| सामाजिक भान जपणारे नाशिकचे ज्येष्ठ उद्योगपती देवकिसन सारडा यांचे नुकतेच २० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोनच्या सुमारास वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने आपल्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. महाराष्ट्रात एके काळी सर्वत्र विकल्या जाणाऱ्या ‘उंट’छाप बिडीचे ते निर्माते. अवघ्या तीन कामगारांना घेऊन १९२२ साली सिन्नर येथे सुरू झालेल्या या कारखान्यामुळे काही वर्षांतच १६,००० स्थानिक कामगारांना रोजगार मिळू लागला. त्यांपैकी बहुसंख्य कामगार महिला होत्या हे विशेष. नाशिक भागातून भरल्या जाणाऱ्या एकूण आयकरापैकी २५ टक्के आयकर हा त्यावेळी फक्त ‘उंट’ बिडीपासून मिळत असे. अर्थव्यवस्थेत आणि रोजगारनिर्मितीत या उद्योगाचे योगदान किती महत्त्वाचे होते हे यावरून स्पष्ट व्हावे. १९६८ साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्या वेळी त्यांचे वय अवघे ३८ होते. चेंबरचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष. त्यापूर्वी चेंबरचे काम मुख्यतः मुंबई आणि पुणे येथील उद्योजकांपर्यंत सीमित होते. ते कार्य महाराष्ट्रभर सारडा यांनी पोचवले. उद्योगाव्यतिरिक्त सामाजिक कामातही त्यांना खूप रुची होती. १९७९-८०-८१ साली शेतकरी संघटनेचे ऊस आंदोलन नाशिकमध्ये झाले होते. त्या वेळी सारडा यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले होते. देशदूत आणि सार्वमत या त्यांच्या मालकीच्या दोन्ही वृत्तपत्रांनी रोजच्या रोज आंदोलनाच्या बातम्या छापल्या होत्या. शेतकरी संघटनेचे कार्यालय त्यांच्याच वृत्तपत्राच्या कचेरीत होते. शरद जोशी यांचे ते आंदोलन राज्यभर पोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. एक उद्योगपती म्हणून ते मोठे होतेच; पण नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनातही त्यांचा आघाडीचा सहभाग होता. कुसुमाग्रज यांचे ते निकटचे स्नेही. आपल्या मृत्युपत्रानुसार कार्यवाही करायची जबाबदारी कुसुमाग्रजांनी सारडा यांच्यावरच सोपवली होती. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना कुसुमाग्रजांनी केलेल्या भाषणाचा हिंदी अनुवाद त्यांनीच मूळ मराठीवरून केला होता. त्यांच्याशी गप्पा मारणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव होता. त्यांच्या पश्चात रामेश्वर आणि विक्रम ही त्यांची दोन्ही मुले त्यांचा व्यावसायिक कारोबार उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीचा आढावा घेणारा आणि अष्टपैलू तसेच समृद्ध व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा एक विस्तृत लेख अंतर्नाद मासिकात संपादकीय म्हणून जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तो पुढे पुनर्मुद्रित करत आहोत. महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच सांस्कृतिक जीवनाला देवकिसन सारडा यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची त्यावरून आजच्या वाचकांना कल्पना येईल. त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीला इ-अंतर्नादचे विनम्र प्रणाम. |
डावीकडून : रामेश्वर सारडा, अनिल जोशी, देवकिसन सारडा व भानू काळे
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातल्या बहुतेक शहरांमध्ये मध्यांतरी स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.च्या) विरोधात बहुसंख्य दुकाने दीर्घकाळ बंद होती. एरवी अगदी वर्षाचे ३६५ दिवस सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत उघडी असणारी दुकानेही बंद राहिल्यामुळे नाही म्हटले तरी नागरिकांची बरीच गैरसोय होत होती. लोकांमध्ये या दुकानदारांविरुद्ध बराच असंतोष होता. ‘हे सगळे मारवाडी! केवळ पैसा कमावण्यासाठी बाहेरून इथे आलेले! इथल्या समाजाच्या सुखदुःखाशी त्यांना काय देणंघेणं असणार?’ अशा प्रकारच्या उद्गारांमधून तो असंतोष अधूनमधून कानावर पडत होता.
