अलीकडे उजव्या गुडघ्याचे दुखणे खूप वाढले आहे. चालणे कठीण झाले. पायरी चढणे उतरणे सहज जमेची ना. उठता बसता ‘स्स्, हाय, आई गं’ चा जप सुरू झाला. वयाने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. सत्तरी ओलांडल्यावर शरीर झिजणारच की!
ओघानेच सर्व आले – डॉक्टर, रक्ततपासणी, एक्सरे… रोज उठून एखादी लॅब नाहीतर क्लिनीक. जीव वैतागू लागला. तोच दुसरा फटका – अचानक हाताला मुंग्या यायला लागल्या, बोटे बधीर झाली, हातातून वस्तू पडायला लागल्या. हे काय नवीनच? पुन्हा डॉक्टरी तपासण्यांचे चक्र. घरचे काळजीत… मी चिंतेत.
शुक्रवार. सगळे रिपोर्ट्स घेऊन मी न्यूरॉलॉजिस्टच्या पुढ्यात!
“एम आर आय करायला पाहिजे, ” – एक्सरेवरची नजर काढत डॉक्टर म्हणाले. जिवात धक् झाले.
“एम् आर. आय ? काय झाले आहे मला काही गंभीर आजार तर नाही?”
“एम. आर. आय रिपोर्ट पाहिल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. मंगळवारी भेटा मला रिपोर्ट घेऊन.”
डॉक्टरांचे निर्विकार शब्द!
दोन तीन दिवस मनात प्रचंड खळबळ. काय झाले आहे आपल्याला? हार्ट की नर्वस सिस्टिम? आयुष्य संपत तर नाही आले? परस्वाधीनता येणार की काय? कोणती बंधने पडणार? हात, पाय शेवटपर्यंत चालतील ना?…
कसं होणार भरल्या संसारातून उठून जावं लागलं तर? अजून खूप आवरायचं आहे. धावपळीत आयुष्य गेलं. उसंत मिळाली नाही. निवांतपणा कधी नव्हताच. निरवानिरव… कपाटाच्या किल्ल्या कुठे असतात हे घरात कुणाला ठाऊक नाही. सर्व व्यवहार एका हाती सांभाळले. प्रत्येक जण आपल्याच धुमश्चक्रीत. केव्हा बोलणार? उद्या सांगू, परवा करू, पुढच्या वेळी… अशातच दिवस गेले. कुणाला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच सर्व उरकायची सवय अंगाशी आली आहे. चुकलंच माझं!
आता चार दिवसांत संसार कसा आवरू? सगळ्यांना सोडून जावं लागलं तर…?
नातीला वरणभात खाऊ घालू शकेन असं वाटत नाही. खूप आवडतो तिला! अगदी पंचतारांकित सुट्टीला गेलो तरी परतताना हळूच म्हणते, “आजी घरी गेल्यावर वरणभात करशील?” वाफाळता आंबेमोहर भात, त्यावर हिंगाच्या वासाचं साधं वरण, वर साजूक तुपाची धार आणि बाजूला लिंबाची फोड! अगदी अंतरात्म्याची तृप्ती…
आत्मा?…
तो तर अमर्त्य आहे… श्रीकृष्णानं सांगितलं आहे. खरंच का माझं शरीर इतकं जीर्ण झालं आहे की त्याचा त्याग करायची वेळ आली आहे? आणखी खूप गोष्टी करायच्या बाकी आहेत… गप्पागोष्टी, लेखन, प्रवास…
प्रवास?
एक वेगळाच भुंगा मन कुरतडू लागला…
कंबोडियाच्या ट्रिपचे काय? मुलीने दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. विमान तिकिटे, हॉटेल बुकिंग, मंदिरांचा अभ्यास…अगदी परिपूर्ण!
