांच्या त्यांच्या प्रयोगशाळांत जाऊन कामात गढून जातील. प्रयोग चालू राहतील, गणितं सोडवली जातील आणि आराखडे पक्के केले जातील. बैठका होतील आणि विचारांची देवाण घेवाण होईल. एकमेकांशी चर्चा करून आणखी योजना आखल्या जातील आणि विचारासाठी सादर केल्या जातील. 

सावकाश पण निश्चितपणे पृथ्वीप्रकल्प प्रगतीच्या मार्गावर होता. अवकाशातील प्रचंड अंतर पार करून जाईल, अवकाशाच्या आकुंचन प्रक्रियेत (स्पेस वार्प) प्रवेश करताना आणि त्यातून बाहेर पडताना ज्याची रचना अबाधित राहील, ज्याची अद्ययावत उपकरणं जुन्या सूर्यमालेत पोचल्यावर त्याची गती अनेक पटींनी कमी करतील आणि मानवाचे पिढीजात घर असलेल्या पृथ्वीवर, सूर्यमालेतील तिसऱ्या ग्रहावर जे नेमकेपणाने उतरेल असं अवकाशयान तयार करण्यात येत होतं. पृथ्वीवर उतरल्यावर तिथलं वर्षभर त्याला तिथल्या कठोर हवामानाला तोंड द्यायला लागणार होतं आणि मग तज्ज्ञांच्या साहाय्याशिवाय पुन्हा उड्डाण करायला सज्ज राहावं लागणार होतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण टाळून जुन्या सूर्यमालेतून बाहेर पडून अवकाशातील अंतर पुन्हा काटून रवीच्या तारामंडळात प्रवेश करून त्यात बसून गेलेल्या अंतराळवीरांना सुखरूपपणे स्वर्गावर परत घेऊन यायचं होतं.

या मोहिमेसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये केवळ अवकाशयानच नव्हतं; अवकाशयान हे जरी सर्वात मोठं आव्हान होतं तरी अभियांत्रिकी गटाला इतरही लहान सहान कामं वाटून दिलेली होती. पृथ्वीवर लागणारी घरं आणि प्रयोगशाळा यांचे आराखडे तयार करायचे होते. पृथ्वीवर जाणाऱ्या पंधरा ते वीस लोकांना तिथल्या अनियंत्रित वातावरणापासून संरक्षण लागणार होतं. तो मूळ ग्रह काही स्वर्गासारखा आरामशीर आणि यांत्रिकपणे सोईस्कर केलेला नव्हता. तो एक वन्यग्रह होता आणि अंतिम युद्धात वापरल्या गेलेल्या अण्वस्त्रांमुळे आणि रासायनिक अस्त्रांमुळे कदाचित आणखी रानटी झालेला होता. ग्रहविज्ञानाचे शास्त्रज्ञ पृथ्वीचे घटक आणि पृथ्वीच्या वातावरणातील सध्याचे बदल यांचा अभ्यास करत होते. पण पृथ्वीवर उतरणाऱ्या दलाला तिथे नेमक्या कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल हे दुसऱ्या तारामंडळात राहणाऱ्या शास्त्रज्ञांना कधीच खातरीने सांगता येणार नव्हतं आणि म्हणूनच, मजबूत पण आरामशीर घरांची योजना करणं हे प्रकल्पाचं एक महत्त्वाचं काम होतं. 

पृथ्वीवर जाणारं दल तिथे वर्षभर राहून प्रयोग करणार होतं आणि तिथले नमुने गोळा करणार होतं आणि त्यासाठी त्यांना चांगल्या प्रयोगशाळांची गरज भासणार होती. अंतराळयानातून नेता येतील अशी हलक्या वजनाची प्रयोगशाळेतील उपकरणं तयार करणं हेदेखील खगोल शास्त्रज्ञांना आणि अभियंत्यांना एक आव्हान होतं. 

