अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत . या अंकात वाचू या प्रकरण चौथे -संपादक
पुनरपि जननं : प्रकरण चौथे
नवे संकल्प
फ्रान्स्का तिच्या झिप्परमधून उतरली आणि जीवशास्त्र संशोधन केंद्राच्या आवारात जिथे पार्किंग असेल तिथे जाऊन स्वतःला पार्क करायची आणि मग आपल्या स्थानाची माहिती कळवायची तिने झिप्परला आज्ञा केली. या आवारात हिंडण्यासाठी तिला त्या लांबच्या प्रवासात वापरण्याच्या झिप्परची आवश्यकता भासणार नव्हती. आवारात हिंडण्यासाठी तिला अर्थातच उडत जाता येणार होतं. आजकाल जास्त वेळ उडताना तिला थोडं दमायला व्हायचं हे खरं; पण मग आवारात जिथे स्वयंचलित रस्ते नव्हते तिथे घरंगळ गाड्या होत्याच.
स्वागत कक्षाच्या इमारतीसमोर उभे राहून, हळूहळू धूसर होत जाणाऱ्या संधिप्रकाशात फ्रान्स्काने तो परिसर न्याहाळून पाहिला. फुलांनी लगडलेल्या झाडांच्या आणि प्रकाशणाऱ्या झुडुपांच्या पुंजक्यांमधून ठिकठिकाणी इमारती डोकावत होत्या. आता अंधार पडू लागला होता आणि बहुतेक इमारतींच्या भिंती अपारदर्शक झाल्या होत्या. त्यांच्या खिडक्यांतून आतला उबदार प्रकाश दिसत होता. आसमंतात रातराणीचा सुगंध दरवळत होता. फ्रान्स्काने डोळे भरून ते दृश्य पाहून घेतले. त्या अर्थपूर्ण क्षणाच्या जाणिवेने ती भारावून गेली.
या आवारात आणि या इमारतींमध्ये वर्तमान काळातील एक अद्वितीय प्रकल्प साकारत होता. आणि त्या प्रकल्पात काम करण्यासाठी तिने आपल्या सुप्रतिष्ठित पदाचा राजीनामा दिला होता. अनेकांना तर अजूनही हा प्रकल्प म्हणजे वेडेपणा वाटत होता.
तिने वळून स्वागत कक्षाच्या इमारतीत प्रवेश केला. एका प्रसन्न वदन सायबॉर्गने स्वतःची ओळख करून दिली आणि तिच्या येण्याचे प्रयोजन विचारले.
“माझं नाव फ्रान्स्का टोरी. अवकाश संकुचन प्रक्षेपण मंडळाबरोबर (Space Warp Propulsion Board) उद्या माझी मुलाखत आहे.”
“फ्रान्स्का टोरी, तुमचं स्वागत आहे. तुमच्या आगमनाने जीवशास्त्र संशोधन केंद्राला आनंद झाला आहे. मायटोकॉन्ड्रिया अतिथिगृहात तुमच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. हे अतिथिगृह या इमारतीच्या डावीकडे असलेल्या क्रिजॅन्थिममच्या वनात आहे. तुम्ही तिथे उडत जाणार का? फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे ते.”
पण मग तिच्या पाठोपाठ येणारी प्रचंड सूटकेस सायबॉर्गने पाहिली आणि म्हणाला, “किंवा कदाचित घरंगळ गाडीने जाणं जास्त सोयीचं होईल.”
“हो, घरंगळ गाडीनेच जाईन मी.”
सायबॉर्गने त्याच्या डेस्कवरील रुपेरी पडद्याला स्पर्श केला. लगेच एक घरंगळ गाडी बाहेर येऊन उभी राहिली. सायबॉर्ग फ्रान्स्काबरोबर बाहेर आला आणि त्याने तिला गाडीवर चढायला मदत केली. सामानाच्या पट्ट्यावरून फ्रान्स्काची सूटकेस वर सरकली आणि तिच्या पायापाशी स्थिरावली. सायबॉर्गने गाडीच्या रुपेरी पडद्यावर सूचना टाईप केल्या. दोन्ही बाजूंना स्वयंप्रकाशित झुडुपे असलेल्या नागमोडी रस्त्यांवरून त्या आवारातील दोन मिनिटांच्या प्रवासाची फ्रान्स्काला गंमत वाटली.
मायटोकॉंड्रिया अतिथिगृहाच्या सुंदर इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फ्रान्स्काची खोली होती. तिने आपल्या सूटकेसला सामानाच्या पट्ट्यावर जाण्याची आज्ञा दिली, पट्ट्याच्या यंत्रावर खोलीचा क्रमांक टाकला आणि मग आपल्या खोलीच्या गच्चीचा अंदाज घेण्यासाठी ती दोन पावलं मागं सरकली. एक भरारी मारून एकसारख्या संगमरवरी खांबांचा कठडा असलेल्या गच्चीवर ती पोचली आणि आपोआप उघडणाऱ्या काचेच्या दारातून तिने तिच्या आरामशीर खोलीत प्रवेश केला. खोलीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तिने बाहेरच्या चौकात उघडणारे दार उघडले आणि आपल्या सूटकेसला आत येऊ दिले. चाके फिरवत सूटकेस रॅकवर जाऊन स्थिरावली. फ्रान्स्काने बटण दाबून रॅकची उंची तिच्या कमरेपर्यंत येईल इतकी वाढवली.
सूटकेस उघडून तिने झोपताना घालायचे कपडे बाहेर काढले, पण ते परत ठेवून दिले. तिने आतून सुंदर घोळदार वस्त्रे काढली आणि ती गरम पाण्याने स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. आकानिष्ठातील घरापासून इतक्या लांबवर केलेल्या प्रवासाने खरंतर ती दमली होती; पण तिला आज संध्याकाळीच तारीकला भेटायची ओढ लागली होती. उद्या सकाळपर्यंत कशाला वाट पाहायची?
