महुद ते ह्युस्टन: लेख २

मुंबईतील महाविद्यालयीन शिक्षण (जून १९७३ – जुलै १९७४)

मी मुंबईतील रूपारेल महाविद्यालयात कसा पोहोचलो?

एस. एस. सी. परीक्षेत प्रथम आल्याने लाभलेल्या  वलयाचा  आनंद काही दिवस घेतल्यावर आणि पंढरपूर व पुण्यात काही सत्कार समारंभांना हजेरी लावल्यावर मला एक मोठा निर्णय घ्यायचा होता : महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठी पुणे की मुंबई? आणि मग, कोणते महाविद्यालय? दोन्ही शहरांमध्ये माझे बरेच नातेवाईक होते त्यामुळे वसतिगृहाचा प्रश्न नव्हता. मला पुण्यातील प्रसिद्ध आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे निमंत्रण आधीच मिळाले होते. फर्ग्युसन महाविद्यालय हादेखील पुण्यात एक पर्याय होता. मुंबईत रुईया (सामान्यतः मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची  निवड), सेंट झेवियर्स (इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची निवड) इत्यादी प्रमुख महाविद्यालये होती; तथापि, एस. एस. सी.च्या निकालानंतर काही दिवसांत, मला सांगलीतील १९७२ च्या एस.एस.सी. टॉपर संजीव कट्टी यांचे ‘वैयक्तिक’ पत्र मिळाले. त्यांनी मला मुंबईतील माटुंगा रोडवरील डी. जी. रूपारेल महाविद्यालयात प्रवेश घेण्याची शिफारस केली.  विज्ञान-शिक्षणासाठी हे आज मुंबईतील सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एक म्हणून ओळखले जाते; पण १९७३ मध्ये त्याची प्रतिष्ठा फारशी चांगली नव्हती. ते ‘उनाड मुलांचे कॉलेज’ म्हणून ओळखले जात होते. 

संजीवने  लिहिले, “तू इतरांकडून जे ऐकतोस त्याची काळजी करू नकोस. विज्ञान शाखेत ४-५ प्राध्यापक आहेत, जे रूपारेलचा दर्जा वाढवण्यासाठी खूप प्रयत्नशील  आहेत.” 

त्याने विशेषतः गणित प्राध्यापक अनंत मनोहर सुरू यांचा उल्लेख केला. त्यांनी संजीवला एक वर्ष त्यांच्या घरी ‘फुकट शिकवणी’ दिली होती. त्याने आणखी एक गोष्ट सांगितली की, तो पुन्हा विद्यापीठात प्रथम आला होता आणि एप्रिल १९७३ च्या परीक्षेत त्याने मुंबई विद्यापीठाचा एफ.वाय. एससी. गुणांचा विक्रम मोडला होता. माझा मोठा भाऊ शासकीय दंत महाविद्यालयात, व्ही.टी.मध्ये बी.डी.एस. साठी प्रवेश घेत असल्याने, या महाविद्यालयात प्रवेशाचा माझा निर्णय झाला.

 धडा : नेहमी ‘तज्ज्ञांचे’ ऐका आणि त्यांच्या वैयक्तिक उदाहरणाचे अनुसरण करा.

आम्ही आमचे अप्पामामा – वाय. एस. कात्रे, जे मध्य रेल्वेत अधिकारी होते – यांच्यासोबत दादर (पूर्व) येथील सेंट्रल रेल्वे ऑफिसर्स कॉलनी, ब्लॉक बी-६, दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. ते सुमारे २००० चौरस फूट असलेले एक मोठे घर होते. दोन मोठे शयनकक्ष, दोन  स्नानगृहे, एक भोजनालय, स्वयंपाकघर आणि प्रवेशद्वाराजवळ २५’ x २५’चा एक मोठा हॉल! तसेच, अनेक इमारती असलेल्या वसाहतीच्या मध्यभागी खेळ आणि व्यायामासाठी  मोठी खुली जागा होती. 