कंबोडियाचे जगप्रसिद्ध ‘अंगकोरवाट’ मंदिर… माझे कैक वर्षांपासूनचे स्वप्न. एका नॅशनल जिओग्राफिकच्या अंकात फोटो पाहिले होते तेव्हाच ठरवले होते… तिथे जायचंच. नंतर श्री. उदयन इंदूरकरांची रंगमंचावरील ‘एक होतं देऊळ’ कलाकृती पाहिली. देवळाची संकल्पना विशद करताना त्यांनी सांगितलेली, जगातल्या विद्वानांनी वर्षानुवर्षं अभ्यासिलेली मोजमापाची अचूक गणिते जेव्हा कानावर पडली तेव्हा मन थक्क झाले. पक्के ठरले आता तर जायचेच! संधी अलगद पुढ्यात आली होती; पण नशिबाने पुढ्यात पेच टाकला होता! मला जाता येईल ना? ते जगप्रसिद्ध समुद्रमंथनाचे शिल्प पाहता येईल ना?
रविवार. आज उस्ताद झाकिर हुसेन यांचा अनोखा कार्यक्रम. झाकिर हुसेन! तालवाद्याचा बादशाह! आजवर त्यांचे खूप कार्यक्रम पाहिलेत – ऐकलेत. कधी उघड्या रंगमंचावर, कधी बंदिस्त सभागृहात; तर कधी चार भिंतींच्या उबदार निवासात. प्रत्येक वेळी त्या माणसाने भारून टाकले. या कार्यक्रमाला गेलेच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत ! सभागृहाचे आवार माणसांनी फुललेले. कुठून कुठून लोक आलेले – एखाद्या चुंबकाने खेचल्यासारखे. कार्यक्रमाची सुरुवात. रंगदेवतेला झाकीरचे विनम्र अभिवादन. त्याची बोटे तबला डग्ग्यावर फिरू लागली… समेची थाप! जणू धनुष्याचा टणत्कार, सुस्पष्ट बोल. ताल,मात्रा,लयीचा अनुपम आविष्कार. साथीदार एक-एक जोडले जात होते. कधी मृदंगाबरोबर जुगलबंदी; तर कधी ढोलकीचे लावण्य! वादक एकमेकांच्या संगीतरसात चिंब. एकमेकांना चुचकारत, चिडवत, वाखाणत एकरूप होऊन पुढे निघाले. झाकीरची बोटे तबल्यावर विजेच्या चपळाईने थिरकताहेत… डोळ्यांना दिसतही नाहीत. तो एका वेगळ्याच जगात पोहचला आहे. पित्याचा संस्कार आणि वर्षानुवर्षांची तपस्या तेजस्वी अबलख वारू होऊन आसमंतात उधळली आहे… कधी ‘शक्ती’तून तर कधी यहूदी मेन्युहिनसोबत… तर कधी विकू विनायकम्च्या घटम् आणि शिवामणीच्या ड्रम्सच्या साथीने ! गणपतीचे ढोलताशे, वारकऱ्यांचे टाळमृदंग आणि शाहिराचा डफ – सर्वांचे नादतत्त्व एकच.
म्हणता म्हणता , गजगामिनीच्या संथ डौलात निघालेल्या तालाने, बोलांच्या आवर्तनातून, गगनभेदी विद्युल्लतेचे रूप केव्हा घेतले हे कळलेच नाही .
हा माणूस आहे की कुणी यक्ष गंधर्व? सारे सभागृह भारलेले. बोटांनी ताल धरला… पायांनी ठेका. माना डोलत होत्या. ‘वाह वाह’ची उत्स्फूर्त दाद येत होती. शब्दसंवादाची गरजच नव्हती. सभेवर जसे संमोहन पडले होते. या नादब्रह्मात रंगलेला श्रीरंग माझ्या डोळ्यांना दिसू लागला. संत सोयराबाईचे अमृताचे शब्द मनःपटलावर उमटले
“अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग “
माझ्या अल्पबुद्धीला एवढ्या मोठ्या तत्त्वज्ञानाचा एक किरण पुसटसा स्स्पर्शू लागला…
“मी तूपण गेले वाया, पाहता पंढरीचा राया ”
माझ्या चिंतित, थकल्या मनावर कुणी फुंकर घालीत होते…
“नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम”
मनाचे शांतवन होत होते…. शरीर निश्चल..
