लाटा

विजू शेजारच्या वहिनींच्या घरी हॉलमधल्या कोचावर बसला होता. वहिनींची वाट पाहत होता. नेहमीचंच दृश्य.

भिंतीवरचा टीव्ही. कोपऱ्यातली काचेची शो केस. त्यातले विजूला आवडणारे छोटे हत्ती.

वहिनी आंघोळ आटपून हॉलमधे आल्या. टॉवेलने ओले केस पुसता पुसता विजूकडे बघून हसल्या. आज फार देखण्या दिसत होत्या वहिनी.

त्या विजूच्या जवळ कोचावर येऊन बसल्या – खूप जवळ. त्यांचा गंध विजूला येत होता, स्पर्श होत होता.

अचानक त्यांनी विजूला जवळ घेतलं आणि त्याच्या गालावर ओठ टेकले.

विजू जागा झाला. काय झालंय ते त्याच्या लक्षात आलं. सुखाची लाट ओसरली आणि अपराधीपणाने तो थिजून गेला.

शेजारच्या वहिनी – विवाहित. त्याच्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठ्या. विजूवर माया करणाऱ्या. विजू माझ्या भावासारखा आहे म्हणणाऱ्या.

त्यांच्याविषयी असं घाणेरडं स्वप्न पडावं? लाजेनं, पश्चात्तापानं त्याचं मन भरून गेलं. त्याच्या वर्गातल्या काही मुली त्याला आवडायच्या. त्यांच्याविषयी आकर्षण वाटायचं. ते सगळं त्याला छान वाटायचं; पण वहिनींविषयी असली घाणेरडी भावना त्याच्या मनात दबा धरून बसली होती. वहिनींविषयी…

तो अकरावीत गेला आणि शेजारच्या फ्लॅटमधे कामत दादा-वहिनी भाड्याने राहायला आले. कामत दादा इंजिनीयर होते. मोठ्या कंपनीत नोकरीला होते. सकाळी सात वाजता जायचे ते संध्याकाळी सात – आठ – नऊ केव्हाही यायचे. त्यांना फक्त रविवारी सुटी असायची.

कधीतरी येणारे पाहुणे सोडले तर वहिनी निवांत असायच्या. दादांच्या डब्याबरोबर त्यांचा स्वयंपाक होऊन जायचा. दोनच माणसांचं असं कितीसं काम असणार! 

वहिनी नोकरीची खटपट करत होत्या; पण ती काही मिळत नव्हती. मग त्या कॉंप्युटरवर करण्यासारखी कामं घेत असत. कसलं तरी भाषांतर, कसलं शब्दांकन. बाकी वेळात काहीतरी नवीन शिकायच्या. रेसिपीचे कार्यक्रम बघून काहीबाही प्रयोग करायच्या.

काहीच नसलं तर टी. व्ही. असायचाच; पण वहिनींना सिरियल्स बघायला आवडायच्या नाहीत. त्यांना क्रिकेटचे सामने बघायला जास्त आवडायचं. टेस्ट असो, वन डे असो की टी २०. सामना उत्कंठावर्धक असो की कंटाळवाणा. अखंड वेळ तो पाहायच्याच.

विजूची आई वहिनींपेक्षा वयाने बरीच मोठी असूनही दोघींचं खूप जमलं. मोठ्या डोळ्यांच्या सावळ्या तरतरीत वहिनी विजूच्या आईला आवडल्या. काही वेगळा पदार्थ केला की आई विजूला म्हणायची, ‘जा तुझ्या वहिनीला देऊन ये.’ कधीकधी वहिनींच्या प्रायोगिक स्वयंपाककृतीत काही बिघडलं  की त्या धावत पळत आईकडे यायच्या आणि म्हणायच्या, “काकू दोन मिनिटं या ना, काहीतरी गोंधळ झालाय.” आईसुद्धा हातातलं काम टाकून शेजारी जायची.

पण वहिनींची खरी गट्टी जमली ती विजूशी. विजूचं कॉलेज दुपारचं असायचं. कॉलेजातून आला की तो खूप वेळा वहिनींकडे असायचा. कॉलेज लवकर सुटलं किंवा सुटी असली की तो तासचे तास वहिनींकडे असायचा. वहिनींनी चित्रपट पाहिलेले असत. क्रिकेटपटूंची त्यांना इत्थंभूत माहिती होती. कॉलेजमधल्या गमती ऐकायला त्यांना मजा यायची. सिरीयल्स, रिल्स, पुस्तकं कुठलाच विषय त्या दोघांना वर्ज्य नव्हता. विजूची सगळी सिक्रेट्स त्यांना माहीत असायची.

विजूच्या आईने एक नियम मात्र घालून दिला होता. संध्याकाळी सातनंतर कामतदादा घरी येतात तेव्हा तिथे रेंगाळायचं नाही. आई रविवारी पण विजूला त्यांच्याकडे जाऊ देत नसे. म्हणायची, ‘आधीच तो गृहस्थ फार घरी नसतो. एक रविवार त्यांना दोघांना मिळतो त्यात तू नको जाऊ त्यांना डिस्टर्ब करायला.’

