सांप्रत काळात तीन प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासाची मांडणी होताना दिसते. पहिले म्हणजे नेहरू व गांधी नावाचे व घराण्याचे खलनायकीकरण, दुसरे याच विचाराचे पुढचे पाऊल म्हणजे २०१४ पर्यंत या दोघांनी व काँग्रेसने देशाचे अपरिमित नुकसान केले व तिसरे म्हणजे खऱ्या विकासाला देशात सुरुवात २०१४ नंतरच झाली असा भाबडा किंवा खरा विश्वास असणाऱ्यांनी नक्की वाचलेच पाहिजे असे पुस्तक म्हणजे प्रा. निखिल मेनन यांचे “Planning Democracy : How a professor, an institution, and an idea shaped INDIA”
३१२ पानांचे हे पुस्तक. मेनन हे इतिहासाचे संशोधक प्राध्यापक व वयानेही बहुधा चाळिशीच्या आतील असावेत असे त्यांच्या पुस्तकातील छायाचित्रावरून वाटते. ३१२ पानांच्या या पुस्तकात जवळपास ७० पाने ही टिपणे व संदर्भाने भरलेली आहेत. सुरुवातीस लिहिलेल्या तीन कल्पनांवर भाबड्या व भक्त म्हणून अपार विश्वास व श्रद्धा बाळगलेल्या वाचकांना हे पुस्तक धक्का देईल. अनेक उदाहरणे, पुरावे, तत्कालीन दस्तऐवज यांच्या आधारे गोष्टीरूपात हे पुस्तक वाचकाला गुंगवून ठेवत, त्यांचे ग्रह व पूर्वग्रह बासनात गुंडाळायला लावते. विद्यमान सरकारने २०१४ मध्येच नियोजन मंडळ विसर्जित करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना केली. हा ताजा इतिहास बघता प्रशांत चंद्र महालनोबीस (इंग्रजीत स्पेलिंग Prasant ) यांचे हे चरित्र म्हणजे भारतातील पंचवार्षिक योजनांचे जनक व प्रणेते यांचा व स्वातंत्र्यानंतरची पहिली पंधरा वर्षे, त्यातील अर्थ व राजकारणाचे ताणेबाणे, त्या वेळच्या नेत्यांसमोरील बिकट प्रश्न व त्याला त्यांनी दिलेली उत्तरे यांचा एका संशोधकाच्या नजरेतून मांडलेला प्रेरणादायी इतिहासच म्हणावा लागेल.
विकासाचे महालनोबीस प्रारूप : मध्यवर्ती नियोजन व मोठे पायाभूत उद्योग
विकासाचे हे मॉडेल महाविद्यालयात असताना पाच मार्कांच्या प्रश्नासाठी वाचले होते! अर्थातच त्या वेळेस महालनोबीस या व्यक्तीचे भारताच्या आर्थिक विकासातील योगदान, त्या वेळची भारतातील आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी व त्यांची दूरदृष्टी याचा अंदाज येण्याची सुतराम शक्यता नव्हती. निखिल मेनन यांच्या या अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तकामुळे प्राध्यापक महालनोबीस यांच्या १९५० – १९६० या दशकातील आता भूतकाळात जमा झालेल्या नियोजन आयोग (प्लॅनिंग कमिशन) या संकल्पनेचा व त्या माध्यमातून झालेल्या त्यांच्या कामगिरीवर विहंगम प्रकाश पडतो. त्याचबरोबर त्या काळातील देशाचे अध्वर्यू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टिपूर्ण नियोजनाबद्दलही नव्याने काही वाचायला मिळाले. गुलझारीलाल नंदा, धनंजयराव गाडगीळ व नंतरच्या काळात जगप्रसिद्ध झालेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासकट अनेक अर्थतज्ज्ञांच्या सुरुवातीच्या त्या काळातील भूमिकांबद्दलही काही मार्गदर्शन या पुस्तकात होते.