दवबिंदू पडलेल्या लिलीच्या फुलासारखी टवटवीत होऊन कापराच्या सुगंधाच्या धुक्यातून ती बाहेर पडली. आपला कॉम (भ्रमणयंत्र) उचलून तिने रायबोसोम अतिथिगृहातील २०२ क्रमांकाच्या खोलीशी संपर्क साधला. आपल्या धडधडत्या हृदयाचं तिला आश्चर्यच वाटलं. इतक्यात पलीकडून तारीकचा भारदस्त आवाज ऐकू आला.
“हॅलो फ्रान्स्का, पोचलीस का तू?”
“अर्ध्या तासापूर्वी. मी मायटोकॉन्ड्रियात आहे.”
“मी येऊ का थोड्या वेळासाठी? संध्याप्राशन करायला? का तू दमली आहेस फार?”
“छे रे! मी वाट बघतेय तुझी.”
“पाच मिनिटांत पोचतो.”
अजूनही धडधडत्या अंतःकरणाने फ्रान्स्काने फ्रीज उघडला आणि उंची द्राक्षाच्या रसाचा जार बाहेर काढला. दोन ग्लासांत तिने रस ओतला आणि ती बाहेर गच्चीत आली. आवारात आता शांतता होती. दूरच्या चांदण्या सोडल्या तर आकाश रिकामे होते. मिनिटभरातच मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या घुमटामागून एकजण उडत येताना आणि तिच्या अतिथिगृहाच्या इमारतीकडे वळताना तिला दिसला. एक ऐटदार वळण घेऊन तारीक खाली उतरला, त्याने आपले मोठाले पंख मिटले आणि प्रसन्न हसत तो फ्रान्स्काकडे आला. एक शब्दही न बोलता त्याने तिला आलिंगन दिले. त्याच्या उबदार मिठीत विरघळून जाताना तिचे सगळे अवघडलेपण गळून गेले. किती सोपं होतं तारीकला ही मधली वर्षं अशी पुसून टाकणं! त्यांचा मुलगा मोठा होऊन पुढील शिक्षणासाठी जेव्हा अकादमीत गेला, तेव्हाच ते दोघे आपापल्या वाटांनी निघून गेले होते.
“किती बरं वाटतंय तुला बघून फ्रान्स्का,” हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकत तो म्हणाला.
“तू अगदी तसाच आहेस तारीक.”
“मी बदललो असेन असं वाटलं का तुला?”
“नाही म्हटलं तरी वीस वर्षं झाली.”
“तुला असं इतकं जवळ घेऊन वीस वर्षं झाली. पण आपल्या आभासी भेटी होतच होत्या.”
“पृथ्वी प्रकल्पात तुला एवढा रस असेल असं मला वाटलं नव्हतं.”
“मला उत्सुकता आहे पण अजून या प्रकल्पामागची भूमिका मला पूर्ण पटलेली नाही.”
“पण मुलाखतीसाठी आलास तू.”
“मी मुख्यतः तुला भेटायची संधी मिळाली म्हणून आलो.”
तिच्या कमरेभोवती एक हात टाकून त्याने तिला अलगद खोलीत नेले. आत गेल्यावर त्याने द्राक्षाच्या रसाचे उंच ग्लास पाहिले. तिच्या हाती एक ग्लास देत त्याने स्वतःचा ग्लास तिच्या सन्मानार्थ उंचावला. तिच्यासाठी तिची खुर्ची ओढून ती बसल्यावर तोही तिच्या समोरच्या खुर्चीत आरामात बसला. तिच्याकडे स्नेहाने पाहत. काचेच्या दारापाशी असलेल्या त्या टेबलाशी बसून उंच ग्लासातून ते द्राक्षाचा रस पीत राहिले.
तारीकच्या प्रत्यक्ष सान्निध्यामुळे वाटणाऱ्या धुंदीतून फ्रान्स्का अजून सावरली नव्हती; जणूकाही जादूने ती तिच्या तारुण्यातील सुवर्णकाळात पोचली होती. त्यांच्या धुंद प्रणयाच्या काळात. तिनं खरं प्रेम फक्त तारीकवर केलं होतं. इतर कोणत्याच पुरुषाने तिच्या मनावर अशी मोहिनी घातली नव्हती.
“माझ्या इथे येण्याचं खरं कारण म्हणजे तू, फ्रान्स्का.”
ही तारीकची नेहमीची लकब, फ्रान्स्काला माहीत होतं. आता या वयात तारीकच्या अशा मोहक शैलीने प्रभावित होण्याचं काहीच कारण नाही हे ही तिला माहीत होतं आणि तरीही स्वतःचं शहाणपण बाजूला ठेवून ती त्याला आपली जादू तिच्यावर चालवू देत होती. तिच्या सर्वांगात भरत जाणारा सोनेरी प्रकाश ती थोपवू शकत नव्हती.
“तुझा निर्णय ऐकून फारुक काय म्हणाला? तू त्याला भेटणार म्हणाली होतीस.”
“हो. आकानिष्ठा सोडण्यापूर्वी त्याला प्रत्यक्ष भेटता आलं असतं तर बरं झालं असतं; पण वेळच नव्हता. म्हणून मग मी त्याला आभासी भेट दिली. मी या प्रकल्पावर काम करण्याची शक्यता आहे हे ऐकून फारुकला फार आनंद झाला. माझ्या आयुष्याची बरीच वर्षं मी आकाशगंगा संशोधन केंद्रात घालवली आहेत, असं त्याचं म्हणणं. तुलाही या प्रकल्पात रस आहे असं सांगितलं मी त्याला. त्याच्या पुढच्या मोठ्या सुटीपर्यंत जर आपण दोघंही खरंच इथं राहिलो तर तो त्याच्या कुटुंबाला घेऊन आपल्याला भेटायला येईल असं म्हणाला तो.”
“हो. गोड आहे त्याचा मुलगा. बघता बघता दहा वर्षांचा झाला. खूप हुशार आहे असं ऐकलंय.”
“तू अलीकडे केव्हा प्रत्यक्ष भेटलास फारुकला?”
“झाली दोन वर्षं. तो घरंगळ गाड्यांच्या नवीन आकारावर काम करत होता. मी एडन अकादमीमध्ये एका विचारसत्राला गेलो होतो. तिथून पुढे तसाच फारुकच्या कुटुंबाला भेटायला गेलो.”