पण सर्वात नाजूक काम होतं ते म्हणजे पृथ्वीवर उतरणाऱ्या दलासाठी सुरक्षात्मक फुगे तयार करणं. श्वासोच्छ्वास करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणारा आणि प्रकाशसंश्लेषणासाठी सूर्याचे किरण एकवटणारा फुगा दलातील प्रत्येक व्यक्तीला द्यावा लागणार होता. एका क्रूर युद्धात शेवटचे उरलेसुरले मानव नष्ट होऊन हजार वर्षं उलटून गेल्यावर आता पृथ्वीच्या वातावरणात कसले विषारी वायू आणि घातक किरणोत्सर्ग वाहत असतील कोण जाणे! त्या प्राचीन ग्रहावर फिरताना हे फुगे स्वर्गातून तिथे गेलेल्या प्रवाशांचे संरक्षण करतील. शिकारी जनावरं आणि झाडं यांच्यापासूनदेखील ते रक्षण करतील – समजा तिथे तसं काही असेल तर! फुग्यामुळे उडताना थोडा त्रास होईल हे खरं, पण फुग्याला गती देणारी वेगळीच यंत्रणा असेल. 

पृथ्वीच्या सद्यःस्थितीविषयी स्वर्गावरील शास्त्रज्ञांत मतभेद होता. काहींना वाटत होतं, की तो जुना ग्रह आता एक मृत, गंजलेला गोळा होता… जीवन जिथे टिकू शकणार नाही असे एक मृतप्राय जग होते ते… मनुष्याच्या मूर्खपणाच्या परिणामस्वरूप त्याची अशी दशा झालेली असावी. ज्या किरणोत्सर्गाच्या महापुराने अंतिम युद्धाचा शेवट झाला त्याने सर्व प्रकारांचे जीव कायमचे नष्ट करून टाकले असणार. या शास्त्रज्ञांना वाटत होतं, की पृथ्वीला भेट देणाऱ्या दलाला तिथे फक्त ओसाड खडक आणि वाळू दिसेल. त्यांचं नशीब बलवत्तर असेल तर खूप खोलवर खणल्यावर त्यांना काही जीवाश्म मिळतील आणि मग त्यांचं विश्लेषण करून अनेक युगांपूर्वी पृथ्वीवर जीवन कसं अवतरलं याबाबत काही निष्कर्ष काढता येतील. 

इतर शास्त्रज्ञांना वाटत होतं की पृथ्वीवर निर्माण झालेलं जीवन अनेक युगं चिकाटीने तगून राहिलं होतं. त्यामुळे अंतिम युद्धामुळे झालेल्या विनाशातून जे काही जीव वाचले असतील ते बदललेल्या वातावरणात जगण्यासाठी रूपांतरित झाले असतील. साल्चर याच शास्त्रज्ञांच्या गटात होता आणि तिथे जाणाऱ्या दलाला निदान पृथ्वीच्या काही भागांत तरी जीवनाचे विविध प्रकार आढळतील असा त्याला विश्वास वाटत होता 

आणि अर्थातच शास्त्रज्ञांचा एक मोठा गट पृथ्वीवर करण्याच्या प्रयोगांची आखणी करत होता. या गटाचं नेतृत्व स्वतः साल्चर करत होता. पृथ्वीवर उतरणारं दल तिथल्या आदिम जीवनाचे – बॅक्टेरिया, आरकिया आणि व्हायरस यांचे – नमुने गोळा करू शकेल अशी त्याला आशा होती. त्यांचं विश्लेषण करून जीवनाचं रहस्य उलगडता येईल असं त्याला वाटत होतं. 

