१६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील एका कार्यक्रमात माजी विदेश सेवा अधिकारी व ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना पहिला सी. डी. देशमुख पुरस्कार देण्यात आला. ९८ व्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे सारथ्य करणाऱ्या ‘सरहद’ या संस्थेच्या वतीने या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अनुरूप अशा अनेक व्यक्तींमध्ये मुळेसर अग्रस्थानी आहेत यात काहीच दुमत नाही. मुळे सरांचे हार्दिक अभिनंदन! चिंतामणराव देशमुख यांनी सनदी अधिकारी ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल केली होती. मुळे सरांनाही त्याच मार्गाने जाता यावे ही शुभेच्छा.
एक अर्थतज्ज्ञ म्हणून चिंतामणराव देशमुख यांची कारकिर्द आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांच्या अर्थतज्ज्ञ म्हणून कारकिर्दीचे विश्लेषण वेळोवेळी झाले आहे व होत राहील. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने पुरस्कार देताना त्यांच्या ‘अर्थतज्ज्ञ’ या कामगिरीबरोबरच एक मराठी प्रेमी, मराठी साहित्यप्रेमी व महाराष्ट्र राज्यप्रेमी म्हणून त्यांची असलेली आगळीवेगळी ओळखदेखील विचारात घेतली गेली आहे हे उघड आहे. या संदर्भात; ते नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष होते, त्यांनी मेघदूताचे संस्कृत भाषांतर केले आहे व संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला पाठिंबा देत केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही त्यांनी दिला होता या तीन गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांची कारकिर्द महत्त्वाची आहे. दिल्लीतल्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरची स्थापना त्यांनी केली होती.
सी. डी. देशमुख, दिल्लीत होऊ घातलेले मराठी साहित्य संमेलन याबाबत वाचत असताना मला डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांची प्रकर्षाने आठवण होते आहे. त्याचे कारण स्पष्ट करण्यासाठी त्यांची थोडीफार ओळख सांगितली पाहिजे परंतु त्यांची थोडक्यात ओळख करून देणे म्हणजे आभाळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दुसऱ्या एका प्रतिभावंताची मदत घेतो. डॉक्टर दाभोळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे ‘रंग याचा वेगळा…’ नावाचे पुस्तक अंतर्नादकर भानू काळे यांनी संपादित केले आहे. त्यावर अरुण साधू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यातील काही भाग असा, ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संशोधक. दिल्लीस्थित औद्योगिक संशोधन संस्थेचा दीर्घकाळ संचालक. पॉलिमर केमिस्ट्रीतील दादामाणूस. याचा संचार राजधानीतील सर्वोच्च प्रशासकीय वर्तुळांपासून तो जगभरच्या वैज्ञानिक परिषदा, मुंबई -दिल्लीच्या झोपडपट्ट्या, नर्मदा खोरे ते हिंदी मराठीतील प्रतिभाशाली कवी, साहित्यिकांच्या खाजगी बैठकींपर्यंत. महाराष्ट्र व मराठीच्या जिव्हाळ्याने जीव तीळ तीळ तुटणारा कठोर टीकाकार, मर्ढेकर- कोलटकर- विंदांपासून तो ढसाळ- ढालेंच्या कविता याला मुखोद्गत. हा स्वतः तुफानी वाचक, कवी, लेखक, विचारवंत आणि होय, हौशी म्हणून घेणारा पण भल्या भल्यांच्या विकेटी घेऊ शकणारा पट्टीचा शोध पत्रकार… एवढ्याने संपत नाही. सांगितले ना की, समीक्षेच्या स्तंभात मावणारा हा माणूस नव्हेच.’
दाभोळकरांचे दिल्लीत सुमारे ३०-३५ वर्षे वास्तव्य झाले. साहित्यिक, कवी म्हणून त्यांचे चौफेर कार्यकर्तृत्व सर्वांसमोर आहे; परंतु कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळण्यासाठी त्यांनी व त्यांच्या दिल्लीतील मराठी प्रेमी मित्रांनी केलेली धावपळ मुळातून समजून घेण्यासारखी आहे. या सगळ्यांच्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी व वृत्ती अत्यंत निर्लेप व ‘इदं न मम’ अशीच आहे; तरीदेखील दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनात या अवलिया व कलंदर वृत्तीच्या थोर माणसाचा यथोचित बहुमान झाला पाहिजे. सरहद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो विचार करावा ही विनंती.
भानू काळे व दत्तप्रसाद दाभोळकर
राजहंसकार दिलीप माजगावकर व दत्तप्रसाद दाभोळकर यांची खूप जुनी मैत्री आहे. तिचा उगम दोघांच्याही कविताप्रेमात आहे. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांना उत्तम उत्तम कविता ऐकवत झालेली ही आगळीवेगळी मैत्री आहे. राजहंस प्रकाशनने नुकतेच दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या निवडक कवितांचे संकलन ‘दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या काही कविता’ या नावाने प्रकाशित केले आहे . या प्रसंगी माजगावकरांनी दत्तप्रसादांना लिहिलेले पत्र हे असे आहे :
मैत्री असावी तर अशी ..
या निमित्त या कवितासंग्रहातील काही कविता अंतर्नाद वाचकांसाठी देत आहोत. चांगल्या कविता आणि चांगली निर्मिती असा चांगला योग असलेल्या या पुस्तकात एक धमाल गोष्ट झाली आहे. या पुस्तकाची प्रस्तावना म्हणून दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या १९९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेली प्रस्तावना तशीच येथे दिली आहे त्यामुळे ती वाचताना आपण गोंधळून जातो आणि भलतीच धमाल होते. शेवटी प्रेमात, कवितेत आणि कवितेच्या पुस्तकात सारे काही क्षम्य असते.
म्हातारपणाच्या कविता
(१)
माझ्यानंतर फेकतील घरातून
मी जपून ठेवलेल्या
अनेक गोष्टी
अडगळ म्हणून!
– नशीब माझे
मी त्यात नसणार!
(२)
मनापासून
‘या’ म्हणत नाहीत
उघडपणे
‘जा’ म्हणत नाहीत
खरंच
मुलं आता मोठी झालीत!
(३)
अनाथ बालगृहातील मुलांचे
असहाय अगतिक एकाकी चेहरे
ते चेहरे आनंदी वाटावेत
असं वाटत असेल तर
तर फक्त एक गोष्ट कर
वृद्धाश्रमात एक फेरी मार…!
(४)
म्हातारा होणं
म्हणजे लक्षात येणं
फार फार तर अकरा दिवस
त्यानंतर तर सारेच असतात
आनंदात, उत्साहात
विसर्जन करायला!
(५)
म्हातारा झालोय
विसरणं वाढतंय
आता एक दिवस
रात्री झोपल्यावर
सकाळी उठायचे
विसरायला हवे!
***
या कवितासंग्रहाचा शेवट असा आहे :
घंटा झाली, खेळ संपला
पुसली पाटी, भरले दप्तर
मजेत आता हसत निघालो
घर गाठावे आता सत्वर…
