| वाई येथील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व, चतुरस्र लेखक, स्त्रीआरोग्य तज्ज्ञ, भाषांतरकार, विज्ञाननिष्ठ डॉक्टर शंतनु अभ्यंकर यांचे अकाली निधन झाले. त्यांना त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राने वाहिलेली ही शब्दसुमने. |
काय बोलू? काय लिहू?
शंतनु आज आपल्यात नाही.
कधीतरी ही घटना नजीकच्या भविष्यकाळात घडणार होतीच.
ती १५ ऑगस्ट रोजी घडली, इतकेच!
एक वादळ शांत झाले.
त्यालाच नव्हे तर सर्व संबंधितांना तशी कल्पना होतीच.
त्याचे आयुष्य कमी राहिले होते.
त्याचे विचार स्पष्ट होते,
‘आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे,’
‘चौथ्या टप्प्यामध्ये असताना त्याचे निदान झाले.’
‘हा एक असाध्य असा आजार आहे,’
‘ठीक आहे; पण त्याला मी किती कवटाळून बसू?’
ज्या कृती ‘वांझ’ असतात, त्यांचे दुःख करायचे असते का?
नेमका हाच त्याने विचार केला.
त्या आजाराने मलाच का निवडले?
आणि तेही संपूर्ण शरीराला पुरता विळखा घालून झाल्यावर समजले!
असे माझ्याच बाबतीत का?
असा प्रश्न त्याला, त्याच्या कुटुंबीयांना आणि आम्हां मित्रांना सदैव पडत होताच;
पण तो मात्र सतत वास्तववादी होता.
जमिनीवर पाय आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच त्याचा विचार आणि निर्णय व्हायचा.
आगामी काळात अपरिहार्य असणाऱ्या आपल्या मृत्यूचे नियोजन त्याने उत्तम केले होते.
गेली दोन वर्षे अव्याहत त्याची गडबड चालली होती.
आजाराचे निदान आणि उपचार आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पहिल्या वर्षात उत्तम होता.
त्याचा झपाटा, कामाचा उरक बघून आम्ही चाट पडत होतो.
त्याचे लेखन, वाचन, मनन आणि चिंतन सतत चालू होते.
मृत्यू कसा यावा याबद्दल त्याच्या स्पष्ट कल्पना होत्या.
जेव्हा हातात काहीच करण्यासारखे उरत नाही तेव्हा एकच गोष्ट उरते, ती म्हणजे ‘आशा.’
शंतनुदेखील आशावादी होताच; पण त्याच वेळी त्याने वास्तवाचे भान जरासुद्धा ढळू दिले नव्हते.
इतकेच महिने आपल्या हातात आहेत, त्यामध्ये कौटुंबिक जबाबदार्या कशा पार पाडायच्या,
पुस्तकांचे लेखन आणि त्यांचे प्रकाशन कसे करायचे,
रुग्णालयातील प्रचंड कामाच्या जबाबदार्या कशा वाटून द्यायच्या…
हे सर्व त्याने अतिशय अलिप्तपणे परंतु समरसून केले
आणि त्यानंतरच तो मृत्यूला सामोरा गेला.
त्याच्या मुलीचे डोहाळजेवण, नंतर बाळंतपण, नातीचे कोडकौतुक,
मुलाचा – मोहितचा – साखरपुडा,
अगदी त्याच्या मुलाची एम. डी. -एम. एसची प्रवेश परीक्षा –
– सर्व काही त्याने अतिशय उत्साहाने, उत्तमपणे केले,
नातीच्या कौतुकाच्या कवितांचे पुस्तकदेखील आता प्रकाशित होणार आहे.
गेल्या दोन वर्षांत त्याची पाच पुस्तके प्रकाशित झाली.
मूळचे तेलगू भाषेतील पण इंग्रजी भाषांतर झालेले एक पद्यपुस्तक त्याच्या हातात पडले.
