वसाहतवाद – एक अन्वयार्थ   

Image of

वसाहतवाद हा colonialism या शब्दाचा मराठी अनुवाद. ‘Colonia’ या लॅटिन मुळापासून ‘कलोनियालिझम’ हा शब्द तयार झाला आहे. एका राष्ट्राने दुसऱ्या देशावर प्रस्थापित केलेले राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वर्चस्व हा वसाहतवादाचा गाभा आहे. प्रगत देशाने अप्रगत देशांशी व्यापारउदिमाच्या मिषाने; त्या अप्रगत देशात प्रवेश करून, हळूहळू हातपाय पसरून, त्या देशाचा ताबा घेऊन त्या देशाचे शोषण करणे असे ढोबळ मानाने त्याचे वर्णन करता येईल.                                                    

वसाहतवादाचे फायदे-तोटे                                                                   

वसाहत झालेल्या देशात वसाहत करणाऱ्या देशाची भाषा येते. या नवीन भाषेमुळे ज्ञान-विज्ञानाची नूतन दालने उघडतात. नव्या शिक्षणसंस्था, नवीन शिक्षणपद्धती येते. वसाहत करणारे आणि भूमिपुत्र – नेटीव्ह्ज यांचे घर्षण होते. या घर्षणातून  फायद्या-तोट्याच्या ठिणग्या उडतात. या ठिणग्यांचे परिणाम भूमिपुत्रांच्या समाजातील वरपासून खालपर्यंत असणाऱ्या स्तराच्या उतरंडीवर वेगवेगळे असतात. यातील समाजातील वरच्या स्तरांना जास्त फायदे होतात, असे इतिहास पाहिला तर दिसून येते. विद्याशाखीय इतिहास वाचण्याने जो ज्ञानानुभव  मिळतो त्यापेक्षा निराळे ज्ञान  त्याच कालखंडातील पत्रव्यवहार वाचल्याने मिळते. अशा प्रकारच्या ज्ञानाला एका विचारवंताने ‘पोएटिक नॉलेज’ ‘काव्यात्म ज्ञान’ असे म्हटले आहे. तो अनुभव विश्रब्ध शारदा पत्रखंड पहिला १८१७-१९४७ संपादक ह. वि. मोटे (प्रथमावृत्ती १ मे १९७२ ह. वि. मोटे प्रकाशन) वाचताना आला. गं. दे. खानोलकर यांनी पत्र परिचय आणि टिपा नोंदवल्या आहेत. दि. के. बेडेकरांची अर्थसखोल ४० पानी प्रस्तावना आहे.                                                                      

 यात ब्रिटिश अधिकारी, मिशनरी, नेटिव्हांतील धुरीण यांच्यातील पत्रव्यवहार आहे. वानगीदाखल एक-दोन – ‘मिशनऱ्यांना इंग्रज सत्ताधाऱ्यांचे पाठबळ होते. पण ते जुजबी होते.’ निज्बिट हा मिशनरी आपल्या मिशनरी मित्राला म्हणतो, की ‘आपल्या जातभाई देशबांधवांत आपले शत्रूच आहेत व ते आपल्या कार्याला  निष्फळ मानतात, आपल्याला शेखमहंमदी समजतात आणि आपली तुच्छतेने हेटाळणी करतात.’                                                              

   ॲडम  या ब्रिटिश अधिकाऱ्याला ‘परके म्हणून, राज्यकर्ते म्हणून मराठी लोकांत  कसे मिसळावे व मिसळू नये’ हे एल्फिन्स्टनने एका  पत्रात मार्मिक शब्दांत लिहिले आहे. येथील इंग्रजांच्या पार्टीज् चा  आणि भाषणांचा त्याला मनस्वी कंटाळा होता. तो इंग्लंडला परत गेल्यानंतर अभ्यासात रमला. कार्ल मार्क्स त्या काळात लंडनला होता. मार्क्सने एल्फिन्स्टनला इंग्लंडमध्ये भेटून भारताबद्दल चर्चा केली होती हे लक्षणीय आहे.                                                          

   मुंबईतील नेटीव्ह जनरल लायब्ररीला पैशांची निकड होती; तेव्हा एल्फिन्स्टन इंग्लंडला परत गेला होता; पण तो मुंबईला विसरला नव्हता, त्याने वीस पौंडाची देणगी तिकडून पाठवून दिली.अशी अनेक पत्रे वाचल्यानंतर इतिहासाकडे पाहण्याचा एक सुयोग्य आणि सर्वसमावेशक नजरकोन तयार होण्यास मदत होते.                                     

