न हि रसादृते कश्चिदर्थः प्रवर्तते
रसाशिवाय कलेचं कोणतंही कार्य सिद्ध होत नाही.
रसिकतेने आस्वाद घेणाऱ्या जिभेखेरीज आणखी एक रसेंद्रिय म्हणजे मन. रसाळ लेखनाचा आस्वाद घ्यायला मन आसुसलेले असतं. हा रस म्हणजे नक्की काय? खरंतर या प्रवाही शब्दाचा अर्थ चिमटीत पकडता येत नाही. भरत म्हणतो जसा अन्नरस तसा नाट्यरस! अन्नाची चव व्यंजनांनी – मसाल्याने वाढते, चवीत वैविध्य येतं तसं रसांमुळे भावनांचं वैविध्य निर्माण होतं.
यथा बहुद्रव्ययुतैर्व्यञ्जनैर्बहुभिर्युतम्
आस्वादयन्ति भुञ्जाना भक्तं भक्तविदो जनाः
भावाभिनयसंबद्धान् स्थायिभावांस्तथा बुधाः
आस्वादयन्ति मनसा तस्मान्नाट्यरसाः स्मृता
रस हा कथाकाव्याचा आत्मा मानला जातो. जीवनात येणारे आनंदाचे, दुःखाचे, भीतीचे, किळसवाणे असे विविध प्रसंग शब्दांतून जसेच्या तसे उभे करणं – यात योग्य शब्दांचा, अलंकारांचा उपयोग करणे म्हणजे भरताला अभिप्रेत व्यंजने घालणे, प्रसंग जहाल किंवा अगदी सपक होऊ न देता वाचणाऱ्याच्या मनावर ठसेल, असं चित्र उभं करणं म्हणजे रसनिर्मिती.
काव्यात हौशीने नवनवीन प्रयोग करणाऱ्या विठ्ठलाच्या कथाकाव्यात रसांचा परिपोष दिसतो. त्यासाठी तो वेगवेगळ्या कल्पना लढवतो. या भागात विठ्ठलाच्या रसनिर्मितीचा आस्वाद घेऊ या.
शृंगार वीर करुणाद्भुत रौद्र आले
शांता बिभत्सक भयानक आठ झाले (११६/११)
यांतला पहिला रसराज – शृंगार रस
भानुदासाने लिहिलेल्या रसमंजरीचा सहज सोप्या भाषेत अनुवाद करताना नायिकांच्या वर्णनातून विठ्ठलाने शृंगाररसाचे विविध विभ्रम दाखवले आहेत.
(पृथ्वी)
तमालतरु दाटती बहुत मालती फूलती
सुवाससुख भोगिती भ्रमरपुंजही गुंजती
अशी सुंदर वातावरणनिर्मिती करत शृंगाररसाला जणू ते आवाहन करतात. एका एका नायिकेची ओळख करून देतात. वानगीदाखल ही
मुग्धाभिसारिका –
बहरून आलेली रात्र, रातकिड्यांच्या किरकिरीची साथ हा दयितेसाठी (प्रियतमेसाठी) मिलनाचा प्रहर… तुझी त्रपा लज्जा त्याग आणि मिलनासाठी उत्सुक हो…
(शार्दूलविक्रीडित) २३४/३७
झिल्लीचे रव होति तेचि तिमिरीं मांगल्य जल्पे क्षपा|
जालासे दयिताभिसार समयो मुग्धे! त्यजावी त्रपा|
२३२/३० परकिया वासकसज्जा
मला आईकडील समारंभाला जायचे आहे असं सांगून दिवे मालवून सासूला बळेच झोपवणारी वासकसज्जा कबुतरांच्या आवाजाने अस्वस्थ झाली आहे.
सासेला निजवी प्रदीप विझवी सौधगृहाभीतरी आकर्णीं श्रवणीं कपोत घुमती चेष्टा बुजे सुंदरी
सूचक शृंगाराचा अनुवादही ते यथातथ्य करतात. त्यातला संकेत चट्कन लक्षात येत नाही हेच सूचक शृंगाराचं महत्त्व! (२२५/२२)
घरधनी सेवकाला सांगतो,
‘ त्वरित हा बदरीद्रुम तोडिं का’
‘बदरीवृक्ष तोडून टाक’ हे कानी पडल्यावर
अइकतां रमणी अतिशाहणी
त्यजि जळांत हिंवांत कुठारिणी
रमणी गुपचूप कुऱ्हाड पाण्यात फेकून देते.