“देह असोनी विदेही, सदा समाधिस्थ राही”
ही काय जादू होती? गेल्या दोन दिवसांतली अंतर्मनातली खळबळ उन्मळून बाहेर येऊ पाहत होती. किल्मिष बाहेर पडत होते…हळूहळू ते डोळ्यांवाटे झरले… अमृताचे रूप घेऊन!
एकदाचं एम. आर. आय. पार पडलं. पुन्हा डॉक्टर… घाबरलेल्या मनाला दिलासा. वयपरत्वे झिजलेले मणके, गुडघे काळजी तर खूप घ्यायला हवी. विमानप्रवास करता येणार होता – कंबोडिया काही फार दूर नाही. चढउतार टाळायचा. फिजिओथेरपी, कंबरेचा पट्टा, मानेची कॉलर, गुडघ्याच्या कॅप्स, पायांत योग्य ते शूज…
देवा रे परमेश्वरा! आणखी काही? विमानतळावर व्हीलचेअर…
तरीही…प्रवास करता येणार होता. भरभरून देवाचे आभार मानले…
मन आसावले आणि पुढील तयारीला लागले.
पूर्वेकडील ख्मेर साम्राज्यात असलेला, हिंदू आणि बौद्ध संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेला देश– कंबोडिया – कंबोज!
इ.स. पहिल्या शतकात कौंडिण्य नावाच्या एका दक्षिणी ब्राह्मणाबरोबर हिंदू संस्कृतीने तेथे प्रवेश केला, आपली पाळेमुळे रोवली. पुढे तिसऱ्या शतकापासून तेथे बौद्ध संस्कृतीचाही प्रसार झाला. त्याची राजधानी ‘अंगकोरवट.’ – मंदिरे आणि पागोड्यांचे शहर. शेकडो मंदिरे… त्यांतील सर्वात महत्त्वाचे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर – श्रीविष्णूचे!! आता डोळे भरून पाहता येणार होते.
मुंबईचे विमानतळ – ते बँकॉकची ‘सुवर्णभूमी’… आणि नंतर सीएमरीपचे आंतरराष्ट्रीय अंगकोर विमानतळ. त्या भूमीवर पाऊल ठेवणे स्वप्नवत वाटत होते… संध्याकाळ सरली होती… हॉटेलमध्ये जाताना, धूसर प्रकाशाने ‘अंगकोर वट’ ची वाट उलगडत होती. ‘समुद्रमंथन’ आता आवाक्यात आले होते.
पहाटेचे पाच वाजले आहेत. उजाडण्यापूर्वीचा अंधार आसमंतात रेंगाळतो आहे. अंगकोरच्या मंदिराचा राजमार्ग उभारलेल्या दगडी नागफणांनी रेखत गेला आहे. पुढे राजचिन्हाचे सिंह, इंद्राचा ऐरावत आणि सुरसुंदरींच्या लेण्यांनी सजलेले कोरीव, भव्य प्रवेशद्वार…
शेकडो माणसे पुढे चालत आहेत. जथ्याजथ्याने, एकटी-दुकटी… तरुण, म्हातारी… चिनी, जपानी, इंग्लिश, आफ्रिकन – जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेली. केवळ पावलांचे आवाज… हलकीशी कुजबूज, विजेऱ्यांचे प्रकाशझोत,मार्गीच्या दोन्ही बाजूंना तलाव… विस्तीर्ण पटांगणे. हिरव्या गवतावर, मोठमोठ्या शिळांवर, भग्नावशेषांवर बसलेली असंख्य माणसे… हातांतले कॅमेरे सरसावून पूर्व दिशेला नजर खिळवून!
समोर आडवे विस्तारलेले महाकाय देवालय – पूर्वउषेच्या तलम, धूसर पडद्याआड… सर्वदूर भारलेले वातावरण!
हळूहळू देवालयाची रूपरेषा उजळू लागली. अवकाशाला भेदणारे मनोरे आणि कळस आकाशपटलावर सुस्पष्ट उमटू लागले. त्यांचा राखाडी, धुरकट रंग हटून त्यावर तांबूस सोनेरी मुलामा चढू लागला. निळ्याभोर आकाशातील ढगांचे चुकार पांढरे पुंजके दूर होऊ लागले. सूर्यनारायणाचा तेजोगोल धिम्या डौलात क्षितिजावर आला. सुवर्णप्रभावळीने मंदिर झळाळून उठले. सूर्योदय झाला!