स्वर्गावर जाईपर्यंत मानवाने या आदिम प्रकारच्या जीवाणूंमध्ये असलेली विविधता संपुष्टात आणली होती. मानवी जीवनासाठी तो ग्रह योग्य बनवण्याकरता स्वर्गावर जेव्हा अभियांत्रिकी बदल करण्यात आले होते तेव्हाच त्याच्या वातावरणातून सर्व प्रकाराचे जंतू नष्ट करण्यात आले होते. त्या ग्रहावर पोचणाऱ्या मानवांच्या पहिल्या तुकडीने अथक परिश्रम करून तो ग्रह मनुष्याला राहण्यासाठी अतिशय सुखकर असा केला होता. त्याच्या तिसऱ्या पिढीपर्यंत नको असलेले सर्व जीव नष्ट करण्यात आले होते. त्याच्याऐवजी माणसाला उपयुक्त असणाऱ्या किंवा त्या ग्रहाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांची जोपासना करण्यात आली होती. पृथ्वीवर मानवजात नष्ट होईपर्यंत ज्या जीवांच्या जनुकांची संरचना उलगडण्यात यश मिळालं नव्हतं त्यांचा उलगडा पृथ्वीबाहेरच्या मानवी वसाहतीतील शास्त्रज्ञांनी केव्हाच केला होता. त्यानंतर स्वर्गावरच्या शास्त्रज्ञांनी मृत्यूपर्यंत उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक कृत्रिम जीवाणूंची निर्मिती केली होती; पण हे कृत्रिम जीवाणू म्हणजे मुळातील जीवाणूंमध्ये बदल घडवून आणून तयार केलेल जीव होते… जीवनाचं रहस्य उलगडण्यात त्यांचा काही उपयोग नव्हता. 

साक्षात्कारी मानवाने नव्या उत्साहाने अवकाशात जीवनाचा शोध घेतला होता; पण खगोलशास्त्रात आणि तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती होऊनदेखील कुठेही जीवनाच्या खुणा सापडल्या नव्हत्या. पृथ्वी सोडून दहा शतकं उलटली होती आणि मानवाला आता अवकाशाविषयी फार मोठ्या प्रमाणात माहिती अवगत झाली होती. आकाशगंगा त्याला चांगली परिचित होती. ताऱ्यांच्या आणि ग्रहांच्या आयुष्याच्या चक्रांविषयी त्याला अचूक भाकीत करता येत होतं. कृष्णविवरासारखी काही कोडी जरी अजून शिल्लक असली तरी या विश्वाच्या घटकांविषयी ज्ञानाचा मोठा साठा आता मानवाकडे होता… पण जीवन हे अजूनही एक रहस्यच होतं. माणसाने जिथे जिथे शोध घेतला होता, तिथे सगळीकडे केवळ शांतता होती. अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर घडून आलेला तो विचित्र अपघात वगळता, जीवनाची – अगदी आदिम प्रकारच्या जीवनाचीदेखील – कोणतीही खूण विश्वात कुठेही सापडलेली नव्हती. 

—————————————————————————————————————-

अभ्यासाच्या स्क्रीनमध्ये गढून गेलेल्या आरुषीकडे आईने कौतुकाने पाहिलं. आरुषी आता एक चुणचुणीत किशोरवयीन मुलगी झाली होती. अभ्यासातून वेळ मिळाल्यावर ती संगीताचा रियाज करत बसे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीवर निर्माण झालेल्या आणि स्वर्गावरील मूठभर लोकांनाच अवगत असलेल्या प्राचीन संगीतात तिला रस होता. त्या संगीतात तिला रुची आहे हे लक्षात आल्यावर आईने तिला नादमुनींच्या एका शिष्याची शिकवणी लावली होती. 

त्याव्यतिरिक्त आरुषीचा बहुतेक वेळ उच्च शिक्षणासाठी अकादमीत जाण्यापूर्वी होणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यात जात होता. आणखी दोन वर्षांत तिचं ज्ञान आणि विश्लेषण करण्याची क्षमता तपासणारी ती परीक्षा द्यायला आरुषी तयार होणार होती. त्या परीक्षेच्या निकालावर तिच्या उच्च शिक्षणाची दिशा आणि कदाचित तिच्या करिअरची दिशा ठरणार होती. 