का बरं असं करत असेल?
मूळ संस्कृत काव्यात स्वचौर्यरतस्थानभूत असे शब्द आहेत… प्रियकराला भेटण्याचं स्थळ तो बदरीतरू असल्याने संकेतस्थळ नाहीसं होईल या भयाने ती झाड तोडायच्या कुऱ्हाडीलाच जलसमाधी देते.
पतिपत्नी प्रेम, नायक नायिका यांचं प्रेम याशिवाय पुरयोषांचंही – पुर = नगर, योषा- स्त्री – नगरवधू – वेश्या) क्षणकालिक प्रेम वाचायला मिळतं. जोडीदारावर आपलं किती प्रेम किती आहे हे दाखवण्यासाठी आणि या प्रदर्शनातून थोडे पैसे मिळावे यासाठी पती प्रवासाला जायला निघाल्यावर ती चक्क डोळ्यांत मिरची घालते आणि डोळ्यांत खोटे पाणी आणते. त्याच्यावरचं प्रेम दाखवायचा आटापिटा करते.
२२८/६
विठ्ठल ही नायिका कशी रंगवतात –
विरह विदित व्हावा
प्रेम कांतासि दावी
पुनरपि धन द्यावें
आपुली प्रीति लावी
मरिच नयनपद्मीं
घालुनी बाष्प आणी
धृत उभि पुरयोषा
द्वार कांतप्रयाणीं
विप्रलंभ शृंगार (विरहावस्था) (२८१/ ८१) (अनुवान नव्हे. विठ्ठलाची रचना)
हरिच्या वियोगें माय झाली पिशी कसें बोलूं तरी काय
मलयपवन चंदन उपवन घन सुमनशयन मृदु व्यजनपवनपरि दहन
गमे मजला व्यर्थचि हा जीव जाय
कुसुमशर शर विखरि मजवरि –
मलय पर्वतावरचे वारे, चंदन, फुलांची शय्या, पंख्याचा शीतल वारा कशानेही तिचा दाह शमत नाही. पुष्पबाण- म्हणजे मदनाची बाधा झाली आहे त्यामुळे व्याकुळलेली नायिका श्रीकृष्णाची आळवणी करत आहे.
विठ्ठलाचा शृंगाररस कधी अश्लीलतेकडेही झुकलेला आढळतो. (२९३)
माझ्या घरांत येउनि गोविंद करि नानापरिचे छंद…
माझ्या सुनेस गे! धरिलें
तिला बळेंच गे! चुंबिलें,
२८२-८४
फडफडां मडकीं फोडितो
मजनिकट डोळे मोडितों
यातून शृंगार दिसत असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या रसनिर्मितीला मारक ठरतो.
स्थायीभाव उत्साह असलेला वीररसही विठ्ठलाच्या रचनेतून मुक्त झरतो.
रामाने प्रत्यंचा ताणताच कडाडलेलं धनुष्य हा वीररसाचा एक आविष्कार!
४६/१८ (शार्दूलविक्रीडित)
दोर्दंडें उचलोनियां चढविले कर्णांत ते ओढिलें
रामानें सहवर्तमान मुनिच्या कोदंड उच्चालिलें
धनुष्य उचलून आकर्ण ताणलं… आणि…
घोषे चाप कडाडिलें रघुपती कोदंड ओढी बळें
तेव्हां कोटि कडाडिलें घन विजा कोदंडकोलाहलें
सीमा सांडिति सिंधु मस्तक तुकी शंभु स्वयें आपुलें
ते सर्वै भुप राम शक्ति नयनीं देखोनि वेडावले
समुद्र उचंबळून वर आला आणि शंकरानं या पराक्रमाला लवून नमस्कार केला.
