विठ्ठल कवी आणि चित्रकाव्यबंध
विठ्ठलाने अलंकार, वृत्तं आणि कथांनी कवितासुंदरी सजवली. त्याने चढवलेले आणखी एक काव्यलेणे म्हणजे चित्रकाव्य.
एखाद्या वस्तूची, विषयाची, आकृतीची मनात कल्पना करून त्या कल्पनेला अनुरूप अशी शब्दरचना करणे –विवक्षित
वर्ण ठरावीक ठिकाणी आणणे आणि ती शब्दरचना चित्ररूपात रसिकांपुढे ठेवणे याला कृत्रिम काव्य समजलं जात असलं तरी विठ्ठलाची नवीन काही देण्यामागची धडपड थक्क करून जाते.
चित्रकाव्यबंधाचा अर्थ अगदी सोपा आहे; पण रचना अवघड आहे. बंधनात असलेलं काव्य ते बंधकाव्य. काव्यरचनेचं वृत्त, काही अक्षरांची होणारी नियमित आवृत्ती यांमुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होतं. शब्दवेडा कवी विठ्ठल नवनवीन शब्दांची वृत्तबद्ध गुंफणच नव्हे तर चित्रणही करत असे. या भागात आपण विठ्ठलाचे काही चित्रकाव्यबंध पाहू या.
१)द्वादशदल कमलबंध – १२ पाकळ्यांची कमळाकृती. २१ अक्षरी मोठं वृत्त – स्रग्धरा.
चाल : ध्याये नित्य महेशम्/६८/१७

नाटोपे कृष्ण काळा, कुटिल अघमळा
कैं न लिंपे विटाळा
चोरीचा त्यासि चाळा, गवळणि अबळा
मोहिल्या चक्रचाळा
घाली मंदारमाळा अजगर बगळा
मारिला काग काळा
त्या नेदी राजबाळा कवण करि बळा त्कार पाहो नृपाळा?
चालीत म्हणताना लक्षात येईलच – दर सातवं अक्षर ‘ळा’ आहे. इथे बंधन आहे वृत्ताचं आणि अक्षरांचं. चालीत म्हणताना कधीकधी अक्षर तोडलंही जातंय – चवथ्या ओळीत कवण करि बळा… त्कार असा टवका उडाला आहे; पण हे बंधकाव्यात क्षम्य आहे.
विठ्ठलाला असा शब्दचातुर्याचा नाद होता आणि त्याने स्वतःसाठीच अवघड मानकं ठरवली.
‘च्छा’ हे जोडाक्षर स्रग्धरेतच कसं गुंफलं आहे बघा
…६८/१९
श्रीवत्साचे यदृच्छा पदक धरि उरीं वर्तताहे स्वइच्छा
सोंगें घे कूर्ममच्छादिक बहु कपटी राज्यभोगीं अनिच्छा
कंठीं मंदारगुच्छावळि मणि मुकुटीं वेष्टिता केकिपिच्छा
दुष्कर्में सर्व आच्छादुनि यश मिरवी हे जयाची चिकिच्छा
द्वादशकमल बंध का म्हणायचं? यति असलेल्या अक्षरावर एकच अक्षर १२ वेळा येत आहे.
यति असलेलं अक्षर मुख्य धरून त्याची प्रतिष्ठापना मध्यभागी करायची आणि बाकी ओळी १२ पाकळ्यांमध्ये लिहायच्या.
(चित्रं त्या-त्या ठिकाणी जोडली आहेत.)
२)असाच आठ पाकळ्यांच्या मांडणीत गुंफलेला पंचचामर वृत्तातील अष्टदल कमल बंध. ९२/३१

अनंग जाळिला भवें मग स्वभूसि वैभवें
सुतप्रदान शांभवें दिलें तया मनोभवें
शरासनीं स्वसंभवें क्षुरप्र योजिलें जवें
प्रपंचचामरा जवें विजीति दूत लाघवें
आठव्या अक्षरावर येणाऱ्या वे वर यति येत आहे. वे हे अक्षर मध्यभागी ठेवून याचाही सुंदर चित्रबंध रेखाटला आहे.