फक्त तीन  समस्या होत्या :

१. दादर स्टेशन मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर असल्याने, कॉलनीच्या मागच्या बाजूला एकूण १२ किंवा १६ मार्ग (साइडिंग, मालगाडी मार्ग धरून) होते. पहिली गाडी  पहाटे ४:३० च्या सुमारास आणि शेवटची रात्री २:०० च्या सुमारास जायची. रात्री लोकल, एक्सप्रेस गाड्या आणि मालगाड्यांच्या सततच्या आवाजामुळे व शिट्यांमुळे मला काही झोप येत नव्हती.  तथापि, माणूस आजूबाजूच्या वातावरणाशी लवकर जुळवून घेतो. एका आठवड्यानंतर, हे सर्वकाही पार्श्वभूमीतील ‘स्वीकार्य’ आवाज बनले.

 २. एक कचरा गाडी दर  रविवारी – (कदाचित दररोजच; पण सोमवार ते शनिवार मी महाविद्यालयात असायचो.) दुपारी १२ च्या सुमारास सिग्नल नसल्यामुळे थांबायची. त्या वेळी आम्ही दुपारच्या जेवणाचा आनंद घेत असू. तो  दुर्गंध अगदी  असह्य  होता. काही  आठवड्यांतच  तोही  जवळजवळ जाणवेनासा झाला.

पहिल्या मजल्यावर एक बंगाली कुटुंब राहत होते. आठवड्यातून किमान तीन वेळा ते तळलेले ‘सुकट  बोंबील’ खायचे. संपूर्ण जिन्यात त्याचा उग्र वास भरून राहायचा. त्याही वासाची मला सवय झाली; पण जेव्हा आमचे नातेवाईक  येत, तेव्हा ते फक्त लिफ्टने येत आणि पहिल्या मजल्यावरून लिफ्ट जाताना नाकावर साडीचा पदर  किंवा रुमाल घेत. 

आदरणीय दादासाहेब रेगे यांची भेट

१८ जूनला महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी मी मुंबईत तीन सत्कार समारंभांना हजेरी लावली. सर्वात अविस्मरणीय कार्यक्रम दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्कजवळील प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरमध्ये होता. ही मुंबईतील मराठी माध्यमाच्या  सर्वोत्तम शाळांपैकी एक होती. त्यांचे नेहमीच टॉप ५० मध्ये अनेक विद्यार्थी असायचे. १९७३ मध्ये त्यांचे ४ विद्यार्थी या पहिल्या पन्नासांत होते. तिथे माझी दोन महत्त्वाच्या व्यक्तींशी  भेट झाली.  एक, मिलिंद श्रीखंडे (SSC दुसरा क्रमांक) यांच्याशी माझी पहिली भेट झाली. तेव्हापासून आम्ही आयुष्यभरचे मित्र आहोत. दुसरे, बालमोहनचे संस्थापक आणि त्या वेळचे प्राचार्य, शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे. समारंभानंतर त्यांनी मला आणि माझ्या आई-वडिलांना त्यांच्या कार्यालयात बोलावले. मला अजूनही आठवते, जेव्हा मी त्यांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा त्यांनी मला काय आशीर्वाद दिला : “शिरीष तू ज्ञानेश्वर होशील.” मला त्या वेळी त्या भविष्यवाणीचा अर्थ खरोखरच समजला नाही. आज ५१+ वर्षांनंतर मागे वळून पाहताना, मला वाटते की, पंढरपुरात शाळा बांधण्याचे माझे स्वप्न आणि आता २१ व्या शतकातील मुलांच्या शिक्षणावर पुस्तके लिहिणे! हे सर्व – कमीत कमी काही प्रमाणात तरी – त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम असू शकेल?

महाविद्यालयीन  वर्षातील मजा आणि आव्हाने आणि आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश (१९७३-७४)

मी रूपारेल महाविद्यालयात जायला लागलो.  प्रा.सुरू  यांनी मला आणि इतर ३ जणांना  –   (एस. एस. सी. मध्ये ८०% किंवा अधिक गुण, पंढरपूरच्या रवींद्र अनंत कुलकर्णीसह) संध्याकाळी त्यांच्या घरी गणिताचे फुकट शिक्षण देणे सुरू केले. मी महाविद्यालयाचा दुसरा आठवडा गमावला कारण मला अजूनही सोलापूर जिल्ह्यात काही सत्कार समारंभांना हजेरी लावायची होती; त्यांतील विशेष दोन मला आठवतात : एक म्हसवडमध्ये, आमच्या डीएचके शिक्षिका पुष्पा कुलकर्णी यांनी आयोजित केलेला आणि दुसरा माळशिरसमध्ये, जिथे विजयसिंह मोहिते पाटील प्रमुख पाहुणे होते.