या दुकानदारांमध्ये बरेचसे मारवाडी आहेत हे खरे असले तरी या समाजाविषयी मराठी माणसांमध्ये व्यापक प्रमाणावर रूढ असलेली ही मते बदलायची आवश्यकता आहे. नाशिकचे एक उद्योगपती देवकिसन सारडा उर्फ भाऊ यांच्या आठवणी सांगणारे ‘पाकळ्या आणि पागोळ्या’ (पद्मगंधा प्रकाशन) हे मयुरी कुलकर्णी यांचे पुस्तक वाचताना मतबदलाची ही आवश्यकता पुनःपुन्हा मनावर ठसत जाते.
नाशिकच्या ‘उंट’छाप बिडीचे हे निर्माते. अवघ्या तीन कामगारांना घेऊन भाऊंच्या वडिलांनी १९२२ साली सिन्नर येथे सुरू केलेल्या या कारखान्यामुळे काही वर्षांतच १६,००० स्थानिक कामगारांना रोजगार मिळू लागला. यांपैकी बहुसंख्य कामगार महिला होत्या हेही विशेष. नाशिक भागातून भरल्या जाणाऱ्या एकूण आयकरापैकी २५ टक्के आयकर हा एके काळी फक्त ‘उंट’ बिडीपासून मिळत असे. अर्थव्यवस्थेत आणि रोजगारनिर्मितीत या उद्योगाचे योगदान किती महत्त्वाचे होते हे यावरून स्पष्ट व्हावे. राजस्थानमधील जोधपूरजवळच्या केरू या छोट्याशा खेड्यामधून ही सारडा मंडळी दोनेकशे वर्षांपूर्वी पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आली, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळच्या कुदेवाडी गावात स्थिरावली. इथे आल्या दिवसापासून त्यांनी हीच भूमी सर्वस्वी आपली मानली. इथल्याच डुबेरे गावच्या देवीला आपली कुलदेवता मानले. इथली भाषा, इथली राहणी, इथली संस्कृती स्वीकारली. पिढ्यान् पिढ्या इथेच उद्योगधंदा केला. राजस्थानातील केरू या आपल्या मूळ गावाशी कसलाही संबंध न ठेवता इथल्याच लोकसंस्कृतीशी ते कसे समरस झाले आणि त्या संस्कृतीला वर्षानुवर्षे कसे समृद्ध करत गेले याची साक्ष हे पुस्तक वाचताना जागोजागी पटत जाते.
सारडा अनेक वर्षे ‘अखिल भारतीय विडी उद्योग महासंघाचे अध्यक्ष होते.
(ह्या उद्योगाचे ग्रामीण रोजगारनिर्मितीसाठी असलेले महत्त्व सरकारदरबारी ठसवण्यासाठी त्यांनी अक्षरशः जिवाचे रान केले आहे. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची १९६८ साली अविरोध निवड झाली त्या वेळी त्यांचे वय केवळ ३५ होते. चेंबरचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष. पूर्वी फक्त मुंबई-पुण्याचे उद्योजक व व्यापारी या चेंबरचे सदस्य असत. चेंबरचे काम उर्वरित महाराष्ट्रात पोचवण्यामागे सारडांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत; पण आपल्या व्यवसायापलीकडे जाऊनही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. १९५९ साली श्री सिन्नर व्यापारी सहकारी बँकेची त्यांनी स्थापना केली. सामाजिक कार्यातील त्यांचे ते पदार्पण. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धार्मिक संघटनादेखील समाजोपयोगी प्रकल्प कसे राबवू शकतात याचा एक आदर्श या संस्थेने घालून दिला आहे. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचेही ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. त्यांची सामाजिक कार्याची आवड बघून विजय मर्चेंट यांनी त्यांना या कार्याकडे वळवले.