३)पट्टिश बंध. पट्टिश हे पट्ट्यासारखं जुनं अस्त्र आहे. ८५/२७

कृष्णाची थोर सेना पसरली गगनासारिखी पाहवेना
पृथ्वीछाया दिसेना दशशतवदना भार तो साहवेना
इथे शेषाचं वर्णनही दशशतवदन असं करून बंधात चपखल बसवलं आहे.
४) व्यजनबंध ९६/१२

व्यजन म्हणजे पंखा! शार्दूलविक्रीडित वृत्त पंख्याच्या आकारात बसवलं आहे.
वज्रांगें सधटें महाबळकटें वीरांकरीं कांबिटें
बाणाचीं तकटें मुखें पसरटें ताटें निघोटें निटें
टे हे अक्षर पंख्याच्या कळीत बसवून बाकीचा शब्दडोलारा उभारला आहे.
५)चामर किंवा चवरीच्या आकारातील बंध. इथेही स्रग्धरा वृत्त आहे आणि चामराची कळ आहे ‘गी’ ९०/२२

वैदर्भी कोमलांगी युत जडितनगीं दिव्यरत्नें अनेगी
जैसी गंगा प्रयागीं गवसित अपगी सागरा जाय वेगीं
तशी ओढीनं श्रीकृष्णाच्या भेटीला रुक्मिणी निघाली आहे.
६)मालाबंध हा अतिशय अवघड प्रकार. माळिणी दोऱ्यातून गाठी मारत माला तयार करतात तसा हा बंध. वृत्त आहे वसंततिलका. ९३/३६

विश्वासली विजुसमद्युति हेमकांती
उद्बोधली उडुधवप्रतिमा वसंतीं
अग्रें निकी असि निरीक्षिलि नारि आली
हर्षें सती हरिस लुब्धलि माळ घाली.
यात पहिलं अक्षर आहे तेच तीन अक्षरं सोडून येतं. उ – उ, अग्रें असि, हर्षें हरि,
तसंच तिसरं अक्षर तीन अक्षरं सोडून येतं..
ओळींतील दहावं आणि शेवटचं अक्षर सारखं आहे.
७)भुजंगप्रयातातील अश्वबंध देखणा आहे. ९६/१०

तुरंगी कसे वीर शोभेति भारी
करी हातयंत्रें धनुर्बाणधारी
कुरंगाकृती वीर शोभेति भारी
शिरीं आतपत्रे तनुत्राणधारी
अशा विविध बंधांखेरीज विठ्ठलाच्या काव्याचा आणखी एक विशेष म्हणजे जुन्या कथांचे संदर्भ असलेल्या रचना २९/८
समुद्राला सागर का म्हणतात, तर रामाचा पूर्वज सूर्यवंशी सगर राजा. त्याला साठ हजार पुत्र होते. समुद्रातील अश्वमेधाचा घोडा शोधण्याचा या सगरपुत्रांनी प्रयत्न केला म्हणून समुद्राचे नाव सागर झाले. अशा अनेक कथा, उपकथांचे संदर्भ विठ्ठलाच्या काव्यात येतात. वामन दाजी ओक यांनी एकत्रित केलेल्या विठ्ठलाच्या काव्यसंग्रहात या कथा टिपणांमध्ये वाचायला मिळतात.
म्हणी आणि वाक्प्रचार वृत्ताच्या आवरणातून विठ्ठल वाचकांसमोर ठेवतो. वास्तववादी म्हणींच्या उपयोजनामुळे कथेतील पात्रंही वास्तवातली — हाडामांसाची वाटतात.
२५९/२४)
परमेश्वराची माया भूलभुलैया निर्माण करते आणि त्यात गुरफटून टाकते हे स्पष्ट करताना कवी म्हणतो
तूंचि वदनपुटीं खडा लाविसी वरि लावुनियां गूळ
विचित्र तरि काय वदावें तव मायेचे मूळ
२६१)जोंवरि संपती तोंवरी कांपती शेवटी येती न कामा
कोठिल बाइल कोठिल लेंकरूं कोठिल काका मामा
जोवरी पैसा तोवरी बैसा ही जगाची रीत स्पष्ट सांगणारी ही म्हण.
