रोजच्यासारखीच त्या दिवशी हिस्टोपॅथोलॉजीची (ऊतिविकृतिशास्त्र) ७-८ स्पेसिमेन्स आली. सोबत आलेले रजिस्ट्रेशन फॉर्म्स फक्त चाळले. आलेल्या नमुन्यात वेगळं असं काही, मी ग्रॉसिंगसाठी जातीने उपस्थित राहायला हवं असं स्पेसिमेन असावं असं त्या फॉर्म्सवरून तरी वाटलं नाही. माझ्या साहाय्य्क लेक्चररला ग्रॉसिंग (बाह्यतपासणी) करून आवश्यक ते तुकडे तपासणीसाठी द्यायला सांगून मी तिथून गेले. दुसरे दिवशी तपासणीसाठी सेक्शन्स (काचपट्ट्या) आले. त्यात एक नमुना २० वर्षे वयाच्या मुलीला झालेल्या स्तनातील गाठीचा होता. त्याचं सर्जनच्या तपासणीनुसारचं निदान साधी गाठ (फाइब्रोअडीनोमा) असं होतं. ती काचपट्टी मायक्रोस्कोपला लावली… ठप्ण!! मेंदू हलला. कॅंसर होता. काहीतरी चुकतंय का?… पेशंटचं वय परत वाचलं, काचपट्टी परत पहिली. होय!! नुसता कॅंसर नव्हे; तर त्याचा पराकोटीचा वाईट समजला जाणारा प्रकार दिसत होता. फॉर्मवरचं ग्रॉस डिस्क्रिप्शन (बाह्यतापसणीचे वर्णन) परत वाचलं, ३x२सेंमी, well circumscribed, firm mass with grey white cut surface ( गोल, आवरण असलेला, घट्टसा करड्या रंगाचा गोळा)… उठले, स्पेसिमेन काढलं, पाहिलं. नमूद केलेल्या वर्णनाला मिळतं जुळतं होतं. स्पेसिमेनच्या दुसऱ्या अर्ध्या भागातून गोळ्यावरील आवरणासहित आणखी एक तुकडा तपासणीसाठी दिला. दुसरे दिवशी सेक्शन्स येईपर्यंत ऑपरेटिंग सर्जनला फोन करून रुग्णाचे क्लिनिकल डिटेल्स (त्यांच्या तपासणीची इत्थंभूत माहिती) विचारले… ते म्हणाले, “firm, mobile, well circumscribed mass (घट्टसर, आतमध्ये कोठेही न चिकटलेला, बाहेरून हातात पकडून नीट हलवता येईल असा गोळा) होता म्हणून enucleate केला. (आवरणासाहित काढला) साहजिकच लसिका ग्रंथी (lymphnodes, काखेतील गाठी) तपासण्याची गरज वाटली नव्हती त्यांना… म्हटलं, “सर, malignancy (कॅंसर) आहे. आणखी एक तुकडा तपासणीला दिला आहे. उद्या सांगते रिपोर्ट.” ते बरं म्हणाले. त्यांनी माझं बोलणं कितपत गांभीर्याने घेतलं माहीत नाही. अनेकदा लिखित स्वरूपात अंतिम तपासणी अहवाल पेपरवर येईपर्यंत सर्जन लोक स्वतःला बिथरू देत नाहीत असा माझा अनुभव.
दुसरे दिवशी जास्तीचे दिलेले सेक्शन्स आले. चित्रात फरक नाही!! Capsular infiltration (कॅंसर आवरणात गेल्यासारखा) वाटत होतं. ऑपरेशन करतेवेळी सर्जनला कॅंसरची शंका नसल्यामुळे शस्त्रक्रियेचा परीघ सुस्पष्ट नव्हता, margins demarcated नव्हत्याच… तरी अगदी कडांमधूनचे तुकडे पुन्हा तपासणीसाठी दिले; तरीही स्वस्थ वाटेना म्हणा किंवा स्वतःवर विश्वास वाटेना म्हणा, सेकंड ओपिनियनसाठी ( आणखी एका विकृतिशास्त्रज्ञाचे एक मत) सेक्शन्स माझ्या एका कॅंसरतज्ज्ञ मैत्रिणीकडे पाठवले. होय! तो High grade Invasive duct Carcinomaच (वाईट भविष्यकाळ असलेला कॅंसर) होता. सर्जनला फोन करून फायनल रिपोर्ट सांगितला.