त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणखी एक उदाहरण आठवते : मुस्लीम समाजात सुधारणा घडून याव्यात यासाठी काम करणारे पुरोगामी कार्यकर्ते हमीद दलवाई त्या वेळी आचार्य अत्रे यांच्या दैनिक ‘मराठा’मध्ये नोकरी करत असत. त्यांना तेव्हा सव्वाचारशे रुपये पगार होता. नोकरी सांभाळूनच त्यांचे सगळे व्याख्यानदौरे चालत व त्यात त्यांची फार ओढाताण होत असे. सारडा यांना त्यांच्या कामाची पूर्ण कल्पना होती व ते किती महत्त्वाचे आहे याची जाणीवही होती. दलवाईंना पूर्ण वेळ आपल्या सामाजिक कामासाठीच देता यावा, यासाठी सारडा यांनी आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने त्यांना महिना पाचशे रुपये पगार द्यायला सुरुवात केली. ह्या पैशाचा हिशेब द्यायचे किंवा तत्सम कुठलेही बंधन त्यांनी दलवाईंवर घातले नाही. पैशाचा विनियोग करायचे पूर्ण स्वातंत्र्य दलवाईंना होते. त्याशिवाय त्यांनी त्या वेळी केंद्रीय गृहमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहून रेल्वेतर्फे दलवाईंना भारतभर कुठेही प्रथम वर्गाने प्रवास करता येईल असा पास मिळवून दिला. विशेष म्हणजे हे सारे आपल्या प्रयत्नांतून झाले, याची त्यांनी दलवाईंना जराही पूर्वकल्पना येऊ दिली नाही! यशवंतरावांनी २० ऑगस्ट १९६९ रोजी पाठवलेल्या पत्रातूनच ही गोष्ट पुढे उघड झाली.
सारडा यांनी १९५९ साली बी. एन. सारडा विद्यालय ह्या सिन्नर तालुक्यातील पहिल्या हायस्कूलची इमारत पूर्णतः स्वतःच्या पैशातून बांधून दिली; त्याची पार्श्वभूमी अशी : १९५३-५४ साली सिन्नर नगरपालिकेने नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेला नवीन शाळेची मंजुरी दिली कारण त्यांची जुनी शाळा वाढत्या लोकसंख्येला अगदी अपुरी पडत होती. आपल्या जन्मगावातील लोकांची ही गैरसोय सारडांना जाणवत होती. याबाबत इतर कोणी पुढाकार घ्यायची वाट पाहत न बसता सारडांनी स्वतःच्या पैशांतून शाळेसाठी नवी भव्य इमारत बांधून दिली. शाळेचे नाव पुढे ‘शेठ ब. ना. सारडा विद्यालय’ असे ठेवले गेले.
सिन्नर, संगमनेर व नाशिक येथील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या उभारणीत व व्यवस्थापनात त्यांचा सहभाग होता. ते अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र माहेश्वरी सभेने त्र्यंबकेश्वर, फलटण, आळंदी, पंढरपूर अशा अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोठ्या धर्मशाळा बांधल्या व आजही ते त्यांची उत्तम देखभाल करत आहेत.
‘देशदूत’ आणि ‘सार्वमत’ या दोन दैनिकांचे ते संस्थापक आहेत. ‘देशदूत’च्या नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतून आवृत्त्या निघतात; तर ‘सार्वमत’ हे श्रीरामपूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून निघते. ही वृत्तपत्रे चालवताना त्यांनी आपल्या औद्योगिक हितसंबंधांना बाधा पोचायची शक्यता असतानाही अनेकदा निर्भीडपणे सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. आणीबाणीच्या काळात सत्ताधारी पक्षावर टीका केल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सरकारी जाहिरात बंद करण्यात आल्या होत्या.
याचे ‘पाकळ्या आणि पागोळ्या’ पुस्तकात नमूद केलेले एक उदाहरण इथे देण्यासारखे आहे. श्रीरामपूरहून निघणाऱ्या त्यांच्या ‘सार्वमत’ दैनिकात १९८० साली प्रवरा हॉस्पिटलबद्दल काहीतरी बातमी आली. त्या परिसरातील एक मातब्बर नेते प्रवराचे संचालक होते. त्यांनी रागावून सारडांवर नगर कोर्टात बदनामीची केस दाखल केली; शिवाय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील वेगवेगळ्या गावांमध्ये केसेस दाखल करायचा सपाटा लावला. सारडांवर एकदा अजामीनपात्र वॉरंटही काढले गेले; पण त्या साऱ्याला सारडा पुरून उरले; आपल्या बातमीदारांच्या व संपादकांच्या मागे भक्कम उभे राहिले. त्यांच्या धाडसाची ही एक कसोटीच होती. आपल्या मतांची किंमत चुकवायची तयारी असलेला असा वृत्तपत्रमालक विरळाच.
