गोळ्यांचे आवाज थांबले होते; तरी सावध असायला हवंय. शत्रू तसा हुशार आहे. तोही मी बाहेर पडायचीच वाट बघत असणार. मेजरसाहेबांनी सांगितलंय, “सकाळपर्यंत जागा सोडायची नाही. शत्रूला थोपवून ठेवायचा आहे. शत्रू हुशार आहे. त्याची पद्धत म्हणजे, आधी तुफान गोळाबारी करायची आणि नंतर भयाण शांतता. असे वाटावे, की तो निघून गेलाय. मग आपण बाहेर पडलो की आयतेच सावज.”
मी सावध आहे; इतक्या सहजासहजी गारद होणार नाही – पण आत्ताची शांतता जास्तच भयाण आहे – दोन्ही बाजूंचे सैनिक शत्रू बाहेर येण्याची वाट बघत असावेत असे वाटण्याइतपत. मला कळत नाही त्यांचाच डाव त्यांच्यावर टाकून काय उपयोग? त्या डावाला ते कसे बळी पडतील? पण… पण कदाचित आपण खूप वेळ थांबलो, तर त्यांना असे वाटायची शक्यता आहे, की आपण पूर्णतः संपलोय. मग तो जागा काबीज करायला नक्की बाहेर येईल. आतापर्यंतच्या युद्धात आमचे खूपच नुकसान झाले होते. काहीजण आततायीपणाने, उगा वीरश्रीने चर सोडून जयहिंदच्या नाऱ्यात बाहेर धावले आणि शत्रूला काही नुकसान न पोचवताच गारद झाले. शत्रूला त्यामुळे हे नीट माहीत असणार, की आमची खूपच हानी झाली आहे. आम्हीही त्यांचे काही कमी नुकसान केले असे नाही. त्यांचीही हानी बरीच झाली आहे. आम्हांला हल्ल्याची तयारी करायला वेळ मिळाला नसला, तरी पूर्वकल्पना मिळाली होती. त्यामुळे आम्ही गाफील नव्हतो. मेजरसाहेबांनी आम्हांला याची कल्पना दिली होती. “आज,” ते म्हणाले होते, “मातृभूमीसाठी देहदान करायची वेळ आली आहे. ही लढाई आपण जिंकणार नाही; पण आपण रात्रभर जागा सोडली नाही, तर ते युद्ध जिंकल्यासारखेच आहे. गावसकर आठवा,” ते म्हणाले. आजूबाजूलाच सगळे बाद होत असताना हा बहाद्दर दोन-दोन दिवस मैदानावर टिकून राहायचा. केवळ हार नको तर सामना बरोबरीत सुटावा म्हणून. आज आपली पाळी तशीच आहे. जीत होणार नाही – पण मागे सरलो नाही तर हार निश्चित नाही,” असे म्हणाले ते. जिवंत परत जाणार नाही याची हमीही दिली त्यांनी. हीच ती वेळ.
माझ्या हातात बॅट नव्हती तर बंदूक होती. तिचे काम चेंडू थोपवणे नव्हते तर शत्रू थोपवणे होते. आम्ही आमची साधने जपून वापरली. शत्रूच्या बेछूट गोळाबारीमध्ये आम्हांला मेजरसाहेबांनी सांगितलेली गोष्ट लक्षात होती. ते म्हणाले होते. प्रत्येक गोळीने एक शत्रू कमी केला तरच रात्र राखू शकू. मी त्यामुळे सावध होतो. समोर शत्रू दिसल्याशिवाय, त्याचे स्थान पक्के झाल्याशिवाय एकही गोळी डागली नव्हती. प्रत्येक गोळीचा निशाणा बरोबर होता.