रूपारेलमध्ये पहिल्याच दिवशी एक मजेदार गोष्ट घडली. प्रा. पी. व्ही. चंद्रात्रे  यांचा फिजिक्सचा वर्ग होता. त्यांनी घोषणा केली, “आपल्या महाविद्यालयात एस. एस.सी. टॉपर आहे.” मग त्यांनी मला विचारले, “शिरीष, तू घनतेची व्याख्या सांगू शकतोस?” माझी वाचाच गेली! कारण मी ती मराठीत (घनता) शिकलो होतो आणि इंग्रजीमध्ये कशी भाषांतरित करावी हे मला माहीत नव्हते. त्यांनी मला मोठ्या मनाने मराठीत उत्तर देण्याची परवानगी दिली. तथापि, काही मागच्या बाकांवरच्या विद्यार्थ्यांनी, “वशिला लावून फर्स्ट आला!” असे टोमणे मारले आणि अनेक विद्यार्थी माझी खिल्ली उडवत हसले. या सर्व लोकांना मी माझ्या पद्धतीने उत्तर दिले. विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेत मी ५वा आलो 

सुरुवातीचे काही महिने मला  इंग्रजी माध्यमात जुळवून घेणे खूप कठीण जात होते; कारण ११वीपर्यंत माझे सर्व विषय मराठी माध्यमात होते. रोज वर्गात मी जेवढ्या नोट्स घेऊ शके तेवढ्या घेत असे. माझी इंग्रजी लिहिण्याची गती फारशी चांगली नव्हती. मग दर रात्री  प्रत्येक विषयाच्या दोन-तीन पाठ्यपुस्तकांच्या मदतीने नोट्स पुन्हा लिहिण्यात  मी २-३ तास घालवत असे. मिलिंद विले पार्ल्यात  राहत होता आणि पार्ले महाविद्यालयात जात होता. त्याने मला मदत करण्याची ऑफर दिली. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आला होता. प्रत्येक शनिवारी रात्री आम्ही एकमेकांच्या घरी जात होतो – दादर आणि विले पार्ल्यात आळीपाळीने  आणि एकत्र अभ्यास करत होतो. याला  ऑगस्टच्या १५ तारखेच्या आसपासच्या एक-दोन  शनिवारांचा अपवाद झाला. एके  शनिवारी  त्यांच्या कॉलनीत ‘हरियाली और रास्ता’ चित्रपट दाखवला जात होता आणि  दुसऱ्या वेळी  आम्ही फुकट पासवर पु. ल. देशपांडे यांचे खूप प्रसिद्ध मराठी विनोदी नाटक ‘वाऱ्यावरची  वरात’ पाहण्यासाठी गेलो होतो. त्यात  डॉ. वसंतराव देशपांडे आणि श्रीकांत मोघे – मिलिंदचे सख्खे मामा – त्या काळातील अनेक दिग्गज कलाकारांसोबत मुख्य कलाकार होते.

माझ्या महाविद्यालयातील दुसऱ्या महिन्यात एक अविस्मरणीय गोष्ट घडली. आमच्या वर्गाची  विहार तलावावर एक सहल  गेली. उत्तम जेवण जेवून आणि काही खेळ खेळल्यानंतर, माझ्या काही वर्गमित्रांनी गाणे आणि नृत्य करणे सुरू केले.  त्यांनी मला गाण्याची विनंती केली. तेव्हा मी पं.वसंतराव देशपांडे यांचे माझे आवडते नाट्यगीत  ‘या भवनातील गीत पुराणे’ गायले.  मला आठवते की, मी १९७१ किंवा १९७२ मध्ये पंढरपूरमधील टिळक मंदिराच्या रंगमंचावर ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक पाहिले होते. वर्गमित्रांनी ते  गायन सहन केले.  त्यांच्यापैकी बहुतेक जण एखाद्या फिल्मी गाण्याची अपेक्षा करत होते आणि मला तशी हजारो गाणी तोंडपाठ होती, तरीही ! 

