संपादकीय : मोजमाप शहाणपणाचे, सुज्ञपणाचे!

खरेच शहाणपणाचे मोजमाप होऊ शकते का ? शहाणपण ही शास्त्रीय संकल्पना आहे का पोकळ तात्त्विक चर्चेचा एक विषय? हुशारी आणि शहाणपण एकच आहेत का त्यांत काही फरक आहे? शहाणी माणसं हुशार असतात परंतु सर्व हुशार माणसे शहाणी असतातच असे नाही. वयपरत्वे शहाणपण वाढते असे म्हणतात; परंतु हुशारी तर वयानुसार कमी कमी व्हायला लागते; मग या दोन परस्परविरोधी गोष्टींचा खुलासा कसा करायचा? अनेक प्रश्न आहेत खरे!
खरेतर शहाणपणाचे असे मोजमाप करता आले तर आपले बरेच निर्णय सोपे होतील. तसे आपण बऱ्याच वेळा समोरच्याला शहाणा आहेस किंवा खूप शहाणा आहेस असे म्हणतो पण आपल्या या मतातील शहाणपणाचे संख्यात्मक मूल्य किती ते सांगता येणे अवघड असते; परंतु आता काही शहाणे शास्त्रज्ञ यामागे लागले आहेत आणि त्यांनी सध्या शहाणपणा मोजण्याचे सात निकष हुडकून काढले आहेत. फक्त माहिती असणे आणि माहितीचे ज्ञानात रूपांतर होणे आणि हे रूपांतर होत असताना विवेकाचा काटा या प्रक्रियेला लागणे असे आपण शहाणपणाच्या निर्मितीचे वर्णन करू शकतो. या निर्मितिप्रक्रियेत या शास्त्रज्ञांच्या मते ज्या सात बाबी महत्त्वाच्या असतात त्यांचा थोडासा आढावा घेऊ या.

सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे मनन आणि चिंतन. स्वतःच्या विचारांचे त्रयस्थ मूल्यमापन म्हणजेच मनन.

दुसरी गोष्ट म्हणजे आपले विचार स्वकेंद्रित न ठेवता सर्वकेंद्रित किंवा समाजकेंद्रित करायचे.

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवायचे. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचे अस्तित्व मान्य करून त्यांचा स्वीकार ही चौथी महत्त्वाची गोष्ट.

विचारांचा व कृतीचा ठामपणा ही पाचवी गोष्ट.

इतरांना चार युक्तीच्या गोष्टी सांगण्याची क्षमता व इच्छा असणे ही सहावी गोष्ट

आणि आध्यात्मिकता ही सातवी गोष्ट.

या सात गोष्टींचे योग्य प्रमाणात मिश्रण होऊन तयार होतो तो शहाणा मनुष्य किंवा त्याची शहाणीव. जेस्ते आणि थॉमस (Jeste and Thomas ) या दोन शास्त्रज्ञांनी मिळून ही शहाणपणाच्या मोजमापाची पट्टी तयार केली आहे. यांतील जेस्ते भारतीय आहेत. त्यांचे पूर्ण नाव दिलीप विठ्ठल जेस्ते. ते एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. सध्या अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांना शहाणीव किंवा शहाणपण याचा अभ्यास करण्यात रस आहे. ही संकल्पना पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही तत्त्वज्ञानांत त्यांना आढळली. हुशारी वयपरत्वे कमी होते परंतु शहाणपण वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या समजूतदारपणामुळे वाढवणे शक्य आहे असा त्यांचा सिद्धांत आहे. या संदर्भात मानवी मेंदूंच्या विविध भागांचे शास्त्रीय अध्ययन त्यांनी केले आहे. व्यवस्थित सराव केला तर माणसाचे शहाणपण वाढू शकते असे त्यांचे सांगणे आहे.
शहाणपणाच्या मोजमापाची एक मोजपट्टी त्यांनी तयार केली आहे. मन मोकळे ठेवणे, परमत सहिष्णू ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फक्त स्वार्थाचा विचार न करता तो विचार व्यापक मानवतेकडे नेणे हे शहाणपणाकडे जाणारे काही मार्ग आहेत असे ते सांगतात. शहाणपणा समजायचा असेल तर वेडेपणाचा उगम कशात होतो तेही पाहायला हवे. त्यासाठी वीर वामनराव जोशी यांचे एक गीत अभ्यासण्याजोगे आहे.

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा

कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमानें राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे

कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या निशेने धुंदली भारी

अशा या विविध रंगाच्या पिश्यांच्या लहरबहरिंनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी

ज्यांना आपला शहाणपणा मोजून पाहायचा आहे त्यांनी खालच्या दुव्याला जरूर भेट द्यावी.

https://survey.alchemer.com/s3/5991949/Jeste-Thomas-Wisdom-Index

Author

One thought on “संपादकीय : मोजमाप शहाणपणाचे, सुज्ञपणाचे!

  1. “मोजमाप शहाणपणाचे, सुज्ञपणाचे” ….संपादकीय मोठे मनोरंजक आहे !

    शहाणपणाला मोजमाप असते ही कल्पनाच मुळी रंजक आहे. “एखाद्याचे शहाणपण छटाकभर, तर आणखी तिसर्याचे शेरभर… ” असे म्हटले तर काय वाटेल? वेड्यात काढतील लोक !! पण या संपादकीयात ” जेस्ते आणि थाॅमस” या द्वयींचा हवाला देऊन अनिलने ते पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे.

    संपादकीय वाचून प्रथमदर्शनी मौज वाटली.आणि हो…….आपल्याकडे शहाणपण नाही याची खात्री असूनही “जेस्ते आणि थाॅमस” यांच्या 28 प्रश्नांच्या प्रश्नावलीस उत्तर द्यायचा प्रयत्न केला…आणि हाती काय लागले? आलेल्या स्कोअरवरून एक निश्चित झाले. ते म्हणजे  ..there is wide scope to enhance the wisdom as a whole!!
    मस्त संपादकीय!!
    (वीर वामनराव जोशी यांची quote केलेली कविता सद्यस्थितीचे यथार्थ दर्शन घडविते! 😊)

Leave a Reply