काव्यचमत्कृती 

या नवीन सदरात प्राचीन काळातील बंधरचनांचा अभ्यास करून  सुषमा जोशी स्वरचित काव्यरचना मांडणार आहे . 

१)अष्टदल कमल बंध 

काव्याचं सौंदर्य नक्की कशाकशांत असतं? शब्द, मांडणी, विचार, जाणिवेत झिरपणारी अनुभूती! कधी विषयाचं सौंदर्य, कधी कल्पनाचातुर्य, कधी शाब्दिक सौंदर्य,  कधी छंद-वृत्तांमुळे  लाभलेलं गेयतेचं सौंदर्य; तर कधी यमकादी अलंकारांनी लहडून आलेलं सौंदर्य. 

मम्मट हे संस्कृताचार्य. अकराव्या शतकातील काश्मिरी पंडित. त्यांच्या ‘काव्यप्रकाशा’मुळे संस्कृत काव्यशास्त्र अतिशय प्रगल्भ झालं. 

अकराव्या शतकात मम्मटानं   शब्दचित्रालंकारांची ओळख करून दिली. 

खड्गबंध म्हणजे खड्गाच्या आकारात रचलेले काव्य, 

मुरजबंध म्हणजे  वाद्याच्या आकारात रचलेले काव्य, पद्मबंध  असे वेगवेगळे चित्रालंकार त्यानं सांगितले आहेत. यात शब्दखेळाची मजा आहे. रसविचार फारसा नाही.  पण तरीही हे बौद्धिक खाद्य मनाला गुंतवून ठेवतं. 

या भागात बघू या

आठ पाकळ्यांचा अष्टदल कमलबंध 

या बंधात संकल्पना  आकारानुरूप असावी असं काही माझ्या वाचनात आलं नाही. तरीही पद्मासंबंधी म्हणजे कमळासंबंधी रचना करावी, असं मनात आलं. 

कमळ म्हटलं की भुंगा आठवतोच.  

नामकमळ आणि ईश्वर हा नामामध्ये अडकलेला भुंगा! ही गोंदवलेकर महाराजांची ही उपमा!  

फक्त चार ओळींत या  भुंग्याला अडकवायचं होतं. वाटलं, सोपं तर आहे! छंद  अनुष्टुभ.   

 ( चाल : भीमरूपी महारुद्रा) 

हे पक्कं डोक्यात ठेवून पेन वही सरसावून आत्ता या भुंग्याला पकडते म्हणून बसले. 

सोपं सोपं म्हणताना या कमळाच्या तळात खोलखोल रुतत गेले.

काहीही साधे ना! 

या मम्मटबुवांनी सांगितलेले नियमही  वाचनात आले नाहीत.  लिहिताना भंबेरी उडाली. 

मम्मटबुवांचं काव्य म्हणजे सभेचं तौलनिक वर्णन आहे.

भासते प्रतिभासार |

रसाभाताहताविभा |

भावितात्मा शुभा वादे |

देवाभाबत ते सभा  |

भासते – उलटून वाचलं की ते सभा

सार, रसा, भास, सभा…   या उलटून सुलटून उड्या लक्षात घेताना हैराण झाले. पण झपाटल्यासारखं झालं होतं. 

नामकमळ ही संकल्पना सोडायची नव्हती. 

अर्धं त्यजति पण्डितः|

आपण तर पंडितही नाही… तडजोड करायला हवी हे कळलं. काव्यातील भुंग्याला तिलांजली दिली. मग ‘नामसारस’ ‘ रसा मना’  देणारे असूनही त्या सारसाला  म्हणजे कमळालाही निरोप दिला. 

तरीही… 

शेवटी ‘नाम’ घट्ट राहिलं यात आनंद आहे… 

तर खाली रचना दिली आहे.  त्याचं चित्र सोबत जोडलं आहे. हे आठ पाकळ्यांच्या कमळात बसवलं आहे. 

नामसारीं मना दास

सदा नासाग्रि उन्मना

नाम उन्मनि नादे ते  

ते दे नादवसा मना

अर्थ : ईश्वराचं नाम हेच सारसर्वस्व आहे.

मनाला या नामाचा दास करावं. हे नाम कसं घ्यावं? सतत घेत राहिलं की नासाग्री दृष्टी स्थिर होऊन लय लागतो. मनाचं उन्मन होतं. ईश्वराशी लय साधतो. या लयानं नाम अनाहत गुंजत राहतं. हा अनाहत नादवसा मनाला लाभतो. 

रचना कशीबशी जमली. आठ तास लागले असतील. पण लिहिलेलं साधायला आठ जन्म पुरतील का? 

हा मुख्य प्रश्न! 

आठ पाकळ्यांच्या कमलदलातील काव्यरचना सोबत जोडली आहे. प्रत्येक पाकळीत काही अक्षरं आहेत. ती अक्षरे कशी वाचावीत ते बाणांनी दाखवले आहे. 

पूर्वेपासून सुरुवात करायची. पहिलं अक्षर ना वाचायचं.

ना> मसा> रीम> परत ना

पुढची पाकळी > दास तिथे परत उलटा बाण.

म्हणजे  दास चा

सदा> ना> साग्रि> उन् म >परत ना> तोच बाण उलट> ना> म उन् > शेजारी मनि> परत ना> देते > उलट बाण ते दे> परत ना > दव

इथे शेजारी परत पहिली पाकळी > साम ना

बाणांनी कसं वाचायचं ते सूचित केलं आहे. काही बाण शेजारी जायची दिशा दाखवतात, तिथे शेजारच्या पाकळीतले शब्द वाचायचे.

Author

Leave a Reply