कोपे शेष उलंडली उडुगणें हेलावला वारिधी
राजे विस्मित राम सस्मित उभा, जो शौर्य तेजोनिधी
निर्घोषें बहु गर्जल्या नभ दिशा संपूर्ण नादें भरे
सीतेच्या स्फुरती भुजा रघुविरा भेटावया आदरें
उत्साहाने सळसळणारा हा वीररस कौरव पांडव युद्धप्रसंगी(२०१) योद्ध्याची वसने लेऊन येतो.
(कटिबंध)
त्या रणिं शोभति येरयेर संहार कराया
स्वार तदा तल्वार झळकविति…
भेरी गर्जति धों धों धों धों झं झं झांगड, झनन नगारे
धोंधों, झांगडसारख्या अर्थहीन शब्दांच्या पुनरावृत्तीतून उत्साहाचं शिंपण घातलं जातं.
स्थायीभाव क्रोध असलेला रौद्ररस वीररसापेक्षा वेगळा! १०८/२८
कृष्ण आणि रुक्म्याच्या युद्धातील श्रीकृष्णाचा आवेश म्हणजे मूर्तिमंत रौद्ररस
(चाल : ध्यायेदाजानुबाहुं – स्रग्धरा)
गर्वाचा क्रूर ताठा धरुनि करितसे वीर संग्रामलाठा
शस्त्रास्त्रें मंत्र पाठांतर सकळ जपे आवृती आठआठा
चावी सक्रोध ओंठा थरकुनि उठले कंप रोमांच कंठा
योजी रुद्रास्त्र पीठावळिसहित रणीं प्रार्थिलें नीलकंठा
ठा चा मध्यानुप्रास उपयोजत, त्यातून परुषावृत्ती अनुप्रास गुंफत रौद्ररस निर्माण केला आहे. चावी सक्रोध ओठा यातून रौद्र रसासह स्वभावोक्ती अलंकारही त्यांनी खुलवला आहे.
भुजंगप्रयातासारख्या गंभीर वृत्तातही चेहऱ्यावर पसरलेल्या रौद्र रसाची लक्षणे त्यांनी रेखली आहेत. (१०८/२९)
जटाजूट निर्मुक्त भूमीस लोळे
मिशा पिंगटा खांड आरक्त डोळे
नभीं मूर्धनी वक्त्र विक्राळ दाढा
असा चालिला रुद्र युद्धासि गाढा
१९१/१४३ रजस्वला द्रौपदीला सभेत आणल्यावर इतर मुखदुर्बळ हातावर हात ठेवून बसले असताना द्रौपदी रुद्रावतार धारण करते आणि म्हणते :
भक्षिते विरमांस शोणित मारिते रजनीचरा
दैत्यदानववीर मानव त्यासि अंतरिं भेदरा…
अशी कोण? (भुजंगप्रयात)
जरा मृत्यु नाहीं गदा नाव तीचें
करी सर्व निर्मूळ नक्तचरांचें
तिचें नाम घेतां पडे सर्व श्रांती
वसे तेच अंकीं तुझे प्राणहर्ती
( जरा= म्हातारपण, नक्तचर – राक्षस)
जरामृत्यू नसलेल्या आयुधाने म्हणजे गदेने
अशा नराधमांचा मृत्यू लवकरच होईल;इतकेच नव्हे; तर…
कुटील नेत्र जीभ रे! रणांत गीध भक्षिती
त्याचे वासनासक्त डोळे आणि जीभ गिधाडं खाऊन टाकतील अशी शापवाणी उच्चारते. हा रसप्रकर्ष अंगावर रोमांच उठवणारा आहे.
रुक्मिणी स्वयंवराआधीच्या महाभयंकर युद्धात (१००/३४)
(शावि)
पूरें तुंबळ दूथडी रणनदी रक्तोदकें दाटली
प्रेतें भीमभयानकें उसळती गोठोनि कोंदाटली
अशी अवस्था झाली. रक्ताचे पाट वाहत होते आणि प्रेतांची खच पडला होता.