पण आत्ताची ही शांतता भयानक होती. काही आवाज नाही. ना कुत्री, ना कोल्हे, ना गिधाडे. अजून कुणी जिवंत होते हे नक्की. म्हणजे युद्ध सुरू आहे; पण तो जिवंत मी एकटाच तर नाही ना? मला शंका आली. मी बाजूला बघितले, तर मेजरसाहेब स्वतः कमालीच्या स्तब्धतेने डोळ्यासमोरून बंदूक हलू न देता, एकाग्रतेने शत्रूच्या चराकडे बघत होते. डोळ्याची पापणीसुद्धा न लववता. मला त्यांचे कौतुक वाटले. स्वतःच्या जिवाची जरासुद्धा पर्वा न करता मेजरसाहेब लढले होते; सारखे चरातून हलत सूचना देत होते; आज्ञा देत होते; सैन्याचा धीर टिकवून धरत होते; पडलेल्या सैनिकाची जागा बदली सैनिक मिळेपर्यंत स्वतः सांभाळत होते आणि आता या लढाईच्या शेवटच्या क्षणात ते अत्यंत सावध होते, कमालीच्या एकाग्रतेने शत्रूवर नजर ठेवून होते. त्यांनाही माझ्यासारखेच वाटत असावे. खूप वेळ असा काढला, तर शत्रूला वाटेल, की आमचे सगळे सैनिक संपले आणि तो चर सोडून बाहेर येईल… मग करता येईल त्यांची कत्तल. मीही मग आपले सगळे अवधान एकवटून त्या समोरच्या चराकडे नजर लावून बसलो.
काहीतरी चुकत होते. वेळ खूपच गेला होता. आत्तापर्यंत काहीतरी व्हायला हवे होते, काहीतरी घडायला हवे होते. का त्यांचेच सैनिक गारद झाले सगळे? मी मेजर साहेबांकडे बघितले. ते जरासुद्धा हलले नव्हते; की ढिले पडले नव्हते. त्यांना जरासुद्धा शंका नव्हती. मला माझी लाज वाटली. कदाचित शत्रूचीही हीच अपेक्षा असेल, की आम्हांला ते संपले असे वाटून आम्ही बाहेर पडू; पण मेजरसाहेब आहेत तोपर्यंत ही चाल यशस्वी होणार नाही. ते हुशार आणि अवधानी आहेत. अशी चूक ते होऊ देणार नाहीत. मी मनातली शंकांची जळमटे काढली आणि परत लक्ष शत्रूकडे नेले. यांना सकाळपर्यंत इथून पुढे जाऊ द्यायचे नाही. सूर्य उगवायला थोडाच वेळ उरला होता. तेव्हा कुमक पोचेल.
आणखी थोडा वेळ गेला. मी शत्रूच्या खंदकाचा कानोसा घेतला. मला फार काही हालचाल ऐकू आली नाही. मला एकदा मनापासून तिथे जाऊन बघावेसे वाटले. कधी कधी ज्याचा विचार करायचा नाही, त्याचाच मन विचार करत बसते. मग तो विचार मनातून काढून टाकायचा प्रयत्न करताना, तो विचार मनात घट्ट बसत जातो. त्यांचा खंदक बघायच्या विचाराचे असेच झाले. मी शेवटी कंटाळून मेजर साहेबांची समाधी भंग करण्याच्या तयारीने गेलो. हळूहळू गेलो. मेजरसाहेब स्तब्ध होते. फारच. जवळ गेल्यावर कळले, की शत्रूनेच मेजरसाहेबांना थोपवले होते. किती वेळ झाला कुणास ठाऊक. मी उगाच त्यांच्या एकाग्रतेचे कौतुक करत होतो; पण म्हणजे आता परिस्थिती गंभीर आहे. मेजरसाहेब नाहीत तर कोण? मी हळूहळू खंदकातून रांगायला सुरुवात केली – आवाज येऊ न देता! मला अख्ख्या खंदकात कुणीच जिवंत सापडले नाही.