“सध्या आणखी काय काय चालू आहे तुझं तारीक?”
“खरं सांगायचं तर फ्रान्स्का, मला अलीकडे सगळ्याचाच कंटाळा यायला लागलाय.”
फ्रान्स्काने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
“इतकी आश्चर्यचकित होऊ नकोस,” तो हसून म्हणाला.
आपले हात पुढे करून त्याने तिचा हात हातात घेतला.
“अगदी काही शेवटच्या पातळीजवळ मी पोचलेलो नाही; पण ते संशोधन, नवीन ज्ञानसंपादन करण्याची जिज्ञासा हे काही पूर्वीइतकं आकर्षक वाटत नाही. आता मी माणसांबद्दल जास्त विचार करतो. ज्या व्यक्तींबरोबर मी हे आयुष्य घालवलंय, ज्यांनी मला आयुष्यात आनंदाचे क्षण दिले, त्यांच्याबदल. म्हणून तर मी आजकाल इतका तुझा विचार करतो,” तारीक हसत म्हणाला.
त्याचं बोलणं कितपत खऱ्या अर्थाने घ्यावं या संभ्रमात ती होती. तो केवळ तिच्यावर छाप पाडायला हे म्हणत असेल; पण त्याने असंच बोलत राहावं असं तिला वाटलं. त्याच्या त्या भारदस्त, आश्वासक आवाजात काहीही बोलत राहावं. त्याच्या हसऱ्या डोळ्यांकडे आपण पाहत राहावं.
थोड्या वेळाने त्याने आपला ग्लास खाली ठेवला आणि आपली खुर्ची मागे सरकवून तो उठला.
“तू प्रवासाने दमली असशील आणि उद्या आपल्याला मुलाखती द्यायच्यात. विश्रांती घे आता.”
तो जाणार या कल्पनेने इतका वेळ या अपरिचित खोलीत भरून राहिलेला सोनेरी प्रकाश जणू विझून गेला. त्याने का परत जावं? निदान आतातरी नको. इतक्या वर्षांच्या एकाकी आयुष्याने कमावलेली आणि भक्कम संशोधन आणि क्वचित इतर पुरुषांशी केलेल्या जवळिकीने दृढ केलेली तिची आत्मविश्वासाची ढाल अशी उद्ध्वस्त केल्यावर तरी नको. खऱ्याखुऱ्या प्रेमाच्या एकाच वर्षावाने त्याने ते कवच फोडून टाकले होते आणि तिला एकाकीपणाच्या तीव्र आघातांना सामोरे जाण्यास भाग पाडले होते. ती एकाएकी अस्वस्थ झाली आणि अचानक म्हणून गेली, “तुला जायलाच हवं का?”
त्याने तिच्याकडे काहीशा काळजीने आणि आश्चर्याने पाहिले.
“या नवीन आणि अपरिचित जागेमुळे मी थोडीशी नर्व्हस झाले आहे. तुझी हरकत नसेल तर आज राहा ना इथेच माझ्याबरोबर आणि उद्या मुलाखतीसाठी आपण बरोबरच जाऊ.”
“मला तर ते आवडेलच.”
हे म्हणजे पूर्वीसारखंच झालं. पालक कराराच्या त्या आनंदात घालवलेल्या वर्षांसारखं. त्या रात्री जेव्हा ती तारीकच्या मिठीत हळूहळू झोपी गेली तेव्हा तिच्या मनात राहून राहून एकच विचार येत होता. असं काय आहे तारीकच्या स्वभावात की तिच्या सर्व प्रियकरांत तो तिला सर्वात अधिक प्रेमळ वाटतो?
—————————————————————————————————————-
मन स्थिर करण्यासाठी काईजाने शांतरसाचा आणखी एक घोट घेतला आणि सभागृहात प्रवेश केला. या कंटाळवाण्या वक्त्याने ज्या कोणत्या गोष्टीचा शोध लावला होता त्याबद्दल त्याचं स्पष्टीकरण देऊन झालं की काईजाचीच बोलायची पाळी होती. काल संध्याकाळी त्याचा शोधनिबंध वाचल्यानंतर झालेली अमरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया जरी त्याला चांगली आठवत होती तरीदेखील काईजाच्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं.
“काईजा, हे विलक्षण आहे. हा एक क्रांतिकारी दावा आहे. हे जर खरं असेल, तर आपल्याला भौतिक वास्तवाचं स्पष्टीकरण देणारा संपूर्ण आराखडा तपासून पाहावा लागेल. हे फारच क्रांतिकारक आहे. थांब! पुन्हा उडून जाऊ नकोस,” काईजाच्या पंखाला धरत अमर म्हणाला होता.
“तुला याचे परिणाम लक्षात येतायत का? जड वस्तुजात आणि चेतना यांना जोडणारा दुवा! त्यांच्यात कोणता संबंध आहे? कुठे आहे त्यांना जोडणारा दुवा?”
“पण अमर, मी चेतनेविषयी काहीच म्हटलेलं नाहीये. मी फक्त हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे की कृष्णविवरात माहिती नष्ट होत नाही. ती घटनाक्षितिजावरून उलटून परत येते आणि ज्ञानकणाच्या रूपात पुन्हा विश्वात प्रवेश करते. प्रकाशकण म्हणजे जशा प्रकाशाच्या पुड्या असतात तशाच ठरावीक प्रमाणातील माहितीच्या पुड्यांच्या स्वरूपात.”
“अगदी बरोबर! आणि माहितीकण हे चेतनेचा लघुत्तम घटक असतात असा कयास अनेक वर्षांपूर्वीच शास्त्रज्ञांनी बांधला आहे. सजीव प्राण्यांमध्ये मज्जातंतूंशी त्यांची प्रक्रिया घडून चेतना निर्माण होते.”
“तुम्ही आण्विक भौतिकशास्त्रज्ञ सारखा मेंदूचाच विचार करता. तुम्ही सगळेच मनुष्यकेंद्रित विचारप्रणालीचे भोक्ते आहात!”