युद्ध इतकं निकराचं होतं ‘नाचती रणमहीस कबंधें’ असं वर्णन विठ्ठल करतो.(९९/२८)
काहींचे दात पडले. विठ्ठल म्हणतो (पृथ्वीवृत्त)
खळाळ पडले नदी दशनवालुवेचे रवे
वाळूचे बारीक कण पसरावे तसे दातांचं चूर्ण पसरलं…
या रौद्ररसाचीच पुढची पायरी असावी असा भयानक रस; पण याचं मूळ आहे भीती. खलनायकाच्या आविर्भावातून, बोलण्यातून भीतीची लहर शरीरभर दौडत जाते आणि भयानं तनू कापू लागते.
३७/१०
प्रचंड धनुष्य समोर आणून ठेवल्यावर रावण घाबरला नाही.
म्यां नाहीं नृप जिंकला रणभुमी तो कोण आला असे?
माझा दर्प सुरेश्वरा, भय बहू शेषासि माझें असे
असं दर्पयुक्त विधान करत
भूची घालिन मी घडी, उतरडी पाडीन मी स्वर्गिंच्या
पाताळें उकलूनि बांधिन चऱ्या लंकेचिया दुर्गिंच्या
अशी प्रौढी तो मिरवतो. त्याच्या या अवतारातून राजसभेत भीती पसरते. सीता प्रार्थना करू लागते,
‘सावित्री शचि काळरात्रि धनुषीं बैसोत धन्वंतरी!’ असं आवाहन करत ‘धनुष जड करावें’ ही इच्छा व्यक्त करते. रावणानं धनुष्य उचललं तर… हे भय ही भावना मूलस्थानी असल्याने हा भयानक रस.
याच्या उलट हास्यरसाचेही विविध स्रोत विठ्ठलाच्या काव्यात दिसतात.
११६/१२
रुक्मिणीच्या वऱ्हाड्यांमध्ये गणपती सगळ्यांत आधी निघाला आहे. त्याचं पोट सावरत अडखळत चालणं पाहून वऱ्हाडी हसू लागतात.
मोठे पोट विशाळ ओठ मिरवे सिंदूर सोंडेवरी
थोंटा दंत, गणेश मूर्त अवघ्या आधी निघाला परी
पायीं आंखुड चालतां लटलटां तो जातसे चांचरी (अडखळत)
हे देखोनि वऱ्हाडिणी गदगदां हांसेति निम्नोदरी
भरतमुनींनी सांगितलेल्या हास्यरसाच्या चार विभावांतील विकृत-परवेष-अलङ्कार आणि व्यङ्गदर्शन हे दोन आताच्या काळात निखळ हास्यकारक वाटत नाहीत. विठ्ठलाने केलेला विनोद काही वेळा व्यंगावर टीका केल्याने निकृष्ट दर्जाचा वाटतो.
हास्याचा दुसरा प्रकार म्हणजे मिस्कीलपणे फुकाचा माज उतरवणं. (५९/११)
श्रीराम सीताविवाह प्रसंगी मिरवणूक निघाली आहे. ‘चालावयासि धरणीप्रति मार्ग नाही,’ अशी अवस्था झाली आहे. या गर्दीत वेश्या आणि पतिव्रता – पिंगळेसारखी सौंदर्यवती रघुरामापुढे नाचत आहेत. संन्याशांना त्यांचा धक्का लागल्यावर ते खवळतात आणि दंडाने मारतात…
वेश्या म्हणतात – “आम्हांलागुनि कां विटाळ करितां” आणि कुचेष्टेने हसतात.
वेश्यांना संन्याशांचा स्पर्श झाल्याने वेश्या विटाळल्या गेल्या असा त्यांनी हसत हसत मारलेला टोमणा सडेतोड उपदेशामृत पाजतो.
‘नाही वृत्ती निमग्न तोंवरि कदा संन्यास घेवों नये
दोषादोषविटाळ त्याप्रति कदा श्रीराम ना सांपडे||
१११,४४
खलनायकाला अद्दल घडली की येणारं खदखदून हसू हा आणखी एक प्रकार.