विजूला राग यायचा. त्याला वाटायचं म्हणावं, ‘मला कळतं सगळं. ते काय दिवसभर तेवढंच करत असतील!’ 

बघता बघता विजू बारावीत गेला. आता तो खूप वेळ वहिनींकडे बसून अभ्यास करीत असे. त्या त्यांचं काहीतरी काम करीत राहत.

विजूला आता आई खुळी वाटे आणि बाबा दूरस्थ. मित्र बरोबरीचे होते पण त्यांना मनातलं सगळं काही सांगता यायचं नाही. काहीही सांगता येईल, विचारता येईल अशा फक्त वहिनी होत्या.

त्यांनाही विजूशिवाय चैन पडत नसे. दोन दिवस जरी विजू त्यांच्याकडे गेला नाही तरी त्या विचारत ‘काय रे? आलास नाहीस? वेदाच्या नादात वहिनींना विसरलास वाटतं!’ 

…आणि आज पहाटे पडलेल्या स्वप्नाने त्या सगळ्याची माती झाली होती. काहीतरी भयंकर घडलं होतं. एक कधीच न धुतलं जाणारं पाप घडलं होतं. एका अंतहीन गर्तेत तो कोसळला होता.

विजू अस्वस्थ झाला. त्याचं कशात लक्ष लागेना. तो पापी होता. कसला तरी ओंगळ स्पर्श त्याला झाला होता. कितीही पश्चात्ताप केला तरी आता उपयोग नव्हता. तो कोवळा मुलगा गांगरून, भेदरून गेला.

चार दिवस तो वहिनींकडे गेला नाहीच; पण तो त्यांना टाळू लागला.

वहिनींच्याही ते लक्षात आलं.

विजू  आपल्या घरात खुर्चीत बसून अभ्यास करीत होता. कोणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. विजूनं दचकून वर बघितलं. वहिनी उभ्या होत्या.

विजूच्या केसांवरून हात फिरवून म्हणाल्या, “रागावलायस का रे? बोलत नाहीयेस अगदी.”

वहिनी खूप जवळ उभ्या होत्या. त्यांचा उबदार मऊ हात त्याच्या डोक्यावर होता. त्यांच्या अंगातल्या कपड्यांचा स्पर्श त्याच्या हाताला होत होता. त्यांच्या केसांचा हलका गंध येत होता.

त्याच्या आईचा स्पर्श असाच तर होता.

चार दिवसांत प्रथमच त्याला धीर आला. वहिनींच्या स्पर्शाने, शब्दांनी जणू त्याचं पाप विरून गेलं. त्या दोघांचं नातं तसंच अनाघ्रात होतं. एखाद्या देवघरातल्या समईसारखं तेवत होतं.

क्षणभर त्याला वाटलं परवा स्वप्नात आल्या त्या वहिनी नव्हत्याच. दुसरीच कोणी बाई होती. त्याचा अपराध वितळला मन हलकं हलकं झालं. डोळ्यांत आलेलं पाणी लपवत तो कसबसं बोलला, “तसं काही नाही. उद्या येतो गप्पा मारायला.”

दुसऱ्या दिवशी आई विजूला म्हणाली, “या वड्या तुझ्या वहिनीला नेऊन दे.”

विजूला वाटलं वड्या पण द्याव्या आणि थोडा वेळ बसून गप्पापण माराव्या. विजूने कामतांच्या घराची घंटा वाजवली. वहिनींना दार उघडायला वेळ लागला. होलमधून पाहून दरवाजा उघडता उघडता त्या म्हणाल्या, “तूच आहेस ना? ये”

विजू आत आला. त्याने वहिनींकडे पाहिलं. वहिनींनी गाऊन कंबरेजवळ बांधला होता. त्यांचे गुडघ्यापर्यंतचे पाय दिसत होते. काम करताना गाऊनच्या छोट्या बाह्या दुमडल्या गेल्या होत्या. गाऊनचा गळा खाली खेचला होता.

वहिनी वळून आत निघता निघता म्हणाल्या, “बाथरूममध्ये होते. कपडे धुते, मग अंघोळ करून येते. बस तोपर्यंत अभ्यास करत.”

स्वप्नातल्यासारख्या त्याच्या संवेदना जाग्या होऊ लागल्या. सुख, उत्तेजना, भीती आणि अपराधीपणा यांच्या लाटा त्याच्या शरीरभर उसळल्या.

स्वतःला सावरत तो म्हणाला, “नाही नाही मी बसत नाही. आईने या वड्या दिल्यात. तिने मला लगेच बोलावलंय. काहीतरी काम आहे म्हणाली.”

 

Author

Leave a Reply