पुस्तक परीक्षण : कार्यकर्ता ,एका राजाची अद्भुत गोष्ट. 

कार्यकर्ता :  लोकसाधनेचं  उत्तुंग स्वप्न साकार करणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांची आत्मकथा. 

लेखक :  सुमेध वडावाला( रिसबूड)

उन्मेष प्रकाशन

पहिली आवृत्ती

एक जून २०२५ 

मूल्य पाचशे रुपये. 

  आत्मकथा हा केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा वृत्तांत नसून, तो मानवी अनुभवांचा, संघर्षांचा आणि त्यातून साधलेल्या प्रगतीचा एक आरसा असतो. हे आत्मकथन सुमेध वडावाला यांनी शब्दबद्ध केले आहे.  आत्मकथन कोकणातल्या एका कार्यकर्त्याची वाटचाल सांगणारे आहे.  वडावाला यांनी त्यांच्या लिखाणातून कोकणदर्शन घडवले आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये.  कोकणातला निसर्ग, तिथली माणसे, त्यांचे स्वभाव यांचे वर्णन करताना त्यांच्या लेखणीला अक्षरशः धुमारे फुटले आहेत.  दांडेकरांची अद्भुत गोष्ट लोकांपर्यंत अत्यंत प्रवाही पद्धतीने त्यांनी पोहोचवली आहे.  कसबयत्ता, ओलसळसळी वारा, पोफळींचा धम्मस पिवळा रंग, अदृष्टाची योजना,उष्माशेष, स्कूटरपीट  यांसारखे त्यांचे शब्दप्रयोग चित्रदर्शी आहेत.  कथनाचा प्रवाह अशा प्रकारच्या कल्पक शब्दरचनेने एका वेगळ्या पातळीवर जातो. त्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. 

लौकिक अर्थाने हे पुस्तक म्हणजे डॉक्टर राजा दांडेकर यांचे आत्मकथन असले तरी ते त्यांचे व रेणू दांडेकर यांचे सहकथन  आहे.  लोकसाधनेचे उत्तुंग स्वप्न या दोघांनी एकत्र पाहिले.  त्यासाठी याच नावाच्या संस्थेची स्थापना करून दिवस-रात्र कष्ट केले आणि हे स्वप्न साकार केले.  अत्यंत योग्य वेळी या संस्थेची धुरा तरुणांच्या हाती देऊन  ‘इदं न मम’  म्हणत हे दोघेही ज्या निर्ममतेने बाजूला झाले आहेत ते अनुकरणीय आहे. दापोली तालुक्यातील गुडघे या गावात असलेल्या वरच्या घरात सुरू झालेली वाटचाल लोकसाधनेच्या विस्तारत चाललेल्या  कामांच्या स्वरूपात आजही चालू आहे. दांडेकरांनी पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु ही कार्यमुक्ती नाही याची ग्वाहीदेखील ते देत आहेत  अपूर्णता आणि अतृप्ती यातच विकासाच्या शक्यता सामावलेल्या  असतात  याची! 

  आत्मकथा हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. यात  लेखक स्वतःच्या आयुष्यातील अनुभव, आठवणी, विचार आणि भावना प्रामाणिकपणे कथन करतो. यामध्ये लेखकाच्या जन्मापासून ते आत्मकथा लिहिण्याच्या काळापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, ठिकाणे आणि त्यांतून मिळालेले धडे यांचा समावेश असतो. ही केवळ घटनांची जंत्री  नसते, तर त्या घटनांकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन, त्यातून झालेला वैचारिक विकास आणि जगण्याबद्दलचे तत्त्वज्ञानही यात प्रतिबिंबित होते. एका परीने कोकण परिसराचा सामाजिक इतिहासदेखील  दांडेकरांच्या  या कथनातून आपल्याला समजतो. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास या भारताच्या भवितव्याशी निगडित तीन विषयांच्या बाबत डॉक्टर दांडेकर यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे.  त्यांची ही वाटचाल  मुळातून  वाचण्यासारखी आहे. आयुर्वेदिक शिक्षणाची सद्यःस्थिती,  ग्रामीण आरोग्य व्यवस्था,  शिक्षणक्षेत्र,  शिक्षण क्षेत्रातील संस्थांना शासकीय मान्यता मिळविण्याचे  दिव्य आणि त्या निमित्ताने होणारा भ्रष्टाचार वाचकाला अस्वस्थ करणारा आहे. त्या काळात त्यांनी महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्रातील सुमारे १८  आयुर्वेदिक महाविद्यालये व त्यांत दिले जाणारे आयुर्वेदिक शिक्षण यांचे केलेले सर्वेक्षण मला फार महत्त्वाचे वाटते.  आजही मिक्सओपॅथी वरून शासन स्तरावरती जो गोंधळ चालू आहे तो कधीतरी बंद केला पाहिजे.  