आणखी एक मोठी आठवण : एक दिवस माझ्या केमिस्ट्रीच्या प्रयोगशाळेत, पुणे एस. एस. सी. बोर्डाचे कॅमेरामॅन असलेले एक पथक आले. त्यांनी माझे  टायट्रेशन करतानाचे काही फोटो काढले. त्यांनी माझा फोटो नवीन १० वीच्या केमिस्ट्रीच्या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर टाकला. गेल्या काही वर्षांमध्ये मी अनेक कनिष्ठ विद्यार्थ्यांना (भारत आणि यूएसए दोन्हीमध्ये) भेटलो आहे, ज्यांनी मला पहिल्यांदा त्यांच्या पाठ्यपुस्तकातील त्या फोटोत पाहिले होते ☺

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात, नोव्हेंबर १९७३ च्या सुरुवातीस दिवाळीच्या सुट्टीत मी पंढरपूरमधील आमच्या घरी गेलो होतो. याचे  दोन फायदे झाले, एक अल्पकालीन आणि दुसरा दीर्घकालीन. मी माझे बहुतेक आयुष्य महाराष्ट्रातील कोरड्या (दुष्काळी) प्रदेशात घालवले होते. मुंबईतील प्रचंड पावसाने माझ्या आरोग्यावर खरोखरच परिणाम झाला आणि माझे वजन सुमारे ६ किलो कमी झाले. माझ्या वडिलांनी मला पंढरपूरचे सीएमओ, डॉ. कोडोलीकर यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांनी निदान केले की, माझ्या वारंवार पोट खराब होण्याचे कारण  अमिबीक डिसेंट्रीचा एक प्रकार आहे. त्यांनी दिलेल्या औषधामुळे मुंबईतील पुढील अनेक वर्षांच्या वास्तव्यात  माझी ती समस्या मिटली. १९७३ मध्ये मिरजची विद्या काटदरे, तिच्या शहरात प्रथम आणि एस. एस. सी. मध्ये ३० वी आली होती, तिने मला अभिनंदन पत्र लिहिले.  आम्ही पत्र-मित्र झालो होतो. तिने मला दिवाळीत आमंत्रित केले म्हणून मी काही दिवसांसाठी मिरजला गेलो. विद्याला आणखी तीन बहिणी होत्या. मिरजमध्ये पहिल्या रात्री इतकी थंडी होती की, त्यांनी मला माझ्या एका रजईखाली थरथरताना पाहिले, म्हणून माझ्या आधी उठून त्या चौघींनीही त्यांच्या रजया माझ्यावर टाकल्या. मला नरसोबाच्या वाडीतील प्रसिद्ध दत्त मंदिरात ३० किलोमीटरहून अधिकची १ दिवसाची यात्रा पायी केल्याचेही आठवते. १९७३ मध्ये सुरू झालेली ही मैत्री आजही कायम आहे. 

भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात – आयआयटी, बॉम्बेमध्ये प्रवेश घेण्याची माझी खरोखरच इच्छा होती. आज ११वी आणि १२वीतील बहुतेक विद्यार्थी  जेईई (आणि नंतर जेएटी) क्रॅक करून आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात. आपल्या शहरात लाखो रुपये फी भरून किंवा त्यांचे पालक खूप श्रीमंत असतील तर कोटा राजस्थान येथे  राहून   ते दोन वर्षांचे कोचिंग क्लासेस करतात. १९७४ मध्ये जेईईची तयारी करण्यासाठी मुंबईतील सर्वोत्तम कोचिंग क्लासेस अग्रवाल क्लासेस होते. त्यांची फी ५,००० रुपये होती. मला खातरी आहे की, तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली असेल, “अरे! किती स्वस्त!” तथापि, १९७४ मधील ५,००० रुपये ५० वर्षांच्या महागाईसह आजचे  सुमारे २ लाख रुपये असतील! माझ्या वडिलांना ही फी  परवडणारी नव्हती. सुदैवाने माझ्याकडे एक पर्याय होता.  प्रा. सुरू यांनी मला सांगितले, “शिरीष, जर तू खूप अभ्यास केलास आणि मुंबई विद्यापीठाच्या एफ. वाय. एससी. परीक्षेत टॉप १० मध्ये आलास, तर तू जेईई न देता आयआयटी बॉम्बेमध्ये’ थेट’ प्रवेश मिळवू शकतोस.” 