कुसुमाग्रज म्हणजे नाशिकचे ग्रामदैवतच. त्यांचा सारडांवर खूप विश्वास. आपल्या मृत्युपत्रानुसार कार्यवाही करायची जबाबदारी त्यांनी सारडांवरच सोपवली होती. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते संस्थापक-विश्वस्त होते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेल्या त्यांच्या भाषणाचा हिंदी अनुवाद सारडांचाच होता.
आधी सिन्नरमध्ये व नंतर नाशिकमध्ये आठवडाभर चालणाऱ्या वार्षिक व्याख्यानमाला हीतर सांस्कृतिक जीवनात सारडांनी घातलेली खूप मोलाची भर आहे. सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर, पांडुरंगशास्त्री आठवले, सेतुमाधवराव पगडी, जयंत नारळीकर, राम शेवाळकर यांसारख्या अनेक दिग्गजांची व्याख्याने त्यामुळे नाशिककरांना गेल्या सुमारे पन्नासेक वर्षांत ऐकता आली. शिवाजीराव भोसले यांनी तर सलग २९ वर्षे या उपक्रमात व्याख्याने दिली. एका वर्षी त्यांनी विवेकानंद हा विषय ओळीने पाच दिवस तुडुंब भरलेल्या परशुराम साईखेडकर सभागृहात मांडला होता आणि तेव्हा मिळालेला प्रतिसाद ही आपल्या व्याख्यानांना मिळालेली आजवरची सर्वोत्तम दाद होती, असे शिवाजीरावांनी दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात सांगितले होते.
स्थानिक संस्कृती समृद्ध करणाऱ्या अशा मंडळींना आपण ‘उपरे’, ‘बाहेरचे’ मानणे गैरच म्हणायला हवे. जागतिकीकरणाच्या आणि व्यापक स्थलांतराच्या या युगात मराठी कोणाला म्हणायचे याच्या कक्षाही रुंदावण्याची गरज आहे.
देवकिसन सारडा हे एक असे समृद्ध, बहुश्रुत आणि तरीही विनम्र व्यक्तिमत्त्व आहे की, यांना तुम्ही एकदा भेटलात की पुन्हा भेटायची ओढ लागतेच. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी काही वर्षे आमच्यांत केवळ पत्रव्यवहार होता. अंतर्नाद वाचून ते एखाद्या लेखाविषयी विस्ताराने लिहायचे. बऱ्याच वर्षांनी आमची नाशिकमुक्कामी प्रत्यक्ष भेट झाली आणि मग आमची चांगली मैत्रीच झाली, त्यांना स्वतःला माणसांची किती ओढ आहे हे जाणवले.
एखाद्या माणसात त्यांना काही वेगळेपण जाणवले की, भरपूर खटपट करून ते त्या व्यक्तीशी आपणहून संपर्क साधतात, तिला आवर्जून भेटतात. सुधा गोखले नावाच्या एका लेखिकेने ‘लोकसत्ता’त लिहिलेला एक पूर्णपानी लेख सारडांच्या वाचनात आला. त्यांना तो खूप वेगळा वाटला. त्यात लेखिकेने काश्मीरला कशा कशा भेटी दिल्या, ज्यांना अतिरेकी समजले जाते अशा तिथल्या युवकांशी कसा संपर्क साधला, त्यांच्या घरी तिचे किती आगतस्वागत झाले, त्यांनी तिला किती विलक्षण प्रेमाने वागवले ह्या साऱ्याचे – काश्मिरी युवकांचे एक वेगळेच दर्शन घडवले होते. त्यात लेखिकेने अनेक गोष्टी धीटपणे लिहिल्या होत्या. ते वाचून सारडा भारावून गेले; पण ही माहिती खरी आहे की खोटी याची शहानिशा करावी असे त्यांना वाटले. लेखिकेचा फोन नंबर त्यांनी ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्याकडून घेतला, तिच्याशी संपर्क साधला आणि खास तिला भेटण्यासाठी ते मुद्दाम नाशिकहून पुण्याला आले. लेखिकेने काश्मीरवर ‘मोहतरम्मा’ नावाचे एक पुस्तकही लिहिले होते. मेहता प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले. तेही सारडांना खूप आवडले. त्यानंतर सारडा अनेकदा पुण्याला येऊन सुधाताई गोखलेंना भेटले. त्या औंधमध्येच सकाळनगर इथे राहत असल्याने मलाही ते एकदा त्यांच्याकडे घेऊन गेले होते. त्या पुस्तकाच्या अनेक प्रती विकत घेऊन त्यांनी त्यांच्या मित्रांना वाटल्या. हेदेखील सारडांचे एक वैशिष्ट्य – आवडलेली पुस्तके इतरांना भेट देणे.