आता मात्र मी मुळापासून हादरलो होतो. या संपूर्ण तुकडीमध्ये मी एकटाच जिवंत होतो. मला खरेतर खूप वाईट वाटत होते. माझा मित्र तीन यार्ड पलीकडे पडला होता. सिंगसाहेब दोन्ही खंदकांच्या मधोमध पडले होते. बाकीचे मित्र असेच इतस्ततः! मी घाबरलो पण. इतके सगळे गेले म्हणजे आता माझा नंबरही येणार लवकरच. मी स्वतःला सावरले. नाहीतरी मेजरसाहेबांनी सांगितले होतेच, “या वेळी जिवंत परत जाणे नाही.” मी एकदा मनातल्या मनात घरचे सगळे आठवले. आईच्या देवघराला नमस्कार केला. कळायला लागल्यापासूनचा हा पहिला नमस्कार. हिची मनोमन माफी मागितली. पोरीचा फोटो एकदा काढून बघितला आणि मरणाला तयार झालो. शत्रूचे उरले सुरले सगळे गारद केल्याशिवाय प्राण त्यागणार नाही अशी स्वतःलाच हमी दिली आणि खंदकाच्या मोक्याच्या ठिकाणी आलो. मग मात्र मला राहवले नाही. मी सगळा प्राण कंठाशी आणून ओरडलो, “हर हर महादेव…”
माझ्या या आततायी वागण्याचा कदाचित फायदाच होईल. शत्रू हा आवाज कुणाचा म्हणून मागोवा तरी घेईल! त्या निमित्ताने मला दिसेल तरी! मी सावधपणे शत्रूच्या खंदकाकडे बघायला लागलो.
अर्ध्या वाटेत सिंगसाहेब होते. मला अजून वाटतंय की ते आत्ता उठतील आणि, “वा ही गुरू की खालसा वाही गुरू की फते,” म्हणून शत्रूवर तुटून पडतील. सिंगसाहेब असे लढायला लागले की आम्हीच काय शत्रूसुद्धा अनिमिष बघत बसायचा. त्यांचा त्वेष, त्यांचे शौर्य अवर्णनीय असायचे. त्यांना मूल नाही. मला बेटा म्हणायचे. मला काय निम्म्या छावणीला बेटा म्हणायचे आणि त्यांच्या या बेट्यांना काही होऊ नये म्हणून युद्धात सगळ्यात पुढे. मी विचारायचो त्यांना, तुम्हांला डर नाही का वाटत. तर म्हणायचे, “हम ने जनम भी लिया है देश के लिये, और मरेंगे भी उसी के लिये। और इसीलिये गुरु ने बेटा नहीं दिया। जब वतन के लिये मरना तय है, तो डर कैसा। और डर लगे तो मेरे पिछे आना। डर गायब हो जायेगा।”
इतक्यात मला समोरच्या खंदकात काही हालचाल दिसली. मी डोळे बारीक करून वेध घेतला, तर कुणीतरी हलत होते. म्हणजे शत्रू जिवंत आहे तर! मला सावध राहायला हवंय. सकाळपर्यंत रोखायचंय त्याला. नाही येऊ देणार. सिंगसाहब, तुम्हारे पीछे हूँ, डरूँगा नहीं। मी त्या हालचालीचा वेध घ्यायला सुरुवात केली. त्या हालचालीच्या मागून मी जायला लागलो. हळूहळू मला एक हेल्मेट दिसायला लागले. मग त्या हेल्मेटखालचा शत्रू. तोही कावेबाजपणे आमच्या खंदकाचा अंदाज घेत होता. आम्ही दोघे कदाचित आतापर्यंत एकमेकांना दिसत असू. काही वेळाने मला कळले, की समोर एकच हेल्मेट हलतेय. म्हणजे त्यालाही कळले असणार की आमच्याकडे एकच हेल्मेट हलतेय. म्हणजे आता…
