मराठीप्रेमाचा मूर्तिमंत आविष्कार असे ज्यांचे वर्णन करता येईल त्या प्रा. यास्मिन शेख यांनी शनिवार, २१ जून २०२५ रोजी वयाच्या एकशेएकाव्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्या संध्याकाळी त्यांचा पुण्यात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते झालेला सत्कार हा सर्वच उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील. या हृद्य समारंभास यास्मिन शेख यांच्या कन्या प्रा. रुमा बावीकर, आता ज्येष्ठ नागरिक असलेले त्यांचे अनेक विद्यार्थी तसेच अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमी आवर्जून हजर होते.
आपल्या भाषणात जोशी म्हणाले, “मराठी भाषेच्या उत्कर्षाची आस बाळगून आणि व्याकरणाचा ध्यास घेऊन प्रा.यास्मिन शेख यांनी केलेले काम पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या तिन्हीचा संगम म्हणजे यास्मिन शेख. वर्ग आणि अध्यापन एवढ्यापुरते आपले काम मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या कामातून समाजाला भाषाभान दिले. व्याकरणासारखा रुक्ष आणि क्लिष्ट वाटणारा विषय त्यांनी ललितरम्य पद्धतीने सर्वांना शिकवला. शतकपूर्ती केलेली ही विदुषी मराठीचे वैभव आहे.”
सत्काराला उत्तर देताना अनेक जुन्या आठवणींना शेखबाईंनी उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “माझे दीर्घायुष्य ही केवळ परमेश्वराची कृपा आहे. यात माझे कर्तृत्व असे काहीही नाही. मी जन्माने ज्यू. ज्यू आणि मुसलमान हे पक्के हाडवैरी समजले जातात. त्यामुळे मी एका मुसलमान व्यक्तीशी लग्न करायचे ठरवल्यावर सुरुवातीला वडिलांनी विरोध केला पण लवकरच तो मावळला. लहानपणापासून आमच्या घरी भरपूर पुस्तके होती, अनेक मासिके येत. त्यामुळे मला मराठी वाचनाची गोडी लागली. मी लहान असतानाच माझ्या आईचे निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न न करता आम्हां सात भावंडांचा सांभाळ केला. माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान खूप मोठे आहे. पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात श्री. म. माटे हे व्याकरण आणि के. ना. वाटवे हे आम्हांला भाषाशास्त्र शिकवायचे. ते खूप सुंदर शिकवत व त्यामुळे मला या विषयांची गोडी लागली. माटे यांनी तर मला त्यांची मुलगीच मानले होते. १९४६ साली मी बी.ए. झाले; केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून. त्याबद्दल प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी मला पाठ्यवृत्ती दिली. पुढे मुंबईत शीव येथील एसआयइएस या महाविद्यालयात मला श्री. पु. भागवत यांच्यासारखे ज्येष्ठ सहकारी लाभले. या सर्वांनी केलेल्या संस्कारांतून यास्मिन शेख घडली. व्याकरणाचे शासनमान्य नियम सर्वसामान्य वाचकालाही सहज समजतील अशा सोप्या भाषेत आणि भरपूर उदाहरणांसह समजावून सांगणारे पुस्तक लिहावे अशी सूचना त्या वेळी राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्ष असलेल्या डॉ. सरोजिनी वैद्य यांनी मला केली. त्यातून ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे माझे पुस्तक आकाराला आले. संस्थेने त्याच्या चार आवृत्त्या काढल्या.” “मराठीवर प्रेम करा,” या शब्दांनी शेखबाईंनी आपल्या सर्व श्रोत्यांना भारावून टाकणाऱ्या भाषणाचा शेवट केला.
शेखबाईंचे माजी विद्यार्थी आणि राज्याचे मुख्य सचिव भूषण गगराणी तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी पाठवलेल्या शुभेच्छा समारंभात वाचून दाखवल्या गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करून शेखबाईंना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दिलीप फलटणकर आणि भानू काळे यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, मराठी साहित्य परिषद व इतरही अनेक संस्थांनी तसेच चाहत्यांनी या प्रसंगी पुष्पगुच्छ-शाल-श्रीफळ देऊन शेखबाईंचा सत्कार केला.
