जगणं समृद्ध करणारी ‘माती माय…’ जनाबाई

परभणीहून मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले तर गाडी लेट झालेली. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून जरा निवांतशी बसले होते. तेवढ्यात  शेजारी कोणी  मायलेकी येऊन बसल्या. लेक अगदी पोरसवदा. बोलक्या डोळ्यांची.  सुंदर, चमकदार, लांबसडक केसांचं ऐश्वर्य घेऊन आलेली. मुंबईला शिकायला निघालेल्या लेकीत  आईचा जीव  अडकलेला; त्यातही लेकीच्या मऊसूत केसांमध्ये तर अधिकच अडकलेला. माय परोपरीने स्वतःची आणि केसांची आबाळ करू नकोस असं बजावतेय. ‘वेळेवर नहात जा, तेल लावत जा…’ इत्यादी सूचना जोडीला होत्याच. लेकही  आता माझे मलाच केस धुवावे लागतील, मलाच तेल लावावं लागेल या काळजीत… माय-लेकींचा आंतरिक जिव्हाळा उमाळा मला जरा गमतीचा पण गोड वाटत होता. त्या बिचाऱ्या  माउलीचं मनही कळत होतं. खरंतर प्रसंग छोटासाच पण मनात घर करून राहिला होता. 

परवा जनाबाईंचे अभंग वाचताना  स्टेशनावरच्या मायलेकींची आठवण आली. वाटलं,  लांबसडक केसांचं ऐश्वर्य घेऊन आलेल्या लेकीला;  तिच्या  केसांची आणि तिची अखंड  काळजी वाहणाऱ्या आईच्या केवळ असण्यामुळे ती शतपटींनी ऐश्वर्यवान आहे हे तिचं तिला तरी कधी कळलं असेल का? आज कळलं नसेल तर उद्या तरी कधी कळेल का? ज्या मायेच्या स्पर्शासाठी,  आतड्याच्या जिव्हाळ्यासाठी   जनाबाई तळमळत होत्या ते सुख अनायास पदरात पडलंय ते त्या सुकेशिनीला कधी कळेल का? आई-बाप असणं, घरदार असणं, समाजात प्रतिष्ठा असणं, जीव ओवाळून टाकणारे सुहृद आपल्यासोबत असणं म्हणजे काय आणि नसणं म्हणजे काय हे जनाबाईंचे अभंग वाचून कळतं… जनाबाईंच्या भोवती मन असं  रेंगाळत राहिलं. त्यांच्या अभंगातील कातरतेने मन कासावीस झालं… विठू माउलीला घातलेली आर्त हाक वाचून उरात हुंदका दाटून आला…

माय मेली बाप मेला |

आता सांभाळी विठ्ठला||१||

मी तुझे गा लेंकरू|

नको मजशी अव्हेंरू||२||

मतिमंद तुझी दासी| 

ठाव द्यावा पायांपाशी||३||

तुजविण सखे कोण | 

माझे करील संरक्षण|| ४||

अंत किती पाहासी देवा|

थोर श्रम झाला जीवा ||५||

सकल जीवाच्या जीवना| 

म्हणे जनी नारायणा||६||

अशा संवेदनशील  जनाबाईंचा जन्म  परभणी जिल्ह्यातील गोदेकाठच्या पावन भूमीवरील एक छोटंसं गाव – गंगाखेड – या गावातला. वडील दमा आणि आई कुरूंड  – जातीच्या  उतरंडीतील खालचं स्थान मिळालेले – दोघेही विठ्ठलभक्त… लहानग्या जनीला या  अफाट जगात पोरकं करून विठ्ठलाकडे गेलेले. मातापित्यांचं प्रेमळ छत्र हरपलेल्या अबोध जनीच्या मनात तेव्हापासून  पोरकेपणाची तीव्र जाणीव जणू वसतीलाच आलेली. तिच्यासोबतच जनीचं उभं आयुष्य जाणार होतं. 