त्याच्याही हेच लक्षात आले असावे. मी परत जोरात ओरडलो, “वाही गुरू की खालसा, वाही गुरू की फते” सिंगसाहेबांसाठी मी इतके तरी करू शकत होतोच आणि मी खंदकाबाहेर उडी मारली. त्याच वेळी त्यानेही खंदकाबाहेर उडी मारली. मी पळत पळतच बंदूक सरसावली, नेम साधला आणि चाप ओढला. तो तेच करत होता. मला कळले की बंदुकीत गोळी नव्हती. संपल्या बहुतेक. अरेरे! म्हणजे मी त्याच्या गोळीला बळी… नाही हे चालणार नाही. मी लगेच नागमोडी पळालो. तर तोही नागमोडी पळाला. मला कळेना मी काय आरशात बघतोय का काय. मग मला कळले अरे, म्हणजे याच्यापण गोळ्या संपल्या. मग मी संगीन काढली आणि चढवली बंदुकीवर. तोही तेच करत होता. हे सगळे पळता पळता. आमच्या दोघांतले अंतर कमी होत होते. मला एकच संधी मिळणार होती. त्यालाही कदाचित. माझी नजर त्याच्या काळजावर रोखलेली होती. एकच संधी, एकच वार आणि शत्रू संपणार होता. मग विजय माझा, माझ्या देशाचा विजय. त्या एका संधीचा पूर्ण फायदा… आलाच जवळ आता कधीही.
मी सर्व शक्ती एकवटून माझी संगीन त्याच्या छातीत खुपसली. जोरात धक्का बसला आणि तो थांबला. त्याच्या छातीतून मला रक्ताची धार निघताना दिसली. म्हणजे फते! शत्रू संपला. मेजरसाहेब, तुमची नजरतर इकडेच आहे तर बघा, मी तुमची आज्ञा पाळली; शत्रू संपेपर्यंत मागे हरलो नाही की मेलो नाही.
मी बघितले, तर त्याच्या नजरेत मला चक्क विजय दिसत होता. मी थोडा गोंधळलो. मग छातीतून जोरात कळ आली. मी खाली बघितले. तर माझ्या छातीतूनही तीच रक्ताची धार वाहत होती. त्यालाही बहुधा आत्ताच कळले असावे – कारण नजरेतला विजय मावळला होता. मग माझ्याही कदाचित.
माझा तोल गेला… पण अचानक सावरलो. शत्रूची हृदयात घुसलेली संगीन आणि त्याची बंदूक मला सावरत होती. त्याला टेकून मी उभा होतो. नाही कदापि नाही. मी सगळा जोर लावून उभा राहिलो. जोर लावताना रक्ताची चिळकांडी उडाली. आणि माझ्या चेहऱ्यावर… पण माझेच रक्त माझ्या चेहऱ्यावर?
नाही ते त्याचे होते. तोही जोर लावून उभा होत होता. त्यालाही माझ्या बंदुकीचा आधार मान्य नव्हता. ही संगीन निघाली, की रक्त जोरात वाहायला लागेल… मग मरण नक्की. कुमक येईपर्यंतसुद्धा टिकणार नाही… तरी शत्रूच्या बंदुकीचा आधार? नाही त्रिवार नाही. सगळा जोर एकवटून ती संगीन काढली आणि बाजूला फेकून दिली. रक्ताची आणखी एक चिळकांडी उडाली आणि रक्त जोरात वाहायला लागले. कधी नळाला इतक्या जोरात पाणी बघितले नाही… पण रक्त मात्र नळापेक्षा जास्त जोरात आणि तोंडावर त्याचे कारंजे. नाही हे रक्त त्याचे, माझ्यावर उडणारे? का माझे? कसे ओळखायचे?