दुर्योधन धर्माला निमंत्रण पाठवतो तेव्हा धर्माला आश्चर्य वाटतं. म्हणतो… आज सूर्य कुठे मावळला…
१७७/१४
उत्तरेसि आजि अस्त सूर्यराज पातला
आमवातिथीस चंद्र हा नभीं विराजला
एखाद्या गोष्टीवर पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे हाही वाक्प्रचार विठ्ठल द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी काव्यात गुंफतो. (१७९)
जनानिमित्य या धनें भुमीस तोय सोडणें
हातात नाही दमडा आणि घ्यायला चालला कोंबडा – अशी एक ग्रामीण म्हण आहे. तशाच अर्थाने द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी (१९०/१३०) दुर्योधनाला कावळ्याची उपमा देत कवी म्हणतो
वायसास काय प्राप्त राजहंसनायिका
१७७/११गंगास्नानानें पुण्यप्राप्ती व्हावी यासाठीं लोक दूरवर जातात. एखादा आळशी असा असतो, त्याच्या जवळ गंगेचें पात्र येते आणि स्नानाचा लाभ घडतो.
‘मला पैसाअडका नको, मला धर्माला भेटायचं आहे,’ साश्रू नयनांनी केलेल्या या नाटकाला फसून विदुर धर्माकडे, सुयोधनाला तुझी फार आठवण येत आहे हे सांगायला जातो.
विदुर स्वतः आपल्या घरी चालत आलेला बघून धर्माचा आनंद गगनात मावत नाही. ‘आळशावर गंगा लोटली’ ही म्हण खुबीने गंगेचे गौतमी हे नाव कामदा वृत्तात खोवून, बोलण्यात घरगुती स्वागताचा बाज ठेवून
धर्माचा अत्यानंद व्यक्त केला आहे.
धर्मजी म्हणे काय गौतमी
आळसी तया प्राप्त आश्रमीं
१६२/१६
ज्याची हो पयसीं विदग्ध रसना, तो तक्र फुंकोनि पी
दुधानं जीभ ( विदग्ध – पोळलेली रसना- जीभ) भाजली की ताकही फुंकून पितात याचं शार्दूलविक्रीडितात सजवलेलं हे रूप मजेशीर वाटतं.
१६२/१६ (शार्दूलविक्रीडित)
कस्तूरींत पलांडु जैं उपजला तो काय हो आपुला…
कस्तुरीत कांदा निघाला त्याला आपला मानू नये… इथे पलांडुला एक ठेच लागते. संस्कृत पंडित असल्याने त्यांच्या काव्यात अवघड संस्कृत शब्द वरचेवर येतात; तत्कालीन मराठीतले काही शब्दही अवघड वाटतात. अशा शब्दांवर अडखळायला होतं.
अहंकाराने रावण म्हणतो (३७/९)
दुर्गा गणेश गुह नंदि शिवःसभेला
कैलास म्यां भुजबळें श्लथरूप केला
श्लथरूप म्हणजे गलितगात्र.
२४/१९ अहल्या ब्रह्म्याची बुज रघुपती मानससुता
बूज ठेवणेचा अर्थ मान राखणे असा होतो. विठ्ठल ‘समज’ या अर्थी हा शब्द उपयोजितो.
पराग या फुलांशी संबंधित शब्दाचा आणखी एक अर्थ ग्रहण असाही आहे हे विठ्ठलाच्या प या अक्षराच्या अनुप्रासाच्या आग्रहामुळे लक्षात येतं.
२४/२५
परम पर्वणि सूर्यपरागिंची विशद पुण्यकथा परिसा तिची
सूर्यपराग म्हणजे सूर्यग्रहणाची वेळ साधून इंद्र ‘टपकला.’
उलथा याचा अलीकडच्या काळातील अर्थ उलथून टाकणे असा होतो. पण
‘मराठी मी पद्यें करुनि रचितों शुद्ध उलथा’
अशी त्याची भूमिका आहे. उलथा म्हणजे भाषांतर.
