तुमचे डिसेंबर २०२४ संपादकीय वाचले. चांगले आहे. त्यात डॉ.जेस्ते यांचा उल्लेख आहे. त्यांनी पदवी शिक्षण बी. जे. मेडिकल पुणे येथून व पदव्युत्तर मुंबईतील G. S. Medical College येथून घेतले. त्यांची व्याख्याने मुंबईत झाली होती ती मी आवर्जून ऐकली होती. डॉ.जेस्ते माझे मित्र डॉ.विहंग वाहिया यांच्या ओळखीचे आहेत. डॉ. जेस्ते यांचे नाव वाचल्यामुळे या स्मृती जागृत झाल्या.
डॉ आनंद जोशी
हैदराबादवरचा लेख(नोव्हेंबर २०२४) उत्तमच. माझं हैदराबादविषयी वेगळं मत होतं. तिथे टॅक्सी ड्रायव्हर पर्यटकांना ठरावीक भागातच हिंडवतात. काही मोहल्ल्यांत जायला लोक घाबरतात वगैरे! पण हा लेख वाचून काहीसं मतपरिवर्तन झालं.
देशपांडेसरांचा लेख वाचायला छान वाटला; पण वाचून झाल्यावर आपल्याला नेमकं काय समजलं हा प्रश्न अनुत्तरित राहिला.
डिसेंबर अंकाचे मुखपृष्ठ सुंदर. त्यावरील भाष्यही तेवढेच सुंदर.
साहित्यिक कोडे ही संकल्पना आवडली. वाचन संस्कृतीचे ते जणू दुसरे अंगच आहे. ‘केंपे गौडा’ हा लेख म्हणजे भानू काळे यांचे अनुभवसिद्ध लेखन. ‘अभिषेकी’ पुस्तक परीक्षण वाचून आपले कष्ट सार्थकी लागले असे वाटले.
संपादकीयासोबत ‘जगी हा खास वेड्यांचा…’ ही पदरचना अत्यंत अनुरूप आहे. परवा एका नियतकालिकात विनोद कांबळे आणि मुकुंद पडळकर या दोघांचा नावानिशी उल्लेख होता म्हणून हे लिहिण्याचे धाडस करत आहे. मुकुंदबरोबर मी काही कार्यक्रम केले आहेत. त्याची कवितेची जाण, संगीतातील मर्मस्थळ विश्लेषण ऐकून आम्ही थक्क व्हायचो. त्याची सांगीतिक बुद्धिमत्ता विलक्षण होती. गायन भावपूर्ण व सुरेल होतंच म्हणूनच त्याची करुण शोकांतिका का व्हावी? अशा प्रश्नांना उत्तरे नसतात. तरीही हुशारी आणि शहाणपण यांची टक्केवारी किती असते याचं मोजमाप आजतरी अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. कुणी सांगावे, उद्या ते कळेलही! या विषयाला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन.
शैला मुकुंद