त्यालाही तोच प्रश्न पडला असावा. तो माझ्याकडे बघत होता. जणू म्हणत होता, इसी की प्यास लगी थी ना? अब पी लो! आम्ही दोघे एकमेकांच्या रक्ताने माखून निघालो होतो, पण ओळखायचे कसे? कुठले कुणाचे? मेजरसाहेब म्हणाले होते, शत्रूच्या रक्ताने अंघोळ करणार म्हणून, पण ते तर तिकडेच गेले अंघोळ न करता आणि ती अंघोळ मला होत्ये. मी हिंदी चित्रपटात अनेक डायलॉग्सपण ऐकले होते, “कुत्ते, मैं तुम्हांरा खून पी जाउँगा, ” वगैरे. इतकी काही चांगली नसते चव रक्ताची.
पण तोल जात होता. मेंदू त्याचे काम करायचे नाकारत होता. आधार हवा, नाहीतर पडणार. शत्रू उभा आहे तोवर मला पडणे मान्य नाही. पडता पडता आपोआप हात लांब पसरले, आधार शोधत. आश्चर्य म्हणजे तो हात कुणीतरी पकडला. मी त्याच्या आधाराने उभाही राहिलो, बघतो तर तो शत्रूचा हात होता. त्याचेही असेच झाले असावे; कारण आम्ही दोघांनीही तो हात झिडकारून दिला, आणि परत धडपडलो. पुन्हा चुकून एकमेकांच्याच आधाराने उभे, परत तो आधार झिडकारला. हा खेळ थोडा चालला. पण नंतर शरीरही हा खेळ खेळण्याइतके सक्षम राहिले नाही. शेवटी एकमेकांच्या डोक्याला डोके लावून आम्ही उभे होतो. धाप लागली होती. आमचे श्वास एकमेकांत मिसळत होते; पण मनांच्या मध्ये देशभक्तीची सीमा होती. प्रत्यक्ष देशाच्या सीमेपेक्षा बळकट आणि अभेद्य… पण त्याचा उपयोग नव्हता. कारण आधाराशिवाय आम्ही खाली पडलो असतो आणि तो उभा तोवर मी पडणार नाही. आमचे शरीर एकमेकांपासून लांब होते, पण डोकी चिकटलेली होती. माझ्या कपाळानंतर त्याचे कपाळ. आमचे विधिलिखित एकमेकांत मिसळत होते. मी डोळे वर फिरवले. तर त्याचा चेहरा दिसला. खूप जवळून. बायकोचाही कधी इतक्या जवळून नाही बघितला. त्याची कांती तरुण होती. दाढी-मिशी नाही. चेहऱ्यावर स्वतःबद्दल घृणा. कदाचित शत्रूच्या आधाराने उभा म्हणून. माझ्याही चेहऱ्यावर असेल कदाचित! त्याच्या डोळ्यांत अजूनही त्वेष होता. माझ्याही असणार; कारण एकमेकांच्या डोळ्यांत बघून आमचे त्वेष आणखी बळावले.
मला मगाचपासून सारखे आरशात बघितल्यासारखे वाटत होते. दोघांच्या प्रतिक्रिया कुणीतरी गोष्टीत लिहिल्यासारख्या समान होत्या. माझी प्रतिक्रिया तीच त्याची. मला वाटायचे तेच त्याला. हे कसे शक्य आहे?
इतक्यात आमचा एकमेकांच्या कपाळाच्या आधाराने जो तोल जमला होता, तो विस्कटला. मी बघितले तर तो खाली जमिनीकडे हात लांब करत होता. खाली बघितले तर मला एक पाकिट दिसले. कोणाचे तरी पडले असावे. त्यातून एका मुलीचा फोटो डोकावत होता. ही माझी नाही, म्हणजे मग याची असावी काय? असेल! म्हणूनच तर तो ते उचलायचा प्रयत्न करतोय. आमचा तोल बिघडू द्यायचा नसेल तर मलाही वाकायला लागेल. ते पाकीट जरा जास्तच माझ्याजवळ होते. मग मी हात लांब करून उचलले आणि त्याला दिले. त्याने ते हावरटासारखे घेतले. बहुतेक ‘शुक्रिया’ म्हणणार होता. पण म्हणता म्हणता अडखळला. शत्रूला शुक्रिया नसतो. मला मैत्रीत ‘सॉरी, थॅंक्यू’ नसते हे माहीत होते. शत्रुत्वात पण ते नसतेच.