इंग्रजी पुस्तकावर ब्रिटिश राजवटीमध्ये ‘अश्लील’ म्हणून बंदी आली होती.
ह्या पठ्ठ्याने अतिशय प्रयत्नपूर्वक त्याचे मराठी पद्यातच रूपांतर केले.
त्या काव्याचे त्याने आणि त्याच्या पत्नीने – डॉ. रुपालीने – उत्तम सादरीकरणदेखील केले!
‘राधिकासांत्वनम्’ चे वीस-पंचवीस कार्यक्रम झाले.
मलातर त्या वेळी त्यांचा ‘लक्ष्मी-नारायणाचा’ नव्हे; तर,
तर ‘पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई’ यांचाच जोडा वाटत होता!
त्याचा हा कामाचा धडाका बघून मला कधी कधी त्याची भीती वाटायची,
अगदी दृष्ट लागावी असा संसार होता
आणि नेमकी तीच भीती खरी ठरली…
एका वर्षात आजार आटोक्यात आला आहे, असे वाटत असतानाच उलटला.
पुन्हा आजारी पडला,
एखादा ‘शापित गंधर्व’ असतो, तशी त्याची अवस्था झाली.
नियतीला ‘अति वाईट’ जसे मंजूर नसते,
तसेच ‘अति चांगले’देखील मान्य नसावे, बघवत नसावे,
अशा वेळी नियती स्वतःच मिठाचा खडा टाकत असावी.
तो विचारी होता.
तो धीटपणे आपले विचार व्यक्त करण्याइतपत धाडसी होता.
तो वास्तववादी होता. डोळस होता.
भोंगळ श्रद्धांना त्याच्यापाशी थारा नव्हता.
त्याचे वाचन अफाट होते,
वाचनातील वैविध्य प्रचंड होते.
मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर त्याचे प्रभुत्व होते.
इकडून तिकडे आणि तिकडून इकडे तो सहज वाक्ये भाषांतरित करू शके;
आणि त्याच वेळी वैद्यकीय परिषदांमध्ये शुद्ध मराठीमध्ये तासभर व्याख्यान देऊ शकत असे.
ती व्याख्याने मनोरंजक असत; शिवाय डोळे उघडविणारीदेखील!
जन्म १४ एप्रिल १९६४ रोजी,
म्हणजे याच वर्षी वयाची ‘साठी’ पूर्ण झाली.
जन्म झाला तो तोंडात चांदीचा चमचा घेऊनच.
देखणे रूप, ताडमाड उंची, गोरापान रंग,
अमोघ वक्तृत्व, मिश्कील शैली,
स्पष्ट पण न टोचणारे भाष्य…
कुणीही प्रथम दर्शनी प्रेमात पडावे असे व्यक्तिमत्त्व.
रुग्णालयात तो असा वावरायचा, की बघतच राहावे.
बालगंधर्व काय, की सवाई गंधर्व काय!
त्याला मी गमतीने ‘दवाई-गंधर्व’ म्हणत असे.
देवाला देव्हाऱ्यात बघावे, तसे शंतनुला मैफिलीत अनुभवावे!
त्या वेळी काव्यशास्त्रविनोदाला बहर यायचा.
कथा, कविता आदी लेखन, नाट्य-सादरीकरण करताना शास्त्रीय बैठक चुकली नाही.
११ ऑगस्ट रविवारी सकाळी त्याचा पहाटे एसएमएस आला,
मी विमानतळावरून थेट दीनानाथमध्ये धावत गेलो.
तासभर बोलत होतो.
ऑक्सिजन असून त्याला बोलताना धाप लागत होती.
तो घामाने प्रचंड भिजला होता,
त्याचे कपडे बदलताना मी अश्रूंनी भिजलो होतो,
शेवटी निघताना मी इतकेच म्हणालो,
‘Fight…!’
शंतनु, मित्रा,
मृत्यूबरोबरची संपली तुझी लढाई.