रुक्मिणीचं स्वयंवर रुक्म्याच्या मनाविरुद्ध झालं. त्यामुळे रुक्मिणी थोडी व्यथित ही झाली होती. श्रीकृष्ण तिला म्हणतो,
“तुझ्या भावाला मी काही मारलं नाही; फक्त त्याची अर्धी मिशी काढली आणि डोक्याच्या मधल्या भागातले केस काढले; शिवाय
‘नागमूत्र वदनासि लाविलें
चूर्णलेपन करूनि गोविलें.
नाग म्हणजे हत्ती (संस्कृत) – हत्तीचं मूत्र तोंडाला फासून वरून चुन्याचा लेप फासला. ऐकायला हे भीषण वाटत असलं तरी खलनायकाला दिलेली शिक्षा वाचून हसू येतं.
शाप, क्लेश, नाश, संकट, मृत्यू यांचं सावट असलेल्या करुण रसात आर्तता, जीव ओतून केलेल्या कार्याची विधूळवाट यांची गढूळ छाया पसरलेली असते. विरहाची व्यथा हेही करुणरसाचे कारण असते.
२३१/२२
रसमंजरीत मुग्धा उत्कंठितेचं वर्णन येतं. ती प्रियकराची वाट बघत आहे. ( शा. वि.)
‘कां अद्यापि न ये गृहा’ मनिं म्हणे ‘अन्यांगने’ पावला
लज्जेनें न पुसे सखिप्रति कदा कंदर्प झेंपावला
दीर्घ श्वास न टाकिले,थबकली, पाहे न कोणाकडे,
तापे पक्वपलांडुपांडुरनिभा दोहीं कपोलीं पडे
विरहामुळे तिच्या दोन्ही गालांवर कांद्याच्या रंगाची छाया पडली आहे म्हणजे तिचा चेहरा फिकट पांढरा पडला आहे. शार्दूलविक्रीडितात ‘पक्वपलांडुपांडुरनिभा’ हा दहा अक्षरी समास बसवताना, रचना कौशल्य ठसठशीत आणि रसास्वाद मात्र फिकट झाला आहे.
९९/३०
रुक्मिणी स्वयंवराच्या आधी
मारी वज्रहलें हली (बलराम) स्वमुसळें निर्जीव केली दळें
असा संहार होतो. भयव्याकूळ झालेलं निर्बळ सैन्य जमिनीवर कपाळं ठेवून रडत असतं… छाती बडवून घेत असतं.
दुःखें पाणितळें पिटीति विपुळे विस्तीर्ण वक्षस्थळें
असा करुण प्रसंग समोर दिसत असताना याला अचानक अध्यात्माची डूब मिळते :
यंत्रांचे (तोफांचे) भडिमार होति समरीं
धूम्रें दिशा दाटल्या
चौथीतें परिणावया रणमखीं वीरीं उड्या
घातल्या!
चौथीशी लग्न करण्यासाठी आपल्या जिवाची आहुती दिली हे ऐकायला विचित्र वाटतं. चत्वार मुक्तीची आध्यात्मिक संकल्पना सर्व श्रोत्यांना माहीत आहे हे विठ्ठल इथे अध्याहृत धरतो.
सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता या चार मुक्ती सांगितल्या आहेत. त्यांतल्या चौथीला भेटण्यासाठी म्हणजे ईश्वराशी एकरूपत्व साधण्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले असा वळसा विठ्ठल देतो.
माणसांप्रमाणेच निसर्गाचीही करुणावस्था विठ्ठल वर्णितात.
इंद्राच्या कामुकपणामुळे, कपटामुळे अहल्येलाही गौतम ऋषींनी शाप दिला. पुढे तिची फसवणूक झाली होती हे लक्षात आल्यावर ते फार दुःखी झाले. ते राहत होते तिथली एकाकी अवस्था(२६/३७,३८)
श्वापदे पळति वृक्ष जळाले
कोरडे नदी सरोवर झाले.
परित्यागिलीं रम्य नीडें पवित्रें
तरू शुष्क झाले समूळाग्रपत्रें
न राहे वनामाजि मुंगी न मासी
गतक्रोध वैराग्य ये गौतमासी
निसर्गाचं बोडकेपण, विरहाचं दुःख, पराभवाची ठसठस अशा विविध प्रसंगांतून करुण रसाचं प्रवाहीपण उठावदार होतं.
