लेखन अनुभव : २

एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल

पुणे भारत गायन समाज

एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग २)

देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं संस्थात्मक कार्य समजून घेताना पुण्यात आणि एकूणच महाराष्ट्रात त्या वेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, हे विचारप्रवाह कसे होते, ते पाहणं आवश्यक वाटलं; कारण या विचारांना बाजूला ठेवून कलानिर्मिती-प्रगती-सांस्कृतिक संपन्नता यांचा विचार होऊ शकत नाही. ही सर्व क्षेत्रं परस्परपूरक आहेत.

संस्था-स्थापनेआधी जवळजवळ ऐंशी-नव्वद वर्षं महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाची चळवळ सुरू झाली होती आणि ती सर्व वर्गांमध्ये पसरू लागली होती. १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये सुरू केलं होतं. लोकहितवादी देशमुखांच्या शतपत्रांमधून (१८४८-१८५०) आधुनिक सुधारणावादी विचार प्रकट होऊ लागले होते. गोपाळराव आगरकर ‘सुधारक’ मधून रूढी-परंपरांवर आसूड ओढत होते. न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे… अशा स्त्रीसुधारकांचं योगदान मोलाचं आहे. सध्याच्या सामाजिक-राजकीय वातावरणात ही नावं आवर्जून सांगायला हवीत. ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले, शाहूमहाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य तर उभ्या महाराष्ट्राला वंदनीय आहेच. अशा अनेक थोर धोरणी माणसांमुळे शिक्षणाची चळवळ मूळ धरू लागली.

या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात ‘वक्तृत्वोत्तेजक’ सभा स्थापन केली. ते साल होतं १८७५. त्यातूनच ‘वसंत व्याख्यानमाला’ आणि १८७८ मध्ये पहिलं ग्रंथकार संमेलन पुण्याच्या हिराबागेत भरलं होतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना याच ग्रंथकार संमेलनात झाली. या शैक्षणिक-वैचारिक अभिसरणाचं पाठबळ सांस्कृतिक क्षेत्राला मिळत राहिलं. त्याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे कलावंतिणींचे कोठे आणि राजदरबारांच्या भिंती ओलांडून संगीतानं मुक्त श्वास घेतला. निषिद्ध मानलेल्या संगीताला टप्प्याटप्प्यानं लोकाश्रय मिळू लागला. याच अभिसरणाच्या काळात अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी ‘संगीत शाकुंतल’ नाटकाचा प्रयोग करून संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली – जणू ‘मऱ्हाटी’ रसिकतेला जाग आली. लढाया आणि मुलुखगिरी करणाऱ्या मराठ्यांना आपली रसिकता प्रकट करायला तोपर्यंत फुरसतच मिळाली नव्हती; परंतु ‘शाकुंतल’ पाहिल्यावर रसिकांनी कौल दिला, ‘यालाच नाटक म्हणतात.’ 

देवगंधर्वांचं संगीत क्षेत्रातलं पदार्पण हे संगीत रंगभूमीवरच झालं. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी किर्लोस्करांच्या ‘रामराज्यवियोग’ नाटकात ‘कैकयी’ची भूमिका केली होती. गायन आणि अभिनयातील नैपुण्यामुळे भास्करबुवा काही काळ रंगभूमीवर स्थिरावले होते. संगीत नाटकांमुळे पदांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची गंगा वाटा-वळणं घेत वाहत राहिली. कीर्तनानंतर प्रथमच पांढरपेशा वर्गाला हक्काची करमणूक मिळाली आणि कीर्तनाप्रमाणेच पदांमधूनही साधे सोपे राग श्रोत्यांच्या परिचयाचे झाले. 

उदाहरणार्थ : ‘नाथ हा माझा’ म्हणजे राग ‘यमन.’

संस्था-स्थापनेसाठी भास्करबुवांना अशी सुपीक सांस्कृतिक जमीन लाभली आणि त्यांनी लावलेला आणि अनेकांनी जोपासलेला संस्थारूपी वटवृक्ष शाखा-उपशाखांनी बहरत गेला.

संस्था-स्थापनेचा काळ स्वातंत्र्य चळवळीनं भारलेला होता. त्याग आणि समर्पणाची भावना रुजत होती, कर्तव्यभावना जागृत झाली होती. प्रत्येकाला  स्वातंत्र्य चळवळीत उडी घेणं शक्य नव्हतं; परंतु आपापल्या कार्यक्षेत्रात मनापासून, कुठलाही लोभ न धरता काम करत राहण्याची इच्छा मोठ्या प्रमाणावर प्रबळ झाली होती. या लोकभावनेचा परिणाम भास्करबुवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर होणं स्वाभाविक होतं. तसाच तो झालाही असणार; कारण पैसा, प्रसिद्धी अशा मोहात न अडकता ते संस्थेचं कार्य करत राहिले आणि जाताजाता पुढल्या पिढीकडे तो वसा देऊन गेले. काही प्रमाणात हा तत्कालीन राष्ट्रवादाचा परिणाम होता असं म्हणता येईल.

उपलब्ध कागदपत्रांमधून अगणित माणसं भेटली – कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे. भूतकाळातील ही साधीसुधी माणसं त्यांच्या कार्यातून माझ्याशी बोलत होती. खरंतर त्यांच्या हयातीत ती स्वतःबद्दल बोलली असतील असं वाटत नाही. त्यांच्यापैकी काहीजण शाळेत अर्धवेळ संगीत-शिक्षक होते, कुणी देवळात गायनसेवा करणारे, कुणाचं भजनीमंडळ… अत्यंत मर्यादित आर्थिक स्रोत असणारा तो काळ होता; तरीही अनेकांनी आपलं आयुष्य संस्थेच्या मुळाशी शिंपलेलं आहे. आपली शेतजमीन विकून संस्थेचं कर्ज फेडायला मदत करणारे शंकरबुवा अष्टेकर, संस्थेसाठीच जगलेले दि. गो. दातार मास्तर, भास्करबुवांची गायकी पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणारे संगीत शिक्षक – भोपे बंधू, बापूराव केतकर, श्रीकृष्ण वैद्य… संस्थेत दिवे गेल्यावर शिक्षकांना अख्खी मेणबत्ती देऊन ‘उरलेली परत आणा’ असं सांगणारे व्यवहारदक्ष अध्यक्ष रावसाहेब केळकर…अशा अनेकांमधील डोंगराएवढ्या निष्ठा मी पाहिल्या म्हणूनच त्यांच्या साध्यासुध्या व्यक्तिमत्त्वाला ‘कणा’ प्राप्त झाला आहे असं वाटलं. देवगंधर्वांवरच्या श्रद्धेनं ‘समाजाशी’ बांधून घेतलेली माणसं तेव्हा होती आणि आजही आहेत. 

काही सन्माननीय अपवाद वगळता सध्या लहान-लहान कलावंतांच्या मोठ्यामोठ्या सावल्या पडू लागल्या आहेत. प्रसिद्धीचा भस्मासुर पसरला आहे. अशा वातावरणात ही माणसं मला भेटली – जणू अक्राळविक्राळ असत्यापुढे इवलंसं सत्य ताठ मानेनं उभं आहे असं वाटलं आणि या माणसांनी त्यांच्याही नकळतपणे मला सकारात्मक जगण्यासाठी फार मोठं बळ दिलं.

Author

Leave a Reply