आरुषी सुरुवातीपासूनच हुशार होती. ती अगदी तान्हं बाळ असल्यापासून आईला हे जाणवलं होतं आणि आता जेव्हा तिचं प्राथमिक शिक्षण संपत आलं होतं, तेव्हा अकादमीत जाणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यापेक्षा तिला अधिक माहिती होती याचा आईला अभिमान वाटत होता. मानवाला ज्ञात असलेलं सर्व विषयांतलं केवळ प्राथमिक ज्ञान आरुषीने आत्मसात केलंच होतं; इतकंच नव्हे तर ती अनेक विषयांत अधिक खोलात जाऊन पारंगत झाली होती. पपाप्रमाणेच ती एक उत्तम कॉंप्युटेशनिस्ट होती. प्रचंड प्रमाणातील डाटाचं ती पट्कन आणि अचूकतेने विश्लेषण करायची. साक्षात्कारपूर्व इतिहासात तिला रुची असल्यामुळे जुन्या आणि वापरात नसलेल्या फाइल्समधूनदेखील तिला डाटा काढता येत असे. 

पण तिचा खरा आवडता विषय होता खगोलशास्त्र. तिला या विश्वाविषयी आणखी जाणून घ्यायचं होतं आणि अकादमीत गेल्यावर तोच मुख्य विषय घेण्याचं तिनं ठरवलं होतं. ही ताऱ्यांविषयीची आवड तिच्यात आपल्याकडूनच आली आहे असं आईला वाटायचं. ती छोटी असताना अनेक तास तिने ताऱ्यांचं निरीक्षण करण्यात घालवले होते आणि त्यामुळे प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आवड आणि आजूबाजूच्या क्षेत्राच्या पलीकडील विश्वासंबंधी कुतूहल तिच्या मनात तयार झालं होतं. तिच्या स्वतःच्या तरुणपणी तिला ज्या क्षेत्रात संशोधन करायला आवडलं असतं पण जो मार्ग तिने धुंडाळला नव्हता त्या क्षेत्रात आरुषीला पुढे जाता येईल या विचाराने आईला बरं वाटायचं. 

युद्धाने ग्रासलेली पृथ्वी सोडून इतरत्र वसाहत करण्याची क्षमता निर्माण करून ज्या सुविख्यात शास्त्रज्ञांनी मानवजात वाचवली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आरुषी पुढे जाईल. ती यशस्वी होईल याची आईला खातरी होती. ज्या बुद्धिमान लोकांनी दुसऱ्या ग्रहांवर संस्कृती उभारली होती आणि मानवी जीवन सुखाचं केलं होतं त्यांच्यासारखीच प्रतिभा आरुषीकडे आहे असं आईचं मत होतं. ज्या प्रतिभेने जुन्या काळातील मनुष्यांना साक्षात्काराचा मार्ग दाखवला आणि दुसऱ्या टप्प्याच्या (type II) संस्कृतीची उभारणी केली, ती प्रतिभा. 

आई शांतपणे आपल्या अभ्यासाच्या खोलीत येऊन बाकावर रेलून बसली आहे असं आरुषीने पाहिलं आणि आपला स्क्रीन बंद केला. संधिप्रकाशात बागेवरून उडत जाण्यासाठी आई तयार होईल अशी तिला आशा होती. दूर क्षितिजावर रवीचा अस्त होऊन आकाशात रंगांची उधळण होत असताना अंधारून येणाऱ्या बागेवर उडत चकरा मारायला माय-लेकींना आवडायचं. खाली झुडुपं हळूहळू प्रकाशमान होताना आणि तरंगणारे आकाशदिवे बागेवर गोळा होताना बघायला त्यांना आवडायचं.

पण आता आरुषीचा पडलेला चेहरा बघून आईने विचारलं, “काय झालं बिट्टू? तू उदास दिसते आहेस.”