पण निस्सीम विठ्ठलभक्त नामदेवांच्या वडिलांनी –  दामाशेटींनी – या पोरक्या   जनीवर मायेची पाखर घातली. 

दामाशेटींच्या घरात चौदा-पंधरा माणसं. कामाच्या धबडग्यात जनीचा दिवस सरे. भांडी, कपडे, सडा-सारवण, दळण-कांडण, केरवारे; शिवाय रानातून शेण्या काटक्या गोळा करणं… एक का दोन! कामाचा डोंगर उपसता उपसता दिवस कधी उगवे आणि कधी मावळे  जनाबाईंना कळतही नसे; पण दामाशेटींच्या घरातल्या  सश्रद्ध वातावरणाचे, नामदेवांच्या अनन्यसाधारण विठ्ठलभक्तीचे लोट  काबाडकष्ट करणाऱ्या पण तरल मनाच्या या दासीकडे – जनाबाईंकडे – न वळते तरच नवल! तिच्याही नकळत जनाबाई विठ्ठलभक्तीच्या अबीर बुक्क्यात रंगून गेली. टाळ – मृदुंगांच्या गजरात हरवून गेली.  श्रीरंग तिचा सखा बनला. जिवीचा जिवलग झाला. तापलेल्या जगण्यातली सावली झाला. पाहता पाहता जनाबाईंच्या भावविश्वाला त्याने वेढून घेतलं. जे जे म्हणून व्हावं असं  वाटे… खरंतर वास्तवात ते होणारच नव्हतं पण तिच्या अंतरंगातला  तिचा सखा श्रीरंग तिच्यासाठी ते ते करे. तिला वाटे कुणीतरी कोरड्या पडलेल्या केसांना तेल लावावं… माय विठू तिच्या डोईला लोणी चोळी, तिला वाटे कौतुकाने कुणी न्हाणीघरातल्या  तपेल्यातल्या कढत पाण्यात शीतळ विसणाचं पाणी टाकावं, दीनांचा नाथ पंढरीनाथ  येरझाऱ्या करत घागरीवर घागरी विसणाचं पाणी आणून देई, कधी पोरकेपण मनी उसळून येई  तेव्हा वाटे कधीतरी आईच्या मायेने कुणी केस चोळावेत, सावळ्या  विठाईने  तिची पाठ चोळावी… खरंच, काय हवं असतं हो बाईला? माया, प्रेम, कधीमधी कौतुक, विश्वास, आश्वस्तपण… पण काहींचं आयुष्यच  असं असतं की या गोष्टी त्यांच्यासाठी दुर्लभ; पण जनाबाई अलौकिक… प्रत्यक्ष परमेश्वराच्या प्रेमाचा सुवर्णस्पर्श जनीला लाभला. जनाबाई लिहितात…

एके दिवशीं न्हावयास |

पाणी नव्हतें विसणास||१||

देव धांवोनिया आले | 

शितळ उदक घे घे बोले||२||

आपुल्या हातें विसणी|

घाली जनीच्या डोयीं पाणी ||३||

माझ्या डोयीच्या केसांस|

न्हाणें नव्हतें फार दिवस ||४||

तेणें मुरडी केशांस | 

कां म्हणे उगीच बैस ||५||

आपुल्या हातें वेणी घाली |

जनी म्हणे माय आली ||६||

तुळशीचे वनीं |

जनी उकलीत वेणी ||१||

हातीं घेऊनियां लोणी|

डोई चोळी चक्रपाणी||२||

माझे जनीला नाहीं कोणी | 

म्हणूनी देव घाली पाणी||३||

जनी सांगे सर्व लोकां | 

न्हाऊ घाली माझा सखा ||४||

जनाबाईंचे अभंग  तिच्यातल्या  पोरकेपणाने  हलवून सोडतात; पण त्याच वेळी   विठोबाची  जनीवरची मायाही आपल्याला गहिवरून टाकते.