१९/४०_४१
जनकाला मिळालेल्या पेटीत काय आहे,
मालिनीत गुंफत विठ्ठल सांगतो
उघडित मग पेटी त्यांत पंचाब्दकन्या
पाच वर्षांची मुलगी ती कशी आहे? कुसुमधनुषमूर्ती – कुसुमधनुष म्हणजे मदन. मदनासारखी सुंदर!
२०/४६ जनकाला भेटण्यासाठी परशुराम येतो तेव्हा
बैसविले मुनि विष्टर देउनि
शब्दकोशात अर्थ सापडला तो : पंचवीस दर्भांची अग्रे खाली करून डाव्या हाताकडे पीळ घातलेली दोरी म्हणजे विष्टर.
११९/३१ कंबरपट्ट्याला सुरशना – शब्दशः सुंदर दोरी असा शब्द ते शार्दूलविक्रीडितात बसवतात.
केयुरांगद कुंडले सुरशना हस्तांबुजीं आयुधें
१२२/४७
श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह अगदी मराठमोळ्या पद्धतीने लावत
वोहरांकडुनि घेवविताति नावें…
वोहर म्हणजे वधुवर – त्यांना नावे घ्यायला सांगतात. हा स्थलविपर्यास मजेशीर ठरतो.
२०/५४
राजाज्ञा मुकुटीं तुरंबुनि गणीं गंतव्य केलें असे…
मस्तकाला लावून स्वीकार करणे याला तुरंबुनि हे क्रियापद शार्दूलविक्रीडितात बसवण्यासाठी यथायोग्य योजलं आहे.
लंकाप्राप्ति मरीचिला करुनियां संरक्षिलें अध्वरा
असं कौतुक वाचताना हा अध्वर कोण असा प्रश्न पडू शकतो. अध्वर म्हणजे यज्ञ (२२/६)
२६/३५ गौतम ऋषी अहल्येला उःशाप देताना म्हणतात,
‘श्रीरामांघ्रिसरोजरेणु जडतां पूर्वस्थिती पावशी’
अंघ्रि म्हणजे पाय. सरोज म्हणजे कमळ रामाच्या पदकमळाच्या धुळीच्या स्पर्शाने तुला पूर्वस्थिती प्राप्त होईल… शाब्दिक कसरती, ज्ञान आणि वृत्त यांची ही गुंफण
२७/४४ मनश्चंद्रमा अर्यमा नेत्र ज्याचे… असा राम… अर्यमा म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी
३१/१७
श्रीरामाच्या पदस्पर्शाने पाषाणदेही मुक्त झाली. पाषाणदेही म्हणजे अहल्या.
उपलयुवति असा सुंदर शब्द कवीने मालिनी वृत्तात योजला आहे. उपल म्हणजे दगड.
३०५/१७ अनंताचे तल्पीं – पलंगावर – पहुडलेला श्रीकृष्ण…शिखरिणीत अचूक खोवलेला शब्द. द्रौपदी स्वतःला चकोर म्हणत श्रीकृष्णाची आळवणी करताना म्हणते, (३०५/१९)‘तवकरमयूख’ प्रसविणे… तुझे हस्तकिरण मला दिसतील असं कर.
स्वतःचं शब्दप्रावीण्य दाखवणं एवढाच विठ्ठलाचा हेतू होता असं अजिबात वाटत नाही. तो पंडित होता, शब्दांच्या नावीन्यपूर्ण उधळणीतून आपली कविता सजवून रसिकांसमोर ठेवणे हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न होता असेच वाटते.
वस्त्रहरण प्रसंगी साड्यांच्या वर्णनात विठ्ठल चांगलाच रंगतो — तेही शिखरिणी वृत्तात. बिडौजा हा शब्द पुन्हा संभ्रमात टाकतो… (३०७/३२) बिडौज म्हणजे इंद्र. इंद्राणी, हत्ती, देव यांची चित्रे रेखलेल्या साड्यांचं वर्णन करताना तो रंगतो. तेही ज्ञानप्रदर्शन न वाटता, प्रसंग रंगवताना सुचेल ते ते लिहून टाकतो असं वाटतं.