आणखी एक पत्रोत्तरी इतिहासाचे  उदाहरण :  आर एल स्टीव्हन्सन (१८५०-१८९४) ‘डॉ. जेकिल आणि मिस्टर हाइड’चा सुप्रसिद्ध लेखक शेवटची काही वर्षे समोआ या पॅसिफिक आयलंडवर  राहत होता. त्याचा देहांत तेथेच झाला. समोआत जर्मन आणि अमेरिकनांच्या वसाहती होत्या. तेथील न्यायाधीश, नगरपालिकेचे प्रमुख ब्रिटिश होते. स्टीव्हन्सन समोअन नेटिव्हांचा दोस्त होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांची वागणूक आणि व्यवहार त्याला पसंत नव्हते. याबाबतची अनेक ठाम ठोस पत्रे त्याने समोआहून ‘लंडन टाइम्सला’ लिहिली. ती प्रकाशित झाली. त्यांची ब्रिटिश पार्लमेंटने दखल घेतली. या पत्रांचा सारांश आणि इतर माहिती स्टीव्हन्सनच्या दोन खंडी चरित्रात वाचल्यानंतर समोअन लोक, तेथील वसाहतकार, तेथील वातावरण याचा एक निराळा ‘फील’ मला आला. ‘फील’ म्हणजे तर्कबुद्धी आणि भावनिक बुद्धी यांची सरमिसळ. याला ‘काव्यात्म ज्ञान’ असे म्हणता येईल.                                                               

वसाहतकार परत गेले पण…                                                               

स्वातंत्र्याचा कोंबडा आरवला. वसाहती संपल्या. भूमिपुत्र पारतंत्र्यातून मुक्त झाले. स्वातंत्र्यदिन साजरे होऊ लागले. त्यानंतर भारतासारख्या वसाहत-मुक्त देशात काय घडले याचा आढावा संशोधकांनी घेतला आहे आणि काही प्रश्न उभे केले आहेत.                                                         वसाहतकारांनी जे कायदेकानू, नियम केले होते ते त्यांच्या सोई-फायद्याकरता, तसेच भूमिपुत्रांवर वचक ठेवण्यासाठी केले होते. वसाहतवाद संपला, साम्राज्यवादाचा अंत झाला, त्या वसाहतवादातील तथाकथित तर्कज्ञानाचा अर्क मागे उरला. हे कायदेकानू, नियम थोडेफार बदलून वसाहत संपलेल्या देशातील सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणेच्या पथ्यावर पडले, त्यांनाही सोईचे ठरले. याचा सामान्यांच्या जगण्यावर परिणाम झाला. लोकशाहीतील काही समस्यांचे मूळ काही प्रमाणात वसाहतवादात आहे.                                                    

