प्रश्नोपनिषद :डिसेंबर २०२४
मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.
विविधतेत एकता या तत्त्वाने जगणाऱ्या आपल्या खंडप्राय देशाला एकत्र बांधणारे एक सूत्र किंवा अनेक सूत्रे कोणती याचा शोध विविध पातळ्यांवर वेळोवेळी घेतला जातो. हे सूत्र एखादी संपर्क-भाषा असू शकते काय याचाही विचार झाला आहे; अजूनही चालू आहे. क्रिकेट वेड, सिनेमा-वेड यांत काहीजण हे सूत्र हुडकतात. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली – आजचे चित्र काय आहे?
भ्रष्टाचार आणि अनैतिकता हे आज आपल्या देशाला बांधणारे सूत्र झाले आहे का?
यावर भानू काळे म्हणतात, की भ्रष्टाचार आणि अनैतिकता ही लक्षणे आहेत; रोगाचे मूळ कारण नव्हेत.
डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचे म्हणणे आहे की भ्रष्टाचार आणि अनैतिकता या विषाणूंमुळे बाकीचे रोग होतात पण त्या रोगांच्या मुळाशी नेमक्या याच दोन मानवी प्रेरणा असतात; म्हणजे कदाचित बाहेरून येऊन मानवी मनावर आघात करणाऱ्या प्रेरणा; तर वर्षाताई काळे म्हणतात, ‘गौतम बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे Desire is the root cause of all the problems. त्यामुळे भ्रष्टाचार व अनैतिकता बोकाळते.’ Desire या शब्दाचा अर्थ इथे ‘इच्छा’एवढाच न घेता ‘मोह’ असा पण घेता येईल. देशप्रेम ही भावना मनापासून रुजवायचा आपल्या कृतीतून दाखवायचा प्रयत्न केला तर कदाचित ते देशाला बांधणारे समान सूत्र ठरू शकेल.
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
संपादक