तुम्ही बरोबर अंदाज लावलात! मी एप्रिल १९७४च्या एफ. वाय. एससी. परीक्षेत ५ वा क्रमांक मिळवला आणि जुलै १९७४ मध्ये केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ५ वर्षांच्या बी.टेक.साठी आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला.

शिक्षणातील राजकारण (अध्याय २)

 डॉ.बावधनी  यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता १९७३च्या एस. एस.सीमध्ये माझा पहिला क्रमांक कसा  टिकवून ठेवला हे माझ्या गेल्या  लेखात मी  सांगितले आहे. १९७४ मध्ये मी तितका भाग्यवान नव्हतो आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागले. काही कारणांमुळे आमच्या एप्रिल १९७४ च्या परीक्षेचा निकाल एक महिना  उशिरा लागला.  मला फक्त ८१% गुण (६८६/८५०) मिळाल्याने धक्का बसला. मला  किमान ८८% अपेक्षित होते. सर्व विज्ञान विषयांमध्ये – सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक – मला अपेक्षेपेक्षा सुमारे १० गुण कमी मिळाले. सर्वात वाईट फिजिक्समध्ये झाले. मला सैद्धांतिक परीक्षेत फक्त ५६/१०० गुण मिळाले. (विद्यापीठात  ७६ चा पहिला होता) मी पुनर्मूल्यांकनासाठी  अर्ज केला पण काहीही बदल झाला नाही;  फक्त माझे १० रुपये शुल्क वाया गेले. ☹. मला समजले की, ते फक्त एकूण गुणांची बेरीज तपासतात, पुनर्मूल्यांकन करत नाहीत. हे खूप हास्यास्पद आहे!  मी खूप रागावलो होतो! प्रा.सुरू यांनी तर्क मांडला की, हा कदाचित रूपारेलविरुद्ध व्यवस्थेने घेतलेला  ‘बदला’ होता. गेल्या वर्षी संजीव रूपारेलमध्ये आला आणि त्याने विद्यापीठात गुणांचा  नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्यांना ते पुन्हा होऊ द्यायचे नव्हते! आणि, दुर्दैवाने, माझ्या हक्कांसाठी मुंबईत लढण्यासाठी माझ्याकडे दुसरे  ‘डॉ. बावधनी’ नव्हते.

माझा माझ्या फिजिक्समधील  इतक्या सुमार कामगिरीवर विश्वासच बसत  नव्हता. सुदैवाने, माझ्याकडे एप्रिलमधील आमच्या परीक्षेची  प्रश्नपत्रिका होती. मी माहीममधील प्रा.फाटक – रूपारेलमधील फिजिक्सच्या सर्वोत्तम प्राध्यापकांपैकी एक – यांच्या घरी गेलो. एका वेगळ्या खोलीत बसलो. त्यांनी १५० मिनिटांचा टाइमर लावला – परीक्षेच्या  कालावधी एवढा. मी पुन्हा पेपर सोडवला. लक्षात ठेवा, मी आयआयटी जेईई दिली नव्हती. त्यामुळे मी आमच्या एप्रिलच्या परीक्षेपासून कोणतेही फिजिक्सचे अध्ययन केले नव्हते. मी काही भाग विसरलो असेन आणि कदाचित एक प्रश्न सोडवला नसेल. प्रा. फाटक यांनी माझी उत्तरे तपासली आणि मला सांगितले, “तुला ७३ ते ७५ च्या दरम्यान गुण मिळायला हवेत. काही ‘वर्णनात्मक’ प्रश्न असल्याने परीक्षक थोडे वेगळे गुणांकन देऊ शकतात. यामुळे माझा ‘आत्मविश्वास’ काही प्रमाणात परत आला.

तरीही मी पाचवा  कसा आलो?

जीवनातील एक महत्त्वाचे तत्त्व: “When you do the best you can, God will do what you can’t.”