विठ्ठलाच्या पोतडीतून बीभत्स रसही येतो.
गणेशाच्या रूपावरून त्याची थट्टा उडवल्याचं आपण पाहिलंच आहे. गणेशाला ‘महाक्षोभ’ आला. त्यामुळे (११६/१३)
‘हाग ओक सुटली वऱ्हाडिणी’
अशी वऱ्हाडाची अवस्था झाली.
शिवधनुष्य उचलायचा प्रयास करताना रावण तर खाली आदळलाच; शिवाय
रक्ताच्या उलट्या वमे भडभडां प्राणांत आरंभिला
अशी गत झाली. (४३/५२)
गंमत म्हणजे हे बीभत्स वर्णन करताना विठ्ठल रावणाची दहा तोंडं विसरत नाही.
टाकी श्वास घटोदके मग मुखें प्रक्षाळिली रावणें (४३/५३)
हे वाचताना रक्ताच्या उलट्यांमुळे बीभत्स रसाचा परिपोष होण्याऐवजी दहा तोंडं धुणाऱ्या रावणाचं चित्र समोर येऊन हसू येतं.
या प्रासंगिक वर्णनांखेरीज त्यांनी बीभत्स रसातून जीवनाचं खरं रूपही मांडलं आहे. आपला देह हाडं, फासळ्या आणि चामडं यांचा असतो, तो काळाचं बाहुलं आहे हेच अंतिम सत्य आहे असं ते सांगतात.
१३३(शा. वि.)
रक्तीं वीर्य भलें जमोनि रचिलें चर्मास्थिचें बाहुलें
जें गर्भीं पचलें कृमीं कवळिलें दुर्गंधीचें पोतलें
पोटीं मूत्र पुरीष पेव भरले रोगें अती सांचिलें
काळाचें जरि भातुकें तुज मना! सांगीतलें विठ्ठलें
२५१ पदसंग्रह
वृद्धपणीं बहु दमा खोकला बडकीं लाळ गळे
बोथरें तोंड, डोळे पींवळे
या पंक्तीत स्वभावोक्ती अलंकार ठळक होतो आणि बीभत्स वर्णनातून अंतर्मुखता उपजते.
अद्भुत रस
रुक्मिणी पाय चुरत असताना श्रीकृष्णाच्या कानीं भक्ताची हाक येते – ‘भक्तया कोण हा गांजियेला’ १९६/१८६ असा विचार येताच द्रौपदीचा धावा ऐकू येतो.
द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा आदेश येताच
‘जसा बोलतो भूप संताप कोपें (१९७/१९७)
तसे चैल आसूडले काळरूपें’ – चैल म्हणजे वस्त्र)
पण…
पुढे चैल आसूडले लागवेगें
दुजें देखिलें हेमरंगी सुरंगें…
तो वस्त्र ओढत राहिला
सभेत लोटला सिंधु दिव्यांबराचा
हरू लागला बंधु दुर्योधनाचा
असा हा विस्मित करणारा अद्भुत रस. यात विठ्ठलाने विविध ठिकाणच्या साड्यांची वैशिष्ट्ये, रंग, पोत काव्यात गुंफून ज्ञानप्रदर्शन मांडले आहे. त्यामुळे अद्भुत रसाच्या आस्वादाऐवजी रसहानी होते.
भरताने सांगितलेल्या रसांखेरीज इतरही रस काव्यात मौज आणतात.
आनंदरस
११४
रुक्म्याचा पराभव झाल्यावर सर्वत्र आनंदीआनंद झाला. (स्रग्धरा – ध्याये नित्यं महेशम्)
शृंगें वंशी दमामे पणव रणतुरें शंख भेरी उधंटा
धों धों त्रों त्रों उतारे मुरज किणकिणी झल्लरी टाळ घंटा
वाद्यांच्या चंडघोषें नभ दुमदुमिलें
भाट गाती पवाडे
ऐसे आले प्रभा आज मिरवत गजरें लोक झाले पुढारे
असाच आणखी एक प्रसंग
रामचंद्राने धनुर्भंग केल्यावर सीतेचा आनंद गगनात मावेनासा झाला… विठ्ठल म्हणतो
‘सीता हास्य करीतसे गदगदां’ (४३/५०)
यातल्या गदगदा शब्दातून तो अत्यानंद श्रोत्यांना जाणवतो.