देव भक्तांसाठी धावून येतो हे सांगतानाही हा शब्दखेळ चालू राहतो.
२५६/१,२
‘नामा शिंपी’ आणि सावता ‘वाफे शिंपी’ असा शिंपीचा द्व्यर्थ मांडतो आणि पुढे या शिंपी बरोबर
दासीजनीच्या कुडचुली भाणवशा लिंपी रे म्हणतो.
२२७/३४
स्वेदोदकें करुन पिच्छल आंग बाई
हे वाचताना ठेच लागते. पिच्छल म्हणजे चिखलाने माखलेलं.
२२६/३०
रसमंजरीत वित्तमात्रोपाधि सामान्य नायिकेचे वर्णन करताना कवी म्हणतो
आनंदाश्रुजळें त्यजी घडिघडी धमिल्लमाला छळें
मूळ संस्कृतातला धम्मिल्ल शब्द – अर्थ – दागिन्यांनी शृंगारलेली केशरचना.
२२९-१३
प्रेयसीला भावना, कल्लोळ व्यक्त करता येत नाही… द्रुतविलंबितात हे बसवताना
उसरमा मनिंचा वदता न ये
मूळ शब्द उश्रमा – रुसवा/ गाऱ्हाणं हा अर्थ.
पहिले तीन लघू हवेत म्हणून उश्रमा चा उसरमा केला!
कधी ही तोडमोड तर कधी जडजंबाळ संस्कृत शब्द!
२२९/१४
करसरोरुहतर्जन असा झिडकारले या अर्थी शब्द ते वापरतात.
२३२/२९
‘चिकुरधोरणी धूपिले’ हे कोणतं धोरण नसून चिकुरधोरणी म्हणजे केस – केस धुपवले असा अर्थ आहे.
२३४/३७ रातकिड्यांची किरकिर वर्णिताना झिल्लीचे रव हा शब्द ते शार्दूलविक्रीडितात गुंफतात. लहान डबके याला थिल्लर हा शब्द वाचूनही मजा वाटते. १७८/२२
१८८/११५ द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी
इळापाळ बोले… वाचून क्षणभर प्रश्न पडतो…
इला पृथ्वी – तिचा पालनकर्ता राजा – असा अर्थ लक्षात येतो.
१६५ परिरंभित म्हणजे आलिंगन देणे,
२११ वरवेत्रधार म्हणजे द्वारपाल
अशा अनेक शब्दांची आपल्या शब्दकोशात भर पडते. सितच्छदभापरिपूर्ती हा शब्दप्रयोग सवाई वृत्तात ते योजतात. १४/२ सितच्छद म्हणजे हंस – शुभ्रहंसिनी.
८१/२९ त्रिदशवाहिनिमेघपुष्प यात पुन्हा अडखळायला होतं. त्रिदशवाहिनी म्हणजे गंगा, मेघपुष्प म्हणजे ढगाचं फूल म्हणजे पाणी.
ही झटापट कशासाठी? तर… वसंततिलकेत बसवण्यासाठी.
७२/४१ भुजंगप्रयातात बसवण्यासाठी आणि ळी चा अनुप्रास योजण्यासाठी केलेली कसरत…
प्रदीपावळी सोहळ्याची दिवाळी
असें सौख्य नेणें कदा नाकपाळी
चालीवर म्हणताना अचानक नाकपाळी या शब्दाला ठेच लागते. नाकपाळी म्हणजे इंद्र.
वृत्तात बसवण्याचा विठ्ठलाचा असा आटापिटा कधी हसू आणतो तर कधी जडजंबाळ शब्दांनी, अर्थ लावायच्या झटापटीने दम लागतो.
पान३०३/५
शिखरिणी वृत्तात बसवण्यासाठी बोलती ऐवजी
‘न बोलेती द्रोणादिक विदुर भीष्मादि उगले ‘असं म्हणतो.
कवी पाया पडतो हे साधं वाक्य शिखरिणीत बसवताना (३०३/१)
कवींद्रें राजश्रीवरदगणराजांघ्रि नमिले अशी शब्दांची ठाशीव रचना करतो.