टाळ्यांचा अचानक कडकडाट झाला आणि काईजाची तंद्री मोडली. मंचावर उभ्या असलेल्या शास्त्रज्ञाचं व्याख्यान संपलं होतं आणि आता कोणत्याही क्षणी त्याच्या नावाचा पुकारा होणार होता. स्वर्गावरील प्रतिष्ठित शास्त्रज्ञांच्या सभेपुढे एकतर तो स्वतःचं हसं करून घेणार होता किंवा अमरने काल संध्याकाळी त्याला आश्वस्त केल्याप्रमाणे तो शास्त्रीय जगापुढे एक क्रांतिकारी कल्पना मांडणार होता. त्याच्या नावाची घोषणा होताच आपल्या थरथरणाऱ्या हातात ई कागद घट्ट पकडून तो मंचाकडे निघाला.
—————————————————————————————————————-
बघावं तिकडे आरुषीला पांढरं धुकं दिसत होतं. दाट धुक्याच्या उसळणाऱ्या लाटा. ती धावत थोडी पुढे गेली आणि जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिला पपाची अस्पष्ट आकृती फक्त दिसली. धुक्याच्या पडद्यामागून त्याने तिला हाक मारली.
“आपली बंगली कुठे आहे आरुषी? बघ, तुला ओळखता येते का?”
पण तिला नाहीच ओळखता आली. पाहावं तिकडं तिला नुसतंच धुकं दिसत होतं. मग हळूहळू तिला इमारतींचे आकार दिसू लागले. धुक्याच्या मागे लपलेल्या मोठाल्या ठोकळ्यांसारखे. तिला थोडी भीती वाटली पण पपा मागून येत आहे हे जाणवून थोडी आश्वस्त देखील झाली ती. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि आजूबाजूला पाहत एका अस्पष्टशा इमारतीकडे बोट दाखवलं.
“नाही, ती नाही आपली बंगली. नीट पहा परत.”
या वेळेस तिने विरुद्ध दिशेच्या एका आकाराकडे बोट दाखवलं.
“नाही, ती पण नाही.”
आता तिने तो धुक्यात बुडालेला प्रदेश थोड्या अधिक अधीरतेने न्याहाळला. त्या पांढुरक्या पडद्याच्या मागे असलेल्या त्या आकृत्यांपैकी एका बंगलीत ते सुटीसाठी आले होते आणि आई आता त्या बंगलीत होती आणि आरुषीला तातडीने आईकडे जायचे होते. तिला पळत आईपाशी जाऊन तिच्या पायांना मिठी मारायची होती; पण तिला अजून त्यांची बंगली सापडतच नव्हती. आणि तिथे पटकन पोचता यावं म्हणून ती पपाच्या पुढे पळत होती. पण कोणत्या दिशेला पळावं हे तिला कळत नव्हतं. आता उन्ह पडलेलं असायला हवं होतं. म्हणजे तिला आईबरोबर बागेत फुलं तोडता आली असती. पण काल रात्री तिचा एक बूट हरवला होता आणि तोच शोधायला ती इतक्या पहाटे पपाबरोबर बाहेर आली होती.
काल रात्री जेव्हा तिला खांद्यावर घेऊन पपाने बंगलीत नेऊन झोपवलं होतं तेव्हा तो बूट तिच्या पायातून निसटून पडला असेल असं पपा म्हणाला आणि काल रात्री जेव्हा ते जयंतच्या घरी गेले होते तेव्हा आरुषीला तिथे असतानाच झोप आली होती, असं आई म्हणाली. जयंतची आई सगळ्यांना काहीतरी पेय देत होती तेव्हा आपल्याला किती झोप आली होती ते आरुषीला आठवलं. तिला नकोच होतं काही प्यायला. तिला फक्त आईच्या मांडीवर डोकं टेकून झोपायचं होतं आणि आत्तासुद्धा तिला काही बूट शोधायचा नव्हता – तिला फक्त बंगलीत परत जायचं होतं जिथे आई तिची वाट बघत होती.
“ते बघ. तुझ्या डावीकडे जे फाटक दिसतं आहे ना? ती आपली बंगली आहे.” तिला अजून स्पष्टपणे दिसत नसलेल्या एका आकाराकडे बोट दाखवून पपा शेवटी म्हणाला. त्याने दाखवलेल्या दिशेने आरुषी पळू लागली कारण तिला माहीत होतं की तिथं आई आहे.
—————————————————————————————————————-
डाळिंबाच्या रसाच्या डब्यांचा क्रेट हातात सांभाळत अमर झिप्परमधून उतरला आणि गुरुत्वकण प्रयोगशाळेच्या एका छोट्या दरवाज्याकडे भरभर चालत गेला. फुलांचे घोस लगडलेल्या वेलीने वेष्टित एका दाराच्या सेंसरवर त्याने आपला पंजा ठेवला. पडद्याने त्याचा जैविक ठसा ओळखताच दार उघडले आणि अमरने क्रेट सांभाळत आत प्रवेश केला.
एका रुपेरी पडद्यासमोर बसून मनोमन त्याला समीकरणे सांगत असलेला काईजा त्याला दिसला. आपल्या मित्राच्या मनातले विचार त्या पडद्यावर आकड्यांच्या आणि समीकरणांच्या स्वरूपात अवतरताना पाहात अमर काही मिनिटे उभा राहिला. अख्खं जग त्याच्यावर प्रशंसा आणि कौतुक यांचा वर्षाव करत असतानादेखील हा एकलकोंडा शास्त्रज्ञ त्याच्या गुहेत त्याच्या संशोधनात मग्न होता.
“मित्रा काईजा, आलो बरं का मी! पुन्हा एकदा अभिनंदन!” त्याला भेटायला उठून आलेल्या आपल्या मित्राला मिठी मारत अमर म्हणाला.
“आणि काय हे मित्रा, इतका नीरसपणाने वागू नकोस. ही तर जल्लोष करण्याची वेळ आहे. नताशाने तुझ्या आवडीच्या डाळिंबाच्या रसाचा क्रेट पाठवला आहे आणि तुला उद्या आमच्या घरी तिने बोलवायला सांगितलं आहे. आमचा मुलगा उद्या संध्याकाळी चार वाजता सॉकर खेळणार आहे आणि त्यानंतर आपण सगळे मिळून काही विशेष पेयांची प्राशन बैठक करू.”