विठ्ठलाच्या आवडीचा आणखी एक रस म्हणजे खाद्यरस
स्वयंवर झाले आणि भोजनाच्या पंक्ती मांडल्या. जेवणाचा बेत वाचून कवी विठ्ठल चांगलाच खवय्या होता हे दिसून येते
१२२
रुक्मिणी स्वयंवरात त्याची खवय्येगिरी बहरून येते.
‘ लवणमिरकुटाचीं रायतीं एकहारी’
वाढून झाल्यावर भात वाढला. पांढऱ्या शुभ्र भाताचं वर्णन ते करतात,
‘लखलखीत जैसा शरच्चंद्रमा’
मग येतात
क्षीरी पंचवरान्न (पाच प्रकारच्या खिरी आणि वरण)
पापड, वडे, लाडू यथाक्रमा
मांडे तेलवऱ्या बऱ्या गुळवऱ्या
घाऱ्या पुऱ्या फेनिया! आमरस आहेच आणि केळ्याच्या शिकरणीला शिखरिणी वृत्तात बसवून आणली आहे…
रसाळे आंब्यांचे रस मधुर वाढीति विहिणी
सुपक्वा केळ्याच्या रुचिकर अमूपा शिखरिणी
आणखी गंमत म्हणजे चामर या जलदगती वृत्तात
लेह्य, पेय, चोष्य, खाद्य, भक्ष्य, भोज्य आणिलें
चाटून खायचे, पिण्याजोगे, चुपून खायचे असे विविध प्रकारही गुंफले आहेत.
विविध रसांचा अनुभव घेत हा रसप्रवास शांत रसापर्यंत जाणं अपेक्षित असतं. मनातले उन्माद, भय, औत्सुक्य हळूहळू आतल्या आत विरत गेलं की मनाचा गाभारा शांतरसाने भरून जातो. संतांच्या काव्यातून शांतरसाची झलक जाणवते आणि आपल्या मनालाही किंचित्काल ती अनुभूती मिळते.
तत्त्वज्ञान हा स्थायीभाव असलेला हा शांतरस गवसला असं विठ्ठल म्हणतो.
संतसंग याची देही लाभला भला
निरतिशय सुखद गा! मला
नाना योनीं सतत श्रमतां
अवचट मार्ग उमजला
निजधन माझे मज सांपडतां
दृढ परमार्थ समजला
विठ्ठल प्रियकर सज्जनीं पाहतां
सहज भवजलधी शमला
पण इथेही भावापेक्षा लाभला भला, उमजला, शमला असे अंत्यानुप्रास जुळवण्यात, शब्दांच्या प्रेमात विठ्ठल रंगला आहे असं वाटतं. संतकवी आणि पंतकवी यांच्यातला हाच मुख्य फरक आहे. संतकवी भक्तीत रंगले होते आणि तटस्थपणाने सूत्रधार ईश्वराने रचलेले नाट्य साक्षीभावाने पाहत होते.
पंत कवी विठ्ठल स्वतः सूत्रधार होऊन साहित्यप्रतलावर नाट्य दर्शवणारा कलाकार आहे. संतकवींच्या आंतरिक तळमळीची जातकुळी वेगळी आणि विठ्ठलाच्या काव्यशृंगाराची वेगळी. सर्वच वाचकांना अध्यात्माची ओढ असते असं नाही. भाषेच्या अलंकारांवर, विभ्रमांवर, कथानकांवर ते लुब्ध असतात. खलदुर्जनांचा नाश आणि आनंदीआनंद या पायरीसाठी आसुसलेले असतात.
विठ्ठलाच्या काव्यातील नाट्य आणि अलंकार पुढच्या भागात…
(संदर्भ : महाराष्ट्रकवि विठ्ठलकृत कवितासंग्रह :संकलन वामन दाजी ओक)