पण ठाशीव रचनेतही सातत्य असतंच असं नाही…
२६२- पदे – प्यायली ऐवजी
सांवळी विठाई माझी… पीयाली मुखीं फळ फूल पान भाजी
असं लिहितो.
७०/२८ संस्कृत पंडित असूनही शब्दांची कसरत करताना संधींचे, नियमांचे तुकडे तोडतो. कवीला याची मुभा असते तरीही ही कसरत विठ्ठलाच्या पांडित्यापुढे केविलवाणी ठरते.
रवीचंद्रज्वालानलतडितवेष्टीत वसती
हा १४ अक्षरांचा समास शिखरिणीत बसवताना नियम धाब्यावर बसवले आहेत. रवीचंद्र नव्हे रविचंद्र हवं. तडित्+वेष्टित म्हणजे तडिद्वेष्टित असं हवं.
वृत्तांचा सोस इतका वाढतो की केवळ गण साधले जावे यासाठी चक्क शब्दांची मोडतोडही विठ्ठल करतो. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी
निराशा सर्वांची मुख किविलवाणें करुनियां
असा केविलवाणा प्रयत्न करतो.
१५३ विभुविण वइकुंठा चालिला प्राणपीठा
तरि अणि उतकंठा लागली पुष्यपीठा
मालिनी वृत्तात बसवण्यासाठी इ आणि उला चक्क कापून वेगळं करून ठेवलं आहे.
रुक्मिणी स्वयंवरात लग्नकार्याचं वर्णन करताना ते लिहितात
(पान ८८)
नारेळे उद इक्षुदंड उतत्या निंबें लवंगा बुका
उतत्या याचा अर्थ काय?
निंबे, पूगीफलं हे बाकीचे शब्द वाचल्यावर उतत्या हे उदबत्त्यांचं आणि बुका हे बुक्क्याचं सोईस्कर रूप केलेलं असावं असं वाटतं.
आणखी एक गंमत म्हणजे पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाच्या धारांचं वर्णन शार्दूलविक्रीडित वृत्तात बसवण्यासाठी कवी काय लिहितो,
भौमाच्या जननीवरी रिचवती…
मग डोक्याला ताण देऊन भौम म्हणजे मंगळ ग्रह – त्याची जननी म्हणजे पृथ्वी…
पृथ्वीवर पडणारा पाऊस असा साधा अर्थ निघतो.
१५१/२६
मदमस्त जुळे हत्ती कान हलवल्याने येणाऱ्या वाऱ्याने भुंग्यांना दूर लोटत आहेत हे वाक्य शार्दूलविक्रीडिताचा पोशाख चढवत विठ्ठल कसं सजवतो…
हस्तीची यमलें महामदजळें दावेति गंडस्थलें
त्या गर्वें विपुलें मधूकरकुलें वारी स्वकर्णानिळे
स्वकर्ण अनिळे कान हलवल्यावर येणाऱ्या वाऱ्याने… हे स्पष्ट केलं की कान हलवणाऱ्या हत्तींचं रूप समोर येतं… पण त्यासाठी बरीच तोड मोड जोड करावी लागते.
वैचित्र्यनिर्मितीचा सोस वाचूनही मजा वाटते तशीच कधीकधी या सोसाची कीव येते. ३०१/१३३
गा गा राघवनामातें
गारा मानुनि विषयातें
गारासम समजुनि जगत्फुगारा…
गान निरत किति गा नर तरले गायनकर…
गाल फुगवुनि न गाल हरिस न जगाल बगाल यमचित्सदनीं
पांडित्यपूर्ण रचना आणि गाल फुगवुनी गाणं ही रचना विठ्ठलाच्या प्रतिभेला आणि ज्ञानाला शोभेशी नाही.
वृत्तांचा मोठा अभ्यास, पांडित्य असलेल्या विठ्ठलाच्या लेखनात एखादी चूकही आढळते
११४/४
वचन केशवें अंगिकारिलें
नररलग असे गण असलेले शुद्धकामदा वृत्त योजले असले तरी त्याला मनोरमा गालगागा गालगागा( रतगग) असे म्हटले आहे.