आता आम्ही इतके वाकलो होतो, की परत उभे राहणे शक्य नव्हते. मग एकमेकांच्या आधाराने खाली बसलो. शरीर मनाप्रमाणे वागत नव्हते. त्याच्याआधी खाली पडायचे नव्हते. त्याच्याबरोबर पडलो. पाठीला कुठलातरी अनाहूत आधार मिळाला. जरा बरे वाटले. मी डोळे मिटून घेतले. तर क्षणात डोळ्यांसमोर माझ्या आयुष्यातल्या तीनही स्त्रिया उभ्या राहिल्या. माझी आई, माझी बायको आणि माझी मुलगी. या तिघींबरोबर मी आयुष्य काढले… खरेतर आयुष्य नाही काढले – मी जास्त वेळ बाहेरच असायचो. नोकरीच्या निमित्ताने. जिथे पोस्टिंग असेल तिथे. वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा मिळणाऱ्या सुट्टीला घरी… याला कसले ‘बरोबर आयुष्य काढले’ म्हणायचे! मी मनापासून या तिघींची माफी मागितली. मला वाईट वाटत होते. या जन्मी नाही जमले बरोबर आयुष्य काढणे! जितका द्यायला पाहिजे तितका वेळ देणे! मुलीला माझ्या चेहऱ्यापेक्षा माझी फिरलेली पाठच आठवत असावी, इतक्या वेळा तिने ती बघितली आहे. याला कसले म्हणायचे जगणे! मला खूप त्रास होत होता. का आलो आपण या सगळ्यांना सोडून इतक्या वेळा! यांना माझी गरज नव्हती का? आणि होती… तर कुणाची गरज जास्त मोठी होती. यांची? का माझ्या देशाची?
मी पट्कन हा देशद्रोही विचार मनातून काढून टाकला. माझा हा त्याग त्याच्या दरबारी विचारात घेतला जाईल याची मला आशा होती. मेजरसाहेब म्हणायचेच, “रणांगणावरचा मृत्यू हा नक्की स्वर्गाची दारे उघडतो,” म्हणून. त्यामुळे असेल कदाचित. पण तरी विचार मनातून जायला तयार नव्हता. जणू त्या तिघी मला जाब विचारत होत्या, ‘आमची काय चूक? आमच्या नशिबात का नाहीस तू? माझा बाबा कुठे आहे? कुठे आहे माझा मुलगा? आमचे हे गेले कुठे? आमची काय चूक? त्या विचारत होत्या आणि मी विचारत होतो त्याला. आता फारच जवळ होता तो. काय माझी चूक? का माझे आयुष्य माझ्या लाडक्या लोकांपासून दूर गेले? काय त्यांची चूक? त्यांनी मला फक्त मनीऑर्डर आणि चिट्ठ्या याच स्वरूपात कायम बघितले आहे. का हे असे माझ्या बाबतीत?
यांच्यापेक्षा जास्त वेळा तर माझा शत्रूच माझ्या शेजारी होता. मी हळूच त्याच्याकडे बघितले. पोरीचा फोटो बघताना त्याचे डोळे पाणावले होते. तोही माझ्यासारखाच विचार करत असावा कदाचित. त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिले. मी माझे अश्रू त्याला दिसू नयेत म्हणून चटकन पुसले. त्यानेही. मग मला आणखी एक प्रश्न पडला. हा शत्रूतर पूर्णपणे माणूस आहे. त्यालाही घर आहे. त्याचेही लाडके आहेत. त्यांच्यापासून लांब आयुष्य काढल्याचे दुःख त्यालाही आहेच. मला झाकावा आणि त्याला काढावा, इतके सगळे समान. मग आम्ही एकमेकांशी का लढलो? एकमेकांचा जीव का घेतला? याचे उत्तर माझ्याजवळ नव्हते.