“मी अखेरच्या युद्धाविषयी वाचत होते आणि मला फार वाईट वाटतं आहे. त्या वेळेस लोकांनी इतके अत्याचार केले, की मानवजात वाचली हेच नवल आहे.”

“हो, त्या काळाबद्दल वाचलं की खरंच वाईट वाटतं.”

“तुला माहिती आहे का आई, अखेरच्या युद्धाच्या बरंच आधी लोक धर्म नावाच्या कसल्यातरी मुद्द्यावरून युद्ध करायचे?”

“होय, बिट्टू. त्या प्राचीन काळी, विचारप्रणालीला फार महत्त्व होतं. एका विचारप्रणालीचे लोक दुसऱ्या विचारप्रणालीच्या लोकांशी भांडायचे. त्या पूर्वीच्या काळी, प्रत्येक स्त्री-पुरुषाला इतरांवर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असायची. त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटायचं किंवा सामर्थ्यशाली वाटायचं. कारण असं पहा, तेव्हा जीवन खूप असुरक्षित होतं. मग त्या प्राचीन काळाच्या साधारण पंचविसाव्या शतकात, पृथ्वीची नैसर्गिक संपत्ती आटू लागली. आधी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आणि मग अन्नाचा. ऊर्जा देणारी खनिजं फक्त सशक्त देशांच्या नियंत्रणाखाली होती आणि अणुऊर्जा निर्माण करण्याची क्षमता सगळ्यांकडे नव्हती. ताऱ्यांची ऊर्जा कशी वापरायची हे अजून त्यांना समजलं नव्हतं आणि या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाला.”

“हो, पण आई, मला नुसता विचार केला तरी या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं, की तेव्हा लोकांना भूक आणि आजारपण यांचा सामना करायला लागला. पोषण जेव्हा कमी पडू लागलं तेव्हा साथीचे रोग पसरले. त्याच वेळी उरल्यासुरल्या नैसर्गिक संपत्तीसाठी अखेरचं युद्ध सुरू झालं आणि माणसांनी इतर माणसांचा अत्यंत स्वार्थी कारणांसाठी उपयोग करून घेतला. एकमेकांशी ते कमालीच्या क्रूरपणे वागू लागले. अगदी लहान मुलांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही.”

मानवाच्या इतिहासातील त्या घृणास्पद काळाविषयी वाचल्याने आरुषी खूप उदास झाली आहे हे आईच्या लक्षात आलं. तिचा मूड बदलायला हवा होता.

“एक फार जुनी म्हण आहे, बिट्टू. जेव्हा जगात अनाचार खूप बळावतो तेव्हा विश्वातल्या काही चांगल्या शक्ती पुढे सरसावतात आणि त्या वाईट परिस्थितीतून काहीतरी चांगलं उद्भवतं. मानवाच्या त्या अधोगतीतूनच पुढे उत्क्रांत मानवाचा जन्म झाला, नाही का? यातून आपण हा धडा शिकायचा, की परिस्थिती कितीही वाईट असली तरी प्रत्येकाने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आपण मानव पुन्हा कधीच तशी अंधकारमय परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. आपलं जीवन आता तितकसं नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता आपली संख्या किती कमी आहे. सगळ्या मनुष्यजातीची संख्या आता केवळ तीन कोटी आहे. अखेरचं युद्ध सुरू झालं तेव्हा ती संख्या दहा अब्ज होती.”

“असं का आई? आपण भरपूर बाळं का नाही निर्माण करत?”

“चल, आपण आपली भरारी मारायला जाऊ, नाहीतर आपला रविअस्त चुकेल. बागेच्या वर तरंगत उडताना आपण बोलू,” आरुषीला हळूच अभ्यासाच्या खोलीबाहेर नेत आई म्हणाली. बाहेर रविअस्ताच्या रंगांत न्हालेली रम्य संध्याकाळ पसरली होती. संध्याकाळी फुलणाऱ्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळत होता.