बहुतेक विद्यार्थी  इंजिनीअरिंग किंवा मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक  विषयांवरच  लक्ष केंद्रित करतात : इंजिनीअरिंगसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, गणित ज्याला ग्रुप ए म्हणतात किंवा वैद्यकीयसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी –  ज्याला  ग्रुप बी म्हणतात. भाषांसाठी ते क्वचितच अभ्यास करत. त्यात  फक्त ३५+ (‘पास’) मिळवणे पुरेसे होते. देवाचे आभार की,  विद्यापीठाच्या रँकसाठी एकूण गुणांची गणना केली जात होती.

मला सर्व विषय आवडत होते, शालेय शिक्षणात तसेच महाविद्यालयातही. मी सर्व विषयांचा अभ्यास केला होता. त्यामुळे जरी मला आयआयटीमध्ये जायचे होते, तरी मी बायोलॉजीचा अभ्यास इतर तीन विज्ञान विषयांप्रमाणेच समर्पणभावाने केला होता. बायोलॉजीसाठी, मला सैद्धांतिक परीक्षेत ८०/१०० आणि प्रात्यक्षिक परीक्षेत ४०/५० गुण मिळाले (खरंतर, ते अनुक्रमे ९० आणि किमान ४८ असायला हवे होते ☺). मी भाषांचाही प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. मराठीसाठी आम्हांला दोन पाठ्यपुस्तके होती : जयवंत दळवी यांचे  ‘सारे प्रवासी घडीचे’ – एक मजेदार कादंबरी आणि डॉ. दुर्गा भागवत यांचे ‘ऋतुचक्र.’ मला मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये सुमारे ७०/१०० गुण मिळाले होते. अशा प्रकारे, राजकारणाने  मला प्रथम येण्यापासून रोखले; पण माझ्या सवयीने  आणि शिस्तीने तरीही मला पाचवा येण्यास आणि आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.

रूपारेलमधील आमचे प्राचार्य प्रा. मुदगल ‘कन्नडी’ होते.  त्यांनी मला पहिल्या आठवड्यात त्यांच्या घरी (परिसरात असलेल्या ) चहासाठी आमंत्रित केले. त्यांनी मला विचारले, “शिरीष, तुला तुझ्या ‘पारिपत्यदार’आडनावाचा अर्थ माहीत आहे?”  मला काही कल्पना नव्हती. मी विनोद केला, “माझ्या कोणत्याही पूर्वजांनी कोणाला हरवलेले नाही (पारिपत्य करणे).” ते म्हणाले, ही कर्नाटकात एक प्रकारची ‘पदवी’ होती. मला फक्त एवढेच माहीत होते की, आमच्या कुटुंबाचे  मूळ  कर्नाटकात  आहे. नंतर मला माझ्या काकांकडून समजले की, आमच्या काही दूरच्या नातेवाइकांपैकी काही जण कर्नाटकातील हलशी येथील ‘भू वराह लक्ष्मी नरसिंह’ मंदिराचे ‘पुजारी’ आहेत. हे बेळगावपासून सुमारे एका तासाच्या अंतरावर आहे. मी सप्टेंबर २०२३ मध्ये त्याला भेट दिली. 

आमचे गणित-त्रिकोणमितीचे प्रा. सोमण  खूप मजेदार होते. जर एखाद्या विद्यार्थ्याने बिंदू P चे निर्देशांक सांगितले नाहीत, तर ते विनोद करत, “हा P कुठे आहे? तुमच्या डोक्यावर, माझ्या डोक्यावर की अरबी समुद्रात?” वनस्पतिशास्त्र प्राध्यापक प्रधान नेहमी वनस्पतींची नावे मराठी भाषेत सांगत. उदाहरणार्थ, बीन्ससाठी ते म्हणायचे, “ज्याला आपण मराठीत ‘पावटा’ म्हणतो.” प्राणिशास्त्र प्राध्यापक रमेश दिघे नेहमी इंग्रजी व्याकरणाची एक चूक करून वर्ग सुरू करत : “Last time, we learned about the reproductive system. Today, we starts with the Circulatory system.” (योग्य इंग्रजी “start” असायला हवे).