 एका संघनिष्ठ घरात जन्माला येऊनदेखील गांधी विचारांच्या बाबत  ममत्व बाळगणे   हे दांडेकरांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. हे महत्त्व नुसते वैचारिक पातळीवर मर्यादित राहत नाही तर चिखलगाव व परिसरात केलेले वेगवेगळे शिक्षण व ग्रामविकासाचे प्रयोग यांतून हा वेगळा दृष्टिकोन जाणवतो.  हे मतभेद आपल्या वडिलांना स्पष्टपणे बोलून दाखवण्याचे धार्ष्ट्य दांडेकरांच्यात आहे.  त्यासाठी त्यांना संघातील ज्येष्ठ मंडळींनी केलेली मदत महत्त्वाची आहे. सर्वसमावेशकता आणि मनपरिवर्तन यावर संघाचा पूर्ण विश्वास असल्याचे वेळोवेळी सांगितले जाते.  या विश्वासाचा वापर करून  दांडेकरांनी  संघ विचार व  गांधी विचार यांचा  लसावि काढून दाखवला.  त्यांचा हा प्रयोग इतरत्र झाला  तर देशापुढले अनेक महत्त्वाचे प्रश्न चुटकीसरशी संपतील का? 

डॉक्टर दांडेकरांच्या या प्रवासात त्यांना अनेक मोठी माणसे भेटली.  काही नावाने मोठी पण मनाने छोटीही माणसे भेटली.  या दोन्ही प्रकारच्या माणसांबद्दल त्यांनी तटस्थपणे परंतु स्पष्टपणे लिहिले आहे.  नानाजी देशमुख, भवरलाल जैन, मोहन धारिया, सत्यनारायण साहू  यांसारख्या दिग्गजांचे प्रेम दांडेकरांना लाभले.  दांडेकरांच्या मनात वेळोवेळी आलेले अशक्यप्राय संकल्प सिद्धीस नेण्यासाठी या सर्व मान्यवरांनी त्यांना मनापासून मदत केली. 

 अनेक स्वयंसेवी संस्थांची नंतर संस्थाने  होतात आणि त्याचे नियंत्रण आपल्याच घरात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात आणि त्यातून अंतिमतः कार्यनाश होतो असे आपण अनेक वेळा पाहतो.  लोकसाधनेच्या विद्यमान नेतृत्वात दांडेकरांच्या घरातली काही मंडळी आहेत; परंतु त्यांनी आपले अस्तित्व आपल्या कामाने सिद्ध केलेले आहे.  या लोकांच्या बरोबर लोकसाधनेशी निगडित असलेले अनेक माजी विद्यार्थीदेखील आता संस्थेच्या कामात भाग घेतात ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. 

  डॉक्टर राजा दांडेकर यांनी आपल्या आयुष्याचा पट या पुस्तकात एकंदरीत   सात प्रकरणांमध्ये मांडलेला आहे. 

१ लोकसाधनेच स्वप्न, २  शिक्षण ३ आरोग्य   ४कृषी  ५  महिला सक्षमीकरण ६  ग्रामविकास  ७सुफळ संपूर्ण  अशी त्या प्रकरणांची नावे आहेत.  लोकसाधना ही त्यांची संस्था. या संस्थेच्या कामाची सुरुवात चिखलगाव येथे शाळा काढून झाली. सामूहिक लोकमुक्तीचे एकमेव साधन शिक्षण आहे अशी या संस्थेशी निगडित सर्व लोकांची भावना आहे.  सुशिक्षित समाज ही ग्राम कल्याणाची पूर्व अट आहे हे खरेच आहे  आणि अशी अनेक सुशिक्षित गावे निर्माण होणे म्हणजेच राष्ट्रनिर्माण. शाळेच्या माध्यमातून सुरू झालेल्या कामाचा हळूहळू विस्तार झाला आणि आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण आणि एकंदरीतच ग्रामविकास असा या कामाचा विस्तार झाला.  सुरुवातीला चिखलगाव परिसरातील ४६ गावे केंद्रस्थानी ठेवून सर्व आखणी होत होती.  आता नवीन पिढीने कामाचा पल्ला ५६ गावांपर्यंत वाढवला आहे.  फक्त पुस्तकी शिक्षणावरती विश्वास न ठेवता ज्या शिक्षणातून रोजगार मिळेल व जमल्यास शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल असे शिक्षण देण्याचा जाणीवपूर्वक  प्रयत्न  लोकसाधनेने केला आणि निदान चिखलगाव परिसराचा तरी  कायापालट झाला. 