जादूची कांडी फिरल्यागत लोक उठून मंदिराच्या दिशेने चालू लागले. सर्वांचे प्रेरणास्थान एकच होते. महापराक्रमी राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने बाराव्या शतकात उभारलेले अंगकोर वाटचे विष्णुमंदिर. आंतरराष्ट्रीय वारशाचा मान लाभलेले जगातले सातवे आश्चर्य. ख्मेर वास्तुकलेचा त्याच्या सुवर्णकाळातील अप्रतिम खरोखरीच awesome! नमुना… मास्टरपीस! प्रचंड, उत्तुंग आणि महाविशाल…आणि देखणा… डोळ्यांचे पारणे फेडणारा ।
एका महत्त्वाकांक्षी राजाने पाचशे एकर जमिनीवर केवढे विराट वास्तुशिल्प उभारले होते!
राजवाट संपली. आता मंदिराच्या पायऱ्या चढायच्या. महाकाय श्रीविष्णूचे दर्शन घेऊन, पायऱ्या चढून उजवीकडे दृष्टी टाकली. जवळपास शंभर मीटर लांबीचा कॉरिडॉर, तेवढ्याच लांबीचे भित्तिशिल्प. इंच अन् इंच कोरलेला. महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध… शरपंजरी पडलेले भीष्म पितामह. एकमेकांपुढे उभे ठाकलेले योद्धे… उधळलेले अश्व, उंचावलेले भाले, सुटलेले बाण, उचललेल्या गदा! सुजन-दुर्जनांचे, सात्त्विक-असात्त्विक प्रवृत्तींचे तुंबळ युद्ध. संहार अटळ. आहुती अटळ. विनाश अटळ. अर्जुनाची दुविधा वाढतेय. श्रीकृष्णाच्या गीतामृताचे सिंचन होतेय. सर्जनाची, नवनिर्माणाची पूर्वतयारी! वळणावर शिवपार्वतीचे सुंदर शिल्प, डावीकडे दक्षिणाभिमुख भिंतीवर राजा सूर्यवर्मन (दुसरा) याच्या राजवैभवी युद्धमोहिमेच्या मिरवणुकीचे शिल्प. ब्राह्मण, अप्सरा, योद्धे… एका राजाच्या गौरवशाली इतिहासाचे, त्याच्या थक्क करणाऱ्या कर्तृत्वाचे प्रमाणच समोर होते.
इ.स.१११३ ते ११४८. तब्बल ३५ वर्षे लागली हे मंदिर उभारायला. कसे बांधले असेल हे देऊळ? किती धन लागले असेल? वास्तुविशारद ‘दिवाकर पंडित’ होते म्हणे; शिवाय इतर किती गणिती, अभियंते, कारागीर, सेवक झटले असतील! कसे वाहिले, घडविले आणि रचले असतील हे कठीण पाषाण? कसा दिसला असेल हा आसमंत? हत्तीघोड्यांनी गजबजलेला,छिन्नी-हातोड्यांच्या आवाजाने निनादलेला, शिल्पकारांच्या साधनेने भारलेला… कितीएक हातांनी घडविल्या असतील ह्या श्रीविष्णू आणि गौतम बुद्धाच्या, इंद्र अप्सरांच्या, सिंह नागांच्या मूर्ती? मानवी क्षमतेला अशक्यप्राय वाटणाऱ्या या कलाकृती कोणत्या अनाम साधकांनी घडविल्या असतील? झाकीर हुसेनची तबल्यावरील थाप आणि शिल्पकाराचा छिन्नीचा घाव एकाच जातीचा तर नाही… निष्ठा आणि अविचलित समर्पणाचा?