नेहमी ऐकवते त्याप्रमाणे घरी येऊन नवऱ्याला ही कहाणी ऐकवली. तो माझे सारे मानसिक बारकावे टिपू शकतो. त्याला माझी अस्वस्थता समजली. पुढले दोन दिवस माझा प्रॅक्टिकलचा क्लास होता. विद्यार्थ्यांचा Briefing class मलाच घ्यायचा होता. स्पेसिमेन आमच्याकडे आल्यापासूनचा हा तिसरा दिवस होता. Shave margins चे sections आज येणार होते. सर्जनला तोंडी रिपोर्ट सांगितला होता. शांत डोक्याने डिस्क्रिप्शन (निदान-वर्णन) लिहायचे होते, म्हणून प्रॅक्टिकल क्लासचा पहिला दिवस (प्रॅक्टिकल २ दिवस असतं) झाला की रिपोर्ट लिहू असं वाटून बाजूला ठेवला होता.
Briefing संपवून मुलांना प्रॅक्टिकल हॉलमध्ये घेऊन आले होते. इतक्यात शिपाई आला. “मॅडम, रिपोर्ट न्यायला पेशंटचे नातेवाईक आलेत, टेक्निशियनने (त्या विभागातील तंत्रज्ञ) तुम्हांला भेटायला सांगितलेय.” विचारलं, “कोणता रिपोर्ट?” त्याने नंबर सांगितला. एव्हाना तो नंबर मला चांगला स्मरणात राहिला होता. पट्कन बाहेर आले हॉलमधून. समोर एक पन्नाशीची, स्थूल, हसतमुख बाई. स्टार्च केलेली साडी परिधान केलेली, नीटनेटकी — tip-top म्हणतात अशी. आम्ही समोरासमोर उभ्या होतो. ती फक्त रिपोर्ट न्यायला आली होती. रिपोर्ट काय आहे हे जाणण्याची उत्सुकता तिच्यात दिसत नव्हती. माझा चेहरा पडला असावा. विचारलं, “आपण पेशंटच्या कोण?” म्हणाली, ”आई!” परत माझ्या डोक्यात ठप्ण!! म्हटलं, “काय करता आपण?” कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती ती. मी पेशंटची हिस्टरी विचारली. ४-५ महिन्यांपूर्वी एक लहानशी गाठ लागली, दुखत-खुपत काही नव्हती. सुशिक्षित असूनही बिब्बा वगैरे गाठ जिरविण्याचे प्रयोग झाले होते. गाठ थोडी जिरल्यासारखी वाटली होती. एक पूर्वनियोजित फॅमिली ट्रिप तोंडावर आली होती. ते कुटुंबीय ७-८ दिवसांची ट्रिप करून आले आणि आता गाठीवरती डॉक्टरी इलाज करण्यासाठी आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी सांगितले, “साधीच आहे, काढून टाकू;” म्हणून काढायचे ठरले. आईने ऑपरेशनसाठी रजा घेतली होती. विचारलं, “मुलगी काय करते?” एकुलती एक मुलगी. तिने इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. मुलगी हुशार होती, पास होणार याची खातरी होती आणि आता तिचे लग्न करून द्यायचे होते. बाई खूपच उत्साहाने सारं सांगत होती. सर्व प्रश्नांची नीट उत्तरं देत होती, विचारल्यापलीकडे माहिती देत होती. माझी मात्र घालमेल!! मीदेखील सेक्शन्स पाहिल्यापासून अस्वस्थ! नकळत केसमध्ये गुंतत गेले होते आणि आज या आईशी हे संभाषण डॉक्टर – पेशंट या नात्यापलीकडे जात होतं. म्हटलं, “मॅडम, उद्या छापील रिपोर्ट घेऊन जा, थोडे सेक्शन्स उद्या येतील. आत्ता मला प्रॅक्टिकल क्लास आहे.” ती थोडी शांत झाली. “इतका उशीर का होतो आहे रिपोर्ट मिळायला?” मग मला राहवेना, खरंतर पेशंटला निदान सांगणे हे रिपोर्टींग पॅथॉलॉजिस्टचं काम नव्हे; पण मी त्या मोकळ्या मनाच्या बाईत — एका आईत गुंतले. म्हटलं, “मॅडम, ती गाठ कॅंसरची आहे.” इतका वेळ बडबड करणारी ती बाई एकदम स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावरचे आत्तापर्यन्तचे आपलेपणाचे, विश्वासाचे रंग पालटले. ती माझ्याकडे शंकेखोरपणे पाहू लागली. साहजिक होते ते. मीदेखील प्रथम ते सेक्शन्स पहिले तेव्हा स्वतःबद्दलच साशंक नव्हते का? मी तिला सांगितलं, “जास्तीचे तुकडे देऊन, कॅंसर हॉस्पिटलमधून सेकंड ओपिनियन घेऊन निदान कन्फर्म केलंय.” तिच्या डोळ्यात खळ्कन अश्रू आले. माझाही आवाज भरून आला. तिचे खांदे पकडून मी तिला सावरले. तिला तेव्हा खरंतर तिच्या कुटुंबियांच्या आधाराची गरज होती. मी बोलत राहिले, “आता ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्वीइतकी अवघड राहिली नाहीये.” इथं मन कचरलं — तिचा कॅंसर high grade आहे हे मला माहिती होतं. रोगाचा प्रसार, lymph node (गाठीचं) स्टेटस वगैरे माहिती नव्हतं मला. म्हटलं, “आता वेळ न दवडता पुढील ट्रीटमेंट सुरू करा.” असं बोलून मी प्रॅक्टिकल हॉलमध्ये मुलांच्यात आले. थोडं हलकं वाटत होतं; पण मन म्हणावं तसं स्थिर नव्हतं. दुसरे दिवशी रिपोर्ट दिला. तात्पुरती बाहेर पडले त्या केसमधून.