दोन तास चाललेल्या या समारंभाच्या वेळी एक जुना प्रसंग मला आठवत होता. शेखबाईंच्या नव्वदीनिमित्त २०१५ साली झालेल्या सत्कारसमारंभात अंतर्नादच्या वतीने शेखबाईंचा सत्कार करताना डॉ. दाभोळकर म्हणाले होते, “शेखबाईंकडे बघितल्यावर वाटते की, नाइण्टी तो झांकी है, सेंचुरी अभी बाकी है! त्यांचा उत्साह बघितल्यावर वाटते, की तोही क्षण आणखी दहा वर्षांनी नक्की येईल आणि त्या वेळीही आपण सर्व असेच एकत्र येऊ!” दाभोळकरांनी केलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले होते! शेखबाईंच्या अशा अनेक आठवणींना या निमित्ताने माझ्या मनात उजाळा मिळत होता.
निवृत्तीनंतर आपला चेंबूरमधील फ्लॅट विकून १९९६ साली शेख जोडपे पुण्यात औंध येथे स्थायिक झाले – आमच्या घराजवळच. त्यामुळे आमच्या गाठीभेटीही अधिक सुलभ झाल्या; त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक विशेष माझ्या लक्षात येत गेले. एक म्हणजे त्यांचे निस्सीम मराठीप्रेम. एकदा महापालिकेचा एक कर्मचारी जनगणना करण्यासाठी त्यांच्या घरी आला. तो विचारत असलेल्या प्रश्नांमध्ये ‘तुमची मातृभाषा कोणती?’ हा एक प्रश्न होता. ‘मराठी’ हे शेखबाईंनी दिलेले उत्तर त्याला पटत नव्हते. ‘तुमचे आडनाव शेख म्हटल्यावर मातृभाषा उर्दू लिहायला हवी’ असा त्याचा आग्रह होता. पण शेखबाईंनी ‘मातृभाषा : मराठी’ अशीच नोंद त्याला करायला लावली. शेखबाई म्हणतात, “भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही. ती महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे.”
भाषा हा आपला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे असे त्या मानतात. त्या म्हणतात, “विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे भाषेइतके प्रभावी साधन दुसरे कोणतेही नाही.” भाषेच्या संदर्भात त्यांची काही आग्रही मते आहेत. उदाहरणार्थ : प्रमाणभाषेचा आग्रह. आजकाल स्थानिक अस्मितांना कुरवाळण्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे समाजघटक आपापल्या बोलीचा आग्रह धरत असतात. मुळातच संकटग्रस्त असलेली आपली मातृभाषा अधिकाधिक घटकांमध्ये विभागली जाते आणि परिणामतः अधिकच दुबळी बनत जाते. शेखबाईंचा कुठल्याच बोलीभाषेला विरोध असा नाही; पण एखादे वैचारिक लेखन सर्व मराठी भाषकांना समजायला हवे असेल तर त्यासाठी प्रमाणभाषेचाच वापर व्हायला हवा असे त्या म्हणतात. ललित साहित्यात बोलीभाषा नक्कीच चालेल, अनेकदा ती वातावरणनिर्मितीसाठी आवश्यकही असेल, पण वैचारिक लेखनात मात्र प्रमाणभाषाच हवी; नाहीतर एका बोलीभाषेतील लेखनाचे नेमके आकलन दुसरी बोलीभाषा असलेल्या वाचकाला होणार नाही. झाडबोलीत केलेल्या लेखनाचे नेमके आकलन कोकणातील वाचकाला कसे होईल किंवा मालवणीत केलेले लेखन चंद्रपूरातील वाचकाला कसे समजेल? महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत आणि प्रत्येकाने स्वतःच्याच बोलीभाषेत लेखन केले तर भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल असे त्यांचे मत आहे.
त्याचप्रमाणे व्याकरणाचे नियमही आपण पाळलेच पाहिजेत हाही त्यांचा आग्रह असतो. सर्वच शास्त्रांमध्ये त्या-त्या शास्त्राचे नियम असतात आणि आपण ते विनातक्रार पाळतच असतो; इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगदेखील आपण घोकून घोकून पाठ करत असतो; मग मराठीच्या बाबतीत कंटाळा का करायचा? भाषा ही प्रवाही असते आणि काळाच्या ओघात तिच्यात फेरफार होतच जातात; त्या दृष्टीने प्रमाणभाषा लेखनाचे नियमही बदलायला त्यांचा विरोध नाही. काही बदल भाषातज्ज्ञांनी अवश्य सुचवावेत; नंतर ते शासनाकडून मंजूर करून घेता येतील; पण तसे घडत नाही तोवर तरी शासनाने आधी १९६२ साली मंजूर केलेले चौदा नियम आणि त्यानंतर १९७२ साली मंजूर केलेले आणखी चार नियम असे अठरा नियम सर्वांनी पाळायलाच हवेत असे त्या म्हणतात. विद्यार्थ्यांना व्याकरणाची गोडी लागायला हवी असेल तर आधी शिक्षकांनी व्याकरणात रस घेण्याची गरज आहे असेही त्या स्वानुभवावरून सांगतात.