या सर्वांचा समन्वय साधणारा सम्राट सूर्यवर्मन( दुसरा). त्याची मिरवणूकही त्याच तोडीची हवी. जगभराच्या लोकांना आवाहन करणारी! पुढे स्वर्ग, मृत्यू, नरकाचे शिल्प…
आणि पलीकडे? पावले अधीर झाली आहेत वळणापलीकडे जायला… काहीच क्षण… वळताच डोळ्यांपुढे उधळला अपूर्व पूर्वरंग ! आदित्यनारायणाच्या तेजस्वी किरणांनी उजळलेले एकशे आठ एकर हस्त लांबीचे शिल्प लेऊन उभी होती – लांबच लांब पूर्वाभिमुख भिंत… समुद्रमंथनाचे अप्रतिम शिल्प!
काही वर्षांपूर्वी ऐकलेले, श्री.उदयन इंदूरकरांचे, ‘देऊळ’ संकल्पनेच्या विवेचनातील शब्द मंथनाच्या तुषारांसारखे कानावर पडत आहेत…
“विष्णू हा काळ (चक्र) आणि अवकाश (शंख) यांचा देव असल्यामुळे या मंदिराच्या लांबीरुंदीची मापे काळाच्या प्रमाणात आणि उंचीची अवकाशाच्या प्रमाणात आहेत.”
“शिल्पावरील एखाद्या देव किंवा दानवावर सूर्यकिरण सरळ पडले तर वर्षाची तारीख कळते. समुद्रमंथनाच्या शिल्पाच्या मधोमध असलेल्या विष्णुशिल्पावर २१ मार्च आणि २३ सप्टेंबरला सूर्य उगवतो, उत्तरेकडील सुग्रीवावर २१ जूनला आणि दक्षिणेकडील बळीवर २१ डिसेंबरला. हे शिल्प म्हणजे सूर्याच्या वर्षभरातील अयनाचा आलेख आहे. ही एक चिरंतन कालातीत दिनदर्शिकाच (Timeless Calendar) आहे. हा शोध लावला आहे अमेरिकन विदुषी एलिनॉर मैनिका यांनी वीस वर्षे अथक परिश्रम करून.”
“क्षीरसागराचे मंथन… कच्छाच्या पाठीवर मंदार पर्वताचा मेरुदंड, त्याला लपेटून जाणारा नागराज वासुकीचा दोर, डोके असुरांकडे आणि शेपटी देवांच्या हातात, उत्तरेला सुग्रीव, दक्षिणेला बळी, मधोमध श्रीविष्णू, वरती इंद्रदेव, एकीकडे नव्वद देव, दुसरीकडे नव्वद दानव आणि श्रीविष्णूची दोन रूपे… एकूण एका अयनाचे दिवस एकशे ब्याऐंशी म्हणजे दोन अयनांचे तीनशे चौसष्ट अधिक एक इंद्रदेव… वर्षीचे तीनशे पासष्ट दिवस”
कसली अफाट संकल्पना !
बापरे! विज्ञान, गणित, कला आणि कृती यांचा हा केवढा नेत्रदीपक संगम! कोणत्याही कलाकृतीला अनेक परिमाणे असतात. काही दृष्टीला दिसतात तर काही अंतःचक्षूंना. निर्लेप मनाने लक्षपूर्वक पाहिली तर ती एक सार्थ अनुभूती असते. कधी स्पष्ट तर कधी घूसर… पण अंतर्मनात रुजलेली, उमलणारी!
अंगकोर वाटच्या समुद्रमंथनाचे दृश्य नजरेपुढे साकार झाले होते. मनाने ध्यासच घेतला होता. इच्छापूर्तीच्या आनंदाने डोळे ओलावले. त्या पारदर्शी आवरणातून दिसू लागले समुद्राचे अविरत मंथन –
प्रथम निघाले हलाहल… कालकूट विष पाण्यावर पसरले. कालकूट पसरले असते तर जीवसृष्टी नष्ट झाली असती. तो विनाश टाळण्यासाठी श्रीशंकराने हलाहल आपल्या कंठात तोलून धरले
आणि नंतर?