जालंधरच्या ‘सेवाश्रम’मधील ज्येष्ठ गांधीवादी आचार्य श्रीकांत आपटे महाराष्ट्रात फारच कमी परिचित आहेत; पण पंजाबात त्यांना लोक खूप मानतात. त्यांच्याविषयी सारडांना माहिती मिळाली, त्यांची एक-दोन पुस्तके वाचनात आली; लगेच सारडा प्रत्यक्ष जालंधरला जाऊन त्यांना भेटले आणि मग दोघांची चांगलीच मैत्री झाली.
अशा प्रकारे त्यांनी मोठा मित्रपरिवार गोळा केला आहे आणि तो जपण्यासाठी ते भरपूर वेळ देतात, प्रवास करतात. पुस्तकांप्रमाणेच माणसे वाचण्याचीही त्यांना आवड आहे. मैत्री कशी जोडावी आणि कशी जोपासावी हे सारडांकडून शिकावे.
व्यवसायाने व्यापारी असले तरी लहानपणापासून सारडांवर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले आहेत; त्यांचा पिंडच ज्ञानेश्वरीवर पोसला गेला आहे. त्यांच्या बोलण्यात संतसाहित्यातील ओळी सतत येत असतात. एक विशेष म्हणजे त्याच वेळी या संतसंस्कारांव्यतिरिक्त त्यांच्यात तंत्रज्ञानप्रवणतादेखील आहे. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी मोबाइल, इंटरनेट, स्कॅनर हे सारे वापरायला सुरुवात केली आणि त्यात ते एखाद्या टीन-एजरइतके आज पारंगत आहेत. तसे पाहिले तर सारडा केवळ शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत; पण फलज्योतिषापासून हिऱ्यांची पारख करण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांचा व्यासंग आहे आणि आज शहाऐंशीव्या वर्षीही नवीन काय काय शिकायची त्यांची उमेद कायम आहे.
गेली दहा-बारा वर्षे सारडा आपल्या व्यवसायातून पूर्ण निवृत्त झाले आहेत. रामेश्वर आणि विक्रम हे दोन मुलगे सर्व कारभार उत्तम सांभाळतात. त्यामुळे इतर गोष्टींकरिता सारडांना वेळही मिळतो.
व्यापार आणि समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या आपल्या या स्नेह्याबद्दल कुसुमाग्रज यांनी लिहिले आहे :
“देवकिसन सारडा हे एक चतुरस्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते जेव्हा एखाद्या ठिकाणी असतात तेव्हा नुसते असत नाहीत, तर स्वतः सर्वांना जाणवण्याइतके असतात. वृत्तीत भाविकता आहे, पण तिला लढाऊपणाची जोड आहे. त्यांच्या या गुणविशेषांचा मोठाच लाभ नाशिकच्या सार्वजनिक जीवनाला झालेला आहे. अनेक संस्थांना आणि कार्यांना त्यांचा खंबीर आधार वाटतो.”
अनेक वर्षांच्या निकटच्या सहवासानंतर कुसुमाग्रजांनी केलेल्या सारडांच्या मूल्यमापनात सारे काही येऊन जाते.