५-६ दिवसांनी एक काळीसावळी, हडकुळी तरुण मुलगी मला शोधत आली. काळी जीन्स आणि टी शर्ट. दिसायला अगदीच सुमार; पण चकाकणारे डोळे. ती पेशंट मुलगी होती! माझा चेहेरा पडला. आता परत काय? अगं आत्ता कुठे मी बाहेर पडतेय त्यातून! ती उपचारासाठी आवश्यक पुढील तपासणीसाठी मेणात बनवलेले तुकडे (blocks) न्यायला आली होती. हसून बोलत होती; किंबहुना तिनेच मला थोडं नॉर्मल केलं. आईसारखीच बोलकी होती ती. ‘आईने तुम्हांला भेटायला सांगितलेय, मोबाईल नंबर मागितलाय वगैरे.’ तिचं इतकं स्थिर असणं मला बोचत होतं की त्याचं कौतुक वाटत होतं? संमिश्र भावना! पण मी परत अस्वस्थ झाले. तिच्याशी पुढील ट्रीटमेंटबाबत माझ्या कुवतीनुसार जुजबी बोलले. म्हटलं, ‘सर्जननी सविस्तर सांगितलं असेलच,’ वगैरे…. ती माझ्यासमोरून लवकर जाईल तर बरं असं वाटत होतं. जाताना तिने वाकून नमस्कार केला मला. माझा आतमध्ये परत आकांत… संपर्कात राहा एवढंच म्हणाले.
नंतर कधीच तिच्या आईचा / तिचा फोन आला नाही; पण ती कॅंसर हॉस्पिटलला गेली, तिचे तेथे केलेले काही तपासणी अहवाल फारसे आशादायक आले नाहीत. तेथील तपासणीत एका लसिका ग्रंथीत कर्करोगाने प्रवेश केल्याचे निदान झाले अशी माहिती मिळाली. तिथल्या डॉक्टरांनी तिच्या आईचे counselling केले होते. ट्रीटमेंटचे स्वरूप व प्रोग्नोसिस ( त्या गाठींच्या निदानामुळे असणारे भविष्य) सांगितले होते. त्या डॉक्टरांशीसुद्धा ती आई मोकळेपणाने बोलली होती. त्या डॉक्टरांकडील दुसऱ्या भेटीत तिने मुलीचे लग्न ठरल्याचे सांगितले. त्या डॉक्टर म्हणाल्या, “इतक्यात लग्न करून देऊ नका, ट्रीटमेंट द्या तिला.” या सल्ल्याकडे त्या बाईने साफ दुर्लक्ष केलेले त्या डॉक्टरांना समजले होते.
त्या केसबद्दलचे माझे विचार परत सुरू झाले. निदान समजण्याआधी ती आई आपल्या मुलीचे लग्न करून देण्यास किती उत्सुक होती, किती उत्साहात होती. कदाचित त्या मुलीने अगोदरच लग्न ठरवले असेल, शिक्षण पूर्ण व्हायची वाट पाहत होते ते. त्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना, खरेतर संकटच, त्या कुटुंबियांच्या दृष्टीने नगण्य होते, की ते जाणून बुजून दुर्लक्षिले जात होते? ते एक सुशिक्षित कुटुंब होते. त्यांना प्रोग्नोसिसची नीट कल्पना आलेली असणार. त्या नवऱ्यामुलाला हे संकट सांगितले गेले की नाही? सत्य लपवून ती बाई, आई म्हणून एक इतिकर्तव्य पार पडत होती का? माझे सारेच प्रश्न अनुत्तरित.
अनेक चित्रपट किंवा कथांचा शेवट आपल्या आकलनावरती सोडून दिलेला असतो — तसेच काहीसे हे…