दुर्दैवाने व्याकरणाचे महत्त्व आपल्या अनेक लेखकांनाही पटलेले नसते. प्रकाशकाने किंवा मुद्रितशोधकाने ते काम करावे अशीच जणू त्यांची अपेक्षा असते. पण इथेही शेखबाई वेगळा मुद्दा मांडतात. अंतर्नाद मासिकाने आयोजित केलेल्या एका कथाशिबिरात त्या म्हणाल्या होत्या, “आपण जेव्हा एखादा अनुभव घेतो तेव्हा त्यासाठी शब्दांची गरज नसते. पण जेव्हा तो लेखनातून व्यक्त करतो तेव्हा मात्र शब्दांची गरज असते; किंबहुना तेच लेखकाचे मूलद्रव्य असते. म्हणूनच लेखकाने व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे. त्यातूनच लेखनाला नेमकेपणा येतो. पुष्कळदा एखादी कथा अत्यंत कलापूर्ण असते, तिचे अंतरंग सौंदर्यपूर्ण असते; पण तिचे बाह्य रूप मात्र तितकेसे निर्दोष नसते. सुग्रास जेवणात वारंवार खडे लागले तर जसा विरस होतो, तसा विरस अशी कथा वाचताना होतो. कथेचे हे बाह्यांग, कथेचा हा शब्दबद्ध आविष्कार, तितकाच महत्त्वाचा आहे, जितके कथेचे अंतरंग. कारण त्या बाह्यांगातूनच वाचक कथेच्या अंतरंगात शिरणार असतो. अगदी विरामचिन्हे हीदेखील बोलकी असतात. त्यांच्यातूनही उपहास, संताप, आश्चर्य, कुतूहल वगैरे भावना व्यक्त करता येतात. म्हणूनच लेखकानेही व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे.”
पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजी शब्द वापरण्याला त्यांचा विरोध असतो. ‘मी सॅड फील करतो’ किंवा ‘तो सॉलिड हर्ट झाला’ अशी आजकालची भाषा त्यांना खटकते. त्यांच्या मते हे भाषिक प्रदूषण आपण रोखायला हवे. उदाहरणार्थ : ‘शूटिंग’ऐवजी चित्रीकरण, ‘चॅनेल’ऐवजी वाहिनी, ‘सिरियल’ऐवजी मालिका, ‘रोल’ऐवजी भूमिका, ‘स्क्रिप्ट’ऐवजी संहिता, ‘मीडिया’ऐवजी माध्यम, ‘क्लासिक’ऐवजी अभिजात, ‘रिस्पॉन्स’ऐवजी प्रतिसाद किंवा ‘स्पॉन्सर्ड’ऐवजी पुरस्कृत यांसारख्या सोप्या प्रतिशब्दांचा त्या आग्रह धरतात. त्या लिहितात, “आपली मराठी भाषा समृद्ध आहे, तिच्यात नव्या नव्या संकल्पना व्यक्त करण्याची ताकद आहे. सर्वच परकीय शब्द काढून टाका असे मला सुचवायचे नाही, पण त्यांच्या अतिरिक्त वापराने मराठीचे अपरिमित नुकसान होत आहे. इतर भाषांच्या गैरवाजवी मिश्रणाने प्रदूषित झालेली भाषा टाळून प्रयत्नपूर्वक पर्यायी मराठी शब्दांचा वापर करणे हे आपले कर्तव्यच आहे.”