द व्हाइट मॅन्स बर्डन                                                                

Rudyard Kipling (१८६५ जन्म मुंबई – १९३६ मृत्यू लंडन) हा इंग्लीश पत्रकार आणि कादंबरीकार, याच्यावर आर. एल. स्टीव्हन्सनच्या लेखनाचा प्रभाव होता. फिलीपाइन आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या संदर्भात किप्लिंग याने ‘द व्हाईट मॅन्स बर्डन’ ही कविता लिहिली. १८९९ साली ती प्रकाशित झाली. त्या कवितेचा आशय थोडक्यात ‘अमेरिकेने युद्ध जिंकून फिलीपाइन येथे वसाहत करावी. वेस्टर्न देशांनी अप्रगत देशात वसाहती करून युरोपियन कायदे आणि संस्कृती आणावी. ही गोऱ्या लोकांची जबाबदारी आहे. गौरेतरांना सुसंस्कृत करणे हे गोऱ्या लोकांवरचे ओझे आहे.’ या कवितेवर जगभरात खूप टीका झाली. मार्क ट्वेन या अमेरिकी लेखकाने त्या कवितेवर विडंबनात्मक लेख लिहिला होता. ही कविता विस्मृतीत गेली तरी ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ हा शब्दप्रयोग ‘पॅटर्नलिस्टिक ॲटिट्यूड’  या अर्थाने वापरला जाऊ लागला. ‘आपण वडील असून शहाणे, सुसंस्कृत आहोत, इतरेजन  अडाणी आणि मूर्ख असून त्यांना    शिकवणे, सुधारणे ही आपली जबाबदारी आहे असा दृष्टिकोन बाळगून वर्तन करणे’ असा या शब्दप्रयोगाचा आशय आहे. बऱ्याच वसाहत संपलेल्या समाजांचा समाज-मानसिक अभ्यास झालेला आहे. सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा काही प्रमाणात असा दृष्टिकोन बाळगून व्यवहार करतात. यामुळे सामान्य माणूस आणि अशा यंत्रणा यांच्यात तेढ निर्माण होते असे आढळून आले आहे; कारण अशा व्यवहारात ‘दुसऱ्याला कमी लेखण्याची भावना असते.                                   

 सामान्यांची शोकात्मिका                                                                             

 Tragedy Of The Commons ही संकल्पना मांडणाऱ्या Elinor Ostrom (१९३३-२०१२) यांना २००९ सालचे अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले. या अमेरिकी महिला अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणाऱ्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ ठरल्या. त्यांनी अनेक वर्षे अर्थशास्त्रात संशोधन केले आणि आफ्रिका  आणि नेपाळ या अप्रगत देशांत ‘फील्ड वर्क’ केले. त्यांनी केलेल्या संशोधनाचा सुलभ आशय पुढील प्रमाणे – ‘जंगले, नद्या, नाले ही साधनसंपत्ती तेथे राहणाऱ्या सगळ्यांची असते. त्याचे नियोजन तेथील सामान्यांवर सोडल्यास ते ही साधनसंपत्ती आणि सामग्री अत्यंत योग्य प्रकारे आणि खर्चफलदायी पद्धतीने वापरतात.’ एलिनॉर ऑस्ट्रॉम यांनी अनेक वर्षांच्या संशोधन, तसेच फील्ड वर्क आणि आकडेवारीनिशी हे सिद्ध केले.‘ही साधनसंपत्ती तेथील सामान्य लोक जास्त प्रमाणात वापरतील (उधळतील)’ असा पारंपरिक दृष्टिकोन आहे. त्याला छेद देणारे ऑस्ट्रॉम यांचे संशोधन होते.‘पण लक्षात कोण घेतो’ असे वाटल्यामुळे असेल त्यांनी त्यांच्या या संशोधन संकल्पनेचे नाव ‘सर्वसामान्यांची शोकात्मिका’ असे ठेवले असावे असे वाटून गेले. 