“धन्यवाद अमर; पण कृपया मला एकटाच राहू द्या. मला इतर लोकांच्यात मिसळायला जमत नाही रे! नताशाला माझ्यातर्फे धन्यवाद दे आणि तिच्या आमंत्रणाचा मला आदर असला तरी मी इथे या प्रयोगशाळेतच ठीक आहे.”
आपल्या मित्राच्या या हट्टीपणाच्या विरोधात अमरने निषेधार्थ मान हलवली. त्याकडे दुर्लक्ष करत काईजाने विचारलं, “टेनिसचं काय? आज खेळणार आहोत का आपण?”
“हो तर! पण आधी मला सांग, तुझ्या शोधनिबंधावरच्या शास्त्रज्ञांच्या प्रतिक्रिया तू वाचल्यास का?”
“हो, वाचल्या आणि त्यावर टीका करणाऱ्यांना प्रतिसाद देण्याचं टाळण्यासाठी मला केवढा निग्रह करावा लागला.”
“टीका करणारे थोडेच आहेत. प्रतिक्रियांचा एकूण रागरंग पाहता, पुढच्या शास्त्रीय अधिवेशनाच्या वेळेपर्यंत जर तुझं प्रतिपादन क्रियात्मक रितीने तपासून पाहण्यासाठी प्रकल्प मंजूर करून घेण्याची चढाओढ सुरू झाली नाही तरच नवल.”
“हा काही प्रयोगशाळेत तपासून पाहता येण्यासारखा सिद्धांत नाही. केवळ घटनाक्षितिजाकडे एखादे यान पाठवूनच तो पडताळून पाहता येईल. शास्त्रीय अधिवेशन जर जुन्या, गंजलेल्या ग्रहांवरच्या सहलींना पैसा देण्याचं थांबवेल तर जवळच्या घटनाक्षितिजाकडे पुढच्या दहा वर्षांत यान पाठवता येईल.”
“मग आमच्यासारख्या गरीब शास्त्रज्ञांनी काय करावं? सगळ्यांना काही तुझ्यासारखी असामान्य कल्पनाशक्ती लाभलेली नसते.”
—————————————————————————————————————-
साल्चरने बैठकीच्या गोलाकार दालनात प्रवेश केला. एखाद्या विशेष प्रसंगी लोकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बैठकी घेण्यासाठी त्या मोठ्या दालनाचा उपयोग केला जात असे. त्याच्यासमोर एकामागून एक असलेल्या अर्धवर्तुळाकार मांडलेल्या आसनांवर बसलेल्या एकशे सतरा श्रोत्यांवरून साल्चरने नजर फिरवली. त्या ग्रहावराचे सर्वांत बुद्धिमान असे सर्व वयोगटातले ते लोक होते. पृथ्वी प्रकल्पात त्यांना रस आहे हे त्याला माहीत होते. आता त्यांना त्या प्रकल्पावर काम करण्यासाठी प्रेरणा देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांपैकी बहुतेक शास्त्रज्ञांना पृथ्वी प्रकल्पाने जाहीर केलेल्या अनेक पदांसाठी आलेल्या अर्जांतून निवड करून, अनेक मुलाखतींच्या मालिकेनंतर त्याने स्वतःच निवडले होते. काहींना त्याने प्रकल्पात सहभागी होण्याची गळ घातली होती. त्यांच्यापैकी काही शैक्षणिक क्षेत्रात मान्यता मिळवण्यासाठी; तर काही खऱ्या शास्त्रीय उत्सुकतेपोटी प्रकल्पात सहभागी झाले होते. काहींनी वैयक्तिक सोयीसाठी हा प्रकल्प निवडला होता तर काही व्यावसायिक महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी सहभागी झाले होते. काहींना या प्रकल्पाच्या सनसनाटीखेज प्रसिद्धीने आकर्षित केले होते; तर काही या प्रकल्पाच्या कल्पनेने भारावून जाऊन त्याच्याशी संलग्न झाले होते आणि या सगळ्या विविध कारणांनी एकत्र आलेल्या लोकांना साल्चरला एका ध्येयाने प्रेरित करायचे होते. या व्यामिश्र समूहाचे एका आण्विक घड्याळाच्या काटेकोरपणाने एकाच अंतिम ध्येयासाठी प्रेरित होऊन परस्पर जिव्हाळ्याने पुढची दहा वर्षे काम करणाऱ्या संघात त्याला रूपांतर करायचे होते.
“मित्रहो, पृथ्वी प्रकल्पात आपणां सर्वांचं स्वागत आहे,” या शब्दांनी साल्चरने प्रकल्प संघाला दिलेल्या पहिल्या भाषणाची सुरुवात केली. त्याचं हे भाषण पुढची अनेक दशके त्या श्रोत्यांच्या स्मरणात राहणार होतं. मानवाच्या प्राचीन घराच्या दिशेने होणाऱ्या दीर्घ प्रवासाची सुरुवात करणारं भाषण होतं ते.
“या प्रयत्नात माझ्याबरोबर सहभागी झाल्याबद्दल तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी एकटा अर्थातच हे काम करू शकलो नसतो; किंबहुना आपण जे साध्य करू इच्छितो आहोत ते कोणीही एकटा मनुष्य साध्य करू शकणार नाही – साक्षात्कारी स्वर्गाच्या सर्व प्रयोगशाळांतील सर्व सोयी त्या व्यक्तीला उपलब्ध झाल्या तरी.
कारण आपण जीवनाच्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालो आहोत. आपल्या प्रकल्पाचं नामकरण जरी चुकून ‘पृथ्वी प्रकल्प’ असं झालं असलं तरी केवळ मानवाच्या जुन्या घरापर्यंतचा प्रवास हे आपलं ध्येय नाही. तो प्रवास केवळ जीवनाच्या त्या आदिम प्रयोगशाळेत प्रयोग करण्याचं साधन आहे.