एका चुकीची पुनरावृत्ती 

मी तुम्हांला सांगितले होते की, माझ्या अतिआत्मविश्वासामुळे एस. एस. सी. बीजगणित-भूमितीच्या पेपरमध्ये ९९ (१०० ऐवजी) गुण कसे आले. प्रा. सुरू यांच्या खासगी शिकवणीमुळे आम्ही वर्गाच्या पुढे होतो, त्यामुळे, फेब्रुवारीपर्यंत आमचा संपूर्ण गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. अंतिम परीक्षांच्या आधीच्या शेवटच्या महिन्यात, मी गणिताचा तेवढा अभ्यास केला नाही जितका करायला हवा होता. परिणामी, मी कॅल्क्युलसच्या एका सूत्रात चूक केली आणि पुन्हा सोपे ३ गुण गमावले! ☹

एफ. वाय. एससी. १९७४ च्या फिजिक्स पेपरबद्दल अधिक

माझा अजूनही विश्वास बसत नाही. हा पेपर माझ्या भविष्यातील जीवनात दोन महत्त्वाच्या प्रसंगी भाग असेल :

१ जानेवारी १९८६ रोजी राधिकाशी लग्न झाल्यानंतर तिचे आई-वडील १९८६ च्या उत्तरार्धात ह्युस्टनला आले. तिचे वडील, डी. वाय. प्रभुदेसाई (आम्ही त्यांना ‘भाऊ’ म्हणत असू.) १९४० ते १९८० पर्यंत मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयात फिजिक्सचे खूप लोकप्रिय  प्राध्यापक होते. जेव्हा त्यांना समजले की, मी १९७३-७४ दरम्यान रूपारेलमध्ये एफ. वाय. एससी. करत होतो, तेव्हा त्यांनी विचारले, “१९७४ मध्ये फिजिक्सचा पेपर कसा होता? कारण तो मी तयार केला होता.” मी त्यांना सांगितले, “खरोखरच, भाऊ, तो आतापर्यंत मी सोडवलेल्या सर्वोत्तम पेपर्सपैकी एक होता. एकही प्रश्न केवळ सूत्र वापरून सोडवणे  किंवा ‘पाठ’ केलेल्या उत्तरावर, घोकंपट्टीवर आधारित नव्हता. प्रत्येक प्रश्नाने आम्हांला विचार करायला आणि सोडवण्यासाठी अनेक भौतिक तत्त्वे लागू करायला लावले.” मग त्यांनी विद्यापीठातील ‘वेगळ्या’ राजकारणाबद्दल सांगितले. अशा असामान्य प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांची ‘नापास’ (३५गुणांपेक्षा कमी गुण) होण्याची टक्केवारी  जास्त झाली. यामुळे अनेक महाविद्यालयीन प्राध्यापकांनी कुलगुरू श्री. टोपे यांच्याकडे निषेध नोंदवला की, पेपर अभ्यासक्रमाबाहेरचा होता. भाऊ म्हणाले, “मी टोपे सरांकडे अभ्यासक्रम आणि काही मंजूर पाठ्यपुस्तके घेऊन गेलो आणि सिद्ध केले की, काहीही अभ्यासक्रमाबाहेरचे नाही!” मग, मी त्यांना माझी कथा सांगितली आणि त्यांनी माझ्याबद्दल सहानुभूती दर्शविली. 

   डिसेंबर २०१९ मध्ये आमच्या बॅचच्या ४० व्या वर्धापन दिनापूर्वी आम्ही आमच्या १९७९ बी. टेक. बॅचमेट्सचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ग्रुपमधील चर्चेच्या विषयांपैकी एक ‘१९७४’ चा फिजिक्स पेपर होता! ४५ वर्षांनंतरही सगळ्यांना तो आठवत होता!! एका मित्राने सांगितले की, त्याला आठवते की, सामान्यतः एटीकेटी (टर्म्स ठेवण्याची परवानगी) ३०-३४ गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (१-५ ग्रेस गुण देऊन ‘पास’ होण्यासाठी) असायची; १९७४ मध्ये फिजिक्ससाठी, विद्यापीठाला ते सुमारे २० पर्यंत खाली आणावे लागले.

—————————————————————————————

पुढील आकर्षण : आयआयटी बॉम्बेमधील माझी सर्वोत्तम  सात वर्षे

Author

Leave a Reply