त्यांच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब म्हणजे मराठी भाषेतून नष्ट होत चाललेल्या म्हणी आणि वाक्प्रचार. त्या म्हणतात, “भाषेचे हे वैभव अलीकडे लुप्त होत चालले आहे. मानवी समाज, रूढी, परंपरा, माणसाच्या स्वभावातील गुणदोष इत्यादींचे अल्प शब्दांत केलेले कथन म्हणजे म्हणी. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ अशा कितीतरी अर्थपूर्ण म्हणी आज मराठी भाषेतून गायब झाल्या आहेत. तसेच, डोळे उघडणे, कान फुंकणे असे कितीतरी वाक्प्रचारदेखील अलीकडे बोलण्यातून हद्दपार झाले आहेत. त्यांचा पुन्हा भाषेत अंतर्भाव होणे आवश्यक आहे.”
शेखबाईंचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही मुद्दा अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी. त्यामुळेच एक विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती आणि आजही अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या संपर्कात असतात. एस.आय.इ.एस. महाविद्यालयात त्यांनी २७ वर्षे मराठीचे अध्यापन केले. इथेच विंदा करंदीकर इंग्रजी व चंद्रकांत बांदिवडेकर हिंदी शिकवत. श्री. पु. भागवत मराठीचे विभागप्रमुख होते; त्यांच्या निवृत्तीनंतरची शेवटची सात वर्षे शेखबाई विभागप्रमुख होत्या. आपल्या निवृत्तीनंतर दहा वर्षे शेखबाई यु.पी.एस.सी.च्या परीक्षार्थींना शिकवीत होत्या. एकूण ४४ वर्षे त्यांनी मराठीचे अध्यापन केले. वर उल्लेख केलेले ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि पुढे त्यांनी तयार केलेला ‘मराठी शब्दलेखनकोश’ (पहिली आवृत्ती मनोविकास प्रकाशन, नंतरच्या आवृत्त्या हर्मिस प्रकाशन) ही त्यांची दोन्ही पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत.
शेखबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वेधक अंग म्हणजे त्यांची धर्मनिरपेक्षता. तसे पाहिले तर शेख आडनावाचा त्यांना खूपदा त्रास झाला आहे. एकदा मुंबई-पुणे आगगाडीच्या प्रवासात समोरच्या एका अपरिचित लहान मुलाशी त्यांच्या गप्पा-टप्पा सुरू झाल्या. यजमान शेख यांनी स्वतःची खिडकीतली जागा मुलाला दिल्यामुळे तो अधिकच खुश होता. शेजारीच बसलेले मुलाचे आई-वडीलही गप्पांमध्ये हसतखेळत सामील झाले होते. पण साधारण निम्मा प्रवास होऊन गेल्यावर गप्पांच्या ओघात बाईंचे आडनाव ‘शेख’ आहे हे कळले आणि समोरच्यांची देहबोली एकदम बदलली. संभाषण मंदावले; मग जवळजवळ थंडावलेच. खिडकीत शेखांशेजारी बसलेल्या आपल्या मुलाला त्याच्या आईने जवळजवळ हिसकावूनच आपल्याकडे घेतले आणि ती जरा लांब जाऊन बसली! उरलेल्या प्रवासात आणि अगदी आगगाडीतून उतरतानादेखील त्यांनी शेखांकडे पाहिलेसुद्धा नाही!
असाच आणखी एक प्रसंग शेख दाम्पत्य पुण्यात फ्लॅट शोधत असतानाचा. एक फ्लॅट त्यांनी पसंत केला होता. सगळी प्राथमिक बोलणीही झाली. पण प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी जेव्हा शेख जोडपे त्या प्रख्यात बिल्डरच्या कार्यालयात गेले व त्यांचे आडनाव शेख आहे हे स्पष्ट झाले, तेव्हा “सध्या फ्लॅट उपलब्धच नाही” असे त्यांना ऐकावे लागले होते!
पण असे बरेच अनुभव गाठीशी असूनही शेखबाईंच्या मनात जराही कटुता नाही. त्या म्हणतात, “आपण कोणत्या धर्मात व जातीत जन्माला येणार हे आपल्याला माहीत नसतं. ते आपण ठरवूही शकत नाही. आपण माणसं आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, असं जर आपण मनापासून स्वीकारलं, तर मानवी समाज किती सुखी होईल!”