“कोणतंही बाळ जन्माला घालण्यासाठी बिट्टू, निदान दोन लोकांना त्याचा जन्म हवा असायला लागतो. बाळाचं पालन पोषण करण्यात त्यांना रस असावा लागतो. उत्क्रांत मानवाची ती खूण आहे. प्रत्येक मूल हे विशेष असतं आणि त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतलेले दोन पालक त्याचा जन्म होण्यापूर्वी तयार असतात. आता कधी अपघाताने मुलांचा जन्म होत नाही आणि म्हणून आपण बाळांना जन्म देणार्‍या दालनांवर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवतो.”

“पण मग माझ्यासारख्या नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मुलांचं काय?” आरुषीने थोडं संकोचत विचारलं. नैसर्गिक जन्माची शास्त्रीय पार्श्वभूमी तिला अर्थातच माहीत होती. त्यासाठी स्त्रियांना आपल्या अंडाशयाचं (ओव्हरीचं) ऋतुचक्र चालू करावं लागे आणि ते दोन वर्षं चालू ठेवावं लागे. मग अशा स्त्रीला असा जोडीदार शोधावा लागे जो तिच्याबरोबर पालक करार करायला तयार होईल. एवढंच नव्हे; तर त्यालाही सतत शुक्राणू तयार करणारं त्याचं प्रजनन क्षमतेचं चक्र सुरू करावं लागे. जर अशा जोडप्याचं नशीब चांगलं असेल तर त्यांच्या समागमानंतर ती स्त्री गर्भवती होण्याची शक्यता असे. हे सगळं आरुषीला माहिती होतं पण आपल्या आईने नैसर्गिक रितीने आपल्याला जन्म देण्यासाठी एवढा त्रास आणि वेदना का सहन केल्या हा प्रश्न तिच्या मनात होताच.

पश्चिम क्षितिजावर रवीचा अस्त झाला होता आणि बागेचे दिवे चारी बाजूने तरंगत येत होते. परिकणांची झुडुपं हळूहळू उजळू लागली. थोड्याच वेळात त्यांचा मंद प्रकाश बागेतील पाऊलवाटा उजळण्याइतका मोठा होईल. आई हळूहळू खाली येत बागेच्या उजव्या बाजूच्या हिरवळीवर उतरली. रोज सकाळी ते जिथे उन्ह खायला बसायचे त्या त्यांच्या घरासमोरच्या हिरवळीला लागूनच बागेचा हा भाग होता. आरुषी तिच्या पाठोपाठ खाली उतरली आणि मऊ हिरवळीवर तिच्या शेजारी बसली. तिने पाहिले की आई दूरवर अंधारणाऱ्या क्षितिजाकडे पाहत होती. पश्चिमेकडच्या काळवंडलेल्या आकाशात खोलवर एक तारा लुकलुकत होता.

“माझं लहानपण फार आनंदात नाही गेलं, बिट्टू. मला नेहमीच कसलीतरी काळजी वाटायची आणि असुरक्षित वाटायचं. कुठल्याही क्षणी काहीतरी भयंकर घडेल अशी मला सारखी भीती वाटायची. असं बघ बिट्टू, माझा जन्मपण नैसर्गिकच होता; पण नैसर्गिक रितीने जन्म देण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या आईला तो अनुभव काही फारसा रुचला नव्हता. 

एकदा माझा जन्म झाल्यावर तिला माझ्यात काही फारसा रस नव्हता. साक्षात्कारपूर्व मानव नको असलेल्या मुलांची करायचे तशी काही तिने अर्थातच माझी आबाळ केली नाही; किंबहुना माझ्या बाबतीत तिने तिचं सगळं कर्तव्य पार पाडलं; पण मनातून मी काही तिला नको आहे, हे मला जाणवायचं. 