त्या फेनिल, निळ्यांभोर लाटेवर तरंगू लागले एक एक
दिव्य रत्न…
लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश्चंद्रमा।
गावःकामदुधा सुरेश्वरगजौ रंभादि देवांगना।
अश्वःसप्तमुखौ विषं हरिधनुः शंखोमृतम् चांबुधे।
लक्ष्मीच्या तेजाने, कौस्तुभ मण्याचा प्रभेने आसमंत उजळला आहे. पारिजाताच्या परिमलाने दरवळला आहे, चंद्रम्याच्या शीतलतेने भारला आहे. सुरा आणि रंभादि अप्सरा मनोरंजनासाठी आणि कल्पवृक्ष, कामधेनू मनोकामना पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत… सप्तमुखी उच्चैश्रवा आणि शुभ्र ऐरावत विभवकालाचे आगमन सूचित करीत आहेत. श्रीविष्णूचे शारंग धनुष्य आणि शंख रक्षणार्थ सज्ज आहेत…
आणि सर्वात शेवटी :- साक्षात धन्वंतरी अमृतकलश घेऊन अवतीर्ण होत आहेत.
कसा असतो तो अमृततत्त्वाचा प्रदेश? निळाशार, चमचमता, मंद स्पंदने असणारा आणि अथांग, अमर्याद! आणि ते अमृततत्त्व? … निर्विकल्प, निर्विकार, निर्लेप, निःस्तब्ध तेच ते जे श्रीविष्णूने असुरांपासून मुक्त करून देवांना… देववृतींना प्राप्त करून दिले. त्यासाठी एवढे मंथन होणे क्रमप्राप्तच होते.
आपलेही असेच. स्वर्ग आणि मृत्युलोकाच्या अवकाशात उभा हा मर्त्य देह… मेरुदंड होऊन जन्मोजन्मीच्या अनुभवांचे, सुखदुःखांचे बरेवाईट संस्कार अंतर्मनाच्या अथांग सागरात साठवून. घटिकापळे, दिवसमास, शक-संवत्सरे घुसळण चालूच…षड्रिपूंच्या दोराने प्रथम निघते ते हलाहल. काळेनिळे… क्लेशकारी, दुःखदायी जीवनरस शोधून घेणारे आणि नंतर, दिसू लागतात रत्नसदृश अनुभवांचे दिव्य क्षण. आता या देहात बंदिस्त झालेला आत्मा मुक्त व्हायचा आहे – अमृताचे रूप घेऊन !
यथोचित आणि निष्काम कर्म करून ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखविला श्रीकृष्णाने.
आणि मनावर चढलेला जन्मोजन्मींच्या संस्कारांचा निचरा करून मुक्तिप्राप्तीची – विपश्यनेची दिशा दाखविली गौतम बुद्धाने.
समुद्रमंथन आणि विपश्यना… श्रीविष्णू आणि गौतमबुद्ध! दोघेही अंगकोर वाटचे तत्त्वज्ञ – अमृतसिद्धीकडे नेणारे… त्या विस्तीर्ण शिल्पापुढे माझा पुतळा झाला आहे. डोळ्यांतून वाहणारी आसवं हीच चैतन्याची खूण आहे. झाकीरच्या तालवादनात पुसटसे दर्शन देणारा श्रीरंग आज श्रीविष्णूच्या मोहिनीरूपात अमृतकलश घेऊन सन्मुख होता… वाट दाखवत… मनाचे शांतवन करीत…
| श्री.उदयन इंदूरकरांचे प्राचीन मंदिरे व मूर्तिकला या संबंधीचे शोधकार्य मौलिक आहे. त्यांच्या ‘एक होतं देऊळ’ या अभ्यासपूर्ण रंगमंच कलाकृतीचे अनेक प्रयोग झाले. ‘देऊळ’ या संकल्पनेचे व त्यातील शिल्पांचे रसपूर्ण विवेचन त्यांच्या ओघवत्या शैलीत ऐकणे हा एक प्रत्ययकारी अनुभव असे. या कथेतील अंगकोरवाटच्या समुद्रमंथनाच्या शिल्पाचे अवतरणचिन्हांमधील वर्णन त्यांच्या समक्ष, त्यांच्या अनुमतीने लिहिले आहे; त्यांनी वाचून मान्यता दिल्यावर ते शब्दरूपात अवतरले आहे . त्यांच्या अकाली निधनाने मूर्तिशास्त्राचा एक विद्वान अभ्यासक आपण गमावला आहे. माझी ही कथा त्यांना आदरांजली आहे. |