कुठली अशी गोष्ट आहे, ती एका माणसाला दुसऱ्या माणसाचा वध करायला प्रवृत्त करते? मी गुन्हेगारांबद्दल बोलत नाही आहे. मी माझ्यासारख्या शूरवीरांची गोष्ट करतो आहे. आमच्यात काही गुन्हेगारी वृत्ती नाही. आम्ही कधी कुणाचे मुद्दाम नुकसान केले नाही. जमली तितकी मदतच केली आहे? मग माझ्यासारखी माणसे एखाद्याला संपवायला इतकी अनावर कशी होतात? ही लढाई आम्ही स्वतःहून, स्वयंप्रेरणेने केली आहे का? का कुणी आमच्याकडून करवून घेतली आहे? मी त्याच्याकडे बघितले. तो काही गुन्हेगार वाटत नव्हता. कदाचित माझ्यासारखाच एक सरळ स्वभावाचा माणूस. मग आम्ही एकमेकांच्या जिवावर का उठलो?
आणि मला आता भीती वाटायला लागली. मगाशी माझी पूर्ण खातरी होती, की मला स्वर्ग मिळणार. आता तितकीशी नव्हती. हा देश म्हणजे नक्की काय आहे, की ज्याच्यामुळे आम्ही आप्त स्वकीयांना बाजूला ठेवून एकमेकांचा जीव घेतला? का या सीमा आमच्यासाठी इतक्या जीवघेण्या ठरतात? नसल्याच जर या सीमा तर… ?
जगातले युद्धाचे कारणच निघून जाईल! जे आहे ते सगळ्या मानव जातीचे असे मानले तर… माझे तुझे हे नाहीसेच होईल. कुणा ख्रिस्ताने कुणाचा उद्धार केला म्हणून ते ख्रिस्ती, कुण्या महंमदाने कुणाला मार्ग दाखवले म्हणून ते मुसलमान, कुण्या कृष्णाने गीता सांगितली म्हणून ते हिंदू. सांगताना तर जवळपास सगळ्यांनी तेच सांगितले आहे, थोड्याफार फरकाने. मग आम्हांला जे सांगितले गेलेय, ते माझ्याच बाप्पांचे चांगले आणि तुमच्या बाप्पाचे वाईट असे म्हणायची ही इतकी अतिरेकी खोड का?
मला प्रश्न पडला. मला खरोखरच का शत्रूला कंठस्नान घालायचे होते? का मी याच्या मुलीला माझ्या मुलीबरोबर खेळताना बघून जास्त आनंदी झालो असतो? कशाने हे जग पुढे गेले असते. या युद्धाने? का त्या दोघी मैत्रिणी म्हणून वाढल्या असत्या तर?
सिंगसाहेब, आत्ता खरी भीती वाटत्ये, खरे खोटे कळत नाही आहे. चांगले वाईट कळत नाही. कुठे आहात? मी त्यांना शोधले. तर मगाशी अनाहूत मिळालेला पाठीचा आधार त्यांचाच होता. मी सिंगसाहेबांना म्हणालो, “अब बहुत डर लग रहा है सिंगसाहेब. सम्हाल लो. तुम्हारे पिछे आ रहा हूँ.” आता जाण्याची जवळपास खात्री झाली होती. मी माझ्या शत्रूकडे बघितले. तो म्हणाला, “अलविदा. अब जा रहा हूँ. शायद जहन्नुम मे. तुम्हें भी वहीं मिलूंगा”
त्याचे डोके माझ्या खांद्यावर विसावत होते. माझे त्याच्या डोक्यावर. मग हळूच डोळे मिटले, आणि क्षणात सगळे विचार संपले.