बौद्धिक क्रांति                                                                          

असे जरी असले तरी सामान्यांचा सहभाग याबाबत मानववंशवैज्ञानिक, उत्क्रांतिवादी जैववैज्ञानिक यांनी गेली अनेक वर्षे संशोधन केले आहे.        समाजातील सर्व स्तर आणि दूरवर पसरलेला बहुजन समाज यांच्यातील कल्पनांचे, विचारांचे आदान-प्रदान सबंध समाजाच्या उत्क्रांतीसाठी भरणसामग्री असते. याबाबत झालेल्या संशोधनाचा आढावा घेणे योग्य ठरेल.                                                                                                                  बहुविध कल्पनांचा समाजात चालू असलेला संघर्ष समाजाला आकार देत असतो. ‘राज्यसंस्था-स्टेट’ नागरिकांकरता नाही तर नागरिकांसह या संघर्षाला वाट करून देते तेव्हा समाजाचा आकार बदलू लागतो. ती एक समाजाची बौद्धिक क्रांती ठरते.                                   Joseph Henrich ( जन्म 1968 – ) हे अमेरिकी मानववंशवैज्ञानिक असून हार्वर्ड विद्यापीठात उत्क्रांतिवादी जैवविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लिहिलेले ‘The Weirdest People in The World’(प्रकाशन साल २०२०) यातील विचार वाचल्यानंतर बराच उजेड पडतो. माणूस जगाबाबतचे आकलन कसे करून घेतो, जीवनमूल्ये कशी ठरवतो, याची उखीविखी त्यांनी या पुस्तकात केली आहे. माणूस उत्क्रांत होऊ लागला, त्याच्या डोक्यात नाना कल्पना येऊ लागल्या – हे कसे घडले? माणसाने एकट्याने केलेली तीक्ष्ण निरीक्षणे आणि केलेली विश्लेषणे एवढ्याने त्याला कल्पना सुचू लागल्या असे घडलेले नाही. सामाजिक  विणलेल्या जाळ्याचे मानवी समूह तयार झाले. त्यामुळे सामूहिक मन-मेंदूची निर्मिती झाली. ही एक समजूतदार आणि बुद्धिसंगत घटना होती. हे पिढ्यानुपिढ्या घडल्यामुळे अनेक वर्षांच्या कल्पनांची साठवण झाली, मोठा साठा तयार झाला. त्यामुळे समूहातील एका सभासदाच्या कल्पनांपेक्षा हा साठा कितीतरी मोठा आणि उपयुक्त ठरला. याला आज आपण crowdsourcing of ideas म्हणतो. पण हे गेली हजारो वर्षे चालू आहे.                                         

यातून फक्त चांगल्या कल्पना निर्माण झाल्या असे मुळीच नाही. मानवाच्या इतिहासात असे कितीतरी कालखंड आहेत जेव्हा वाईट कल्पना निर्माण झाल्या आणि त्यांच्या प्रभावाखाली माणसांचे समूह वाईटपणे वागले. कालाच्या ओघात मानवप्रजातीत पुनर्शोध घेण्याची आणि स्व-दुरुस्तीची यंत्रणा निर्माण झाली म्हणून माणूस आजच्या स्थितीला येऊन पोचला आहे. असे कसे किंवा का घडले असावे याबाबत संशोधकांनी थिअरी मांडली आहे. समाजात ‘विजडम’ –  ‘शहाणपणाची’ निर्मिती होते. Generic Knowledge – सामान्यांचे ज्ञान आणि तज्ज्ञांचे Contextual Knowledge – संदर्भयुक्त ज्ञान   ही एकत्र येतात किंवा त्यांचा संगम होतो तेव्हा शहाणपण तयार होते. हा शहाणपणाचा ऐवज पुनर्शोध आणि स्व-दुरुस्तीची यंत्रणा निर्माण करत असावा. हे चुकतमाकत पद्धतीने घडते अशी ही थिअरी आहे. याचे दृश्यरूप आपण अनुभवत आहोत.                                            