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या दहा-पंधरा वर्षांतील देशातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये नियोजन मंडळाचा(प्लॅनिंग कमिशन) सर्वात महत्त्वाचा वाटा होता. नियोजन मंडळाला ही मध्यवर्ती भूमिका मिळवण्यासाठी विविध प्रकारचे राजकारण व खेळी महालनोबीस यांना कराव्या लागल्या. एका संख्याशास्त्रज्ञाकडून अर्थशास्त्रज्ञाकडे झालेला त्यांचा प्रवास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. या सर्व प्रवासात एकीकडे नेहरू यांचा विश्वास व दुसरीकडे तत्कालीन मंत्रिमंडळ, शासकीय अधिकारी व विषयतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ यांच्या प्रकट व छुप्या विरोधाला तोंड देत प्रा. महालनोबीस यांच्या सल्ल्याने भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली दिशा स्वतंत्र भारताच्या पायाभरणीतील महत्त्वाचा कालखंड आहे. ग्रामीण आणि शहरी कुटीर उद्योग आणि मोठे उद्योग यांच्यामधील सनातन वाद, आयात-निर्यात धोरण, परकीय चलनाचा तुटवडा, रशियाप्रमाणे प्रसंगी सक्तीचे केंद्रीय नियोजन का अमेरिकेच्या वाटचालीप्रमाणे भांडवलशाही? असे अनेक प्रश्न, त्याला दिलेला धोरणात्मक प्रतिसाद व या सगळ्याबद्दलच नव्याने विचार करायला लावणारे तपशील मुळातून वाचावेत असे आहेत. रामचंद्र गुहा यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकानंतर गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये नव्या दमाचे अनेक अर्थ, समाजशास्त्र व इतिहासाचे अभ्यासक भारतातल्या पहिल्या पंचवीस-तीस वर्षांच्या कालखंडाकडे केवळ पुराव्याच्या आधारे जे दिसते आहे ते बघून साकल्याने मांडणी करत आहेत; त्यातीलच हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ.
आर्थिक नियोजनाची सुरुवात व माहितीचे महत्त्व
महालनोबीस हे विख्यात संख्याशास्त्रज्ञ. भारतात व नंतर जगभरात अनेक ठिकाणी विविध परिषदांमध्ये त्यांचा संचार होता. त्यांच्या विषयातील ते जागतिक तज्ज्ञ. असा हा कोलकात्यातील संख्याविशारद दिल्लीत कसा आला व आपल्या दूरदृष्टीने त्याने त्या वेळच्या नेतृत्वावर कशी मोहिनी टाकली हा पुस्तकाचा मध्यवर्ती विषय. आपल्या खंडप्राय देशातून प्रथम विश्वसनीय माहिती गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे व त्यावर आधारित देशाचे अर्थधोरण ठरवणे हे महाधनुष्य महालनोबीस यांनी व त्यांच्या कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट व नंतर दिल्लीतील नियोजन मंडळाने कसे पेलले याचे रोमांचक वर्णन पुस्तकात आहे. देशातून माहिती गोळा करताना वापरण्याच्या (आज वापरल्या जाणाऱ्या सर्व पद्धती म्हणजे उदाहरणार्थ रँडम सॅंपलिंग किंवा NSS चे सर्व्हे ) संकल्पना प्राध्यापक महालनोबीस यांच्या दूरदृष्टीतून जन्माला आल्या! याच माहितीच्या आधारे अनेक पंचवर्षीय योजनांचे आराखडे बनवले गेले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे सर्व आराखडे करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
संगणक युगाचे जनक राजीव गांधी नव्हेत तर प्राध्यापक महालनोबीस !
राजीव गांधी यांनी संगणक युगाची सुरुवात केली अशी माझी व अनेक जणांची समजूत आहे. या पुस्तकाने ही समजूत किती चुकीची आहे हे सप्रमाण दाखवून दिले आहे. पुस्तकातील एक पूर्ण लेख महालनोबीस यांनी केलेल्या अथक परिश्रमांबद्दल आहे. जेव्हा भारतभर विविध प्रकारच्या संख्याशास्त्रीय माहितीच्या संकलनाला सुरुवात झाली तेव्हा या अफाट माहितीचे करायचे काय, म्हणजेच त्याच्यावर मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रक्रिया करण्यासाठी संगणकाची मदत लागणार हे महालनोबीस यांच्या नजरेने हेरलं आणि त्यासाठी अर्थातच मग शोध सुरू झाला. यासाठीचे तंत्रज्ञान त्या वेळच्या प्रगत देशांमध्ये कोणाकडे आहे? ते पाहणे गरजेचे बनले. त्यातून इंग्लंड, अमेरिका व रशिया या तीन देशांमधील त्यांच्या विविध शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ यांच्याशी असलेल्या व्यापक संपर्कातून त्यांनी भारताला हे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकेल का याची केवळ चाचपणीच नाही तर अतिशय वेगवान हालचाली करून त्यासाठी उपयुक्त संगणक मिळवण्यासाठीचे सर्व सोपस्कार एकहाती पूर्ण केले. २०२३ मध्ये हे लिहिणे अतिशय सोपे आहे; पण त्यासाठी त्यांना काय काय दिव्य करायला लागले याबद्दलचाही अतिशय रंजक तपशील या पुस्तकात आहे. १९५० आणि १९६० हे दशक हा शीतयुद्धाचा कालखंड. सर्व जगाची विभागणी अमेरिकेच्या वर्चस्वाखालील पश्चिमेकडील राष्ट्रे आणि दुसरीकडे रशियन गटातील राष्ट्रे अशा दोन ध्रुवांत झाली असल्यामुळे या दोन्ही गटांमध्ये भारताला हे तंत्रज्ञान दिले तर त्याचा हेरगिरीसाठी व युद्धासाठी वापर होऊ शकेल अशी भीती होती. या संगणक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग तर होणार नाही? अशी शंका असल्यामुळे प्राध्यापक महोदयांना हे तंत्रज्ञान सहजी उपलब्ध होऊ शकेल अशी अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळेच या तीन आघाड्यांवर काम करत असताना त्यांनी एकीकडे स्वतःच्याच संस्थेमध्ये म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये एका शास्त्रज्ञांच्या छोट्या गटाबरोबर स्वतःचा संगणक बनवण्याची सुरुवात याच काळात केली. या चार आघाड्यांवर काम करताना आणखी एक रंजक व महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातच पश्चिम किनाऱ्यावर डॉक्टर होमी भाभा आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थांमध्येही संगणक निर्मितीवर स्वतंत्रपणे काम सुरू झाले होते. त्यामुळे देशामध्ये दोन आघाड्या आणि परदेशात तीन आघाड्या अशा पाच आघाड्यांवर काम करत करत महालनोबीस यांच्या संस्थेने भारतात हरप्रयत्न करून पहिला संगणक आणला. केवळ संगणक आणून उपयोग नव्हता; ते चालवण्याचे शिक्षण देणारे तंत्रज्ञान व शास्त्रज्ञांचीही आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी यातील जगप्रसिद्ध नाव नादलेर (Nadler) याला भारतात येण्याचे कसे निमंत्रण दिले याचाही अतिशय रोचक तपशील पुस्तकात आहे.
संगणकाच्या शोधात प्राध्यापक महालनोबीस यांना एका वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तीची ओळख झाली. नादलेर हे त्यांचे नाव. हे अमेरिकेत जन्मलेले. अमेरिकेतच असताना तेथील संरक्षण व्यवस्थेच्या नियंत्रणाखालील एका प्रकल्पात ते काम करत होते. कम्युनिस्ट पार्टीचे सहानुभूतीदार म्हणून त्यांच्यावरती तेथील सरकारचे लक्ष होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी त्यांची अमेरिकन सरकारच्या कामातून हकालपट्टी झाली. तेथून ते जवळपास पुढील बारा वर्षे पूर्व युरोपात राहिले. तिथल्या वास्तव्यामध्ये तेथील रडार यंत्रणेवर काम करणाऱ्या एका सरकारी यंत्रणेमध्ये काही कारखान्यांमध्ये ते काम करत होते. महालनोबीस व नादलेर यांची प्रागमध्ये भेट झाली आणि त्याच वेळेस महालनोबीस यांनी त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. या व्यक्तीची आपल्याला संगणक तयार करण्यात मोठी मदत होऊ शकेल या हेतूने त्यांनी त्यांना कलकत्त्याला काही दिवस येण्याचे निमंत्रण दिले. या काही दिवसांचे १८ महिन्यांमध्ये रूपांतर झाले आणि त्यांच्या मदतीने कलकत्त्याच्या बाहेरच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट प्रयोगशाळेत नियोजन मंडळासाठी लागणाऱ्या संगणकाची निर्मिती झाली; तरीही प्रयत्न थांबले नव्हते. इंग्लंड, अमेरिका व युरोपमधील देशांमधून अद्ययावत संगणक मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. याच काळात गेल्या दहा वर्षांत ‘बदनाम’ झालेल्या फोर्ड फाउंडेशनच्या त्या वेळच्या कार्यालयाने त्यांना सुमारे २३ लाखांची ( त्या वेळचे ५,००,००० डॉलर) मदत देऊ केली. ‘आयबीएम १६२०’ नावाचा संगणक नियोजन मंडळासाठी भारतात आणण्यात आला. हा सर्व तपशील मूळ पुस्तकात वाचण्यासारखा आहे.