मित्रांनो, तुम्हांला माहीत आहे की स्वर्ग हे एक मानवनिर्मित जग आहे. आपण राहतो ते वातावरण कृत्रिम रित्या तयार केलेलं आहे. आपण श्वास घेतो ती हवा, आपल्या पेयांतून आपल्याला मिळणारं पोषण, आपल्या शरीरातील प्रकाश संश्लेषणाची क्रिया हे सर्व आपलं विकसित तंत्रज्ञान आणि जैविक अभियांत्रिकी यांचा परिणाम आहेत.
या कृत्रिम वातावरणात आपण पूर्वीच्या अचेतन जगात उद्भवलेल्या जीवनाच्या उत्पत्तीचे सुगावे हरवून बसलो आहोत. त्यामुळे जीवनाची उत्पत्ती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी आपल्याला या कृत्रिम जगापासून दूर जाऊन प्रयोग करणे आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी कोट्यवधी वर्षांपूर्वी जिथे जीवनाची सुरुवात झाली त्या जागेपेक्षा अधिक चांगली जागा ती कोणती!
तुमच्यापैकी काही जणांनी मला विचारलं की ज्या ग्रहावर बुद्धिमान मानवाने हजारो वर्षे वस्ती केली होती आणि ज्या ग्रहावर अंतिम युद्ध म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या मानवाच्या इतिहासातील अत्यंत घृणास्पद काळाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला त्या ग्रहावर काही नवीन सापडण्याची आशा ठेवणं कितपत रास्त आहे?
हा प्रश्न योग्य आहे; पण आपण दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. पहिला मुद्दा असा की उरल्यासुरल्या मनुष्यांचा अंत झाल्यानंतर जवळजवळ हजार वर्षं पृथ्वी अनाघात राहिली आहे. संगणाकांनी तयार केलेल्या प्रतिकृती असं दर्शवतात की निसर्गाने केव्हाच आपलं साम्राज्य पृथ्वीवर प्रस्थापित केलेलं असेल. युद्धामुळे पृथ्वीला झालेल्या जखमा भरून येण्याची प्रक्रिया काही शतके चालली असेल आणि दुसरा मुद्दा असा की साक्षात्कारपूर्व मानवाकडे नसलेलं ज्ञान आज आपल्याला उपलब्ध आहे. जीवनाच्या प्रक्रियांचं त्यांचं ज्ञान हे फारच प्राथमिक स्वरूपाचं होतं. जीवनाच्या उत्पत्तीचा मागोवा घेताना पृथ्वीच्या वातावरणात नेमकं काय शोधायचं हे त्यांना माहीत नव्हतं.
आणि त्यामुळेच, मला असं वाटतं की उत्क्रांत मनुष्यप्राण्याने त्याच्या पूर्वजांच्या घराला भेट देण्याची वेळ आता आली आहे. आपण परत जाऊन शोध घेण्याची वेळ आली आहे. कसून तपास करण्याची वेळ आली आहे आणि काही बौद्धिक प्रश्न विचारण्याचीदेखील.
आज इथे जमालेल्यांपैकी काहीजण अगदी तरुण आहेत. आपलं आयुष्य अधिक आनंददायी करण्यासाठी ज्या गोष्टींचा उपयोग होईल त्यांचा शोध लावण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती साहजिकच आसुसलेली असेल; पण तुमचं वय जसजसं वाढेल आणि तुम्हांला स्वतःचं आणि स्वतःच्या कार्यशक्तीचं आणि त्याचबरोबर तुमच्या मर्यादांचं जसजसं अधिक ज्ञान होईल, जेव्हा तुम्ही अमर किंवा स्टेल्लाच्या वयाचे व्हाल, तेव्हा तुम्ही आयुष्याचा अर्थ शोधू लागाल. आपण कुठून येतो, आणि कुठे जातो? मृत्यू का आवश्यक आहे आणि जन्म का होतो? आपलं आयुष्य कितीही उत्तम असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा मनात हे प्रश्न उद्भवतात.
असे प्रश्न विचारणारा मी एकटाच नाही. पूर्वीच्या पिढ्यांतील अनेक शास्त्रज्ञांनी या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला आहे. अगदी जुन्या सूर्यमालेतील मंगळ आणि युरोपावरच्या वसाहतींतील आपल्या अग्रेसर पूर्वजांनीदेखील या मूलभूत प्रश्नांची नोंद केली आहे. असं सांगतात की प्रख्यात शास्त्रज्ञ काशी सासी – ज्याने मंगळावर प्रगत जीवअभियांत्रिकी प्रयोगशाळा स्थापित केली होती – शेवटी शार्प पर्वताच्या शिखरावर चढून गेला आणि वादळी आरक्त आकाशाकडे पहात त्याने विचारले, “मी कुठून आलो, कुठे जाणार? माझ्या आणि या विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्याचा जिथे उलगडा होईल अशा ठिकाणी मला घेऊन चला.” असे म्हणून त्याने स्वतःला मंगळावरच्या घातक उत्सर्गाला समर्पित केले आणि मी असंही ऐकलं आहे की पृथ्वीवरच्या अत्यंत प्राचीन समाजांनीसुद्धा हा प्रश्न ऋचांमधून आणि पौराणिक कथांमधून विचारला होता. हा ‘स्व’ चा आणि परम ज्ञानाचा शोध हा मानवजाती इतकाच प्राचीन असावा.