१५०/१८
जल कंबुशे बहु पंक होय वाटे (१- १३)
नदनदी त्याप्रति पूर फार दाटे (२-१४)
धन दुर्दिनोत्तम मानला समग्रा
रस निपजे सखि वृत्त पुष्पिताग्रा
पुष्पिताग्रा हे अर्धसम वृत्त आहे. पहिल्या आणि तिसर्या ओळीत १२ अक्षरे आणि ननरय गण हवेत आणि दुसर्या आणि चौथ्या ओळीत १३ अक्षरे नजजरग गण हवेत. या पंक्तींत १३ आणि १४ अशी अक्षरे आहेत आणि ती गणांप्रमाणेही नाहीत. विठ्ठलाचं वृत्तांवरचं विलक्षण प्रभुत्व लक्षात घेता, ही वृत्त‘पुष्पा’मधली चूक जुने ग्रंथ चाळायला भाग पाडते. मो.स. मोने आणि वृत्तदर्पणकारांनी ननरय आणि नजजरग असेच गण दिले आहेत. त्यामुळे विठ्ठलाची ही रचना सदोष आहे असे वाटते.
अश्लीलता हा विठ्ठलाच्या काव्याला असलेला धब्बा आहे. श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन करताना त्याचे शब्द घसरतात.
२८२/८४
फडफडां मडकी फोडतो
मजनिकट डोळे मोडतो
२९१/१११
आंगणीं दिवसासि आंगासिं कां झोंबें
गाल चुंबुनि मम शयनीं करि चैल सैल
अशा किंवा याहूनही अश्लील रचना विठ्ठलाच्या पदांमध्ये आढळतात. त्यामुळे
२८१/८०
बहुत बोलुनी काय रे!
धरी सद्गुरूपाय रे
चिंतितार्थ फळतील सकळ कळतीलच तरणोपाय रे
पूर्ण काम विश्रामधाम श्रीरामरूप गुरुपाय रे
अशा रचना केवळ भक्तिकाव्य रचना म्हणून लिहिल्या गेल्या असाव्यात असं वाटतं.
कालविपर्यास हा ढळढळीत दोषही विठ्ठलाच्या काव्यात दिसतो. सीतास्वयंवराला कोण कोण उपस्थित होते त्या वऱ्हाड्यांची जंत्री विठ्ठल सादर करतो. ३२/२६ (शा. वि.)
संन्यासी भट वैद्य ज्योतिषि महामौनी तडीतापडी,
श्रोत्री पंडित सिद्ध साधक मुनी, तीर्थाटणी कापडी…
यांशिवाय शास्त्रज्ञ, नाट्यगायक, सराफ, कापडवाले, वाणी अशी विठ्ठलकालीन वऱ्हाड्यांची जंत्री ते रंगवतात.
रुक्मिणीस्वयंवर प्रसंगी रुक्मिणी श्रीकृष्णाचा धावा करत असताना म्हणते, ७९/१९
‘विचित्रें पांचाळीप्रति अमुप वस्त्रे पुरविली||’
वास्तविक द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग रुक्मिणी स्वयंवराच्या नंतर घडलेला आहे. त्यामुळे ही आळवणी हास्यास्पद ठरते.
या दोषांसकट त्याचं काव्य स्वीकारावं ते त्याची शब्दांवरची हुकमत, वृत्तांचं वैविध्य, मनुष्यस्वभावाची जाण आणि त्यानुसार होणारी पात्राची रंगवलेली वर्तणूक यासाठी!
विठ्ठलाच्याच आवडीच्या स्रग्धरा वृत्तातून त्याच्या लेखनाची वैशिष्ट्यं मांडण्याचा छोटासा प्रयत्न :
चित्रे कूटात्म रेखे| कवन बहुसुखे| गुंफितो वृत्त मेखे|
लोकांचे दोष जोखे| जनमन विळखे| रंगवी पात्ररेखे||
शौर्यप्रताप देखे|गुणभजन मुखे| कौतुके काव्य माखे|
दोषांची काहि डेखे|परि मन हरखे| काव्यआनंद चाखे||
लेखात वापरलेली सर्व छायाचित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत.
