| भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे एक साधनमात्र नसून ती भारताची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असलेली भारतीय रेल्वे, दररोज कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. ही रेल्वे केवळ लोकांसाठीच नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची आहे. मालवाहतुकीतही रेल्वेचा मोठा वाटा आहे, ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळते. भारतीय रेल्वेचा इतिहास १६० वर्षांहून अधिक जुना आहे. तेव्हापासून, आजपर्यंत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रेल्वेने अनेक बदल पाहिले आहेत. आज, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, रेल्वे अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनली आहे. भारतीय रेल्वे हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक प्रतीक आहे. याची ओळख आपल्या लेखमालिकेतून करून देताहेत हेमंत कुलकर्णी . |
रेल्वेची तोंडओळख
१८५३ साली १६ एप्रिलला चालू झालेली झुकझुक/धडधड/आणि आता सुस्स्स्सस करीत चालणारी रेल्वे चालते कशी?कोण आहेत यामागे? त्यांच्यातील सुसूत्रता, काम करणारे हात, रात्रंदिवस चालणारी स्टेशन्स, गाडीचे चालक, कर्मचारी, त्यांचे पगार,आरोग्य, त्यांची कुटुंबे अशा सर्व बाबींचा विचार लहानपणापासून माझ्या मनात चालत असे आणि तशातच एके दिवशी रेल्वेत रुजू व्हायचे ठरले. आजदेखील लहानपणीचा तो प्रसंग आठवला की हसू येते.
मी दुसरीत किंवा तिसरीत होतो, एका रेल्वे प्रवासादरम्यान मी धीटपणे तिकीट निरीक्षकाला (TC) विचारले होते, “मला तुमच्यासारखे होण्यासाठी किती शिकावे लागेल?” समजूतदारपणे त्याने उत्तर दिले, “कॉलेज पास झाल्यावर मला भेट.”
… आणि मी Railway Recruitment Board परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी पास होऊन सिकंदराबादला दोन वर्षांचे प्रशिक्षण घेण्यास निघालो. हे प्रशिक्षण अगदी सैनिकी शिस्तीचे होते. सकाळी कवायत, नंतर व्याख्यान किंवा प्रात्यक्षिक. दर सोमवारी चाचणी. प्रत्येक LECTURER/INSTRUCTOR आम्हांला म्हणायचा, “गाडी देर से चली तो कारण बता सकते हैं, accident मतलब आप ने गलती की है| पढाई ठीकसे करो,ताकी मनचाहा posting मिलेगा.” अशा सिग्नल आणि टेलीकम्युनिकेशन विभागात दूरसंचार निरीक्षक म्हणून आम्हां तीन मराठी मुलांचे प्रशिक्षण सुरू झाले. आमच्या एकूण ५५ च्या बॅचमध्ये बंगाली,राजस्थानी, आसामी यांचाच भरणा जास्त होता.
आमची जेवणाची मेस आम्हीच चालवत असू. काही दिवसांनी ‘मेस सचिव’ ही जबाबदारी माझ्यावरच पडली. आधीचा मेस-सचिव आसामी (पूर्वेकडील ) रेल्वेचा होता. माझे ट्रेनिंग आणि मेस सचिवाचे काम चालू झाले. रोज एका उमेदवाराची मेस DUTY. मेनू आणि लागणारे पैसे असे आम्ही ठरवत असू. मला साह्य करणारे इतरजण होतेच. त्या वेळेस आमचा रोजचा खर्च ६३ रुपये असायचा. यात सकाळचा चहा, उत्तम आणि भरपूर नाश्ता, दुपारचे जेवण,होस्टेलला आल्यावर परत चहा आणि अल्पोपाहार आणि रात्रीचे मस्त जेवण. या सगळ्यासाठी लागणारा शिधा कसा ठरवायचा यासाठी मेसमध्ये एक Ready Reckoner होता. जितके ट्रेनी असतील त्याप्रमाणे, ज्याची मेस DUTY आहे तो शिधा काढून देत असे. कधी कधी अन्न खूप उरायचे आणि वाया जायचे. मला वाईट वाटायचे. एक दिवस मी आईला याबाबत विचारले. तिला आमची मेसची प्रक्रिया सांगितली. तिने मला सल्ला दिला “अरे, १०० जण जेवत असतील तर ८० ते ८५ जणांचा शिधा घ्यायचा.” मी हा सल्ला मानला आणि अन्न कमी वाया जाऊ लागले. कधी- कधी उरायचेसुद्धा नाही. मी तिथले बरेच भंगार सामान मोडीत घातले आणि आलेले पैसे मेस खात्यात जमा केले. अशा किरकोळ सुधारणा मी करत होतो आणि सोबत अभ्याससुद्धा!