मराठीप्रेम आणि धर्मनिरपेक्षता ह्यांव्यतिरिक्त आवर्जून उल्लेख करायला हवा असा शेखबाईंचा तिसरा विशेष म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठा. पाठाची पूर्वतयारी केल्याशिवाय, आवश्यक ती टिपणे काढल्याशिवाय त्या कधीही वर्गावर गेल्या नाहीत; त्यात त्यांनी कधीच कंटाळा किंवा आळस केला नाही. अंतर्नादच्या प्रत्येक अंकाची मुद्रिते त्या अगदी वेळेत तपासून देत; काम झाले की लगेच स्वतः फोन करून कळवत – पाठपुरावा कधीही करावा लागत नसे. यजमान हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतानाही त्यांनी अंतर्नादची मुद्रिते तिथेच बसून तपासून दिली होती. यात आपण काही विशेष करतो असेही त्यांनी कधी मला जाणवू दिले नाही. “अंतर्नादच्या अंकात एखादी चूक आढळली तर मला हातावर ओरखडा उमटल्यासारखं वाटतं,” असे त्या एकदा म्हणाल्या होत्या. हे सारे त्या पैशाकरिता करत नव्हत्या, कारण सुदैवाने त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम होती; पण हाती घेतलेले काम जास्तीत जास्त चांगले करणे हीच त्यांची त्यामागची भावना होती. सुरुवातीला वर्णन केलेल्या समारंभातील आपले संपूर्ण भाषण त्यांनी स्वतःच्या हाताने अगदी कच्चे आणि एकदा पक्के असे दोन वेळा लिहून काढले होते हे इथे नमूद करावेसे वाटते. शेखबाईंची कर्तव्यतत्परता जर लेखकांपासून पुस्तकविक्रेत्यांपर्यंत साहित्यक्षेत्रातील अधिकाधिकांनी अंगी बाणवली, तर अन्य कुठल्याही शासकीय वा बिनशासकीय मदतीशिवायदेखील मराठी साहित्यव्यवहार खूप अधिक उंचावर जाईल.
शेखबाईंचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांना प्रसिद्धीचा जराही सोस नाही. केवळ आपले नियत काम जास्तीत जास्त चोख करण्यावर त्यांचा सगळा भर असतो. कोणाच्या पुढे-पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव नाही, या ना त्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवायचाही त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्या मुंबईत होत्या ते साहित्याच्या दृष्टीने बहराचे दिवस होते. साहित्यसृष्टीत अनेक गट कार्यरत होते; अनेक संस्था होत्या. पुरस्कार दिले जात, कार्यक्रम सादर होत. त्यात कुठेतरी सामील व्हायचा प्रयत्न साहजिकच अनेक जण करत असत. प्रकाशझोत सगळ्यांनाच प्रिय असतो. पण आपले कॉलेज सोडले तर तशा कुठल्याही गटात शेखबाई कधी सामील झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. कुठल्याही प्रकारच्या ‘गॉसिप’मध्ये त्या कधीही सहभागी नसतात. कुठल्याही साहित्य संमेलनात किंवा परिसंवादात आमंत्रित वक्त्री म्हणून त्यांची वर्णी लागलेली नाही. त्यांनी स्वतःहून कधी तसा प्रयत्नही केला नाही. पुण्यातील किंवा मुंबईतीलही साहित्यिक वर्तुळात त्यांच्या फारशा ओळखी नव्हत्या. २०१५ साली त्यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार दिला गेला तो त्यांना मिळालेला पहिला मोठा पुरस्कार. तोही वयाच्या नव्वदीत मिळालेला. पारितोषिकांचा सुळसुळाट झालेल्या आजच्या काळातही अशा स्वरूपाचा गौरव त्यापूर्वी कधी त्यांच्या वाट्याला आला नव्हता ही एकच गोष्ट त्यांच्या प्रसिद्धिपराङ्मुखतेची साक्ष पटवायला पुरेशी आहे. शेवटच्या दहा वर्षांत मात्र अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले.