मला असं वाटतं की या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची साधनं आता आपल्याकडे आहेत. मी आयुष्यभर जीवनाच्या मुळाचा शोध घेण्यासाठी संशोधन करतो आहे आणि आता मी अशा टप्प्यावर येऊन पोचलो आहे की ज्या क्षणापासून जीवनाची सुरुवात होते त्या क्षणापासून पुढे जे काही घडतं ते जवळपास सर्व मला ज्ञात आहे. स्टेम सेल्समध्ये – म्हणजे इतर पेशींना जन्म देणाऱ्या ज्या पूर्व पेशी असतात त्यात होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आपल्याला माहीत आहेत. कृत्रिम रित्या पेशी तयार करताना या पूर्वपेशींच्या सांगाड्यावर नवीन पेशी कशा तयार होतात, अवयव कसे निर्माण होतात आणि छापले जातात ते आपल्याला माहीत आहे, वनस्पती आणि निम्न स्तरावरचे प्राणी यांच्यात मूळ जीवापासून विभक्त होऊन नवे जीव कसे तयार होतात ते आपल्याला माहीत आहे आणि जे विभाजित भाग तग धरू शकत नाहीत तेव्हा त्यांचं काय होतं हेही आपल्याला माहीत आहे. बीजांड फलित झाल्याच्या क्षणापासून ते त्यातून तयार होणारे शरीर घडत असताना त्यात होणारा प्रत्येक बदल आपल्याला माहीत आहे आणि बीजातून अंकुर फुटताना काय होतं हेदेखील आपल्याला माहीत आहे; पण या सगळ्या प्रक्रिया म्हणजे जीवन चालू राहण्याची उदाहरणे झाली. आपण एखाद्या पेशीची हुबेहूब रासायनिक प्रतिकृती तयार केली तरी अजूनही आपल्याला जीवन सुरू कसं करायचं हे माहीत नाही. पेशीची ती प्रतिकृती जिवंत होऊ शकत नाही, विभाजित होऊ शकत नाही, ती पोषणाचा उपयोग करू शकत नाही की तिच्या आवरणावरील प्रथिनांमध्ये बदल करू शकत नाही. आपण फार फार तर एखाद्या जिवंत पेशीचे आवरण किंवा आतील द्रव्य (सायटोप्लाजम) वापरून त्यात कृत्रिम जनुकपटल (जीनोम) घालू शकतो.
म्हणूनच, आपण जर पृथ्वीवर परत गेलो आणि तिथे काही प्रयोग केले, अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जी परिस्थिती होती ती पुनर्निर्मित केली, तर कदाचित आपल्याला काहीतरी नवं ज्ञान प्राप्त होईल. आपल्याला कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, बहुधा आपल्याला जे नवं ज्ञान प्राप्त होईल त्यातून आणखी प्रश्न उद्भवतील; पण हेच तर मनुष्याच्या प्रगतीचं रहस्य आहे.
हे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला योग्य तऱ्हेचे लोक लागतील. आपला प्रत्यक्ष प्रकल्प सुमारे वीस वर्षांनी सुरू होईल. आकाशगंगा प्रवास केंद्राला यान तयार करण्यासाठी तेवढा अवधी लागेल. त्या यानातून प्रवास करतील ते अवकाशयात्री आज बाल्यावस्थेत असणार. त्या प्रवासासाठी योग्य ती मुलं निवडून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांनी पृथ्वीवर करण्याच्या प्रयोगांचा आराखडा तयार करणं आणि त्यांचा प्रवास सुरू करून देणं हे आपलं काम आहे.
आजपासून पंधरा वर्षांनी आपण आपले उत्तराधिकारी निवडायला सुरुवात करू. पृथ्वीवर जाणारे अंतराळवीर जेव्हा परत येतील तेव्हा त्यांनी तिथे केलेल्या प्रयोगांचे परिणाम तपासून त्यातून निष्कर्ष काढण्याचं काम आपले हे उत्तराधिकारी करतील.
आजपासून आठवड्याभराने आपण विषयवार समित्यांमध्ये विभागले जाऊ. या समित्या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या अंगांवर काम करतील. या प्रकल्पाच्या यशासाठी तुमच्यापैकी प्रत्येकजण महत्त्वाची भूमिका निभावेल. तुमच्यापैकी प्रत्येकजण या शोधमोहिमेतील शिलेदार आहे. आपला प्रवास आपण आज सुरू करतो आहोत. पृथ्वीवर जाणारं यान अवकाशात उड्डाण करेल तेव्हा आपला प्रवास संपेल. त्यानंतर सुरू होणारा प्रवास हा पृथ्वीवर गेलेले अंतराळवीर परत येतील तेव्हा संपेल. त्यानंतर त्यांच्या प्रयोगांचे विश्लेषण करण्याचा प्रवास सुरू होईल.
तर माझ्या सहप्रवाशांनो, या आपल्या ऐतिहासिक प्रवासातील पहिलं उड्डाण आपण आज करू या. मी तुम्हांला खात्री देतो की असा आश्चर्यांनी भरलेला आणि अज्ञाताच्या कुतूहलाने भारलेला प्रवास यापूर्वी कोणीही कधी केला नसेल. चला तर, सुरुवात करू या.”
—————————————————————————————————————-
आरुषीच्या कंबरपट्ट्यातील संपर्कयंत्राची बेल जोरात वाजली. आता तिकडे दुर्लक्ष करणं आरुषीला शक्य नव्हतं.
“आरुषी, घरी ये. अंधार पडलाय आणि संध्याप्राशनाची वेळ होऊन गेली आहे.”
इतर मुलं आपले पंख वेगाने फडफडवत आजूबाजूने उडत जाताना आरुषीला दिसत होती.
“बाकीची मुलं अजून खेळतायत. त्यांच्या आया त्यांच्यावर कुठे ओरडतायत,” आरुषी संपर्कयंत्राकडे पहात ओरडली. तिला आईचा फारच राग आला होता.
“तू आताच्या आता घरात ये, नाहीतर मी तिथे येऊन तुला घेऊन येईन.”
आपल्या मित्र-मैत्रिणींच्या समोर तमाशा नको म्हणून आरुषीने पडते घ्यायचे ठरवले. आपण थोड्याशा नाजूक आहोत हे आरुषीला थोडे थोडे समजायला लागले होते; पण शेजारपाजारच्या इतर मुलांइतकेच आपणही काटक आहोत असेच भासवायचा ती प्रयत्न करायची. तिच्या तब्येतीविषयी आणि विशेषतः तिच्या पेय पिण्याच्या वेळांविषयी आई सारखी काळजी करायची हे तिला मुळीच आवडायचं नाही. शरीरात पाणी कमी झाल्याने एकदा आपल्याला कशी चक्कर आली होती हे अर्थात तिला आठवत होतं. पण तिला वाटत होतं की तो फक्त मनाचा खेळ होता. तिने जर मन अगदी खंबीर केलं तर तीसुद्धा इतर मुलांसारखंच अंधार पडल्यावरही खेळत राहू शकेल.