एक दिवस माझ्या रूमध्ये मला एक चिठ्ठी मिळाली,“महोदय, मेस के ताले बदलो.” मला काही कळले नाही; पण एक दिवस चारमिनारला फिरत असताना रिक्षा चालक म्हणाला, “आपके मेस का खाना बढिया रहता है|” मला अजब वाटले. चौकशीत कळले की, त्याचा भाऊ मेसमध्ये होता आणि उरलेल्या अन्नाची आणि मिठाईची तो ५ रुपये पार्सल प्रमाणे आसपास गुपचूप विक्री करायचा. सगळे उमेदवार प्रशिक्षणाला गेले की हा व्यवहार करायचा. मी सगळी कुलपे बदलली आणि एक दिवस तो माझ्याकडे आला. गयावया करू लागला. मी त्याला सांगितले, “निम्मे पैसे मेसच्या खात्यात भरत जा.”तो कबूल झाला. मेसला उत्पन्न मिळाले,अन्नही वाया गेले नाही. मला उगीच भारी वाटले. आमचे एका वर्षाचे क्लासरूम ट्रेनिंग संपले. मी मेसचा कार्यभार एका बंगाली उमेदवाराला दिला. त्या वेळी दिवसाचा खर्च होता ५२ रुपये आणि माझ्या कारकिर्दीस सुरुवात होतेवेळी हा आकडा होता ६३/- रुपये प्रतिदिवस. माझ्यासारख्या इतर उमेदवारांचे पैसेही मी वाचवले याचे मला एक आत्मिक समाधान वाटले. ह्या सगळ्या गोष्टी त्याला मी कारभार सोपवताना सांगितल्या.
आमचे एक वर्षाचे क्लास रूम ट्रेनिंग संपले. आम्ही परत FIELD TRAINING साठी मुंबईला परतलो. आता बाहेरचे खाणे! आमची तात्पुरती सोय भायखळा होस्टेलला केली होती. रोज आम्ही दगडी चाळ येथून डबा आणायचो. तेथील एक-दोन चकमकीसुद्धा आम्ही पाहिल्या. रोज नवे स्टेशन, नवा मार्ग पाहत आम्ही ट्रेनिंग घेत होतो. लोकलचा प्रवास मजेशीर वाटत होता. गर्दी होतीच, आतासारखी AC लोकल नव्हती. आम्हांला फिरण्यासाठी पूर्ण मध्य रेल्वेचा पास दिला होता. लोकलमध्ये एक नवीन प्रकार पहिला.
एक AGENT ( रेल्वे कर्मचारी नव्हे) ५० रु. घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्याला एक कार्ड देत असे. तुम्ही विनातिकीट फिरा, दंड झाल्यास तोही द्या; पण त्याआधी ५० रुपये भरून उल्हासनगरच्या एका टोळीची मेंबरशिप असायला हवी. विनातिकीट फिरताना दंड झाल्यास माझ्याकडे या आणि दंडाची रक्कम घ्या. त्याचे गणित असे होते की गर्दीमुळे कोणी पकडले जाण्याची शक्यता खूप कमी होती. त्याने असेच भरपूर पैसे कमावले. शेवटी तो दक्षता विभागाकडून(VIGILANCE) पकडला गेला. VIGILANCE चे किस्से पुढे सांगेनच.
—————————————————————————————————————-
इनोद
“अरे मित्रा, आज मी रेल्वेला फसवले” ,
“ते कसे?”
“तिकीट काढले आणि सरळ घरी निघून आलो.”
हेमंत कुलकर्णी

खूप छान लिहिले आहे मित्रा. सुरुवात एकदम मस्त झाली. रेल्वे जीवनातील अनुभवाचे छान मांडणी केलीस.पुढील लेखांसाठी खूप खूप शुभेच्छा.
खुप मस्त..शिर्षक हि अगदी मनपसंत…लहान मुलांनासुद्धा वाचायला लावेल असं आहे…!! लेखात टाकलेली वाक्ये अतिशय सुटसुटीत आणि छोटी असल्याने परीणाम कारक झाली आहेत.
Mast lekh. आता हळूहळू सगळे लेख वाचेन.