डावीकडून चंद्रकांत झटाले,भानू काळे, शरद अभ्यंकर, दत्तप्रसाद दाभोळकर, रूपा अभ्यंकर
शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ ची संध्याकाळ. वाई येथील टिळक वाचनालयाचे रमेश गरवारे सभागृह साहित्यप्रेमींनी भरले होते. निमित्त होते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ (मनोविकास प्रकाशन, पुणे) या पुस्तकाच्या डॉ.शंतनु अभ्यंकर यांनी केलेल्या ‘Unraveling the Real Swami Vivekanand’ या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन.
मंचावरती पुस्तकाचे लेखक डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ.शरद अभ्यंकर (कै. डॉ. शंतनु अभ्यंकर यांचे वडील, ज्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले), अनुवादाचे तरुण आणि उत्साही प्रकाशक चंद्रकांत झटाले, डॉ. रूपाली अभ्यंकर (डॉ. शंतनू यांच्या पत्नी) आणि प्रमुख पाहुणे लेखक – संपादक भानू काळे ही मंडळी उपस्थित होती. समारंभात या सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. हे पुस्तक लिहिण्यामागची आपली प्रेरणा काय होती ते डॉ. दाभोळकर यांनी सांगितले. रात्री जागून आपला मुलगा अनुवादाचे हे काम कसे करत होता याविषयी डॉ. शरद अभ्यंकर बोलले. सातारा येथील डॉ. संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले. पुण्याचे प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि डॉ. शंतनु यांचे बालमित्र श्री. मकरंद शेंडे यांनी आपल्या मित्राच्या अनेक आठवणी सांगितल्या. आभारप्रदर्शन केले वाईच्या डॉ. प्रशांत पोळ यांनी. कै. डॉ. शंतनू यांनी त्यांच्या दुर्धर आजारपणात खूप मेहनत घेऊन या पुस्तकाच्या अनुवादाचे काम जिद्दीने पूर्ण केले. हे महत्त्वाचे पुस्तक आहे आणि त्याचा इंग्रजी अनुवाद व्हायला हवा आणि मी स्वतःच तो करेन हा त्यांचा निर्धार होता. संपूर्ण समारंभावर त्याबद्दलची कृतज्ञता आणि त्यांच्या अकाली निधनाचे दुःख यांची छाया पडली होती.
अनुवादित पुस्तकाची झलक श्रोत्यांना यावी या उद्देशाने डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी पुस्तकातील विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील संबंध दाखवून देणारी दोन इंग्रजी पाने वाचून दाखवली. त्या संदर्भात भानू काळे यांना एक मुद्दा मांडायचा होता; पण शेवटी वेळ अपुरा पडल्याने तो न मांडताच त्यांना त्यांचे भाषण थोडक्यात आटोपते घ्यावे लागले होते. तो मुद्दा म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भातली एक आठवण आणि तिच्यातून निर्माण होणारे दोन प्रश्न. या वृत्तांतात त्याचा उल्लेख करावासा वाटतो. एकदा जमशेदजी टाटा यांची आणि स्वामी विवेकानंदांची बोटीने प्रवास करताना परदेशात गाठ पडली होती. त्या वेळी बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची आखणी टाटा करीत होते. टाटा यांनी या संस्थेला आपला तिसरा मुलगा मानले होते आणि आपली एक तृतीयांश मालमत्ता त्यांनी याच संस्थेसाठी राखून ठेवली होती. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालता येईल या दृष्टीने अभ्यास करणारा एखादा विभाग तिथे सुरू करता येईल का आणि तसा तो सुरू केला तर त्याचे प्रमुख स्वामी विवेकानंद होतील का, असा टाटांचा प्रश्न होता. त्यांनी प्रवास संपल्यावर विवेकानंद यांना पाठवलेल्या एका पत्रातून तो विचारला होता; पण एरव्ही बराच पत्रव्यवहार करणार्या विवेकानंदांनी त्या पत्राला मात्र उत्तर दिले नव्हते. विवेकानंदांनी टाटा यांची ती ऑफर का स्वीकारली नाही? विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालता येईल असे विवेकानंदांना वाटत नव्हते का? हे प्रश्न काळे यांना खूपदा पडत आले आहेत. त्या दृष्टीने विद्वानांनी काही मार्गदर्शन करावे अशी काळे यांची इच्छा होती. असो. कुठल्याच पुस्तकात सर्व प्रश्नांची उत्तरे असू शकणार नाहीत.
धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर एक निर्भीड विचारवंत म्हणून स्वामी विवेकानंदांची उत्तम ओळख या पुस्तकात डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी करून दिलेली आहे. विवेकानंद यांनी हिंदू धर्माबद्दल गौरवोद्गार जसे काढले आहेत तशीच हिंदू धर्मातील काही चुकीच्या प्रथांवर टीकाही केली आहे. आपल्या प्रत्येक विधानाला स्वामी विवेकानंद यांच्या पत्रांतील वेगवेगळ्या वाक्यांचा आधारही डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी दिलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांच्या दृष्टीने या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. इंग्रजी अनुवाद झाल्यामुळे आता देशभरातील आणि जगभरातील असंख्य वाचकांचे या आगळ्यावेगळ्या स्वामी विवेकानंदांकडे लक्ष वेधले जाईल अशी आशा आहे.
(प्रकाशक ‘फ्रीडम पब्लिकेशन’, अकोला, पृष्ठे ३२८, किंमत रुपये ४५०)