वसाहतकारांवर परिणाम                                                          

युरोपीय देशांनी केलेल्या वासाहतवादाचा युरोपीय वसाहतकारांवर आणि युरोपीय समाजावर काय परिणाम झाला त्याचे विश्लेषण करणारे पुस्तक नुकतेच वाचले.    Aime Cesaire (१९१३-२००८) हे कृष्णवर्णीय कवी, कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ यांनी Discourse on Colonialism हे फ्रेंच भाषेत लिहिलेले पुस्तक Joan Pinkham यांनी इंग्लीशमध्ये अनुवादित केले (Aakar Books २०१८) या पुस्तकाला Robin d g Kelley (जन्म १९६२ वय ६३) या अमेरिकी इतिहासकाराची ‘a poetics of anticolonialism अशी भावगर्भ प्रस्तावना आहे. एमी सिझेर यांचा जन्म Martiniqueचा  पण शिक्षण पॅरिस येथील सुप्रसिद्ध शिक्षण संस्थेत झाले. त्यांचे हे पुस्तक बरेच गाजले. त्यांनी वसाहत करणाऱ्या गोऱ्या लोकांवर, त्यांच्या विचारसरणीवर, वर्तनावर प्रखर प्रकाश टाकला आहे. वसाहतवादाचा वसाहत करणाऱ्यांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण सिझेर यांनी केले आहे. वसाहत करणारे स्वतःच कसे असंस्कृत – डिसिविलाइज्ड होत गेले आणि छळ, हिंसा, वर्णद्वेष आणि अनैतिकतेचे विलक्षण ओझे या तथाकथित ‘सिविलाइज्ड – सुसंस्कृत’ वसाहतकारांवर होते आणि आजही आहे. या ओझ्याच्या जड वजनाखाली हे गोरे वसाहतकार रानटीपणाच्या खोल विवरात आणखी खाली खाली गेले. वसाहतकारांच्या सत्तेची उपकरणे रानटी, क्रूर, हिंसात्मक, दहशत घालणारी होती. याचा परिणाम ज्यांच्यावर वसाहतवादाचा वरवंटा फिरवला त्यांच्यावर तर झालाच पण त्यापेक्षाही ज्या युरोपीय सत्तांनी तसेच ब्रिटिशांनी वसाहतवाद गाजवला त्यांच्यावरसुद्धा झाला. याचा अंतिम परिणाम युरोपची अधोगती होण्यात झाला.                                                        आफ्रिकन्स, भारतीय, इतर आशियाई यांना ‘संस्कृती’ नव्हतीच किंवा साम्राज्यवादी वसाहातकारांकडे जी संस्कृती होती तशी संस्कृती ज्यांच्या येथे वसाहती केल्या त्यांच्याकडे नव्हती, अशी सुपिरिऑरिटि = श्रेष्ठतेची भावना   घेऊनच वसाहतकार आले होते. आयडिऑलॉजी ऑफ सुपिरिअर कल्चर = सांस्कृतिक वर्चस्वाची विचारधारा  आणि रेशीयल हायरार्की – वांशिक अधिकारश्रेणी हा वसाहतवादाचा पाया होता.                                    

वसाहतवादाचे दूरगामी परिणाम युरोपवर झाले. युरोपमध्ये सुरू झालेल्या हुकूमशाहीची पाळेमुळे वसाहतवादाच्या विचारधारेत आहेत. या हुकूमशाहीची परिणती ‘होलोकास्ट,’ दुसरे महायुद्ध, हिरोशिमा, नागासाकी अशा जागतिक हिंसाचारात झाली. युरोपचा वसाहतवाद युरोपपासून हजारो मैल दूर झाला पण सांस्कृतिक आणि वांशिक अधिकारश्रेणी, वर्णद्वेष ही विषभावना युरोपीय समाजात सर्व स्तरांवर भिनली. त्याचे पडसाद आजही जगभर उमटत आहेत. वसाहतवादाचा हा अर्क आहे. हा अर्क पिऊन जगभरचे कितीतरी समाज आणि व्यक्ती तर्र झालेल्या आजही दिसतात.                                                    

सोशल फिजिक्स – समाज भौतिकी                                                         

मानव प्रजाती सतत पुनर्शोध आणि स्व-दुरुस्ती करण्याच्या प्रयत्नात असते त्याचे एक उदाहरण. Alex Pentland (जन्म १९५१) अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापक या उगवत्या विज्ञानशाखेचे प्रमुख विज्ञानवंत आहेत. भौतिकीविज्ञानातील गणितीय उपकरणांचा वापर मानवी वर्तनाचा आणि  societal phenomena – सामाजिक दृश्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी होईल तसेच समाजातील आजघडीच्या समस्या सोडवण्यासाठी होईल.मोठ्या डाटाचा – विदाचा अभ्यास हा सोशल फिजिक्सचा एक भाग आहे. लोकांचे विविध समूह जेव्हा एकत्र येतात किंवा भोवतालात असतात तेव्हा विचारांना चालना मिळते, नवीन विचारांची निर्मिती होते असे सोशल फिजिक्सच्या शोधाभ्यासात आढळून आले आहे. प्रा. पेंटलँडच्या मते जनसंख्येच्या घनत्वामुळे सर्जनशीलता वाढते. चांगल्या, सहिष्णू समाजाची निर्मिती होऊ शकते अशा आशावादाला जागा आहे तर.                                                              

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 

Author

Leave a Reply