वाचकांना साद
मंडळी नमस्कार,
आभासी अंतर्नाद सुरू होऊन पंधरा महिने झाले. भानू काळे आणि छापील अंतर्नाद हे दोन दीपस्तंभ समोर होते. त्यांच्या प्रकाशातच ही वाटचाल झाली, चालू आहे व होईल. हा प्रयोग सुरू करताना मनात नाही म्हटले तरी धाकधूक होती. एकंदरीत प्रतिसाद पाहता हा प्रयोग स्थिरावला आहे असे वाटण्याइतपत परिस्थिती आहे. अर्थातच हे श्रेय अनेक लोकांचे आहे. त्यांचा सर्वांचा व्यक्तिगत नामोल्लेख करणे त्यांनाही आवडणारे नाही.
तरुणांना आभासी अंतर्नाद वाचायला लावणे व ज्येष्ठांना हा अंक वाचण्यासाठी तंत्रस्नेही होण्याची इच्छा निर्माण करणे अशी दोन महत्त्वाची आव्हाने आहेत. या दोन्ही बाबींत थोडे का होई ना – यश आले आहे असे वाटते. आता भविष्यकालीन वाटचाल कशी असावी त्याचा विचार करायची वेळ आली आहे असे वाटते. त्या विषयी काही मुद्दे खालील प्रमाणे :
१ अगदी पहिल्या अंकापासून बऱ्याच वाचकांनी काही ना काही वर्गणी ठेवा असा आग्रह केला होता व हा आग्रह असणारे आजही अनेक लोक आहेत. संकल्पना नवीन आहे ती रुजवण्यासाठी आता सध्यातरी वर्गणी नको अशा विचाराने आपण काहीच वर्गणी ठेवलेली नाही.
२ आता एक सुरुवात म्हणून ऐच्छिक वार्षिक बाराशे रुपये अशी वर्गणी ठेवण्याचा मानस आहे. ज्या महिन्यात वर्गणी भरली जाईल तेव्हापासून बारा महिने या वर्गणीची मुदत राहील. वर्गणी भरली नाही तरी हा अंक पूर्वीसारखा आपल्याला येत राहील.
३ वर्गणीचा विनियोग काही नवीन तंत्रज्ञान अंक-निर्मितीसाठी वापरता येईल का ते आजमावण्यासाठी व सर्व मान्यवर लेखकांना काही ना काही मानधन देण्यासाठी केला जाईल.
४ वर्गणी भरण्यासाठी सोबतचा क्यूआर कोड आपण स्कॅन करू शकता किंवा
94 22 64 72 83 या क्रमांकावर फोन पे /जी पे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे पाठवू शकता. आपण वर्गणी पाठवल्यानंतर आपले नाव व दूरध्वनी क्रमांक व ई-मेल याच क्रमांकावर कळवावे म्हणजे रक्कम कोणाकडून आली ते समजू शकेल.
५ तुम्हांला येणारा अंक तुम्ही आणखी पाच ते दहा तुम्हांला योग्य वाटणाऱ्या वाचकांना पुढे पाठवावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. अंक खूप लोकांपर्यंत पोहोचणे आणि या नव्या प्रयोगातून लोकांना वाचनसंस्कृतीशी जोडणे हा तुमचा आणि आमचा एकच उद्देश आहे.
– संपादक