जनाबाईंचा काळ सातशे-आठशे वर्षांपूर्वीचा. जातीव्यवस्थेने घट्ट आवळून टाकलेला.  स्त्रीचं अस्तित्वसुद्धा कोणाच्या खिजगणतीत नसलेला. तिचा उभा जन्म  काबाडकष्टात संपून जायचा, त्या काळात जनाबाईंसारख्या स्त्रीचा जन्म – तोही नीच जातीच्या आईबापापोटी झालेला, त्यात भर म्हणून  अनाथ; शिवाय दुसऱ्यांच्या घरची दासी…दुःखाची, अवहेलनेची  सगळी कारणं तिच्यासमोर उभी असताना तिचा आधार होता  केवळ एक श्रीपती. विठूमाउली लेकरांच्या कळवळ्याने धावत येते हे तिला ऐकून माहीत होते. वणव्यात अडकलेल्या हरिणीच्या काळजाने जना आपल्या आराध्याला बोलावते…

माझी आंधळ्याची काठी|

अडकली कवणे बेटीं||१||

आतां सांगूं मी कवणासी|

धावें पावें हृषिकेशी ||२||

तुजवाचोनी विठ्ठला |

कोणी नाहीं रे मजला ||३||

माथा ठेवीं तुझे चरणीं |

म्हणे नामयाची जनी ||४||

 तिची  आर्तता, तिची आर्जवं  हरीला धाव घेण्यासाठी विवश करतात. रुक्मिणीचा रोष पत्करून , राउळातली गर्दी सारून शेवटी तो येतो; दळण दळतो, कांडण करतो, धुणी धुतो, गोवऱ्या थापतो, अगदी रानात जाऊन  शेण्या वेचतो…   हरीच्या या मदतीला आज कोणी भास म्हणतील,  भ्रम म्हणतील… 

म्हणो बापडे! पण  करुणार्द्र भावनेने ओथंबून वाहणाऱ्या भावभक्त जनीसाठी तो धावत येतो हेच एक सत्य आहे.  जनीसाठी तो  साक्षात असतो, जिवंत, रसरशीत, परिपूर्ण असा अनुभव असतो…

झाडलोट करी जनी| 

केर भरी चक्रपाणी ||१||

पाटी घेऊनि डोईवरी | 

नेऊनियां टाकी दुरी ||२||

असा भक्तिसी भुलला |

नीच कामें करूं लागला ||३||

जनी म्हणे बा विठ्ठला| 

काय उतराई होऊं तुला ||४||

किती पारदर्शी मन म्हणायचं हे! कुठे आडपडदा नाही, दांभिकता नाही. शब्दांचा डामडौल नाही. अध्यात्माचा तोरा नाही की ‘मी’ पणाचा अहंकार नाही… विठ्ठलप्रीतीने, कृतज्ञतेने भारलेलं  जनाबाईचं  दैनंदिन जगणं विठ्ठलमय आहे. जनाबाई संत म्हणून श्रेष्ठ आहेतच पण त्यांच्यातल्या बाईपणाचे, मायेच्या ओलाव्यासाठी  आसुसलेपणाचे पाझर   मनात खोलवर झिरपत जातात आणि आपल्या जगण्याच्या तळवटी जनाबाईंशी जोडलेलं ओलं नातं काळी माती होऊन जगणंच समृद्ध करतं.

जनाबाईंना माती माय असं नाही संबोधत खरंतर… मला वाटलं म्हणून तसं शीर्षक दिलं. मला का वाटलं? तर दोन कारणांनी – एक म्हणजे  ज्या मातीत जनाबाईंचा जन्म झाला तो जिल्हा परभणी हे माझं जन्मगाव आणि त्याच तालुक्यात आमचं शेळगाव आहे, तिची नि माझी माती एकच म्हणून आणि दुसरं  म्हणजे परिस्थिती, समाज, प्राक्तन सगळ्यांचे आघात सोसूनही तिच्या मनातलं  प्रेम जिवंत राहिलं. मातीची अमर्याद सहनशीलता आणि सर्जनशीलता पाहून आपल्या मनाची मातीही समृद्ध होते. जनाबाई वाचताना मला असं काही वाटत होतं.

Author

Leave a Reply