एक खंत मला जरूर वाटते; त्यांनी स्वतः फारच कमी लेखन केले. या लेखात पूर्वी उल्लेख केलेली दोनच पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांच्या नव्याण्णवाव्या वाढदिवशी दिलीप फलटणकर आणि भानू काळे यांनी संपादित केलेला एक गौरवग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात समाविष्ट केलेले शेखबाईंचे काही लेख त्यांच्या अंगी असलेल्या लेखनगुणांची साक्ष पटवायला पुरेसे आहेत. उदाहरणार्थ : ‘कळ्यांचे निःश्वास : निःशब्दाचे शब्दरूप’ हे पुस्तकपरीक्षण, किंवा ‘श्री. पु. भागवत : सहकारी आणि स्नेही’ आणि ‘श्री. म माटे – एका विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनातून’ ही व्यक्तिचित्रे. विशेष म्हणजे या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संपादनासाठी असलेला पुरस्कारही मिळाला. त्यांच्या लेखनशैलीचे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘मैत्र – एक पवित्र नाते’ या शीर्षकाचा मैत्रीबद्दलचा त्यांचा लेख. त्यात त्या लिहितात,
“माझ्या पपांची पंढरपूरला बदली झाली तेव्हा मी सहावीत होते. आमची ममा माझ्या वयाच्या दहाव्या वर्षीच आम्हांला कायमची सोडून गेली. देऊबाई नावाची एक स्वयंपाकीण आमच्याच घरात राहायची. ती स्वभावाने दुष्ट होती. पपांच्या अपरोक्ष ती आम्हां भावंडांचा दुःस्वास करी. आमची शाळा घरापासून बरीच दूर होती. सकाळी अकरा वाजताच घरून निघावे लागे. आम्हां बहिणींना मधल्या वेळी खाण्यासाठी डबा तिने कधीच दिला नाही. ‘स्वैपाक तयार नाही’ ही तिची सबब रोज ऐकायची आणि डबा न घेताच शाळेत जायचे! माझ्या वर्गातल्या ज्या मुलींची घरे शाळेजवळ होती, त्या मधल्या सुट्टीत घरी जेवायला जायच्या. ज्यांची घरे दूर होती त्या डबे आणायच्या. मी मधल्या सुट्टीत वर्गातच बसून राही. माझ्या तीन वर्गमैत्रिणींच्या ही गोष्ट लक्षात आली. त्या मला वर्गात बोलवायला आल्या. ‘मला भूक नाही; मी शाळेत येतानाच जेवून आले,’ असे मी त्यांना सांगू लागले. कसे कुणास ठाऊक, पण मी खोटे बोलते आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी माझ्या प्रतिकाराला न जुमानता अक्षरशः मला ओढून शाळेच्या पटांगणातील एका झाडाखाली नेले. त्यांनी आपापले डबे उघडले. भाजी, पोळी, भाकरी, लोणचे, चटणी असे काही काहीबाही त्यांच्या डब्यात होते. ‘चला, जेवू या,’ म्हणून त्यांनी जेवायला सुरुवात केली. मला फार संकोचल्यासारखे झाले. मी काही खाई ना. तेव्हा त्यांनी एकमेकींना नेत्रपल्लवी केली आणि आळीपाळीने मला घास भरवायला सुरुवात केली. माझ्या घशात आवंढा दाटून आला. घास गिळवेना. तेव्हा त्यांतल्या एकीने ‘घास घे रे तान्ह्या बाळा’ हे गाणे सुरेल आवाजात गायला सुरुवात केली. तिघीही माझ्याकडे पाहून मंद स्मित करू लागल्या. त्यांच्या दृष्टीत अजिजी होती. मलाही हसायला आले आणि त्या दिवसापासून रोज मी त्यांच्याबरोबर जेवू लागले. संकोच, अवघडलेपण गेले. गंमत म्हणजे आम्ही सर्व जणी त्या डब्यातूनच अन्न खात असू, कुणीही वेगळे वाढून घेत नसे. डब्यातून लागेल तसे खाणे हा कार्यक्रम होता. ‘तू डबा का आणत नाहीस?’ असा प्रश्न त्यांनी कधीच विचारला नाही. मला आई नाही हे त्यांना ठाऊक होते; पण त्याबद्दल दयाबुद्धीने किंवा सहानुभूतीने त्यांनी एक शब्दही कधी उच्चारला नाही; किंवा इतर कुणापाशीही ‘ही आमच्या डब्यातले खाते’ असे उद्गार काढले नाहीत. त्या काळात पंढरपूरसारख्या त्या गावात जातिभेदाचा अनुभव आम्हांला वारंवार येई. त्याच पंढरपुरात माझ्या या तीन वर्गभगिनींना एकाच डब्यातून जेवताना स्नेहाचे अतूट नाते माझ्याशी जोडावेसे वाटले! हा अनुभव इतका हृदयस्पर्शी होता, की आज इतक्या वर्षांनंतरही त्याच्या मधुर स्मृती माझ्या मनाला एक वेगळाच अवीट आनंद देऊन जातात आणि हृदय कृतज्ञतेने भरून येते. त्यांनी मला जे निरपेक्ष प्रेम दिले, ते किती मोलाचे होते हे शब्दांत सांगता येणार नाही.”