तू जिंकलास! मृत्यू नाही.
हृषिकेश मुखर्जी ‘आनंद’ चित्रपटात सांगून गेलेत,
की, ‘बाबूमोशाय, ‘जिंदगी बड़ी होनी चाहिये, लंबी नाही,’
तरीही मला ओरडून सांगावेसे वाटते,
‘जिंदगी बड़ी और लंबी दोनों होनी चाहिये!’
ह्याच चित्रपटातील ओळींचा आधार घेऊन असे म्हणावेसे वाटते,
“आनंद मरा नाही, आनंद मरते नहीं”
शंतनु, तू गेलास, एक वादळ शांत झाले.
मृत्यूचा एक आनंदोत्सव साजरा करून गेलास!
आमचे आयुष्य तू समृद्ध करून गेलास.
शंतनु आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही .
वाटते, तो अजूनही त्याच मिश्कील आणि खट्याळ चेहऱ्याने त्याच्या ओपीडीमध्ये बसला असणार, दोन पेशंट्समध्ये फोन करणार आणि विचारणार, ‘शुक्रवार आहे आज, कधी येताय राव? वाट बघतोय तुझी…’
गेली तीन-चार वर्षे मी त्याच्या ह्याच प्रश्नाला तेच तेच उत्तर देत होतो… ‘पुढील शुक्रवारी नक्की…’
आता कधी वाईला जाऊ आणि कुणाशी गप्पा मारू, हा मोठा गहन प्रश्न…
दिवस जातील – त्यांच्या गतीने ते जाणारच. रोज समोर आलेला पेशंट, समोर आलेला प्रश्न आणि समोर आलेले काम संपविण्यात संपूर्ण दिवस जातो, एकामागून एक सहा दिवस गेले की शुक्रवार उजाडतो. सातारचे ओपीडी आणि हॉस्पिटल काम लवकर आटोपून ‘जुम्मे का दिन’ असे म्हणत मी वाईची दिशा पकडायचो.
साडेतीनपर्यंत मी मॉडर्न हॉस्पिटलमध्ये पोहोचायचो.
बाहेर गर्दी असायची, काउंटरवर सारिका सिस्टर. मी दिसताच ती नजरेने माझ्यासाठी कोण कोण पेशंट थांबले आहेत ते सांगायची.
पण मी बेधडक डाव्या हाताच्या ओपीडीमध्ये घुसायचो.
तो तिथे नसायचा, आतमध्ये काहीतरी काम चालू असायचे. टेबलावर नुकतेच लिहून पूर्ण केलेले लेख आणि त्या संदर्भात असणारी काही पुस्तके पडलेली असायची. केवळ माझ्यासाठी ती काढून ठेवली असणार, असे गृहीत धरून मी वाचत बसायचो.
तितक्यात तो यायचा. लेख कसा वाटला, हा प्रश्न यायच्या आतच माझी मते मी त्याच्या समोर मालगाडी च्या डब्यासारखी एका पाठोपाठ एक सांगायला लागायचो,
तितक्यात माझी रेल्वे गाडी थांबवण्यासाठी सारिका सिस्टर कॉफीचा कप आणून ठेवायची.
मग सुरू व्हायचा तो गप्पांचा अड्डा. कधी हास्यकल्लोळ तर कधी मिश्कील पण गंभीर मुद्द्यावर चर्चा.
राधिकासांत्वनम् हे तर माझ्या साक्षीने लिहिले गेले, वाचले गेले आणि सादरही केले गेले.
दर आठवड्याचा शुक्रवार हा माझ्यासाठी संपूच नये असे वाटणारा असा होता.
जगायचे कसे हे ज्याच्याकडून शिकायचे तोच आता आपल्यामध्ये नाही,
मॉडर्न विचार देणाऱ्या त्या क्लिनिकमध्ये हा अल्ट्रा मॉडर्न माणूस शंतनू बसलेला आता कुठे दिसणार?