हिरमोड झालेला आणि रुसलेला चेहरा घेऊन ती उडत घरात शिरली. तिचे आई पपा प्राशनाच्या टेबलाशी बसून तिची वाट पाहत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. तिला खूप तहान लागलेली असली तरी आपल्याला पेय नकोच आहे असं तिनं दाखवलं. काही मिनिटांनी आई तिच्या खोलीत आली आणि आरुषीचे कपडे बदलायला तिने मदत केली.
“पपा आणि मी आज तुला त्या नवीन आलेल्या आकाशगंगा प्रवासाच्या खेळाला घेऊन जायचा विचार करत होतो. अर्थात तुला जर जायचं असलं तर,” आई गालातल्या गालात हसत म्हणाली.
आरुषीला अत्यानंद झाला. या नवीन खेळाबद्दल मुलांच्या पत्रिकेत वाचल्यापासून कधी एकदा आपण तो पाहतो असं आरुषीला झालं होतं.
“म्हणजे आत्ता जायचं?” तिने उत्साहाने विचारलं.
“हो, म्हणजे आपलं पेय पिऊन झाल्यावर.”
“चला!” आरुषी आनंदाने म्हणाली आणि प्राशनाच्या खोलीकडे धावत ओरडली, “पपा, आपण आकाशगंगा प्रवासाच्या खेळाला जाणार आहोत. लवकर तुझं पेय संपव.”
आनंदाच्या भरात ती आपल्या खुर्चीवर चढली आणि पपाने तिच्या काचेच्या वाडग्यात चविष्ट पेय ओतताच ती ते घोट घोट पिऊ लागली.
“आरुषी, आता नीट लक्ष दे,” आई गंभीरपणे म्हणाली. “रोज संध्याकाळी तू खेळ संपवून सात वाजता घरी यायला हवं. त्यानंतर बाहेर राहायचं नाही. घरी येऊन माझ्याबरोबर आणि पपाबरोबर बसून तुझ्या शंका विचारायच्या आणि नवीन अभ्यासाचे खेळ खेळायचे.”
“पण बाकी मुलं तर खेळतच राहतात. मीच का खेळ अर्धवट टाकून घरी यायचं?”
“कारण इतर मुलं तुझ्याइतकी हुशार नसतात. तू जितकं वाचन करतेस तितकं ते करत नाहीत; शिवाय आयुष्यात काही शिस्त असावी लागते. जितक्या लवकर प्रयत्न करशील तितकं चांगल्या सवयी लावून घेणं सोपं जाईल.”
आरुषीने हा उपदेश निमूटपणे ऐकून घेतला कारण नवीन खेळाला जाण्याची तिला उत्सुकता होती. संध्याप्राशन केल्यानंतर थोड्याच वेळात ते तिघेही एका झिप्परमध्ये बसले आणि पन्नास मैलांवर असलेल्या करमणुकीच्या आवारात गेले. तिथली घुमटासारखी इमारत प्रकाशात उजळली होती आणि ‘आकाशगंगा प्रवास’ या नवीन खेळाची घोषणा लेसर किरणांनी केली जात होती. त्या खेळाचे सभागृह आणि त्याच्या भोवतालच्या बागेत लोक मजेत पेयपान करत होते, छोट्या छोट्या टपर्यांत खेळ खेळत होते आणि गप्पा मारत होते.
आरुषीसुद्धा अतिशय आनंदात होती. आई आणि पपा अशा दोघांबरोबर ती आज बाहेर आली होती आणि आता लवकरच ती एक नवीन खेळ खेळणार होती. पाहावे तिकडे तोच आनंद तिला सर्वांच्या चेहऱ्यावर परावर्तित झालेला दिसत होता.
आई आणि पपांबरोबर तिने सभागृहात प्रवेश केला आणि आतील रंगीबेरंगी मायावी दृश्याने ती हरखून गेली. तिथे तऱ्हेतऱ्हेचे रंग आणि आकार होते आणि ते एखाद्या गायरोस्कोपमधील दृश्यासारखे अखंड एकमेकांत मिसळत होते. कुठे जमीन आहे आणि कुठे छत आहे, पायाखालची घन फरशी वितळून तिचं पाण्यात केव्हा रूपांतर होतं आहे आणि तिने चालावं का उडावं हेच आरुषीला समजेना. तिथे उसळणाऱ्या धुक्यातून डब्यांची माळ असलेली एक आगगाडी तरंगत आली आणि त्यातील एका डब्यात आई व पपाचा हात धरून आरुषी चढून बसली. उत्सुकतेने तिचे छोटे पंख थरथरत होते. आगगाडी हळूहळू घरंगळत पुढे सरकू लागली आणि तिने वेग घेतला. पुढच्याच क्षणी ते ताऱ्यांनी भरलेल्या आकाशातून उडू लागले. सप्तरंगांनी झळकणाऱ्या आकाशगंगा त्यांच्या आजूबाजूने वेगाने जाऊ लागल्या.
आपण किती वेळ त्या माळगाडीत बसलो आणि कुठे कुठे उडत गेलो याचा आरुषीला हिशेबच ठेवता आला नाही. आजूबाजूने जाणाऱ्या ताऱ्यांची आणि ग्रहांची नावे आई सांगत होती हे मात्र तिला आठवत राहिलं. पण तो सगळा चमचमाट, रंगांची उधळण, संगीत आणि वेग यांनी तिचं मन गोंधळून गेलं. आपण एकाच वेळी त्या माळगाडीत बसून हिंडतो आहोत आणि आपल्या मऊ बिछान्यात झोपलेले असून आपल्याला अवकाशातून उडत असल्याचे स्वप्न पडते आहे असं आरुषीला वाटलं. ती जेव्हा रात्री झोपी गेली तेव्हा ती इतकी दमून गेली होती की आकाशगंगा पर्यटनाचा खेळ आणि तिची स्वप्नं एकमेकांत मिसळून गेली.
प्रकरण चौथे समाप्त