दिल्ली ते गल्ली : नियोजन गळी उतरवण्याचा प्रवास!
एकीकडे दिल्लीत बसून सर्व भारतभरासाठी नियोजन केल्यानंतर ते गावागावांत कसे पोचवायचे याचा एक फारच मोठा प्रश्न त्या वेळेस महालनोबीस व योजना करणाऱ्या सर्व सदस्यांना होता. त्यामुळेच या मध्यवर्ती नियोजनासाठी त्या वेळच्या सरकारने सर्व प्रकारची प्रचारतंत्रे उपयोगात आणली. या विषयीचा अतिशय रंजक असा एक लेख याच पुस्तकात ‘योजनेला मदत करा व स्वतःला मदत करा’ – ‘हेल्प द प्लॅन हेल्प युअरसेल्फ,’ असा आहे. त्या काळात निघणाऱ्या ‘योजना’ नावाच्या मासिकाद्वारे या सर्व योजनेचा तपशील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला. त्या वेळचे फिल्मी कलाकार मीनाकुमारी, कामिनी कौशल यांना याकरता कामाला लावले गेले! या प्रसिद्ध व्यक्ती ‘योजना’ मासिकाचे अंक वाचत आहेत असेही चित्र या पुस्तकात आहे. केवळ मासिकापर्यंत न थांबता, गावागावांमध्ये त्या वेळचे फिल्म्स डिव्हिजन व त्यांचा ताफा पथनाट्य, गाणी, कथा या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. आजच्या भाषेत ज्याला ब्रँड अँबेसिडर म्हणले जाते असे अनेक लोक सरकारने या कामात गुंतवले. त्याही पुढे जाऊन आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे नेहरूंच्या काळात ‘भारत साधू समाज’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुमारे पाच लाख साधूंच्या संघटनेलाही त्या वेळच्या सरकारने या प्रचारासाठी कामास जुंपले! स्वतंत्र भारताच्या पहिल्या १५ वर्षांत अशा प्रकारे साधूंनी गावागावांत जाऊन या योजनेचा प्रचार करणे याबद्दलही त्या वेळच्या काही हितचिंतकांनी प्रकट टीका केली होती; पण गुलजारील नंदा यांनी हा विषय पुढे रेटला आणि अक्षरशः गावोगावच्या साधूंनाही कामाला लावले. पुस्तकामध्ये महाराष्ट्राचे संत तुकडोजी महाराज यांचाही उल्लेख तीन चार वाक्यांत आहे. लेखकाला कदाचित त्यांच्या कामाबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे तुकडोजी महाराजांची गणना यात उजव्या आघाडीचे संत म्हणून केली आहे! साधुसंतांच्या बरोबरीने विद्यापीठातही नियोजनाबद्दल चर्चा, विद्यार्थ्यांचे गट आणि त्यासाठीचे स्वयंसेवक नेमण्याची मोठी मोहीम सरकारने त्या काळात केली. एका प्रकारे हातात असलेली सर्व प्रकारची प्रचार यंत्रणा वापरून नियोजनाची गोळी लोकांच्या गळी कशी उतरवायची याचाच एक अभूतपूर्व प्रयास त्या काळात केला गेला आणि तो या पुस्तकाच्या निमित्ताने सगळ्यांसमोर येत आहे. याच पुस्तकात तुकडोजी महाराज यांच्या एका पत्राचा उल्लेख लेखकाने केला आहे. तो असे म्हणतो की त्यांनी एक पत्र दिले आणि त्या पत्रात असे म्हटले की, “हे जर लोक आपले आहेत, सरकार आपले आहे, पंचवार्षिक योजना आपली आहे, तर मग आपण सरकारच्या या कामापासून लांब का बरे राहावे?”
केंद्रीय नियोजनाचे तोटे
लेखक पुस्तकाच्या शेवटी नियोजनाच्या तंत्रशाहीबद्दल (technocracy) परखड मते मांडतो. प्रगतीचा व नियोजनाचा केंद्रबिंदू लोकशाही व देशामधील जिवंत माणसे – त्यांना फारसे विचारात न घेता योजना करण्याचे एक तंत्र होऊन बसणे, त्यातून आकडे व त्यांची उलाढाल व कसरत व हे करताना लोकशाहीचा प्राण हरवणे असेच होते; ते तसेच होत गेले व १९६० च्या दशकात महालनोबीस यांचे महत्त्वही कमी कमी होत गेले.
अजित कानिटकर