 डॉक्टर दांडेकर यांच्या सर्व संकल्पनांना समर्थ दाते लाभले. तेर देस होम, नानाजी देशमुख, भवरलाल जैन, नितीन साबळे यांसारखे वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक  राजाभाऊंना भेटले. या लोकांनी सर्व प्रकल्पाला वेळोवेळी आर्थिक मदत तर केलीच पण त्यासोबत राजाभाऊंना नैतिक मदतही केली आणि ते फार महत्त्वाचे ठरले.

लोकसाधनेसाठी डीएड कॉलेज काढणे आणि ते आठ वर्षांनी बंद करणे यावर राजाभाऊंना आलेला अनुभव, लोकमान्य मंदिराच्या संदर्भात आलेला अनुभव,  सुरुवातीच्या काळात दांडेकर कुटुंबीयांवर इतर गावाने टाकलेला बहिष्कार हे काही अनुभव मुळातून  वाचण्यासारखे आहेत.  एक सुसंस्कृत समाज होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाटचाल करायची आहे  त्याची विदारक जाणीव हे वाचल्यावर होते. 

 रेणूताई दांडेकर, गंगाधर रामचंद्र दांडेकर यांच्याशिवाय हे स्वप्न साकार झाले नसते,  याची जाणीव राजाभाऊंच्या सर्व लिखाणात दिसून येते.  सततची व  अविश्रांत भ्रमंती हे राजाभाऊंच्या स्वभावाचे एक  महत्त्वाचे  वैशिष्ट्य. दांडेकरांनी केलेल्या  तीन प्रकारच्या भटकंतीचे वर्णन यात आहे. गो. नी.  दांडेकर यांचे सोबत  दुर्गभ्रमण,  वैद्य खडीवाले यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रात फिरून आयुर्वेद शिक्षण स्थितीचे सर्वेक्षण आणि ग्रामदर्पण अहवाल तयार करण्यासाठी केलेली भटकंती हे  फार महत्त्वाचे आहे. 

  एक अत्यंत वाचनीय पुस्तक असे याचे वर्णन करावे लागेल.  स्वयंसेवी संस्था कशा चालवल्या पाहिजेत याचा वस्तुपाठ डॉक्टर राजा व रेणूताई दांडेकर यांनी दिला आहे.  आत्मकथनामुळे तो प्रवास इतरांना समजेल.  त्यामुळे भविष्यात समाजासाठी काही करू पाहणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक दीपस्तंभाचे काम करेल.  नानाजी देशमुख यांनी, ‘कुटुंब हा समाजाचा आधारभूत घटक आहे.  पती-पत्नीने मिळून सामाजिक कार्य करणे ही आदर्श पद्धत आहे,’ असा जो मंत्र दिला होता तो दांडेकर पती-पत्नींनी शिरोधार्य मानून सुमारे साडेतीन तपे केलेल्या तपश्चर्येचा हा लेखाजोखा विचार करायला भाग पाडतो. 

या संस्थेची सूत्रे हस्तांतरित करत असताना डॉक्टर राजा दांडेकर लिहितात :

मी ‘अथक प्रयत्नवादी’ असलो तरी दैवाचं  अस्तित्व मी अमान्य करत नाही. ‘योगायोग’ तर अनेकदा अनुभवायला मिळाले मला.  प्रयत्न आणि अपेक्षित यश, योग्य कर्मकृती आणि अपेक्षित घटित यांचा सुसंगत संबंध प्रत्येक वेळी निश्चित असता तर ग्रामोन्नतीचा ध्यास घेतलेल्या आमच्या कुटुंबाला, आरंभीची अनेक वर्षं गावाने वाळीत  टाकल्याचा अनुभव घ्यावा लागला नसता.  त्याबद्दल मनात कटुता नाहीच.  ‘योगायोगा’बद्दलची रास्त  कृतार्थता मनात जागी आहे. मला सामाजिक कार्याची ‘लोकसाधना’ करायची होती; ती मी माझ्या परीने केलीही. पण स्वतंत्र कर्तृत्वाची क्षमता अंगी असलेल्या बायकोनेही त्या कार्यात झोकून द्यावं, पुढे ‘कॉर्पोरेट’ जगतातल्या करिअरची सहज संधी शक्य असणाऱ्या उच्चशिक्षित मुलाने, सुनेनेही त्या ‘साधनेशी’ आपली जन्मबांधिलकी मानावी, हा योगायोग उर्फ सुखस्थिती म्हणजे दैवाची प्रसन्नताच आहे.”  

हे लिहून आपल्या कुटुंबाचे मिळालेले सहकार्य हे किती महत्त्वाचे आहे ते अधोरेखित करत असतानाच अपूर्णता आणि अतृप्ती यांतच विकासाच्या शक्यता सामावलेल्या असतात याची त्यांना असलेली जाणीव आश्वासक आहे. संस्थेची अपूर्णता आणि विस्तारवाढीच्या शक्यता ते नवीन नेतृत्वाला सांगण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत हे आशादायक आहे. 

Author

Leave a Reply