मी जेव्हा छोटी होते ना, तेव्हा मी अनेकदा माझ्या आजीच्या घरी जायची. आजी माझे खूप लाड करायची आणि तिच्यासोबत असताना मी खूप आनंदात राहायचे. मग एक दिवस मी माझ्या आई आणि पपांबरोबर एका दुसऱ्या गावात राहायला गेले. मग फक्त कधीकधी माझी आजीशी आभासी भेट व्हायची आणि मी एक एकाकी, सारखी चिंता करणारी मुलगी झाले. तेव्हा मग मी ठरवलं, की मोठी झाल्यावर मी स्वतः एका बाळाला जन्म देणार आणि त्या बाळावर इतकं प्रेम करणार, की तिला किंवा त्याला कधीच एकटं वाटू नये. 

पंधरा वर्षांची झाल्यावर मी अकादमीत गेले. तेव्हापर्यंतच्या आयुष्यातील तो माझा सर्वात आनंदाचा काळ होता. मी अभ्यासात चांगलं यश मिळवून उत्तीर्ण झाले आणि माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला लागले. आणि मग तेव्हा मला स्वप्नं पडायला सुरुवात झाली… संकटात सापडलेल्या लहान मुलांची स्वप्नं… माझ्या मदतीची गरज असलेल्या मुलांची स्वप्नं. सारखी सारखी मला ती स्वप्नं पडत. त्या स्वप्नांत येणारी बाळं इतकी लहान असायची की ओळखूही यायची नाहीत. पण त्या सगळ्या स्वप्नांत मला त्या बाळांना मदत करायची असायची आणि माझ्याकडून त्यांच्यासाठी शक्य तितका प्रयत्न करायला मी धडपडायचे. मला त्या स्वप्नांचा अर्थ कधीच कळला नाही पण त्यामुळे स्वतःचं बाळ असण्याची माझी इच्छा मात्र तीव्र झाली. मग माझ्या बाळासाठी एक चांगला पपा होईल अशा पुरुषाचा मी शोध घ्यायला लागले. माझी आई व्हायची इच्छा इतकी तीव्र झाली, की मी तासन्‌तास  बाळाला कडेवर घेतल्याची, त्याचे लाड करत असल्याची कल्पना करत बसायचे. ही इच्छा मला शारीरिक पातळीवर जाणवू लागली. बाळाचं अस्तित्व आपल्या शरीरात अनुभवावं असं मला वाटायला लागलं… आपल्या शरीरात वाढणारा एक जीव… स्वतःच्या रक्ताने आणि श्वासाने त्याचं पोषण करावं असं वाटू लागलं.

मी जेव्हा तुझ्या पपाला भेटले तेव्हा, “आपलं नैसर्गिक बाळ असलं तर आवडेल का?” असं मी त्याला विचारलं आणि तो लगेच तयार झाला. मग आम्ही पालक करार केला आणि मग तीन वर्षांच्या आतच तू जन्मलीस. माझं स्वप्न साकार झालं.”

आरुषीने आईकडे पाहिलं. आई म्हणजे तिच्या विश्वाचा केंद्रबिंदू होती. तिचं पपावर ही खूप प्रेम होतं आणि तिला भरपूर मित्र-मैत्रिणीदेखील होत्या. पण आईशी तिचं खास नातं होतं हे तिला माहीत होतं. फारच विशेष नातं होतं. त्याचा विचार केल्याने ते नातं तुटायला नको, असंही तिला वाटायचं. आई गंभीर झाली तर आपल्याला किती वाईट वाटतं हेही तिला माहीत होतं.

त्या रात्री झोपताना ती आईने सांगितलेल्या गोष्टींवर विचार करत राहिली. लहानपणी आईला एकाकी वाटत होतं हे आठवून तिला वाईट वाटलं. आई आसपास नसली तर आपल्याला कसं वाटतं हे तिला आठवलं. जगातला आपला आधारच हरवल्यासारखं वाटतं तेव्हा. तिने ठरवलं की आपण आईला कधीच एकटं वाटू द्यायचं नाही. 

प्रकरण सहावे समाप्त

Author

Leave a Reply