इथे थोडा व्यक्तिगत मजकूर लिहिला तर ते अनुचित ठरू नये. अंतर्नाद मासिकाच्या श्रेयनामावलीत ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून छापले गेलेले नाव म्हणजे यास्मिन शेख. पण आमचा संबंध केवळ व्यावसायिक पातळीवरचा कधीच नव्हता. तसे पाहिले तर त्यांची धाकटी मुलगी रुकसाना (सासरची रुमा बावीकर) आणि मी पाचवी ते अकरावी डी. एस. हायस्कूल या शीव येथील शाळेत एकाच वर्गात होतो. परंतु त्या काळी वर्गात मुलगे एका बाजूला आणि मुली दुसऱ्या बाजूला अशी अगदी सुस्पष्ट विभागणी असायची! जणू भारत आणि पाकिस्तान! धर्माव्यतिरिक्त इतरही अनुल्लंघनीय भिंती समाजात असतातच! त्यामुळे शेखबाईंबरोबर माझा खरा परिचय झाला तो अंतर्नादच्या माध्यमातूनच. पण लौकरच तो खूप दृढ झाला.
तो किती दृढ झाला त्याचे एक द्योतक. दिवस होता एप्रिल १५, २०२३. पुण्यातील डेक्कन जिमखान्याचे सभागृह. आम्ही साठ-सत्तर जण एकत्र जमलो होतो. माझा सत्तरावा वाढदिवस अनौपचारिकरित्या साजरा करण्यासाठी. “भानू काळे यांनी माझ्या पोटातून जन्म घेतला नसला तरी त्यांना मी माझा मानसपुत्रच मानते. या माझ्या प्रिय मानसपुत्राला दीर्घायुष्य लाभो अशी या प्रसंगी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते,” अशी सुरुवात करून त्यांनी केलेले ते चार-पाच मिनिटांचे भाषण ऐकताना इतर बहुतेक श्रोत्यांप्रमाणे माझेही डोळे पाणावले होते. त्यांनी असे सर्वांसमोर म्हणावे याहून अधिक कुठला गौरव माझ्या वाट्याला या आयुष्यात येणार होता? तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. अलीकडच्या काळात दिलीप फलटणकर हेही त्यांच्या जवळच्या संपर्कात आले आहेत आणि त्यांनाही शेखबाई मानसपुत्र मानतात.
शंभरीचा उंबरठा ओलांडल्यावरही दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात त्या गर्क असतात, स्वतःला गुंतवून घेतात. एक मोठे नवल म्हणजे मुद्रिते तपासताना त्यांना चष्माही लावावा लागत नाही. आजही दोन-तीन शब्दकोश नेहमीच त्यांच्या हाताशी असतात; एखाद्या शब्दाविषयी जराजरी शंका आली तरी कंटाळा न करता त्या शब्दकोश काढून तपासतील. लेखनसंस्कार करताना कुठलाही संदर्भ विचारा; लगेच सांगतील; स्वतःला ठाऊक नसेल तर मुद्दाम शोध घेऊन माहिती पुरवतील. तेही अगदी हसतमुखाने. इतक्या वर्षांत त्यांच्या चेहर्यावर कधी वैताग किंवा कंटाळा बघितल्याचे आठवत नाही. अगदी दुपारची वामकुक्षीही कधी पाच मिनिटांसाठीही घेत नाहीत. सतत स्वतःला अशा स्वरूपाच्या कामात गुंतवून घेणे त्यांना बहुधा आवडत असावे; त्यातूनही त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळत असावी.
यास्मिन शेख यांनी आता शंभरी ओलांडली आहे. वाढत्या आयुर्मानाच्या आजच्या काळातही हे तसे विशेषच आहे. त्यांचा जन्मदिन २१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस आणि अलीकडे तो जागतिक योगदिन म्हणूनही साजरा होतो हाही एक सुखद योग. या चिरतरुण वैयायोगिनीला भावी आयुष्यासाठी वंदनपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!
प्रा. यास्मिन शेख यांनी वयाची शंभरी ओलांडली याबद्दल त्यांचा पुण्यात २१ जून २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगीचे छायाचित्र.
(डावीकडून) कन्या रुमा बावीकर, वर्षा काळे, दिलीप फलटणकर, यास्मिन शेख, मिलिंद जोशी आणि भानू काळे
